भारतातील प्रसिद्ध नद्या : सरस्वती नदी

Submitted by Hindi on Sun, 10/22/2017 - 16:08
Source
जलसंवाद, ऑक्टोबर 2017

भूकंपांमुळे जमिनीवर जी उलथापालथ झाली त्यामुळे या नदीचा प्रवाह बदलला असावा. ही नदी नाहीशी झाल्यामुळे तिच्या आजूबाजूची मानवी वस्ती विखुरल्या गेली. लोक इतस्ततः पांगले. जातांना सोबत ते सरस्वती नदीची आठवण सोबत घेवून देशभर पसरले. त्यांना वाटेत जिथेजिथे नदी लागली तिथेतिथे ते स्थायीक झाले. पण नदीची आठवण ताजी असल्यामुळे त्या नदीचे नामकरणही त्यांनी सरस्वती नदी असेच केले. परिणामतः या सर्व प्रदेशात बर्‍याच नद्यांचे नावे सरस्वती नदी असेच आढळते.

जी नदी दिसत नसून सुद्धा वर्षानुवर्षे आपले अस्तीत्व टिकवून आहे तिचे नाव सरस्वती नदी आहे. ज्या संस्कृतीला आपण सिंधू संस्कृती म्हणतो ती सिंधू संस्कृती नसून ती सरस्वती संस्कृती आहे असे आज अभ्यासक म्हणायला लागले आहेत. सुरवातीला जी हिमालयातून उगम पाऊन त्रिवेणी संगमस्थळी गंगेला मिळत होती तिने काळाच्या ओघात आपला प्रवास बदलून आपला मोर्चा अरबी समुद्राकडे वळविला. आणि आजही ती गुप्त स्वरुपात जमिनीखालून आपला प्रवास करीत आहे असे सिद्ध झाले आहे.

सरस्वती नदीचे उल्लेख फार पुरातन काळापासून आढळतात. ऋगवेद व यजुर्वेदापासून तर रामायण, महाभारतातही या नदीचे उल्लेख आहेत. रामायणात दशरथ राजा आजारी असतांना भरताला आणण्यासाठी जे दूत पाठविले गेले होते त्यांनी जातांना व येतांना सरस्वती नदी पार करुन गेल्याचा उल्लेख आहे. महाभारतात बलराम श्रीकृष्णावर रागवून प्रवासाला निघाला असतांना तो याच नदीच्या काठाकाठाने उत्तरेकडे गेल्याचा उल्लेख आहे. तो जे महत्वाचे टप्पे पार करत गेला ते टप्पे आजही भारताच्या नकाशावर आढळतात. पुराणांमध्ये या नदीचे उल्लेख फारच कमी आढळतात. याचा अर्थ असा की त्या कालखंडात जो बदल व्हायचा होता तो होवून गेला होता व या नदीचे अस्तीत्व लोप पावले होते असा अर्थ काढला जात आहे.

देशात सध्या सरस्वती नदीच्या संशोधनाची एक लाट उसळली आहे. त्यासाठी सॅटेलाइटवरुन जे नकाशे तयार करण्यात आले त्यावरुन अशी नदी खरेच अस्तीत्वात होती याचे पुरावे उपलब्ध झालेे आहेत. त्या मार्गाचे खोदकाम करुन तसा प्रवाह आजही आढळून येतो. या खोदकामात प्रवाहातील रेती तपासून पाहिली असता ती हिमालयाच्या रेतीशी तंतोतंत जुळते. या वरुन हा प्रवाह हिमालयाकडून येत आहे याची संशोधकांना खात्री पटली आहे.

भूकंपांमुळे जमिनीवर जी उलथापालथ झाली त्यामुळे या नदीचा प्रवाह बदलला असावा. ही नदी नाहीशी झाल्यामुळे तिच्या आजूबाजूची मानवी वस्ती विखुरल्या गेली. लोक इतस्ततः पांगले. जातांना सोबत ते सरस्वती नदीची आठवण सोबत घेवून देशभर पसरले. त्यांना वाटेत जिथेजिथे नदी लागली तिथेतिथे ते स्थायीक झाले. पण नदीची आठवण ताजी असल्यामुळे त्या नदीचे नामकरणही त्यांनी सरस्वती नदी असेच केले. परिणामतः या सर्व प्रदेशात बर्‍याच नद्यांचे नावे सरस्वती नदी असेच आढळते. त्या प्रवाहाशी निगडीत असलेली राज्य सरकारे, त्या परिसरातील विद्यापीठे, असे सर्वजण मिळून या नदीच्या अस्तीत्वाचा शोध घेत आहेत. व त्या दृष्टीने त्या त्या ठिकाणी संशोधन चालू आहे. सॅटेलाइट वरुन या नदीचा जो नकाशा तयार करण्यात आला आहे तो आपल्या देशाच्या पंतप्रधानांच्या कार्यालयात लावला गेला आहे.