Source
जलसंवाद, सप्टेंबर 2017

हिमायतसागर आणि उस्मानसागर हे तलाव होण्याचे आधी हुसेनसागर हाच तलाव हैद्राबाद शहराची पाण्याची गरज भागवत होता. या सरोवराजवळ टँकबंड रोड पूर्वी फारच चिंचोळा होता. पण हैद्राबाद राज्याचे पंतप्रधान मिर्झा इस्माईल यांनी त्याची रुंदी बरीच वाढविली. आता तर एन.टी रामाराव आंध्रचे मुख्य मंत्री असतांना त्यांनी याला प्रशस्त स्वरुप दिले. १९८५ साली या सरोवरात भगवान बुद्धाचा पुतळा उभारण्यात आला. या ४०० टनी वजनाच्या या पुतळ्याला घडविण्याचे काम २०० कलाकार सतत दोन वर्ष करीत होते. या तलावालगतच ७.५ एकरांवर लुंबिनी पार्क उभारण्यात आला आहे. या सरोवराला सजवण्यासाठी सुंदर बगीचा, लेझर शो दाखविणारे ऑडिटोरियम, नौकानयनाची सोय करण्यात आली आहे. सरोवराची शोभा वाढविण्यासाठी या राज्याच्या संस्कृतीशी निगडीत अशा ३४ महापुरुषांचे पुतळे सरोवराच्या काठावर उभारण्यात आले आहेत. २०१२ साली या सरोवराला जागतिक पर्यटन दिवसाचे निमित्त हेरिटोज साईट म्हणून घोषित करण्यात आले आहे.
या सरोवराची सद्यस्थिती मात्र गंभीर झालेली आहे. हैद्राबाद आणि सिकंदराबाद शहराचे सांडपाणी या सरोवरात मोठ्या प्रमाणात सोडण्यात आले आहे. शहरांची बेसुमार वाढ या सरोवरासाठी घातक ठरत आहे. यामुळे पारिस्थितीकीचे प्रश्न डोके वर काढत आहेत. जैवविविधता नष्ट होत आहे. त्याचप्रमाणे प्राण्यांचे व वनस्पतींचे अस्तीत्व धोक्यात आले आहे. या सरोवराचे जवळ सांडपाणी शुद्धीकरण यंत्रणा उभारली गेली आहे पण ती इतकी तोकडी आहे की परिस्थितीत फार काही सुधारणा होतांना दिसत नाही.
स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेवून या सरोवराचे संवर्धन करण्यासाठी एक सरोवर संवर्धिनी या ठिकाणी स्थापली आहे. सरकारचे प्रतिनिधी, कार्यकर्ते व लाभार्थी यांचे प्रतिनिधी एकत्र घेवून या सरोवर संवर्धिनीची देखभाल व्यवस्था उभारली गेली आहे. जपानच्या पुढाकाराने एक इंटरनॅशनल लेक एन्व्हायर्नमेंट कमिटी स्थापन करण्यात आली आहे. या कमिटीने २००८ साली हैद्राबादला एक अंतरराष्ट्रीय कार्यशाळा आयोजित केली होती. या परिषदेचा उद्देश भारतातील सरोवरांच्या जोपासनेसाठी एक स्थायी स्वरुपाची व्यवस्था निर्माण करणे हा होता. सरोवरांवरील आक्रमण थोपवणे, सरोवरात सांडपाण्याचे विसर्जन थांबविणे, नैसर्गिक व सांस्कृतिक कारणांमुळे निर्माण होणारा गाळ थांबविण्याची व्यवस्था करणे, जलपर्णींची वाढ थांबविणे यासारखे कार्यक्रम या सरोवर संवर्धिनीच्या मार्फत घण्यात येतात. सरोवर विकासाचा भविष्यातील आराखडा तयार करण्याचे कामही सरोवर संवर्धिनी मार्फत व्हावे ही अपेक्षा आहे.
हुसेन सागर, हैद्राबाद