वारसा पाण्याचा - भाग 6

Submitted by Hindi on Thu, 12/03/2015 - 11:33
Source
जल संवाद

भारत ऐतिहासिकदृष्ट्या स्थिर झालेला खंडप्राय देश आहे. स्थैर्याच्या या प्रक्रियेसाठी त्याला अनेक स्थित्यंतरातून जावे लागले. ज्या पर्यावरणाशी त्याला संघर्ष करून हे स्थैर्य प्राप्त करावे लागले, त्या पर्यावरणाच्या घटकाची या ठिकाणी तोंड ओळख करून देण्याचा प्रयत्न केला आहे.

भारत ऐतिहासिकदृष्ट्या स्थिर झालेला खंडप्राय देश आहे. स्थैर्याच्या या प्रक्रियेसाठी त्याला अनेक स्थित्यंतरातून जावे लागले. ज्या पर्यावरणाशी त्याला संघर्ष करून हे स्थैर्य प्राप्त करावे लागले, त्या पर्यावरणाच्या घटकाची या ठिकाणी तोंड ओळख करून देण्याचा प्रयत्न केला आहे. ऐतिहासिक जलव्यवस्थापनेतून संप्रेषित होणारे कौशल्य या विषयावरील अभ्यासाचे सरळ सरळ दोन भाग पडतात -

1. इतिहासाच्या प्रदीर्घ वाटचालीमध्ये निर्माण झालेल्या जलव्यवस्थापन पध्दती व
2. या पध्दतीची कौशल्याकडे होणारी वाटचाल, कौशल्य निर्मिती मागे अनेक शतकांचा कालावधी व अनेक पिढ्यांचे प्रयत्न कारणीभूत झालेले आहेत आणि अंतिमत: निर्माण झालेले कौशल्य, साकार झालेली व्यवस्था, त्यामागच्या कौशल्याचे संप्रेषण करते. निसर्गावस्थेत पाण्याची उत्पत्ती प्रथम आणि त्याच्या आधाराने मानवाची वस्ती ही नंतर झालेली आहे.

एकंदर सामाजिक स्थैर्यासाठी पाणी हा अत्यंत आवश्यक घटक आहे. या अर्थाने पृथ्वी हा ग्रह वेगळा आहे. याच ग्रहावर मुबलक पाणी आहे. या पाण्यातूनच जीवसृष्टी निर्माण झालेली आहे. म्हणून पाणी म्हणजे जीवन असे म्हणणे यथार्थ ठरते. मानवाचा व इतर प्राणीमांत्रांचा सर्व प्रवास पाण्याच्या आधाराने झालेला आहे. त्यांनी साध्य केलेले सांस्कृतिक उच्चांक, त्यांनी केलेली लहान मोठी युध्दे ही सर्व पाण्याच्या साक्षीने झालेली - केलेली आहेत. भारतीय इतिहासाच्या परिवर्तनाच्या दृष्टीकोनातून सर्व प्रमुख युध्दे रामायण महाभारत व त्या नंतरची युध्दे पण यमुना नदीच्या साक्षीने झालेली आहेत. म्हणजे एका यमुना नदीचा मागोवा घेण्याचा आपण प्रयतन केला तर तिच्या खोऱ्यामध्ये भिन्न काळात निर्माण झालेल्या जलसंसकृतीचे यथार्थ दर्शन घडते. रामायण महाभारत काळापासून ते आजपर्यंत निर्माण झालेल्या वसाहती त्यांच्या जलजीवनाचे दर्शन, जलजीवनात झालेले चढउतार हे यमुनेच्या खोऱ्यामध्ये आजही स्पष्ट स्वरूपात पाहावयास मिळतात.

सामान्यत: कोणत्याही समाजात शेती, शेतीआधारीत व इतर उद्योग, पिण्यासाठी व पर्यावरणासाठी वर्षभर पाणी लागते. सिंचनाचा प्रयोग जमिनीच्या छोट्या आकारमानातून जास्तीत जास्त उत्पन्न काढण्यासाठी केला जातो. हे तत्कालीन समाजाच्या लक्षात आल्यावर त्या समाजाने पाण्याच्या शोधाचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या असे लक्षात आले की, पर्जन्य हा सर्व स्त्रोतांचा पिता आहे, जनक आहे. तथापि पर्जन्याबद्दल निश्चित स्वरूपाने असे काहीही सांगता येत नव्हते - नाही. त्यामुळे पर्जन्य नेहमी अनुकूल असावे अशी समाजधारणा झाल्यास वेगळे वाटण्याचे कारण नाही. त्यामधूनच अवर्षणाच्या कालखंडात पर्जन्याचे महत्व अनन्यसाधारण वाढले आणि समाज जीवनातील पाण्याचे स्थान उंचावले जावून त्याला अंतरिक्षातील दैवताचे स्वरूप प्राप्त झाले. दैवतेचा कोप नको म्हणून त्यांची स्तुती केली जावू लागली.

त्याला नैवेद्य अपर्ण केले जावू लागले. मानवी स्वभावानुसार पर्जन्याला देवता समजून त्याला वश करून घेण्याचा अविरत प्रयत्न सुरू झाला व आजपण तो बऱ्याच ठिकाणी दिसून येतो. त्याचे प्रतिबिंब आपणास साहित्यात पण उमटलेले दिसते. वेदात पण पर्जन्य हा स्वतंत्र विषय आहे आणि पर्जन्याला दैवत समजून त्याची स्तुती केलेली आढळते. पर्जन्याबरोबरच पर्जन्याचा स्वामी वरूण आणि पर्जन्य सूचकाची वर्णने आढळतात. वरूणाचा स्वामी इंद्र हा जेव्हा देवांचा राजा झाला, तेव्हा तो सर्व जलसंपत्तीचा स्वामी झाला म्हणून इंद्राला देवाधिदेव असे संबोधन प्राप्त झाले. थोडक्यात समाजाचे आणि पाण्याचे नाते समाजात पाण्याला असलेले आदरयुक्त स्थान आपोदैवोभव: हे वेदातून स्पष्ट होते. याच कालखंडात भूपृष्ठावरील दृष्य पाण्याबरोबरच भूपृष्ठांतर्गत पाण्याचा, सामाजाने एकूण समाज धारणेसाठी, वेध घेण्याचा प्रयत्न केलेला जाणवतो.

निसर्गातील सर्व व्यवस्थेसाठी उपलब्ध होणारे पाणी हे केवळ वर्षातून एकदाच मर्यादित कालावधीत भारतात उपलब्ध होते. ते केवळ जास्तीतजास्त चार महिने उपलब्ध होवू शकते. चार महिन्यानंतर पाण्याची गरज कशी भागवता येईल या विवंचनेतून जलनियोजनाची, जलसंवर्धनाची व जलव्यवस्थापनाची संकल्पना आली. या त्रिसूत्रीतून पुढे स्थिर झालेल्या समाजाला 365 दिवस आणि 24 तास पाणी उपलब्ध करून देणे ही एकूणच समग्र प्राणीमात्रांच्या अस्तित्वाची गरज ठरली.

त्यामुळे कशा पध्दतीने जलसंवर्धन केल्यास वरील गरज भागू शकते, यांचा निरनिराळ्या वसाहतीने, मानवी समाजाने त्या त्या परिसरातील पर्यावरणाच्या अनुषंगाने विचार करण्यास - कृती करण्यास सुरूवात केली. वारा हा पर्जन्याचा वाहक आहे. त्यातून मौसमी वाऱ्याचा म्हणजेच पावसाचा अभ्यास होवू लागला आणि सखोल अभ्यासानंतर ते खालील निष्कर्षास पोहोचले.

1. मान्सूनचा पाऊस अनिश्चित असतो
2. तो वर्षाच्या ठराविक कालखंडातच पडतो
3. तो केव्हा, कुठे आणि कसा येईल यांच्या बद्दल ठोस अंदाज सांगता येणे कठीण आहे
4. त्यांचा अंदाज वर्तवण्यासाठी पहिल्यांदाच सूत्रबध्द असे पंचांग तयार केले व त्या आधारावर कृषी अधिष्ठित समाज रचना हळूहळू आकार घेवू लागली. निसर्गातील ग्रह, तारे, व त्याची विज्ञानावर आधारित हालचाल, गतिमानता व त्यातून होणारे नियमित पर्यावरणीय बदल या सर्वांना गणितीय पध्दतीने मानवी आकलनात आणण्याचा शास्त्रशुध्द प्रयत्न पंचागांच्या माध्यमातून हळूहळू विकसित होत गेला. कालौघात त्यांना मोसमी पावसाचे वेळापत्रक उत्तम पध्दतीत मांडता येवू लागले आणि नेमेचि येतो मग पावसाळा या निष्कर्षाप्रत ते पोहचले. म्हणजे अनिश्चिततेकडून होणारी वाटचाल शेकडो वर्षाची ठरली आणि त्यामधून कृषी समाज आकारास आला. या रचनेत काही बिघाड झाल्यास पर्यायासाठी पशुपालनाचा मोठा आधार मानवी समूहाने हाताशी ठेवला होता.
5. सर्व भारतभर हा समाज सारख्या परिस्थितीतून जात नव्हता कारण पर्यावरणीय दृष्टीकोनातून भारताचे अनेक विभागात वर्गीकरण होते. अतिपर्जन्यापासून पर्जन्यविरहीत क्षेत्र तसेच हिमाच्छादित प्रदेशापासून वाळवंटी भाग या पर्यावरणीय घटकात हे वर्गीकरण मोडते. भौगोलिक दृष्टीकोनातून 8 अक्षांशापासून 36 अक्षांशापर्यंत येणाऱ्या भिन्न भौगोलिक पट्ट्यामध्ये भारताचा भूभाग विस्तारला असल्यामुळे नैऋत्य मान्सून वारे या मौसमी वाऱ्यांच्या टापूत येणारा पुष्कळसा भूभाग या पर्यावरणीय गटात अंतर्भूत झालेला आढळतो. त्यामुळे प्रत्येक विभागाला त्यांना अनुकूल होईल अशा जलव्यवस्थेची भिन्न कालखंडात आवश्यकता भासत होती. म्हणून वेगवेगळ्या समाज समूहांनी आपल्या जलविषयक गरजांची पूर्तता करण्यासाठी स्थानिक लोककौशल्यावर आधारित स्वतंत्र जलव्यवस्थापनाची पध्दती कार्यान्वित केली. हजारो वर्षांपूर्वी कार्यरत होवून त्या त्या काळच्या समाज व्यवस्थेला प्रगतीच्या, समृध्दीच्या शिखरावर पोहचविणाऱ्या व त्यापैकी काही आजही कार्यरत असलेल्या व्यवस्था पुढील विवेचनावरून आपल्या दृष्टीपटलासमोर येतात.

कौशल्य म्हणजे काय ? ते जलसंधारण क्षेत्रामध्ये कसे निर्माण होते याचा विचार केला पाहिजे. जलव्यवस्थापन या शब्दप्रयोगात व्यवस्थापन, जलसाठवण, जलनियोजन इ. बाबी अंतर्भूत आहेत असे समजण्यास काही हरकत नाही. एखाद्या निर्मितीमधील सुबकता, सुलभता, वैज्ञानिकता व उपयुक्तता अंतर्भूत करण्याच्या प्रक्रियेला कौशल्य असे म्हणणे चुकीचे ठरू नये. थोडक्यात कल्पनेच्या, विवेकाच्या, चिंतनाच्या व वास्तविकतेच्या बळावर समाजातील कोणत्याही घटकाला हे कौशल्य आत्मसात करता आले पाहिजे व हे त्यांचे मुख्य सूत्र असावे. जलव्यवस्थापनामध्ये तत्सम समाजाला आवश्यक असणारे पाणी, आवश्यक त्या ठिकाणी आणि अपेक्षित काळात व अपेक्षित मात्रेत उपलब्ध करून देणे याला जलव्यवस्थापनातील कौशल्य असे मानले जाते.

पाणी हे पर्जन्याची देणगी आहे आणि वर विवेचन केल्याप्रमाणे भारतीय पर्जन्यामध्ये निश्चित प्रमाणात अनिश्चितता अधिक जाणवते. कधी महापूर तर कधी दुष्काळ हे अतिवर्षण आणि अवर्षणाचे चक्र याशिवाय वाजवी पेक्षा जास्त विलंब, ताण, दोन्ही मौसमात (खरीप आणि रब्बी) पुरेसा पाऊस न पडणे, अपेक्षेप्रमाणे न पडणे, वेळेवर न पडणे ही अनिश्चितता टाळण्यासाठी नियोजनबध्द पध्दतीने जलसंधारण व जलव्यवस्थापन करणे ही काळाची गरज ठरली असे म्हणणे संयुक्तिक आहे. पर्यावरणीय क्षेत्र टोकाचे विषम असल्याने त्या त्या क्षेत्रात उपयुक्त अशा जलसंधारण व जलव्यवस्थापनाच्या पध्दतीचा विकास करणे, त्या काळाच्या कसोटीवर उपयुक्त आणि व्यवहार्य असणे, यांची काळजी घेणे, त्याचे संगोपन करणे व हे सर्व लोकसहभागातून करणे व याची समाजाला जाण असणे आवश्यक होते. लोकातूनच निर्माण झालेले कौशल्य व ते लोकधारणेसाठी सातत्याने वापरण्यासाठी लोकप्रणित व्यवस्था हा या जलव्यवस्थेचा गाभा ठरत गेला.

भिन्न स्थळांच्या भेटीवरून असे स्पष्ट होते की संबंधित लोकांनी शेकडो वर्षाच्या प्रयत्नातून यशापयशातून अशाप्रकारे सर्वकालिक व व्यावहारिक पध्दती शोधून काढल्या व वापरात आणल्या. जीवनात समृध्दी आणली. हळूहळू त्यांचा प्रसार केला. शतकानुशकताच्या अथक प्रयत्नातून निर्माण झालेल्या पध्दती कोणाही एका व्यक्तीच्या अथवा घटकाच्या नव्हत्या. त्यामध्ये सर्व समाजाचा सहभाग होता. निर्मितीपासून ते दैनंदिन वापरापर्यंत यामध्ये कोणत्याही सामाजिक घटकाने आपली संबंधित तंत्राबद्दलची नापसंती दर्शविल्याचे दिसत नाही. काळाने एका राजवटीतून दुसऱ्या राजवटीत पाऊल टाकले तेव्हा देखील जलव्यवस्थापनातील या व्यवस्था टिकून पाहिल्या, त्यातील कौशल्यात सातत्य राहिले. काळाच्या ओघात त्या वैज्ञानिक कसोटीला उतरल्या. म्हणूनच तिची उपयुक्तता कालौघात सर्वांनाच पटली होती. सर्वांनी तिचे जतन, संवर्धन व वितरण करण्यात स्वत:ला धन्य मानले. यामधूनच ही लोक कौशल्ये आजपर्यंत काही ठिकाणी आपल्या पूर्णक्षमतेने कार्यरत असल्याचे संशोधनाच्या भेटी अंती जाणवले.

भारताचा इतिहास शोभादर्शक यंत्रामध्ये दिसणाऱ्या मनोवेधक आकृती सारखा आहे. सामान्यत: त्यांचे तीन कालखंडात वर्गीकरण केले जाते. इतिहास पूर्व कालखंड, प्रागैतिहासिक कालखंड व ऐतिहासिक कालखंड. आजपर्यंतच्या इतिहासाच्या वाटचलीत तुलनात्मकदृष्ट्या इतिहासपूर्व कालाने अधिककाळ व्यापलेला आहे. तथापि या कालावधीत पाण्याच्या व्यवस्थापनाविषयी निश्चित काही भाष्य करता येत नाही. कारण या कालखंडामध्ये त्या समाजाचा अधिक काळ अन्न गोळा करण्याच्या शोधात भटकण्यामध्ये जात असल्याचे दिसते.

या कालखंडाच्या शेवटच्या पर्वात जेव्हा मानवाने अन्न शोधण्याऐवजी अन्न निर्मिती करण्याच्या टप्प्यामध्ये प्रवेश केला तेव्हा त्यांच्या वसाहतीना काहीसे स्थैर्य आले आणि आत्तापर्यंत झालेल्या पुरातत्वीय उत्खननामधून हे स्पष्ट झाले आहे की त्या वेळच्या समाजाने पाणथळाच्या परिसरात आपल्या वसाहती निर्माण केल्या. जो पर्यंत हा समाज कृषिक्षम अवस्थेमध्ये होता तो पर्यंत त्यांची पाण्याची गरज नैसर्गिक पाणथळावर अवलंबून होती. परंतु ज्या दिवशी त्यांनी आपले भटके जीवन संपवले आणि कृषिप्रधान अशा जीवनास प्रारंभ केला त्यावेळेस त्यांना पाण्याची निश्चित गरज निर्माण झाली आणि क्षेत्रनिहाय जलसंचय प्रक्रियेस त्यांनी आरंभ केला. या कालखंडास प्रागैतिहासिक कालखंड म्हणतात. सिंधू संस्कृती, मोहोंजोदडो, धोलविरा ही याची संप्रेषित उदाहरणे म्हणता येतील.

इसवी सन पूर्वी सुमारे 3000 वर्षांपूर्वी सिंधू नदीच्या खोऱ्यात ही संस्कृती होवून गेली. इसवी सन पूर्व 3000 च्या काळात नाईल नदीच्या काठी इजिप्शियन संस्कृतीचा उदय झाला. इसवी सन 2500 पूर्वी चिनी संस्कृती उदयास आली. इसवी सन पूर्व 1500 पर्यंत ग्रीक संस्कृती उदयास आली होती. इसवी सन पूर्व 500 वर्षांपासून रोमन संस्कृतीचा इतिहास आहे.

इसवी सन पूर्व 1500 च्या सुमारात हिंदू धर्म स्थापन झाला. इसवी सन पूर्व सहाव्या शतकामध्ये गौतम बुध्दाने बौध्द धर्म स्थापन केला. इसवी सन 500 मध्येच चीनमध्ये चिनी तत्वज्ञ कोंनफ्युशियस याने कोंलफ्युशियानिझम हा धर्म स्थापन केला. सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी ख्रिस्ती धर्म स्थापन झाला. इसवी सन सातव्या शतकात इस्लाम धर्म स्थापन झाला.

रामायण काळातील दक्षिणेतील पंपा सरोवर आणि भारतात अनेक ठिकाणी उपलब्ध असलेली राम सीतेची कुंडे / स्नानगृहे (दगडात कोरलेले टाके) आपणास आजही पहावयास मिळतात. महाभारत कालीन ब्रम्हसागर (कुरूक्षेत्र), कर्ना सागर (कर्नाल), शुक्रतल (हस्तिनापूर) तेर या ठिकाणचे कुक लेकुंड, परळी येथील मेरू तलाव हे आजसुध्दा पहावयास उपलब्ध आहेत. त्या त्या काळच्या समाजाच्या गरजा भागविण्यासाठी या पाण्याच्या साठवणीच आहेत.

महात्मा गौतम बुध्दापासून म्हणजे इ.स.पूर्व 5 व्या 6 व्या शतकापासून पुढच्या कालखंडाचे काही प्रमुख टप्पे व त्या कालखंडात निर्माण झालेल्या काही प्रमुख जलव्यवस्थापनाच्या साधनांची यादी संक्षिप्तपणे खालीलप्रमाणे करता येईल.

जल संवाद इ. स 1294 ला देवगिरीच्या यादवांचा पराजय झाला आणि या देशावर परकियांची सत्ता आली. यादवांचे साम्राज्य नर्मदा नदीच्या दक्षिणेकडे विस्तारले होते. नर्मदेच्या उत्तरेकडे 6 व्या व 7 व्या शतकात राजा हर्षवर्धनचा कालखंड होता. तत्पूर्वी गुप्त राजवटीने राज्य केले. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण आले. साधारणत: यादवांचा आणि पृथ्वीराज चव्हाण यांचा अस्तकाल हा 100 वर्षाच्या फरकाने समकालीन ठरतो. पृथ्वीराज चव्हाणचा पराजय मोहम्मद घोरीकडून झाला. या कालखंडानंतर या देशावर प्रदीर्घ काळ प्रामुख्याने मुघल आणि ब्रिटीशांची सत्ता नांदली. मुघल राजवटीने जवळ जवळ 200 वर्ष राज्य केले.

ब्रिटीशांची सत्ता ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून 1757 पासून ते 1857 पर्यंत (बंगालच्या प्लासीच्या लढाईपासून) आणि इंग्लंडच्या राणीच्या वर्चस्वाखाली 1857 ते 1947 पर्यंत या देशावर राहिली. यादवांनंतर दिल्ली येथून खिलजी, तुघलक, बहामनी व मुघल असा तो कालखंड पुढे सरकतो. या तेराव्या शतकाच्या दारूण पराभवानंतर तीन राजवटींनी या देशाचा इतिहास वेगळेपणाने घडविला. त्यातील उत्तरेकडील मेवाडचा राजा महाराणा प्रताप आणि दक्षिणेकडील दोन बलाढ्य राजवटी म्हणजे विजयनगरचे साम्राज्य व दुसरे मराठ्यांचे राज्य. दुर्दैवाने महाराणा प्रतापला पराजयाला तोंड द्यावे लागले. तो कालखंड 16 व्या शतकातला होता. दक्षिणेकडे यादवांच्या पराभवानंतर 15 व्या, 16 व्या आणि 17 व्या शतकापर्यंत जवळजवळ अडीचशे वर्ष विजयनगरच्या साम्राज्याने या देशावर राज्य करून समृध्दीचा वेगळा ठसा उमटवला. विजयनगरच्या पाडावानंतर पश्चिमेकडे महाराष्ट्रात मराठी राज्य उदयास आले आणि राजा छत्रपती शिवाजी महाराज यांनी मराठी राज्याचा पाया घातला. साधारणत: पुणे येथील शनिवारवाड्यावर इंग्रजांचा ध्वज फडकेपर्यंत (1818) संपूर्ण भारतावर मराठ्यांचा अंमल होता असे म्हंटले तरी अतिशयोक्ती होणार नाही. अखेरच्या शंभर वर्षाच्या कालखंडात पुणे ही तशी भारताची राजधानी होती असेच म्हणावे लागेल.

डॉ. दि. मा. मोरे - मो : 09422776670