पाण्याचा समृध्द वारसा

Submitted by Hindi on Thu, 09/29/2016 - 15:22
Source
जल संवाद

नाशिकजवळ गोदावरीच्या काठी ओढा नावाचे एक ऐतिहासिक लहान गांव आहे. गावाला वेस आहे, बुरुज आहेत, एक जूनी गढीपण आहे. माझे कुतुहल त्या गावात जाऊन त्या गढीमध्ये इतिहासकाळात पाण्याची कोणती व्यवस्था होती याचा शोध घेण्यांत होते. गावात जाण्याचा योग आला. ती गढी उंचावर आहे. पांढऱ्या मातीच्या टेकडीवर वसलेली आहे. साधारणत: परिसर एक एकरापेक्षाही जास्त मोठा असावा. चारही बाजुंनी किल्ल्यासारखी तटबंदी आहे.

भारत देशाला इतिहासाची व्यापक बैठक आहे आणि या देशाला समृध्द असा पाण्याचा वारसा लाभलेला आहे. याचे पुरावे पदोपदी आपल्याला पाहावयास मिळतात. हे पुरावे शिलालेखाच्या स्वरुपात असतील, भोतिक सांगाड्याच्या स्वरुपात असतील, वा लिखीत व शब्दबध्द स्वरुपात असतील. योगायोगाने हजारो वर्षांपासूनचे पाणी व्यवस्थापनाचे जमीनीवरील पार्थीव सांगाडे अनेक ठिकाणी चांगल्या स्थितीत आहेत तर कांही कार्यरत / जिवंत आहेत.

पाणी हा समृध्दीचा स्त्रोत आहे. एकेकाळी हा देश समृध्द होता. कांही शतकांपूर्वी तर या देशात सोन्याचा धूर निघत होता असे म्हटले जाते. हा देश खेड्यांचा आहे, शेतीचा आहे. या शेतीला समृध्दी आणण्यास कारणीभूत असलेल्या पाण्याच्या व्यवस्थापनातील कौशल्याचा मात्र अद्याप मागोवा घेण्यात आला नाही. ही इतिहासलेखनातील उणीव जाणवते. पाणी व्यवस्थापनातील तंत्र, त्यातील सामाजिक आशय जाणून घेऊन व त्याची सूत्र बध्द पध्दतीने मांडणी करुन पुढच्या पिढीला त्याचे संप्रेशन करण्याची गरज का भासली नाही हे एक कोडेच आहे. थोडक्यात, इतिहासाच्या विपूल लेखनात पाण्याचा म्हणजेच विकासाचा इतिहास अंतर्भूत झाला नाही.

इ.स. 2000 साली ' भारतीय जलसंस्कृती मंडळाची ' ' पाणी ' या विषयाचा ऐतिहासिक मागोवा घेण्याच्या उद्देशाने स्थापना झालेली आहे. याच मंडळाची पुणे येथे (एम.आय.टी. पुणे) 2006 साली एक शाखा उघडण्यात आली. पुणे शाखेचा, विशाल अशा पुणे नगरीत पाणी आणि पाण्याचा इतिहास यावर प्रेम करणाऱ्या, या विषयाबद्दल जिव्हाळा बाळगणाऱ्या, आपुलकी ठेवणाऱ्या, अभ्यासकांना, विचारवंतांना, एकत्र आणण्याचा एक लहानसा प्रयत्न आहे. दिनांक 28 जून 2009 चे चर्चासत्र हे या दिशेने टाकलेले पहिले पाऊल आहे.

पाण्यातून समृध्दी हा धागा आपणास वेरुळच्या कैलास लेण्यात दिसतो. तुडुंब जलाशयात कमलासनावरील लक्ष्मीस गजराज स्नान घालतो, हे शिल्प पाण्यातून संपत्ती, पाण्यातून समृध्दी, पाण्यातून विकास याचे दिग्दर्शन करते. गरीब, दुबळा समाज वेरुळ, अजिंठा, पितळखोरे, कान्हेरीसारख्या अप्रतिम लेण्या, सुंदर शिल्प याची निर्मिती करु शकत नाही. ही समृध्दी त्या त्या काळात त्या समाजाला पाण्यातून, जमिनीतून, पर्वतरांगातून मिळालेली असणार. आपण शिल्पाच्या सोंदर्याकडे पाहतो, त्याचे गुणगान करतो, पण त्यातून दिल्या जाणाऱ्या संदेशाकडे डोळेझाक करतो. कारण तो संदेश शोधून काढण्याची दृष्टी आपल्या जवळ नसते. दरिद्री समाजव्यवस्था उन्नतीच्या भराऱ्या मारु शकत नाही.

भले तो समाज कितीही विद्वान, ज्ञानी असेल. समाजाच्या उन्नतिसाठी, भौतिक प्रगतीसाठी संपत्तीचे, समृध्दतेचे महत्व नाकारुन चालत नाही. हा धडा आपण इतिहासातून घेतला पाहिजे. देशात अशी ऐतिहासिक पाणी व्यवस्थापनाची ठिकाणे हजारोंनी आहेत. महाराष्ट्रातच 350 च्या वर डोंगरी किल्ले आहेत. या व इतर ठिकाणी पाणी व्यवस्थापनात वेगवेगळे कौशल्य, वेगवेगळे तंत्र उत्तमपणे त्या भागातील, प्रदेशातील हवामानाशी, सामाजिक व्यवस्थांशी, गरजांशी निगडित असे हाताळलेले आपणास दिसते. एका खोऱ्यातील पाणी दुसऱ्या खोऱ्यात नेणे, नदी वळविणे, पाण्याची स्वच्छता राखणे, त्याचे बाष्पीभवनापासून संरक्षण करणे या प्रकारचे अनेक घटक विचारात घेऊन पाण्याला योग्य त्या प्रकारे खेळवून त्यातून त्या त्या वेळच्या समाजजीवनाची गरज समर्थपणे भागविण्यात आलेली आहे. हे आपणास या वस्तुनिष्ठ पुराव्यावरुन दिसून येते.

नाशिकजवळ गोदावरीच्या काठी ओढा नावाचे एक ऐतिहासिक लहान गांव आहे. गावाला वेस आहे, बुरुज आहेत, एक जूनी गढीपण आहे. माझे कुतुहल त्या गावात जाऊन त्या गढीमध्ये इतिहासकाळात पाण्याची कोणती व्यवस्था होती याचा शोध घेण्यांत होते. गावात जाण्याचा योग आला. ती गढी उंचावर आहे. पांढऱ्या मातीच्या टेकडीवर वसलेली आहे. साधारणत: परिसर एक एकरापेक्षाही जास्त मोठा असावा. चारही बाजुंनी किल्ल्यासारखी तटबंदी आहे. आत पूर्णपणे पडझड झालेली आहे. कोणीही रहात नाही. ओढेकर देशमुख त्या गढीचे मालक हे फार दिवसांपूर्वीच नाशिक येथे आले आहेत असे समजले. त्या गढीचा वापर गाव सध्या शौचालय म्हणून करते. आतील उध्वस्त अवशेष पाहत असतांना एका ठिकाणी थांबलो, खूप आनंद झाला. एक सुंदर अशी वीटकामात बांधलेली विहीर दिसली. आडापेक्षा थोडी मोठी. गढीतले पावसाचे सर्व पाणी भोवताली मुरणार आणि अशा रितीने या आडाचे पुनर्भरण होणार. आत राहाणाऱ्या लोकांना वर्षभर पाणी पुरणार अशी ही व्यवस्था आहे.

नाशिकच्या पश्चिमेकडे आनंदीबाईंचा गोदाकाठी आनंदवली नावाचा किल्ले वजा वाडा होता. आज सगळे काही उध्वस्त झालेले आहे. ओढ्याच्या गढी प्रमाणेच. गोदाकाठीचा हा वाडा उंचावर आणि पांढऱ्या मातीवर भग्न अवस्थेत जुन्या काळचे अवशेष दाखवत उभा आहे. वाड्याला पाणी पुरवठा करण्यासाठी त्या काळात नेमकी काय व्यवस्था होती हे शोधण्याचा एके दिवशी प्रयत्न झाला. नदी जरी खेटूनच असली तरी पूर्वीच्या काळीसुध्दा नदीचे पाणी पिण्यासाठी शक्यतो सरळपणे वापरले जात नसे. प्रदूषणामुळे आज तर त्याचा विचार पण करणे शक्य नाही. नदीचे पाणी भूगर्भातून पाझरवून विहिरींमध्ये घेण्याची व झेलमोटेने पाणी वाड्यात उचलण्याची सोय केलेली असणार हे बाहेरच्या रचनेवरुन लक्षात येते.

इतिहासकालीन वास्तू, त्या कितीही पडझड झालेल्या असल्या तरी त्या ठिकाणचे अवशेष त्या काळातील, त्या ठिकाणच्या पाणी व्यवस्थापनेवर बराचसा प्रकाश टाकण्यास मदत करतात. ती वास्तू बोलते. तेथील अवशेष बोलतात. सर्व इतिहास सांगतात.

गुजरातमधील पाटणची राणीची बारव, भोपाळचा भोज तलाव, राजस्थानमधील जैसलमेर किल्ला, हिमालयातील झऱ्यावरील सिंचन, 150 वर्षांचा गंगेचा कालवा, तुंगभद्रेच्या काठावरील ऐतिहासिक हंपी शहरातून जाणारे दगडी अस्तरीकरण केलेले आणि आजपण कार्यरत असलेले 600 वर्षापूर्वीचे जुने कालवे, तापी खोऱ्यातील फड पध्दतीचे बंधारे, तंजावरचा कावेरीचा कालवा, देवगिरीचे वर्षा जलसंचयाचे साधन, मदुराई येथील मिनाक्षी मंदीराच्या छतावरील जलसंचयाचा प्रयोग, नळदूर्गचा जलमहाल, सासवड येथील जाधवरावांच्या गढीतील छतावरील जलसंचयाचा उत्कृष्ट नमुना, कऱ्हेच्या काठावरील बाजीराव पेशव्यांच्या मस्तानीचा महाल, दिवेघाटातील मस्तानी तलाव, वैनगंगेतील गौंडकालीन तलाव, फलटणचा पाण्याचा खजिना, कोल्हापूरचा करवीर जलसेतू, औरंगाबादच्या नहरी, कोकणातील तलावातील आड, त्र्यंबकेश्वर मंदीर परिसरातील छतावरील जलसंचय करणारी पुष्कर्णी, रांजणगाव येथील गणपती मंदीराच्या छतावरील जलसंचयाचे उदाहरण, नवीन निर्माण झालेल्या छत्त्तीसगढ राज्याची राजधाणी रांची परिसरातील तलाव आणि नागरी वस्तीतील टेकडीवरील आड, पुण्याजवळील कात्रजच्या पलीकडील बनेश्वराचे कुंड, नगर येथील चांदबीबी महालाच्या पर्वताच्या आजुबाजुची जलसंधारणाचे तलाव, पुणे येथील कात्रजचे तलाव व त्यातून निघणाऱ्या नहरी ते थेट शनिवार वाड्यातील हजारी कारंज्याला पाणीपुरवठा, सिंहगडावरील देवटाके, रायगडचा खाणीतून निर्माण केलेला गंगासागर, जगातील सर्वात जुन्या अशा नालंदा विद्यापीठ परिसरातील पिण्याच्या पाण्याचे आड अशी अनेक मोजता येण्यापलिकडच्या ठिकाणांचा उल्लेख करता येईल. या देशातील जवळजवळ प्रत्येक ऐतिहासिक गावात, महालात, किल्ल्यात, पाण्याचा वारसा सांगणारी साधने आपल्याला पाहावयास मिळतात. या पाहणीतून खूप काही कळते. वास्तुच्या जवळ गेल्यानंतर नकळत त्याच्या पाठिमागे दडलेले कौशल्य शोधता येते. जोधपूर, दिल्ली, जुन्नर, विजापूर, औरंगाबाद, इत्यादी नगरांना पाण्याची विद्यापीठेच म्हणावे लागेल.

या पाहणीतून असे दिसून आले की या निर्मितीमागे सामुहिक प्रयत्नांच्या माध्यमातून निर्माण झालेला शहाणपणाचा हात आहे. या व्यवस्था लोकांनी निर्माण केलेल्या आहेत आणि लोकांनी जपलेल्या आहेत. त्यामध्ये सामाजिक विषमता बोथट करण्याचे सामर्थ्य होते. त्या त्या काळातील पाण्याचे प्रश्न सोडविण्याची ताकद त्यात दडलेली आहे. पुनर्भरण हा जलव्यवस्थापनेचा गाभा आहे. यावर इतिहासकालीन जलव्यवस्था उभी ठाकली आहे. त्याला विसरुन चालणार नाही हा आवाज त्यातून बाहेर आलेला आहे. अनेक उपयुक्त संदेश पाण्याच्या इतिहासाच्या अभ्यासातून बाहेर पडतात. त्याचा मागोवा आजच्या काळात घेणे चुकीचे ठरणारे नाही. ही सर्व जुनी साधने पुनश्च कार्यान्वित करुन वापरता येतील असा दावा करण्याचे धाडस कुणीही करणार नाही. पण या साधन निर्मितीमागचे कौशल्य, शहाणपण, आणि त्यातून मिळणारा संदेश हा शास्वत स्वरुपाचा असणार. यातून आजच्या घडीला जे शिकणे आवश्यक आहे ते शिकावे आणि यासाठी हा सर्व प्रपंच मांडलेला आहे. एकाच विहिरीवर जवळजवळ 2500 एकर सिंचन गेल्या शेकडो वर्षांपासून अविरतपणे करणारी व्यवस्था बीड येथील अतितूटीच्या क्षेत्रात खजाना विहिरीच्या रुपात आपणास पाहावयास मिळते. शनिवार वाड्यात अनेकांचे मनोरंजन करणारे आणि जलगती शास्त्रातील एक आश्चर्य म्हणून संबोधले जाणारा हजारी कारंजा हा पुणे नगरीतलाच. या साधनांना जगात तोड नाही असे म्हटले तर अतिशोयक्ती म्हणू नये आणि वृथा अभिमानही मानला जाऊ नये हीच अपेक्षा.

या व्यापक स्वरुपातील पाण्याच्या इतिहासाचा आपल्याला अभिमान आहे आणि त्यात वावगे काही नाही. पण आपल्याला या केवळ गुणगौरवातच गुरफटून जायचे नाही. आजचे युग हे विज्ञान युग आहे. या इतिहासकालीन पाणी व्यवस्थापण वैज्ञानिक तत्वावरच आधारलेल्या आहेत. या तत्वाचा आताच्या आधुनिक जीवनात कसा उपयोग करुन घेता येईल यावर चिंतन होण्याची गरज आहे. हे दुर्लक्षित झालेले पाण्याचे सांगाडे सिंचनाचे तलाव, गाव तलाव, झरे, बारवा, आड, विहिरी हे आधुनिक तंत्रज्ञानाचा व प्रचलित नियमाचा उपयोग करुन पुनरूज्जीवीत करता येतील का, हे ही तपासायला हवे.

आत्ताच्या काळातील पाणलोटक्षेत्र विकासाच्या उपक्रमात या साधनाचा अंतर्भाव कसा करता येईल हे पण पडताळून पाहिले पाहिजे. ही बहुतांशी साधने ग्राम पंचायतीच्या परिसरात येतात. 73 व्या व 74 व्या घटना दुरुस्तीने ग्राम पंचायतींना तालूका व जिल्हा परिषदेंना स्वतंत्र असे अधिकार दिलेले आहेत. त्या अधिकाराचा वापर या साधनाला जिवंत करण्यासाठी या स्थानिक स्वराज्य संस्था कशा प्रकारे करु शकतील या बाबतचेही प्रबोधन होण्याची गरज आहे. इतिहासाचा तपशील, त्याचे वाचन हा एक आवडीचा भाग म्हणून एका मर्यादेपर्यंत ठिक राहील. पण आपल्याला त्याच्याही पुढे जावयाचे आहे. या साधनाची भौगोलिक ठिकाणे आत्ताच्या विकासाच्या आराखड्याशी अनुकुलच राहतील. बार्शी तालूक्यातील पाणगांव या गावाच्या मध्यभागी असलेले ऐतिहासिक अष्टकोनी तलाव चार-एक वर्षांपूर्वी ग्रामीण विकासाच्या माध्यमातून पुनरूज्जीवीत करण्याचा प्रयत्न झाला. त्यापासून त्या गावातील आडांच्या पाण्याची पातळी वाढण्यात नेमका काय परिणाम झाला हे ही जाणून घेणे महत्वाचे राहणार आहे.

इतिहास आणि आधुनिक काळ यांची सांगड घालून समाजाचे पाण्याचे प्रश्न सोडविण्याकामी काही पावले पुढे टाकता येतील का याची शहानिशा करण्याची गरज आहे. आहे त्या व्यवस्था केवळ सुरक्षित ठेवण्याच्या पलिकडचा टप्पा आपण गाठण्याची गरज आहे. या साधनाची जपणूक ही निश्चितपणे व्हावयास पाहिजे पण त्याच बरोबर पुनुरुज्जीवीत साधनांचा उपयोग समाज बांधणीसाठीपण होण्याची गरज आहे. या दृष्टीने विचाराची देवाण-घेवाण व्हावी. पाण्याची स्वच्छता हा एक कळीचा मुद्दा आहे. आधुनिक युगात चालत असताना या विषयात आपण नापास झालो आहोत. पाणी नदीतील असो वा विहिरीतील, त्याची स्वच्छता राखण्यात आपण कमी पडलो आहोत. हाही विषय इतिहासाचे भान ठेवत आपणास हाताळावयाचा आहे. या सारख्या प्रश्नांनी गंभीर स्वरुप घेतलेले आहे. पण मार्ग काढावा लागणार आहे. त्या त्या राजवटीतील लोकांची सांघिक शक्ती या जलसाधनाच्या पाठीमागे उभी टाकलेली होती. आज माणसे एकट्या दुकट्यानीच विचार करत आहेत. जलव्यवस्थापनातली अतिशय गुंतागुंतीचे प्रश्न (पाण्याचे प्रदूषण, पाणी मोजणी, पाण्याचे वाटप इ.) लोकप्रणित, सांघिक व्यवस्थेतूनच सुटणार आहेत. पाण्याच्या इतिहासातून आपण हे का शिकू नये ?