Source
जल संवाद
चंद्रपूर येथे भरलेल्या सहाव्या जलसाहित्य संमेलनाच्या निमित्ताने 18 डिसेंबर 2010 रोजी सायंकाळी भारतीय जलसंस्कृती मंडळाची सर्वसाधारण सभा घेण्यात आली. या सभेत डॉ. दि. मा. मोरे यांनी वर्षभरात भारतीय जलसंस्कृती मंडळाने केलेल्या कार्याचा आढावा घेतला आणि शेवटी नवीन अध्यक्षाची निवड करण्याची गरज व्यक्त केली.
चंद्रपूर येथे भरलेल्या सहाव्या जलसाहित्य संमेलनाच्या निमित्ताने 18 डिसेंबर 2010 रोजी सायंकाळी भारतीय जलसंस्कृती मंडळाची सर्वसाधारण सभा घेण्यात आली. या सभेत डॉ. दि. मा. मोरे यांनी वर्षभरात भारतीय जलसंस्कृती मंडळाने केलेल्या कार्याचा आढावा घेतला आणि शेवटी नवीन अध्यक्षाची निवड करण्याची गरज व्यक्त केली. त्यांनी स्वत:च डॉ. दत्ता देशकर यांचे नाव अध्यक्ष म्हणून प्रस्तावित केले. या प्रस्तावाला श्रीमती अरूणा सबाने यांनी अनुमोदन दिले आणि टाळ्यांच्या गजरात डॉ. मोरे यांनी डॉ. देशकर यांची अध्यक्ष म्हणून निवड झाल्याचे घोषित केले. डॉ. देशकर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून आपण भविष्यात काय करू इच्छितो याचे थोडक्यात विवेचन केले. संस्थेचा शाखा विस्तार, सभासद संख्या विस्तार आणि संस्थेला भरभक्कम आर्थिक पाया उपलब्ध करून देणे यावर आपला भर राहील असे ते म्हणाले.डॉ. दत्ता देशकर यांच्या संपूर्ण आयुष्यातील एक महत्वाचा कालखंड डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला आणि वाणिज्य महाविद्यालय, औरंगाबाद येथे प्राध्यापक व प्राचार्य म्हणून व्यतीत झाला. महाविद्यालयातून निवृत्त झाल्यानंतर त्यांचा जागतिक ख्यातीचे जलतज्ज्ञ डॉ.माधवराव चितळे यांच्याशी संपर्क आला व डॉ. देशकर यांचे संपूर्ण जीवनच बदलून गेले. सुरूवातीला ते ग्लोबल वॉटर पार्टनरशिप या जागतिक संस्थेमध्ये संस्थेचे अध्यक्ष डॉ. चितळे यांचे बरोबर कार्यरत झाले. 2 वर्षाच्या कालखंडात त्यांनी पाण्याबद्दल अखंड माहिती जमा करून त्यावर मनन व चिंतन केले व पाणी प्रश्नाचे भयावह स्वरूप समजून घेतले व शेवटी हेच कार्यक्षेत्र आपल्यास योग्य आहे अशी खूणगाठ बांधून आपले उर्वरित आयुष्य याच कामावर खर्च करावयाचे त्यांनी ठरविले.
ते स्वत: स्थापत्य अभियंता नसल्यामुळे त्यांच्या कार्याला अर्थातच एक महत्वाची मर्यादा येऊन पडली. त्यामुळे त्यांनी जलसाक्षरता हा विषय निवडून यावर कार्य करण्याचे ठरविले. सर्वप्रथम त्यांनी एक लाख विद्यार्थ्यांना जलसाक्षर करण्याचा संकल्प केला. या साठी शाळा शाळांमध्ये जाऊन 8 वी, 9वी व 10 वी या वर्गात शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना पाण्यासंबंधात प्रबोधन केले. हा संकल्प त्यांनी एका वर्षातच पूर्ण केला. हे प्रबोधन करित असतांना त्यांनी पाण्याच्या वापरात काटकसर, पिण्याच्या पाण्याचे शुध्दीकरण, जलपुनर्भरण आणि पाण्याचा पुनर्वापर याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
हा संकल्प पूर्ण झाल्यानंतर त्यांनी दुसरा संकल्प केला तो म्हणजे ग्रामीण भागात शेतकऱ्यांना स्वत:च्या शेतात जलसंकलन करण्यासाठी शेततळे खणण्यासाठी मार्गदर्शन करणे. आज भारतीय शेतकरी पाण्याच्या अभावी वर्षातून फक्त एकच पीक घेतो, त्यातही पावसाच्या अनियमितपणामुळे त्याला पूर्ण यश प्राप्त होत नाही. चार महिन्यात काम करून उत्पन्न कमवून एक वर्षभर तो पैसा पुरविणे ही त्याच्या दृष्टीने एक तारेवरची कसरतच ठरते व त्यात अपयश आल्यास तो इतका खचून जातो की त्याला आत्महत्या करण्याची इच्छा होते. आत्महत्या करण्यापेक्षा स्वत:च्या शेतात पाण्याची व्यवस्था करणे जास्त सोपे आहे हे डॉ. देशकर शेतकऱ्यांना समजावून सांगतात आणि हे शेततळे कशा प्रकारे स्वत:च्या प्रेरणेने व मेहनतीने खणणे गरजेचे आहे ही बाब त्यांच्या मनावर बिंबवतात. या संकल्पात त्यांनी दहा हजार च्या वर शेतकऱ्यांशी संपर्क साधला व त्यांचे जलजागरण केले.
लोकांशी संपर्क साधणे आणि त्यांच्याशी चर्चा घडवून आणणे यात जास्त संपर्क होवू शकत नाही ही बाब लक्षात आल्यावर डॉ. देशकरांनी एक नवीनच विचार केला तो म्हणजे पाणी प्रश्नावर चर्चा घडवून आणण्यासाठी एक मासिक काढणे. या संदर्भात त्यांनी डॉ. माधवराव चितळे व न्या. श्री. नरेंद्र चपळगावकर यांच्याशी चंर्चा केली व भारतीय जलसंस्कृती मंडळाचा या कार्यासाठी आशीर्वाद मिळू शकेल काय याबद्दल विचारणा केली. या दोघांनाही ही कल्पना खूप आवडली व त्यांनी या कामासाठी मंडळाचा पाठींबा व्यक्त केला. एकदा ही बाजू बळकट झाल्यावर पाणी क्षेत्रात काम करणाऱ्या एखाद्या अभियंत्यास आपण या कामात समाविष्ट करून घेतले तर ते जास्त उचित ठरेल हा विचार त्यांच्या मनात आला व त्यांनी आपले मित्र श्री.प्रदीप चिटगोपेकर यांना या कामी मदत करण्याचे आवाहन केले व त्यांची संमती मिळताच संपादकद्वयांनी हा रथ रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न केला व गेल्या 6 वर्षांपासून यशस्वीपणे हे मासिक प्रकाशित होत आहे. आतापर्यंत या मासिकाने 15 वेगवेगळ्या विषयांवर विशेषांक काढून पाणी प्रश्नाचे विविध पैलू वाचकांसमोर मांडण्याचा या मासिकाद्वारे प्रयत्न केला. महिला आणि पाणी, पाणी आणि संस्कृती, पाण्याचे प्रदूषण, नदीजोड प्रकल्प, शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि पाणी, भूजलाचा प्रश्न, पाण्याच्या दराचा प्रश्न, पाण्याच्या वितरणाचा प्रश्न, पाण्यापासून वीज निर्मिती, स्टॉकहोम पुरस्काराचे मानकरी, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, पाण्याची गुणवत्ता या सारख्या विषयांवर सखोल अभ्यास करणारे विशेषांक निश्चितच महत्वाचे ठरले.
भारतीय जलसहभागिता मंचातर्फे भारतीय जलसंसकृती मंडळाला जे 1 लाख रूपयाचे अनुदान मिळाले होते त्या अनुदानाचा वापर करून त्यांनी पाणीप्रश्नाच्या संदर्भात विविध कार्यशाळा घेवून 2000 चे वर महिलांचे प्रबोधन केले. यासाठी अंबाजोगाई, नांदेड, परभणी, जालना, औरंगाबाद, पुणे, मुळशी याठिकाणी कार्यशाळांचे कमीत कमी खर्चात आयोजन करून जास्तीत जास्त महिलांना या प्रश्नाच्या जाळ्यात आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
जलसाहित्य निर्माण करण्यात त्यांनी भरपूर प्रयत्न केला. पाण्याच्या संदर्भात वेगवेगळ्या विषयांवर 9 प्रचार पत्रिका काढून त्याद्वारे त्यांनी प्रबोधन केले. चला जलसाक्षर होवू या, जलपुनर्भरण, वनशेती, पाण्याची शुध्दता, सामाजिक संस्था जलक्षेत्रात काय करू शकतात, महिला पाण्याच्या क्षेत्रात काय करू शकतात, रोटरी पाण्याच्या क्षेत्रात काय करू शकते या सारख्या विषयांवर त्यांनी या द्वारे प्रबोधन केले. एवढेच नव्हे तर शेततळे, वनशेती, जलपुनर्भरण, शाश्वत शेती या सारख्या विषयांवर पुस्तिका तयार करून त्याद्वारेही त्यांनी समाजप्रबोधन केले.
त्यांच्या सदर कार्याची पावती म्हणून हे अध्यक्षपद त्यांना देण्यात आले आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यांच्या या नवीन जबाबदारीत त्यांना यश लाभो हीच जलसंवाद मासिकातर्फे शुभेच्छा.