आता आत्महत्या मच्छिमारांच्या

Submitted by Hindi on Fri, 02/03/2017 - 16:50
Source
जल संवाद

सार्वजनिक संपत्ती तर आजकाल लोक इतक्या सहजपणे नष्ट करतात की ज्यामुळे समाजामध्ये बेशिस्त आणि बेदरकारपणा वाढत चालला आहे याची जाणही आंदोलनकर्त्यांना राहत नाही. बसेस व गाड्या जाळावयाच्या, रस्त्यावरचे दिवे फोडून टाकायचे आणि नंतर गाड्या नीट चालत नाहीत व रस्त्यावर अंधार आहे म्हणून नवीन आंदोलनाला वाट मोकळी करून द्यायची यात काय हाशील आहे?

जलसंवाद मासिकाच्या ऑगस्ट २००९ च्या अंकात श्री. विजय दिवाण यांचा ‘आता आत्महत्या मच्छिमारांच्या’ हा लेख वाचण्यात आला. या लेखात त्यांनी दोन मुद्यांवर आपले लिखाण केले आहे. ते दोन मुद्दे म्हणजे मच्छिमारांच्या आत्महत्या आणि समुद्रातील जलप्रदूषण. सुरुवातीला या संदर्भात आपण लिखाण करायचे नाही असे ठरविले होते; पण श्री. दिवाण यांना चिडविण्यातही एक प्रकारची मजा येते. त्यामुळे हा लेखनप्रपंच. या लेखाबद्दल श्री. दिवाण यांनी राग मानू नये ही सुरवातीस विनंती करतो. त्याचबरोबर या लेखावर प्रतिक्रिया म्हणून त्यांना काही लिखाण करावयाचे झाल्यास त्यालाही जलसंवादमध्ये प्रसिद्धी देण्याचे अभिवचन देतो. आता आपण त्यांच्या लेखाकडे वळू या.

मध्यंतरी माझ्या शेतावरील विहिरीवरचा पंप खराब झाला. वीज असूनसुद्धा तो विहिरीतील पाणी खेचत नव्हता. सक्शन पाईपमध्ये लिकेज असल्यामुळे तिथून पंप हवा घेतो व त्यामुळे पाणी ओढले जात नाही असे माझ्या सालदाराने माझ्या लक्षात आणून दिले. त्यामुळे पाईपाला नवीन आटे पाडून आणणे आवश्यक असल्याचे तो म्हणाला. नेहमीप्रमाणे मी तो पाईप काढून बैलगाडीमध्ये टाकून औरंगाबादला आणला. शहागंज भागात पाईपाला आटे पाडून मिळतात हे मला माहीत असल्यामुळे मी सरळ बैलगाडी शहागंजमध्ये घेऊन गेलो. पण सर्वत्र हिंडूनसुद्धा मला आटे पाडणारा एकही माणूस त्या ठिकाणी सापडला नाही. त्या ठिकाणी माझ्या एका मित्राचे दुकान असल्यामुळे त्या दुकानात मी चौकशीसाठी शिरलो त्यावेळी माझा मित्र मला म्हणाला, आजकाल पीव्हीसी पाईपचा जमाना सुरू झाल्यामुळे असे आटे पाडणारे कामगार त्या ठिकाणी उपलब्धच नाहीत. थोडक्यात काय तर जसजसा काळ बदलत जातो तसतसे व्यवसायाचे जुने प्रकार मोडीत निघून नवीन प्रकार सुरू झालेले आपल्याला दिसतात. यालाच आपण काळाचा महिमा म्हणतो.

निव्वळ आटे पाडणार्‍या कामगारांना रोजगार मिळावा म्हणून आपण लोखंडी पाईप वापणार आहोत का? हा प्रश्‍न माझ्या मनाला पडला. हे उदाहरण या परिस्थितीत देणे मला आवश्यक वाटले. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे मासेमारी व्यवसायामध्ये आजकाल नवीन पद्धतीची यात्रिक मासेमारी सुरू झाल्यानंतर त्याचा परिणाम हा पारंपरिक मासेमारीवर होणारच ही गोष्ट नाकारता येत नाही. त्यामुळे या मच्छिमारांचे पुनर्वसन कसे करावे हा प्रश्‍न महत्त्वाचा ठरतो. त्यासाठी यांत्रिक होड्या बंद करणे हा मार्ग निश्‍चितच हास्यास्पद ठरतो. त्यामुळे या बाधीत मच्छिमारांच्या संघटनांनी आपल्या सभासदांना वाचविण्यासाठी या नवीन प्रकारच्या मासेमारीला सामोरे जाण्यास काय हरकत आहे? काही मच्छिमार एकत्र येऊन त्यांनी जर यांत्रिक मच्छिमारी सुरू केली तर त्यांनाही चांगल्याप्रकारचे यश या व्यवसायात मिळाल्याशिवाय राहणार नाही. काळाप्रमाणे जो बदलतो त्याची सध्या दुनिया आहे हे नाकारून चालणार नाही.

या संदर्भात एक दुसरे मजेदार उदाहरणसुद्धा द्यावयाचा मोह मला अनावर होत आहे. जातीव्यवस्था मोडकळीस आल्यामुळे भटभिक्षुकांचा व्यवसायही मोठ्या प्रमाणात मोडकळीला आला आहे. पारंपरिक व्यवसाय बंद पडल्यामुळे हे भटभिक्षुक संकटात सापडलेले आहेत. त्यामुळे त्यांची रोजगारीसुद्धा महत्त्वाची ठरू शकते. त्यांना त्यांचा व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी आपण जातीयरचना पुन्हा सुरू करणार आहोत का? हा महत्त्वाचा प्रश्‍न आहे. या भटभिक्षुकांनी स्वत:च प्रश्‍न बर्‍याच मोठ्या प्रमाणात सोडवून घेतला आहे. आपण जरी या व्यवसायात खितपत पडलो तरी आपल्या मुला-बाळांना या व्यवसायत प्रवेश करू न देण्यात ते निश्तिच यशस्वी ठरले आहेत. त्यामुळे त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्‍न त्यांनीच स्वत:च्या पातळीवर आणि प्रयत्नाने सोडवून घेतला आहे. समाजप्रवाहात अशा प्रकारचे बदल अपेक्षितच असतात आणि त्यामुळे हे बदल झाल्यास त्याबद्दल जास्त चिंता करत बसणे विचारवंतांना त्रासदायक ठरते. विचारवंतांनी या संदर्भात या नवीन परिस्थितीशी अशा समाजाने कसे जमवून घ्यावे याबद्दल विचार केल्यास ते जास्त उपयुक्‍त ठरू शकेल.

धरणांच्या बाबतीतही तसेच म्हणता येईल. धरणे आवश्यक की अनावश्यक हा मुद्दाच आता कालबाह्य झालेला आहे. सगळ्या विकसित देशांनी आपापल्या देशात धरणे बांधून पाण्याचे साठे वाढविले आहेत आणि वीज निर्मितीचा ते लाभ घेत आहेत. पण त्या देशातील काही विचारवंत आजही धरणे उपयुक्‍त की अनुपयुक्‍त याबद्दल वारेमाप चर्चा करातान दिसतात. एवढेच नव्हे तर आपल्यासारख्या विकसनशील देशातील त्यांच्या भाऊबंधांना ते भडकवण्याचे कामसुद्धा सातत्याने करत असतात. आपण त्यांच्या जाळ्यात अटकतो व या धरणांना विरोध करून सरकारला अडचणीत आणत असतो.

धरणामुळे विस्थापितांचा प्रश्‍न निश्‍चितच समाजासमोर उपस्थित होतो; पण धरणे नको म्हणण्यापेक्षा या विस्थापितांचा प्रश्‍न सोडविण्यासाठी आपण काय करू शकतो याबद्दल विचार करणे योग्य नव्हे काय? हा प्रश्‍न सोडविण्यासाठी मेधा पाटकर यांच्यासारग्या कार्यकर्त्यांनी पुनर्वसनाची जबाबदारी स्वीकारली असती तर मला जास्त आनंद झाला असता. एखाद्या विशिष्ट भूभागातील विस्थापितांचा प्रश्‍न आम्ही सोडविण्यास मदत करतो, आपण आम्हास आर्थिक मदत द्या, या मदतीचा वापर करून विस्थापितांना कसे पुनर्वसित करता येईल याची जबाबदारी आमच्यावर सोपवा असे त्यांनी म्हणावयास काय हरकत आहे? एका विशिष्ट पातळीपर्यंत विरोध करणे लोकशाहीत अपेक्षितच आहे. पण एकदा का बहुमताने निर्णय घेतला की आपले मत बाजूला ठेवून आहे त्या परिस्थितीत आपण अधिक चांगले काय करू शकतो याबद्दल विचार केलेला बरा. हेच खरे समंजसपणाचे धोरण असू शकेल.

आज आंदोलन करणे, समाजाला भडकवणे व नवीन गोष्टींना विरोध घडून आणणे ही एक फॅशनच झाली आहे. या आंदोलनामुळे किती वेगवेगळे प्रश्‍न निर्माण होतात याची कल्पनाच केलेली बरी. आज हाती घेतलेली योजना वेळेत पूर्ण झाली नाही तर तिच्यासाठी येणारा खर्च दुपटीतिपटीनेसुद्धा वाढू शकतो. आंदोलन सुरू करणे आपल्या हातात असते; पण ते थांबवणे मात्र आपल्या हातात नसते ही गोष्ट आंदोलनाचे प्रमुख सोयीस्करपणे विसरतात व त्यामुळे निर्माण झालेले दंगेधोपे करोडे रुपयांचे नुकसान करतात व त्याचबरोबर काही जणांना स्वत:चे प्राणही गमवावे लागतात. यात प्राण गमावणार्‍या आंदोलनांचे प्रमुख कधीच नसतात. ही गोष्ट नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही.

सार्वजनिक संपत्ती तर आजकाल लोक इतक्या सहजपणे नष्ट करतात की ज्यामुळे समाजामध्ये बेशिस्त आणि बेदरकारपणा वाढत चालला आहे याची जाणही आंदोलनकर्त्यांना राहत नाही. बसेस व गाड्या जाळावयाच्या, रस्त्यावरचे दिवे फोडून टाकायचे आणि नंतर गाड्या नीट चालत नाहीत व रस्त्यावर अंधार आहे म्हणून नवीन आंदोलनाला वाट मोकळी करून द्यायची यात काय हाशील आहे ? त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी या सर्व दीर्घकालीन परिणामांचा विचार करून मगच आंदोलने सुरू करावीत असा प्रेमाचा सल्ला त्यांना द्यावासा वाटतो.

रस्त्यावरची काठावरील झाडे तोडू नये यासाठी आंदोलन करणारेसुद्धा टीकेस पात्र ठरू शकतात. वाहतूक वाढली म्हणजे रस्ते मोठे करावेच लागतात. नाही केले तर अपघातात दगावणार्‍यांची संख्या वाढीस लागते. आजकाल तर एक नवीनच प्रकार दिसावयास लागला आहे. अपघातात एक माणूस मेला तर चूक कोणाची होती हे तपासून न बघता वाहनांची ताबडतोब जाळपोळ सुरू करण्याचेच प्रघात वाढत चालले आहेत. त्यामुळे रस्ता रुंदीकरण म्हणजे पर्यायाने झाडांचे खच्चीकरण ओघाने आलेच. ते तोडण्यास विरोध करणे म्हणजे स्वत:च्या पायावर दगड पाडून घेण्यासारखेच आहे. झाडे तोडू नका या मागणीपेक्षा तोडलेल्या झाडांच्या संख्यपेक्षा दुप्पट नवीन लागवड करा असा आग्रह धरणे जास्त संयुक्‍तिक ठरणार नाही काय? या निसर्गप्रेमी मंडळींना एक प्रश्‍न निश्‍चितच विचारावासा वाटतो. तो म्हणजे या मंडळांनी स्वत: किती वृक्षारोपणाचे काम हाती घेतले आहे. वृक्षारोपण ही चळवळ खरे म्हटले तर पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत हितावह आहे. पण निव्वळ झाडे तोडण्याला विरोध करून पर्यावरण रक्षण होणार नाही याची जाणीव निर्माण होणे आवश्यक ठरते.

श्री. दिवाण यांनी मच्छिमारांच्या प्रश्‍नाला वाचा फोडली ही निश्‍चितच स्वागतार्ह बाब आहे. पण हा प्रश्‍न कशाप्रकारे सोडवावा यासाठी एक पाऊल मागे जाण्यापेक्षा पाच पावले पुढे जाणे योग्य ठरणार नाही काय? याचाही विचार होणे आवश्यक आहे. मच्छिमारांच्या संघटना बळकट करणे, या संघटनांना सकारात्मक पद्धतीने विचार करावयास लावणे व निर्माण झालेले प्रश्‍न सोडवण्यासाठी आपण काय विविध पर्याय त्यांच्यासमोर उपलब्ध करून देऊ शकतो याबद्दल विचार करायला प्रवृत्त करणे यासारखी भरीव कामगिरीसुद्धा केली जाऊ शकते. या मच्छिमार संघटनांना यांत्रिक होड्या विकत घेण्यासाठी बँकांकडून कर्जाऊ रकमा मिळवून देण्याच्या दृष्टीनेसुद्धा पावले उचलली जाऊ शकतात. घेतलले कर्ज परत करावयाचे असते, व्यवसायाचा हिशेब ठेवून परतफेडीची योजना तयार करावयाची असते आणि त्याचबरोबर आपला व्यवसाय नीट करण्याच्या दृष्टीने काय पावले उचलली जाऊ शकतात याबद्दलही विचार करायला लावणे हे सकारात्मक विचारसरणीचे लक्षण आहे.

यांत्रिकीकरण आज सर्वत्रच होत आहे. मच्छिमार व्यवसायसुद्धा त्यापासून कसा अलिप्त राहू शकेल? पारंपरिक मच्छिमार व्यवसाय बर्‍याच संकटांना उद्युक्‍त करतो समुद्रावरील अनिश्‍चित हवामानाचे संकट या व्यवसायावर नेहमीच असते. पारंपरिक होड्या जास्त खोलवर जाऊन मच्छिमारी करू शकत नाहीत व त्यामुळे व्यवसायाचा व्याप चांगल्याप्रकारे वाढू शकत नाही, विक्री व्यवस्था योग्य नसल्यामुळे मच्छिमारांना आपल्या व्यवसायापासून चांगले उत्पन्‍न मिळू शकत नाही. या बाबीही दृष्टीआड करता येणार नाहीत. त्यांना योग्य प्रशिक्षण देऊन, शिक्षित करून, आर्थिक मदतीचे स्रोत त्यांच्यासाठी उभे करून, त्यांच्या संघटना मजबूत करून या प्रश्‍नांना साकल्याने सोडविले जाऊ शकते. त्याऐवजी यांत्रिक बोटी बंद कराव्यात हे म्हणणे योग्य ठरणार नाही असे मला वाटते.

प्रश्‍न उरतो तो जैवविविधतेचा. पूर्वीच्या काळी माशांचे जितके विविध प्रकार समुद्रकाठी उपलब्ध होते ते आज उपलब्ध नाहीत ही गोष्ट खरी आहे. त्यामुळे जैवविविधता नष्ट पावत आहे हेही म्हणणे योग्य आहे; पण वेगवेगळ्या प्रकारची बीजे समुद्रात सोडून ही विविधता निर्माण केली जाऊ शकते ही गोष्ट नाकारता येत नाही. त्यादृष्टीनेसुद्धा मच्छिमार संघटनांना या उपक्रमामध्ये समाविष्ट करून घेण्याची आवश्यकता उपयुक्‍त ठरते. काही विशिष्ट प्रकारच्या माशांना चांगला भाव मिळतो, त्यांची पैदास वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणेही आवश्यक ठरते आणि ते शक्यच नसेल तर आपल्या उपभोगात आवश्यक ते बदल करून नवीन परिस्थितीशी सामोरे जाण्यात शहाणपण आहे. कोंबडीची लज्जत चाखणार्‍या खवय्यांना गावरान कोंबडीची चव जीभेवर रेंगळाविशी वाटणे साहजिकच आहे. त्यासाठी ते जास्त पैसेही मोजायला तयार असतात. पण शेवटी ती मिळालीच नाही तर दुधाची तहान ताकावर भागविण्यासारखे ते ब्रॉयलर कोंबडीची ऑर्डर देऊन मोकळे झालेले आपण पाहतो.

आजकालच्या यांत्रिकी युगात माणसाच्या आहारातही अमूलाग्र बदल झालेला आपल्याला दिसतो. त्याचे जिव्हालालित्य आता इतिहासजमा झालेले दिसते. पूर्वीच्या काळी एक गहू आणि प्रकार बहु अशी म्हण प्रचारात होती. पण दिवसेंदिवस समाजामध्ये झालेल्या बदलामुळे हे विविध प्रकार आता फक्‍त पुस्तकात आणि विचारातच शिल्लक असलेले दिसतात व काही दिवसांनंतर नाईलाज म्हणून ब्रेडची पाकीटे फस्त करणारी माणसेच या समाजात उरणार आहेत हे नाकारून चालणार नाही. त्यामुळे जैवविविधता या प्रकरणाला किती ताणावे आणि केव्हा सोडून द्यावे याचाही विचार करण्याची गरज आहे. जी विविधता आपल्याला अपेक्षित आहे ती आज येऊ शकेल काय? हा प्रश्‍न महत्त्वाचा बनत चालला आहे. आपण आता सुवर्णमध्याकडे वाटचाल करणे आवश्यक आहे. जितकी जास्त शक्य असेल तितकी विविधता कशी मिळविता येईल एवढा प्रयत्न केला तरी पुरे आहे असे मला वाटते.

विजय दिवाणांनी मांडलेला दुसरा मुद्दा मात्र अत्यंत गंभीर आहे आणि त्यावर विचार होणे अत्यावश्यक आहे. आज पर्यावरण नाश करण्यासाठी आपणच कारणीभूत ठरत आहोत. आपले कारखाने आणि मानवाने निर्माण केलेले सांडपाणी हे समुद्रातील पाणी प्रदूषित करण्यात सातत्याने पुढाकार घेताना दिसतात. हे प्रदूषण कसे कमी करता येईल याबद्दल मात्र गंभीरपणे विचार करण्याची आवश्यकता आहे. या प्रदूषित पाण्यामुळे समुद्रातील जीव धोक्यात आले आहेत आणि त्यामुळे प्रदूषित पाणी विशिष्ट पातळीपर्यंत शुद्ध करूनच मग समुद्रात सोडले जावे याबद्दल मात्र आग्रही भूमिका घेणे अत्यावश्यक आहे.

आपल्या देशातील प्रदूषण नियंत्रण मंडळ आपल्या ढिसाळपणासाठी प्रसिद्ध आहे. अधिकार्‍यांना थोडेसे गरम केले म्हणजे आपल्याला हवे ते प्रमाणपत्र द्यायला ते मोकळे असतात. ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही आणि त्यामुळे समाजसेवी संस्थांकडे ही एक फार मोठी जबाबदारी येऊन पडली आहे. मला नफा मिळण्यासाठी इतरांचे प्राण गेले तरी हरकत नाही ही संकुचित मनोवृत्ती बदलण्यासाठी फार खोलवर प्रयत्न करणे आवश्यक आहे. यासाठी कारखानदारांचे आणि व्यवस्थापकांचे फार मोठ्या प्रमाणात प्रबोधन होणे गरजेचे आहे. यासाठी रोटरी क्लब, लायन्स क्लब, ज्येष्ठ नागरिक संस्था, महिला मडळे , तरुण मंडळे यांचे दबावगट निर्माण होणे आवश्यक आहे. यामुळे कारखान्यांवर योग्य तो दबाव आणणे सहज शक्य आहे. अशा क्लबचे सभासदच सहसा कारखानदार असतात व त्यामुळे त्यांच्यावर आवश्यक तो दबाव आणून त्यांच्यामध्ये बदल घडवून आणणे सहज शक्य आहे.

पाताळगंगा नदी प्रदूषणासाठी अत्यंत प्रसिद्ध आहे; पण त्याच नदीवर कार्यरत असलेल्या पाताळगंगा एरिया वॉटर पार्टनरशीप सारख्या संस्थेने हे प्रबोधनाचे काम हाती घेतल्यामुळे या नदीच्या प्रवाहात बराच सकारात्मक बदल झालेला या संघटनेच्या अहवालात वाचावयास मिळतो. नदीकाठावरील वेगवेगळ्या संस्था एकत्र येऊनच ही एरिया वॉर्टर पाटर्नरशीप स्थापन करण्यात आली आहे. व कारखानदारांवर आवश्यक तो दबाव आणण्यातही ती बहुतांशी यशस्वी झाली आहे.

राहता राहिला प्रश्‍न नगरपालिकांचा. या नगरपालिका आपल्या गावातले सर्व सांडपाणी आहे त्या परिस्थितीत समुद्रात बिनदिक्कतपणे सोडताना दिसतात. संस्थेतील नगरसेवक बहुतांश शिक्षित असतात व त्यांना जर आपण चांगल्याप्रकारे समजून सांगू शकलो तर ते निश्‍चतच या संदर्भात मोलाची मदत करू शकतात. नागरिकांचे त्यांच्यावरील दडपण वाढल्यास त्यांचेही व्यवस्थापनावर आवश्यक ते दडपण येऊन सांडपाण्याचे आवश्यक त्या प्रमाणात शुद्धीकरण करूनच मग ते पाणी समुद्रामध्ये सोडण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाऊ शकतात. यामुळे समुद्रातील पाणी शुद्ध होण्याकडे योग्य ती वाटचाल केली जाऊ शकेल त्याचा निश्‍चितच अनुकूल असा परिणाम समुद्रातील जीवनावर होऊन माशांची पैदास वाढविण्याच्या दृष्टीने बहुमोल मदत होऊ शकेल.

समाजाबद्दल आस्था असणार्‍या लोकांनी थोडासा सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास ते या जमिनीवर निश्‍चितच नंदनवन निर्माण करू शकतील असा विश्‍वास व्यक्‍त करू या.