Source
जलसंवाद, ऑगस्ट 2017
(डॉ. दि. मा. मोरे हे एक ख्यातनाम जल अभियंता. संपूर्ण आयुष्य जलक्षेत्रात कार्यरत, त्याचप्रमाणे जलक्षेत्रातील एक चिकित्सक व संशोधक. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाला त्यांनी जलव्यवस्थापनातील पारंपारिक शहाणपण या विषयावर आपला संशोधनाचा प्रबंध सादर करून Ph.D ही पदवी संपादन केली. या शहाणपणातील काही कथा आपण अभ्यासल्या, या अंकापासून सदर मालिकेला आपण पूर्णविराम देत आहोत. )
१. लोककल्याणार्थ जलव्यवस्थापनाच्या पायाभूत सोयी या स्थिर, दीर्घकालीन, समृध्द आणि प्रजाहित दक्ष राजाच्या राजवटीतच निर्माण होतात. विकासासाठी स्थिर राजवट ही गरज आहे.
२. प्राचीन कालखंडात सार्वजनिक हिताच्याच साधनांची, (तलाव, बंधारे, कालवे, बारवा, कुंड, विहीरी, पुष्करणी इ.) निर्मिती झाली.
३. मध्ययुगीन कालखंडात मुस्लीम राजवटीत पाण्याचा वापर, जीवन जास्त सुखालोलूप व चैनीचे (स्नानगृहे, हमाम, कारंजे, उद्याने, वातानुकूल महाल, शहरी पाणी पुरवठा इ.) करण्यावर भर देण्यात आला.
४. प्राचीन आणि मध्ययुगीन कालखंडात, जलव्यवस्थापन लोकप्रवण होते.
५. ब्रिटीश कालावधीत जलव्यवस्थापन हे शासन प्रणीत केले गेले.
६. स्वातंत्र्योत्तर भारतात ब्रिटीश कार्यप्रणालीचाच कित्ता गिरविला गेला.
७. भुईकोट किल्ल्यातील भूजल आधारित पाणी व्यवस्थेचा मुख्य आधार खंदक होते. खंदक हे पुनर्भरणाचे एक साधन म्हणून वापरले गेले. किल्ल्याचे संरक्षण करण्यासाठी पण ( Water for defence) खंदकाचा वापर होत होता.
८. गाव व शहर यासाठी पण खंदकाचा (Moat) वापर पुनर्भरणाचे साधन म्हणून होत होता.
९. बारवा, विहीरी, पुष्करणी, आड याां पुनर्भरणाची व्यवस्था प्रथम करण्यात येत होती. आधी पुनर्भरण मग (विंधन) विहीर हेच सूत्र या साधनांना लावण्यात आल्याचे स्पष्ट होते. त्याचा आज विचार करणे गरजेचे आहे.
१०. गाव तेथे गावतळे, शेत तेथे शेततळे व वाडा तेथे आड याद्वारे पाण्याची शाश्वती निर्माण करण्यात आली.
११. पाण्याचा उपसा व पुनर्भरण याचे गणित प्रत्येक ठिकाणी (गाव, पाणलोट, उपखोरे, खोरे) बसविण्याची नितांत गरज आहे.
१२. तलावाचे आयुष्य हे प्रदीर्घ असते. काही तलाव हजार वर्षापेक्षा जास्त कालापूर्वीचे आहेत. पैकी काही आजही कार्यक्षम आहेत.
१३. मोठी जलाशये (४५००० हेक्टर पोटात घेणारे) निर्माणकरण्याची परंपरा फार पुरातन आहे.
१४. पावसाच्या दोलायमानतेवर मात करण्यासाठी व अधिकतम लाभासाठी जल नियोजनात कमी विश्वासर्हता हे तत्व स्वीकारून तलावाचे आकार मोठे ठेवण्याच्या परंपरेचे अनुकरण करण्याची गरज आहे.
१५. वाळूवर बंधारे बांधण्याचे शास्त्र पारंपारिक आहे. ते अवगत करून राज्याच्या तत्सम भागात (पूर्णा तापी खोरे) त्याचा वापर करण्याची गरज आहे.
१६. पाणी उचलण्यासाठी पवनचक्की (Wind mill) , रहाट गाडगे (Persian Wheel), मोट, हैड्रोलिक रॅम अशा स्थानिक ऊर्जा साधनांचा (Local energy devices) वापर करण्याची गरज आहे.
१७. पारंपारिक ऊर्जा स्त्रोत म्हणून बैल, घोडे, उंट, मनुष्यशक्ती इत्यादींचा वापर हल्लीच्या विज्ञानयुगातही चालू ठेवणे हीतकारकच आहे.
१८. तलावातील गाळ उपभोगकर्त्याने नियमितपणे काढून तलावाची धारण क्षमता टिकविण्याचीपरंपरा होती. ती आज मितीस चालू ठेवण्याची गरज आहे. साचलेला गाळ जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी व कुंभार या बलुतेदाराला व्यावसायिक आधार म्हणून देण्यासाठी वापरला जाण्याची प्रथा होती. गाळ कुंभाराने उपसून न्यावा हे अपेक्षित होते.
१९. गावातील तलावाची स्वच्छता ही गावकरीच राखत असत.
२०. विहीर, आड व गावतलाव हीच साधने गावाला पिण्याच्या पाण्यात स्वयंनिर्भयता देत होती. म्हणून पाणी पुरवठ्याच्या मोठ्या व्यवस्था (Mega schemes) अप्रस्तुत ठरतील का अशी भिती व्यक्त होत आहे. नळ योजना हा ग्रामीण पाणी पुरवठ्याचा विश्वसनीय आधार होवू शकत नाही म्हणून ग्रामीण पाणी पुरवठ्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहण्याची गरज आहे.
२१. आर्थिक दृष्ट्या पेलवतील, परवडतील, सामाजिकदृष्टीने स्वीकारार्ह ठरतील, पर्यावरणाच्या दृष्टीने सातत्य टिकवून ठेवतील अशाच व्यवस्थांची निर्मिती करावी.
२२. पाण्याची किंमत ही उपभोगकर्त्यांना परवडणारी असणे गरजेचे आहे. त्याची परिपूर्तता त्यांच्याकडून करून घेणे हे व्यवस्थेला कार्यक्षम ठेवण्याचे व त्यात सातत्य आणण्याचे दृष्टीने आवश्यक आहे.
२३. पाणी व्यवस्थापनाची साधने ही कमीत कमी देखभाल दुरूस्ती करावी लागणारी व हाताळण्यास सोपी असण्याची गरज आहे. सामान्य माणसाला ती सहजपणे वर्षानुवर्षे हाताळता आली पाहिजेत.
२४. पाणी व्यवस्थापनाच्या योजना कार्यक्षमपणे हाताळण्याची ताकद समाजामध्ये निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवणे गरजेचे आहे.
२५. शासनकर्त्याची भूमिका ही प्रवर्तक व प्रेरक म्हणून राहील. प्रत्यक्ष निर्मिती मध्ये शासनाने कर्ता किंवा व्यवस्थापक म्हणून भूमिका कधीही घेतली नाही, आणि तशी न घेणे चांगले आहे.
२६. पाणी हे लोकांचे आहे. त्यांना त्याचा अधिकार वापरू द्यावा. शासनाने हळूहळू आपले अंग बाजूला काढून लोकांना त्यांचे पायावर उभे राहण्यास प्रोत्साहन द्यावे. लोक हे पाण्याचे अंतिम उपभोक्ते आहेत. मग ते पाणी शेतीचे असो, घरगुती वापराचे असो, पर्यावरणाचे साठी असो, ऊ र्जा निर्मितीसाठी असो वा अन्य प्रयोजनासाठी असो.
२७. अधिकाधिक जमिनीला पाणी व अधिकतम गरीब जनतेला पाणी हे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवण्याची गरज आहे.
२८. ज्या व्यवस्थेमध्ये प्रशासनावर, योजनेच्या नियोजनाचा, बांधकामाचा व व्यवस्थापनाचा, भाग असतो तेथे लोकसहभाग मिळत नाही.
२९. जल व्यवस्थापनात महिलांचा सहभाग महत्वाचा ठरतो. त्यांना या क्षेत्रात महत्वाच्या भूमिका देण्याची गरज आहे.
३०. पाणी हे सामुहिकरित्या हाताळली जाणारी वस्तू आहे म्हणून त्याची जबाबदारी वैयक्तिक न ठेवता समुहावर ठेवावी, पाणी वाटपात लोकशाही आणण्याची गरज आहे.
३१. लोक सहभागातून परिणामकारक पाणी वापर हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्याची गरज आहे.
३२. लोकांना सतत शासनाधार देवून पंगू बनवू नये.
३३. पाणी व्यवस्थापनात सवलतीचे तत्व अग्रभागी असू नये. पाण्याचा नियमित व निश्चित पुरवठा हीच मोठी सवलत ठरू शकते.
३४. पाण्याचे एकात्मिक रीतिने नियोजन व व्यवस्थापन होणे गरजेचे आहे. सुट्या सुट्या पध्दतीने प्रश्न गंभीर होतात.
३५. पाण्याचे मोठे साठे, लहान साठे, पाणलोट क्षेत्र विकासाची साधने ही एकमेकांस पूरक ठरतात. त्याचा एकत्रितपणे विचार करण्याची भविष्यात गरज आहे.
३६. पाणी हाताळण्यात पाण्याविषयी प्रेम, आदर, भावनिक जवळीक व ते स्वच्छ ठेवण्याची व्यवस्था आदी बाबीला प्राधान्य देण्याची गरज आहे.
३७. उपभोगकर्त्याची मानसिकता, रूची, कल जाणून घेवूनच त्याच्यासाठी योजना निर्माण कराव्यात.
३८. पाण्याचा पुनर्वापर हे पाण्याच्या परिणामकारक वापरासाठी आणि पर्यावरण संतुलन राखण्यासाठी अत्यावश्यक आहे.
३९. शहरी, ग्रामीण उद्योगासाठी पाणी पुरवठा हा बंद पाईप मधूनच करण्याची गरज आहे. उघड्या कालव्यातून, नदीतून केला जाणारा पिण्याचा पाणी पुरवठा आरोग्याला हानिकारक ठरतो व पाण्याची स्वच्छता राखणे खर्चिक ठरते. पाण्याचा र्हास होतो.
४०. पाण्याची जुनी साधने (तलाव, विहीरी, बारवा इत्यादी) लोकांच्या भावना जागवून टप्प्प्या टप्प्याने त्या पुनरूज्जीवित करून वापरात आणणे गरजेचे आहे. पारंपारिक अनेक जल व्यवस्था अल्पसा खर्च करून कार्यान्वित होवू शकतात. त्या दृष्टीने कार्यवाही होण्याची गरज आहे.
४१. नवीन जल व्यवस्थाची आखणी जुन्या पारंपारिक व्यवस्था विचारात घेवून, त्याचे पुनरूज्जीवन करून एकात्मिक पध्दतीने करावी. नवीन आराखड्यात जुन्याला पण स्थान द्यावे.जुन्याला विसरू नये. त्याला उध्वस्त करू नये. जुन्या व्यवस्थेचा विचार करून उर्वरित परिणामासाठीच नव्या व्यवस्थेचे नियोजन करावे.
४२. पाणी व्यव्सथापनातील यशस्वितेचे गमक तुमच्याकडे किती पाणी उपलब्ध आहे यात नसून उपलब्ध पाणी किती परिणामकारक पध्दतीने तुम्ही वापरता यावर आहे.
४३. खोरे, उपखोरेनिहाय पीक पध्दती ही पाणी उपलब्धतेलसा अनुकूल अशी ठरविण्याची गरज आहे.
४४. जल विकासात व व्यवस्थापनात लोककौशल्याला पुरेपूर वाव देण्याची आवश्यकता आहे. हे लोककौशल्य शिक्षण व प्रशिक्षणाद्वारे वाढविण्याची गरज आहे. यातून निर्माण होणार्या जलव्यवस्था या कमी खर्चाच्या व परवडणार्या असतील,
४५. पाणी व्यवस्थापनामध्ये समन्यायी वाटप पध्दती रूजविण्याची आत्यंतिक गरज आहे. सामाजिक व आर्थिक विषमता कमी करण्याच्या दृष्टीने हे गरजेचे आहे.
४६. जमिनीला जमीन (Land for land) या तत्वाच्या ही पलीकडे जावून भूमिहिनांना (बलुतेदार) पण प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात जमीन देवून विस्थापितांना सामाजिक न्याय देण्याची गरज आहे.
४७. प्रकल्पग्रस्तांना प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात कालव्याच्या सुरूवातीच्या भागात (Head reach) जमीन देवून प्रकल्पग्रस्त हा पहिला लाभधारक आहे हे कृतीत उतरविण्याची गरज आहे.
४८. प्रकल्पग्रस्तांना पुनवर्सित भागात नवीन तलाव बांधून सिंचनाची सोय करून देण्याची गरज आहे.
४९. पाणी वाटपातील तंट्यासाठी लोक न्यायालये, लोक पंचायती निर्माण करण्याची जबाबदारी उपभोक्त्यावर टाकणे गरजेचे आहे.
५०. शहरीकरणावर मर्यादा आणण्याची आवश्यकता आहे. पाणी पुरवठा व तत्संबंधित व्यवस्थेवरील ताण कमी करण्यासाठी हे गरजेचे आहे. पेलवतील इतक्या आकाराची लहान लहान शहरे निर्माण करावीत.
५१. कृषी आधारित व अकृषी उद्योगाची वाढ व विस्तार ग्रामीण भागात करावा.
५२. पर्यावरण संतुलनासाठी प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा वापर सिंचन, उद्याने, कारंजे इत्यादी विकसित करण्यासाठी करावा. सांडपाणी प्रक्रिया व पाणी पुरवठा याचे एकत्रित नियोजन करावे.
५३. जलवाहतुक अल्पखर्ची असल्यामुळे ती वाढविण्याची गरज आहे. सिंचन कालव्याचा पण यासाठी वापर करावा. लोकमनोरंजनासाठी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी पण याचा वापर करावा.
५४. पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनच्या वाटेवरील गावांना पण पाणी पुरवठा करावा.
५५. पाणी मोजून द्यावे व पाण्याची किंमत घ्यावी.
५६. शहरीकरणाचा विस्तार हा पडीक व नापीक जमिनीवरच करण्यात यावा.
५७. शेतीयोग्य जमीन अन्य अकृषी उपयोगासाठी वापरली जावू नये.
५८. पाणी व इतिहास, पाणी व संस्कृती, पाणी व निती, पाणी व विकास इत्यादी क्षेत्रांचा एकात्मिक विचार होण्याची गरज आहे. केवळ पाणी व अभियांत्रिकी यांनीच प्रश्न सुटू शकत नाहीत.
५९. इतिहासकालीन वास्तूची ताकद त्या वास्तूच्या रचनेतील सारखेपणामध्ये (Symmetrical structure) आहे. या तत्वाचे अनुकरण करावे.
६०. पारंपारिक सर्व जलव्यवस्थेचे ऐतिहासिक वारसा व पूर्वजांनी दिलेली ठेव म्हणून जतन करावे.
६१. जलव्यवस्थापनेतील या देशाचा गौरवशाली इतिहास पुढच्या पिढीच्या लक्षात राहण्यासाठी व त्यातून सातत्याने मार्गदर्शन घेण्यासाठी याचा अभ्यासक्रमात अंतर्भाव करावा. संशोधन करणार्यांची पिढी निर्माण करावी, त्याला राजाश्रय, समाजाश्रय द्यावा.
६२. जलव्यवस्थापनेतील या गौरवशाली परंपरेचे विविध माध्यमाद्वारे (दूरदर्शन, रेडीओ, कार्यशाळा, परिषदा, किर्तन, प्रवचन इ.) समाजाचे, सामाजिक संस्थांचे, जाणकारांचे सतत संप्रेषण करावे.
६३. केवळ पाणी या विषयाला वाहिलेले एक स्वतंत्र जलविद्यापीठ असावे.
डॉ. दि. मा. मोरे , पुणे, मो : ०९४२२७७६६७०