अजरामर जलसाहित्य कृती (7) झाडाझडती कादंबरी

Submitted by Hindi on Tue, 12/08/2015 - 12:43
Source
जल संवाद

जाभंळीचा धरणामुळे खैरापुरच्या लोकांना पाणी मिळते, पाण्याखाली जमीन नव्हे सर्वस्व गेलेले जांभळीकर मात्र कोरडेच रहातात. त्यांच्या जगण्याचा प्रवास मात्र दु:खातून आणखी दु:खाकडे असाच चालू असतो. वर्षानुवर्षे गुरूजी कुणासाठीतरी खेटे घालतच असतात, गरीब भांडतच असतात, घरेदारे - शेती - रान असलेल्यांना जगण्यासाठी दुसऱ्याची गुलामी करायची वेळ येते.

धरण येण्याने सुबत्ता येते मात्र त्यासाठी काही लोकांना, काही कुटुंबांना, काही गावांना, आपले सर्वस्व सोडून विस्थापित व्हावे लागते. त्यांच्यासाठी जणू धरणे हे मरणच ठरते. अशाच एका धरणाने विस्तापित झालेल्या गावातील लोकांचे जळजळीत अनुभव म्हणजे ही कादंबरी.

पाच दशकापूर्वी झालेल्या कोयना धरणाच्या विस्थापितांचे प्रश्नही अद्याप पूर्णपणे सुटलेले नाही. सरदार सरोवराच्या निमित्ताने विस्थापितांचा प्रश्न सोडविण्यासाठी मेधा पाटकरांच्या नेतृत्वाखाली एक लढा उभा राहिला. त्यातून पुर्नवसनाचा कायदाही झाला तरीही अद्याप मूळ प्रश्न कायमच आहे. त्यावर झकझकीत प्रकाश टाकणारी विश्वास पाटीलांची ही कादंबरी ..... झाडाझडती.

जलसंवाद मासिकाने 2013 - 14 या कालखंडात पाण्याशी निगडीत अशा कलाकृतींचा परिचय करून देण्याचे ठरविले आहे. आतापर्यंत सहा साहित्यकृती लोकांपर्यंत पोहचल्या आहेत. आज आपण डॉ.विश्वास पाटीलांच्या लौकिक अर्थाने आनंददायी नाही. पण काळजाला भिडणारी आहे. बुध्दी आणि मन दोन्हीला सुन्न करणारी आहे. अशा कादंबरीचा परिचय करून घेवू या. पाणी श्वासाइतकीच निकडीची गरज, अगदी प्रत्येकाला. मग तो माणूस गरीब असो - श्रीमंत असो, खेड्यातला असो वा राजधानीतला असो, लहान असो वा मोठा असो , स्त्री असो वा पुरूष असो, सामान्य असो वा राजकारणी प्रत्येकाला पाणी लागतेच. आणि ते पाणी जर मिळाले नाहीतर होणारा आटापिटा हा जीवघेणा असतो. ही झाडाझडती अशा अर्थाने जीवघेणी आहे.

धरण हा या कादंबरीचा विषय जांभळी या गावी ही एकमेव मोठी घटना घडते. या धरणा भोवती कादंबरी फिरते. राजकारण्यांच्या रोजच्या रगाड्यात एका लहान नदीवरच धरण ही काही मोठी घटना नव्हे. पण जांभळीचे ग्रामस्थांच्या जीवनात मात्र ते घोंघावणारे वादळ आहे. या वादळाने त्यांना सर्वांनाच झोडपले आहे. रोजचे अन्न, वस्त्र, निवारा मिळविण्यातच त्यांचा दिवस उजाडतो - संपतोही. हेच चक्र वर्षानुवर्षे चालू आहे. रोजच्या जीवनात येणारे सुख-दु:खाचे प्रसंग, देवाची पालखी, जत्रा हाच त्यांच्या आयुष्यातील बदल. या कादंबरीला नायक नाही, नायिका नाही, कादंबरीच्या रचनेत असणारी सुरगाठ - निरगाठ उकल काही नाही. काळाचा मोठा स्पॅनही नाही.

एकूण सारा दहा - बारा वर्षांचा कालखंड. जांभळी गावातले ग्रामस्थ - अठरापगढ जातीचे लोक - ही या कादंबरीतील पात्रे आहेत. त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना, धरणामुळे झालेली प्रचंड उलथापालथ, विस्थापिताचे असह्य लाजीरवाणे जिणे, सगळ्या नकाराकडून आशेच्या होकाराकडे जाणारा हा प्रवास आहे. जीवनाचा, दारिद्र्याने, दु:खाने, सर्वस्व गमावलेली ही माणसे आपल्या काळजाचा ठाव घेतात. त्यांचे गाव, तिथली नदी, जमीन, रान, डोंगर, गायी, गुरं, बकऱ्या, लोभवणारा निसर्ग हेच त्यांचे जीवन आहे. त्यांच्या च्या रोजच्या रहाटगाड्यात दारिद्र्यात का असेना जगत आहेत, एकमेकाला माणूसकीच्या धाग्याने बांधलेले आहेत.

त्यांच्या जांभळी गावात धरण होणार ही बातमी येते, बरीच वर्षे बातमीच रहाते. प्रत्यक्षात धरण होणार ही नुस्ती वावटळ रहात नाही, ते प्रत्यक्ष होणार असे चित्र दिसू लागते. आणि प्रत्येकाची झालेली घालमेल, सगळी रडून आपणच ओरबाडले जातोय, हे वास्तव पचवणे त्यांना अवघड जात आहे. गावातील प्रत्येक स्त्री- पुरूष द्या संकटाने कोलमडला आहे. त्यातही त्यांना धीर देणारे त्यांचे प्रतिनिधीत्व करणारे, प्रत्येकाचे संकट स्वत:चे मानणारे, खैरमोडे गुरूजी म्हणजे त्यांचे दैवत आहे. ह्या गुरूजींवर त्यांचा शंभर टक्के विश्वास आहे, गुरूजीही सत्यवचनी, अभ्यासू, प्रेमळ पण लढवय्ये आहेत, निर्माेही आहेत. त्यामुळेच कुठल्याही सरकारी अधिकाऱ्याला ते घाबरत नाहीत, त्यांच्यापुढे दबून रहात नाहीत. ताठ कण्याने, ताठ मानेने ते आपल्या मागण्या कलेक्टर समोर मांडायलाही कचरत नाहीत. थंडपणे सरकारी मिजासखोरांसमोर आपला शब्द लावून धरणे, पाठपुरावा करणे ही सोपी गोष्ट नाही. खैरेमोडे गुरूजी ते करण्यात, काया, वाचा, मने करतात. सामान्यातले असामान्य कसे असतात याचे गुरूजी म्हणजे उत्तम उदाहरण आहे.

पेशाने शिक्षक असले तरी ते इतरांपेक्षा वेगळे नाहीत. त्यांचे राहणीमान इतरांसारखेच आहे. त्यांची बायकोही इतरांसारखी शेतावर कामाला जाते, त्यांची मुलगी म्हणजे त्यांचे विसाव्याचे स्थान आहे, काळजाचा तुकडा आहे. एरवी कडक, कणखर असणारे गुरूजी शेवंती च्या बाबतीत मेणाहूनही मऊ होतात. एरवी गावासाठी परिस्थितीशी दोन हात करणारे गुरूजी गावातील गुंडांना घाबरून लौकर मोकळे होण्यासाठी तिला बिजवराला देतात. तत्वाला मुरड घालून हुंडाही देतात. व्यसनी, नालायक नवऱ्याकडून शेवंती दोन मुलांसह माघारी येते. इतरांसारखी ती ही शेतावर राबू लागते, तिच्यावर बलात्कार होतो. तडफड होऊनही गुरूजी वास्तवाला तोंड देऊन गप्प रहाण्यापलीकडे काही करत नाहीत. खरे म्हणजे संकटांच्या रेट्याने शारिरिक, मानसिक कुठलीच ताकड त्यांच्यात रहात नाही. गुरूजींना असे हतबल झालेले पाहून वाचकही अस्वस्थ होतो. 'अरे असे कसे झाले' हा प्रश्न स्वत:लाच विचारता होतो.

धरणाच्या भूमीपूजनाला आलेल्या अधिकाऱ्यांचे पुजेचे ताट लाथेने उलथवणारी, त्यांना परत जायला लावणारी 'आवडाबाई' हे या कादंबरीतील प्रभावी व्यक्तिमत्व, गावातील प्रत्येकाला ती जवळची वाटते. वयाने वृध्दत्वाकडे झुकणारी, कामाला वाघ असणारी, परिस्थितीपुढे न वाकता दोन हात करणारी आवडा वाचकांच्या मनाचा कब्जा केव्हा घेते कळत नाही. कुटुंबातील वडिलधाऱ्या माणसासारखी गावाची काळजी करणारी, कुणासाठीही मदतीला तत्परतेने उभी रहाणारी, अचूक निर्णयावर ठाम असणारी, अतोनात कष्ट करणारी, विपरित परिस्थितीतही पुन्हा पुन्हा उभी रहाणारी आवडी श्रमजिवी, कष्टकरी ग्रामीण स्त्रीचे प्रतिनिधित्व करते. ती गरीब आहे पण लाचार नाही, उलट अत्यंत स्वाभिमानी लोभस म्हातारी आहे. संकट कोसळले तर हा माझा हा परका असा भेदभाव तिच्याजवळ नाही. म्हणूनच स्वत:चा फाटका संसार असतांनाही ती नकोशी ला जवळ करते.

तिच्या बाळांसकट तिचे डोळ्यात तेल घालून रक्षण करते. लंगडा नवरा गोविंदा, यांच्यासह संसार करून दोन मुलांना त्यांच्या पायावर उभे करणे ही तिच्या आयुष्याची इती कर्तव्यता आहे. गावातील नदी, त्या जवळची तिची जागा, आजूबाजूचे रान, जंगल, तिची पेरूची बाग, आज ना उद्या घरावर कौल चढवून मोठ्या घराचे स्वप्न पहाणारी आवडा म्हणजे त्या निसर्गाचाच एक भाग आहे. ती आणि जंगल वेगळे नाहीच, हे सारे निसर्ग वैभव पाण्याखाली जाणार म्हटल्यावर ती कावरीबावरी होते. वेड्यासारखी रानभर भिरभिरते. आपले सर्वस्व जाणार म्हटल्यावर कोलमडते. गावाची वेसही न ओलांडणारी आवडा दुसऱ्या गावात पुर्नवसन ही कल्पना असह्य करणारी आहे. किंबहुना गावातील ही माणसे म्हणजे त्या निसर्गाचाच एक भाग आहेत. 'धरण म्हणजे मरण' हे त्यांनी मनोमन मानले आहे. त्यासाठी गावाने एकत्र येऊन 'आधी मरण मग धरण' अशा आरोळ्या देत विरोध करायचा निकराने प्रयत्न केला. सरकारी अंकुशाने कशाचाही विचार करता, तो केव्हाच चुरडून टाकला. आता कुठलं माहेर, कुठे वजील, कुठे भाईबंद, प्रत्येक स्त्री जात्यावर बसून म्हणून लागली -

बांधील धरण बुडलं माह्यार,
सये आता कसल आह्यारमाह्यार
बांधील धरण पाणी त्याच गव्यापाशी
सावळा बंधुराया झाला माझा दखेशी
माय एक वाटंला, बंधुची दुजो वाट
काळ बसला डोईवरी - देवा माणसांची ताटातूट
उरावरी धरण ग बाई रोजचच मरण

ही कहाणी कोण्या एकाची नाही, गावातल्या प्रत्येक विस्थापिताची आहे. इतिहास माग पडला आहे, वर्तमान लढण्यात, सावरण्यात जातो आहे तर भविष्यात फक्त अंधार, अंधार आणि अंधारच आहे. हेच त्यांचे जीवन आहे.

कादंबरीतील नात्यांचे लागेबांधे, त्यातील प्रेम, काच, सुष्ट - दुष्ट, याची वीण इतक्या बेमालूमपणे एकमेकात मिसळली आहे की जवाब नाही. मानवी मनाचे विविध रंग असेच कादंबरीभर विखुरले आहेत. आपले कुस्तीगार पुतणे डोईजड होतआहेत असे वाटल्यास व संपत्तीसाठी केलेला त्यांच्या सुनांचा प्रयत्न, हा प्रयत्न प्रत्यक्ष काकाच करतात, भाऊ जातो विकलांग गोविंदा जीवंतपणी मरणयातना अखेर पर्यंत भोगतो. एकीकडे हा हलकटपणा, नीचपणा त्याच लंगड्या गोविंदाचा संसार प्रेमाने जीव ओतून करणारी, गोविंदाला सर्वार्थाने संभाळणारी आवडा, हा मनाचा मोठेपणा आपल्याला अचंबित करतो. तसाच आवडाचा भाऊ सुभन्या, बहिणीवर जीव ओवाळून टाकणारा, सर्वांना मदत करणारा, सुभन्याही चटका लावणारा आहे.

मुंबईत नोकरी करतो, कुटुंबातील अडल्या नडल्याची जबाबदारी स्वत:च्या खांद्यावर घेतो, लक्ष सगळे स्वत:च्या खेड्याकडे, तिथली शेती, तिथली माणसे, निसर्ग यात जीव गुंतलेला. आपल्याला मरण तेथेच यावे, आपली हाडे त्या मातीतच मिसळावीत ही शेवटची इच्छा, होतही तसेच. मरण बहिणीकडे असताना अचानक येते. त्याचे मृत्यूनंतर झालेले धिंडवडे, माणसांच्या विकृत, त्याच आलेले निसर्गाचे अडथळे सर्वच सुन्न करणारे, काय काय आणि किती म्हणून लिहावे.

खैरापुरला विस्थापनांना मिळणारी बसस्टँड जवळची जमीन साखर कारखान्याला दिली जाणे, शाळेची केव्हाही पडेल अशी तकलादू नवीन इमारत, विस्थापितांना उपकार केल्याप्रमाणे ट्रकमधून आणून उघड्यावर उतरवणारी सरकारी यंत्रणा, रस्ता म्हणायचा म्हणून झालेला रस्ता, त्यांना रहाण्यासाठी मिळालेली कुठलीही सोय नसलेली जागा, नापिक जमीन, ही आणि अशी शेकडो उदा. सरकारच्या, अधिकाऱ्यांच्या कोडगेपणा, स्वार्थी राजकारणावर कोरडे ओढणारी आहेत.

डोळ्यांदेखत सर्व शेती नव्हे सर्वस्व पाण्याखाली जाते, वडील जीव देतात तरी शेवट पर्यंत हैबती नोकरीवर कायम होत नाही. विस्थापितांना कबूल केलेल्या नोकऱ्या इतरांना दिल्या जातात. आपल्या हक्काच्या जमिनीसाठी सरकार दरबारी खेटे घालून हाती भोपळाच रहातो. धरणावर काम करणारा शिवराम यंत्राखाली येऊन मरतो. तो कायमचा कामगार नाही म्हणून त्याला कुठलीच सरकारी मदत मिळत नाही, जमीन मिळत नाही. दोन लहान लहान लेकरांची आई नकुशा एका क्षणात उघड्यावर येते. मोठ्या मनाने आवडा तिला जवळ करते. तरण्या ताठ्या नकुशाला माणुसरीच्या नात्याने संभाळते.

प्रथम गुरूजींचा सच्चा चेला असणारा गणू स्वार्थ दिसताच लालाचा सोबती होतो. अनेकांच्या जमिनी हडप करतो, नावावर लावून घेतो. ज्या सावत्र आई मुळे त्याचा जन्म होतो तिलाच बापाच्या मृत्यूनंतर घराबाहेर काढतो, तिचा संपत्तीतला वाटा हडप करतो. कळस म्हणजे ती मेल्याचे खोटे कागदपत्र करून तिची जमीन बळकवतो. वरकडी म्हणजे सरकारदरबारी न्याय मागायला गेल्यावर तिलाच तलाठी मेल्याचे सर्टिफिकेट आणायला सांगतो. निर्लज्जपणाचा कळस, पैशासाठी पोखरली गेलेली यंत्रणा, निर्ढावलेली मने, मला काय त्याचे ही सर्वसामान्यांची वृत्ती, आळशी यंत्रणा सर्वच सुन्न करणारे आहे. सरकारी अधिकाऱ्यांच्या स्वभावाचे विविध पैलू यात दिसतात. केवळ काम करायचे म्हणून करणारे, फक्त नियमावर बोट ठेवून वागणारे, लबाडांच्या तुंबड्या भरणारे, गरीबांना नागवणारे एक का अनेक. यातही देशमुख साहेबांचा अपवाद आहे. तरूण, तडफदार, विस्थापितांबद्दल कळकळा असणारे हे जिल्हाधिकारी थोड्याशा कारकिर्दीत गरीबांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतात, त्यांचे म्हणणे ऐकून घेतात. गरीब, निर्वासित त्यांना देव मानू लागतात. मास्तरांना मदतीला घेऊन, वेळी अधिकाऱ्यांना फैलावर घेऊन कामरारांना कामाला लावून त्यांची घरे, रस्ते, जमीनी यांची व्यवस्था लावतात. सरकारी यंत्रणा तिथेही फिरतेच - स्थिर होण्याआधीच त्यांची बदली होते.

जाभंळीचा धरणामुळे खैरापुरच्या लोकांना पाणी मिळते, पाण्याखाली जमीन नव्हे सर्वस्व गेलेले जांभळीकर मात्र कोरडेच रहातात. त्यांच्या जगण्याचा प्रवास मात्र दु:खातून आणखी दु:खाकडे असाच चालू असतो. वर्षानुवर्षे गुरूजी कुणासाठीतरी खेटे घालतच असतात, गरीब भांडतच असतात, घरेदारे - शेती - रान असलेल्यांना जगण्यासाठी दुसऱ्याची गुलामी करायची वेळ येते.

धरण पर्यटन स्थळे होतात - श्रीमंतांच्या खानपानाच्या सर्व व्यवस्था होतात. पण जांभळीकरांना ना न्याय मिळत, ना धड घर, ना खायला प्यायला. मग गुरूजींना मारहाण होते, शेवंतावर बलात्कार होतो, हैबतीची नोकरी (टेंपररी) जाते असे अनेक, भीक मागून साधे स्मशान देखील मिळत नाही. जीवंतपणीची झडती मेल्यावरही चालू रहाते.

या माणसांच्या मनाचे बारीक सारीक कंगोरे लेखकाने रेखाटले आहेत. त्यांच्या अंधश्रध्दा कळसाबाईवरचा अगस्थ विश्वास, सखाई दगडाचे पाणी करते, अंगात आलं की कंठा हडळींना कुनी बनवते. आसराना पाणी भरायला लावते. या आणि अशा अनेक अंधश्रध्दा त्यांच्या रोजच्या जीवनाचा भाग आहे.

कादंबरीत आलेल्या लोककथा विलक्षण बोलक्या आहेत. कथा खरी यांचीच पण राजा राणीच रूप घेऊन आलेली. राज्यावर संकट आल्यावर मोहनाराणी आपल्या सानुल्याला घेऊन दूरदेशी जाते, भुईसपाट, सुनसान नगरीकडे वळून वळून पहाते. आपला नवीन मार्ग शोधते.

मनुहर आणि इठलाई यांची अशीच एक लोककथा, स्वत:ला मूल नाही म्हणून वहिणीचा मुलगा दत्तक घेतला. तो मनोहर चुलतीत दत्तक घेतला, हिश्याच वाटा आला म्हणून चुलत्याला दत्तक मुलाला मारून आंब्याखाली पुरले. खूप दिवसांनी इठीईला कळले ती वेडी झाली. वेडात ती मनुहर मनुहर हाका मारे, तेथेच मेली आणि झाडा आले.

या कादंबरीचे एकूण सात भाग आहेत. एका भागात पावसाचे चार महिन्यातील प्रत्येक महिन्यातला पडणारा पाऊस, निसर्गात होणारे मनोहरी बदल. गवत, फुलांनी भरलेले रान त्यासंबंधीची लोकगीत यांनी वर्णिलेली आहेत. लेखकाचे निसर्गाचे निरीक्षण अगदी बारीक आहे.

लागला हत्ती त्यान पाडल्या भिंती
लागल्या मघा तर चुलीपुढे हदा
न्हाई लागल्या मघा, तर आभाळाकडे बघा।।

त्यात येणारी रानडुकरांची शिकार असो, कोल्ह्या कुत्र्यांचे ओरडणे असो, मासेमारी असो, भरल्या पावसातच बाहेर पडणारे साप, पक्ष्यांची घरटी लेखकाची लेखणी सगळ्यांची नोंद ठेवते.

यातील येणाऱ्या म्हणीही अगदी चपखळ, भात भरपूर आल की माणस चारीवेळेला भरपूर भात खायची. 'आगोटीच बांगाट, आणि सराईच टोणगाट', 'उतरा नी भात खाईना कुत्राट, 'आवळा घेऊन भोपळा दिला' अशा अनेक.

कादंबरी वाचतांना मला वारंवार जाणवत होते की लेखकाने हे प्रत्यक्ष पाहिले आहे, अनुभवले आहे. त्याशिवाय इतक्या सुंदर व्यक्तिरेखा, माणसांचे नमुने, निसर्गाची वर्णने, येणारच नाहीत. शेवटी ही झाडाझडती कोणाची ? ज्यांचे भवितव्य आम्ही धरणाच्या घशात कोंबले, विकास - प्रगती साठी त्यांना वापरले. स्मशानासाठी सुध्दा ज्यांना भीक मागावी लागली, त्या नडलेल्या आम्ही आणखी नागवले अशांची, जीवंतपणी नव्हे तर मेल्यानंतरही त्यांची झडती चालूच आहे, चालूच रहाणार आहे. राजकीय नियतीच्या अमर्याद ताकदीमुळे सामान्यांना ही झाडाझडती द्यावी लागते. अतिशय स्फोटक राजकीय आशय असलेली ही कादंबरी सुन्न करणारी आहे. मुखपृष्ठही बिलक्षण बोलके आहे. आजवर अनेक धरणे झाली , होतील पण ही झाडाझडती अशीच राहील. प्रत्येकाने वाचलीच पाहिजे अशी ही कादंबरी.

लेखक. विश्वास पाटील,
परीचय लेखिका - मीरा धाराशिवकर - (02562235987)