Source
जलसंवाद, जानेवारी, 2018
उत्तर प्रदेशात सोऩभद्र जिल्ह्यातील पिंप्री येथे रिहांद नदीवर बांधल्या गेलेले हे धरण होय. तसे पाहू गेल्यास हे धरण उत्तर प्रदेश व मध्यप्रदेश या दोन राज्यांच्या सीमेवर बांधण्यात आले आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगढ या तीन राज्यांशिवाय बिहार राज्याला सुद्धा या धरणामुळे सिंचनाचा लाभ मिळत आहे.
या धरणाचे बांधकाम १९५४ पासून सुरु झाले व १९६२ साली ते पूर्ण झाले. या धरणाची उंची ९१ मीटर असून लांबी ९३४ मीटर आहे. या धरणाची जल धारण क्षमता १०.६ बीसीएम एवढी आहे. धरणामुळे जे सरोवर निर्माण झाले आहे त्याचे नांव गोविंद वल्लभ पंत सागर असे ठेवण्यात आले आहे. या सरोवराला ५१४८ चौरस किलोमीटर परिसरातून पाणी मिळते. या धरणावर वीज निर्मितीही होते. त्यासाठी ५० मेगॅवॅटची ६ जनित्रे बसविण्यात आली आहेत. या धरणाच्या उभारणीवर एकूण ३७५ दशलक्ष रुपये खर्च आला आहे. सध्या या धरणाची अवस्था समाधानकारक नाही. ते जीर्णावस्थेत आहे. त्याच्या उद्धारासाठी सरकारने योजना आखल्या आहेत.
या धरणाच्या परिसरात अनेक वीज निर्माण केंद्रे आहेत. तिथे कोळशापासून वीज निर्मिती होते. सिंग्रोली, विद्यांचल, रिहांद, अंपारा, सासन, रेऩूकेत या ठिकाणी तर सुपर थर्मल पॉवर स्टेशन्स आहेत. त्यामुळे निर्माण झालेली राख याच धरणात सोडली जाते. त्यामुळे या धरणाचे पाणी प्रदूषित झाले असून शेतीच्या कामासाठी त्या पाण्याचा वापर होणे कठीण झाले आहे. या परिसरातील वीज निर्मिती के्ंरद्रांमधून जवळपास २०,००० मेगॅवॅट वीज निर्मिती होते. त्यासाठी या सरोवरात जमा झालेले पाणीच वापरल्या जाते. ते प्रदूषित वापरलेले विषयुक्त पाणी पुन्हा याच सरोवरात सोडले जाते. यामुळे जवळपासच्या भागातील भूजलही प्रदूषित झालेले आहे. एवढेच काय तर या ठिकाणच्या पाण्याचे सेवन करुन काही माणसे दगावलीही आहेत. पंडीत नेहरु या धरणाच्या उद्घाटन प्रसंगी म्हणाले होते की या धरणामुळे या प्रदेशाचे स्वित्झरलंड होऊ शकेल पण आज येथील परिस्थिती पाहिली तर एक वेगळेच चित्र आढळते.
या धरणाजवळील विद्युत केंद्रामध्ये निर्माण झालेली वीज उत्तर प्रदेश सिमेंट, रासायनिक कारखाने, टायर आणि ट्यूब तयार करणारे कारखाने, रासायनिक खते तयार करणारे कारखाने, अॅल्यूमिनियम, कॉस्टिक सोडा, क्लोरीन, पोर्सिलीन, कागद आणि कागदाचे बोर्ड, प्लास्टिक आणि विद्युत कारखाने यासाठी वापरली जाते. मासेमारी संवर्धन, पाण्यातील खेळ, नौकानयन, पूरावर नियंत्रण, जंगल विकास आणि जमिनीच्या धूपेवर नियंत्रण या गोष्टी या धरणामुळे साध्य होणार होत्या.