अनाम प्रेमींकडून मिळाले अमाप प्रेम

Submitted by Hindi on Mon, 10/05/2015 - 15:03
Source
जल संवाद
महाराष्ट्रात अनाम प्रेम नावाची एक संस्था आहे. तिला संस्था तरी कसे म्हणावे ? संस्था म्हंटली म्हणजे कार्यकारिणी आली, अध्यक्ष आले, कामाखाली दबलेले सचिव आले, कार्यालय आले, वर्गणी आली, बँकेचे खाते आले. असे यांच्याजवळ काहीही नाही. अनुयायी मात्र असंख्य आहेत व ते प्रेमाने एकमेकांशी व समाजाशी प्रेमाच्या अतूट बंधनाने जोडले गेले आहेत. हा प्रेमाचा झरा निर्माण करणारे एक दादाजी आहेत. या दादाजींचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांना स्वत:बद्दल बोललेले आवडत नाही. थोडीशी चौकशी केल्यावर ते एक निवृत्त न्यायाधीश आहेत एवढीच ओळख मिळाली. तेच स्वत: बद्दल बोलायला तयार नाहीत म्हंटले म्हणजे त्यांच्याबद्दल जास्त माहिती मिळविणे सभ्यतेला धरून नाही असे समजून आपण त्यांनी निर्माण केलेले हे प्रेमाचे बंध व त्याद्वारे जोडले गेलेले समाजातील विविध दुर्लक्षित सामाजिक गट व त्यांच्यासाठी अनाम प्रेमींची कार्य करण्याची दांडगी इच्छाशक्ती याबद्दल विचार करणे मला जास्त संयुक्तिक वाटले म्हणून हा लेखन प्रपंच.

अनाथ, आंधळ्या व्यक्ती, अपंग, मंदमती व्यक्ती, मुकबधीर, रिक्षा चालविणारे, ड्रायव्हर्स, बस ड्रायव्हर्स, इस्पितळात कार्य करणाऱ्या नर्सेस, पिडीत महिला, चतुर्थ श्रेणी कर्मचारी, डाक कर्मचारी, रेल्वेचे कार्मचारी, शहीद व जखमी जवान व त्यांची कुटुंबे, तृतीय पंथी व्यक्ती, मोल मजुरी वर काम करणाऱ्या स्त्रिया यांच्यासाठी वेगवगेळे कार्यक्रम आयोजित करून त्यांना दिलासा देण्याची धडपड अनाम प्रेमी सातत्याने करीत असतात. त्यांच्याबरोबर हे सर्व वर्ग समाजासाठी ज्या पध्दतीने राबत असतात त्याचाही गौरव व्हावा हा या कार्यक्रमांचा उद्देश असतो.

अनाम प्रेम ही एक धर्मातीत संस्था आहे. प्रत्येक धर्माच्या सणांना समाजसेवेची जोड देवून ते साजरे करण्यात येतात. भारत हा विविध धर्मांचा, जातींचा, पंथांचा देश आहे व इथे जातीय व धार्मिक एकोपा टिकवणे आवश्यक आहे ही भावना बाळगून प्रत्येक धर्माच्या सणांना समाजसेवेची जोड देवून ते साजरे केले जातात. ईस्टरच्या वेळी चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांबरोबर, दिवाळीला परदेशी विद्यार्थ्यांबरोबर, गुरूनानक जयंतीच्या दिवशी गुरूद्वारात मोबाईल फोन जंतुविरहित करण्याची सोय देवून, मोहरमला सरबताचे वाटप करून, पतेतीला पारशी वृध्दाश्रमांना भेट देवून, महावीर जयंतीला तृतीय पंथी व्यक्तींबरोबर प्रेम व सद्भावना वाटून सण साजरे करण्यात येतात. याशिवाय वसुंधरा दिन, भाषा दिन, आल्हाद दिन, महिला दिन, सौरभ दिन (रविंद्र संगीत) असे विविध दिनही उत्सव म्हणून साजरे केले जातात.

अनाम प्रेमने पाण्याशीही नाते जोडले :


जलसंवादने काढलेला पाणी प्रश्नावर प्रकाश टाकणारा 'जलोपासना' हा दिवाळी अंक श्रीमान दादाजी यांच्याकडे त्यांच्या अनुयायांतर्फे पोहोचला. झाले ! अनामप्रेमचे पाण्याशी जवळचे नाते जुळले ! त्यांनी आपल्या अनुयायांना पाणी प्रश्नासंबंधी अधिक माहिती मिळविण्याची सूचना केली व त्या संदर्भात माझ्याशी संपर्क करण्याचा सल्ला दिला. एका दिवसात मला पन्नासपेक्षा जास्त फोन कॉल्स आल्याबरोबर मला अनाम प्रेमची शक्ती कळली व या शक्तीचा वापर जलसाक्षरतेसाठी कसा करून घेता येईल याबद्दल माझ्या डोक्यात चक्रे फिरावयास लागली.

संक्रातीचा सण स्त्रियांचा. या स्त्रियांचा पाण्याशीही तितकाच जवळचा संबंध. या संबंधात अनामप्रेमींकडून योजना आखण्यात आली. व संक्रांतीच्या हळदीकुंकू कार्यक्रमात पाणी प्रश्न, त्याची गंभीरता, पाणी प्रश्नाची उकल करण्यात महिलांना कसे सहभागी करून घेता येईल, पाणी बचतीचे मार्ग कोणते, त्या संदर्भात महिलांचे योगदान काय राहू शकते, हा संदेश पोहोचविण्यासाठी माझी कोल्हापूर, मुलुंड, गोरेगाव, मलाड, विरार, कांदीवली, परळ इत्यादी ठिकाणी भाषणे आयोजित करण्यात आलीत. मकर संक्रांतीच्या कार्यक्रमात वाण वाटण्याचा प्रघात आहे. या विविध कार्यक्रमात काय वाण वाचण्यात आले याची आपण कल्पना करू शकता ? देशकर यांनी लिहिलेली 'चला जलसाक्षर होवू या' ही पुस्तिका ! या साठी अनाम प्रेम मंडळींनी वर्गणी जमा करून या पुस्तिकेच्या 2000 प्रती छापून घेतल्या व त्यांचे विविध ठिकाणी वितरण करण्यात आले. आजही माझ्याजवळ 25 च्या वर भाषणांची निमंत्रणे pending आहेत व जसाजसा वेळ मिळेल तसतशी मी ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन.

श्रीमान दादाजींशी चर्चा करतांना मी उद्योजकतेवर पुस्तक लिहिले असून त्याचा समाजातील उद्योजकता वाढविण्यासाठी काय करता येईल याबद्दलही बोलणे झाले. अंधांना उद्योजकतेचे धडे देण्यासाठी या पुस्तकाचे ब्रेल लिपीत भाषांतर करता येईल असे सांगताच तिही योजना ताबडतोब निश्चित झाली व अनाम प्रेमींच्या सहाय्याने ती योजना नजीकच्या भविष्यात प्रत्यक्षात येईल याबद्दल माझ्या मनात मुळीच संदेह नाही.

मोबाईल नेटवर्कचा अत्यंत कार्यक्षमपणे व कौशल्याने वापर करणारी अनाम प्रेम ही एक संस्था आहे. एखादी घटना कोठेही घडली तर क्षणार्धात त्याची बातमी सर्व अनाथ प्रेमी परिवाराला कळते. जलसंवाद प्रकाशनने प्रकाशित केलेल्या जलोपासना या पाण्यावर वाहिलेल्या दिवाळी अंकाला मुंबईतील एका संस्थेतर्फे पुरस्कार मिळाला ही बातमी अनाम प्रेमींना कळल्याबरोबर तिचे प्रसारण इतके वेगाने झाले की माझा मोबाईल अभिनंदनाच्या कॉल्सनी सतत वाजता झाला. प्रेम द्यावे तर अनाम प्रेमींनीच याची खात्री पटली.

अनाम प्रेमीच्या कोल्हापूर येथील मकर संक्रांतीचा कार्यक्रम तर अफलातून झाला. महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनाची जशी महिन्यापासून तयारी सुरू असते तशी तयारी या कार्यक्रमासाठी चालू होती. स्टेजची उभारणी व सजावट तर अत्यंत वेधक होती चार साडेचार तासाचा एकूण कार्यक्रम अत्यंत शिस्तबध्द पध्दतीने पार पडला. कार्यक्रमाला तृतीय पंथीयांचा गट, अपंगांचा गट, मूक बधिरांचा गट कार्यक्रमाची शोभा वाढवित होता. कार्यक्रमाचे उद्घाटनच एका आगळ्या वेगळ्या पध्दतीने झाले. एका तृतीय पंथी व्यक्तीच्या हस्ते दीप प्रज्वलन होवून कार्यक्रमाचा प्ररंभ झाला. विविध गटांनी कार्यक्रमात आपल्या कलांचे प्रदर्शन केले. अनाम प्रेमचे बरेचसे कार्यकर्ते पहाटे उठून रस्त्यावर रीक्षा थांबवून रिक्षा चालकांना तीळगुळाचे वाटप करून त्यांच्याशी प्रेमबंध निर्माण करून आले. त्यासाठी तयार करण्यात आलेले खास प्रेमवृध्दीचे संदेश रिक्षावर चिकटविले गेले.

अनाम प्रेमींनी संघटित केलेली माझी पहिली मुंबई सफर तर अत्यंत संस्मरणीय झाली. मुलुंडचे खानोलकर कुटुंबीय, गोरेगावचे सामंत व सरनाईक कुटुंबीय, कांदीवलीचे मेस्त्री कुटुंबीय, त्याचप्रमाणे तेली कुटुंबीय, मालाडचे परब कुटुंबीय, वांद्र्याचे कापसे कुटुंबीय, विरारचे पाटील कुटुंबीय, कोल्हापूरचे चोडणकर कुटुंबीय, त्याचप्रमाणे केळुंजकर कुटुंबीय यांनी मला दिलेली सहृद वागणूक मी कधीच विसरू शकणार नाही. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात त्यांच्याकडील Home stay कायमचा स्मृतीत राहील.

एका अनाम प्रेमीला मी म्हणालो, तुमच्या संगतीत एक आठवडा राहिल्यामुळे माझ्या विचार सरणीत बदल झाला. रिक्षा चालकाला मी नमस्कार व धन्यवाद म्हणायला लागलो तर ती म्हणाली, फरक आमच्यातही झाला आहे. पाणी वापरतांना आम्हाला सतत तुमची आठवण होते. आमच्या पाण्याकडे बघण्याच्या दृष्टीकोनात निश्चितच बदल झाला आहे.

इतक्या सर्व अनाम प्रेमींची सांगड बांधण्यात श्रीमान दादाजींना जे यश आले त्याबद्दल त्यांच्याबद्दलची आदराची भावना निश्चितच वृध्दींगत झाली आहे. त्यांना सादर प्रणाम !

डॉ. दत्ता देशकर, पुणे - मो : 09325203109