पूनर्भरणाने भूजलात वाढ

Submitted by Hindi on Fri, 05/05/2017 - 16:39

पावसाळ्याच्या तोंडावर शेतकरी जमिनीची मशागत करून रान तयार ठेवत असतो. तशीच जलपुनर्भरणाचीही केली पाहिजे. दिवसेंदिवस खालावत चाललेल्या भूजल पातळीमुळं सगळेच हादरले आहेत. पाण्याचा उपसा आणि माणसाचा हव्यास संपता संपत नाही, अशी आजची स्थिती आहे. त्यामुळे पाणी हवे असेल तर जलपुनर्भरण केले पाहिजे. त्याचे फायदे खूप आहेत.

एकवेळ एखाद्या माणसाचे तोंड उघडून त्यात बळजबरीनं पाणी ओतता येईल. बुडणाऱ्या माणसाची अवस्था तशीच तर असते. पण जमिनीत तशा पद्धतीनं बळजबरीनं पाणी मुरवता येत नाही, त्याची एक प्रक्रिया असते. कूपनलिका किंवा विहिरींमधील पाण्याचा उपसा करताना त्यांचं पुनर्भरण करा, असं सांगितलं जातं. ती वेगळी प्रक्रिया आहे, ती कशी कार्यान्वित करायची त्याविषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. पण जमिनीवर पडणारं पाणी मुरतं कसं हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे, कारण त्यामुळं आपण करत असलेला भरमसाठ उपसा आणि वाया दवडत असलेल्या पाण्याबद्दल जागरूकता निर्माण होण्यास निश्चितच मदत होईल.

वाहणारं पाणी अडवा आणि जमिनीत मुरवा, असं वारंवार सांगितलं जातं. पण ते नेमकं कसं होतं, याची माहिती अनेकांना नसते. सोलापूरचे भूजल तज्ज्ञ, माजी प्राचार्य डॉ. श्रीनिवास वडगबाळकर यांनी जमिनीत पाणी मुरण्याची गती किती असते, त्याचा तपास करण्यासाठी एक प्रयोग केला. त्यांचा निष्कर्ष महत्त्वाचा आहे. किंबहुना पाण्याचा गैरवापर करणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे. डॉ. वडगबाळकर म्हणाले,''आम्ही पाणी मुरण्याची प्रक्रिया तीन प्रकारे तपासली. नदी वाहती असते. त्यामुळं पाण्याचा प्रवाह निरंतर वाहण्याची प्रक्रिया सुरू असते. असं वाहतं पाणी जमिनीत मुरण्याचा वेग प्रत्येक सेकंदाला सात फूट इतका असतो. नदी वाहती असणं का आवश्यक असतं, त्याला हे उत्तरच म्हणावं लागेल. दुसरी गोष्ट, तलावांची. एका जागी साठवून ठेवलेलं पाणी जमिनीत मुरत असतंच. तलावातील पाणी प्रत्येक सेकंदाला ०.७ फूट इतक्या वेगानं मुरत असते. त्यामुळं नदी वाहती ठेवा असं म्हणतानाच, तलावही तुडुंबलेला असणं गरजेचं आहे. त्याचा, परिसरातील भूजल पातळीवर निश्चितच परिणाम होतो. पुढचा मुद्दा आहे तो जमिनीवरून वाहणाऱ्या पाण्याचा. सर्वसाधारणपणे पावसाचं पाणी जमिनीवर पडलं की ते मुरण्याची प्रक्रिया होत असते. तथापि, त्याची गती खूप संथ असते हे ध्यानात घेतलेलं बरं. कारण जमिनीवरून वाहणारं पाणी प्रत्येक दिवसाला ०.३३ फूट इतकं निवांत, सावकाश मुरत असतं. ''

आपल्याकडं पाऊस आला की विहिरीचं आणि बोअरचं पाणी वाढलं असं म्हटलं जातं. पाणी मुरण्याच्या या प्रयोगाचा आधार पाहता उपशावर नियंत्रण ठेवणं महत्त्वाचं आहे. १९७२च्या दुष्काळानंतर हरितक्रांतीचं वारं सुरू झालं. तेव्हा कृषीतज्ज्ञ स्वामीनाथन यांचं मोलाचं मार्गदर्शन झालं. त्याची चांगली फळं मिळाली. मात्र त्यानंतर घेतली जाणारी पिकं आणि जमिनीतून होणारा पाण्याचा उपसा यांच्यात संतुलन राहिले नाही. त्यामुळं भूजल पातळी दिवसेंदिवस खालावायला लागली. एकट्या महाराष्ट्रातच नव्हे, तर सगळ्या भारतातच ही स्थिती उद्भवली आहे. डॉ. वडगबाळकर याबाबत एक उदाहरण देतात : ''वडिलोपार्जित संपत्ती कितीही प्रचंड असली तरी पुरवून आणि नियंत्रण ठेवून खर्च केली तरच पिढीला पुरेल. म्हणजे बँकेत कोटी रूपये जरी असले तरी तुम्ही एकावेळी किती रूपये काढून खर्च करता, यावर ते किती दिवस टिकतील ते सांगता येतं. भूजलाचंही असंच आहे. आपल्या वाडवडिलांनी, पूर्वजांनी जमिनीत जे पाणी आपल्यासाठी राखून ठेवले आहे ते न उधळता आपण त्याचा योग्य विनियोग केला पाहिजे. पण दुर्दैवानं असं होताना दिसत नाही. त्यामुळं भूजलपातळी खालावली आहे.''

भूजल वाढवण्याचा नामी उपाय


शेतकरी आपल्या शेतात विहिरी खोदण्याऐवजी विंधन विहिरी, म्हणजे बोअरवेल घेत आहेत. विहिरीच्या तुलनेत बोअरवेल घेणं सोपं असलं तरी त्याचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. अनेक बोअरवेलना पाणी लागतच नाही, त्या कोरड्याच राहतात. जमिनीत किती खोलवर जाऊन पाणी उपसा करावा, याचा कोणताही धरबंद राहिलेला नाही. इतक्या मेहनतीनंतरही पाणी लागेलच याची शाश्वती नाही. सोलापूर कृषी विभागातील कृषी पर्यवेक्षक श्री. नरेंद्र कल्याणशेट्टी सांगतात,''पंचवीस वर्षांपूर्वी पाणी लागण्याचे आणि बोअर 'फेल' जाण्याचं प्रमाण ५० टक्के होतं. दहा वर्षांपूर्वी ते ८० ते ९० टक्के झालं आहे. आणि आता तर बोअरला पाणी लागण्याची खात्री ३ टक्केसुध्दा देता येत नाही. पाणाडे आणि बोअर मशिनचा धंदा मात्र जोरात सुरू आहे. जमिनीत दिसत नसलेल्या पाण्यासाठी शेतकरी आणि सामान्य माणूस पुंजी पणाला लावतो, पण पावसाळ्यात डोळ्यासमोर कोट्यवधी लिटर पाणी वाहून जाऊ देतो.'' कर्ज काढून शेतकरी जास्तीत जास्त खोल बोअर घेण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे अधिकाधिक पाणी लागेल आणि ते दीर्घकाळ टिकेल, असा त्याचा होरा असतो. पण भूगर्भाच्या रचनेचा पाणी धारण क्षमतेवर मोठा परिणाम होत असतो, हे अनेकांच्या ध्यानात येत नाही.

बोअरमधून ताशी पाचहजार लिटर उपसा होतो

बोअरमधून ताशी ५००० लिटर उपसा


एका बोअरमधून तासाला सरासरी पाच हजार लिटर पाण्याचा उपसा होतो. रोज आठ तास आणि वर्षाचे २५० दिवस पाण्याचा उपसा होतो असा हिशेब मांडला तर एका बोअरमधून दरवर्षी सुमारे १ कोटी लिटर पाणी उपसले जाते. आणि उन्हाळ्यात महाराष्ट्रात रोज हजारो बोअर घेतल्या जात आहेत.

पावसाळ्यात आपल्या नजरेसमोर वाहून जाणाऱ्या पाण्याला रोखण्याची गरज असल्याचं सांगितलं जातं, ते लक्षात घेण्याची गरज आहे. घरात आपण पिंपात किंवा टाक्यांमध्ये पाणी साठवून ठेवतो. मगच ते आपल्याला वापरायला मिळते. साठवून ठेवलेले पाणी संपले की मग पाणी मिळत नाही. जमिनीचंही तसंच आहे. श्री. कल्याणशेट्टी सांगतात, ''जमिनीवर पाणी अडवण्यासाठी शासकीय पातळीवर खूप प्रयत्न होत आहेत, पण त्याला मर्यादा आहेत. छोटा नाला बांध किंवा मोठी धरणं या सगळ्यांसाठी योग्य 'साईट' शिल्लक नाहीत. तथापि, अत्यंत कमी खर्चात अमर्याद पाणी अडवण्यासाठी असंख्य 'साईट्स' शिल्लक आहेत. भूगर्भात अमर्याद स्वरूपाची साठवण शक्ती असते. तेथील नैसर्गिक पोकळ्यांमध्ये पावसाळ्यात वाहून जाणाऱ्या पाण्याचा साठा केल्यास विहिरी किंवा बोअर जास्तकाळ पाणी देऊ शकतात. जमिनीवर पडणारे पाणी मिळेल त्या उतारास वाहून जाते. भूगर्भातील पाण्याचा उपसा करण्यासाठी पाडलेल्या विहिरीत किंवा बोअरमध्ये हे वाहून जाणारे पाणी सोडून भूगर्भातील पाण्याचा साठा वाढवणे ही जलपुनर्भरणाची मुख्य संकल्पना आहे.''

जलपुनर्भरण एक वरदानच


सर्वसाधारणपणे एक हेक्टर क्षेत्रावर एक मिलिमीटर पाऊस झाला तर दहा हजार लिटर पाणी मिळते. ५०० ते ६०० मिमी सरासरी पाऊसमान असलेल्या सोलापूरसारख्या जिल्ह्यात फक्त २५० मिमी पाणी अडवले तर १ हेक्टर क्षेत्रातून २५ लाख लिटर पाणी पुनर्भरणासाठी उपलब्ध होईल. ४ हेक्टर म्हणजे १० एकर क्षेत्रातून १ कोटी लिटर पाणी साठू शकते. जलसंकट दूर करण्यासाठी पुनर्भरण हे वरदानच म्हणावे लागेल.

जलपुनर्भरण कसे करायचे, याचा तपशील श्री. कल्याणशेट्टी सांगतात. आपल्या शेताजवळ जास्तीत जास्त क्षेत्रात इतरत्र वाहून जाणाऱ्या पाण्यास विहिरीच्या अथवा बोअरच्या दिशेनं वळवण्यासाठी जमिनीच्या चढउताराचे निरीक्षण करून जरूर तेथे भर अथवा बांध घालावेत. गरजेनुसार चारी काढाव्यात. पाण्याबरोबर येणारा गाळ, पालापाचोळा विहिरीत जाऊ नये म्हणून वाहत्या पाण्याच्या दिशेला आडवे दगड रचून किंवा उभ्या फरशा लावून पाण्याचा वेग तोडावा.

विहिर पुनर्भरणाची माहिती देताना ते म्हणाले, ''जमिनीचा उतार पाहून विहिरीपासून पुरेशा अंतरावर पाणी गोळा होण्यासाठी तीन बाय तीन बाय दोन मीटर आकाराचा साठवण खड्डा घ्यावा. गरजेनुसार २० मीटर लांबीची इनलेट चारी मारावी. साठवण खड्ड्यात सुरूवातीला एक मीटर उंचीपर्यंत दगड भरावे. त्यावर अर्धा मीटर जाडीचा खडीचा थर द्यावा. साठवण खड्ड्यालगत विहिरीच्या बाजूला दोन मीटर अंतरावर दोन बाय दोन बाय दोन आकाराचा शोष खड्डा घ्यावा. शोष खड्ड्याच्या तळाशी अगोदर मोठे दगड, नंतर खडी आणि सगळ्यात वर वाळूचा थर भरावा. दोन्ही खड्डे ०.६० मीटर खोल आणि दोन मीटर लांबीच्या चारीने जोडावे. शोष खड्ड्याच्या तळापासून चारी खोदून पीव्हीसी पाईप विहिरीत सोडावा. पाईपच्या तोंडाशी नायलॉन जाळी बांधावी. हे अगदी कमी खर्चाचे तंत्रज्ञान आहे.

बोअरचे पुनर्भरण कसे करायचे ते दाखवणारी आकृती

बोअर पुनर्भरणाचा प्रयोग


सोलापूरचे प्रयोगशील शेतकरी व उद्योजक गोवर्धन बजाज यांनी आपल्या शेतात दहा वर्षांपूर्वी बोअरच्या पुनर्भरणाचा प्रयोग केला. विशेष म्हणजे, आजतागायत त्यांच्या बोअरचे पाणी हटलेले नाही. आपल्या प्रयोगाविषयी ते सांगतात, ''बोअरच्या केसिंग पाईपभोवती सुमारे आठ ते दहा फुट व्यासाचा आणि सहा फूट खोलीचा खड्डा घ्यावा. केसिंग पाईपला धक्का लागणार नाही, याची काळजी घ्यावी. एकूण किती क्षेत्राचे पाणी अपेक्षित आहे, त्या स्थानानुसार खडड्याची रुंदी आणि खोली ठरवावी. बोअर खोलगट भागात असल्यास किंवा तिच्या जवळून ओढा-नाला अथवा पाण्याचा मोठा ओहोळ जात असल्यास जास्त पाणी उपलब्ध होऊ शकते.

खड्ड्यातील उघड्या झालेल्या केसिंग पाईपवर खालचे सहा इंच सोडून वरपर्यंत सुमारे १ ते २ इंचावर ड्रिलिंग मशिनने अथवा हाताने फिरवायच्या गिरमिटने छिद्रे पाडावी. बाजारात छिद्रे असलेले परफोरेटेड स्क्रिन केसिंग पाईपसुध्दा उपलब्ध आहेत. सच्छिद्र केसिंग पाईपवर नायल़ॉनची जाळी नायलॉन दोरीने व्यवस्थित बांधून घ्यावी. केसिंग पाईपच्या भोवतीलच्या खडड्यात खाली मोठे दगड, त्यावर लहान दगड, त्यावर मोठी खडी, त्यावर बारीक खडी आणि वर वाळूची चाळ असा थर रचावा. शेवटी बारीक वाळूचा थर द्यावा. याला स्टोन फिल्टर असे म्हणतात. विहिर पुनर्भरणाप्रमाणेच जमिनीचा मगदूर आणि चढउतार, त्याचप्रमाणे खडड्यांच्या आकारानुसार खर्च अपेक्षित आहे.''

अशा प्रकारच्या प्रयोगामुळे जमिनीतील बेसिन आणि भेगांमध्ये गाळरहित स्वच्छ पाण्याचा मोठा साठा होतो. बाष्पीभवनामुळे होणारे पाण्याचे नुकसान टळते. १० ते २० विंधन विहिरींच्या पुनर्भरणाने एखाद्या पाझर तलावाइतके पाणी उपलब्ध होऊ शकते. अशा प्रकारच्या जलपुनर्भरणाचा खर्च तुलनेने फारच कमी आहे, अशी या प्रयोगाची वैशिष्ट्ये श्री. बजाज व श्री. कल्याणशेट्टी सांगतात.

शासकीय पातळीवरील योजनांच्या मागं न लागता शेतकऱ्यांनी एकत्र येऊन असे प्रयोग केले तर त्याचा मोठा लाभ होतो. त्यासाठी इच्छाशक्तीची मात्र गरज आहे. आगामी काळात धरणाच्या कालव्यांमधूनही पाणी मिळणे कठीण होणार आहे, कारण धरणातील जलसाठ्यांना हजारो वाटा फुटत आहेत. शेतकऱ्यांनी पाण्याबाबत स्वयंपूर्ण होण्याची हीच वेळ आहे.

रजनीश जोशी, सोलापूर, मोबाईल – ९८५००६४०६६