Source
जल संवाद
जलगौरव पुरस्कार प्रदानाचा कार्यक्रम पार पडल्यावर जलसंवादचे संपादक डॉ.दत्ता देशकर यांनी श्री. प्रदीप चिटगोपेकर यांच्या सहकार्याने गेल्या 6 वर्षांपासून पाणीप्रश्नांच्या विविध पैलूंचा उहापोह करणारे मासिक काढत असल्याचे सांगून थोडक्यात जलसंवाद बाबतची माहिती सांगितली.
6 वे अखिल भारतीय जलसाहित्य संमेलन चंद्रपूर येथील राजीव गांधी अभियांत्रिकी, संशोधन व तांत्रिक महाविद्यालयात दिनांक 18 व 19 डिसेंबर 2010 या दोन दिवसात यशस्वीपणे संपन्न झाले.जलसाहित्य संमेलनाच्या उदघाटन सत्राची सुरूवात व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर मॅगासेसे पुरस्कार विजेते राजस्थानचे जलदूत श्री.राजेंद्रसिंहजी, कुष्ठरोग्यांना दिलासा देणारे आनंदवन तथा सोमनाथ प्रकल्पांचे शिल्पकार डॉ.विकास आमटे, भारत सरकारचे माजी अर्थराज्यमंत्री व राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सर्वेसर्वा श्री.शांताराम पोटदुखे, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जलतज्ज्ञ व स्टोकहोम जलपुरस्कार विजेते डॉ.माधवराव चितळे, भारतीय जलसंस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ.दि.मा.मोरे आणि संमेलनाच्या साहित्यमंच प्रमुख श्रीमती अरूणा सबाने यांचे हस्ते झालेल्या दीप प्रज्वलनाने झाली.
दीप प्रज्वलनानंतर राजीव गांधी अभियांत्रिकी आणि तांत्रिक महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. कीर्तीवर्धन दीक्षित आणि त्यांच्या सहकारी प्राध्यापक वर्गातर्फे मंचावरील मान्यवरांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले.
श्री. मदन धनकर :
संस्थेचे श्री.मदन धनकर यांनी केलेल्या प्रास्ताविकात गोदावरी खोऱ्याच्या पुण्यभूमीत आमचे वास्तव्य असून ही पुण्यभूमी आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करत असल्याचे सांगितले. त्याचवेळी गोदावरी गंगेपेक्षाही प्राचीन असल्याचे सांगायला ते विसरले नाहीत. व्यासपीठावर राजेंद्र (राजेंद्रसिंहजी), माधव (डॉ.माधवराव चितळे) आणि विकास (डॉ.विकास आमटे) यांचा त्रिवेणी संगम झाल्याचेही त्यांनी कथन केले. जलसाहित्य संमेलनाची पार्श्वभूमी संयोजकांचे वतीने त्यांनी उपस्थितांना मार्मिक शब्दात सांगितली.
प्रास्ताविकानंतर निवेदिकांनी भारतीय जलसंस्कृती मंडळाचे माजी अध्यक्ष न्या. श्री.नरेंद्र चपळगावकर, जैन इरिगेशनचे सर्वेसर्वा श्री. भवरलालजी जैन आणि ज्येष्ठ विचारवंत श्री.मोहन धारिया यांचे संमेलनासाठी आलेले शुभसंदेश वाचून दाखविले.
श्री. शांताराम पोटदुखे :
जलसाहित्य संमेलनाच्या आयोजन संस्थेचे प्रमुख श्री.शांतारामजी पोटदुखे यांनी यंदाचे जलसाहित्य संमेलन चंद्रपूरलाच झाले पाहिजे असा कार्यकर्त्यांचा आग्रह होता आणि आम्ही तो मानला म्हणूनच आजचे हे संमेलन चंद्रपूरला संपन्न होत असल्याबद्दलचा आनंद व्यक्त केला. तथापि होत असलेले संमेलन हे अखिल भारतीय जलसंमेलन कसे असा प्रश्न पडला असल्याचे त्यांनी सांगितले. स्वातंत्र्यानंतर 60-62 वर्षांचा कालावधी उलटूनही योग्य जलनियोजन झाले नाही. तसेच शेततळ्यांची अपेक्षित निर्मितीही होऊ शकली नाही याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. जलसाहित्य संमेलनाचे निमित्ताने निदान या पुढील कालावधीत तरी हे प्रश्न तडीस नेण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन उपस्थितांना श्री. शांतारामजी पोटदुखे यांनी केले.
डॉ. दि.मा.मोरे :
भारतीय जलसंस्कृती मंडळाचे विद्यमान अध्यक्ष डॉ.दि.मा.मोरे यांनी या जलसाहित्य संमेलनात पाण्याच्या वेगवेगळ्या पैलूंवर चर्चा करण्यासाठी, प्रकाश टाकण्यासाठी प्रयत्न सर्वजण करणार असल्याचे सांगितले. आपण पाण्याला जीवन मानतो. नदीला आणि भूमीला माता मानतो. पण पराकोटीचे भोगी लोक असलेल्या आपल्यासारख्यांना नदी आणि भूमाता यांचेप्रति कृतज्ञताभाव राखण्यात अपयश येते. आपण नदीला वाईट वागणूक देतो. भूमातेचा अपमान करतो. याबाबत नुसते गप्प बसून चालणार नाही. सविस्तर चर्चा होवून यातून काही मार्ग काढता यायला हवा. आपण पाण्याविषयी काय करू शकतो याचे गांभीर्याने या परिषदेत विचारमंथन व्हायला हवे. मरणासन्न नद्यांची अवस्था बदलण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. आपणाला निश्चितपणे सामुहिकरित्या काहीतरी करायचे आहे. संमेलनाचे दोन दिवस एकत्र राहून आपल्याला काहीतरी मार्ग काढायचा आहे. हेच जलसाहित्य संमेलनाचे उद्दिष्ट असल्याबाबतचे विचार त्यांनी मांडले.
श्री. राजेंद्रसिंहजी, प्रमुख अतिथी :
जलसाहित्य संमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून आवर्जून उपस्थित राहिलेले राजस्थानचे जलदूत आणि मॅगासेसे पुरस्कार विजेते श्री.राजेंद्रसिंहजी यांनी हिंदीतून केलेल्या आपल्या व्याख्यानाच्या सुरूवातीलाच संमेलनाध्यक्ष डॉ.विकास आमटे यांची 27 वर्षांनंतर भेट होत असल्याचे सांगून भेटीबद्दलचा आनंद व्यक्त केला. या संमेलनाला शिक्षकवृंद व विद्यार्थावर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित असल्याबद्दल समाधान व्यक्त करतानाच मराठी समजत असली तरी ओघवत्या भाषेत बोलता येत नसल्याबद्दल खंत व्यक्त करून त्यांनी आपले विचार हिंदीतून मोकळेपणाने व्यक्त केले.
आपल्या व्याख्यानाच्या सुरूवातीलाच भारतात अनादी कालापासून वेद, पुराण यांच्या माध्यमातून भरपूर जलसाहित्य लिहिले गेले असल्याचे सांगून त्यानंतरही वेगवेगळ्या काळात निर्माण झालेल्या संतवाङमयातही पाण्याचे महत्व सांगणारे उल्लेख मोठ्या प्रमाणात आढळतात हे स्पष्ट केले. जीवनात पंचमहाभूतांची अनुभूती घेतांना त्यात जल अग्रक्रमाने येते. जल हा आपला सांस्कृतिक सन्मान आहे. जल आणि त्याच्या विविध पैलूंचा आम्ही भारतीय लोक आदराने उल्लेख करत आलो आहोत. पण दिवसेंदिवस बिकट होत असलेल्या पाणीप्रश्नाचा समंजसपणे विचार होण्याऐवजी अलिकडे पाणी हा समाजाच्या व संस्कृतीच्या शोषणाचा मुद्दा बनत चालला आहे. पाणी हा देशातील बहुतांच्या प्राणाच्या शोषणाचा विषय होताना दुर्दैवाने दिसून येत आहे. आज माणसामाणसात, राज्याराज्यात व देशादेशात पाण्यावरून संघर्ष पेटत आहेत. पाण्यावर कुणाचे फारसे नियंत्रण असल्याचे व व्यवस्थित नियोजन होत असल्याचे दिसून येत नाही. ज्याची लाठी त्याची म्हैस या उक्तीप्रमाणे बलवान राज्ये पाणी पळवत असल्याचे विदारक चित्र देशाच्या बहुतेक भागात दिसत आहे. ज्याच्याकडे पाण्याची मुबलकता आहे तो बलवान तर ज्याच्याकडे पाण्याची दुर्भिक्षता आहे तो दुर्बल. पाणी हाच आज समाजाच्या, राज्याच्या व देशाच्या प्रगतीचा मूलाधार बनला आहे. त्यामुळे जोपर्यंत पाण्याच्या वापराबाबत जनमानसात शिस्त असेल तोपर्यंतच पाण्याची समस्या भेडसावणार नाही. ज्या दिवशी समाजातील शिस्त संपेल व स्वार्थ बोकाळेल तेव्हा पाणीप्रश्न आपल्या हातून निसटलेला असेल, उग्र स्वरूप धारण केलेला असेल. आज असेच झाले आहे. जलप्रश्न हाताळण्यातील आपली कुशलता लयाला जातांना दिसत आहे. जलसृष्टी व जलदृष्टी बदलण्याची गरज आज निर्माण झाली आहे.
जलदृष्टी बदलण्यासाठी जलसाक्षरता सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी साहित्यमंच निश्चितच उपयुक्त ठरू शकतो. साहित्यिकांनी हा प्रश्न मनावर घेतला तर भविष्यात पाणीप्रश्नाची तीव्रता कमी होवून जनजीवन सुसह्य होण्यास हातभार लागू शकेल. मोठ्या प्रमाणात साहित्यिक पुढे सरसावले तर भविष्यात भारत, महाराष्ट्र व चंद्रपूर पाणीदार झाल्याचे चित्र दिसायला वेळ लागणार नाही.
पण प्रश्न केवळ पाण्याच्या उपलब्धतेचा नाही, केवळ पाण्याच्या वापराचा नाही, पाण्याच्या विविध अंगांचे व विविध पैलूंचे प्रश्न आपल्याला आज भेडसावत आहेत. जलप्रदूषण हा सर्वांना भेडसावणारा मोठा प्रश्न बनला आहे.
आपण अभिमानाने म्हणतो ʅ हम उस देश के वासी है, जिस देश में गंगा बहती है.ʆ आपण गंगेला माता म्हणतो पण आज गंगा आईप्रमाणे निर्मळ राहिलेली नाही. गंगा दिवसेंदिवस जास्तीत जास्त प्रदूषित होत आहे. घाणीचे प्रमाण वाढत चालले आहे. जे गंगेचे तेच गोदेचे व तेच अन्य सर्व नद्यांचे चित्र झाले आहे. सर्वसामान्य लोक, महानगरपालिका, उद्योगजगत या साऱ्यांमध्ये आपापल्या भागातील नद्या जास्तीत जास्त प्रदूषित रण्याची स्पर्धाच लागलीय जणू काही. हे थांबवायला हवे. नद्या अन् सर्व जलस्त्रोत स्वच्छ अन् शुध्द व्हायला हवेत. स्वातंत्र्याचे वेळी असलेली जलस्थिती पुन:श्च प्रस्थापित करण्याचा प्रयत्न हा जलसमस्या सोडविण्याचा मार्ग ठरू शकेल.
जल ही केवळ राज्याची संपत्ती नव्हे. जल व सृष्टी ही समाजाची व देशाची संपत्ती आहे. या संपत्तीवर कब्जा करण्याचा अधिकार कुणालाच असू शकत नाही. असलाच तर अधिकार संपूर्ण समाजाचा आहे. जोपर्यंत समाज ही जबाबदारी समंजसपणे व समर्थपणे पेलणार नाही तोपर्यंत जलसमस्या सुटणे शक्य नाही. जनसामान्यांनी समर्थपणे ही जबाबदारी पेलण्यासाठी त्यांना जागृत करण्याची व प्रेरित करण्याची जबाबदारी निदान यापुढे तरी साहित्यिकांनी घ्यायला हवी.
दिल्लीतील यमुना, वाराणसीत गंगा, हैद्राबादची मुसा, पुण्यातील मुळा-मुठा या सर्व नद्यांचे आता ' गंदा नाले ' बनले आहेत. राष्ट्राच्या विकास प्रक्रियेमुळे नद्या अशा प्रकारे प्रदूषित होणार असतील तर या विकासाला विकास म्हणणे योग्य ठरणार नाही. आधी नद्या व पाण्याचे स्त्रोत घाण करा, मग ही घाण स्वच्छ रण्यासाठी भरमसाठ कर्ज मिळवा, कर्ज फेडण्यासाठी पुन्हा कर्ज घ्या असे अविरत फिरणारे चक्र म्हणजे भारताची संस्कृती बनत चालली आहे. गंगा अॅक्शन प्लॅन या गंगा शुध्दीकरणाच्या प्रकल्पासाठी रूपये सात हजार कोटीची फ्रान्स व जपानची टेक्नॉलॉजी वापरण्यात यावयाची आहे. कुठे आहे भारताची टेक्नॉलॉजी ? स्वातंत्र्यप्राप्तीनंतर साठ वर्षे उलटली तरी अजूनही आपण जगाच्या मागे कसे याची खंत वाटते.
नद्यांवरील अतिक्रमण, प्रदूषण व अतिशोषण टाळता आले तर समाजाची ही सर्वात मोठी सेवा ठरणार आहे. गंगेचे खोरे देशातील 11 राज्यात व देशाच्या 40 टक्के क्षेत्रावर पसरले असल्यामुळे गंगा अॅक्शन प्लॅन शस्वी ठरल्यास 40 टक्के शुध्दीकरण प्रक्रिया पार पडण्यास मदत होवू शकेल.
नद्यांचे प्रदूषण झाल्यावर शुध्दीकरणाचा प्रयत्न होण्यापेक्षा नद्या प्रदूषित होणार नाहीत याची काळजी घेणे जास्त श्रेयकर ठरणार आहे. ही प्रक्रिया सामुहिक स्तरावर तसेच वैयक्तिक स्तरावर राबविणे शक्य आहे. प्रत्येक उद्योजक कंपनीने आपापल्या प्रॉडक्शनचे वेळी निर्माण होणारे वेस्ट नदीत टाकणे टाळले तर नदी प्रदूषित होणे आपोआपच टळेल. प्रदूषण नियंत्रण मंडळाने त्यांचेवर सोपवण्यात आलेली जबाबदारी काटेकोरपणे व प्रामाणिकपणे सांभाळली तर संपूर्ण समाज त्यांचा ऋणी राहील.
मी ज्या व्यथा मांडतो आहे, खंत व्यक्त करत आहे त्या मला सामाजिक कार्यात कार्यरत असतांना जाणवलेल्या जाणीवांवर आधारित आहेत. मी कुठल्याही विद्यापीठातून आयआयटी वा तत्सम महत्वाची डिग्री घेतलेली नाही. मी एक अशिक्षीत शेतकरी असून माझा अनुभव माझ्या जलविषयक कार्यात उपयुक्त ठरत असेल तर आपल्यासारख्या विविध क्षेत्रातील ज्ञानी माणसांच्या ज्ञानाचा, विचारांचा समाजाला निश्चितपणे जास्त उपयोग होवू शकेल. पण त्यासाठी निश्चित ध्येय हवे. निश्चित संकल्प व संकल्पना हव्यात. साहित्यिक मंडळी तर हे काम अधिक चांगल्या प्रकारे करू शकतील. त्यामुळे 6 व्या जलसाहित्य संमेलनाला शुभेच्छा देतानाच मी सर्वांना अशा प्रकारच्या साहित्य निर्मितीबद्दल आवाहन करून आपली रजा घेतो.
डॉ. माधवराव चितळे :
संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी जलनिती विषयावर सविस्तर मांडणी करणार असल्याचे सांगताना डॉ.चितळे यांनी अगदी थोडक्यात भाषण नव्हे, तर संभाषण केले. दोन दिवसांच्या या संमेलनात पाण्याच्या विविध विषयांवर होणाऱ्या चर्चासत्रात सहभागी होण्याबाबत आवाहन केले. मरणासन्न नद्या, तलावांचे व्यवस्थापन अशा महत्वपूर्ण विषयांवरील चर्चासत्रात मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याबरोबरच पथनाट्य, चित्रनिर्मिती व चित्रपट निर्मिती ही देखील साहित्याचीच विविध अंगे असल्याचे लक्षात घेवून या माध्यमांचाही उपयोग जलविषयक विविध पैलूंचा उहापोह करण्यासाठी होवू शकेल, याचाही विचार व्हावा असे मत त्यांनी मांडले.
डॉ. विकास आमटे, संमेलनाध्यक्ष :
जलसाहित्य संमेलनाच्या उदघाटन सत्राचा अध्यक्षीय समारोप करतांना आनंदवन व सोमनाथ प्रकल्पांचे शिल्पकार असलेल्या डॉ.विकास आमटे यांनी आपण पाणीविषयक तज्ज्ञ नसून एक सेवाव्रती कार्यकर्ता, पाण्यासंबंधीचा एक ठेकेदार असल्याचे स्पष्ट करतानाच आपला साहित्याशी प्रत्यक्षपणे संबंध नसल्याचे सांगितले.
सुरूवातीला आनंदवनाची निर्मिती हा एक प्रयोग होता असे सांगून प्रयोगशाळा म्हंटले की नैराश्य असते, उपलब्धता नसते. यशासाठी सातत्याने प्रयत्नशील राहावे लागते असे सांगितले. यावर अधिक भाष्य करताना डॉ.आमटे यांनी एडीसन या शास्त्रज्ञाचे उदाहरण देवून 856 वेळा अयशस्वी ठरलेला एडीसन शेवटी यशस्वी होवून ' शास्त्रज्ञ ' या संज्ञेस पात्र ठरल्याचा उल्लेख केला. आश्रमातील कुष्टरोगी भिकारी नसतात तर मग समाजात भिकारी का असतात असा सवाल करत आनंदवनात मी आणि बाबा काम करायला लागलो तेव्हा पु.ल.देशपांडे, विजय तेंडुलकर, कुमार गंधर्व, नाना पाटेकर अशा संवेदनशील, श्रेष्ठ साहित्यिकांची व कलाकारांची कौतुकाची थाप पाठीवर पडली, त्यांचे सहकार्य लाभले, प्रेरणा मिळाली हेही सांगितले.
माझे बाबा (बाबा आमटे) म्हणायचे ' महारोगी काम करणार नाहीत, पण ते काम करून घेवू शकतील सर्वांकडून.' आनंदवनातील कुष्टरोग्यांसाठी हळू हळू आम्ही काम करायला लागलो, त्यांनीच आम्हाला कळत नकळत कामाला लावले. उजाड माळरानावर जेथे ' प्रायमरी वॉटर टेबल ' नाही, कावळे-चिमण्यांसारखे पक्षी नाहीत, प्राणी नाहीत तेथे जलसंवर्धनाच्या व पाणलोट विकासाच्या योजना राबवण्यात आम्ही यशस्वी ठरलो. आनंदवनाच्या 500 एकराच्या भूमीत अकरा खोदतलावांची निर्मिती करून 300 एकरात शेती सुरू केली. सोमनाथ प्रकल्पाच्या क्षेत्रात 27 तळी खोदून पाण्याच्या बाबतीत तसेच दुबार तथा तिबार शेती करून अन्नधान्य व भाजीपाल्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालो. तलावाबरोबरच छोटे मोठे बंधारे बांधून पाणी साठवले. टायरच्या, रबराच्या बंधाऱ्यांचे यशस्वी प्रयोग केले. प्लॅस्टीकच्या, काचेच्या चुऱ्याचा सिमेंटमध्ये वापर करून सिमेंटिंग मटेरियल सारखा उपयोग केला. अभियंता नसूनही केवळ अनुभवाच्या व कल्पकतेच्या जोरावर असे अनेक प्रयोग आम्ही आनंदवन व सोमनाथ प्रकल्पात राबवून यशस्वी केले.
माझे गुरू कै.अनिल अग्रवाल यांनी मला पाण्याचे महत्व सांगितले, जलसंवर्धनाचे तत्व समजावले, धावत्या पाण्याला चालते करा, चालत्या पाण्याला रांगते करा, रांगत्या पाण्याला थांबते करा व थांबत्या पाण्याला मुरते करा हे पाणीतत्व त्यांनी मला शिकवले व त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यात अविरत प्रयत्नांच्या माध्यमातून आम्ही यशस्वी ठरलो. मी भाषणवाला माणूस नाही तर संवादवाला माणूस आहे. म्हणूनच संवादाच्या माध्यमातून माझ्या कृतीबाबतचे विचार मी आपणासोबत शेयर करत आहे. तो परमेश्वर कुठे आहे मला माहित नाही, पण आज प्लॅस्टिक मात्र डोंगरावर, पर्वतावर, पाण्यात, समुद्रावर सर्वत्र मोठ्या प्रमाणात आढळत आहे. त्यामुळे होत असलेला पर्यावरणनाश काही प्रमाणात वेचून, गोळा करून बंधाऱ्यासारख्या विधायक कामात वापरून कमी करण्याचा प्रयत्न आम्ही व आमचे आश्रमवासी करत आहोत.
हे सारे स्वानुभवाचे बोल मी आपणास ऐकवले. डॉक्टरी व्यवसायातल्या माणसाने सामाजिक बांधीलकीच्या माध्यमातून कल्पकतेने काही प्रयोग यशस्वी केले. येथे जमलेल्या सूज्ञ अभियंत्यांना, कल्पक साहित्यिकांना याहून बरेच काही जास्त सहजपणे करता येवू शकेल. इच्छाशक्ती दांडगी असली की काहीही साध्य करता येते हे आनंदवनाभोवती महंमद नावाच्या माणसाने नॉनग्रँट, नॉन डोनेशन अशी भक्कम भिंत बांधली आहे यावरून स्पष्ट होते. मी जलसाहित्य संमेलनाला शुभेच्छा देतो व आपली रजा घेतो.
जलगौरव पुरस्कार :
संमेलनाच्या उद्घाटन सत्रातच पाणी विकासाच्या कामात भरीव योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यास प्रतिवर्षी देण्यात यावयाचा जलगौरव - 2010 हा पुरस्कार संमेलनाध्यक्ष डॉ.विकास आमटे, आणि मॅगासेसे पुरस्कार विजेते प्रमुख अतिथी श्री.राजेंद्रसिंहजी यांचे हस्ते जलसंवादचे संपादक व महाराष्ट्र सिंचन सहयोगचे सचिव श्री.प्रदीप नारायणराव चिटगोपेकर यांना प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र असे होते.
जलगौरव पुरस्कार प्रदानाचा कार्यक्रम पार पडल्यावर जलसंवादचे संपादक डॉ.दत्ता देशकर यांनी श्री. प्रदीप चिटगोपेकर यांच्या सहकार्याने गेल्या 6 वर्षांपासून पाणीप्रश्नांच्या विविध पैलूंचा उहापोह करणारे मासिक काढत असल्याचे सांगून थोडक्यात जलसंवाद बाबतची माहिती सांगितली. तद्नंतर संपादकद्वयांनी जलसंवादच्या गेल्या वर्षभरातील अंकांचा संपूर्ण संच संमेलनाध्यक्ष डॉ.विकास आमटे, प्रमुख अतिथी श्री.राजेंद्रसिंहजी, भारत सरकारचे माजी अर्थराज्यमंत्री श्री.शांताराम पोटदुखे व आमदार श्रीमती शोभाताई फडणवीस यांना भेट म्हणून दिला.
राजीव गांधी अभियांत्रिकी, संशोधन व तांत्रिक महाविद्यालयाच्या प्राध्यापक प्रतिनिधींच्या आभार प्रदर्शनानंतर उद्घाटन समारंभाची सांगता झाली.
श्री. दीपनारायण मैंदर्गीकर, सोलापूर