राजर्षी शाहू छत्रपती आणि दुष्काळ निवारण कार्य

Submitted by Hindi on Sat, 09/09/2017 - 16:24
Source
जलोपासना, दिवाली विशेषांक, 2014

दुष्काळ म्हटले की खाजगी सावकारांचे सुगीचे दिवस असतात. या काळात शेतकर्‍याला जितका नाडवता येईल आणि त्यांच्याकडून त्याच्या अशिक्षित पणाचा फायदा घेवून जितके काढून घेता येईल तितके ते घेत असतात. असा शेतकरी नाडला जावू नये म्हणून छत्रपती शाहु राजांनी सहकारी सोसायट्या आणि पतपेढ्यांमार्फत शेतकर्‍यांना कर्ज देण्याची सोय केली. जे शेतकरी वेळेत कर्ज फेडू शकत नाही त्यांचे बैल आणि इतर दुभती जनावरे सावकार ओढून नेत. त्यालाही महाराजांनी फतवा काढून मज्जाव केला.

भारतात हवामानाचा लहरीपणा ही अत्यंत नियमित घडणारी स्थिती आहे. आपल्या देशातील मान्सून कधी शहण्यासारखा वागेल, तर कधी लहरी महंमद त्याच्यात शिरेल, सांगता येत नाही. देशही इतका मोठा आणि भौगोलिक दृष्ट्या वैविध्याने नटलेला आहे की त्याच्या कुठल्या भागातील मान्सून केव्हा कसा वागेल हे सांगणे कठीण आहे. तरी सुध्दा गेल्या दोनशे वर्षाची मान्सूनची माहिती मिळवली तर असेच दिसेल की देशात दर १० - १२ वर्षांनी एकदा अतिवृष्टी आणि पुढील १० - १२ वर्षांनी अवर्षण काळ ठरलेला. मान्सूनचा ग्राफ कधी सरळ रेषेत नसतोच. तो नेहमीच - क्रेस्ट आणि ट्रफच्या रूपात - खालीवर लहरी सारखा असतो. त्यामुळे या नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्याची तयारी आपल्याला करता येवू शकते. पण आपले नेहमी माकडा सारखे. पावसाळा आला की घर बांधण्याचा संकल्प आणि पावसाळा संपला की पुन्हा पूर्वी सारखे सुरू.

सन १८९६ - ९९ या काळात जेव्हा संपूर्ण भारतात दुष्काळ पडला होता, तेव्हा त्या दुष्काळात संपूर्ण भारतात १०,००,००० लोक मृत्युमुखी पडले होते. पण त्यात कोल्हापूर संस्थानातील एकही व्यक्ती नव्हती. कोल्हापूर संस्थान निव्वळ एकमेव असे होते की त्या दुष्काळावर मात करण्यात तेथील राज प्रशासनाला यश आले होते. असे काय त्यांनी केले की त्यांनी एवढ्या मोठ्या नैसर्गिक आपत्तीवर मात करता आली ?

खरं तर हा लेख मला लिहायला जेव्हा डॉ. देशकरांना सांगितले तेव्हा मी ही असाच प्रश्‍न माझ्या मनाला विचारला , ‘ असे काय छत्रपती शाहु महाराजांनी केले आहे ? कोल्हापूरात असा कितीसा दुष्काळाचा परिणाम असणार आहे ?’ कारण माझे हे मत कोल्हापूरचे आजचे रूप पाहून तयार झालेले होते. पण जेव्हा मी या विषयावरील संदर्भ साहित्य वाचायला लागलो तेव्हा मला डॉ. देशकरांचे शतश: आभार मानावेसे वाटले. एका फार महत्वाच्या इतिहासाबद्दल मी अनभिज्ञ होतो. एक नुकतच मिसरूड फुटायला लागलेला २० - २१ वर्षाचा तरूण, छत्रपती घारण्याच्या गादीवर बसतो काय आणि आपल्या या लहान वयातच अद्वितीय, भव्य दिव्य आणि पुढील अनेक पिढ्यांना फलदायी ठरणारे काम करतो काय !! सगळचं कसं स्वप्नवत वाटते. पण ते सत्य आहे. तुम्ही ही वाचा आणि एक राजा आपल्या प्रिय प्रजेला निसर्ग कोपापासून वाचण्यासाठी कसा तळमळीने तन, मन, धनाने झटतो ते पहा !

छत्रपती शाहु महाराजांनी कोणत्या परिस्थितीत राज्य केले हे कळावे म्हणून थोडक्यात पार्श्वभूमी देत आहे. पश्‍चिम महाराष्ट्राच्या दक्षिणेला असलेले छोटेखानी कोल्हापूर संस्थान. ब्रिटीशांच्या अधिपत्याखाली होते. मधल्या काळात या गादीवर बसलेले छत्रपती वयाने लहान किंवा अल्पायुषी ठरलेले. इथे ब्रिटीश अधिकारी स्थानिक अधिकार्‍यांच्या सहाय्याने संस्थानाचा कारभार पहात होते. त्यामुळे संस्थानावर नोकरशाहीचाच पगडा होता. प्रत्येक जण आपल्या पुरते पहाण्यात, वरिष्ठांना खूष करण्यात आणि प्रजेला नाडण्यात मग्न होता. प्रजेच्या दु:खाशी कुणाला काही देणे घेणे नव्हते. पण आता लवकरच सगळे बदलणार होते. कारण गादीचा खमक्या वारस आता तिच्यावर स्थानापन्न होणार होता.

श्रीमंत यशवंतराव जयसिंगराव घाटगे यांचा जन्म २६ जून १८७४ ला झाला आणि १७ मार्च १८८४ ला, म्हणजेच वयाच्या १० व्या वर्षी, त्यांचा विधीपूर्वक कोल्हापूरचे गादीवर छत्रपती म्हणून राज्याभिषेक करण्यात आला. त्यानंतर यशवंतरावांचे ‘शाहु’ असे नामकरण करण्यात आले. तेव्हापासून त्यांना शाहु छत्रपती म्हणून ओळखले जावू लागले. त्यानंतरचा त्यांचा काळ राजकोट आणि धारवाड येथे शिक्षण आणि राजकीय प्रशिक्षण घेण्यात गेला. तसेच या काळात राजे शाहु यांनी तीन वेळा संपूर्ण देश पालथा घातला आणि भारताची ओळख करून घेतली. त्यांनी त्यांच्या राज्यकारभाराला, खर्‍या अर्थाने २ एप्रिल १८९४ पासून, म्हणजे वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी सुरूवात केली. कारण या दिवशी त्यांनी ‘राजाचे’ सर्व अधिकार ब्रिटीश सरकारने बहाल केले.

शाहु राजे कोल्हापूरच्या गादीवर येण्या अगोदर संस्थानचा कारभार ब्रिटीश अधिकार्‍यांमार्फत आणि नोकरशाहीकडूनच होत होता. त्या काळात ठराविक अधिकारी ‘ अमर्याद सत्तेचे केंद्र’ बनले होते. त्यांच्या नियमबाह्य आणि मनमानी जुलमी कारभाराला प्रजा कंटाळली होती. छत्रपती शाहुंच्या राज्याभिषेकामुळे जनतेच्या मनात हे चित्र बदलण्याची आशा पल्‍लवीत झाली होती आणि ती प्रत्यक्षात आणण्याची जबाबदारी आचा छत्रपतींवर येवून पडली होती.

त्यांनी पहिले काम काय केले असेल, तर आपल्या संस्थानचे प्रशासन जास्तीत जास्त लोकाभिमुख आणि भ्रष्टाचार मुक्त करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी पूर्वीपासून सत्ता केंद्र बनलेल्या इंग्रज, पारशी आणि ब्राम्हण अधिकार्‍यांना त्यांच्या पदावरून मुक्त करायला आणि त्या जागी बहुजन समाजातील हुशार आणि कर्तव्यदक्ष तरूणांना नेमायला सुरूवात केली. त्यांनी ब्रिटीश सरकारकडून गुन्हेगारांना कठोर शिक्षा करण्याचे प्रसंगी फाशी देण्याचे अधिकारही मिळवले.

या त्यांच्या कृतीमुळे त्यांची प्रशासनावर चांगलीच पकड बसली. त्यांनी जसा संपूर्ण देश पाहिला होता, तसेच त्यांचे स्वत:चे संस्थानही अगदी दूरच्या भागात स्वत: जावून, रस्ते नसतांना घोड्यावरून प्रवास करून पाहिले होते. तेथील स्थानिक लोकांशी मिसळून, त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारून रोटी व्यवहार, त्यांच्या मांडीलामांडी लावून सहभोजन करून, त्यांच्या रांगड्या अडाणी भाषेत त्यांच्याशी बोलून, त्यांना समजावून घेवून, जाणून घेतले होते. त्यामुळे आपल्या संस्थानाचा प्रदेश कसा आहे, शेती, जंगल, रस्ते, बाजार पेठा कशा आहेत, आपली प्रजा कशी आहे आणि तिच्या मुलभूत समस्या काय आहेत हे छत्रपती शाहु महाराजांना चांगले उमगले होते. त्यांच्याकडे कुणी वस्तुस्थितीचा विपर्यास करून मखलाशी करू लागला की त्यांना लगेच समजत असे. आणि मग ते त्याची चांगलीच फिरकी घेत.

संपूर्ण संस्थानाची नीट कल्पना आल्यानंतर, त्यांनी विकासावर सगळे लक्ष केंद्रीत केले. कामाच्या स्वरूपाचे वेगवेगळे विभाग करून त्यावर सक्षम अधिकार्‍यांची नेमणूक ते करत आणि त्यांना आपल्या विभागांच्या विकास कामांचा नियोजन आराखडा करण्यास सांगत. त्यांनी आपल्या संस्थानातील तालुका अधिकार्‍यांना त्यांच्या कामाचा अहवाल दर आठवड्याला संस्थानच्या हुजुर चिटणिसांना, कोल्हापूर येथील हुजुर कार्यालयात पाठविण्यास सांगितले होते. त्यामुळे त्यांना संस्थानात काय चालले आहे, हे कळणार होते. या त्यांच्या निर्णयामुळे कामात शिस्त यायला लागली. कर्मचार्‍यांवरच्या जबाबदार्‍या निश्‍चित झाल्या. संस्थानातील विकास कामे आता मार्गी लागणार, अशी आशादायक स्थिती निर्माण झाली. जनतेलाही हे बदल जाणवायला लागले. आता नक्की चांगला बदल घडेल याची त्यांना खात्री वाटू लागली.

छत्रपती शाहु राजे आपल्या विकास कामांना गती देत असतांनाच अचानक संस्थानावर दोन नैसर्गिक आपत्ती ओढावल्या. प्रशासनाची गाडी रूळावर येवून नुकतीच कुठे वेग घ्यायला लागली होती. तेवढ्यात सन १८९६ ला संस्थानात मोठा दुष्काळ पडला. त्याच वेळी कोल्हापूर शहरात आणि आजूबाजूच्या भागात प्लेगच्या साथीचीही लागण झाली. या दोन्ही आपत्तींना तोंड देता देता अननुभवी अगदीच तरूण असलेल्या महाराजांची खूपच दमछाक होवू लागली. पण प्रभावी प्रशासन, कार्यक्षम अधिकारी आणि अनुभवी योग्य सल्‍लागार यांच्या सहाय्याने त्यांनी या दोन्ही आपत्तींना यशस्वीपणे तोंड दिले. संकट काळात राजा कसा असावा आणि त्याने जनतेला कशी मदत करावी याचा एक आदर्शच शाहु महाराजांनी घालून दिला आहे. दुष्काळात प्रशासनाने जनतेसाठी जे जे करायला हवे ते ते त्यांनी केले. या काळात संस्थानचा खजिना त्यांनी लोकांसाठी वापरला. प्रथम त्यांनी तातडीचे अल्पकालीन उपाय योजले आणि लगेचेच कायम स्वरूपी दीर्घकालीन योजनाही आखायला सुरूवात केली. दोन्ही उपाय त्यांनी ताबडतोब अंमलात आणायला सुरूवात केली.

पावसाने १८९६ पासूनच पूर्ण दडी मारली. आकाशातलं पाणी जसं पळाले तसे जमिनीवरचे आणि जमिनीखालचे पाणी सुध्दा अदृष्य होवून लागले. काळीमाय पार भेगाळून गेली. डोंगर उघडेबोडके आणि वाळलेल्या गवतामुळे पिवळे धमक दिसू लागले. पेरलेल्या बियाण्यांवर पक्षी गुजराण करू लागले. जस जसा वेळ जावू लागला तस तशी परिस्थिती आणखीनच बिकट बनत चालली. शेतकर्‍यांच्या घरातल्या कणग्या पार मोकळ्या होवून गेल्या. हातांना काम उरले नाही. दररोजच्या जेवणाची भ्रांत पडू लागली. लोक कामाच्या शोधात गावोगावी भटकू लागले. काहींनी तर गावाला रामराम केला आणि शहराचा रस्ता धरला. जशा दुष्काळाच्या बातम्या संस्थानातून शाहु महाराजांपर्यंत पोचू लागल्या तसे ते अस्वस्थ झाले.

त्यांनी आपल्या अधिकार्‍यांना प्रत्यक्ष निरनिराळ्या भागात जावून परिस्थितीची पहाणी करायला आणि ताबडतोब त्याचा अहवाल दरबारला द्यायला सांगितले. या काळात छत्रपती शाहु स्वत: आपल्या राजवाड्यात बसून सांगीवांगी माहितीवर विसंबून काम करणारे नव्हते. ते स्वत: जातीने आपल्या संस्थानात फिरू लागले. ते लोकांशी संवाद साधत होते. त्यांची पीडा त्यांना कळत होती. जमेल तसे ते त्यावर तातडीने उपाय करत होते. या अस्मानी संकटासमोर मानवी प्रयत्न टिकाव धरतील का ? अशी मनात पाल चुकचुकण्यासारखी परिस्थिती होती. पण प्रयत्न सोडून चालणार नव्हते. हाच खरा कसोटीचा काळ होता. छत्रपती खंबीर होते. ते जनतेला आणि आपल्या अधिकार्‍यांना सतत मार्गदर्शन करत होते. उभारी देत होते.

दुष्काळात लोकांना खायला धान्य आणि प्यायला पाणी लागते. कारण या दोन्ही गोष्टींचीच खरी उणीव जनतेला जाणवत असते. या परिस्थितीचा गैरफायदा घ्यायला काही लोक टपलेलेच असतात. तसे ते त्या काळातही होते. हळूहळू बाजारात धान्याचे दर दामदुप्पट होवू लागले. व्यापार्‍यांनी धान्य गोदामातून दडवायला सुरूवात केली. काही काळासाठी दुकानातून धान्याचे साठेच नाहीसे होवू लागले. अडलेल्या प्रजेला मोठ्या प्रमाणात नाडवले जावू लागले. त्यावर नियंत्रण मिळवणे आणि धान्ये भरपूर प्रमाणात उपलब्ध करून देणे आवश्यक होते. छत्रपती शाहु राजांनी धान्याचे भाव न वाढवण्याचे आणि जास्तीत जास्त धान्य लोकांना उपल्बध करून देण्याचे व्यापार्‍यांना आवाहन केले. व्यापार्‍यांनी खरेदी किंमतीलाच धान्य विक्री करावी, असा आदेश काढला. तसे केले तर व्यापार्‍यांना तोटा होवू शकतो आणि तोटा सहन करून व्यापारी धान्य विक्री करणार नाहीत, याची महाराजांना पूर्ण कल्पना होती. त्यामुळे त्यांनी व्यापार्‍यांचा तोटा संस्थानाच्या कडून भरपाई करून दिला जाईल असे ही त्या आदेशात नमूद केले. इतकेच करून ते थांबले नाहीत, तर गरजू प्रामाणिक व्यापार्‍यांना धान्य खरेदी करण्यासाठी दरबाराकडून बीनव्याजी कर्ज देण्याचीही सोय त्यांनी केली.

याचा चांगला परिणाम व्यापार्‍यांवर झाला. व्यापार्‍यांनी या आदेशाचे पालन करावयास सुरूवात केली. त्यामुळे धान्याचे भाव थोडे खाली आले. काही व्यापार्‍यांनी एकत्र येवून एक स्वस्त धान्य दुकान सुरू केले. यातून इतरही काही व्यापार्‍यांनी प्रेरणा घेवून आपापल्या भागात, गावात स्वस्त धान्य दुकाने सुरू केली. काहींनी खरेदी किंमतीला धान्य विकावयास सुरू केले. संस्थानात धान्य किती उपलब्ध आहे ? ते किती दिवस पुरेल ? याचा आढावा अधिकार्‍यांना घेण्यास सांगण्यात आले. सत्य परिस्थिती समजल्यावर छत्रपतींनी ब्रिटीश सरकारला सर्व परिस्थितीचा अहवाल पाठविला आणि त्यांच्याकडून धान्याची मदत मिळवली. त्यावरच न विलंबून रहाता मधल्या काळात त्यांनी म्हैसूरच्या महाराजांनाही धान्य पुरवठा करण्याची विनंती केली आणि त्यांच्याकडूनही धान्य मिळवले. या धान्याचे वाटप त्यांनी सहकारी संस्था आणि शासकीय यंत्रणेमार्फत करण्यास सुरूवात केली. ते धान्य लोकांपर्यंत योग्य प्रकारे पोचते की नाही हे महाराज जातीने लक्ष घालून पहात असत. तसेच शेजारच्या इतर संस्थानातून आणि प्रदेशातून व्यापार्‍यांमार्फत धान्य आणण्यात येतच होते ते वेगळेच.

धान्य बाहेरून आणले, पण ते घेण्याची कुवत लोकांच्यात असावयास हवी. ती खिशात पैसे असल्याशिवाय कशी येणार ? त्यासाठी लोकांच्या हातांना काम देण्याची गरज होती. धान्य पुरवले पण पाण्याचे काय ? ते कसे आणणार ? त्याकाळात आजच्या सारखे टँकर नव्हते. रस्त्यांचे जाळे नव्हते. त्यामुळे गावोगावी लोकांना पिण्याचे पाणी पुरवणे अवघड काम होते. त्याच बरोबर लोकांना काम देणे, रोजगार उपलब्ध करून देणे ही पण समस्या होतीच. छत्रपती शाहु महाराजांनी या दोन्हीची सांगड घालण्याचा सुंदर आणि खूप दूरवर परिणाम करणारा उपाय शोधून काढला. त्यांनी लोकांना त्यांच्या जुन्या विहीरीतील गाळ उपसणे, विहीरी खोल करणे, त्या रूंद करणे अशा कामात गुंतवून टाकले. जुने बंद पडलेले झरे, काही ठिकाणी गाळ काढल्याने मोकळे झाले. विहीरींना पाणी आले. काही ठिकाणी खोली व रूंदी वाढल्याने विहीरींची पाणी साठवण क्षमता वाढली. ज्यांना विहीरी काढावयाच्या होत्या आणि जे त्यासाठी श्रमदान करण्यास तयार होते, त्यांना संस्थानाकडून काही रक्कम देवून, अशा नवीन विहीरी काढण्यास प्रोत्साहन दिले. यामुळे थोडाफार पाण्याचा प्रश्‍न सुटला. पण यातून छत्रपतींनी मात्र एक चांगला धडा घेतला. या कामांनी तात्पुरता प्रश्‍न सुटला तरी भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होवू नये, यासाठी काही ठोस काम करण्याची आवश्यकता असल्याचे मनोमन जाणले. त्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरू झाले.

दुष्काळी कामामध्ये तात्पुरत्या कामाबरोबरच काही कायम उपयोगाची कामेही घेण्यात येवू लागली. त्यात विहीरी खण्याबरोबरच नदी नाल्यांना बांध बांधणे, तलाव बांधणे, जुन्या तलावातील गाळ काढणे, वाहतुकीसाठी रस्ते बांधणे, नदी नाल्यावर पुल बांधणे अशी कामे घेण्यात येवू लागली. संस्थानात एकूण २२ लाख तलाव बांधण्याचे नियोजन करण्यात आले. संस्थानात पैसा आणि स्थानिक लोकांचे श्रमदान यातून ही कामे करण्यात येवू लागली. त्याचबरोबर जुन्या तलावातील गाळ उपसून त्यांची पाणी साठवण क्षमता वाढवण्यात आली. विशेष म्हणजे यातील अनेक तलाव हे सिंचन तलाव असून त्यावर हजारो एकर जमीन ओलिताखाली आणण्यात आली. आज ही हे तलाव हे सिंचनाचे काम इमानेइतबारे करतांना दिसत आहेत. या तलावामुळे आणि बंधार्‍यामुळे गावातील जनावरांचा पाण्याचा प्रश्‍न सुटला. आपण पाण्याची सोय नेहमी आपल्या दृष्टीनेच करण्याचा विचार करतो. इतर प्राण्यांचा - पक्ष्यांचा विचार आपण क्वचितच करतो.

रस्त्यांच्या कामावर येणार्‍या तरूण स्त्री - पुरूषांच्या बरोबर त्यांची लहान मुलेही असत. ती कामाच्या ठिकाणीच बाजूला झाडाझुडपाच्या सावलीला किंवा उन्हातच ठेवलेली असत. त्यांच्याकडे पहायला कुणी मोठी व्यक्ती नसे. महाराजांनी हे दृष्य स्वत:च्या डोळ्यांनी पाहिले. त्यांना खूप वाईट वाटले. त्यांनी अशा कच्च्याबच्च्यांची काळजी घेण्यासाठी कामाच्या ठिकाणीच शिशुसंगोपनगृहे सुरू केली. या संगोपन गृहात मुलांची काळजी घेण्यासाठी संस्थानच्या खर्चाने आयांची नेमणूक केली. त्या मुलांच्या दुधदुभत्याची, खाण्यापिण्याची आणि औषधांची व्यवस्थाही केली.

लोकांना जसे जगण्यासाठी धान्य आवश्यक आहे, तसाच जनावरांसाठी चारा आवश्यक आहे. दुष्काळात चार्‍याचे दुर्भिक्षही मोठ्या प्रमाणात निर्माण होते. संस्थानात फिरत असतांना चारा पाण्याविना हालहाल होवून मरणारी अनेक दुभती जनावरे आणि बैल शाहू महाराजांनी पाहिले. त्याने अपार दु:खी झालेल्या शेतकर्‍यांना कसा धीर देणार ? या विवंचनेने ग्रासले असतांना महाराजांना कल्पना सुचली. ज्यांना केवळ चारा हवा होता त्यांना त्यांनी संस्थानातर्फे स्वस्त दराने चारा उपलब्ध करून द्यायला सुरू केले. इतकेच करून ते थांबले नाहीत, तर छत्रपती शाहु महाराजांनी असा फतवा काढला की ज्यांना स्वत:ची जनावरे सांभाळणे कठीण होत आहे त्यांनी आपली जनावरे संस्थानाच्या छावणीत आणून सोडावीत आणि जेव्हा मालकाला ती परत न्यावीशी वाटतील तेव्हा त्यांने ती घेवून जावीत.

छावणीत आहेत तो पर्यंत त्या जनावरांचे संगोपन संस्थान करेल. छावणीत सोडलेली जनावरे परत नेत असतांना, आपली जनावरे दुसर्‍यांनीच नेल्याचे अनेकांना कळले. अशा लोकांना नवीन जनावरे संस्थानातर्फे देण्याची महाराजांनी व्यवस्था केली. घोटाळे करणे हे आपल्या समाजाचा अविभाज्य भागच आहे आणि तो पूर्वापार चालत असल्याचे अशा प्रकारावरून दिसून येते. तसेच, छत्रपतींनी संस्थानातर्फे अनेक विभागात जनावरांच्या छावण्या सुरू केल्या, त्या छावण्यात लोकांना आपली जनावरे आणून सोडण्यास सांगितले. त्यांच्या संगोपनाची जबाबदारी संस्थानाने घेतली. ज्यांना आपली जनावरे छावण्यापर्यंत नेणे शक्य नव्हते त्यांना आजूबाजूच्या गावकर्‍यांना सवलत देण्यात आली.

जो राजा दुष्काळात जनावरांची इतकी काळजी घेतो तो वृध्द, अपंग, आंधळे, पांगळे, आजारी रूग्ण व्यक्तींची काळजी घ्यायला कसा विसरेल. अशा दुबळ्या लोकांची काळजी घेण्यासाठी छत्रपती शाहु महाराजांनी त्यांच्या संस्थानात सन १८९६ - ९७ या काळात एकूण ९ निराधार आश्रम चालू केले. ते कोल्हापूर बरोबरच गारगोटी, बाजारभोगाव, कटकोळ, बांबवडा, पन्हाळा, गडहिंग्लज, वळीवडे आणि तिरवडा येथे स्थापण्यात आले. त्यानंतर सन १८९९ - १९०० या काळात आणखीन २ निराधार आश्रम वडगाव व शिरोळ येथे सुरू करण्यात आले. या आश्रमांमधून खरोखर गरजू आणि गरीब लोकांनी आसरा घेतला होता. या आश्रमामध्ये त्यांच्या कपड्या पासून औषधपाण्यापर्यंत सर्व गरजा भागवल्या जात होत्या. या काळात जवळ जवळ ४८,७५० लोकांनी या आश्रमांचा लाभ उठवला असल्याचे दिसून येते. पण जे या आश्रमापर्यंत पोचू शकत नव्हते त्या गरजू अपंग, रोगी व्यक्तींचे काय ? महाराज त्यांनाही विसरले नव्हते. अशा लोकांनी त्यांचा शिधा त्यांच्या घरी पोचता केला जात असे.

दुष्काळ म्हटले की खाजगी सावकारांचे सुगीचे दिवस असतात. या काळात शेतकर्‍याला जितका नाडवता येईल आणि त्यांच्याकडून त्याच्या अशिक्षित पणाचा फायदा घेवून जितके काढून घेता येईल तितके ते घेत असतात. असा शेतकरी नाडला जावू नये म्हणून छत्रपती शाहु राजांनी सहकारी सोसायट्या आणि पतपेढ्यांमार्फत शेतकर्‍यांना कर्ज देण्याची सोय केली. जे शेतकरी वेळेत कर्ज फेडू शकत नाही त्यांचे बैल आणि इतर दुभती जनावरे सावकार ओढून नेत. त्यालाही महाराजांनी फतवा काढून मज्जाव केला.

छत्रपती शाहु महाराजांना माहित होते लोकांच्या हातात पैसा असेल, तर ते आपले प्रश्‍न आपणच सोडवू शकतील. म्हणून शेतकर्‍यांना शेतासाठी तगाई देण्याची योजना महाराजांनी आखली. त्याच बरोबर कर्मचारी आणि नोकर लोक जे पगारावर काम करतात त्यांनाही दुष्काळाची झळ पोहचतच असते. तात्पुरत्या वाढत्या महागाईला तोंड देणे त्यांनाही कठीण जाते. अशा अवस्थेत त्यांच्याकडून मनलावून काम करण्याची अपेक्षा तरी कशी करणार ? हे ओळखून अशा कामगार नोकर वर्गासाठी धान्याच्या रूपात दुष्काळ भत्ता सुरू केला.

दुष्काळ निवारणासाठी संस्थानच्या प्रशासनात स्वतंत्र कचेरी उघडणारे कदाचित छत्रपती शाहु महाराज एकमेव संस्थानिक असावेत. त्यांनी हुजुर कार्यालयातच ‘दुष्काळ निवारण विभाग’ सुरू केला आणि त्याचे अधिकार म्हणून संस्थानाच्या दिवणांचीच नेमणूक केली. निव्वळ कोल्हापूरातच कचेरी काढून ते थांबले नाहीत तर त्यांनी सर्व संबंधित मामलेदार कचेर्‍यांत सुध्दा खास दुष्काळ निवारण विभाग सुरू केला. त्या विभागामार्फत लोकांना दुष्काळ निवारणासाठी लागणारी उपकरणे, हत्यारे, अवजारे आणि इतर साधने पुरवली जात. या साहित्याच्या खरेदीवर एका वर्षात त्यावेळी २६,००० रूपयांहून अधिक खर्च करण्यात आला होता. साधने किंवा उपकरणे नाहीत म्हणून लोकांना शेतीची, विहीरींची किंवा रस्त्याची कामे देतांना अडचण येवू नये, याची पूर्ण खबरदारी घेतली जात असे हे यावरून दिसून येते.

या सर्व विवेचनावरून हेच लक्षात येते की छत्रपती शाहु महाराजांनी दुष्काळ निवारणासाठी कराव्या लागणार्‍या सर्वच बाबींचा सखोल विचार केला होता. लोकांनी या सर्व योजनांचा योग्य वापर केला असता, तर आजच्या पेक्षा कितीतरी वेगळे चित्र कोल्हापूर संस्थानात दिसले असते. पण भ्रष्टाचार आमच्या आचार विचारात इतका खोलवर भिनला आहे की राजाने सदहेतुने आणि सदभावनेने केलेल्या योजनांचे सुध्दा लचके तोडायला आणि आपल्या तुंबड्या भरण्यास त्याचा उपयोग करायला काही महाभागांनी कमी केले नाही. रोजगार हमी योजनेत आज चालतो तसाच भ्रष्टाचार त्यावेळी ही संबंधितांनी केला. जे सरळ सरळ सापडले त्यांना महाराजांनी घरी पाठवले, पण जे गुल्दस्त्यात राहिले त्यांच्यावर वचक बसवण्याची संधी मात्र त्यांनी सोडली नाही.

या अनुभवातून छत्रपती शाहु महाराजांनी काही धडे घेतले आणि आपल्या रोजगार हमी कामाच्या पध्दतीत बदल केले. जुन्या चुका पुन्हा होणार नाहीत याची खबरदारी घेतली. आता त्यांनी असा आदेश दिला की कुणालाही त्याच्या रहात्या गावात दुष्काळाचे कामावर ठेवले जाणार नाही. त्यांना लांबच्या गावात जावून काम करावे, याचे कारण होते ज्याला खरोखरच कामाची गरज असेल तो कामावर येईल. तसेच स्थानिक लोकांकडून मस्टरमध्ये होत असलेले घोटाळेही कमी होतील. दुसरा निर्णय होता मजुरी अदा करण्यासंबंधी. जसे काम केले जाईल त्या प्रमाणेच दाम दिला जाईल असे महाराजांनी जाहीर केले. एक व्यक्ती किंवा व्यक्तींचा गट जितके ब्रास काम करेल त्यानुसार त्यास मजुरी दिली जाईल.

छत्रपती शाहु महाराज केवळ दुष्काळ निवारणाचे काम करून थांबले नाहीत. त्यांनी दीर्घकालीन दुष्काळ निवारण योजना राबवण्याचे नियोजन करावयास सुरूवात केली. त्यांना पक्के ठाऊक होते की आपला शेतकरी कष्टाळू आहे. पण त्याच्याकडे आधुनिक शेतीचे ज्ञान नाही. कारण पुरेसे शिक्षण नाही. म्हणून त्यांनी ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षणावर भर दिला. त्यांनी १४ वर्षे वयापर्यंतच्या मुलामुलींसाठी प्राथमिक शिक्षण मोफत केले. त्यांनी मुलांच्या शिक्षणाइतकीच मुलींच्या शिक्षणालाही प्राथमिकता दिली. त्यातही त्यांनी गावपातळीवर दिल्या जाणार्‍या शिक्षणामध्ये शेतीशास्त्राचे स्वतंत्र अभ्यासक्रम राबवले. जेणे करून शेतकर्‍यांच्या मुलांना व्यावसाईक शिक्षण प्राप्त होईल.

त्यांना माहित होते की आपल्या राज्यात आणि देशात ८० टक्के लोक शेतावर अवलंबून आहेत. त्यामुळे शेती सुधारली, तरच देश सुधारेल आणि त्याचे निसर्गाच्या लहरीवरचे अवलंबन कमी होईल. पुन्हा भविष्यात दुष्काळ आला तर त्यावेळी आमचा शेतकरी आजच्या सारखा आगतिक होता कामा नये. तशा नैसर्गिक आपत्तींना तो तोंड देण्यास सदैव तयारच असला पाहिजे. या विचारांनीच त्यांनी ‘ द किंग एडवर्ड अ‍ॅग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट’ ची स्थापना केली. या संस्थेमार्फत शेतकर्‍यांच्या मुलामुलींना सुधारित बियाणे, खते, कीटकनाशके, उपकरणे साधने आणि आधुनिक शेती पध्दतींची माहिती करून देण्याची त्यांची योजना होती.

याच बरोबर महाराजांनी सुधारित शेती अवजारांचे एक ‘संग्रहालय’ स्थापन केले. त्याच्या माध्यमातून शेतकर्‍यांना लागणारी अवजारे मोफत दिली जात. आधुनिक रासायनिक खते शेतकर्‍यांत वाटली जात. या आधुनिक गोष्टींचे प्रशिक्षण देण्यासाठी महाराजांनी तज्ज्ञ डेमॉन्स्ट्रेटर्स नेमले होते. लोकांचा विश्वास वाढावा म्हणून महाराजांनी या आधुनिक वस्तुंचा वापर करून शेती कशी करावी हे दाखवण्यासाठी एक नमुना शेत तयार केले. ते त्यांनी राजाराम हायस्कूलशी सलग्न केले. या सर्वांचा परिणाम लगेच दिसू लागला, शेतकरी या आधुनिक पध्दतींचा वापर करून शेती करू लागले. देशात कितीही मोठा दुष्काळ पडला तरी कोल्हापूर मात्र बिनधास्त असते. त्याचे कारण छत्रपती शाहु महाराजांनी राबवलेल्या या सर्व योजना आहेत. हे इथले प्रत्येक शेतकरी मान्य करतो.

दुष्काळाला हटविण्यासाठी आधुनिक शेती करणे आवश्यकच आहे. पण आधुनिक शेती करायची असेल, तर तिला खात्रीशीर पाणी मिळेल याची व्यवस्था करणे अत्यंत आवश्यक आहे. हे ही शाहु माहाराजांनी ओळखले होते. म्हणूनच विहीरी, तलाव यांच्या बरोबरच त्यांनी नदीनाल्यांवर बांध आणि धरण बांधण्यास सुरूवात केली. विहीरीसाठी शेतकर्‍यांना कर्ज देवू केली. सर्वात महत्वाचे म्हणजे ब्रिटीश सरकार कडून त्यांनी भोगावती नदीवर फेजिवडे येथे ‘राधानगरी धरणाची योजना ’ मंजूर करून घेतली आणि आपल्याच देखरेखीखाली १९०७ ला त्याची पायाभरणीही केली. १९१७ पर्यंत निम्मे धरण पूर्ण करून घेतले. पण पहिल्याच महायुध्दामुळे काम थांबवावे लागले. त्यानंतर ते काम छत्रपती शाहु महाराजांचे चिरंजीव छत्रपती राजाराम महाराज यांचे कारकीर्दीत पूर्ण झाले. आज या धरणामुळेच अनेक अ‍ॅग्रोइंडस्ट्रीज कोल्हापूर जिल्ह्यात उभ्या असून या जिल्ह्याला दरडोई उत्पन्नामध्ये देशात अगदी वरच्या स्थानावर विराजमान होण्याचा मान मिळवून दिला आहे. या सर्व विवेचनावरून आपल्या लक्षात आलेच असेल की दुष्काळ निवारणाबरोबरच छत्रपती शाहु महाराजांनी पहिल्या ‘हरिक क्रांती’चा पाया घातला. म्हणून त्यांना ‘हरित क्रांतीचे आद्यजनक’ ही मानण्यात येते.

महाराजांनी कोल्हापूरच्या शेतकर्‍यांना सक्षम करण्यासाठी केवळ आधुनिक शेती करण्यास उद्युक्त केले नाही, तर त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी म्हणून कोल्हापूरात मोठ्या बाजारपेठाही सुरू केल्या. त्यासाठी शेजारच्या प्रांतातून सक्षम व्यापार्‍यांना बोलावून त्यांना सर्व सवलती देवून, त्यांना सन्मानाने आपल्या संस्थानात सामावून घेतले. संस्थानातील महत्वाचे रस्ते, पुल त्यांनी बांधलेच पण जिथे ब्रिटीश प्रदेशातील रस्ते व पुल बांधणे संस्थानाच्या दृष्टीने आवश्यक होते तेथे तेही बांधले. कारण महाराजांना माहित होते निव्वळ आपल्या संस्थानातील रस्ते बांधून भागणार नाही तर सभोवतालच्या परिसरातील मुलभूत सुविधांसुध्दा चांगल्या असल्या पाहिजेत. त्यासाठी त्यांनी रेल्वे सारखे त्याकाळचे अत्यंत आधुनिक दळणवळणाचे साधन संस्थानाच्या खर्चाने कोल्हापूरात आणले. त्यामुळे कोल्हापूरचे शेती उत्पादन देशाच्या कानाकोपर्‍यात जावू शकले. या कामय स्वरूपी योजना छत्रपती शाहु महाराजांन्‍नी केल्यामुळे आजचा कोल्हापूरचा शेतकरी सधन आहे आणि दुष्काळास तोंड देण्यास सक्षम आहे. तेव्हा या त्यांच्या कामापासून आज आपण ही चांगला धडा घ्यावा यातच आपले हित आहे.

डॉ. अनिलराज जगदाळे
अध्यक्ष भारतीय जल संस्कृती मंडळ, कोल्हापूर , ४०३, न्या. शामराव मंडलिक पार्क, १३ वी गल्‍ली, राजारामपुरी, कोल्हापूर - ४१६००८, मो : ०८३०८००१११३