भारतातील प्रसिद्ध नद्या : 1 - गंगा नदी

Submitted by Hindi on Sat, 07/29/2017 - 16:47
Source
जलसंवाद, जुलाई 2017

उत्तराखंड हायकोर्टाने गंगा नदीला कायदेशीर व्यक्ती असा सजीव व्यक्तीचा दर्जा दिला आहे. प्रदूषण मुक्तीच्या दृष्टीने उचललेले हे एक महात्वाचे पाऊल समजले जाते. २००७ साली जगात एक सर्व्हे केला गेला त्यात गंगा नदी ही जगातील पाचव्या क्रमांकाची प्रदूषित नदी म्हणून निर्देशित करण्यात आली आहे.

भारतातील हिंदू नागरिकांच्या दृष्टीने या नदीला फार मोठे धार्मिक महत्व आहे. म्हणूनच प्रत्येक माणूस आयुष्यात एकदा तरी या नदीचे दर्शन घेवून तिच्या पाण्यात स्नान करण्याचे स्वप्न बघत असतो. प्रामुख्याने ही नदी भारतातूून जरी वाहात असली तरी तिचा शेवट मात्र बांगला देशात झालेला आहे. या नदीचा उगम उत्तराखंड राज्यात पश्‍चिम हिमालय रांगातून झालेला आहे. नंदादेवी, त्रिशूल व कामेत या हिमशिखरापासून तिला पाणी मिळून ती समृद्ध बनते. अलकनंदा, धौलगंगा, नंदाकिनी, पिंडर, मंदाकिनी व भागीरथी या सहा नद्यांचे प्रवाह तिला मिळतात. ऋग्वेद काळात सिंधू व सरस्वती नद्या जास्त पवित्र मानल्या जात असत पण नंतरच्या तीन वेदात मात्र गंगा नादीला मानाचे स्थान प्राप्त झाले आहे.

भारताचा ऐतिहासिक कालखंड लक्षात घेता कनौज, कांपिल्य, कारा, प्रयाग, काशी, पाटलीपुत्र, हाजीपूर, मुंगेर, भागलपूर, नवद्वीप, सप्तग्राम, कलकत्ता व ढाका या राजधान्या या नदीच्या काठावर वसल्या आहेत. भारतातील उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्‍चिम बंगाल या राज्यांतून तिचा प्रवाह वाहात असून शेवटी ती बांगला देशात प्रवेश करते. तिथून बंगालच्या उपसागराला मिळते. पाण्याच्या उपलब्धतेबाबत जगातील नद्यांत तिचा तिसरा क्रमांक लागतो. घाटातून २५० किलोमीटरचा प्रवास करुन हरिद्वार येथे आल्यावर गंगा कॅनालमधे तिचे पाणी वळविले जाते व उत्तर प्रदेशाच्या दोआब भागात या पाण्याचा सिंचनासाठी वापर केला जातो. त्यानंतरच्या ८०० किलोमीटरच्या कनौज, फरुकाबाद व कानपूरच्या प्रवासात तिला रामगंगा प्रवाह मिळतो. अलाहाबादला आल्यानंतर तर तिला यमुना नदीचा प्रवाह मिळतो. तिथेच सरस्वती नदी गुप्त स्वरुपात अस्तीत्वात आहे असे समजले जाते म्हणून इथे त्रिवेणी संगम झाला असे मानले जाते.

गंगेला भरपूर उपनद्या आहेत. डावीकडून रामगंगा, गोमती, घाघरा, गंडक, कोसी, महानंदा तर उजवीकडून यमुना, तामसा, सोन व पुनपुन हे महत्वाचे प्रवाह मिळतात. ऋषिकेश, हरीद्वार, फारुकाबाद, कानपूर, जाजमाउ, अलाहाबाद, मिर्झापूर, वाराणशी, गाझीपूर, बक्सर, बालिगा, पाटना, हाजीपूर, मुंगेर व भागलपूर ही महत्वाची शहरे गंगातीरावर वसलेली आहेत. बांगला देशात शिरण्याचे आधी ती हुगळी नदीला मिळते. तिच्या प्रवाहावर नियंत्रण आणण्यासाठी तिथे फराक्का बॅरेजची उभारणी करण्यात आली आहे.

उत्तराखंड हायकोर्टाने गंगा नदीला कायदेशीर व्यक्ती असा सजीव व्यक्तीचा दर्जा दिला आहे. प्रदूषण मुक्तीच्या दृष्टीने उचललेले हे एक महात्वाचे पाऊल समजले जाते. २००७ साली जगात एक सर्व्हे केला गेला त्यात गंगा नदी ही जगातील पाचव्या क्रमांकाची प्रदूषित नदी म्हणून निर्देशित करण्यात आली आहे. यासाठी जी मर्यादा घालून देण्यात आली आहे तिच्या १०० पटीने ती जास्त प्रदूषित आहे असे आढळून आले आहे. तिचे हे प्रदूषण निव्वळ मानवालाच नाही तर पर्यावरणालाही मारक ठरत आहे. तिच्या सभोवताल असलेली लोकसंख्येची घनता, मानवी वापर, धार्मिक अंधश्रद्धेमुळे मृत शरीरांचे नदीत विसर्जन, जनावरांसाठी वापर, २९ शहरातील सांडपाण्याचे नदीत विसर्जन व औद्योगिक वसाहतीतील रासायनिक सांडपाणी, भ्रष्टाचार, तांत्रिक ज्ञानाचा अभाव,पर्यावरण नियोजनातील त्रुटी व धार्मिक संस्थांकडून असहकार्य ही प्रदूषणाची महत्वाची कारणे समजली जातात. सणांच्या दिवशी तर ७० लाख लोक या नदीत स्नान करण्यासाठी उतरतात.

या प्रदेशाचे मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण झाले असून कोळशावर चालणारी वीज निर्मिती केंद्रे, चामड्याचे उद्योग, रासायनिक उद्योग, कत्तल खाने, डिस्टिलरीज, दवाखाने या सर्वांचा परिणाम नदीतील पाण्याच्या गुणवत्तेवर होत आहे. पंतप्रधान राजीव गांधींच्या काळात या नदीच्या शुद्धीकरणावर फार मोठा खर्च झाला. पण होणाारी सुधारणा व त्यापेक्षा जास्त वेगाने होणारे प्रदूषण यांचेमधे संतुलन न झाल्यामुळे परिस्थितीत म्हणावी तशी सुधारणा झालेली नाही. आपले नवे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी तर गंगा शुद्धीकरणाचा ध्यासच घेतला आहे. त्यासाठी वेगळे मंत्री नेमून नमामी गंगा कार्यक्रम राबविण्यास सुरवात केली आहे. यासाठी २०१४ साली २०३७ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या प्रयत्नांना किती यश येणार हे काळच ठरवेल.

भारतातील प्रसिद्ध धरणे : 1 - भाकरा नानगल धरण


भारताचे पहिले पंतप्रधान श्री. जवाहरलाल नेहरु यांनी नव भारतातील तीर्थस्थाने म्हणून ज्याचा उल्लेख केला असे हे भाकरा नानगल धरण होय. हिमाचल प्रदेशातील सतलज नदीवर विलासपूर जिल्ह्यात हे धरण बांधण्यात आले आहे. खरे पाहिले असता भाकरा व नानगल अशी दोन स्वतंत्र धरणे आहेत पण या दोघांना जोडनावानेच संबोधण्यात येते. भाकरा धरणामुळे तयार झालेल्या जलसाठ्याला गोविंदसागर या नावाने संबोधिले जाते. या धरणाची उंची २२६ मीटर असून लांबी ५१८ मीटर एवढी आहे. या धरणामुळे निर्माण झालेला जलसाठा हा ९० किलोमीटरपर्यंत पसरलेला आहे. हा पसर जवळपास १६८.३५ चौरस किलोमीटर आहे. या धरणामुळे निर्माण झालेला जलसाठा ९.३४ दशलक्ष घनमीटर एवढा आहे. हे धरण बांधण्यासाठी १४ दशलक्ष क्यूबिक मीटर काँक्रीट लागले. इजिप्त मधील सर्वात मोठ्या पिरॅमिडला जेवढे मटेरियल लागले त्यापेक्षा हे दुप्पट होय. हे धरण पूर्ण करण्यासाठी ७० दशलक्ष मानवी तास लागले. यासाठी ९५ दशलक्ष टन माती हालवावी लागली. नानगल धरण सुद्धा याच नदीवर आहे पण विस्ताराने ते लहान आहे. ते बॅरेज धरण म्हणून ओळखले जाते.

हे धरण बांधण्याचे जरी १९४४ सालीच ठरले असले तरी प्रत्यक्ष काम सुरु होण्यासाठी १९४८ साल उजाडले. पूर्ण होण्यासाठी १९६३ साल उजाडले. या धरणाच्या उभारणीत पंजाब, राजस्थान व हिमाचल प्रदेश या राज्यांचा सहभाग आहे. सतलज नदीचे पूरनियंत्रण, सिंचन क्षेत्राचा विकास आणि वीज निर्मिती ही तीन उद्दिष्टये डोळ्यासमोर ठेवून या धरणाची उभारणी करण्यात आली. या धरणामुळे पर्यटन विकासालाही चालना मिळाली आहे. या् धरणामुळे १०दशलक्ष एकर एवढी सिंचन क्षमता निर्माण झालेली असून तिचा लाभ पंजाब, हरयाणा व राजस्थान राज्यांना पण मिळाला आहे. हा लाभ ३७ टक्के पंजाबला, ४७ टक्के हरयाणाला तर १६ टक्के राजस्थानला झालेला आहे. मुख्य कालवा १७४ किलोमीटरचा असून उपकालवे ११०४ व ३३६० किलोमीटरचे आहेत. या वाढीव सिंचनामुळे १.३ दशलक्ष टन जास्त धान्याची पैदास झाली. या धरणाच्या बांधकामामुळे ३७१ खेडी पाण्याखाली गेली पण त्यांचे पुनर्वसन करण्यात आले. इतका काल लोटून सुद्धा या कामात काही त्रुटी राहून गेलेल्या दिसतात.

वीज निर्मितीसाठी या धरणावर दोन विद्युतगृहे उभारण्यात आली आहेत. त्यापैकी एक जपानी कंपन्यांच्या मदतीने तर दुसरे रशियाच्या मदतीने उभारले गेले आहे. या दोनही केंद्रांची एकूण निर्मिती क्षमता ही १५०० मेगॅवॅट एवढी आहे. केंद्रांपासून ओढलेली लाईन जवळपास ३६८० किलोमीटर आहे. या मुळे राजपुरा, रामगढ, लुधियाना, पतियाला, नाभा, मोगा, फिरेजपूर, फाझिलका, फरिदकोट, मुक्तसार, जालंदर, होशियारपूर, कपूरथला, पठानकोट, अंबाला, पानिपत, हिस्सार, भिवानी, रावारी, रोहतक, काल्का, गुरगांव, दिल्ली इत्यादी शहरांना वीजपुरवठा होत असतो.