Source
जल संवाद
प्राचीन कालखंड (इ.स. 1200 पर्यंत)
समृध्दीची कारणे जाणून घेण्यासाठी पाण्याच्या इतिहासात डोकावून पहाणे गरजेचे ठरते. या देशाला इ.स. पूर्व 4000 वर्षांपासूनचा इतिहास लाभलेला असतांना व समृध्दीचे मूळ हे पाणी यात असून सुध्दा पाण्याचा इतिहास मात्र शब्दबध्द झालेला दिसत नाही.
मौर्य कालखंडापासून ते यादव कालखंडापर्यंत इतिहासावरून नजर फिरवली असता असे दिसून येते की, हा देश बलवान आणि समृध्द म्हणून पुढे आला आहे. त्याच कारणाने हा देश पहावयास आलेल्या अनेक परदेशातील प्रवाशांनी या देशाच्या समृध्दीचे मुक्त कंठाने कौतुक केले आहे. या कालखंडात या देशातून सोन्याचा धूर निघत होता असे अनेक इतिहासकारांनी लिहून ठेवले आहे. विजयनगर साम्राज्याचा कालखंडसुध्दा असाच समृध्दीने ओथंबलेला होता. मराठी साम्राज्याचा उदय हा अनेक राजकीय चढउतारांमध्ये व्यतित झाला व या राजवटीत प्रजा सुखी होती.त्या काळातील विकसित अजिंठा - वेरूळच्या लेण्या आणि या ठिकाणी चित्रित केलेले किंवा कोरलेले जे काही मानवी व्यवहाराचे नमुने आहेत त्यावरून असे निश्चितपणे दिसून येते की एकेकाळी या भागामध्ये सुखसमृध्दी नांदत होती. अन्यथा माणसाला फक्त कल्पनेतूनच असा अविष्कार दृष्यस्वरूपात मांडता येणे शक्य नाही. अजिंठा - वेरूळ या लेण्या सातवाहन, राष्ट्रकूट, यादव या कालखंडात विकसित झाल्या आहेत. मोहंजोदारो सारखे सुसंस्कृत आणि परिपूर्ण शहर इथे वसले होते. तक्षशिला व नालंदा विद्यापीठाची स्थापना याच देशात झाली. यादव कालखंडात या परिसरात होवून गेलेले संत ज्ञानेश्वर यांनी या भागात समृध्दीचा आणि सुखाचा कालखंड पाहिला आहे आणि म्हणून त्यांच्या लिखाणामध्ये कुठेही उद्वेग, राग वा दारिद्र्याचे वर्णन दिसून येत नाही. संत ज्ञानेश्वर त्या अर्थाने नशिबवान म्हणावयास पाहिजेत - कारण त्यांनी यादवांच्या पाडावानंतरचा या भागातील दारिद्र्याचा, अन्यायाचा काळ पाहिला नाही. याच्या उलट संत रामदास, संत तुकाराम हे 17 व्या शतकातील संत. त्यांच्या सर्व लिखाणांमध्ये समाजातील विषमता, दारिद्र्य, अन्याय, अत्याचार याबद्दलच्या कंगोऱ्यांचे प्रतिबिंब पहावयास मिळते.
वरील ऐतिहासिक स्थिर राजवटीच्या काळात या ठिकाणी समृध्दी नांदत होती. व्यापारात भरभराट होती. मध्य आशिया व मध्यपूर्व देशांशी या ठिकाणाहून होणाऱ्या व्यापाराचा मार्ग प्रस्थापित झालेला होता. हा व्यापार कशाचा झाला ? या भागाचे जीवनमानच शेतीवर अवलंबून होते. त्यातून उत्पादित झालेल्या अधिकच्या (Surplus) वस्तूंचा व्यापार झाला. कापूस, कापड, औषधी पदार्थ, सुगंधी पदार्थ, मसाल्याचे पदार्थ, रेशमी कपडे यांचा व्यापार प्रामुख्याने चालत होता हेच इतिहासावरून आपल्या लक्षात येते.
जगातील सर्व संस्कृती या पाण्याच्या काठावरच विकसित झालेल्या आहेत. इजिप्तची संस्कृती नाईल नदीच्या काठावर, भारताची हिंदू संस्कृती सिंधू नदीच्या काठावर, 14 व्या व 15 व्या शतकात उत्कर्षास गेलेले विजयनगरचे साम्राज्य हे कृष्णा खोऱ्यात तुंगभद्रेच्या काठावरच. याच कृष्णा खोऱ्यात घटप्रभा, मलप्रभाच्या काठावर विकसित झालेले आणि ऐककाळी दक्षिण भारतावर राज्य केलेले बादामीचे चालुक्याचे साम्राज्य, कावेरीच्या काठावर हजारो वर्षे वैभवाने नांदलेले चोलाचे साम्राज्य अशी अनेक उदाहरणे देता येतील. रामायणकाळी विकसित झालेले रामराज्य हे गंगा खोऱ्यातील शरयू नदीच्या काठावरील तर उज्जैनचे गुप्ता साम्राज्य विकसित झाले ते याच खोऱ्यातील क्षिप्रा नदीच्या काठावर. विकासाबरोबरच विनाशाच्या खुणा पण नदीकाठीच म्हणजेच पाण्याच्या काठावरच घडलेल्या असल्याचे आपणास जाणवतात.
अगदी अलीकडील उदाहरण म्हणजे तिसरे पानिपतचे युध्द 1761 मध्ये मराठे आणि परकीय यामध्ये झाले ते गंगाखोऱ्यात, यमुनेच्या काठावर, सिकंदर आणि पौरसाचे युध्द सिंधू खोऱ्यातील झेलम नदीच्या काठी झाले, माधवराव पेशवे आणि हैद्राबादचा निजाम यांचे राक्षसभुवन येथील युध्द हे गोदावरीच्या काठावर, तर पृथ्वीराज चौहान व महंमद घोरी या दोघातील युध्द पण यमुनेच्या काठावरच झाले. दक्षिण भारताशी पर्यायाने महाराष्ट्राशी संबंधित असलेली महत्वाची लढाई आणि त्यातूनच झालेले दारिद्र्याचे रोपण म्हणजेच देवगिरीच्या यादवांचा पाडाव. राजा रामचंद्रदेव आणि अल्लाऊद्दीन खिलजी यांची (1294) लढाई सालूर येथे गोदावरी खोऱ्यात शिवना नदीच्या काठावरच झालेली आहे. महाभारतातील 18 दिवस लढलेले कुरूक्षेत्रावरील युध्द हे गंगा खोऱ्यातील सरस्वती नदीच्या काठावरच झाले. उत्कर्षाची व विनाशाची अशी अनेक उदाहरणे पाण्याच्या साक्षीने घडली. दिल्लीचे पाणी पानिपत या ठिकाणावरून अहमदशहा अब्दालीने तोडून सदाशिवभाऊचा पानिपतच्या लढाईत पराभव केला हे विदारक सत्य डोळ्यापुढे आहेच, भोपाळजवळ बेटवा नदीच्या काठावर 1739 मध्ये पहिल्या बाजीराव पेशव्यांनी युध्द न करता हैद्राबादच्या निजामाचा अपमानकारक पराभव केल्याचे उदाहरणही अलिकडचेच आहे.
समृध्दीची कारणे जाणून घेण्यासाठी पाण्याच्या इतिहासात डोकावून पहाणे गरजेचे ठरते. या देशाला इ.स. पूर्व 4000 वर्षांपासूनचा इतिहास लाभलेला असतांना व समृध्दीचे मूळ हे पाणी यात असून सुध्दा पाण्याचा इतिहास मात्र शब्दबध्द झालेला दिसत नाही. त्या त्या काळात त्या समाजाने पाणी नेमके कोणत्या पध्दतीने हाताळले व त्यातून समृध्दी कशी निर्माण केली याचा मागोवा घेण्यासाठी व भविष्यात यातील काळानुरूप उपयुक्त ठरणाऱ्या तत्वांचा अंगिकार करण्यासाठी पाण्याच्या इतिहासाची समग्रपणे नोंद करण्याची गरज होती. पण तसे घडले नाही. पाण्यातील अभियांत्रिकी, पाण्यातील समाजिकता, पाण्याचे अर्थकारण, प्राणीमात्र आणि वनस्पती जीवनाच्या विकासासाठी पाण्याचे कौशल्यपूर्ण व्यवस्थापन त्या त्या काळामध्ये वेगवेगळ्या राजवटीत वेगवेगळ्या लोकसमुहाने कशा पध्दतीने अंगिकारलेले व हाताळलेले होते याचे रेखाटन उपलब्ध नाही. अतिशय त्रोटकपणे स्पष्ट करणारे, अलीकडच्या 18 व्या 19 व्या शतकात शब्दबध्द केलेले उल्लेख उपलब्ध आहेत ते कितपत विश्वसनीय आहेत याबद्दल देखील सखोल अभ्यास होण्याची गरज आहे.
लोककल्याणार्थ व्यवस्था या स्थिर राजवटीच्या काळात वैभवास येतात हे सत्य स्वीकारणे अपरिहार्य आहे. राजकीय स्थिरता, सामाजिक स्थिरता, आर्थिक स्थिरता, सांस्कृतिक स्थिरता, धार्मिक स्थिरता जेव्हा एकत्रित नांदत असतात तेव्हाच त्या त्या काळातील राजवटी सातत्य मिळविण्यासाठी प्रजेला सुखी करू इच्छतात आणि हे सुख भारतासारख्या शेतीप्रधान देशाला पाण्यातूनच लाभत असल्यामुळे पाण्याच्या विकासाला त्या काळात प्राधान्य दिलेलेच असणार यात शंका नाही. यमुनेवर स्थिर राजवटीत, चोल राजाचे अनुकरण करून ग्रँड ऍनिकटचेच तत्व स्वीकारून ताजेवाडा येथे बंधारा बांधून दोन्ही बाजूला कालवे काढून शेती उत्पादनात स्थिरता दिलेला हा प्रयोग इतिहासकाळातील पाण्याचा वारसाच ठरतो.
इतिहासावरून नजर फिरवल्यास असे दिसून येते की जवळ जवळ 1200 वर्ष या देशावर पाण्याची चणचण असणाऱ्या भागात राजधानी बसवून राज्य केले. सातवाहन राजवटीने (ज्याच्या नावावरून शालीवाहन शतकाची सुरूवात झाली) सध्याचे पैठण येथून जवळ जवळ 450 वर्ष राज्य केले. वाकाटकापासून तर यादवांपर्यंतच्या घराण्यांनी याच तुटीच्या प्रदेशातून राज्य केले आहे. वाकाटकाची राजधानी नगरधन आणि उपराजधानी वाशिम. राष्ट्रकूटाची राजधानी वेरूळ व उपराजधानी लातूर. वेरूळ हे स्थान देवगिरीला लगतच पाण्याची वानवा असणारे म्हणून प्रसिध्द आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज याच भागातील होते.
राष्ट्रकूटाची सैनिकी राजधानी (Army capital) कंधार येथे होती. यादवाची राजधानी देवगिरी होती. महंमद तुघलक यांनी दिल्लीची राजधानी देवगिरीला आणली तेव्हा त्यांनी त्या भागातील विपुलतेपुढे झुकून देवगिरीचे नामकरण दौलताबाद असे केले. दौलत म्हणजे धन, समृध्दी. ही समृध्दी प्राप्त झाली ती पाण्यामुळेच. हा देश कृषीवर आधारलेला, कृषी आधारित व्यवसाय आणि त्यातून झालेली निर्मिती, त्याचा जगाशी व्यापार त्यातून धन व संपत्तीची निर्मिती असे हे समीकरण असणार. पण त्यातील गमतीचा, म्हणण्यापेक्षा वाखाणण्यासारखा भाग म्हणजे या वेगवेगळ्या राजवटीनी प्रदीर्घ अशा कालखंडामधघ्ये ही समृध्दी गाठली ती पाण्याचे दुर्भिक्ष असणाऱ्या भागात आपले पाय रोवून. या घराण्याने राज्य केले ते पाण्याच्या तुटीच्या प्रदेशातून. विजयनगरच्या साम्राज्याची राजधानी हम्पी येथे वसलेली आहे. युरोप मधील रोमन संस्कृतीने इतिहासामध्ये जे वैभव प्राप्त केले होते त्याच्या ही पेक्षा जास्त वैभव विजयनगरच्या साम्राज्यांनी त्यांच्या 200 ते 250 वर्षाच्या कालखंडात या देशात प्राप्त केले होते. हम्पी या ठिकाणचे महाल, निवासाच्या वास्तू, संगीतशाळा, मंदिरे हे त्याकाळचे वैभव त्यांच्या बांधकामाच्या पध्दतीतून, विलोभनीय शिल्पातून सांगतात.
असाच प्रत्यय वाकाटक, राष्ट्रकूट आणि यादव कालखंडात वेरूळ आणि अजिंठा येथील शिल्पातून आपणास दिसून येतो. जीवनाच्या वेगवेगळ्या पैलूवर प्रकाश टाकणारे हे शिल्प त्याकाळच्या संस्कृतीचा पटच उलगडून दाखवतात.
भारत हा सर्वच बाबतीत समृध्द होता. त्याचा पुरावा म्हणजे वेरूळ, अजिंठा, बेलून, हळेबीड, हम्पी, मदुराई, कोणार्क आदी हजारो ठिकाणच्या वैभवशाली कलाकृती. तो समाज सामाजिक, वैचारिक, सांस्कृतिक, आर्थिक या सर्वच क्षेत्रात पुढे पाऊल टाकलेला होता. हे पुढे पडलेले पाऊल जलविकासाशी निगडीत होते. भूकेल्या पोटी वैभवशाली कलाकृती निर्माण होत नाहीत. म्हणून इतिहासकालीन विकासाचा मागोवा घेत असतांना पाण्याचा मागोवा घेणे क्रमप्राप्त होते.
लिखित स्वरूपातल्या संदर्भाचा आधार घेणे शक्य नसल्यामुळे शेकडो, हजारो वर्षाच्या कालखंडात प्रवास करत करत ज्या जलव्यवस्था आजपण आपले अस्तित्व टिकवून ठेवल्या आहेत, त्यांच्याकडे पहाणे, त्यांच्याशी संवाद करणे, त्यांचे तंत्र जाणून घेणे, त्यांच्या पाठीमागचे अभियांत्रिकी तत्व, त्यांच्या पाठीमागचे सामाजिकतत्व, अर्थशास्त्र, त्याच्यातला लोक सहभाग, त्यांच्याबद्दलचा लोकांचा आदर या सर्वातून त्या व्यवस्थेला मिळालेले सातत्यपूर्ण वैभव समजून घेणे क्रमप्राप्त होते. महाराष्ट्रात, देशात आणि देशाच्या बाहेर विखुरलेल्या व्यवस्था वेगवेगळ्या उद्दिष्टासाठी अस्तित्वात आलेल्या आहे. मानवाच्या उन्नतीसाठी, त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे जलव्यवस्थापनाचे बोलके सांगाडे (पायाभूत सुविधा) आपल्याशी पदोपदी संवाद करतात असेच अनुभूतीला येते.
मध्ययुगीन कालखंड (इ.स. 1800 पर्यंत) :
इ.स. 1200 पासून मध्ययुगीन काल सुरू होतो व 1761 मध्ये मराठ्यांनी दिल्ली मिळवल्यानंतर तो संपतो. या काळाला मुस्लीमांची राजवट असेही समजले जाते.
मुस्लीमांचे आक्रमण 8 व्या शतकाच्या सुरूवातीपासूनच सिंधप्रांतापासून सुरू झाले. 13 व्या शतकापर्यंत महमंद गझनी, महंमद घोरी व अल्लाऊद्दीन खिलजी यांचा भारतावरील आक्रमणाचा काल होता. त्यानंतरचा कालखंड महंमद तुघलक याचा. महंमद तुघलकाच्या मृत्यूनंतर फिरोजशहा (1351 ते 1358) दिल्लीच्या गादीवर आला. तुंगभद्रेच्या दक्षिण तीरावर हंपी येथे विजयनगर राज्याची स्थापना झाली. विजयनगरच्या साम्राज्य काळात दक्षिण भारताचा काळ भरभराटीचा गेला. नद्यांवर कालवे, तलावांचे जाळे निर्माण केले गेले. या कालखंडास सुवर्णयुग पण म्हटले जाते. फिरोजशहाच्या कालखंडात यमुना व सतजल नदीचे पाणी अडवून सिंचनाचे काम झाल्याचे इतिहासकारांनी वर्णन केलेले आहे. या नंतरच्या कालखंडात बहामनी राज्याचा आणि नंतरचा मुघलांचा. मुघलांचा पहिला राजा बाबर 1526 ला दिल्लीच्या तख्तावर आला. त्याच्यानंतर हुमायुन आणि शेरशहा यांचा काळ 1556 पर्यंत, अकबराचा कालखंड 1605 पर्यंत तर जहांगिरचा कालखंड 1628 पर्यंत, शहाजहानचा कालखंड 1658 आणि औरंगजेब 1707 पर्यंत तर मराठ्यांचा कालखंड 1650 ते 1818 पर्यंतचा आहे.
या सर्व कालखंडावरून नजर टाकली तर असे दिसून येते की विजयनगरच्या साम्राज्याचा कालखंड वगळला तर राजवटीतला कालखंड लढाया करणे, सत्ता प्रस्तापित करणे व सैन्याची ने - आण करणे यात गेला. मुघलांना दीर्घ आयुष्य लाभले. तरी पण त्यांनी या देशात सिंचन व्यवस्थेत फार मोठी भर घातल्याचे दिसून येत नाही. फिरोजशहा, शहाजहान यांचा त्यांच्या कारकिर्दीत यमुनेच्या कालव्याचे काम केल्याचा उल्लेख आढळतो. मराठी साम्राज्याच्या कालखंडात पण सिंचनासाठीचे भरीव काम झाल्याचे दिसत नाही.
सिंचन व्यवस्था ही पायाभूत सोय आहे. समृध्दी कडे जाण्याची वाट आहे. त्यात समाजाचे व देशाचे कल्याण आहे. ज्या राजवटी स्थिर आहेत, ज्यांना प्रजेची कळकळ आहे, लोककल्याणाची आस आहे. त्याच राजवटीत सिंचनासारख्या पायाभूत व्यवस्थेस खतपाणी घातले जाते व त्यांची वाढ होते. ज्या राजवटी अस्थिर आहेत, सत्ता मिळवणे ही त्यांची उद्दिष्ट्ये आहेत, त्यांच्या राजवटीत लोक कल्याणाची कामे फार कमी होत असतात. हा धागा धरून इतिहासाकडे पाहिले तर वेगवेगळ्या राजवटीत सिंचनातील खाचखळग्यांची उकल आपणास सहज समजून येते. मुस्लीम आक्रमणानंतर मुघलंच्या काळात पाण्याचा वापर चैनीसाठी झाल्याचे दिसून येते. पाणी मनोरंजनासाठी, पाणी कारंज्यासाठी, पाणी वातानुकूल वास्तू निर्माण करण्यासाठी व पाणी शहरांना पाणी पुरवठा करण्यासाठी वापरल्याची शेकडो उदाहरणे आपणास पहावयास मिळतात. विजापूर, अचलपूर, औरंगाबाद, तिसगांव, विदर्भ, अनकाई, ठणकाई व बुऱ्हाणपूर अशी किती तरी उदाहरणे देता येतील की ज्या ठिकाणी सुंदर महाल बांधले गेले. स्नानगृहे - हमाम निर्माण करण्यात आले. गरम पाण्याचे फवारे, थंड पाण्याचे फवारे (शॉवर बाथ) या कल्पना या कालंखडात रूजल्या.
याला अपवाद म्हणून याच कालखंडात इंदौरच्या राणी अहिल्याबाई होळकरच्या राजवटीत तापी खोऱ्यात फड पध्दतीचे पुनरूज्जीवन होवून ती पुनश्च कार्यान्वित झाली. त्यांच्या कालखंडात लोकोपयोगी अनेक कामे जसे बारवा, कुंड, घाट इत्यादी ची निर्मिती झाली. अशी काही वेगळी उदाहरणे आपल्याला त्या कालखंडाची वैशिष्ट्ये दाखवतात. यापूर्वीच्या कालखंडामध्ये म्हणजेच प्राचीनयुगात पाणी लोक कल्याणासाठी, शेतीसाठी, पिण्यासाठी, संरक्षणासाठी आणि समृध्दीसाठी वापरले गेल्याचे प्रामुख्याने दिसून येते. ब्रिटीश कालखंडात सिंचनातून महसूल वाढविण्यासाठी व या बरोबरच मालाची, सैन्याची वाहातूक करण्यासाठी व इंग्लंडला कच्चा माल पुरवण्यासाठी पाण्याचा वापर केल्याचे दिसून येते. मराठी साम्राज्यात पाण्याकडे लक्ष देण्यास अवसर मिळाल्याचे दिसून येत नाही.
आधुनिक कालखंड (इ.स. 1800 नंतरचा) :
आतापावेतोच्या विवेचनावरून असे निश्चितपणे दिसून येते की, वेगवेगळ्या कालखंडात जलव्यवस्थापनेच्या अनेक व्यवस्था कार्यान्वित झालेल्या आहेत आणि त्यापासून त्या त्या कालावधीत त्या समाजाने समृध्दी मिळवली आहे. इ.स. 1300 च्या अखेर दक्षिण भारतात यादवांची सत्ता संपली. उत्तर भारतात त्यांच्या 100 वर्ष अगोदरच पृथ्वीराज चव्हाणांची सत्ता संपली होती. त्यानंतरचा कालखंड हा परकीय सत्तेखाली व्यापून गेला. याला अपवाद म्हणजे दक्षिणेकडील साधारणत: विजयनगरच्या साम्राज्याचा व 100 ते 125 वर्षांच्या मराठी साम्राज्याचा. हे दोन कालखंड सोडल्यास देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत भारत हा परकीयांच्या अंमलाखाली राहिला. मुघलांच्या काळात राज्याकर्त्यांना दीर्घ आयुष्य लाभले. हजारो वर्षांपासून रूजलेल्या हिंदू संस्कृतीशी त्याचा संघर्ष झाला.
जातीव्यवस्थेमुळे एकोप्याचा अभाव, फितूरी इत्यादी अनेक कारणामुळे स्थानिक राजवटी मांडलिक झाल्या. 1757 ची प्लासीची लढाई जिंकून बंगालमधून इंग्रजांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून या देशात शिरकाव केला. 1857 च्या पहिल्या स्वातंत्र्य युध्दानंतर कंपनीच्या हातून कारभार काढून घेवून इंग्लंडच्या राणीचे म्हणजे ब्रिटीशांचे राज्य भारतावर घट्टपणे बसले. पूर्ण भारत त्यांच्या अधिपत्याखाली आला. जगातल्या अनेक देशांवर त्यांची सत्ता आवळली गेली. असे म्हटले जाते की त्यांच्या साम्राज्यावर सूर्य मावळत नव्हता. साहजिकच त्यांना या देशावर कायम राज्य करू असे वाटून गेले. त्या अनुरोधाने त्यांनी या देशामध्ये प्रामुख्याने त्यांची सत्ता बळकट करण्यासाठी काही पायाभूत सोई निर्माण करण्याची कामे हातात घेतली. रस्ते बांधणी, रेल्वे बांधणी, जलवाहतुक इत्यादी बाबींना वेग देण्याचा प्रयत्न केला. या देशातील साधनसामुग्री जलमार्गाने जलदपणे इंग्लंडमधील कारखान्यांना पुरवठा करण्याचे वेध त्यांना लागले. चांगल्या लाकडाची वाहतूक, कापसाची वाहतूक, लोखंडाची वाहतूक इत्यादी कच्च्या वस्तू इंग्लंडच्या कारखान्यात पाठविणे यावर त्यांनी लक्ष केंद्रीत केले.
इंग्रजांना जरी असे वाटत असले की ते या देशावर निरंतर राज्य करणार आहेत, तरीपण परिस्थिती तशी राहिली नाही. देशात स्वतंत्रतेचे वारे नेटाने वाहत होते. 1930 च्या दरम्यान टिळकांचे युग संपले, गांधी पुढे आले, स्वातंत्र्य चळवळीला वेग येवू लागला. देशात इंग्रज राजवटी विरूध्द प्राणाची पर्वा न करता अन्यायाच्या विरूध्द झगडण्यकरिता अनेक राष्ट्रप्रेमी, स्वातंत्र्य सैनिक पुढे येवू लागले. या व इतर घटनांमुळे इंग्रजांना कळून चुकले की आपण भारतात आता जास्त काळ पाय रोवून बसणार नाही आणि त्याचा परिणाम म्हणून साधारणत: 1930 नंतर इंग्रजांनी या देशामध्ये पायाभूत सोईची कामे हातामध्ये घेवून गुंतवणूक केली नाही. दरम्यानच्या काळात दुष्काळात लोकांना जगवण्यासाठी म्हणून आणि तद्नंतर शेतीला सिंचनाचा आधार देवून उत्पन्न वाढविण्याच्या हेतूने सिंचनाच्या काही योजना ब्रिटीशांच्या काळामध्ये हाती घेवून पूर्ण करण्यात आल्या. याच कालखंडात महाराष्ट्राच्या कोल्हापूर भागात छत्रपती शाहू महाराजांनी राधानगरी धरण बांधून पंचगंगा खोऱ्याचा विकास केला. हा विकास पूर्णपणे लोकसहभागातून झाला. सामुहिक शक्तीतून बंधारे बांधून पाणी वाटपात फड पध्दतीची न्याय्य व्यवस्था अंमलात आणली. लोकांनी आपल्या पायावर उभे केले. म्हैसूर प्रांतात राजा जय चामराज वाडीयार यांनी महान अभियंता डॉ. विश्वैश्वरय्या यांच्या कार्यकुशलतेखाली कावेरी खोऱ्याचा विकास केला. कृष्णराजसागर धरण बांधले.
कावेरी नदीवरील बॅरेजेस, गंगा नदीवरील हरिद्वार येथील बॅरेज आणि कालवे, यमुनेवरील कालवे, कृष्णा, गोदावरी, रावी, शोण इत्यादी नद्यांवर मोठे बंधारे बांधून कालव्यांचे जाळे विणण्याचे काम त्यावेळेच्या काही द्रष्ट्या लोकांनी हाती घेतले. गोदावरी आणि कृष्णेवरच्या त्रिभूज प्रदेशात राजमंड्री व विजयवाडा येथे विशाल असे बॅरेजेस बांधून या त्रिभूज प्रदेशात कालव्यांचे जाळे विणले गेले आणि ते सिंचन व्यवस्थेमध्ये उल्लेखनीय ठरले आहे. लाखो हेक्टर जमीन सिंचनाखाली आणून त्या भागातील लोकांचे जीवनमान बदलून गेले आहे. कावेरीच्या त्रिभूज प्रदेशातील कालव्यांना बळकटी देण्यासाठी मेटूर येथे (कर्नाटक - तामिळनाडूची सीमा) एक सुंदर दगडी धरण याच काळात बांधले गेले. एक मैल लांबीच्या दगडी धरणाची वास्तू अभियांत्रिकी क्षेत्रातील गुणवत्तेचे, दगडी बांधकामाचे दिग्दर्शन करते. या वास्तूच्या आयुष्याचे भविष्य वर्तविणे कल्पनेपलीकडे असेल. प्रदीर्घ काळ अशा योजना सेवा देत राहणार.
सर आर्थर कोटन हा ब्रिटीश अभियंता कृष्णा आणि गोदावरीच्या त्रिभूज प्रदेशात पूजनीय ठरला. त्याचप्रमाणे गंगेवर जगातील सर्वात मोठी सिंचन व्यवस्था निर्माण करण्याचा उच्चांक सर कोटले या इंग्रज अधिकाऱ्यानी गाठला. तो सैनिक पेशातला होता. अभियंता नव्हता. 1854 च्या दरम्यान ही व्यवस्था कार्यान्वित झाली. हरिद्वार ते रूरकी पर्यंत गंगा कालव्यावर फक्त 4 बांधकामे (Structures) आहेत. 1. सायफन. 2. सुपर पेसेज 3. लेव्हल क्रॉसिंग व 4. जलसेतू. रूरकीच्या पुढे केनोल रीज वरून जातो. बांधकामे नाहीत म्हटले तरी चालेल. ही चार बांधकामे अभियांत्रिकी क्षेत्रातील त्यावेळच्या तंत्रज्ञानाची उंची दर्शवितात.
त्या कालव्यातून मोठा विसर्ग (200 क्यूमेक्स) रात्रं - दिवस वहात असतो. कधीही खंड नाही. हे कालवे गेल्या 150 वर्षात अभावानेच बंद केले गेले आहेत. त्यात गाळ साठतच नाही. कालवा कसा असावा याचे हे मूर्तीमंत उदाहरण आहे. फिशलेंडर, रामधारा इत्यादी सारख्या पर्यावरण संतुलनाच्या तरतुदीपण हरिद्वारच्या बंधाऱ्यात केलेल्या आहेत. कावेरीचे कालवे दुहेरी काम करतात, पावसाळ्यात नद्या म्हणून आणि पावसाळ्यानंतर कालवे म्हणून, या व्यवस्थेचा उगम दुसऱ्या शतकात चौल राज्याच्या काळात झाला आहे. वाळूवर बंधारे बांधण्याची शृंखला ही चौल राजाच्या कालखंडात रूजली गेली आहे.
महाराष्ट्रात पण 19 व्या शतकाच्या शेवटी व विसाव्या शतकाच्या सुरूवातीला 6 मोठ्या योजना कार्यान्वित झाल्या. 1. कृष्णा कालवे, 2. निरा कालवे. 3. मुठा कालवे. 4. प्रवरा कालवे. 5. गोदावरी कालवे व 6. गिरणा कालवे. इतर काही लहान प्रकल्प दुष्काळी परिस्थितीत लोकांना काम देण्यासाठी हाती घेण्यात आले. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर महाराष्ट्रातील सिंचन हे दोन अडीच लक्ष हेक्टरच्या जवळपास होते. तर देशपातळीवर हा आकडा साधारणत: 22 दशलक्ष हेक्टरच्या आसपास असावा. सोलापूर जिल्ह्यातील मांगी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ब्रिटीश राजवटीस 50 वर्षे लागली. यावरून असे दिसून येते की अशा लहान योजना दुष्काळातील लोकांना जगविण्यासाठी हाती घेतल्या जात असत. एका ठराविक कालावधीत पूर्ण करून लोकांचे जीवन सुधारावे हा हेतू त्यांच्या मध्ये नसावा.
ब्रिटीशांची सत्ता या देशात आली तेव्हा त्यांचा हेतू या देशातील व्यवस्थेतून पाणीपट्टी, टॅक्सच्या स्वरूपात जास्त महसूल जमा करणे हा होता. पाण्यापासून महसूलात वाढ करणे हे ध्येय त्यांनी डोळ्यापुढे ठेवले. या देशातील मूळ व्यवस्था लोकप्रणित होत्या, लोकांनी निर्माण केलेल्या, लोकांनी चालविलेल्या व्यवस्था होत्या. ओघानेच ज्या वर्षी पाण्याचा ताण जास्त असेल त्या वर्षी पाणीपट्टीचा ताण त्याच्यावर नसणार. शेतकरी आणि राज्यसत्तेमध्ये ब्रिटीशांनी तिसरा माणूस निर्माण केला. विदर्भात या तिसऱ्या माणसाला मालगुजार म्हटले आहे. अशा पायाभूत सोईची (तलावाची) मालकी मालगुजाराकडे गेली. या मालगुजारांकडून पाणीपट्टी वसुली करण्याचे काम होत असे. दुष्काळ असो, सुकाळ असो, ठराविक पाणीपट्टी वसुल केली जाई. शेतकऱ्याचा सामुहिक काम करण्याचा उत्साह अशा पध्दतीने मारला गेला. देखभालीकडे दुरूस्तीकडे यातून दुर्लक्ष झाले. अशा पध्दतीने देशभर हळूहळू या लोकप्रवणतेचे रूपांतरण, शासन प्रणित व्यवस्थेत होवू लागले. शेतकऱ्याच्या उत्साहाला, स्वप्रेरणेला वाव राहिला नाही.
ब्रिटीशांनी ज्या मोठ्या जलविकासाच्या व्यवस्था निर्माण केल्या त्याची मालकी त्यांनी स्वत: कडेच ठेवली. त्या शासन नियंत्रित केल्या. कदाचित अशा मोठ्या व्यवस्था लोकांकडे ठेवल्या तर ब्रिटीश राजवटीला धोका निर्माण होईल असे वाटून गेले असावे. ओघानेच ऐतिहासिक लोकप्रणित व्यवस्थेबरोबरच ब्रिटीशांनी निर्माण केलेल्या जाळ्याचे नियंत्रण पण राजसत्तेकडेच एकवटले. काश्मिर खोऱ्यात पारंपारिक भात शेतीचे सिंचन जतन केले गेले होते. त्यातील वैशिष्ट्य म्हणजे थंड पाण्यातून भात शेती करण्याचे उत्तम कसब स्थानिक कौशल्यातून निर्माण करण्यात आले होते. काश्मिरची भात शेती नीटनेटकी, स्वच्छ, सुंदर असते.
कावेरी आणि काश्मिर या प्रदेशातील सिंचनापासून ब्रिटीशांना भारताकडून शिकावे असे वाटले. इंग्लंडमध्ये सिंचित शेती हा प्रकार नाही. कारण 12 महिने पाऊस. नौकानयनासाठी ब्रिटीशांनी कालव्यांचे मोठे जाळे निर्माण केले. यातूनच मोठे कालवे निर्माण करण्याचे कसब हिंदुस्थानच्या सिंचन व्यवस्थापनेत आणले. याच दृष्टीने ब्रिटीशांनी भारतातील कालव्याचा आकार मोठा ठेवला. 1848 ला गंगेचे कालवे निर्माण केले. त्या कालव्यांचा विकास नौकानयनासाठी व्हावा हा दृष्टीकोन होता. याच तंत्रज्ञानाचा वापर करून दामोदर नदीवर, कृष्णा नदीवर, शोण नदीवर, यमुना नदीवर आणि कावेरी नदीवर 19 व्या शतकाच्या सुरूवातीच्या काळात कालव्यांचे जाळे निर्माण केले. ब्रिटीशांनी जी कामे केली ती पक्की व विस्तृत आकाराची होती.
ब्रिटीश काळात कालव्यांच्या बांधकामात नौकानयनाची व्यवस्था होती. बोटीने दळणवळण करत असत. कालव्याच्या मदतीने मद्रास पासून ते पूर्व किनाऱ्यानी कृष्णेचे आणि गोदावरीच्या कालव्याद्वारे थेट काकीनाडापर्यंत (बकींगहॅम कॅनॉल) बोटीने वाहतुक होत असल्याचे सांगितले जाते. गंगेच्या कालव्याद्वारे पण नौकानयनामार्फत मालाची वाहतुक होत असते. कृष्णा नदीचा डावा कालवा आणि गोदावरीच्या उजव्या कालव्याची तळ पातळी वेगवगेळी असतांना देखील नेव्हल लॉकच्या मदतीने कालव्यातील पाण्याची पातळी खाली वर करून बोटी एका कालव्यातून दुसऱ्या कालव्यात घेवून जात असत. अशारीतीने पातळ्या वेगवेगळ्या असतांना कृष्णा व गोदावरी कोलेरू या ठिकाणी एकमेकाला मिळतात. हा नदीजोडचाचा प्रकार म्हणण्यास काही हरकत नसावी. आजची जशी रेल्वे स्टेशनची व्यवस्था आहे तशीच व्यवस्था कालव्यावर ठिकठिकाणी केलेली दिसते. आजसुध्दा ही व्यवस्था पहावयास मिळते. पण त्यांचा वापर केला जात नाही. गोदावरी आणि कृष्णा कालव्याच्या काही भागात बोटीने वाहतुक केली जाते. पाण्यातून वाहतुक ही कमी खर्चाची व परवडणारी आहे. अलिकडच्या काळात त्याकडे दुर्लक्ष झाले. रेल्वेनी वहातुक कमी आहे. त्यामुळे रस्त्यावर वाहतुक वाढली. जलवाहतुकीला प्राधान्य हा बदल होणे गरजेचे वाटते.
अशा रितीने पारंपारिक लोक व्यवस्थेतून वृध्दींगत झालेली सिंचन व्यवस्था ब्रिटीशांच्या काळामध्ये हळूहळू शासनप्रणित झाली. स्वातंत्र्यानंतर ब्रिटीशांचा कित्ता गिरवल्यामुळे शासन नियंत्रित व्यवस्था अधिक घट्ट झाली. लोकांचा उत्साह संपला, लोक पंगू झाले. गेल्या 65 वर्षात ब्रिटीशांनी लावलेले शासन प्रणितचे झाड फोफावले आणि या प्रदीर्घ कालखंडात आपण स्वावलंबनाकडून परावलंबनाकडे प्रवास केला. आजचा अनुभव म्हणजे शेतकरी समुहात काम करण्यास सहजासहजी तयार नाही. सामुहिक सिंचन व्यवस्था त्यांना नकोशी वाटते, जाचक वाटते. एका मोठ्या कालखंडात असे परिवर्तन करण्यास भाग पाडलेल्या शासन व्यवस्थेचा हा परिणाम आहे. आज आपणास आपल्या पारंपारिक कौशल्याकडे, नितीकडे परत फिरून पाहण्याची गरज पडत आहे. सध्याच्या समस्येला यातूनच उत्तर मिळणार आहे.
डॉ. दि. मा. मोरे - मो : 09422776670