हरित क्रांतीचा हा सतत उत्पादन वाढीचा काळ एकविसाव्या शतकाच्या सुरूवातीला संपत आल्याचा अनुभव कृषी तज्ज्ञ व अर्थतज्ज्ञांना जाणवू लागला. सतत रासायनिक खतांचा, औषधे व पाण्याचा अमर्यादित उपयोग यामुळे जमिनी नापीक होवू लागल्या. अनेक जमिनी तर पूर्णपणे लागवडीस अयोग्य झाल्या. जमिनीतील ह्युमस नष्ट झाले. जमिनीची उत्पादकता कमी होवू लागली. शेतकर्यांचे जीवन अधिकाधिक प्रमाणात बाजारावर अवलंबून राहू लागले.
सन १९४७ साली हिंदुस्थानची फाळणी झाली व भारत हा एक स्वतंत्र देश म्हणून जन्माला आला. परंतु स्वातंत्र्याबरोबर दोन गहन प्रश्न निर्माण झाले. एक, लोकसंख्येची अदलाबदल व दोन, अन्नधान्याचा तुटवडा. गहू पिकवणारा पंजाब व तांदूळ पिकवणारा बंगाल हे पाकिस्तानात गेले. भारताला बराच काळ परदेशातून विशेषत: अमेरिकेतून अन्नधान्य आयात करावे लागले. १९६० च्या सुमारास कृषी क्षेत्रात एक क्रांतीकारी शोध लागला.मेक्सिको येथील कृषी शास्त्रज्ञ डॉ. नॉर्मन बोरलांग ह्यांनी जास्त उत्पादन देणार्या अन्नधान्याच्या नव्या जाती शोधून काढल्या विशेषत: गहू व तांदुळाच्या. त्याचप्रमाणे अधिक उत्पादन देणार्या ज्वारी व बाजरीचे मिश्र (हायब्रीड) वाणही शास्त्रज्ञांनी विकसित केले. नव्या वाणांना जास्त प्रमाणात पाणी व खते ह्यांची गरज लागते. ही गरज नवी धरणे, विहीरी, तलाव, रासायनिक खते, शासनाची नवी शेतकर्यांना लाभधायक धोरणे ह्यामुळे शेतमालाच्या विशेषत: अन्नधान्याच्या उत्पादनात प्रचंड वाढ झाली व एकेकाळचा अन्नधान्य आयात करणारा भारत अन्नधान्य निर्यात करणारा देश म्हणून जगप्रसिध्द झाला. हीच स्थिती हरित क्रांती म्हणून ओळखली जाते.
हरित क्रांतीचा हा सतत उत्पादन वाढीचा काळ एकविसाव्या शतकाच्या सुरूवातीला संपत आल्याचा अनुभव कृषी तज्ज्ञ व अर्थतज्ज्ञांना जाणवू लागला. सतत रासायनिक खतांचा, औषधे व पाण्याचा अमर्यादित उपयोग यामुळे जमिनी नापीक होवू लागल्या. अनेक जमिनी तर पूर्णपणे लागवडीस अयोग्य झाल्या. जमिनीतील ह्युमस नष्ट झाले. जमिनीची उत्पादकता कमी होवू लागली. शेतकर्यांचे जीवन अधिकाधिक प्रमाणात बाजारावर अवलंबून राहू लागले. पूर्वी खते, जंतुनाशके व बि बियाणे शेतकर्याला घरातच वा आसपासच्या परिसरात उपलब्ध होत होती. त्यासाठी रोकड पैशाची गरज नव्हती. परंतु हरित क्रांतीची अर्थव्यवस्था भिन्न होती. शेतीस लागणारी प्रत्येक वस्तू पैसे देवून बाजारातून विकतच आणावी लागली व त्यासाठी भांडवलाची जरूरी भासू लागली. बँक वा सावकाराकडून कर्ज घेणे अपरिहार्य झाले.
कर्ज फेडीसाठी कृषी उत्पादने बाजारात विकणे अपरिहार्य झाले. पण बाजारात व्यापार्यांनी केलेल्या कोंडीमुळे शेतकर्याला योग्य भाव मिळणे कठीण झाले. कर्जाचे हप्ते न भरल्याने शेतकर्यांना जमिनी विकाव्या लागतात व ह्या लाजीरवाण्या परिस्थितीमुळे अनेकांना आत्महत्या कराव्या लागल्या. थोडक्यात हरित क्रांती व बाजारमुखी कृषी अर्थव्यवस्था ह्यामुळे शेतकर्याच्या आत्महत्या वाढल्या व समाजात असंतोष वाढला. महाराष्ट्रातील पाऊसमानही बेभरंवशाचे आहे. दर तीन वर्षांनी अवर्षण व दहा वर्षांनी दुष्काळ अनुभवास येतो. ह्या परिस्थितीत अल्पभूधारक व कोरडवाहू शेतकर्यांची परिस्थिती अत्यंत गंभीर होते. कर्ज न फिटल्यामुळे जमिनी जप्त होतात. हे सर्व प्रश्न त्याला देशोधडीला लावतात. ह्या सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्याचा प्रयत्न विदर्भातील एक संशोधक वृत्तीचे व्यवहारी शेतकरी श्री. सुभाष पालेकर ह्यांनी बीन खर्चाची तथा झिरो बजेट फार्मिंग ही संकल्पना मांडली आहे.
कर्नाटक व तेलंगणा ह्या राज्यांनी ह्या प्रणालीस अधिकृत मान्यता दिली आहे व कैंद्र सरकारने पालेकरांना पद्मश्री देवून सन्मान केला आहे. पालेकरांच्या मते ते काही नवीन सांगत नाही आहेत तर परंपरेने व अनुभवाने सिध्द झाले आहे पण आज जे प्रचलित नाही पण जे उपयुक्त आहे त्याचाच ते प्रचार करत आहेत. काय आहे झिरो बजेट फार्मिंग ते आता पाहू.
झिरो बजेट फार्मिंग (झिपफा) :
दुष्काळ आणि शेतकर्यांच्या आत्महत्या हे दोन ज्वलंत प्रश्न विचारात घेवून शेती मशागतीची झिरो बजेट फार्मिंग ही योजना तयार केली आहे. तिची चार वैशिष्ट्ये आहेत -
१. कोरवाडू व अल्पभूधारक शेतकर्यांसाठी अधिक उपयुक्त, अल्पभूधारक शेतकर्याला बहुतेक वेळा पाण्याच्या टंचाईला तोंड द्यावे लागते. पाण्याचा थोडासाही ताण सहन होत नाही. झिरो बजेट फार्मिंगमध्ये विविध तर्हेने झाडाच्या मुळाशी ओलावा राहील ह्याची काळजी घेतली जाते.
२. शेतीची मशागत सुरू करतांना पैसे देवून बाजारातून कोणतीही वस्तू आणावी लागत नाही. म्हणूनच त्याला झिरो बजेट फार्मिंग असे म्हंटले आहे. उदाहरणार्थ बी बियाणे, खते, जंतुनाशके ह्या सर्व वस्तू शेतातच उपलब्ध होतात. देशी बियाण्याला प्राधान्य दिले जाते कारण ते परत वापरता येते. हायब्रीड बियाणे दरवर्षी नव्याने बाजारातून खरेदी करावे लागते व त्यासाठी रोकड पैशाची जरूरी रहाते आणि तो लहान शेतकर्याला उपलब्ध नसतो. देशी वाण अनेक वर्षे वापरात असल्याने सिध्द झालेले असेत. त्याची उत्पादकता निश्चित असते.
३. शेतीसाठी कमीतकमी पाणी लागते. त्यामुळे अवर्षणातही पीक तग धरू शकते.
४. झिरो बजेट फार्मिंग देशी गाय व तिच्यापासून मिळणारे शेण व मूत्र ह्यावर आधारित आहे. म्हैस वा अन्य प्राण्याचे शेण वा मूत्र देशी गाईपेक्षा कमी प्रतीचे आहे. गाय कशी निवडावी ह्याविषयी काही महत्वाच्या सूचना आहेत. विलायती गाईपेक्षा देशी गाय, दुभत्या गाईपेक्षा भाकड गाय, बैलापेक्षा गाय अधिक उपयुक्त आहे. अनुभव असा आहे की एका गाईच्या आधारे ३० एकर शेतीची मशागत करता येते. शेतकरी स्वावलंबी व स्वयंपूर्ण रहातो.
झिरो बजेट फार्मिंग हे पाच द्रव्यांवर अवलंबून आहे. ही द्रव्ये शेतकरी स्वत: आपल्या शेतात तयार करतो. त्यासाठी बाजारातून फार अल्प प्रमाणात वस्तू आणाव्या लागतात व ह्या वस्तू सर्वत्र उपलब्ध असतात. त्यासाठी येणारा खर्च अल्प असतो. ह्या द्रव्यांची नावे अशी - ही नावे वा त्यातील ही कॉपीराईट वा पेटंटेड नाहीत. ती सर्वांना खुली आहेत.
१. बीजामृत :
बी वा रोपे, ती लावण्यापूर्वी बीजामृतात काही काळ बुडवून ठेवावित व मग त्याची लागवड करावी. त्यामुळे बियाणे व रोपे ह्यांना जंतू संसर्ग होत नाही. पेरणीनंतर उगवण लवकर व जोरदार होते. हे बीजामृत शेतावरच तयार करता येते. एक एकरासाठी बाजीमृत तयार करण्यासाठी खालील वस्तू एकत्र करून द्रावण तयार केले जाते.
वस्तू यादी
१. पाणी - २० लिटर
२. देशी गाईचे शेण - ५ किलो
३. गोमुत्र - ५ लिटर
४. जमिनीवरील मूठभर माती
५. चुना - ५० ग्रॅम
२. जीवामृत :
एक एकरावरील पीकासाठी ६ वेगवगेळ्या वस्तू एकत्र करून द्रावण तयार केले जाते. हे द्रावण एका वेळेसाठी उपयोगी पडते. हे द्रावण झाडापाशी टाकले जाते. दर पंधरा दिवसांनी टाकणे जास्त उपयोगी ठरते. जमले नाही तर किमान महिन्यातून एकदा तरी टाकावेच. द्रावण हे खत नव्हे. झिरो बजेट तत्वज्ञानानुसार जमिनीत झाडाला आवश्यक ती अन्नद्रव्ये असतातच. जीवामृतामुळे जमिनीतील असंख्य जीवाणू उत्साही व चळवळी रहातात व त्यामुळे जमीन सछीद्र रहाते व जमिनीतील ती द्रव्ये झाडाला उपलब्ध होतात.
जीवामृतातील ६ घटक खालील प्रमाणात एकत्र केले जातात
१. पाणी - २०० लिटर
२. देशी गायीचे शेण - १० किलो
३. देशी गायीचे मूत्र - ५ ते १० लिटर
४. गूळ - २ किलो
५. डाळीचे पीठ - २ किलो
६. शेतातील मूठभर माती
३. मल्चिंग :
झाडाच्या बुडाशी असलेला ओलावा उडून जावू नये, त्याची वाफ होवू नये ह्या हेतूने झाडाच्या बुडाशी ओल्या झाडपाल्याचे आछादन केले जाते ह्यालाच मल्चिंग म्हणतात. झिरो बजेट फार्मिंगचा एक प्रमुख उद्देश हा आहे की कमीत कमी पाण्यात शेती करता आली पाहिजे. ह्या उद्देशपूर्ती साठी मल्चिंग आवश्यक आहे.
४. जंतुनाशके :
१. फंगिसाईड | १ (बुरशीनाशक -१) |
पाच दिवस आंबवलेले ताक | ५ लिटर |
पाणी | ५० लिटर |
२. फंगिसाईड | २ (बुरशीनाशक - २) |
देशी यायीचे दूध | ५ लिटर |
काळी मिरी पावडर | २० ग्रॅम |
पाणी | २०० लिटर |
३. ईनसेक्टीसाईड | १, (किटकनाशक - १) |
लिंबोणी वा लिंबोणी झाडाच्या पानाची पावडर | २० किलो |
४. ईनसेक्टीसाईड | २ (किटकनाशक - २) |
गायीचे शेण | ५ किलो |
गोमूत्र | १० लिटर |
कडू लिंबाची पाने | १० किलो |
पाणी | २०० लिटर |
५. ईनसेक्टीसाईड | ३ (किटकनाशक - ३) |
कडू लिंबाची पाने | १० किलो |
तंबाकू पावडर | ३ किलो |
आल्याचा ठेचा | ३ किलो |
हिरव्या मिरचीचा ठेचा | ४ किलो |
मिश्र पीक योजना व पिकांची चक्रगती :
नैसर्गिक शेतीत शेतात एकच एक पीक घेतले जात नाही. तर दोन तीन पिके एकाच वेळी घेतली जातात. पीकाच्या दोन ओळीत अंतर ठवले जाते व त्या रिकाम्या जागेत हरबरा, तूर, मूग ह्यासारखी जमिनीत नत्र निर्माण करणारी कडधान्ये वा भाजीपाला ह्यासारख्या पीकांची अंतरपीक म्हणून लागवड केली जाते, त्यामुळे एक पीक बुडाले तरी दुसर्या पीकापासून उत्पन्न मिळते. हा प्रयोग एका अर्थाने पीक विमाच होय.
सम्पर्क
डॉ. नीळकंठ बापट
औरंगाबाद, मो : ९३२५६१३९३६