Source
जल संवाद
धरण प्रकल्प उभारणाच्या कामांसाठी सर्व कर्मचारी व अधिकारी यांच्यात एकजिनसीपणा निर्माण झाल्यानंतर तेथील वैयक्तिक नातीही कशी जिवाभावाची होतात याचे प्रत्यंतर लवकरच आले. मुळा प्रकल्पावरून माझी अल्पसुचनेने भातसा प्रकल्पावर बदली झाली, तेव्हा दिवसरात्र एक करून उभारलेल्या मुळा धरणाचे निरोपाचे दर्शन घेतांना मी भारावलो, तसेच त्या कामात अखंड साथ देणारे तेथील अनेक कर्मचारीही सद्गदित झाले. त्यातील तिघांनी तर हट्टच धरला की तुमच्याबरोबर आम्हालाही भातसा प्रकल्पावर घेवून चला. त्यांची समजूत काढणे अवघड गेले.
धरण प्रकल्प उभारणाच्या कामांसाठी सर्व कर्मचारी व अधिकारी यांच्यात एकजिनसीपणा निर्माण झाल्यानंतर तेथील वैयक्तिक नातीही कशी जिवाभावाची होतात याचे प्रत्यंतर लवकरच आले. मुळा प्रकल्पावरून माझी अल्पसुचनेने भातसा प्रकल्पावर बदली झाली, तेव्हा दिवसरात्र एक करून उभारलेल्या मुळा धरणाचे निरोपाचे दर्शन घेतांना मी भारावलो, तसेच त्या कामात अखंड साथ देणारे तेथील अनेक कर्मचारीही सद्गदित झाले. त्यातील तिघांनी तर हट्टच धरला की तुमच्याबरोबर आम्हालाही भातसा प्रकल्पावर घेवून चला. त्यांची समजूत काढणे अवघड गेले. मी स्वत: तत्पूर्वी भातसा प्रकल्पाचे धरणस्थळ पाहिलेले नव्हते. तेथील कामाची सद्यस्थितीही माहिती नव्हती. अशा वेळी त्यांना काही आश्वासन देणेही शक्य नव्हते. भातसा प्रकल्पावर पोचल्यावर मी तुम्हाला निरोप पाठवतो एवढे म्हणून मी तात्पुरती सुटका करून घेतली.पण शहापूरसारख्या खेडवळ ठिकाणी अधीक्षक अभियंत्यांचे मंडळ कार्यालय स्थलांतरित करायचा निर्णय घेतांना ही जिवाभावाची माणसे डोळ्यासमोर होती. शहापूरच्या वनविभागाच्या छोट्या विश्रामगृहातील एक खोली तात्पुरती रहायला मिळवून त्यातच भातसा कार्यालयाचा शुभारंभ करावा लागला. कागद, टंकलेखन यंत्र, कर्मचारी हाताशी काहीच नाही. एका लहान कागदावर तेथे मंडळ कार्यालय सुरू झाल्याचे पत्र तयार करून मंगल प्रवेशाचा नारळ फोडला होता. त्याच्या करवंटीतच डिंक कालवून व त्याने लिफाफा बंद करून तो शहारपूरच्या डाक पेटीत टाकला. आता पुढचा प्रश्न होता हाताशी माणसे गोळा करणे व माझी स्वत:ची व त्यांची रहाण्याची व्यवस्था शहापूरमध्ये किंवा भातसा धरणस्थळी करणे.
भातसा प्रकल्पाला प्राथमिकता असल्याने शासनाने माझ्या नेमणुकी पाठोपाठ कार्यकारी अभियंता, उप अभियंता, कनिष्ठ अभियंता लेखनिक कर्मचारी वर्ग, लेखापाल यांचा भातसा प्रकल्पमंडळात बदलीवर मार्च एप्रिलमध्ये (1966) नेमणुका करायला प्रारंभ केला. पावसाळा सुरू व्हायच्या आत या सर्वांना आसरा देणे आवश्यक होते. शहापूरला वनविभागाजवळ काही 6 - 7 छोटी दोन खोल्यांची घरे रिकामी होती. धरणस्थळाजवळ असलेल्या बिरवाडीलाही रहायला उपयोगी अशी दोन खोल्यांची चार घरे मिळण्यासारखी होती पण 30 - 40 जणांच्या नेमणूका भातसा मंडळात झालेल्या होत्या. त्यांना 5000 वस्तीच्या गावात भाड्याने घरे कितपत मिळणार ? म्हणून तेथील प्रतिष्ठित रहिवाशांची मदत घेण्याचे ठरवले. त्यातील अनेकांनी त्यांच्या इमारतींमधील दोन तीन खोल्या शासनाच्या ताब्यात प्रकल्प कर्मचाऱ्यांसाठी देणे आनंदाने कबूल केले. शासनाच्या प्रचलित नियमांप्रमाणे त्या जागांचे भाडे स्वीकारण्याचेही कबूल केले.
एखाद्या मोठ्या उद्दिष्टांसाठी स्थानिक समाज कसा पाठीशी उभा रहातो याचा अनुभव प्रारंभीच्या काही महिन्यातच आला. कोणताही औपचारिक करारनामा किंवा भाड्याची रक्कम निश्चित न करताच 20 - 30 निवासाला उपयोगी जागा तत्काळ प्रकल्पाच्या ताब्यांत आल्या. प्रकल्पासाठी ज्या खाजगी जागा ताब्यांत घेतल्या होत्या त्यांचे मालकाशी झालेल्या कराराप्रमाणे द्यावयाचे भाडे काहीही असो, ज्या शासकीय कर्मचाऱ्यांला ती वापरायला द्यावयाची त्याच्याकडून मात्र शासकीय निवासाप्रमाणे पगाराच्या 10 टक्केच किंवा त्या जागेच्या भाड्याइतके जे कमी असेल ते पगारांतून वळते करून घ्यायचे या वित्तीय व्यवस्थेलाही शासनाकडून लगेच मंजूरी मिळाली. जसजसे अधिकारी - कर्मचारी रूजू व्हायला लागले तसतशा या जागा त्यांना लगेच उपलब्ध झाल्याने कोणाची काही गैरसोय झाली नाही. कुलकर्णी व पटवर्धन हे दोघे स्पर्धा परीक्षेतून आलेले तरूण उप अभियंते आपले नवे उभरते संसार पाठीवर घेवून सरळ बिरवाडीला जावून अशा दोन जागामध्ये दाखल झाले, त्यामुळे पुढील अनेक कामे झटपट मार्गाला लागली.
पण एवढ्याने भागणार नव्हते. आणखी रहिवासी दालने व मुख्यत: कार्यालयांसाठी तातडीने जागा उभारणे आवश्यक होते. अशा अडचणीच्या वेळी मुळा प्रकल्पावरून माझ्याबरोबर भातसा प्रकल्पावर येण्यासाठी उत्सुक असलेल्या कर्मचाऱ्यांची मला आठवण झाली. विशेषत: त्यातील हसतमुख व कष्टाळू व्यक्तिमत्वाचा कनिष्ठ अभियंता शिवानंदप्पा व नेकीचा कसबी कामगार सुतार, आणि परिसराची न कंटाळता व्यवस्था सांभाळणारा माळी यांची उपयुक्तता लक्षात आली. त्यांना निरोप जाताच ते तातडीने आले. तात्पुरत्या आसऱ्यासाठी निवडलेल्या पाठारावरील गवत हटवून तेथ पत्र्यांची घरे व कार्यालये उभारण्याचे काम त्यांनी अथक प्रयत्नांनी शहारपूरच्या 1500 मि.मी पेक्षा जास्त कोसळणाऱ्या भर पावसातही चालू ठेवून दसरा दिवाळीपूर्वी उरकले.
कार्यालये मार्गाला लागली. संसारही उभे राहिले. यातच लेखापाल पदावर रूजू झालेले प्रसिध्द लेखक वि.ग. कानीटकरही होते. त्यांच्या तेथे असण्यामुळे प्रकल्पाच्या सगळ्या उपस्थितीला एक प्रकारचा भारदास्तपणा आला होता. कोणत्याही अडचणीचा बाऊ व करता अशी ही सारी मंडळी हातोहात गोळा झाल्याने प्रकल्पाच्या विविधांगी स्वरूपाला लवकर आकार येवू लागला. नव्याने एकत्र झालेल्या या सर्वांमध्ये एकोपा व्हावा म्हणून पावसाळ्यानंतर कोजागिरीच्या चांदण्यात तात्पुरत्या उभारलेल्या मंडपवजा पत्र्याच्या मंडळ कार्यालयाच्या सभोवतीच्या आवारात खोखोच्या छोटेखानी स्पर्धा व दुग्धपानाचा कार्यक्रम झाला. एकप्रकारे ही प्रकल्पाच्या उभारणीची एक अनौपचारिक सुरूवात होती.
भातसा धरणाची जागा बिरवाडीहूनही आत जंगलात 19 किलोमीटर वर होती. चैत्र महिन्यातच लक्षात आले की मुंबई महानगराला पाणीपुरवठा करायला निघालेल्या या भातसा नदीला उन्हाळ्यात पाणी नसते. अशा नदीकाठी धरणाच्या बांधकामाची वसाहत उभी करायची म्हणजे येत्या पावसाळ्याच्या अगोदरच पाण्याची काहीतरी सोय करायला पाहिजे. पर्यावरणाबद्दल स्वप्नाळू विचार मांडणाऱ्या माणसांशी संबंध येतो तेव्हा सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या घनदाट जंगलातील भातसा प्रकल्पाच्या या धरणस्थळाच्या त्या निर्जळी अवस्थेची आठवण होत रहाते. तेथे मोठा दगडी बंधारा बांधून पावसाळ्यांतही पाणी साठवून घेणे, अडवून घेणे आवश्यक होते. त्याप्रमाणे तेथे तातडीने बांधकाम हाती घेतले व त्याची जबाबदारी नाईक नावाच्या एका तडफदार कनिष्ठ अभियंत्याला दिली. तो बिरवाडीहून जा ये करत असे.
नदीपात्रातील बंधाऱ्याच्या पायाच्या खोदाईचे काम सुरू केले त्या दिवशी नाईकांना सांगितले, बंधारा पूर्ण होईपर्यंत सकाळी 8 पासून सायंकाळी अंधार होईपर्यंत येथेच थांबायचे. जेवायचा डबा बरोबर घेवून यायचे. पावसाळ्यामध्ये धरणस्थळी तपासणी करण्यासाठी म्हणून गेलो, तेव्हा धरणाच्या वरच्या अंगाला बांधायच्या या बंधाऱ्याच्या कामावरही डोकावलो. निम्मी उंची बांधून झाली होती. पाणी साठले होते. येते वर्ष नक्की निभावेल याची खात्री होती. मध्यान्ह उलटल्यावर जेवणासाठी आम्ही सर्वजण परत फिरलो, तेव्हा बरोबर गाडीत घेण्यासाठी नाईकांनाही बोलावले. ते म्हणाले, मी संध्याकाळपर्यंत येथेच थांबणार आहे. बरोबर जेवणाचा डब्बा आणला आहे. आपण मला तसे सांगितले होते. अजून बंधारा पूर्ण उंचीचा झालेला नाही. आपल्या समाजातील अशी ही नैष्ठिक माणसे ही आपली मोठी शक्ती आहे, त्याचीच एक झलक तेव्हा पहायला मिळाली.
धरणाच्या मागे डुबक्षेत्रात घनदाट जंगलात एक टुमदार गाव होते पेल्हार. त्याचे पुनर्वसन करावे लागणार होते. तेथे मोजणीदार पाठवून सर्व कुटुंबाची पाहणी करून त्यातील शिक्षित साक्षर तरूणांची यादी तयार केली गेली. बिरवाडीच्या प्राथमिक शाळेत ती शिकली होती. त्यांच्या त्यांच्या पात्रतेनुसार त्या सर्वांना पावसाळा सरताच कामावर नोकऱ्या दिल्या. त्यांचे भवितव्य प्रकल्पाच्या प्रगतीशी जोडले गेले. सारे गाव प्रकल्पाशी भावनिक दृष्टीने बांधले गेले. त्यांचे पुढे कायम सहकार्य मिळत राहिले. कोठेही कटूता न येता त्यांचे पुढे पुनर्वसनही नीट झाल्याचे कळले. स्थानिक लोकवस्तीचा निखळ सहभाग हीही भातसा प्रकल्पाची एक शक्ती होती.
पावसाळा सरण्यापूर्वी उरकायचे आणखी एक महत्वाचे काम होते. ते म्हणजे धरणाच्या स्त्रवणक्षेत्रात वैज्ञानिक निकषांप्रमाणे पुरेशा संख्येत पर्जन्यमापकांची स्थापना करणे. पहिल्या पावसाळ्यापासूनच क्षेत्रातील पावसाची व त्यातून धरणस्थळापर्यंत येणाऱ्या प्रवाहाची - पुराची नीट मोजणी सुरू झाली. जलउपलब्धीचे वार्षिक अहवालही तयार होवू लागले. मुंबई महानहरपालिकेने या धरणाच्या उभारणीसाठी पुढाकार घेतला होता व प्रकल्पाला प्रशासकीय मान्यताही मिळवली होती. पाणी उपलब्धतेच्या तपशीलावार छाननीनंतर लक्षात आले की प्रकल्प अहवालात मंजूर केलेल्या पाणी साठ्यापेक्षा येथे बराच अधिक साठा सहज शक्य होणार आहे. त्यामुळे मुंबईसाठी मंजूर केलेल्या पाण्याव्यतिरिक्त इतरही काही गरजा या अतिरिक्त पाण्यातून भागवता येणार आहेत. म्हणून मग त्या दृष्टीने धरणस्थळ ते मुंबई बेटापर्यंतच्या भूक्षेत्रावरील पाण्याच्या गरजांचा अभ्यास सुरू झाला.
उन्हाळ्यात मूळ भातसा नदीच जवळपास कोरडी होत असल्याने भातसा खोऱ्यातील शहापूर, वासिंद, सारख्या गावाच्या पिण्याच्या पाण्याची स्थायी व्यवस्था उभी होवू शकत नव्हती. नदी काठी सपाट शेते होती. पण पावसाळ्यानंतर आठ महिने केवळ कोरडे गवत तेवढे त्याच्यावर वाढलेले आढळले. या साऱ्या शेतांना सिंचनाचा आधार देणे व परिसरांतील सर्व गावांची पिण्याच्या पाण्याची विश्वासार्ह व्यवस्था उभारणे उपलब्ध पाण्यातून शक्य होते. पण त्यादृष्टीने प्रकल्पाची फेररचना होणे आवश्यक होते. मुंबई महापालिकेतील अभियंते श्री. मुळेकर त्यावेळी हा प्रकल्प पाहात होते. पुढे ते मुख्य अभियंता व महानगरपालिकेचे उप आयुक्तही झाले. त्यांच्या मनाचा व विचारांचा मोठेपणा असा की प्रकल्पांचे हस्तांतर त्यांच्याकडून पाटबंधारे विभागाकडे होणे किंवा नंतर प्रकल्पाच्या रचनेत महत्वाचे बदल करण्यात येणे याला त्यांनी दूरान्वयानेही विरोध तर नव्हेच नापंसतीही कधी व्यक्त केली नाही, उलट सहकार्यच केले. त्यामुळे विस्तृत भूक्षेत्राच्या व्यापक विकासाचा प्रकल्प म्हणून भातसाचे रूपांतरण शक्य झाले.
रूपांतरित भातसा प्रकल्पात जलविद्युत निर्मितीसाठी तरतूद करता आली. सिंचनासाठी विस्तृत क्षेत्र समाविष्ट करता आले. केवळ मुंबईला पाणी पोचवणे हे मर्यादित उद्दिष्ट प्रकल्पाचे राहिले नाही. प्रकल्पाची फेरआखणी मनांत पक्की झाल्यानंतर कोणातरी जाणकार व्यक्तीला ती दाखवावी म्हणून मी तडक कोयनेचे शिल्पकार चाफेकर साहेब यांना पुण्यात जावून भेटलो व माझ्याबरोबर एकदा विस्तारित प्रकल्पक्षेत्रात व धरणस्थळी येण्याची विनंती केली. 'केंद्रीय सेवा सोडून प्रान्तिक सेवेत ये व पाण्याच्या क्षेत्राकडे वळ' अशी दहा वर्षांपूर्वी मला प्रेरणा देणारे तेच होते. म्हणून प्रकल्पाचे व्यापक क्षेत्रीय स्वरूप त्यांना दाखवायचे ठरवले. कोणतेही आढेवेढे न घेता व औपचारिकतेच्याही काही अपेक्षा न करता ते अगदी सहजपणे आले. त्यांनी सर्व हिंडून तपासून पाहिले व प्रकल्पाला दिले जाणारे नवे वळण योेग्य असल्याचा असंदिग्ध निर्वाळा दिला. त्यामुळे माझा हुरूप वाढला.
मंत्रालयातील मुख्य अभियंता या नात्याने भातसा प्रकल्पाची जबाबदारी नातू साहेबांकडे होती. विश्व बँकेच्या आर्थिक सहाय्यासाठी स्वीकारलेल्या या प्रकल्पाला त्याच्या आखणीतील मुलभूत फेररचनेच्या चक्रात अडकून पडल्यामुळे दिरंगाई तर होणार नाही ना ही भिती त्यांच्या मनात असे. ते स्वत: मुळचे कल्याणचे रहाणारे. त्यामुळे मुंबईबाहेरील प्रदेशाच्या गरजांची चांगली जाण त्यांना होती. त्यामुळे प्रकल्पाच्या फेररचनेतील व्यापकता त्यांना पटे. अडचण होती ती विश्व बँकेच्या भूमिकेची. त्यांना पाठवलेल्या मुंबईला पाणीपुरवठा करावयाच्या भातसा प्रकल्पाच्या मूळ मंजूर अहवालाला डावलून वेगळ्या व्यापक रचनेचा अहवाल विश्व बँक कितपत स्वीकारणार ?
विश्व बँकेच्या कार्यपध्दतीतील कच्चेपणा या वेळी लक्षात आला. विश्वबँक स्वत: म्हणून काही प्रकल्पांचे अभ्यास, रचना, आखणी करीत नाही. त्यांचा सारा भार खासगी सल्लागारांवर असतो. युरोपीय व अमेरिकन पार्श्वभूमीचे सल्लागार यांचीच मुख्यत: बँकेच्या सल्लागार सूचीवर त्या काळात रेलचेल होती. त्यामुळे विश्वबँक जरी आंतरराष्ट्रीय सहकाराची व्यवस्था म्हणून तत्वश: उभी होती, तरी तेथील वैचारिक दिशा ही युरोपीय व अमेरिकी अनुभवांवर आधारित होती. विकासनशील देशांच्या वेगळ्या गरजांची पुरेशी जाण बँकेत निर्माण झालेली नव्हती. बिनी आणि पार्टनर्स हे भातसा प्रकल्पासाठी नेमण्यात आलेले विश्वबँकेचे सल्लागार मूलत: ब्रिटीश परंपरेतले. सिंचनाची व बहुउद्देशीय समाजिक प्रकल्पांची पार्श्वभूमी नसलेले. भातसा प्रकल्प मंडळ शहापूरला सुरू होण्यापूर्वीच त्यांचे कार्यालय मुंबईत चक्क मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर उघडण्यात आले होते. विश्वबँकेचा म्हणून असलेला दबदबा त्यांच्या पाठीशी होता. त्यामुळे त्यांनी प्रारंभिक अहवाल म्हणून मुंबईला पाणी देणारा म्हणून जो प्रकलाप अहवाल स्वीकारला त्यात बदल होत आहेत ही कुणकुण त्यांच्या कानी गेली तेव्हा ते चांगलेच विचलित झाले. याबाबतीत त्यांनी माझ्याशी खूप वादंगही घातले. पण मुख्य अभियंता नातू व माहाराष्ट्र शासन स्पष्टपणे माझ्या पाठीशी आहेत, हे हळूहळू त्यांच्या लक्षात आले. महाराष्ट्र शासनाने तर बहुउद्देशीय रूप घेतलेल्या परिवर्तीत भातसा प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मंजुरीही बहाल केली. तेव्हा ते खऱ्या अर्थाने काहीसे वरमले. त्यांचा चाणाक्षपणा मात्र असा की, विश्वबँकेला अंतिम प्रस्ताव देतांना त्यांनी या परिवर्तीत रूपाचेे जणू काही वैचारिक जनक तेच आहेत अशा अविर्भात त्या प्रकल्पाची टिपणी बनवली व विश्वबँकेत शेखी मिरवली.
मुंहई बाहेरच्या विस्तृत प्रदेशाचा त्यांनी सल्लागार म्हणून अभ्यास करायचा म्हणजे भारतीय सर्वेक्षण खात्याकडून त्यांना आवश्यक तेवढे सारे नकाशे उपलब्ध करून देणे गरजेचे होते. अशा नकाशांच्या प्रती शासकीय कार्यालयानांही सहजी मिळत नसत. त्यामुळे ते नकाशे मिळवून द्यायला काही वेळ लागेल, हे एका बैठकीत मी त्यांच्या लक्षात आणून देताच, त्यांच्या ब्रिटीश कार्यप्रमुखाने शांतपणाने त्याच्या पिशवीतील त्या सर्व नकाशांच्या प्रती बाहेर काढून पटलावर ठेवल्या. एव्हाना त्या मंडळींशी अनौपचारिक मैत्रीचे संबंधही निर्माण झालेले असल्याने तो सहजपणे बोलून गेला, ' आम्ही भारत काही आंधळेपणाने सोडलेला नाही. तुम्ही गोपनीय समजता ते हे सारे नकाशे मला दुसऱ्या स्त्रोतातून अगोदरच मिळाले आहेत.' मी चरकलो. मुळा प्रकल्पाच्या पायाबाबतच्या वादात फ्रेंच व स्वीस यांच्या एकांगी वरचढ प्रवृत्तीच्या वा त्याच्या दबावाखाली वावरणाऱ्या भारतीय व्यवस्थेचा अनुभव घेतला होता. आता तर जागतिक कल्याणाशी बांधिलकी सांगणाऱ्या व्यवस्थेचे म्हणजे विश्वबँकेचे सल्लागार प्रतिनिधी आपल्याच प्रभावाखाली सारी परिस्थिती निर्णायकपणे मुठीत ठेवू इच्छित होते.
त्यामुळे अखेरीस प्रकल्पाच्या सुधारित मांडणीचे श्रेय कोणाचे याचा वाद घालत न बसता, व सुधारित प्रकल्पातील वाढीव साठवण व उंची वाढविलेले दगडी धरण, सिंचनाचे कालवे, व जलविद्युत निर्मिती सयंत्र हे वगळून मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या मर्यादित घटकाचा तेवढा विश्वबँकेच्या अर्थसहाय्यासाठी अंतर्भाव करायचे ठरले व मुंबई महानगरीपुरता भातसा प्रकल्प मार्गाला लागला.
एव्हाना दोन वर्षात भातसा धरणाच्या पायाच्या मुख्य खोदाईला प्रारंभ झाला होता. धरणस्थळी स्वयंपूर्ण वसाहत आकाराला येत होती. धरणस्थळापर्यंत पक्का रस्ता झाला होता. छोट्या मोठ्या ठेकेदारांची वर्दळ वाढली होती. वन्यजाती प्रदेशातील हा मोठा खर्चिक प्रकल्प या दृष्टीने परिसरातील सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांचे प्रकल्पाकडचे लक्षही वाढले होते. प्रकल्पाबाबतच्या इष्ट अनिष्ट अशा अपेक्षाही वाढत चालल्याचे जाणवत होते. प्रकल्पाच्या शिस्तीप्रमाणे व कार्यपध्तीप्रमाणे प्रकल्प मात्र प्रगतीपथावर होता.
त्या काळात मा. खताळसाहेब राज्यमंत्री होते. त्यांच्या नाशिक मुंबई प्रवासात त्यांची शासकीय गाडी अचानक पणे शहापूरजवळ बंद पडली. त्यांच्याकडून निरोप येताच दुसरी पर्यायी गाडी देवून त्यांना मुंबईला रवाना केले. प्रकल्पाच्या यांत्रिकी उपविभागाला मंत्र्यांच्या गाडीची तातडीने दुरूस्ती करण्याच्या सुचना दिल्या, त्यासाठी बऱ्यापैकी खर्च आला. त्याची प्रकल्पाच्या लेख्यांमध्ये नोंद कशी घ्यायची ? 'तूर्त तो खर्च तात्कालिक उचल म्हणून दाखवा व देयक राज्यमंत्री कार्यालयाला पाठवा ' असे त्या उप विभागाला सांगितले. देयक जाताच राज्यमंत्री कार्यालयाकडून तात्काळ त्याचा परतावा आला. अशा गोष्टींचा अकारण बाऊ केला जातो, असे लक्षात आले.
शहापूरच्या स्थानिक खासदारांचा या दोन वर्षात चांगला परिचय झाला होता. अधूनमधून गाठीभेटी होत असत. त्यांनी वन्यजाती प्रदेशातील मागास मुलांसाठी वसतीगृह काढायचे ठरवले. निधिसंकलनासाठी ते माझ्याकडे आले. एक चांगला प्रकल्प म्हणून त्यांच्या मदतीसाठी म्हणून त्या संस्थेला मी व्यक्तीश: अल्पशी आर्थिक मदतही दिली. पण त्यांचा आग्रह पडला की, तसे करायला मी सर्व अधिकारी - कर्मचाऱ्यांनाही सांगावे व प्रकल्पावर काम करणाऱ्या ठेकेदारांकडे त्यांच्याबरोबर निधी संकलनासाठी हिंडावे. या दोन्ही गोष्टी करायला मी असमर्थता व्यक्त केली. ' सामाजिक जाणीव म्हणून व्यक्तिश: मला जे करणे इष्ट ते मी केले आहे पण माझ्या अधिकारपदाचा त्यासाठी उपयोग करणे हे माझ्या कर्तव्यकक्षेत किंवा शासकीय शिस्तीत बसत नाही. आपण तसा आग्रह धरू नका' असे त्यांना कितीही नम्रतापूर्वक सांगितले तरी ते माझ्या घरातून तणतणतच बाहेर पडले.
1968 च्या पावसाळ्याचे दिवस होते. तीन वर्षात मी एकही दिवस रजा म्हणून घेतली नव्हती. चाळीसगावला जावून आईवडिलांजवळ काही दिवस रहावे म्हणून मी रजा मागितली होती. 1967 च्या डिसेंबरमध्ये कोयना धरणाजवळ प्रलयंकारी भूकंप झाला होता. बरीच वाताहत झाली होती. प्राथमिक आवराआवरी नंतरची दीर्घकालीन व्यवस्था लावण्याचे कोयना प्रकल्पात प्रयत्न चालू झाले होते. त्यासाठी माझी नेमणूक कोयना प्रकल्पात करण्यात आली. शहापूरच्या स्थानिक वर्तुळात मात्र समज असा झाला, किंवा पसरवण्यात आला, की ही बदली स्थानिक राजकीय कार्यकर्त्यांनी घडवून आणली. जलविकासाची समग्र मांडणी कशी असावी याबद्दल दामोदर व्हॉली कॉर्पोरेशन, टेनेसी व्हॅली अथॉरिटी, यांची माहिती मी वाचली होती. त्या दिशेने महाराष्ट्रातील एका मोठ्या प्रकल्पाची आखणी करण्याची संधी मला भातसा प्रकल्पावर मिळाली हा आनंद घेवून मी त्या प्रकल्पातून बाहेर पडत होतो.
पूरक संदर्भ : सुवर्ण किरणे - पृष्ठ 51 ते 58
विज्ञानयात्री - माधव चितळे पृष्ठ 43 ते 47
डॉ. माधवराव चितळे, औरंगाबाद - मो : 09823161909