सत्र पाचवे जलसाहित्य : स्वरूप आणि व्याप्ती

Submitted by Hindi on Sat, 02/06/2016 - 12:23
Source
जल संवाद

पाण्याची रूपे ही विविध असतात अन त्यामुळे पाण्यासंबंधातील निर्माण होणाऱ्या साहित्यासाठी नवीन नवीन विषय सुचू शकतात यावर त्यांनी आपल्या विवेचनात भर दिला. संथ वाहणारे पाणी, धो धो वाहणारे पाणी, जमिनीतील पाणी, भूपृष्ठावरील पाणी या विविध स्वरूपामुळे लेखकाला वेगवेगळ्या उर्मी मिळू शकतात असे ते म्हणाले.

जलसाहित्य म्हणजे नेमके काय ? ते सर्वसाधारण साहित्यापेक्षा कसे वेगळे ठरते, त्याची व्याप्ती काय असावी याबद्दल सर्वसामान्य माणसाच्या मनात आजही संदेह असल्यामुळे यावर जलसाहित्य संमेलनात चर्चा व्हावी या उद्देशाने या संमेलनात एक खास सत्र या विषयावर आयोजित करण्यात आले होते. या चर्चा सत्रात भाग घेण्यासाठी श्री. सूर्यकांत रहाळकर, डॉ. राजन जैसवाल व श्रीमती मेघना वाहोकार या तिघांना आमंत्रित करण्यात आले होते पण व्यक्तिगत अडचणींमुळे त्यांना चंद्रपूरला येणे जमले नाही. डॉ. जया द्वादशीवार या एकट्याच अधीकृत वक्त्या उरल्यामुळे ऐन वेळी श्री. किशोर पाठक यांना या चर्चासत्रात भाग घेण्याची विनंती करण्यात आली आणि त्यांनीही ती त्वरित मान्य केल्यामुळे या चर्चासत्राला निश्चितच अर्थ प्राप्त झाला. या चर्चासत्राचे नियोजित अध्यक्ष डॉ.दत्ता देशकर यांनी चर्चासत्राला प्रारंभ केला. प्रारंभी श्रीमती जया द्वादशीवार यांनी ओपनिंग बॅट्समन म्हणून जबाबदारी स्वीकारतांना या विषयाच्या गाभ्याला हात घातला.

डॉ. जया द्वादशीवार :
एकंदर पृथ्वीतलावर दोन भाग पाणी व एक भाग जमीन असूनसुध्दा त्यामानाने जलसाहित्य फार कमी प्रमाणात निर्माण झालेले आहे याची खंत त्यांनी व्यक्त केली. पाण्याचे महत्व विषद करतांना त्यांनी गौतमाचा भगवान गौतम बुध्द कसा झाला याच्या इतिहासाचा आढावा घेतला. पाणी प्रश्न सोडविण्यासाठी चर्चा महत्वाची असून हा प्रश्न चर्चेद्वारे सोडविण्यात यावा, यासाठी युध्द करण्याची आवश्यकता नाही व आवश्यकता पडल्यास मी राज्य त्याग करावयास सुध्दा तयार आहे पण युध्द करू नका हा समंजसपणाचा संदेश त्यांनी समाजाला दिला आणि त्याबरहुकूम वागून राज्य त्याग करून एक आदर्श समाजाला घालून दिला. आज पाण्याचे समन्यायी वाटप व्हावे ही संकल्पना मूळ धरत आहे. त्याचे मूळ वरील विचारात लपलेले आहे हे त्यांनी दाखवून दिले.

जलसाहित्याच्या संदर्भात त्यांनी कलेकरता कला की व्यवहारा करता कला हा साहित्यातील वाद सुध्दा विचारात घेतला आणि पाणी प्रश्नाचे स्वरूप स्पष्ट करण्यासाठी जे साहित्य निर्माण व्हावयास हवे ते या दुसऱ्या प्रकारात मोडते याची श्रोत्यांना जाणीव करून दिली. शहरापेक्षा खेड्यात पाणी प्रश्न जास्त तीव्रतेने भेडसावत असल्याने जे जलसाहित्य निर्माण झाले आहे त्यावर ग्रामीण जीवनाचा ठसा जास्त प्रमाणात असलेला दिसून येतो याचीही चर्चा त्यांनी केली. आदिवासींच्या ज्या लोककथा आहेत त्यातही बऱ्याचशा कथा या पाण्याशी जास्ती निगडीत आहेत असेही त्या म्हणाल्या. संत साहित्यात सुध्दा पाण्याला महत्वाचे स्थान आहे हे ज्ञानेश्वरी, दासबोध यासारख्या ग्रंथात नमूद करण्यात आले आहे हे ही त्यांनी श्रोत्यांच्या निदर्शनाला आणून दिले. पाण्याचा युक्तीने वापर व्हावा याचाही उल्लेख संत साहित्यात असल्याचे मत त्यांनी प्रदर्शित केले.

पाणी हा महिलांच्या जीवनाशी जास्त जवळून निगडीत असल्यामुळे महिला कवियत्रींनी सुध्दा पाणी विषय आपल्या काव्यात उचलून धरलेला आहे असे मत त्यांनी प्रदर्शित केले. बहिणाबाई, सरोजीनी बाबर, दुर्गा भागवत यांच्या साहित्यातून स्त्रीयांचा पाण्याशी असलेला संबंध त्यांनी विषद केला. स्त्री लेखिकांच्या लेखनात पावसाला फारच महत्व आहे हे ही त्यांनी दाखवून दिले. आनंदातही पाऊस आणि दु:खातही पाऊस, प्रियकर आणि पाऊस अशी विविध पाण्याची रूपे त्यांनी विविध स्त्रीयांच्या लिखाणातून स्पष्टपणे दाखवून दिली.

पाण्याच्या बाबतीत वैचारिक लेखन भरपूर प्रमाणात झालेले आहे यावर त्यांनी जोर दिला. दत्तप्रसन्न दाभोळकरांचे नर्मदा नदीवरचे लिखाण, अभिजीत घोरपडे यांचे पर्यावरणावरील लिखाण ही उदाहरणे देवून त्यांनी वैचारिक लेखन कसे विकसित झाले आहे हे सभेच्या निदर्शनाला आणून दिले. सामान्य माणसाच्या मनातील जाणीवांना खत पाणी घालून या लेखकांनी पाणी प्रश्न समाजासमोर चांगल्या प्रकारे मांडण्याचा प्रयत्न केला याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

पाणी प्रश्न साहित्याद्वारे चांगल्याप्रकारे मांडला जावा हा जलसंस्कृती मंडळाचा उद्देश महत्वाचा आहे हे विषद करून लेखकांनी या संदर्भात कशा प्रकारचे लिखाण करावे हे त्यांना समजवून सांगण्यासाठी त्यांच्या कार्यशाळा घेतल्या जाव्या व त्याद्वारे या विषयाचे स्वरूप आणि व्याप्ती त्यांच्या निदर्शनाला आणून द्यावी असे मतही त्यांनी या संदर्भात व्यक्त केले. जलसंस्कृती मंडळाची त्यांच्यापासून काय अपेक्षा आहे हे जर त्यांना स्पष्टपणे समजले तर त्यांच्याकडून सकस असे लिखाण होवू शकेल ही आशा त्यांनी व्यक्त केली.

प्रचारकी थाटाच्या साहित्याला जलसाहित्यात फार महत्वाचे स्थान असून पाणी प्रश्नावर उपाय शोधून काढण्यासाठी जलसाक्षरता निर्माण करणे गरजेचे आहे हे सांगून या प्रकारचे साहित्य जास्त प्रमाणात निर्माण व्हावे ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली पण अशा प्रकारच्या साहित्याला वाङमयीन मूल्य लाभू शकेल काय याबद्दल त्यांनी शंका व्यक्त केली. जलसाहित्याच्या संदर्भात त्यांनी श्री. सदानंद देशमुख ना. धों. महानोर, विठ्ठल वाघ, श्री. ना. पेंडसे, गो. नि. दांडेकर, रा. रं बोराडे, विश्वास पाटील, सुरेखा शहा, वसंत बापट यांच्या लिखाणांचाही सविस्तर उल्लेख केला.

श्री. किशोर पाठक :
ऐन वेळी चर्चेत संमिलित झालेले किशोर पाठक हे कसलेले साहित्यिक असल्यामुळे त्यांनी आपला ऐन वेळी सामावेश झाला असूनसुध्दा आपण कोठे कमी पडत आहोत हे तसूभरसुध्दा श्रोत्यांना जाणवू दिले नाही. साहित्याच्या वेगवेगळ्या विभागांचा जसे ग्रामीण साहित्य, दलित साहित्य, संत साहित्य, तंत्र साहित्य उल्लेख करून त्यामानाने जलसाहित्य ही एक साहित्याची नवीनच शाखा अथवा संकल्पना असल्याचे विचार त्यांनी व्यक्त केले व या साहित्याला अधिक समृध्द होवू देण्यासाठी आपल्याला काही कालावधी जावू द्यावा लागेल असे मत व्यक्त केले.

प्रत्येक नदी ही वेगवेगळ्या प्रदेशातून वाहत असल्यामुळे तिने स्वत:ची वेगळी अशी सांस्कृतिक छाप समाज जीवनावर पाडली असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे प्रत्येक प्रदेशात किंवा खोऱ्यात निर्माण झालेले जलसाहित्य एकसारखे रहाणार नाही त्यात विविध स्वरूपाच्या संकल्पना राहण्याचीच शक्यता जास्त असल्याचे ते म्हणाले. या संदर्भात त्यांनी आचार्य अत्रे यांच्या कऱ्हेचे पाणी या आत्मवृत्ताचा उल्लेख केला. पाणी तुमच्यावर संस्कार करतं आणि या संस्कारातूनच पाण्याचं तीर्थात रूपांतरण होतं ही गोष्ट कऱ्हेचे पाणी या आत्मवृत्तावरून आपल्या लक्षात येते असे ते म्हणाले.

पाण्याची रूपे ही विविध असतात अन त्यामुळे पाण्यासंबंधातील निर्माण होणाऱ्या साहित्यासाठी नवीन नवीन विषय सुचू शकतात यावर त्यांनी आपल्या विवेचनात भर दिला. संथ वाहणारे पाणी, धो धो वाहणारे पाणी, जमिनीतील पाणी, भूपृष्ठावरील पाणी या विविध स्वरूपामुळे लेखकाला वेगवेगळ्या उर्मी मिळू शकतात असे ते म्हणाले.

डॉ. दत्ता देशकर :
चर्चा सत्राचा समारोप करतांना मी स्वत: साहित्यिक नसून माझा या विचारांशी नवीनच घरठाव आहे ही गोष्ट देशकरांनी स्पष्ट केली. मी प्रचारकी थाटाचे लिखाण करणारा एक लेखक आहे व त्यामुळ साहित्यातील माझी जबाबदारी आणि माझ्या संकल्पना ह्या अत्यंत मर्यादित असल्याचे त्यांनी स्प्ष्ट केले. भारतीय जलसंस्कृती मंडळ हे पाच विविध धारांनी जसे परंपरा धारा, लोक व्यवहार धारा, साहित्य धारा, पर्यावरण धारा व प्रबोधन धारा युक्त असल्यामुळे प्रत्येक धारेच्या गरजेप्रमाणे साहित्य निर्माण व्हावे ही संकल्पना त्यांनी सुरूवातीलाच स्पष्ट केली. या पाच धारांपैकी साहित्य धारा ही जलसाहित्याचा गाभा असून बाकीच्या चार धारांमध्ये जे लिखाण होणार आहे ते वेगळ्याच स्वरूपाचे राहणार असून त्यातून व्यावहारिक साहित्यच निर्माण होणार असे ते म्हणाले.

मी एका विशिष्ट विचारशैलीच्या महाविद्यालयात माझे संपूर्ण आयुष्य काढल्यामुळे दलित साहित्य या संकल्पनेशी माझा जवळून संबंध आला व त्यामुळे त्यात कसकसा विकास होत गेला याचा इतिहास माझ्या नजरेसमोर आहे ही बाब त्यांनी स्पष्ट केली. हे करत असतांना त्यांनी दलित साहित्य आणि जलसाहित्य यांची तुलना करण्याचा प्रयत्न केला. वर्षानुवर्षे समाजावर झालेला अन्याय हा दाबून ठेवला गेल्यामुळे हा दाब निघाल्याबरोबर ज्या प्रमाणात दलित साहित्य उफाळून वर आले व साहित्यिकांची एक मजबूत फळीच समाजासमोर उभी राहिली हे सांगून अत्यंत कमी काळात हे साहित्य समृध्द अवस्थेला कसे पोहोचले हे त्यांनी दाखवून दिले. पाणी प्रश्न हा समाजासमोर आलेला नवीनच प्रश्न होय, त्याची समाजाला तितकीशी तीव्रताही जाणवली नाही व त्यामुळे पाणी प्रश्नाच्या संदर्भामध्ये निर्माण होणारे साहित्य अशाप्रकारे उफाळून वर येऊ शकले नाही, ते तेव्हाच समृध्द होईल की ज्यावेळेस पाणीप्रश्नाची दाहकता व तीव्रता समाजासमोर येईल, त्यामुळे पाणीप्रश्न आणि जलसाहित्य हे दोनही अजूनसुध्दा बाल्यावस्थेतच असल्याचे मत त्यांनी प्रतिपादित केले.

जलसाहित्य निर्माण करण्यात श्री. देशकर संपादित करित असलेले जलसंवाद मासिक महत्वाचे स्थान बाळगून आहे हे त्यांनी सभेच्या निदर्शनास आणून दिले. गेल्या सहा वर्षांपासून हे मासिक अत्यंत नियमितपणे काढून आजपर्यंत 72 अंक समाजासमोर सादर केल्याचा उल्लेख त्यांनी केला आणि या विविध अंकाद्वारे 75 च्या वर नवीन लेखक निर्माण करून जलसाहित्य समृध्द करण्याचा जलसंवादने खास प्रयत्न केला ही बाब त्यांनी अभिमानाने सभेसमोर मांडली. आम्ही पाणी प्रश्नाच्या संदर्भात यशस्वीपणे लिखाण करू शकू किंवा नाही अशी भिती या नवलेखकांच्या मनात असतांना त्यांच्या मनामध्ये एक आशावाद निर्माण करून त्यांनी समृध्द लेखक बनविण्याचे कामात जलसंवादचा मोठा वाटा आहे ही बाब त्यांनी सभेच्या निदर्शनास आणून दिली.

पाण्याला विविध पैलू असून आजपर्यंत पाण्याचे आर्थिक, सामाजिक व मानसिक पैलू समाजासमोर मांडण्यातच आले नसून त्यामुळे भविष्यातील जलसाहित्य या दृष्टीने विकसित व्हावे ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पाणी हे एक आर्थिक मूल्य असलेली बाब असल्यामुळे त्याचे अर्थकारणही महत्वाचे व त्या दृष्टीने अजून खरा विचार व्हावयास लागलेला नाही व त्यामुळे हे आव्हान स्वीकारून अर्थशास्त्रज्ञांनी पुढे येऊन पाण्याची आर्थिक बाजूही समाजासमोर मांडावी अशी विनंती त्यांनी या संदर्भात केली. पाण्याला सामाजिक व मानसिक पैलू तर फारच जास्त आहेत याबद्दलही पुरेसे असे विचारमंथन झाले नसल्याचे ते बोलले.

माझा प्रश्न सुटला म्हणजे पाणी प्रश्न सुटला असे मानणारे लोक समाजात जास्त असल्याचे त्यांनी सभेच्या निदर्शनाला आणून दिले. जायकवाडी धरण बांधल्यामुळे औरंगाबादकरांचा प्रश्न सुटला पण हा प्रश्न सोडवित असतांना पुढच्या प्रवाहातील अगणित पाणी उपसा योजना बंद पडल्या याचे सुख-दु:ख औरंगाबादकरांना नसल्याचे खेदाने म्हणावेसे वाटते. आता धरणाच्या वरच्या बाजूला 8 नवीन धरणे बांधली गेल्यामुळे जायकवाडीला येणारा पाण्याचा येवाच कमी झाल्यामुळे आता एक नवीनच प्रश्न औरंगाबादकरांसमोर येऊन ठेपला आहे व भविष्यात आपले काय होईल ही चिंता त्यांना भेडसावत आहे त्यामुळे पाणी प्रश्न हा आपल्यापुरता सुटला म्हणजे प्रश्न संपला या दृष्टीकोनातून पाणीप्रश्नाकडे पाहिले जावू नये हा विचार त्यांनी प्रकर्षाने मांडला.

आज विविध धरणे बांधणारे अभियंते भारतात आहेत, त्यांनी कष्ट करून या धरणांचे काम यशस्वीपणे पूर्ण केले आहे ते काम करित असतांना त्यांच्या समोर बरीच आव्हाने आली असण्याची शक्यता आहे. ही आव्हाने शब्दांकन करून त्यांनी जर समाजासमोर मांडली तर त्यातून बोध घेऊन नवीन अभियंते निश्चितच चांगल्या प्रकारचे काम करू शकतील. त्यामुळे या अभियंत्यांनी लिहिते होणे गरजेचे आहे. काही अभियंत्यांनी अशा प्रकारचे प्रयत्न करून कथा कादंबऱ्याही लिहिल्या आहेत ही निश्चितच स्तुत्य बाब आहे. त्यांचेच अनुकरण करून इतर अभियंत्यांनी जर हा प्रयत्न केला तर समाजासमोर मोठ्या प्रमाणात अशा प्रकारचे साहित्य येण्याची शक्यता आहे. सुरूवातीला त्यांना भाषेची अडचण निश्चितच जाणवेल पण या कामात सातत्य आणल्यास ते चांगल्या प्रकारचे साहित्यिक बनू शकतील. याही दृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे.

गेल्या 1-2 दशकात पाणीप्रश्नाबाबत निश्चितच जाणीव निर्माण झाली आहे. त्यामुळे विविध समाजसुधारक या क्षेत्रात भरीव काम करण्याच्या प्रयत्नात आहेत. राळेगणसिध्दी, हिवरे बाजार, धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुका, राजस्थानातील अलवर जिल्हा, गुजराथ मधील सौराष्ट्र प्रदेश याठिकाणी जलसंकलनाचे आणि संवर्धनाचे यशस्वी प्रयोग मोठ्या प्रमाणावर झाले आहेत. या प्रयोगांचे यशोगाथांच्या स्वरूपात रूपांतरण करून त्या यशोगाथा समाजासमोर आणणे हे ही जलसाहित्याचे महत्वाचे काम आहे ही बाबही डॉ. देशकर यांनी सभेसमोर मांडली. ते स्वत: सौराष्ट्राचा व शिरपूरचा प्रदीर्घ दौरा करून, तिथल्या कमाची प्रत्यक्ष पाहणी करून, मिळालेल्या यशाचा अंदाज घेऊन, त्याचा जनजीवनावर झालेला परिणाम अभ्यासून त्यासंदर्भात त्यांनी या यशोगाथांचे शब्दांकन मासिकात व वर्तमानपत्रात केल्याचे त्यांनी सभेला सांगितले. ही कामे मोठ्या प्रमाणावर झाल्यास त्याचे वाचन करून या क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांना स्फूर्ती मिळू शकेल ही बाब त्यांनी सभेसमोर मांडली.

आतापर्यंत 6 जलसाहित्य संमेलने झालीत, या संमेलनांचे डॉक्युमेंटेशन होणे गरजेचे आहे यावर त्यांनी विशेष जोर दिला. ज्यावेळेस अशाप्रकारची 30-40 संमेलने घेतली जातील त्यावेळेस आधीच्या संमेलनांमध्ये काय घडले याचे कुतूहल भविष्यात निश्चितच निर्माण होईल. ही बाब लक्षात घेऊन दरवर्षी घेतलेल्या संमेलनाचा एक सविस्तर अहवाल वा कार्यवृत्त करण्याची गरज त्यांनी प्रतिपादन केली. दरवर्षी जलसंवाद ही जबाबदारी स्वीकारण्यास तयार आहे असे त्यांनी जलसंवादच्या वतीने स्पष्ट केले.

सदर सत्र यशस्वीपणे पार पाडण्यास डॉ. जया द्वादशीवार व श्री. किशोर पाठक यांनी जे सहकार्य दिले त्याबद्दल त्यांचे आभार मानून त्यांनी सत्र संपल्याचे घोषित केले.

डॉ. दत्ता देशकर, पुणे - (भ्र : 9325203109)