भारतातील प्रसिध्द सरोवरे : सांबर सरोवर

Submitted by Hindi on Mon, 10/23/2017 - 09:39
Source
जलसंवाद, ऑक्टोबर 2017

भारतातील सर्वात मोठे असे खार्‍या पाण्याचे हे सरोवर आहे. जयपूर पासून 96 किमी व अजमेर पासून 64 किमी अंतरावर राष्ट्रीय हमरस्ता 8 वर हे सरोवर वसले आहे. या सरोवराला पाण्याची आवकही नाही व जावकही नाही. मेंढा, रुपनगढ, खांडेल व कुरियन या नद्यांपासून पाटाने या सरोवरात पाणी आणले जाते. या सरोवरासभोवताल एकूण 38 गावे वसली आहेत. हे सरोवर नागौर व जयपूर जिल्ह्यात पसरले आहे. अजमेर जिल्ह्याची सीमा या सरोवराला भिडली आहे.

सांबर सरोवरया सरोवराची लांबी 35 किमी असून रुंदी वेगवेगळ्या ठिकाणी 3 ते 11 किमी पर्यंत पसरली आहे. सरोवराची खोली वेगवेगळ्या ठिकाणी 60 सेंटीमीटर ते 3 मीटरपर्यंत आहे. या सरोवराचा परीघ 96 किलोमिटर्सचा आहे. हे सरोवर दोन भागात विभागले गेले आहे. या दोन भागांच्या मध्ये 5 किलोमीटर लांबीचा बांध बांधण्यात आला आहे. सरोवराच्या एका भागात पाटाचे पाणी सोडले जाते. पाण्याने एक विशिष्ट उंची गाठली म्हणजे ते पाणी दुस-या भागात सोडण्यात येते. या दुस-या भागात मीठागार आहे. हा भाग म्हणजे एक मोकळे मैदानच आहे. बाष्पीभवनाने पाणी उडून गेल्यावर तिथे मीठ तयार होते. ही प्रथा हजारो वर्षांपासून चालू आहे. उन्हाळ्यात या भागाचे उष्णतामान 40 डिग्रीपर्यंत वाढते. या सरोवरातून दरवर्षी 210 हजार टन मीठ तयार होते. भारताची 9 टक्के गरज हे सरोवर पूर्ण करते. दरवर्षी वेगवेगळ्या हंगामात तयार होणारे मीठ एकसारखे खारट असत नाही. त्यांचा खारटपणा वेगवेगळा असतो.

मीठ तयार करण्याची पूर्ण प्रक्रिया ही बाष्पीभवनावर आधारित आहे. सांबर साल्ट,(मर्यादित) आणि राजस्थान सरकार यांचा हा संयुक्त उपक्रम आहे. या सरोवराच्या पूर्वेला रेल्वे लाईन आहे. त्या रेल्वे लाईनलवर सांबरलेक सिटी आणि जयपूर विमानतळ ही दोन स्टेशन्स आहेत. जगात सरोवरांना दर्जा देण्यासाठी जी रामसर साइट संकल्पना आहे तो दर्जा या सरोवराला देण्यात आला आहे. या सरोवराच्या पाणथळ भागात दरवर्षी सैबेरिया आणि उत्तर आशिया या भागातून हिवाळ्यात हजारोंच्या संख्येने फ्लेमिंगो पक्षी येत असतात. सरोवराच्या लगतच्या जंगलात नीलगाई, हरणे व कोल्हे यांचा मुक्त संचार असतो.

या भागात पावसाचे प्रमाण वाढत असूनसुद्धा सरोवराची पाणी पातळी खालावत चालली आहे कारण ज्या नद्यांपासून पाणी आणले जाते त्या नद्यांवर धरणे बांधण्यात आल्यामुळे ही आवक मंदावली आहे. पाण्याची ही कमतरता भूजल उपसून भागवली जात असल्यामुळे या प्रदेशातील भूजल पातळी वेगाने घसरत चालली आहे. आजूबाजूच्या ग्रामीण भागात पाण्याचा दुष्काळ निर्माण होत आहे.