Source
जल संवाद
पुण्यामध्ये 87 इमारतींना जलसंधारणाच्या प्रयोगाबद्दल महापालिकेच्या करातून सवलत मिळालेली आहे पण प्रत्यक्ष हा प्रयोग राबविणाऱ्या केवळ 23 च वास्तू आहेत अशी माहिती पुढे आली. ही सर्व उदाहरणे फार बोलकी होती आणि उत्साह वाढविणारी होती.
19 सप्टेंबर 2010 रोजी 'भारतीय जलसंस्कृती' मंडळाच्या पुणे शाखेने 'माईर्स, एम.आय.टी.' पुणे या शैक्षणिक संस्थेच्या मदतीने पुणे येथे 'भूजल पुनर्भरण' या जिव्हाळ्याच्या विषयावर अर्ध्या दिवसाच्या कार्यशाळेचे आयोजन केलेले होते. रविवारचा दिवस, कौटुंबिक व स्वत:ची इतर कामे उरकण्यासाठी उरलेला अर्धा दिवस शिल्लक राहावा हा त्या पाठिमागचा हेतु होता. अलिकडे अशा कार्यक्रमासाठी फार कमी सहभाग मिळतो. पुणे शहरातच अनेक मंडळी आपल्या घराच्या गच्चीचा, बंगल्याच्या भोवतीच्या मोकळ्या जागेचा वापर करुन 'भूजल पुनर्भरणाचे' प्रयोग राबविलेल्या कांही घटना 'दैनिक सकाळ'च्या माध्यमातून माहिती झालेल्या होत्या. ज्या पुण्याची ओळख गरजेपेक्षा खूपच जास्त पाणी वापर करणारे शहर म्हणून झालेली आहे, त्याच शहरात कांही सूज्ञ मंडळी स्वत:च्या दारातच पाणी निर्माण करण्याचे यशस्वी प्रयोग राबवितात ही घटना फार महत्त्वाची ठरते.या प्रयोगांना प्रसिद्धी द्यावी, प्रयोग करणाऱ्यांचे कौतुक कराव जेणेकरुन इतरांनांही अशाच प्रकारच पाणी निर्माण करण्याची प्रेरणा मिळेल हा या कार्यशाळेचा प्रमुख हेतु. याबरोबरच, या विषयातील जी जाणकार मंडळी आहेत त्यांचे मार्गदर्शन लाभावे हाही उद्देश होता. कार्यक्रम अर्ध्या दिवसाचा, साध्या पद्धतीने करावा, खर्च नगण्य असावा, शाली, गुच्छ, जेवण, बॅगा यांना फाटा द्यावा हा संकल्प करुनच कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेस सुमारे 250 लोकांची उपस्थिती लाभली, यापैकी 100 महाविद्यालयीन विद्यार्थी होते. पुनर्भरणाच्या माध्यमातून आपण भूजल वाढवू शकतो आणि या पाण्याच्या वापरामुळे दूरवरुन पुरवठा होणाऱ्या पाण्यामध्ये बचत होऊ शकते. हे वाचलेले पाणी, पाण्याची चणचण असणाऱ्या भागात शेतीसाठी उपलब्ध होऊन अन्नध्यान्याच्या उत्पादनात भर घालते आणि ग्रामीण जीवनाचा आर्थिकस्तर ऊंचावण्यास कारणीभूत होते. या व्यापक दृष्टीकोनातून भूजल पुनर्भरणाचे कार्यक्रम शहरामध्ये, वस्त्यांवर, खेड्यामध्ये, शेतावर, शैक्षणिक, व्यावसायिक, औद्योगिक संकुलात आणि इतरत्र पण राबविण्याची गरज प्रतिपादण्यात आली.
कार्यशाळेत पुणे परिसरातील चार अनुभवी व्यक्तींनी राबविलेल्या भूजल पुनर्भरणाच्या, जलसंधारणाच्या प्रयोगाची मांडणी केली. डॉ.ग.ना.आचार्य यांनी घराच्या गच्चीवरील पाणी साठवून आपल्या पाण्याची गरज भागविल्याचे उदाहरण दिले. श्री. अनिल दामले यांनी त्यांच्या लॉ कॉलेज रस्त्यावरील उपहारगृहाच्या स्वच्छतेसाठी गच्चीवरील पावसाच्या पाण्याचा उपयोग करीत असल्याचे चित्रासह दाखविले. सौ. स्मीता पिंगे यांनी त्यांच्या सोसायटीच्या घरातील गच्चीवरील पाण्याद्वारे विंधन विहिरीचे पुनर्भरण केल्याचा प्रयोग नजरेसमोर आणला. वडगांव मावळचे श्री. संजीव सुळे यांनी गच्चीवरील पाणी साठवून त्याचा पिण्यासाठी देखील उपयोग केल्याचे उदाहरण लोकांपुढे आणले. पुण्यामध्ये 87 इमारतींना जलसंधारणाच्या प्रयोगाबद्दल महापालिकेच्या करातून सवलत मिळालेली आहे पण प्रत्यक्ष हा प्रयोग राबविणाऱ्या केवळ 23 च वास्तू आहेत अशी माहिती पुढे आली. ही सर्व उदाहरणे फार बोलकी होती आणि उत्साह वाढविणारी होती.
शेतातील पाणी शेतातच जिरवून शेतीतून उत्पादन वाढविणारी कांही उदाहरणे चर्चेमध्ये पुढे आली. शिरपूरचे श्री. सुरेश खानापूरकर आणि औरंगाबादचे श्री. विजय केडिया यांनी शेतावरील पाण्याचे संधारण करण्याऱ्या पद्धती विशद केल्या. भूजलाचा साठा हा अदृष्य स्वरुपात असतो, त्याला बाष्पीभवनाची झळ पोहोचत नाही, तुलनेने प्रदूषणापासून दूर राहतो आणि पाणी साठविण्यासाठी जमिनीच्या पृष्ठभागाचा वापर करत नाही. म्हणून पर्यावरणाला पूरक ठरतो. अशा अनेक फायद्यांमुळे भूजलात वाढ करणे हा सर्वांच्या नियमित कर्तव्यांचा भाग होण्याचा सूर कार्यशाळेतून पुढे आला. पुणे येथील 'माईर्स एम.आय.टी.' परिसरात भूजल पुनर्भरणाचा प्रयोग लवकरच राबविण्याचा संकल्प संस्थेचे संस्थापकीय अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथराव कराड यांनी व्यक्त केला. या अनुभवाच्या बोलातून, कार्यशाळेतून कांही संदेशवजा विचार, निष्कर्ष पुढे आले. ते खालीलप्रमाणे आहेत.
1. भूजल पुनर्भरणाद्वारे पुणे शहराची किमान 40 टक्के पिण्याच्या पाण्याची गरज भागते.
2. भूजल पुनर्भरणामुळे पावसाच्या स्वरुपातील सार्वजनिक पाणी भूजल स्वरुपात खाजगी होऊन त्याच्या वापरातून समाजात विषमता निर्माण होऊ नये यासाठी भूजलाच्या नियमनाची नितांत गरज आहे.
3. शहरांना पिण्यासाठी सार्वजनिक व्यवस्थेतून (महानगरपालिका, नगरपरिषद इ.) आवश्यक तेवढेच पाणी पुरवावे. लोक आपोआपच भूजल पुनर्भरणाच्या पद्धतीचा स्वीकार करतील.
4. शहरांमध्ये भांडे, कपडे व वाहने धुताना पाण्याचा अमर्याद वापर होतो. यावर लक्ष देऊन हा पाणीनाश टाळता येतो.
5. पाण्याची गुणवत्ता तपासणी व्यवस्था कमी खर्चाची आणि कमी वेळात पूर्ण होणारी असावी. त्यासाठी स्थानिक अभियांत्रिकी / विज्ञान महाविद्यालयांनी पुढाकार घ्यावा.
6. शेतीसाठी ठिबक व त्याही पुढच्या अत्याधुनिक सिंचन तंत्राचा वापर करावा आणि पाणी वाचवावे.
7. भूस्तरीय रचना वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी असल्यामुळे भूजल पुनर्भरणासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करणे गरजेचे आहे.
8. गणेश उत्सवासारख्या देखाव्यातून जलसंधारणाच्या प्रयोगाचा प्रसार करावा. या वर्षी शनिवारवाड्याजवळ 'साईनाथ मंडळाने' जलसंधारणाच्या देखाव्यातून लोकशिक्षण करण्याचा एक स्तुत्य कार्यक्रम हाती घेतला होता. त्याचे अनुकरण अन्यत्रपण व्हावे.
9. दररोजच्या पाणी वापरामध्ये (स्वयंपाक, स्नान इ.) कोठे बचत करु शकतो याचा विचार करुन बचत करावी.
10. विद्यार्थ्यांमध्ये पाण्याबद्दलची जागरुकता निर्माण करावी आणि त्यांचा अशा कार्यक्रमांमध्ये सहभाग वाढवावा.
11. समाजामध्ये जल जागरुकता निर्माण करण्यासाठी अशा प्रकारचे अनेक कार्यक्रम व्हावेत. नागरी व ग्रामीण भागासाठी वेगवेगळ्या सत्रांचे आयोजन व्हावे.
सम्पर्क
डॉ. दि. मा. मोरे, पुणे - (भ्र : 9422776670)