भूजलाचे पैलू - भाग १

Submitted by Hindi on Sat, 08/12/2017 - 13:29
Source
जलसंवाद, ऑगस्ट 2017

(महाराष्ट्रातील भूजल समजून घेताना त्याचे तांत्रिक, आर्थिक, सामाजिक व पर्यावरणीय पैलू जाणून घेणे अत्यंत महत्वाचे आहे. या लेखमालेच्या माध्यमातून हे सर्व पैलू विस्ताराने सोदाहरण मांडण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यात महाराष्ट्रातील भूजलाची निर्मिती, प्रवास, वारसा, उपलब्धी, वापर, गुणवत्ता, व्यवस्थापन, संहिता, धोरण अशा क्रमाने या सर्व पैलूंची उकल करण्यात येणार आहे).

दक्षिणी कातळ खडकांचे स्तर सर्वसाधारणपणे जाड समांतर वडीच्या आकाराचे असतात व त्यांची क्षेत्रिय व्याप्ती बरीच मोठी असते. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभाग व इतर वैज्ञानिकांनी केलेल्या अभ्यासानुसार बेसाल्ट खडकांत जवळपास ३२ लाव्हा थर आढळतात. सर्वसाधारणपणे प्रत्येक थरात भरीत/कुहरी (Vesicular / Amygdolodal Basalt) व अकुहरी (Compact Basalt) असे दोन भाग आढळतात. ग्रामीण भागात त्यांना अनुक्रमे मांजर्‍या व काळा पाषाण असेही म्हणतात.

वैज्ञानिक पैलू : पाण्याचा स्रोत एकच, तो म्हणजे पाऊस. पावसाद्वारेच आपल्याला पाणी मिळते. जमिनीवरील पाणी म्हणजे भूपृष्ठ जल व जमिनी खालील पाणी म्हणजे भूजल. वैज्ञानिक दृष्ट्या बघितले तर या पाण्याच्या दोन अवस्था आहेत आणि त्याही परिवर्तनीय. थोडक्यात काय, तर पावसाळ्यात नाले, नद्या यां सोबतच जमिनी वरुन देखील पाणी वाहते व ते भूपृष्ठावर साठवलेही जाते. या प्रवासात हे पाणी प्रथम मातीच्या ओलाव्यात साठले जावून तो संपृक्त झाल्यावर गुरुत्वाकर्षणाद्वारे जमिनीखाली उताराच्या दिशेने वाहात जावून खडकांत साठवले जाते. खडकात साठवलेल्या या पाण्यालाच भूजल असे संबोधले जाते. भूजलाची साठवण धारण करणार्‍या व ते उपलब्ध करुन देणार्‍या खडकाला जलधर म्हणतात. जलधरांच्या साठवण क्षमतांनुसार भूजल साठा कमी अधिक होत असतो. एकदा का हा खडक संपृक्त झाला की मग हे पाणी जलधरांमधून झर्‍यावाटे बाहेर पडण्यास सुरवात होवून ते पुन्हा नदी नाल्यांमध्ये प्रगट होते. यालाच बेस फ्लो असे म्हणतात. दरवर्षी ऑक्टोबर नंतर नदी नाल्यांमध्ये वाहणारे स्वच्छ पाणी म्हणजे दुसरे तिसरे काही नसून भूजलच आहे. पाण्याचा प्रवास अशा प्रकारे दोन अवस्थांमधून होत असतो. आणि म्हणूनच जलचक्रातील या दोन अवस्थांचा जल नियोजनासाठी एकत्रित विचार करणे गरजेचे आहे.

भूपृष्ठजलाची उपलब्धता स्थळ व काळ सापेक्ष आहे, मात्र भूजलाची उपलब्धता स्थळ, काळ व खोली सापेक्ष आहे. भूपृष्ठावरील पाणी धरण/ बंधारे या मध्ये अडवून ते अचल होत असल्यामुळे त्याचा विकास व व्यवस्थापन करणे सोईचे होते. परंतु भूजल हे चल असल्यामुळे ते सतत उताराच्या दिशेने वाहात असते व एका जागी साठवुन ठेवता येत नाही. तसेच भूजलाचा प्रवास न दिसणारा, अतिशय अवघड व कठिण. म्हणूनच भूजलाचा विकास व व्यवस्थापन अतिशय गुंतागुतीचे आहे. जसा मानवाचा स्वभाव वर्तविणे कठिण तसेच काहीसे भूजलाचे देखील आहे. म्हणूनच भूजलाचा विचार करताना तो वैज्ञानिक अभ्यासाचे आधारे होणे अनिवार्य आहे.

शरीरशास्त्र व भूजल शास्त्र यांत खूप साधर्म्य आहे. जसे रक्त तपासणीसाठी शिरेतूनच रक्त काढावे लागते, त्याच प्रमाणे खडकातून भूजल काढण्यासाठी भेगा/संधी/भ्रंश यांवरच विहीर/विंधन विहीर खोदल्या गेल्यास पाणी उपलब्ध होते. तसेच शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास सलाईनद्वारे थेंब थेंब पाणी थेट नसांमध्ये पोहचवले जाते, त्याच पध्दतीने जलधरांमधील भूजल साठा वाढविण्यासाठी कासवाच्या गतीने पाणी भेगांमधून मुरवावे लागते.

पर्जन्यमान : महाराष्ट्रातील भूजल संपत्तीचा संचय व उपलब्धता मुख्यत्वे पाऊस, भूपृष्ठीय स्थिती व भूशास्त्रीय स्थिती यावर अवलंबून आहे. या तीन परिमाणांमध्ये पाऊस हा दरवर्षी बदलणारा आहे. तथापि भूपृष्ठीय व भूशास्त्रीय स्थिती मात्र वर्षानुवर्षे न बदलणारी आहे. भूजल हे दरवर्षी पावसातुनच निर्माण होत असल्यामुळे पावसाच्या कमी जास्त प्रमाणामुळे भूजलाचे प्रमाण देखील दरवर्षी कमी अधिक होत असते. महाराष्ट्रात वेगवेगळ्या प्रदेशात पडणार्‍या सरासरी पावसाचा विचार करुन राज्याची विभागणी तीन प्रमुख भागात करता येते.

अति पर्जन्यमानाचा प्रदेश: पश्‍चिमी समुद्र व पश्‍चिम घाटाच्या मध्ये असलेला साधारणपणे ०.३० लक्ष चौकिमी क्षेत्रात प्रामुख्याने कोकण विभागातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे. या भागात सरासरीने २००० त ३००० मिमी पाऊस पडतो. सह्याद्रीच्या शिखरांवर काही ठिकाणी तर ४००० ते ६००० मिमी पाऊस पडतो. या भागातील उतार तीव्र असल्याने जास्त पर्जन्यमान असुनही भूस्तराच्या मर्यादांमुळे भूजलाची निर्मिती मात्र अत्यल्प होते.

मध्यम पावसाचा प्रदेश : नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी व कोल्हापूर या जिल्ह्यातील १.२७ लक्ष चौकिमी भाग शाश्वत पर्जन्यमानाच्या पट्टयात समाविष्ट होतो. ह्या प्रदेशात सरासरी ८०० ते १५०० मिमी पाऊस पडतो. या भागात उतार मध्यम स्वरुपाचा आहे. तसेच भूस्तरांची पाणी धरुन ठेवण्याच्या मर्यादीत अनुकुलतेमुळे भूजलाची निर्मिती मध्यम स्वरुपाची होते. या भागास शाश्वत पर्जन्यमानाचा प्रदेश म्हणून जरी संबोधले जात असले तरी भारतीय मोसम विभागाने गेल्या १०० वर्षांच्या हंगामी पर्जन्यमानाच्या आधारे केलेल्या अभ्यासात या भागातील पावसाचे प्रमाण जवळपास १६ टक्क्यांनी घटणार असल्याचे भाकीत वर्तविले आहे.

अवर्षण प्रवण प्रदेश : सह्याद्री पर्वत रांगांच्या पुर्वे कडील मुख्यत्वे ३० ते ५० किमी रुंदीचा प्रदेश पर्जन्यछायेच्या पट्टयात येतो. यात महाराष्ट्रातील जवळपास १.५० लक्ष चौकिमी क्षेत्र समाविष्ट होते. या भागात प्रति वर्षी सरासरी ४०० ते ७०० मिमी पाऊस पडतो. काही भागात ४०० मिमी पेक्षाही कमी पाऊस पडतो. या क्षेत्रात अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगांव, नंदुरबार, बुलढाणा, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, पुणे, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यांचा समावेश आहे. या भागात पर्जन्यमान कमी असूनही भूस्तरांच्या अनुकुलतेमुळे भूजलाची निर्मिती चांगली होते. परिणाम स्वरुप भूजलावरील अवलंबिता सर्वाधिक आहे. भूजलाचा उपसा प्रतिवर्षाच्या पुनर्भरणापेक्षा जास्त प्रमाणात केल्यामुळे त्याचा परिणाम भूजलाच्या अचल साठ्यावर होवून उन्हाळ्यात विहिरी कोरड्या होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्यासाठी या भागात दरवर्षी कमी अधिक प्रमाणात टंचाईची परिस्थिती निर्माण होते.

पर्जन्यमानात खूप दोलायमानता असल्याने महाराष्ट्रात दरवर्षी एकसारखा पाऊस पडत नाही. दोलायमानता गुणांक जितका जास्त तितकी अधिक अनियमितता. जितकी जास्त पावसातील अनियमितता तितकी भूजलाच्या उपलब्धतेत देखील अनियमितता व परिणामी अपूर्ण भूजल साठ्यामुळे सततची पाणी टंचाई. महाराष्ट्र जल व सिंचन आयोगाच्या अहवालानुसार उर्ध्व कृष्णा-अग्रणी नदीच्या उपखोर्‍यातील पर्जन्यमानाचा दोलायमानता गुणांक सर्वाधीक (६५%) असून त्या खालोखाल नर्मदा (४६%), गोदावरी सुधा-स्वर्णा (३८%), उर्वरित भीमा - उजनी खाली - माणसहीत (३४%), सीना बोरी बेनेतुरा व गोदावरी निम्नस्रोत - पैठण धरणाखाली (३३%), सीना व मांजरा (३२%).

महाराष्ट्रातील पर्जन्यमानात दोलायमानतेबरोबरच क्षेत्रिय विचलन देखील मोठ्या प्रमाणावर आढळते. म्हणजेच गांवाच्या पुर्वेला पाऊस पडतो पण पश्‍चिमेचा भाग कोरडा असतो. परिणाम स्वरुप सर्व गांवात पाऊस सारखा नसल्यामुळे पाणी मुरण्याचे व भूजल उपलब्धतेचे प्रमाण वेगवेगळे असते. तालुक्यात व जिल्ह्यात देखील अशीच परिस्थिती असते. यासाठी प्रत्येक गांवाने पुढाकार घेवून पर्जन्यमापक बसवून पाऊस मोजायला सुरवात करणे गरजेचे आहे.

भूपृष्ठीय स्थिती : भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने महाराष्ट्रातील भूपृष्ठीय स्थितीची विभागणी तीन प्रमुख भागात केलेली आहे. त्याचा तपशील खालील प्रमाणे आहे.

ओसाड माळरानाच्या पायथ्याशी असलेल्या जालना जिल्ह्यातील शिवनी गावाने २००३ पासून पाऊस मोजमापास सुरूवात करून दरवर्षी पाण्याच्या ताळेबंदातून जलव्यवस्थापनाची एक आदर्श कार्यपध्दती बसविली व त्यातून ग्राम सम्रुध्दी मिळवली आहे.

वहन क्षेत्र (अति विच्छेदित व डोंगराळ भूभाग) : वहन क्षेत्रातील भूभाग अति ओसाड माळरानाच्या पायथ्याशी असलेल्या जालना जिल्ह्यातील शिवनी गावाने २००३ पासून पाऊस मोजमापास सुरवात करुन दरवर्षी पाण्याच्या ताळेबंदातून जलव्यवस्थापनाची एक आदर्श कार्यपध्दत बसविली व त्यातून ग्राम सम्रुध्दी मिळविली आहे. विच्छेदित व डोंगराळ असून जमिनीचा उतार २० टक्के पेक्षा जास्त आहे. त्यामुळे या क्षेत्रात भूपृष्ठावरुन पाणी वाहून जाण्याचे प्रमाण सर्वाधीक असून भूगर्भात पाणी मुरण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. राज्यातील जवळपास ६.१५ दशलक्ष हेक्टर क्षेत्र या भूभागाने व्यापलेले आहे.

पुनर्भरण क्षेत्र (पठारी भूभाग) : पुनर्भरण क्षेत्रातील भूभाग पठारी स्वरुपाचा असून जमिनीचा उतार ५ ते २० टक्के पर्यंत आहे. त्यामुळे या क्षेत्रात भूपृष्ठावरुन पाणी वाहून जाण्याचे प्रमाण मध्यम असून नावाप्रमाणेच भूगर्भात पाणी मुरण्याचे प्रमाण मध्यम स्वरुपाचे आहे. राज्यातील जवळपास १५.३९ दशलक्ष हेक्टर क्षेत्र या भूभागाने व्यापलेले आहे. या भागात प्रवाही सिंचनाबरोबरच उपसा सिंचनाही समन्वय असणे गरजेचे आहे.

साठवण क्षेत्र (पठारी भूभाग) : साठवण क्षेत्रातील भूभाग सपाट व नदीलगतच्या गाळाचा असून जमिनीचा उतार ५ टक्के पेक्षा कमी आहे. त्यामुळे या क्षेत्रात भूपृष्ठावरुन पाणी वाहून जाण्याचे प्रमाण कमी असून भूगर्भात पाणी मुरण्याचे प्रमाण सर्वाधीक आहे. राज्यातील जवळपास ९.२३ दशलक्ष हेक्टर क्षेत्र या भूभागाने व्यापलेले आहे. हा भाग प्रवाही सिंचनाला सोपा व अनुकुल आहे.

भौगोलीक परिस्थिती, भूपृष्ठीय स्थिती व भूशास्त्रीय स्थिती यांच्या एकत्रित अभ्यासातून व त्याला स्थानिक क्षेत्रिय सर्वेक्षणाची जोड देवून भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने (भूसवियं) महाराष्ट्राचे संपुर्ण भूभागाची प्राथमिक स्वरुपाची विभागणी १५३७ पाणलोट क्षेत्रांमध्ये केलेली आहे. भूजलाच्या सर्वेक्षणासाठी व नियोजनासाठी विस्तृत भूप्रदेशापेक्षा किंवा उपखोर्‍यापेक्षाही लहान असलेला पाणलोट क्षेत्र किंवा लघु पाणलोट क्षेत्र हे घटक वैज्ञानिक व व्यावहारीक दृष्टीने अधिक उपयुक्त आहेत. मृद व जलसंधारण विभागाद्वारे या लघु पाणलोटांचे विभाजन लघुत्तम पाणलोटात करण्यात आलेले असून त्या आधारावर पाणलोट क्षेत्र विकासाचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. राज्यात लघुत्तम पाणलोटांची संख्या जवळ जवळ ४४००० इतकी आहे. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेद्वारा निर्धारीत व अधिसूचित केलेल्या या पाणलोट क्षेत्रांचे सरासरी क्षेत्रफळ १५० ते २०० चौकिमी आहे. पाणलोट क्षेत्राचे नामकरणात, तो ज्या उपखोर्‍यात समाविष्ट आहे, त्यांची आद्याक्षरे समाविष्ट असून त्यांना क्रमांक देखील देण्यात आलेले आहेत.

राज्यातील ५ प्रमुख खोर्‍यांचे (गोदावरी, कृष्णा, तापी, नर्मदा, पश्‍चिम वाहिनी) विभाजन १५ उपखोर्‍यात (गोदावरी, गोदावरी-पुर्णा, मांजरा, पेनगंगा, वर्धा, वैनगंगा, प्राणहिता, इंद्रावती, भीमा, सीना, कृष्णा, तापी, तापी-पुर्णा, नर्मदा, पश्‍चिम वाहिनी) केलेले असून एका उपखोर्‍यात सरासरी १०० पाणलोटांचा अंतर्भाव आहे. राज्यात भूजलाची उपलब्धता दर दोन वर्षांनी पाणलोट निहाय निर्धारीत केली जावून ती प्रसिध्द केली जाते. पाणलोटांच्या सीमा या उपखोर्‍यांशी संलग्न असल्याने उपखोरे निहाय जल आराखडे तयार करीत असताना भूजल उपलब्धतेची आकडेवारी सहज उपलब्ध होते. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण अधिनियम २००५ नुसार तयार करावयाच्या उपखोरेनिहाय व खोरे निहाय एकात्मिक जल आरखड्यात भूजलाचा अंतर्भाव करणे सोर्ईचे झाले आहे.

भूशास्त्रीय स्थिती : महाराष्ट्राचा भूभाग अतिप्राचीन ते अलिकडच्या काळात तयार झालेल्या खडकांपासुन बनलेला आहे. भूशास्त्रात नमुद केलेले जवळपास सर्व प्रकारचे खडक राज्यात सापडत असलेने त्याला भूशास्त्रीय संग्रहालय संबोधले जाते. कारण त्यात प्राग्जीव व आद्य महाकल्पातील अग्निजन्य व रुपांतरीत खडक, विंध्यन, कडप्पा, गोंडवन महासमुहातील संघनीकृत गाळाचे व गाळस्तरांचे खडक, ज्वालामुखीय बहुस्तरीय दक्षिणी कातळाचे खडक (डेक्क्न ट्रॅप किंवा बेसाल्ट), जांभा खडक व अघनीकृत नदीचा गाळ यांचा समावेश आहे. महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी ८१.२० टक्के भूभाग लाव्हारस थंड होवून थिजून तयार झालेल्या बहुस्तरीय दक्षिणी कातळाचे खडकांनी व्यापलेला आहे. याबरोबरच इतर समुहातील कठीण खडकांचा एकत्रित विचार करता महाराष्ट्रातील ९३.७२ टक्के क्षेत्र कठिण खडकांनी व्यापलेले आहे. तेव्हा महाराष्ट्रातील भूजलाचा विचार म्हणजे मुख्यत्वे करुन दक्षिणी कातळाच्या खडकातील भूजलाचाच विचार होईल.

दक्षिणी कातळ (बेसाल्ट खडकांची) व्याप्ती व गुणधर्म :


दक्षिणी कातळ खडकांचे स्तर सर्वसाधारणपणे जाड समांतर वडीच्या आकाराचे असतात व त्यांची क्षेत्रिय व्याप्ती बरीच मोठी असते. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभाग व इतर वैज्ञानिकांनी केलेल्या अभ्यासानुसार बेसाल्ट खडकांत जवळपास ३२ लाव्हा थर आढळतात. सर्वसाधारणपणे प्रत्येक थरात भरीत/कुहरी (Vesicular / Amygdolodal Basalt) व अकुहरी (Compact Basalt) असे दोन भाग आढळतात. ग्रामीण भागात त्यांना अनुक्रमे मांजर्‍या व काळा पाषाण असेही म्हणतात. एक थर संपल्यानंतर काही भागात गेरुचा थर आढळतो व तो दोन लाव्हा थरांचा विभाजक असतो. सर्वसाधारणपणे लाव्हा थरांची जाडी १ मीटर पासून ३५ मीटर पर्यंत असते. या थरांची सरासरी जाडी २० मीटर आहे. त्यांची क्षेत्रिय व्याप्ती देखील बरीच मोठी असते, काही ठिकाणी ती १०० किमी पर्यंत देखील असते. या थरांची जाडी कमी झाल्यामुळे व व्याप्ती वाढल्यामुळे निर्माण होणारे खळगे नविन थर अथवा थरांनी भरले जातात. पातळ थरांची व्याप्ती फारच कमी असते. तसेच या सर्व लाव्हा थरांच्या उत्पत्ती नंतरच्या काळात झालेल्या विघटन व विच्छेदनामुळे त्याची व्याप्ती ओळखणे शक्य होत नाही. परिणाम स्वरुप नेमक्या जलधारक स्तराचे निदान करणे अवघड जाते. यासाठी गांव पातळीवर सखोल क्षेत्रिय सर्वेक्षणात्मक अभ्यास करुन लाव्हा थरांचे भूजल शास्त्राच्या दृष्टीकोनातून मानचित्रण करणे आवश्यक आहे.

भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने केलेल्या अभ्यासानुसार लाव्हा थर प्रामुख्याने दोन प्रकारचे आहेत. एक म्हणजे पाहोहहोर्ई (Pahoehoe ) व दुसरा आ (Aa). पाहोहहोर्ई थरांचे विघटन लवकर होवून त्याचे रुपांतर सरळ उताराच्या टोकदार डोंगरात होते. तुलनेने आ थर मात्र कठीण असतात व कड्याच्या स्वरुपात टिकून राहतात. त्यातील एक आड एक थरांच्या कठीण व खंडमय पृष्ठभागामुळे त्यांचे रुपांतर पायरी सारख्या संरचनेत होते आणि म्हणूनच त्यांना डेक्कन ट्रप असेही संबोधले जाते. आ प्रकारचे थर राज्याच्या दक्षिण, दक्षिण-पुर्व व पुर्व भागात आढळतात. पाहोहहोई थरांचे प्राबल्य ठाणे, रायगडच्या उत्तरेकडील भाग, धुळ्याचा पश्‍चिम व मध्य भाग, नाशिक, पुणे व अहमदनगरचा पश्‍चिमेकडील भागात आहे. बृहन मुंबर्ईच्या पश्‍चिमेकडील भागात आ थराचे प्राबल्य आहे. थोडक्य्यात उत्तरपुर्व व दक्षिण पश्‍चिम पट्टयात समावेश होणार्‍या भागात पाहोहहोर्ई थर आढळतो. ज्या ठिकाणी या थरांची जाडी कमी आहे, तेथे सर्वसाधारणपणे सच्छिद्र/भरीतकुहरी खडक आहेत. भरीत कुहरी बेसाल्ट मध्ये वायुंमुळे पडलेल्या छिद्रांमध्ये द्वितीयक खनिजे भरली जातात व त्यांच्या रंगाप्रमाणे पांढरे किंवा काळसर हिरवे दिसतात.

काळा पाषाण हा बुडबुडे विरहीत असतो. तसेच तो काहीसा तुकतुकीत व काळा किंवा निळसर काळ्या रंगाचा असतो. दोन्ही प्रकारचे बेसाल्ट पृथ्वीच्या अंतर्भागात खडक वितळून तयार झालेला लाव्हा पृथ्वीच्या पृष्ठभागावर येवून थिजून तयार झालेले असल्याने त्यांच्यात सुक्ष्म रंध्रे / प्राथमिक सच्छिद्रता (Primary Prosity) नसते. त्यामुळे दोनही प्रकारच्या खडकात पाणी मुरते ते निव्वळ दुय्यम सच्छिद्रतेमुळे निर्माण झालेल्या भेगांमध्येच. या भेगांबरोबरच राज्यातील बेसाल्ट खडकात आकुंचन संधी (Joints), भ्रंश (Faults) इत्यादिंचाही समावेश आहे. संधी या उभ्या, तिरप्या व आडव्या असतात व ग्रामीण भागात त्यांना पस्ते किंवा सप असेही म्हणतात. ज्या विंधण विहिरी या पस्त्यांवर खोदल्या जातात त्यांनाच चांगले पाणी लागल्याचा अनुभव आहे. याच बरोबर ज्या खडकाचे अपघटन/विघटन होवून मुरमात रुपांतर होते त्यात पाणी साठल्या जावून तो चांगला जलधर संबोधला जातो. परंतु ज्या खडकांचे रासाय्यनिक अपघटन होत नाही व तो ठणठणीत अवस्थेत असतो, ते संपुर्णपणे अपार्य असतात आणि त्यांच्यात पाणी मुरु अगर साठू शकत नाही.

काळा पाषाणामध्ये सामन्यत: संधी/भेगा/तडे यांचे प्रमाण अधिक असते, त्यामुळे त्यांच्यात चांगले पाणी मुरते असा अनुभव येतो. या खडकांचे थर बरेच जाड व लांबवर पसरलेले असल्याने व त्यांच्यात संधी/भेगा/तडे यांचे प्रमाण जास्त असलेने ते उत्तम प्रतिचे जलधारक असतात. मांजर्‍या खडकात मुळ स्थितीत जरी पाणी साठत नसले तरी वातावरण क्रियेने तो कुजू लागला की पाणी साठवण्यास परिस्थिती अनुकूल होवू लागते. कारण त्यांच्या रासायनिक अपघटनाच्या मधल्या स्थितीत ते संध्रयुक्त होतात आणि आडव्या भेगा पडून त्यांचे पत्र्या मुरमात रुपांतर होते. या स्थितीत ते चांगले जलधर बनतात आणि त्यांच्यात खोदलेल्या विहिरींना भरपूर पाणी लागते. सर्वसाधारणपणे काळा पाषणाच्या थरातील वरचा काही भाग व तळालगतचा काही भाग भरीत कुहरी झालेला असतो व या भागात संधी/भेगा नसतात. याचा अर्थ काळा पाषाणाच्या थराच्या मधल्या भागात भेगांचे प्रमाण जास्त असते आणि असा भेगा असलेला मधला भाग जर जमिनीवर उघडा पडलेला असेल तरच त्यात पाणी मुरेल. भूपृष्ठावर चांगल्या संधी/भेगा असलेला काळा पाषाणाच्या प्रदेशात भूजलाची समस्या सहसा आढळत नाही. फक्त ज्या प्रदेशात संधीयनाचे स्वरुप भूजल साठण्यास प्रतिकूल असेल अशाच प्रदेशात सौम्य टंचार्ई जाणवण्याची शक्यता आहे.

पण मांजर्‍या खडकाच्या प्रदेशात मात्र गंभीर टंचाईचा अनुभव येतो. मांजर्‍या खडकाच्या प्रदेशात पाणी साठण्याची शक्यता फक्त रासायनीक अपघटनाने कुजलेल्या व आडवे पस्ते निर्माण झालेल्या विघटीत भागातच असते. तेव्हा विहिरींची यशस्वीता अशा थराच्या जाडीवर अवलंबून आहे. जेथे विघटन न झालेला मांजर्‍या खडक पृष्ठभागावर उघडा पडलेला आहे किंवा विघटीत थराची जाडी फारच थोडी आहे, त्या प्रदेशात भूजल मिळण्याची शक्यता कमी असल्याने अशा प्रदेशात सखोल भूशास्त्रीय अभ्यासांतीच नविन विहिरी खोदणे फायदेशीर ठरते.

वरिल विवेचनावरुन स्पष्ट होते की, बेसाल्टचे प्राबल्य असलेला भूभाग सर्वसाधारपणे भूजलाचा मोठा साठा करण्यास अनुकूल नाही. जर भेगाळलेला अथवा बर्‍याच खोली पर्यंत कुजलेला/विघटीत झालेला बेसाल्ट पृष्ठभागावर असल्यास पाणी मुरण्याची व साठण्याची शक्यता जास्त असते. राज्यातील बेसाल्ट खडकांची व्याप्ती विचारात घेतल्यास भूजल मिळण्याची शक्यता नसलेल्या भागांचे प्रमाण अधिक आहे. तरीही पाणी लागण्याच्या आशेवर आजवर खोदण्यात आलेल्या विहिरींच्या आकडेवारीचा विचार करावयाचा झाल्यास २.५ लक्ष चौकिमी बेसाल्टच्या क्षेत्रात जवळपास १५ लक्ष विहिरी आहेत. म्हणून महाराष्ट्रातील भूजलविषयक परिस्थितीचा विचार करताना या प्रतिकूल भूशास्त्रीय परिस्थितीची सतत जाणीव ठेवूनच तो केला पाहीजे.

परी (पीपल्स आर्चिव ऑफ रुरल इंडीया - https://ruralindiaonline.org/) या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या बातम्यांचा परामर्ष घेतला असता मराठवाड्यातील बोअरवेल व अपयश यांचे विदारक चित्र स्पष्ट होते. बेसाल्ट बाबत एक मोठ्ठा गैरसमज सर्वदूर आहे. आणि तो म्हणजे जितके खोल जावू तितके अधिक पाणी लागते. परंतू वैज्ञानिsक दृष्ट्या बघिल्यास जसे जसे खोल जात जावू तशा भेगा/संधी/मुरुम कमी होत जातात अथवा आकुंचित होत जातात. परिणाम स्वरुप पाणी मिळण्याची शक्यता अत्यल्प असते. तेव्हा या गैरसमजातून शेतकर्‍यांनी/ भूजल उपभोक्त्यांनी बाहेर येणे गरजेचे आहे. उर्वरीत खडकांचा विचार व त्यांचे गुणधर्म पुढील लेखात.

श्री. शशांक देशपांडे , पुणे, मो : ०९४२२२९४४३३