Source
जलसंवाद, डिसेंबर, 2017
(जलसंस्कृती हा विषय चांगल्या प्रकारे समजला जावा यासाठी मान्यवर डॉ. माधवराव चितळे यांनी दिलेल्या एका भाषणाचा वृत्तांत सोबत देण्यात येत आहे.)
आपली खरी जीवनपध्दती काय होती हे पहाण्यासाठी पांच-सहा शतके आपल्याला आक्रमण काळाच्या मागे जावे लागते. त्यांतले दोन दिवस विशेष महत्वाचे आहेत. एक घटस्थापनेचा व दुसरा अक्षय तृतीयेचा. त्यांतला घट शब्द कुठुन आला ? नवरात्रात आपण माळा करणे, देवीची पुजा करणे हे सर्व करतो. पण मघाशी जी कलशप्रवण संस्कृती आपण पाहिली तिला अनुसरुन आपण कुंभाची म्हणजे घटाची स्थापना करतो. त्या दिवशी आपण तलावांची पुजा करतो. तलावांच्या पाण्याचे हिशोब लावतो. हे पाणी मला वर्षभर इथल्या पशुजीवनासाठी, दुग्ध व्यवसायासाठी, प्राणी जीवनासाठी, मानवी जीवनासाठी, शेतीसाठी वर्षभर वापरायचे आहे याची आपण आठवण ठेवतो.
मार्गशीर्षाचा आपण सर्वोत्तम मानला गेलेला महिना नुकताच सरत आलेला आहे आणि आपण पौषांत पदार्पण करतो आहोत. खुद्द गीतेमध्येसुध्दा परमेश्वराची आठवण करायची असेल तर ती कुठल्या कुठल्या स्वरुपांत कशा तर्हेने करावी याचे मार्गदर्शन करतांना ज्या गोष्टींचा मुद्दाम भगवान कृष्णांनी उल्लेख केला त्यामध्ये मासानी मार्गशीर्षो ड हं असे म्हटले. अशा प्रकारे या मार्गशीर्ष महिन्याला एक वेगळे आदराचे स्थान आपल्या परंपरेत दिलेले आहे. आपण ज्या परिवारांत रहातो, ज्या परिसरांत रहातो, तेथील प्राकृतिक स्थितीचे आणि आपले नाते मनामनांमध्ये एवढे घट्ट होत जाते की त्या सर्व गोष्टींचे वेगळेपण व वैशिष्ठ्य आपल्याला नकळत नाहीसे होते. पण मासानां मार्गशीर्ष हम् अशा शब्दरचनांमधून ते व्यक्त होत रहाते. भगवान श्रीकृष्ण हे उत्तर धृवावर रहात असते, (आर्य हे उत्तर धृवावरचे आहेत, असा अनेकांचा चुकीचा समज आहे) तर त्यांनी ’ मासानां मार्गशीर्षो हम् ’ असे लिहिले नसते. कारण तेथे आता या महिन्यांत बर्फ पडतोय. ती कांही मोठी प्रसन्न अवस्था नाही. म्हणून त्या भूमीवर मासानां मार्गशीर्षो हम् असे म्हणणे शक्य नाही. उत्तर ध्रुवीय प्रदेशांमध्ये मार्गशीर्ष महिना इतका सुखद नाही.एकंदरीनेच असे जे मनावर होणारे संस्कार असतात, त्यांत आपल्या भोवती ज्यांना आपण पंच महाभूते म्हणतो, ती जी पाच तत्वे आहेत, त्यांची स्थिती कशी आहे याचा मोठा प्रभाव असतो. त्या सगळ्यांना जोडणारे जे चल तत्व आहे ते म्हणजे पाणी. पाणी हे आकाशांत आहे. पावसाच्या रुपाने ते आकाशातून पडतांना आपण पहातो. नंतर पाणी भूपृष्ठावर वहातांना पहातो. जमिनीमध्ये पाझरुन नंतर ते विहिरीमध्ये प्रकट होते. आपण ते सारेच्या सारे विहिरींमधून काढून टाकू शकत नाही. ते झिरपत झिरपत नदीमध्ये येते. पावसाळ्यानंतर आपल्या नद्या वहात असतात, त्यावेळी कांही पाऊस पडतो म्हणून नाही. पाऊस पडून गेलेला असतो आणि तेव्हां जे पाणी जमिनीत मुरलेले असते, ते पुन्हा नदींत प्रवाहित होत असते. म्हणून नदी वाहात असते. ती पुढे समुद्राला मिळते, तेव्हा तेथून पुन्हा बाष्पीभवनाने ते पाणी आकाशात परत जाते.
अशा प्रकारे ते पाणी चक्रीय पध्दतीने या पृथ्वीतलावर, जमिनीखाली आणि पृथ्वीभोवतीच्या वातावरणांत सारखे हिंडत असते. म्हणून पाण्याच्या या हिंडण्याकडे, ह्या जलचक्राकडे यज्ञ प्रक्रियेचे एक स्वरुप म्हणून आपण पाहिले आहे. यज्ञाचे वर्णन करतांनासुध्दा श्रीमद्भास्कर गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांना ह्या जलचक्राची आठवण झालेली आहे.
आपल्या भोवतीच्या पार्थीव व्यवहारांशी असलेले आपले नाते हे वेगळ्या प्रकारांनी आपल्या भारतीय मनांमध्ये खोल खोल, अती खोल, रूजलेले आहे. आपल्याला पुष्कळदा त्याची जाणीवसुध्दा होत नाही. आपण सहजपणाने आपल्या लग्न-मुंजीच्या पत्रिकांवर कलशाचे चित्र छापतो. त्या कलशावर पाने ठेवलेली असतात. त्या वर नारळ ठेवलेला असतो. अशी ही मांडणी हे कशाचे प्रतीक आहे ? हंगामी, मर्यादित पावसाळा वाट्याला आलेल्या आपल्या भारतीय जीवनामध्ये पाण्याची साठवण व्हायला पाहिजे. समृध्दि: सलीला धीना समृध्दी पाण्यावर आधारित आहे. त्याची आठवण आपल्याला सतत होण्यासाठी कलशाची पुजा हा आपल्या सगळ्या परंपरेचा एक अविभाज्य भाग म्हणून आपण स्विकारला आहे.
एखाद्या व्यक्तिमत्वाची महानता व्यक्त करायची असेल, किंवा एखाद्या प्रसंगाची उत्तुंगता व्यक्त करायची असेल तर आपण अगदी कळस झाला असे म्हणतो. मंदिराची अंतीम पूर्णता ही त्यावर ’ कळस ’ बसविल्याशिवाय होत नाही. त्याच्या शिखरावर ’ कलश ’ बसविणे हा त्या मंदिराच्या रचनेचा सर्वात महत्वाचा आणि समाप्तीचा विधी मानला जातो. भारतीय जीवनामध्ये कलशाला हे जे अत्यंत प्रमुख आणि केंद्रिय स्थान आलेले आहे, त्याच्या मुळाशी आपल्या वाट्याला जे हवामान आलेले आहे ते कारण आहे. त्या हवामानामध्ये मानवी जीवनाच्या सुख समृध्दीसाठी पाणी हे साठविले गेलेच पाहिजे.
भारतामध्ये येणारा पाऊस हा चार महिन्यांमध्ये आणि तो ही अनेक ठिकाणी जेमतेम १०-१२ दिवस पडणार. त्या १०-१२ दिवसांत तो साठविला गेला नाही तर एखाद्या गृहिणीने सकाळी उठायचा आळस करुन जर तासभर येणारे नगरपालिकेच्या नळाचे पाणी घरात साठवून ठेवले नाही तर दिवसभर जशी त्रेधतिरपिट उडते तशी समाजाची त्रेधातिरपिट उडू शकते. याची आपल्याला अतिशय खोल जाणीव असल्यामुळे पाण्याच्या सांठवणीला आपल्या सगळ्या व्यवहारांमध्ये आदराचे स्थान दिलेले आहे.
असे करणे हे किती महत्वाचे असले पाहिजे याची झलक आपल्या वाङमयांतही पहायला मिळते. येवढे प्रचंड महाभारताचे युध्द झाले, अत्यंत घनघोर युध्द झाले. त्याच्या नंतर सर्व स्थिरस्थावर होत असतांना नारदमुनी हे युधिष्ठीरांना भेटायला आले. राज्याची सगळी घडी नव्याने कशी बसविणार ? म्हणून भेटायला आल्यानंतर नारदमुनींनी युधिष्ठीराला एक प्रमुख प्रश्न काय केला ? इतर अनेक गोष्टी राज्य व्यवहाराच्या म्हणून आहेतच. पण त्याबरोबर कद्चित् राष्ट्रेे तडागानि पूर्णानि बव्हंतिच अरे तुझ्या राज्यामध्ये अनेक तलाव काठोकांठ भरलेले आहेत ना ? हा प्रश्न त्यांनी केला. म्हणजे राज्याची नवीन घडी बसवितांना पहिल्यांदा कशाकडे लक्ष द्यायला पाहिजे, याची नारदांनी युधिष्ठीराला आठवण करुन दिली.
ज्यावेळी ब्रिटीश मंडळी येथे आली त्यावेळी त्यांनी आपल्या भारताचे वर्णन लिहून ठेवलेले आहे. ब्रिटीश मंडळी ही युरोपीय संस्कृतीत वाढलेली असल्यामुळे, त्यांनी लिहिलेल्या इतिहासांत आपण वाचतो की मानवी संस्कृती नदीकाठी वाढली. अजुनहि आपण इंग्रजीचा धागा सोडला नसल्यामुळे आपला समज तसाच आहे. पण केवळ हा युरोपीयन समज आहे. भारतीय संस्कृती ही प्रत्यक्षांत तलावांकाठी वाढली. युरोपीयन लोकांनीच भारताचे असे वर्णन करुन ठेवलेले आहे की हा तलावांचा देश आहे. त्यांना त्या काळांत तसे पाहायला मिळाले ? अठराव्या शतकांत ब्रिटीश मंडळी येथे आली, त्यावेळी आपल्या देशात वीस लाख तलाव अस्तित्वात होते, वापरांत होते.
आज आपल्या देशांत पाच लाख खेडी आहेत म्हणजे साधारणत: म्हणजे प्रत्येक गावाला कमीतकमी दोन तलाव होते. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये तलावांच्याकाठी आपले हे भारतीय जीवन वाढलेले आहे. जर आपण केवळ नदीकाठी रहाणारे असतो तर जेव्हा ग्रीष्म ऋतु जो ग्रीष्म येतो, नद्या आटायला लागतात, तेव्हा आपल्याला जनजीवनाचे स्थलांतर करायला लागले असते. तसे स्थलांतर करायला लागू नये म्हणून आपण वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे अगदी उंचीवर पठारांवरसुध्दा आपण तलावांची निर्मिती करुन, त्या ठिकाणी पाणी साठवून, त्या त्या ठिकाणच्या प्राणी जीवनाला, मानवी जीवनाला भक्कम आधार दिलेला आहे.
आपल्या ज्या तीन देवता आहेत त्या तीन देवतांपैकी पहिल्या ज्या दोन देवता आहेत, त्या म्हणजे सरस्वती आणि लक्ष्मी. वेरुळमधील कैलास लेणे पहायला गेला असाल तर तेथे सर्वात मोठे, जगात अवर्णनीय असलेले शिवलिंग आहे. भारतीय संस्कृती समजावून घ्यायची असेल तर असे म्हटले जाते की दोन गोष्टी आपण करायला हव्यात. भारतीय संस्कृतीचा सर्वोत्तम भाष्यकार म्हणजे कालीदास. कालीदासाचे वाङमय वाचले तर भारतीय चालीरिती, भारतीय संस्कृती, भारतीय विचारधारा कळते. त्याचे दृष्य रुप पहायचे असेल, कालीदासाला जी भारतीय संस्कृती कळली ती आपल्याला एके ठिकाणी मूर्त रुपात पहायची असेल तर असे म्हटले जाते की कैलास लेणे जाऊन पहा. ह्या ठिकाणी तिला शिल्पबध्द केलेले आहे. त्या कैलास लेण्यामध्ये आपण जर प्रवेश करायला लागलात तर आपल्याला दरवाजांत पहिले चित्र कुणाचे दिसते ? वस्तुत: हे लेणे म्हणजे भगवान शंकराला अर्पण केलेली. ही कलाकृती आहे.
पण आपल्याला शंकराचे दर्शन फार आंत गेल्यानंतर घडते. पहिले दर्शन ज्या शिल्पकृतीचे घडते, ते म्हणजे लक्ष्मीचे. तिचे तेथे अत्यंत सुंदर शिल्पचित्र आहे. तेथे ती लक्ष्मी कशावर बसलेली आहे? तर ती लक्ष्मी एका तलावात बसलेली आहे. त्या तलावाचे अतीशय सुरेख तरंग त्या त्या दगडी शिल्पामध्ये दाखविलेले आहेत. त्यांच्यावर पाने लहरत आहेत आणि दोन्ही बाजुंनी दोन हत्ती गजशुंडेमधून त्या लक्ष्मीवर जलवर्षाव करत आहेत. पाण्याची विपुलता आणि तलाव ह्या दोन्ही गोष्टींचे निदर्शक असणारे हे चित्र कैलास लेण्यामध्ये पाय ठेवताच आपल्या मनांत ठसावे अशी त्या वेळच्या, त्या कलाकाराची सुध्दा मनातली भावना आहे.
आपण लक्ष्मीचे दर्शन घेतले आणि नंतर डावीकडे वळलो की तेथे जगभर गाजलेले सर्वोत्तम शिल्प आहे ते कशाचे आहे ? भिंतीवर तीन देवतांची सुंदर रुपे आहेत. गंगा, यमुना आणि सरस्वती यांची देवतारुपाने त्या ठिकाणी मूर्तीचित्रे कोरलेली आहेत. प्रत्येक चित्रातले तपशील वेगळे आहे. प्रत्येक मूर्ती वेगळी आहे. तिचे वाहन वेगळे दर्शविले आहे. त्या वाहन रुपांतून त्या त्या नदीची जी वैशिष्ठ्ये आहेत ती कलाकाराने आपल्यापुढे ठेवली आहेत. त्यातली जी सरस्वती आहे ती आपल्या बुध्दीची देवता आहे, तिचे नांव सरस्वती म्हणजे तलावांच्या कांठी असलेली देवता. ’ सर ’ हा शब्द आपल्या सगळ्यांना परिचित असलेला शब्द आहे. आपल्या अनेक गावांची नांवे त्याच्याभोवती ’ सर ’ हे उपपद लावून झालेली आहेत. कारण तलावांच्या कांठी असलेली ती गांवे आहेत. उदाहरणार्थ अमृतसर हे गांव. हे तलावाच्या कांठी असलेले गांव आहे.
सरस्वती ही तलावांची देवता कशामुळे झाली ? आपली ही सरस्वती नदी होती. ती आता लुप्त झालेली आहे. आपण तिचा आता पूर्ण शोध लावलेला आहे. आधुनिक संशोधन शास्त्राचा आधार घेऊन ही नदी मुळात कस-कशी वहात होती हे आपण शोधून काढले आहे. आपली जी सगळी ऋग्वेदकालिन व त्याच्या पूर्वीची वर्णने आहेत त्यांत सरस्वती ही तलावा तलावांची नदी आहे. हिमालयांतून वहात आल्यानंतर अत्यंत सपाट, सखल प्रदेशांतून वहात असल्यामुळे ही नदी वेगवेगळे तलाव भरत भरत प्रभासपट्टणाच्या जवळ पश्चिम समुद्राला मिळत होती. त्या त्या ठिकाणी आपल्या संस्कृतीचा विकास झाल्यामुळे, आपला बौध्दिक विकास झाल्यामुळे, त्या त्या ठिकाणी वाङमयीन विकास झाल्यामुळे, आपण विद्यादेवतेचे पर्यायी नांवचमुळी सरस्वती असे ठेवले आहे. पाणी, पाण्याची साठवण आणि त्याच्याभोवती संस्कृतिची वाढ हे आपल्यामध्ये इतके दृढमूल आहे की आपला कुठलाहि धार्मिक विधी हा अभिषेकाशिवाय संपन्न होत नाही.
आपण जर थंड प्रदेशातून आलेलो असतो तर अभिषेक करायची कल्पना कुणाला सुचली नसती. परंतु हा उष्ण कटिबंधाचा कोरड्या हवामानाचा प्रदेश असल्यामुळे अंगणात सडा घालणे काय किंवा अंगावर अभिषेक करणे काय या गोष्टी भारतीय संस्कृतीत समाविष्ट झाल्या. भौगोलिक परिस्थितीचे जे संस्कृतीशी नाते असते ते आपण अभिषेकातून व्यक्त केलेले आहे. असा अभिषेक वर्षभर झाला तर आपल्याला हवा आहे. पण निसर्गाने ती अनुकूलता दिलेली नाही. म्हणून एका बाजुला साठवण करत असतांना दुसर्या बाजुला आपण अभिषेकाची आठवण ठेवलेली आहे. असा अभिषेक सातत्याने होत रहावा अशी आपली इच्छा आहे. पाण्याची उपस्थिती बारमाही व्हायला हवी ही आपली एक प्रकारची ध्येयवादिता आहे. ही ध्येयवादिता आपण एका वेगळ्या संकल्पनेतून व्यक्त केलेली आहे. मघाशी मी भगवान शंकराचा उल्लेख केला.
अनेक ठिकाणी असे आपल्या लक्षात येईल की शंकराच्या मंदिरामध्ये त्याच्या पिंडीवर वर्षभर पाण्याची धार धरणे हे तेथील धार्मिक व्यवस्थेचे एक अंग असते. तेव्हा नदी बारमाही करणे हे निसर्गाने सर्वत्र केलेले नाही, परमेश्वराने केलेले नाही, परमेश्वराने आपल्या वाट्याला विषमता व असंतुलन दिलेले आहे. पण परमेश्वराने दिलेले हे जे हवामानाचे असंतुलन आहे ते मानवी प्रयत्नातून, मानवी कर्तबगारीतून, मानवी जिद्दीतून संतुलित करणे हे आपले ध्येय राहिलेले आहे. अशी वेगवेगळी ध्येये आपल्या मनामध्ये सतत तरंगत रहावी म्हणून आपण प्रतिके निर्माण केली आहेत. कळसाचे प्रतिक आहे, शंकराच्या पिंडीवर सतत बारमाही धार आहे, अभिषेक आहे. आपण त्याच्याही पुढे गेलेलो आहोत.
आपल्याकडे कोरडे हवामान असल्यामुळे तहान जास्त लागते. म्हणून कुठल्याही धार्मिक विधीला आपल्याला बसविले तर प्रथम सांगितले जाते की अगोदर आचमन करा. कुठल्याही अन्य समाजांमध्ये तेथील धार्मिक निधी, सामाजिक विधी हा आचमनाने सुरु होत नाही. ह्या सगळ्या भारतीय व्यवस्था आहेत. भारतीय संस्कृतीचे पाण्याशी असलेले जे नाते आहे, ते व्यक्त करणार्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण आपण हे नाते केवळ व्यावहारिक स्वरुपापुरते बंदिस्त ठेवलेले नाही. आपले हे पाण्याशी असलेले नाते, प्राणी जीवनाला आधार देणारा प्रमुख घटक ह्या स्वरुपातले, समृध्दीच्या स्वरुपातले साठवणीच्या स्वरुपातले, त्याला आपण त्याच्याहि पलिकडे नेलेले आहे. हे भारतीय संस्कृतीचे एक वेगळे वैशिष्ठ्य आहे.
आज जगामध्ये जो पाण्याचा विचार चाललेला आहे तो समृध्दि सलिला धीना हा विचार. जगाला पटलेले आहे की सगळी समृध्दि पाण्यावर अवलंबून आहे. हे किती पटलेले आहे ? नुकतेच सप्टेंबरमध्ये आपण सगळ्यांनी वृत्तपत्रामध्ये वाचले असेल की जगामध्ये एक फार मोठी परिषद झाली. अर्थशास्त्राचे तत्वज्ञ, राजनीति निपुण, व्यवस्थापक, अभियंते, सामाजिक कार्यकर्ते असे ८००० विचारवंत हे दक्षिण आफ्रिकेत जोहान्सबर्गला जमले होते. त्यावेळी त्यांनी आठ दिवस मंथन केले की येत्या शतकामध्ये आणि त्यानंतर जगाच्या एकंदर विकासाचे स्थैर्य टिकून रहाणार कां नाही ? आज जी विकसित अवस्था आपल्याला पुष्कळ ठिकाणी दिसते, ती स्थायी रहाणार की ती तात्पुरती रहाणार ? ह्याबाबत विचार विनिमय केल्यानंतर, खूप खल केल्यानंतर, एक नवा शब्द आता जगात प्रचलित झाला आहे.
आपल्या अनेकांच्या वाचनात तो आलेला असेल. इंग्रजीमध्ये अद्याक्षरे जोडून तो नवीन शब्द केलेला आहे. वेहाब. वेहाब म्हणजे Water, Energy, Habitation, Agriculture आणि Bio-technology हे पांच विषय जगाची एकंदर विकासाची स्थिती कशी राहील हे ठरविणार. जे समाज हे विषय नीट हाताळू शकतील ते जगांत आघाडीवर रहाणार. त्यांतहि पहिला प्रश्न पाणी हा रहाणार आहे. आठ हजार विचारवंत, संयुक्त राष्ट्र संघाच्या वेगळ्या संघटनांचे अर्ध्वयु आणि १२५ हून अधिक वेगवेगळ्या राष्ट्र प्रमुखांचे प्रतिनिधी यांनी एकत्रित येऊन केलेला हा निर्णय आहे. त्यामुळे जगालासुध्दा भारताच्या वाङमयांत सहज सापडणारे पाण्याविषयीचे कौतुक आज पटलेले आहे. समृध्दि सलिला धीना हे आज जगांने मान्य केले आहे. २००३ च्या वर्षामध्ये आज आपण आहोत. हे सगळे वर्ष संयुक्तराष्ट्र संघाने जगभर समृध्दि सलिला धीना ह्या जाणीवेने प्रचार व प्रसार करण्यासाठी वापरायचे म्हणून ठरविले आहे. पहिली जी दोन वर्षे आहेत २००३-०४ ती दोन वर्षे जगभर प्रचार करण्यासाठी आणि नंतर त्यातून स्थायी स्वरुपाचे कार्यक्रम उभे करण्यासाठी वापरली जाणार आहेत.
सुदैवाने आपल्या परंपरेतच पाणी कसे हाताळावे त्याचे कांही महत्त्वाचे संकेत आपल्याला लाभले आहेत. आपल्या घरादारात अलिकडे वापरला जाणारा शब्द म्हणजे बादली. तो आपल्या मूळ प्राकृत भाषेत नाही, संस्कृत भाषेत नाही. बादली ही युरोपीय संस्कृतीची देणगी आहे. आपण कधीही पाणी उथळ तोंडाच्या भांड्यात साठवत नाही, कारण आपल्या स्थानिक निसर्ग रचनेची जी प्रकृतीची वैशिष्ठ्ये आहेत त्यामध्ये बाष्पीभवन हा आपला सर्वात मोठा शत्रू आहे. कोरडी हवा असल्यामुळे पावसाळ्यांतसुध्दा आपले कपडे वाळतात. कशामुळे असे वाळतात ? तर त्या कपड्यांमधली ओल ही हवेत निघून जात रहाते, म्हणून ते वाळतात. याची आपल्याला जाणीव असल्यामुळे आपण घराघरांत जे पाणी साठवतो ते बादलीत साठवत नाही. ते कळशीत साठवतो. तिचे पोट मोठे असते, पण तोंड लहान असते. चिंचोळ्या तोंडातून पाणी उडून जाऊ नये अशी ही व्यवस्था आहे. त्यामुळे कुंभ, कळशी ह्यांचे हे आकार परदेशांत व युरोपांत प्रचलित नाहीत. त्यांच्याकडे बादली आहे, इतर प्रकारची पाण्याची भांडी आहेत. आपल्याकडे मात्र कुंभ आणि कळशी आहे. कारण त्या कुंभ आणि कळशीमध्ये पाण्याची जास्त साठवण व्हावी. पण तिच्या तोंडातून बाष्पीभवनाला मिळणारी संधि मर्यादित असावी.
आपल्या अनेक लेण्यांभोवती पहाल तर पाऊस गोळा करायची व्यवस्था आहे. मुंबईत कान्हेरी लेण्यांना जा, तेथे फार उत्तम अवस्थेत ही व्यवस्था अजूनही आहे. लेण्यांच्या वर पाणी गोळा करण्यासाठी चार्या खणलेल्या आहेत. त्यांतून पाणी आणून लेण्यांमध्ये पाणी साठवायची जी व्यवस्था आहे, ती आंत जाऊन दगडाच्या पोटांत कोरुन तयार केलेल्या कुंडात आहे. राजमाचीवर काय किंवा आपल्या अनेक किल्ल्यांवर काय अशाच व्यवस्था आहेत. पाण्याचा आणि वार्याचा, पाण्याचा आणि हवेचा फार संबंध येऊ नये, बाष्पीभवन कमी व्हावे म्हणून पाणी हे झाकून ठेवायचे हा पाणी संग्रह करण्याच्या व्यवस्थेचा एक महत्वाचा निकष आहे. हे तपशील विसरले म्हणजे अनेक घोटाळे होतात. आपण स्वातंत्र्यानंतर नव्याने तलावांची निर्मिती सुरु केली. पण इंग्रजी शिक्षणाच्या प्रभावामुळे आपली परंपरा आपण नकळत विसरलो.
आपल्याकडे तलावांची संस्कृती असल्यामुळे २० लाख तलाव आपण अगोदरच बांधलेले असल्यामुळे व त्यांचे व्यवस्थापन आपण सांभाळले असल्यामुळे त्यांच्या कांही पध्दती, कांही संकेत हे आपल्या अंगवळणी पडलेले होते. पण आपण तेहि विसरलो. हिंदीमध्ये तलाव कसा निर्माण करावा त्यासाठी एक छोटे वाक्य प्रचारांत आहे. ’ तलाव बीसी असावा. ’ वीस पुरुष खोलीचा असावा. आपले जे दंडक होते, त्यामध्ये तलाव वीस पुरुष खोलीचा असला पाहिजे. हा एक मानदंड होता. तो तसा कां असला पाहिजे ? ते जर आजच्या परिभाषेत आपल्याला व्यक्त करायचे असेल, तर एक पुरुष म्हणजे साधारणत: १.५ मीटर उंची होते. २० पुरुष तलाव म्हणजे साधारणत: ३० मीटर खोलीची पाण्याची साठवण होते. तेव्हा त्या तलावाचा जो मुख्य गाभा म्हणजे सर्वात खोल असलेला भाग हा ३० मीटर उंचीचा असला पाहिजे.
आज आपण पुणे शहरांत बसलेलो आहोत. पुणे शहरामध्ये आपल्याला वरुणदेव वर्षभराचा पाऊस आणून देतो. तो ६०० ते ७०० मिलीमीटर. ते आपल्या जमेच्या बाजुला रुजू होणार. पण खर्चाच्या बाजुला पुण्यामध्ये २००० मि.मी. वर्षातून बाष्पभवन होते. म्हणजे जमेच्या बाजुला ६००-७०० मि.मी. येणार आणि वर्षाच्या अखेरी २००० मि.मी. हे उडून जाणार. तसे होऊ नये, बरेचसे पाणी उडून जाऊ नये म्हणून आपल्याला वेगळी काळजी घ्यायला लागते. ३० मीटर खोलीचा जर तलाव असेल आणि त्यातून जर २ मीटर पाणी बाष्प होऊन उडून गेले तरी एकंदर व्यावहारिक संग्रह कुशलता आपल्या हातात किती राहीली तर १०%. आधुनिक रचनेत हे संकेत विसरले गेले. आपण अनेक ठिकाणी उथळ तलावांची बांधणी केली.
आपल्याकडे अवर्षणाचा फार मोठ्या पट्ट्याचा प्रदेश आहे. आपल्या कृष्णा नदीच्या पूर्व तीराचा जो भाग आहे, विशेषत: सीना नदीच्या पूर्व तीराचा जो भाग आहे, किंवा मांजरा नदीच्या खोर्याचा जो भाग आहे, बीड, उस्मानाबाद हा पट्टा आहे, हा अतिअवर्षणाचा आहे. स्वातंत्र्यानंतर आपण मोठ्या प्रमाणात जलविकासाच्या कामात आहोत. ह्या पट्ट्यामध्ये जवळजवळ दीड हजार लहान-मोठे सांठवणीचे तलाव आहेत. त्या ठिकाणी सध्या अवर्षण आहे. त्यामुळे सगळे दीड हजार तलाव कोरडे आहेत. तलाव बांधताना तो खोल असला पाहिजे. ती खोली कशी निर्माण करायची ह्याची आपली निरनिराळी तंत्रे होती. प्रत्येक नाल्यावर तलावासाठी अनुकूल असलेल्या ठिकाणी इतकी खोली मिळेलच असे नाही. म्हणून विहीर जशी आपण खोदतो तशी विहिर त्या जलाशयाच्या गाभ्यांत मुद्दाम खोदून तयार करायची असते. त्यातून जे दगड आणि माती निघेल, त्यातून बांध किंवा पाल तयार करायची. आपल्या वाङमयात पाल, पाली हे शब्द रुढ झालेले आहेत. पालीवाल हा शब्द त्यांतूनच आलेला आहे.
बांध उभारणारी जी तज्ज्ञ मंडळी होती, त्या लोकांना पालीवाल म्हणत असत. आपल्या समाजाची पुन्हा स्थायी स्वरुपांत समृध्दीच्या दिशेने नीट रचना करायची तर हजारो वर्षांपासून आपल्यापर्यंत जलव्यवस्थापनाचे जे संकेत पोहोचलेले आहेत ते आपण नीट समजावून घेतले पाहिजेत. त्यांतलाच आणखी एक सामाजिक दुवा फार महत्वाचा आहे. हा तलाव बांधण्याचे जे शास्त्र आहे, ते परिचित असणारी मंडळी देशभर हिंडून त्या त्या ठिकाणच्या गरजांप्रमाणे त्या तलावांचे बांधकाम पिढ्यानपिढ्या करीत असत. ज्यांना आपण सध्या मागासलेले असे समजतो, ते आपले घटक समाज तसे नव्हते. भिल्लांमध्येसुध्दा एक उपजाती आहे. त्या उपजातीचे नांवच ’ तलावी ’ असे आहे. जसे पालीवाल तसे. आपला ’ छोटा नागपूर ’ नांवाचा प्रदेश आहे. तेथे संथाल मंडळी आहेत. त्या भागात आहर म्हणजे तलाव. त्यांच्यामध्ये ’ आहर संथाल ’ म्हणजे ज्यांना तलाव बांधण्याचे तंत्र आत्मसात झालेले आहे.
त्यांचा स्वतंत्र असा तज्ज्ञ वर्ग होता. आपल्याकडे रेल्वे नव्हत्या. आजच्यासारखी परिवहनाची सुविधा नव्हती. तेव्हा बैलांवरुन किंवा हत्ती, घोडे, ऊंट ह्यांवरुन मालाची ने आण होत असे. हे सगळे कोण करतअसत ? आपल्या भारतीय व्यवस्थेमध्ये हा अत्यंत कर्तबगार समाज होता. ब्रिटीशांनी त्यांना उध्वस्त केले व त्यांच्यात आणि इतरांत सामाजिक दरी निर्माण केली. ब्रिटिशंनी त्यांना मागासलेला समाज म्हणून जाहिर केले. वस्तुत: मुळात तो अत्यंत समृध्द आणि कर्तबगार समाज होता. हा बंजारा समाज किती कर्तबगार होता ? लाख लाख गाई आणि बैल घेऊन ते इकडून तिकडे सामानाची वाहतूक करीत हिंडत असत. देशभर असे लाख लाख गाई, बैल घेऊन हिंडायचे आणि वहातृक करायची म्हणजे ज्या ठिकाणी त्यांचा पडाव करायला लागायचा. त्या ठिकाणी १ लाख बैलांना पाणी द्यायची व्यवस्था करावी लागे. ह्या लोकांना लाखा बंजारा म्हणायचे. त्या लाखा बंजारामध्ये एक वर्ग होता की जो असे तलाव बांधण्यात निष्णात झालेला होता.
मध्य प्रदेशामध्ये सागर नावांचा एक जिल्हा आहे. उत्तर मध्य प्रदेशामध्ये ’ सागर ’ हे नांव कसे आले ? त्याचा इतिहास उपलब्ध आहे. एक ’ लाखा बंजारा ’ म्हणून महाराष्ट्रातला बंजारी होता. त्याची उत्तरेतून म्हणजे यमुना काठापासून दक्षिणेकडे सतत व्यापार चालायचा. म्हणून त्याला सागर ह्या जिल्ह्याच्या परिसरामध्ये नेहमी मुक्काम करावा लागायचा. जनावरांची अडचण होऊ नये म्हणून त्याने एक विशाल तलाव बांधला. त्या काळच्या मानाने तो खूपच मोठा तलाव होता. त्यावरुन त्याला सागर हे नांव पडले. त्या तलावाच्या नावावरुन त्या गावाला व त्या जिल्ह्याला सागर हेच नांव दिले गेले. अशा प्रकारे समाजाच्या अनेक वर्गांमध्ये तलाव बांधण्याचे तंत्र प्रगत होते. ब्रिटीशांनी आपली समाजव्यवस्था अत्यंत कुशलतेने उध्वस्त करतांना आपल्यातला जो जो कर्तबगार समाज घटक आहे त्या त्या समाज घटकाला नामोहरम करुन, त्याची नामुष्की करून, निंदा नालस्ती करुन, हळूहळू तो तेजोहीन होईल अशी व्यवस्था केली. आपण महाराष्ट्रातले एक उत्तम उदाहरण घेऊ या. महाराष्ट्रामध्ये भंडारा हा जिल्हा आहे. ह्या जिल्ह्याला भंडारा हे नांव कशावरुन पडले ?
ते अन्न धान्न्याचे. उसाचे, गुळाचे भांडार होते. कोल्हापूर हे गुळाचे भांडार नंतर झाले. परंपरेने भंडारा जिल्हा हे गुळाच्या व्यापाराचे मुख्य केंद्र होते. दक्षिणोत्तर व्यापार येथून होत असे. आपले जे वैनगंगेचे खोरे आहे, त्या ठिकाणी आपल्यासारखी अवर्षण पडत नाहीत. त्या ठिकाणी १००० ते १२०० मि.मी. हुकमी पाऊस दरवर्षी पडतो. त्या एका जिल्ह्यामध्ये आजसुध्दा मानवी उपयोगामध्ये असलेले (मी आकडा सांगितला तर खरा वाटणार नाही, पण तेथे जाऊन आपण बघू शकता, सरकार दरबारीहि त्याची नोंद आहे). आठ हजार तलाव आहेत. ते आज वापरात आहेत. हे तलाव कुणी निर्माण केले ? हे तलाव निर्माण कराणारा जो वर्ग आहे, त्या वर्गाला कोहली समाज म्हणतात. हा कोहली समाज अत्यंत कर्तबगार समाज आहे. आपण जर ते तलाव जाऊन पाहिले तर आजच्या आधुनिक अभियांत्रिकीच्या संदर्भामध्येसुध्दा आपल्याला कांही बाबतीत आश्चर्याने स्तब्ध व्हायला होते. आपल्या मराठी भाषेंत भरपेट जेवलो की पोट तुडुंब भरले म्हणतो.
एखादी गोष्ट काठोकाठ भरली की तुडुंब शब्द वापरला जातो. हा तुडुंब शब्द कुठुन आला ? तुडुंब म्हणजे त्या तलावाचा सर्वात वरचा पाणी घेण्याचा दरवाजा. त्यातून मराठी भाषेत तुडुंब शब्द आला. पण ह्या कोहली समाजाची इंग्रजांनी काय दैना केली ? त्यांनी पाहिले की हा अत्यंत कर्तबगार समाज आहे, एका जिल्ह्यामध्ये त्यांनी हजारो तलाव बांधले आहेत, त्याचे व्यवस्थापन करताहेत आणि त्यामुळे जिल्हा अत्यंत समृध्द आहे. तेव्हा आता ह्यांना नामोहरम केले पाहिजे. १८६१ साली जेव्हा त्यांनी जन गणना केली तेव्हा शांत पणाने त्यांनी ह्या कोहली समाजाची नोंदणी शेड्युल्ड ट्राईब म्हणून करुन टाकली. म्हणजे अभियांत्रिकीमध्ये जो अत्यंत प्रगत समाज, ज्यांनी प्रगत वारसा जपला, त्या समाजाला नामोहरम करण्यासाठी त्यांनी शांतपणाने शेड्युल्ड ट्राईब म्हणून ठरवून टाकल. आपल्या अनेक सामाजिक शक्तीशाली धारणांना छेद देऊन ब्रिटिशांनी ह्या ठिकाणी त्यांची व्यवस्था बसविली.
आपल्याला आता त्याच्या पलिकडे जायचे आहे. आपल्या विकासाची पुन्हा स्थायी रचना करत असतांना आपली जी परंपरागत बलस्थाने आहेत ती नीट समजावून घ्यायची आहेत. या सगळ्या सांस्कृतिक परंपरेमध्ये सहाजिकच असा प्रश्न राहील की ब्राम्हण वर्ग हा कुठे आला ? आपल्यामध्ये पुन्हा एक गैरसमज निर्माण केला गेलेला आहे आणि इंग्रजांनी त्याला विशेष चालना दिलेली आहे की ब्राम्हण वर्ग हा पुजा अर्चा करणारा, तात्विक विवेचन करणारा, केवळ बौध्दिक गोष्टी करणारा असतो. पण वास्तव तसे नाही. ब्राम्हणाचे आपण कुठलेही वर्णन पाहिले तर त्याला आपण कर्मकांडामध्ये रुळलेला, कर्मकांडाचा पुरस्कार करणारा व स्वत: अग्रेसरत्व करणारा असा ब्राम्हण म्हणूनच ओळखतो तो सर्व क्षेत्रांमध्ये आहे. मग तो धनुष्य शास्त्रामध्ये अग्रेसरत्व करणारा द्रोणाचार्य असेल, किंवा राज्यशास्त्रामध्ये अग्रेसर करणारा कौटिल्य असेल प्रत्यक्ष त्या त्या जीवनाच्या अंगाचे धुरीणत्व करणे, त्या क्षेत्राला दिशा देणे, प्रत्यक्ष ते आचरुन दाखविणे आणि तसे करुन दाखविण्यासाठी इतरांना मार्गदर्शन करणे, ही ब्राम्हण वर्गाची वैशिष्ट्ये होती.
ब्राम्हण वर्गाची ही वैशिष्ट्ये वेगवेगळ्या ब्राम्हण समाजाघटकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारांनी लक्षात येतात. राजस्थानात आपले जे पवित्र पुष्करतीर्थ आहे, त्या पुष्करतीर्थाशी परशुरामांचा संबंध आलेला असल्यामुळे सर्वांच्या मनांत विषेश आदराची भावना आहे. राजस्थानमध्ये त्या पुष्करतीर्थाच्या परिसरांत अवर्षण-प्रवणता असतांनासुध्दा फार मोठी वैभवशाली सुवर्णयुगे आपण निर्माण करु शकलो. कशाच्या जोरावर ? मघाशी जसे सरस्वतीचे वर्णन केले, तशा लाखो तलावांच्या जोरावर ते केले गेले. राजस्थानात हे तलाव निर्माण करणारे जे होते, त्या तलाव निर्माण करणार्यांची ब्राम्हण वर्गामध्ये एक पोट जात आहे. त्यांना पुष्करण ब्राम्हण म्हणतात. तलाव निर्मितीचे मार्गदर्शन करणारा, गावागावात ह्या तलावांची व्यवस्था बसविणारा, तलाव बांधून घेणारा, असा हा वर्ग होता, त्यांना आपण पुष्करण ब्राम्हण म्हणतो. पालीवाल हा सुध्दा बांधांची निर्मिती करणारा ब्राम्हणांमधलाच एक वर्ग आग्रा, मथुरेच्या बाजूला आहे.
ह्या सगळ्यांचा अलिकडे फार चांगला सामाजिक अभ्यास झाला. आपली तलावांची परंपरा समजावून घेण्यासाठी गांधी प्रतिष्ठानमध्ये काम करणारे अनुपम मिश्रा नांवाचे सर्वोदयवादी कार्यकर्ते आहेत. त्यांनी पाण्याच्या बाबतीत भारतीय संस्कृती काय होती हे समजावून घेण्यासाठी गांधी प्रतिष्ठानचा कार्यक्रम म्हणून तीन वर्षे भारतभर सगळीकडे भ्रमण केले. तेथे राहिेले, लोकांशी बोलले, त्यांची जुनी दानपत्रे पाहिली, त्या ठिकाणचे शिलालेख पाहिले, ऐतिहासिक संग्रहालये पाहिली. आणि नंतर त्या तीन वर्षांच्या भ्रमंतीचे सार संग्रहित करणारे एक पुस्तक त्यांनी लिहिेले. ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी ते पुस्तक अवश्य विकत घ्या आणि संग्रही ठेवा. हे पुस्तक इतिहासाचे पुस्तक आहे का ? म्हटले तर आहे. हे पुस्तक ललित कलाकृती आहे का ? लालित्यपूर्ण कलाकृतिहि आहे. फार रसाळ लिहिले आहे. एखादी कादंबरी असावी असे लालित्यपूर्ण लिहिले आहे. हे सांस्कृतीक निवेदन आहे का ? तर ते तसे सांस्कृतिकही आहे.
त्या पुस्तकाचे नांव आहे आज भी खरे है तालाब. मुळांत हिन्दीत लिहिलेले आहे. सुदैवाने भारतीय जलसंस्कृती मंडळासाठी त्याचा मराठी अनुवाद प्रा. प्रदीप भलगे यांनी करुन प्रसिध्द केला आहे. तेव्हा त्याचे नांव मात्र काहींसे बदलून भारतीय तलावांची परंपरा असे दिले आहे. अत्यंत वाचनीय आहे. त्या पुस्तकामध्ये अनेक तपशिल दिलेले आहेत. आज वेळेच्या अभावी आपल्याला सगळ्या तपशिलांमध्ये जाता येणार नाही. आजच्या संदर्भातले कांही महत्वाचे तपशिल तेवढे आपण बघू. आपला जो कोकणचा प्रदेश आहे, तो भगवान परशुरामांनी लागवडीला आणला. लागवडीला आणला म्हणजे नेमके काय केले ? त्या ठिकाणी कांही वेगळे ऋतुचक्र नव्हते. भारताच्या अन्य प्रदेशांसारखेच ऋतुचक्र होते. त्यामुळे केवळ हंगामी पाऊस म्हणून त्या ठिकाणी त्यांनी हजारो तलावांची निर्मिती केली.
मध्यंतरी आपल्या कोकणामध्ये कणकवलीला सिंचन विकासाची परिषद भरली होती. ती भरविण्यांत पुढाकार मधु मंगेश कर्णिकांनी घेतला होता. ते स्वागताध्यक्ष होते. त्यासाठी फक्त रत्नागिरी जिल्ह्यातील साडेतीनशे मंडळी आली होती. त्या परिाषदेसाठी येतांना हे सांगितले गेले होते की आपण आपल्या गावाच्या परिसरांत पूर्वी पाण्याच्या काय व्यवस्था असत, त्याची त्याची थोडी थोडी माहिती घेऊन या. विशेषत: जी महाविद्यालये आहेत, शाळा आहेत, विद्यार्थ्यांना ही माहिती आणायला सांगितली होती. त्यांतून असे लक्षांत आले की रत्नागिरी जिह्यामध्ये तीन हजार पाणवठे होते. कांही ठिकाणी पाच पाच किलोमीटर लांबून. त्यासाठी अगदी बोगदेसुध्दा काढून पलिकडच्या घळीमध्ये पाणी नेले गेले होते. आज त्या व्यवस्था उध्वस्त आहेत. पण त्या अवशेषांमधून आपल्या एकंदर समाज जीवनाची पाण्याच्या संदर्भातील व्यवस्था कशी होती त्याचे अनेक संकेत मिळतात.
आपल्या कोकणातल्या बोल भाषेमध्ये ’ आज मला तो तळ्यावर भेटला ’ असे सहजपणे येतेृ तळे हा शब्द कोकणी भाषेमध्ये इतका प्रचलित कसा झाला ? अनेक गावांभोवती चार-चार, आठ-आठ तलाव होते. महाडचे चवदार तळे त्यांतलेच एक. वेगवेगळ्या उपयोगासाठी वेगवेगळे तलाव. आपण सगळी चितळे मंडळी विंध्यवासिनीची उपासक आहोत व मुळचे राहणारे कोंकणांतील रावतळ्याचे आहोत. म्हणजे विंध्यवासिनीजवळ सुध्दा मोठे तळे होते. तेव्हा कोंकणातही हा तलावांचा समाज आहे, असा हा तलावांचा समाज कुणी निर्माण केला ? त्याची एक आख्यायिका सांगितली जाते. जर त्याच्यातून कुणी दुखावले जाणार असतील, तर ती सध्या केवळ आख्यायिका आहे एवढेच त्यांनी समजावे. चितपावनांमध्ये आणि देवरुखांमध्ये वितुष्ट आहे असे समजले जात असे. त्या वितुष्टांना प्रारंभ कुठुन झाला ?
याबाबत एक मजेशीर कथा सांगितली जाते. वासुदेव चितळे नांवाचे चिपळूणला एक मोठे सत्पुरुष होते. ते सत्पुरुष पाणी, पाणी व्यवस्थापन, तलाव बांधणे, तलाव निर्माण करणे ह्याचा फार आग्रहाने पुरस्कार करत असत. मघाशी मी जे पुष्करण ब्राम्हण सांगितले, त्यांच्यामध्ये आपण शंकराच्या पिंडीची पुजा करतो किंवा शाळुंकीची पुजा करतो, तशी प्रतीकात्मक म्हणून एखाद्या शिळेवर खोदाई करायची आयुधे चित्रित असत, त्या शिळेची देवतेप्रमाणे पुजा करायची परंपरा आहे. खोदाई केल्याशिवाय तलाव बांधणी शक्य नसल्यामुळे हा सगळा ब्राम्हणवर्ग ती खोदाई करायला लागणारी जी आयुधे आहेत, त्यांचीहि देवघरांत पुजा करतात. वासुदेव चितळे हे त्या परंपरेतले होते. त्यांचा असा आग्रह होता की ब्राम्हण हा क्रियाशील असला पाहिजे. समाजाची जी वेगवेगळी अंगे आहेत, मग ते नाट्य असेल, साहित्य असेल, ह्या सर्व अंगांमध्ये प्रमुख म्हणून उदा. नाट्यमुनी हे ब्राम्हण असत. म्हणजे ब्राम्हण हे नुसते लेखक किंवा बोलघेवडे विचारवंत नव्हते, तर क्रियाशील होते. ब्राम्हणांनी असे क्रियाशील राहिले पाहिजे, कोकणामधल्या तलावांची व्यवस्था ब्राम्हण वर्गाने सांभाळली पाहिजे याचा ते आग्रहपूर्वक पुरस्कार करित असत.
त्या काळातल्या ब्राम्हणांमध्ये एकदा मोठा वाद झाला. त्या वादामध्ये दोन तट पडले. त्यातले नेमके खरे, खोटे, आज सांगता येणे कठीण आहे. त्यांबाबत जास्त संशोधन व्हायला पाहिजे. पण ज्या ब्राम्हण वर्गाने त्यावेळी असा आग्रह धरला की पुजा पाठ, धार्मिक चिंतन हेच ब्राम्हण वर्गाचे प्रमुख काम आहे, तसे न केले तर देव त्यांच्यावर रागावतील, त्यांना देवरुखे म्हटले गेले, आणि बाकीचे चित्तपावन राहिले अशी ती आख्यायिका आहे. या आख्यायिकांमधला संघर्षाचा मुद्दा जरी सोडून दिला, तरी पाण्याशी असलेला आपल्या संस्कृतिचा संबंध किती खोलवर आहे याची प्रचिती त्यांतून मिळते. वासुदेव चितळे नेमके कुठच्या शतकांत झाले त्याचा फारसा पुरावा नाही. पण अंदाजाने ८-१० शतकांपूर्वीची ती व्यक्ति असावी. आपण तसेच इतिहासांत आणखी मागे मागे गेलो, तर महाभारत काळामध्ये सुध्दा या तलावांना असलेले महत्वाचे स्थान लक्षात येते. नारदमुनीसुध्दा ह्या परंपरेची युधिष्ठीराला आठवण करुन देताहेत.
इतिहास काळांत याच्याहि आपण मागे गेलो तर जगामध्ये सर्वात पहिला ग्रंथ, म्हणजे त्याच्या आधी ग्रंथ नव्हते असे नाही. पण ते कालबाह्य व विस्मृत झाले. जो एक ग्रंथ टिकून राहिला व जगातील अत्यंत आदरणीय ग्रंथ म्हणून मान्यता पावला तो म्हणजे रामायण. रामायणाच्या वेगवेगळ्या कांडांमध्ये, आपली तक्तालिन भारतीय रचना कशी होती, ध्येये -उद्दिष्ट्ये काय होती याचे चित्र पहायला मिळते. ज्यावेळी प्रभुरामचंद्र, सीता आणि लक्ष्मण यांनी दंडकारण्यात प्रवेश केला तेव्हा ज्या आश्रमांत ते उतरले, ( तो आश्रम अत्रि ऋषींचा होता) अत्रि ऋषी वयस्कर होते. अनुसुयेचे सुध्दा वर्णन अतीशय वृध्दा असेच आहे. रामाने प्रथम स्वत:ची ओळख करुन दिली. ’ मी राम, ही माझी पत्नी सीता, हा माझा भाऊ लक्ष्मण, ’ त्यानंतर अत्रि ऋषींनी अनुसुयेची ओळख रामाला आणि सीतेला करुन दिली.
ती ओळख रामायणांत वाचण्यासारखी आहे. मुळांतच दंडकारण्य हा शब्द कसा आला ? तर त्याचा रामायणांत खुलासा आहे. दंडक म्हणजे उभी असलेली निष्पर्ण काठी. वनां वर्णनाला व पर्यावरणाला आज जो एक प्रकारचा स्वप्नाळूपणा जोडला गेला आहे की दाट झाडी वगैरे असोत तसे तेथे कांही नव्हते. अवर्षण प्रवणता असल्यामुळे ’ वनराई ’ किती निर्माण होऊ शकते त्याबाबत निसर्गाची मर्यादा असल्यामुळे दंडकारण्यामध्ये वाळक्या काठ्या उभ्या असायच्या. ज्यांना आपण बोरी बाभळीची झाडे म्हणतो, ती उभी होती. ही कथा नेमकी कुठे घडली असावी हे आज खात्रीपूर्वक सांगता येत नाही. पण एकंदर वर्णनावरुन बुलडाणा जिल्ह्याच्या मराठवाड्याच्या सीमेवर कुठे तरी घडली असावी. त्या ठिकाणी अत्रि ऋषींचा आश्रम होता. या ठिकाणी अनुसुयेने जे पर्यावरणीय काम केलेले आहे, त्या कामाचे अत्रि ऋषी कौतुक करताहेत.
काय शब्दांत करताहेत ? दशवर्षान नावृष्टिम् रामाला ते सांगत आहेत तु आता येथे येण्यापूर्वी दहा वर्षे अनावृष्टी अवर्षणाची गेली आहेत. सध्या जसे पाठोपाठ दोन वर्ष महाराष्ट्रामध्ये आपल्याला अवर्षणाला तोंड द्यायला लागते आहे, तसे दहा वर्षे तेथे सलग अवर्षण झाले होते. अशी दीर्घ अवर्षणे आपल्या इतिहासांत वेळोवेळी झालेली आहेत. दुर्गादेवीचा दुष्काळ हा महाराष्ट्रात आपल्या सगळ्यांना माहिती असलेला आहे. १२ आणि १३ शतकाच्या कांठावर तेरा वर्षे महाराष्ट्रात सतत दुष्काळ होता. त्या दुष्काळांत हा समाज कुणी टिकवून धरला ? आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण दोनच महिलांच्या नांवामागे आदराने देवी हा शब्द लावतो. आपण फार चोखंदळ माणसे आहोत. चोखंदळच असले पाहिजे. शब्द जपून वापरले पाहिजेत. आपण एकदम कुणाचे कौतुक करत नाही आणि कुणाला पटकन दुखवितहि नाही.
आपण नुसते अहिल्या म्हणत नाही. आपण देवी अहिल्या बाई असे म्हणतो. मघाशी मी ज्या वंजारी समाजाचा उल्लेख केला, त्या वंजारींमध्ये जे लाखा वंजारी होते, त्या लाखा वंजारींमध्ये एक दुर्गा नांवाची महा कर्तबगार महिला होऊन गेली. लाखा बैल इकडून तिकडे उत्तरेत नेऊन ती वहातुक करत असे. तेरा वर्षे महाराष्ट्रात दुष्काळ असतांना त्या काळच्या बिहार या गंगेच्या काठच्या प्रदेशांतून धान्य आणून तिने हा महाराष्ट्रांतील समाज जगवला. आपण त्यासाठी तिला काय दिले ? त्या काळापासून तिचा सर्वत्र उल्लेख ’ दुर्गादेवी ’ असा होऊ लागला. त्या काळांतल्या इतिहासांत सुध्दा तो दुर्गादेवीचा दुष्काळ असे म्हटले जाऊ लागाले. तेरा वर्ष अखंड वाहतुक करुन तिने हा समाज जगवला. तसेच सकृतदर्शनी रामायणाच्या आर्य अनुसुयेच्या कथेच्या काळांत ह्या प्रदेशामध्ये अगोदर घडले होते. त्यावेळी दशवर्षान नावृष्ट्या दग्धे लोको रामायणातले मूळ वर्णन आले आहे.
दहा वर्षांच्या अवर्षणामुळे सर्व प्रदेश जणू बेचिराख झाला होता. निरंतरं ययामूल फले सृष्टे जान्हवीच प्रर्वतीता आज जसे आपण वेगवेगळ्या ठिकाणी तलाव बांधतो, पाझर तलाव बांधतो, तसे अनुसयेने पाझर तलाव इतक्या मोठ्या संख्येत त्यावेळी बांधले की ज्या ठिकाणी अत्रि ऋषींचा आश्रम होता ती नदी बारमाही झाली. जान्हवी हा शब्द बारमाही नदीला वापरला जातो. अनुसयेने अवर्षणग्रस्त प्रदेशात जान्हवी निर्माण करुन दाखविली. अशा कर्तबगार अनुसयेचे आपण उपासक आहोत.
आपल्या संस्कृतित लौकिक, कर्तबगारीचे असे अनेक संकेत आहेत. संस्कृती जर खर्या अर्थाने विजयी, जगज्जेती, समृध्दी-प्रवण व अभिमानास्पद अशी करायची असेल तर त्या दिशेने आपल्याला सक्षम, कर्तबगार वर्ग समाजात उभा करायला पाहिजे. आपले सर्व त्यांच्यावर सौख्य, आरोग्य, स्थैर्य आणि समृध्दी अशा सगळ्या गोष्टी टिकून ठेवण्याची जबाबदारी रहाणार आहे. त्याच्याही पलिकडे आपल्याला एक पाऊल जायचे आहे. इथपर्यंत कदाचित इतर जग आपल्याबरोबर येईल, पण आपण पाण्याला त्याच्याहि पलिकडे नेऊन एक सांस्कृतिक उन्नत स्थान दिले आहे.
आपल्या कुठल्याहि धार्मिक विधीनंतर, पुजेनंतर, आपण ज्यावेळला प्रसाद वाटतो, त्या वेळेला आपण हातावर तीर्थ देतो. त्याला आपण ’ पाणी ’ देतो असे म्हणत नाही, जल देतो असे म्हणत नाही, आपण पाण्याला तीर्थता दिलेली आहे. मांगल्य दिलेले आहे. नदीकाठच्या धार्मिक ठिकाणी जातो तेव्हा आपण तीर्थक्षेत्री जातो असे म्हणतो. इतकेच नाही, तर आपल्या वडिलधारी मंडळींबद्दल आदर व्यक्त करतांना आपण त्यांनासुध्दा तीर्थरुप म्हणतो. तेव्हा पाण्याबाबत मंगलमयता निर्माण करणारा, पाण्याला मंगल स्थान देणारा हा समाज आहे. जगाच्या पाठीवरचे इतर समाज पाण्याला हे मांगल्य अजून देऊ शकलेले नाहीत. आता या संदर्भात आपल्याला भोवतालच्या परिस्थितीकडे पहायचे आहे. हे पाण्याचे मांगल्य आपल्या पुण्याच्या जवळच अहिल्या देवीने बांधलेला संगमवरचा घाट आहे, तेथे गेल्यानंतर आपल्याला जाणवते का ?
तेथील पाणी हे तीर्थ आहे असे आपल्याला वाटू शकेल कां ? आपणच आपय्ल्याला आता प्रश्न विचारावयाचा आहे की भारताची ही जी प्रदीर्घ सांस्कृतिक परंपरा आहे, जिच्या प्रकाशांत अनुसुयेने येवढे कर्तबगारीचे काम केले, वासुदेव चितळ्यांनी रोष पत्करुन आपला मुद्दा सोडला नाही, त्या परंपरेचे जर आपण खरेखुरे वारसदार असू, तर आपल्यालाहि त्या संकेतांच्या प्रकाशामध्ये भविष्याचा मार्गै शोधायचा आहे. आपल्याला तशी प्रेरणा सतत कुणाकडून मिळणार आहे ? परशुराम जयंती अक्षय तृतीयेला येते. ह्यांतला अक्षय शब्द कुठुन आला ? आपण आपल्या भारतीय संवत्सरा जी व्यवहार रचना ठरवली आहे, त्यांत पाण्याच्या व्यवस्थापनेसाठी जे अनेक दिवस महत्वाचे आहेत, ते आपण त्या अर्थाने प्रत्यक्ष जीवनामध्ये गेल्या ५-६ शतकांमध्ये नीट वापरात आणू शकलेलो नाही.
आपली खरी जीवनपध्दती काय होती हे पहाण्यासाठी पांच-सहा शतके आपल्याला आक्रमण काळाच्या मागे जावे लागते. त्यांतले दोन दिवस विशेष महत्वाचे आहेत. एक घटस्थापनेचा व दुसरा अक्षय तृतीयेचा. त्यांतला घट शब्द कुठुन आला ? नवरात्रात आपण माळा करणे, देवीची पुजा करणे हे सर्व करतो. पण मघाशी जी कलशप्रवण संस्कृती आपण पाहिली तिला अनुसरुन आपण कुंभाची म्हणजे घटाची स्थापना करतो. त्या दिवशी आपण तलावांची पुजा करतो. तलावांच्या पाण्याचे हिशोब लावतो. हे पाणी मला वर्षभर इथल्या पशुजीवनासाठी, दुग्ध व्यवसायासाठी, प्राणी जीवनासाठी, मानवी जीवनासाठी, शेतीसाठी वर्षभर वापरायचे आहे याची आपण आठवण ठेवतो. त्याला अनुसरुन पाण्याचे अत्यंत व्यवस्थित असे लोकानुवर्ती व्यवस्थापन ठरवतो. अक्षय तृतीयेला आपल्या वेगवेगळ्या धार्मिक समारंभामध्ये वेगवेगळ्या दानांमध्ये वेगवेगळे पुण्य सांगितले आहे. संक्रांतीला तीळाचे दान सांगितले आहे.
तीळामधून कृषी उत्पादनातील समृध्दी व्यक्त करतो. जर आपल्याला कायमचे पुण्य मिळायचे असेल, आपल्याला स्वर्ग मिळवायचा असेल तर अक्षय तृतीयेला घटाचे दान करायला सांगितले आहे. ज्या समाजाजवळ भरलेला घट दान करण्याइतके पाणी शिल्लक असेल, तो समाज समृध्द राहणार. जैन परंपरेमध्ये अक्षय तृतीयेला महावीर जैनांना मस्तकाभिषेक केला जातो, पाण्याचे घडे भरभरुन त्यांच्या मस्तकावर ओतले जातात. पाण्याची अशी विपुलता जो समाज अक्षय तृतीयेपर्यंत टिकवू शकतो, त्या समाजाची समृध्दी अक्षय्य टिकते असा संकेत आहे.
म्हणून आपल्या जीवनामध्ये, शेती जीवनामध्ये अक्षय तृतीयेला अपरिमित महत्व आलेले आहे. घटस्थापनेच्या दिवशी समाजाच्या हाती असणारे पाणी काटकसरीने वापरत वापरत शिल्लक ठेवायचे आहे. लगेच सारे उघळून टाकायचे नाहिये. समाजाला ही सवय लागण्यासाठी अक्षय तृतीयेचे महत्व आपल्या मनावर बिंबविण्यांत आलेले आहे. असे हे सगळे सांस्कृतिक संकेत भविष्यामध्ये आपल्याला मार्गदर्शक ठरणार आहेत. त्यांतून पुढच्या विकासाच्या वाटा स्पष्ट होणार आहेत. त्या वर मार्गस्थ होण्यासाठी आपापल्या परिने आपण सर्वांनी ह्या कामाला लागू या. अशी विनंती करुन थांबतो.
डॉ. माधवराव चितळे, औरंगाबाद, मो : ०९८२३१६१९०९