देवनदी पुनरुज्जीवन शेतकर्‍यांचे सबलीकरण

Submitted by Hindi on Sun, 06/19/2016 - 11:24
Source
जल संवाद

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात अमलात आलेला देवनदी पुनरुज्जीवन प्रकल्प केवळ बंधारे बांधणे अथवा दुरुस्त करणे, कालवे खोदणे आणि शेतीला पाणी देणे या पुरता सीमित नाही. पाणी अडविणे, वळविणे आणि ते समप्रमाणात वितरित करण्यासाठी लोकसहभाग असलेली व्यवस्था कार्यान्वित करणे हा देवनदी पुनरुज्जीवन योजनेचा मूलाधार आहेच. परंतु पाणी, उत्पादकता आणि उत्पन्न वाढ अशी सुव्यवस्थित सांगड हे या प्रकल्पाचे वैशिष्ट्य. याशिवाय उपलब्ध पाण्यानुसार पीक लागवडीचा ढाचा ठरविण्याचा परिपाठ रुढ झाला ही खास उपलब्धी. उत्पादित कृषी मालासाठी वितरण कंपन्यांची निर्मिती, पाणी सुरक्षा व शेतकर्‍यांच्या नफा तोटा चक्रातील तुटी कमी करण्यासाठी आयआयटीतील संशोधकांची घेण्यात येत असलेली मदत या एकात्मिक ग्रामीण विकासाच्या पैलूंचे एकत्रित दर्शन याठिकाणी होते. विनासायास कारखानदारांच्या घशात जाणारे पाणी अधिकृतपणे शेतीसाठी उपलब्ध व्हावे यासाठी कायद्याचा आधार घेत पाणी वापर संस्थांची करण्यात आलेली स्थापना ही देवनदी पुनरुज्जीवन योजनेची अलीकडची फलनिष्पत्ती आहे. शेतकर्‍यांच्या सबलीकरणाशी निगडित असलेल्या बहुआयामी, सर्वस्पर्शी उपक्रमांचा एकत्रित समावेश म्हणजे देवनदी पुनरुज्जीवन प्रकल्प.

सन २००७ मध्ये देवनदी पुनरुज्जीवन प्रकल्पाची मूहूर्तमेढ रोवली गेली. परिसरातील तरुणाईला नैसर्गिक संसाधनांची ओळख व्हावी, देवनदीवरील ब्रिटीशकालीन बंधारे, त्यावरील पाट व्यवस्थेची सद्यस्थिती, नदीकाठावरील जैवविविधता आणि तिला बाधा आणणारे प्रदूषण अभ्यासणे इत्यादी प्रमुख उद्देश डोळ्यासमोर ठेवून देवनदी शोधयात्रा मोहिमेची आखणी करण्यात आली होती. अशा स्वरुपाच्या योजना अमलात आणण्यासाठी एका कल्पक व गतीशील योजकाची आवश्यकता असते. खरं तर असे योजक लाभणे ही अतिशय दुर्लभ बाब. परंतू सिन्नर तालुक्याचे सुपुत्र सुनील पोटे यांनी ही जबाबदारी स्वीकारली. ते याच तालुक्यातील लोणारवाडीचे रहिवासी. लोणारवाडी हे देवनदीच्या काठावर वसलेले. त्यामुळे विशेष ममत्वाने देवनदी परिक्रमा या उपक्रमास सुनील पोटे यांनी शोध यात्रेचे स्वरुप दिले. पुढे या शोधयात्रेच्या निमित्ताने झालेला अभ्यास आणि त्यातून निघालेले निष्कर्ष सूत्रबध्दपणे अमलात आणण्यासाठी त्यांनी युवामित्र संस्थेच्या माध्यमातून परिसराच्या परिवर्तनाची अहर्निश कास धरली. त्याची ही प्रेरक कहाणी.

देवनदी पुनरुज्जीवन प्रकल्पाची यशोगाथा जाणून घेण्यापूर्वी थोडं मागे जावं लागेल. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुका. सुमारे तीनशे वर्षे यादवांच्या राजधानीचे मुख्य केंद्र असलेल्या सिन्नरचे प्राचीन साहित्यातील नाव मश्रीनगरफ असे आहे. श्रीनगर म्हणजे संपत्ती व वैभव असलेली नगरी. तथापि सिन्नरची अलीकडची ओळख दुष्काळी तालुका अशीच आहे. पश्चिम सीमेवरील धोंडबारच्या खडक्या डोंगरातून उगम पावणारी आणि पूर्वेकडे सुमारे ७० कि.मी. वाहत शेवटी सांगवी जवळ गोदावरीला मिळणारी देवनदी ही या तालुक्यातील एक प्रमुख नदी. देवनदीच्या काठावरील लोणारवाडीचे सुनील पोटे सिन्नरला महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना छात्रभारती या विद्यार्थी संघटनेच्या संपर्कात आले. लोकशाही, समाजवाद या विषयांवरील चर्चा, अभ्यासवर्ग आणि बैठका यात त्यांचा संचार वाढला. बहुधा याच काळात मसामाजिकीकरणाचे मबीजारोपण झाले. त्याकाळात म्हणजे साधारण १९९२ मध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शुल्कवाढीच्या विरोधात छात्रभारतीतर्फे आंदोलन छेडण्यात आले होते. सुनील पोटे या आंदोलनात अग्रभागी होते. या प्रश्नाच्या अनुषंगाने मंत्रालयावर काढण्यात आलेला मोर्चा सुनील पोटे यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. नर्मदा आंदोलनाच्या प्रणेत्या मेधा पाटकर यांचे विद्यार्थ्यांसमोर भाषण झाले होते. या भाषणाच्या प्रभावामुळे सुनील पोटे आणि मित्रमंडळी तडक धरणाखाली प्रथम बुडणार्‍या सातपुड्यातील मणीबेली या नर्मदेकाठावरील आदिवासी बहुल गावाकडे रवाना झाले. तथापि पोलीसांनी या आंदोलकांना धुळ्यातच रोखले. तीन दिवस त्यांना धुळ्यातील एका शाळेत ठेवण्यात आले. नंतर त्यांना नाशिकला सोडण्यात आले. या घटनाक्रमामुळे त्यांच्या विचारांची दिशाच बदलली.

क्षणोक्षणी शिक्षण :


समाजासाठी काही तरी केलं पाहिजे ही खूणगाठ बांधली गेली. पुढे या धाग्यातूनच समाजशास्त्रात पदव्युत्तर पदवी त्यांनी संपादन केली. या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून त्यांना कसरावद येथे पाठविण्यात आले. त्यावेळी आनंदवन सोडून बाबा आणि साधनाताई आमटे यांनी नर्मदाकाठावरील कसरावद येथे वास्तव्य केले होते. कसरावद येथे अनेक मान्यवरांचा सहवास लाभला. येथील दोन महिन्यांचे वास्तव्य वैचारिक जडणघडणीसाठी मजबूत पायाभरणी करणारे ठरले. तेथून परतल्यानंतर समाजशास्त्र महाविद्यालयात काही काळ प्राध्यापक, एका कंपनीच्या सामाजिक कार्य विभागात अधिकारी अशा जबाबदार्‍या त्यांनी सांभाळल्या. मात्र आपल्या परिसराच्या परिवर्तनाची आस त्यांना अस्वस्थ करीत असे. अशीच भावना असलेल्या समविचारी मित्रांसोबत त्यांनी युवामित्र या संस्थेची स्थापना केली.

प्रारंभीच्या काळात युवामित्रच्या माध्यमातून लोणारवाडी परिसरातील रामनगर आणि जामगाव या गावात क्षणोक्षणी शिक्षणही चळवळ सुरु करण्यात आली. ग्रामीण भागातील पारंपारिक ज्ञान, कौशल्य या अनुषंगाने दस्तावेज तयार करण्यासाठी असंख्य उपक्रम राबविण्यात आले. यानिमित्ताने ग्रामीण अर्थकारणाचा महत्वाचा घटक असलेल्या शेतकर्‍याच्या फाटक्या आर्थिक स्थितीचे वास्तव ठळकपणे त्यांच्या लक्षात आले. शेतकर्‍यांना सहज पैसे उपलब्ध होतील, पर्यायाने आधुनिक शिक्षण व्यवस्था आणि आरोग्यसुविधांचा लाभ घेणे त्यांना सुकर होईल या धारणेतून काही उपक्रम त्यांनी राबविले. प्रारंभी परिसरातील नऊ गावांमधील शेतकर्‍यांकडून दूध संकलित करुन ते नगर जिल्ह्यातील सहकारी दूध संस्थांना पुरविण्याचा उपक्रम सुरु करण्यात आला. अनेक अडचणींवर मात करत या व्यवसायाने पुढे चांगला आकार घेतला. नंतर विशिष्ट टप्प्यावर शेतकर्‍यांच्या सहकारी संस्थेवर जबाबदारी सोपवून युवा मित्र बाजूला झाले. दरम्यानच्या काळात युवकांसाठी प्रशिक्षण, कौशल्य विकास असे उपक्रम युवा मित्राच्या माध्यमातून सुरु होते.

सन २००७ मध्ये घोटी-सिन्नर हायवे वरील लोणारवाडी शिवारातील युवामित्र संस्थेच्या प्रांगणात युवकांसाठी कृषीविषयक प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. सहभागी युवकांचा शेतीकडे कल वाढावा यासाठी पारंपारिक पध्दत, नैसर्गिक पध्दत या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यात आले. तीन दिवसांचे शिबीर संपले. सहभागी युवकांचे मनोगत जाणून घेण्याचा शेवटचा अध्याय सुरु होता. या शिबीरात सहभागी ४० तरुणांपैकी सर्व तरुणांनी आपण पुढे नोकरी करणार, शेती करणार नाही असे ठामपणे सांगितले. तरुणांच्या या भूमिकेमुळे सुनील पोटे आणि युवा मित्रचे सदस्य अस्वस्थ झाले. शेती का करणार नाही तर, पाणी नाही असे कारण सांगण्यात आले. तेव्हा पाणी गेलं कुठे? या प्रश्नाभोवती चर्चा सुरु झाली. त्यातूनच आपल्या परिसरातील नैसर्गिक संसाधनाचा परिचय युवा पिढीला करुन देण्याची आवश्यकता अधोरेखित झाली. देवनदी परिक्रमा संकल्पनेची मूहूर्तमेढ ही या शिबीराचीच निष्पती.

देवनदी शोध यात्रा - दि.१५ ते २० मे २००७ :


देवनदीच्या परिक्रमेच्या संकल्पनेवर चर्चा सुरु झाली. सहभागी होणार्‍या ४० युवकांच्या बैठकीत परिक्रकेचे नामकरण ङ्गदेव नदी शोध यात्राङ्घ असे करण्यात आले आणि पाच दिवसांचे संपूर्ण नियोजन करण्यात आले. शोध यात्रेत सहभागी होणार्‍या युवकांनी देव काठावरील ग्रामस्थांमध्ये नैसर्गिक साधन संपत्तीचे संवर्धन, संगोपन व संरक्षण होण्याच्या दृष्टीने सजक दृष्टीकोन निर्माण करणे अपेक्षित होते. त्याचप्रमाणे सहभागी युवकांनी निसर्गचक्र अबाधीत रहाण्याच्यादृष्टीने जैवविविधतेचा समतोल व असमतोल समजून आवश्यक होते. याशिवाय देवनदीवरील ब्रिटीशकालीन बंधारे व त्यावरील पाट व्यवस्था समजून घेऊन सद्यस्थिती नोंदविणे हे या शोध यात्रेचे मुख्य उद्दीष्ट ठरले. शोधयात्रेस दिनांक १५ मे २००७ रोजी सकाळी ७ वाजेपासून देवनदीच्या काठावरील खोपडीगावापासून प्रारंभ झाला. देवनदीच्या उगमाच्या दिशेने प्रवास सुरु झाला. खोपडीपासून पुढे गोदावरीच्या पाटाव्दारे शेतीच्या पाण्याची व्यवस्था आहे. परंतु ब्रिटीशकालीन पाणी वाटप व्यवस्था नाही हे लक्षात घेऊन खोपडी ते धोंडबार हा मार्ग निश्चित करण्यात आला. शोधयात्रेचे रीतसर उद्घाटनही झाले. याप्रसंगी ङ्गनाशिक रनङ्घ च्या विश्वस्त श्रीमती उत्तरा खेर उपस्थित होत्या. शोध यात्रेतील अभ्यास गटांची विषयानुसार विभागणी करण्यात आली.

त्यात - १) प्रदुषण नोंद गट, २) जैव-विविधता नोंद गट, ३) पाणी वाटप व पाणी साधने शोध गट असे तीन गट तयार करण्यात आले. शोधयात्रेत येणार्‍या प्रत्येक गावात नियोजनाप्रमाणे सकाळ-संध्याकाळ ग्रामसभा होत. गावातून जागृती फेरी काढण्यात येत असे. गावातील घरांवर देवनदी जाणीवेविषयीची पोस्टर्स लावण्यात येत. पत्रके वाटण्यात येत. ज्येष्ठ ग्रामस्थांशी चर्चा करुन एक प्रश्नावली तयार करण्यात आली होती. त्यानुसार माहिती संकलित करण्यात येत होती. मे महिना असल्यामुळे नदीपात्र कोरडे होते. त्यामुळे नदीपात्रातूनच मार्गक्रमण सुरु होते. त्यामुळे आपल्या गटाचे काम करणे युवकांना शक्य होत असे. २० मे रोजी देवनदीच्या उगमस्थानावर धोंडबार येथे शोधयात्रेचा समारोप झाला. त्यावेळी सहभागी युवकांचे अनुभवविश्व समृध्द झाले होते. सर्वांचे आयुष्य बदलले होते.

प्रदूषणाच्या विळख्यात देवनदी :


अभ्यास गटांनी नोंदविलेले निरीक्षण सर्व प्रचलित समज व गैरसमज दूर करणारे होते. ज्या देवनदीचे सध्याचे स्वरुप एका ओहळा सारखे आढळले ती देवनदी पूर्वी बारमाही होती अशी माहिती उपलब्ध झाली. संकलित माहितीचे छाननी करण्यात आली. या नदीमध्ये त्यावेळी ३५२ विहीरी अस्तित्वात असल्याचे निदर्शनास आले. नदीमध्ये खाणकाम चालत असल्याचे काही ठिकाणी आढळले. नदीपात्रातील वाळू पत्र्याने खरडून भरण्यात येत असे. प्रदुषण नोंद गटाचे निरीक्षण तर हादरविणारे होते. प्रदुषण फक्त शहरांमध्येच होते. खेडे गावांत कशाचे प्रदुषण हा गैरसमज या शोधयात्रेमुळे दूर झाला. प्रदुषण संपूर्ण निसर्गचक्र बिघडवू शकते याचे उदाहरण कुंदेवाडी शिवारामध्ये नदीपात्रात आढळलेले मेलेले मासे, बेडुक हे होते. सजिवांमधील विविधता नष्ट होण्यास प्रदुषण हातभार लावते हे सर्वत्र नदीपात्राच्या कडेने वेढा घातलेल्या बेशरमच्या वेलींवरुन आढळले.

प्रदुषणामुळे पाणी निर्जीव होऊ शकते हे मुसळगाव-कुंदेवाडी शिवारात पाण्याने भरलेल्या नदीपात्रातील बंधार्‍यावरुन दिसले. पाण्यावाचून आजूबाजूची शेती पडीक होती. जनावरांना मुबलक पाणी व चारा नाही म्हणून पाळीव जनावरांची संख्या कमी झाली,असे ग्रामस्थांनी सांगितले. परंतू गावाच्या शिवारात पाण्याने भरलेले देवनदीचे पात्र औद्योगिक वसाहतीतून वाहून येणार्‍या निचर्‍यामुळे दुषीत होऊन निर्जीव झालेले आढळले. सांडपाणी व कपडे, भांडी, जनावरे धुण्यामुळे पाण्याने स्वत:चा रंग बदलला असल्याचे आढळून आले. सरस्वती नदीव्दारे वाहून येणारे सिन्नर शहराचे सांडपाणी कुंदेवाडी शिवारात देवनदीस मिळते. या पाण्यासमवेत वाहून येणारे प्लॅस्टिक, कचरा आणि माती हे देवनदीवरील बंधार्‍यांमध्ये साचून राहतात. त्यामुळे बंधार्‍याची साठवण क्षमता कमी झालेली आढळली. याशिवाय देवनदीच्या पात्रात बेशरम या वनस्पतीची वाढ मोठ्या प्रमाणावर झालेली आढळून आली. एकेकाळी जैवविविधतेने संपन्न असलेल्या देवनदी काठावरील आमराया कालौघात नष्ट झाल्याचे निरीक्षण संबंधित अभ्यास गटाने नोंदविले. आंबा, वड, जांभुळ असे वृक्ष नदीपात्रांच्या काठांचे संरक्षण करायचे व आजुबाजुने वाहून येणारे पाणी या झाडांच्या मुळांमुळे व्यवस्थित पाझरुन पाण्याचे प्रदूषण रोखायचे व मातीची धुप थांबवयाचे, त्यांची जागा बेशरम, बिलायत, हरळ, कुळसण अशा झुडपेरी वेलींनी घेतलेली आढळली. पाणमळे नष्ट झाल्यामुळे अन्नसाखळी विस्कळीत झाली. पर्यायाने साप, मोर, मुंगुस यांची संख्या घटली. कोरफड, गुलतुरा, साबरबोड या औषधी वनस्पतींची जागा गवताने घेतली.

शोध पाण्याचा :


परिसरातील पाणी गेले कुठे? यासंदर्भात शोध घेणे हा या यात्रेचा मुख्य उद्देश होता. धोंडबारच्या खडक्या डोंगरातून उगम पावणारी देवनदी शेवटी सांगवी येथे गोदावरीला मिळते. देवनदीचा संपूर्ण प्रवास ७० किमीचा आहे. १८७० ते १८८० या दशकात ब्रिटीश राजवटीत ३२ बंधारे देवनदीवर उभारण्यात आले. या सर्व बंधार्‍यावर पाट काढण्यात येऊन प्रत्येक गावाच्या शेतीसाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. पाणी वाटपाचे नियोजन व व्यवस्थापन संपूर्ण गाव एकत्रितपणे करीत असे. पाणी वाटपामध्ये क्षेत्र व पिकानुसार पाण्याचे समान वाटप होत असे. मुख्य पाटापासून वैयक्तिक शेतामध्ये पाणी नेण्यासाठी त्यावर चा-या काढलेल्या होत्या.

पावसाळ्याच्या सुरुवातीस पाटाचे पाणी सर्व जमिनीमध्ये फिरल्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होत होती. कालौघात ब्रिटीशकालीन बंधार्‍यांची व्यवस्था कोलमडली. वापर तसेच देखभाल व दुरुस्ती अभावी बंधार्‍यांची दुरवस्था झाली. १९७२ नंतर देवनदीवर वसंत बंधारे बांधण्यात आले. शिवाय याच काळात कोनांबे धरणही बांधण्यात आले. त्यामुळे देवनदीच्या प्रवाहामध्ये अनेक बदल घडून आले. धरणामुळे पाण्याचा प्रवाह कमी झाला. नदीकाठावर विहीरींची संख्या वाढली. वैयक्तिक पाणी पुरवठ्याची व्यवस्था निर्माण झाली. विज पंपामुळे पाण्याचा उपसा वाढला. पर्यायाने पाटाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या परंपरागत व्यवस्थेकडे दुर्लक्ष झाले. पुढे वाढीव वीज बिल आणि भारनियमानामुळे पुन्हा विनाखर्चाची पाणी वाटप पध्दत सुरु व्हावी अशी भावना शेतकर्‍यांमध्ये वाढीस लागली.

देवनदी शोध यात्रेची सांगता झाली. अनेक सूचना, निरीक्षणे समोर आलीत. या अनुषंगाने युवामित्रमध्ये मंथन सुरु झाले. देवनदीच्या तीरावर वसलेल्या गावांचे उपजिविकेचे मुख्य साधन शेती आहे. शेती व्यवसायाच्या शाश्वततेमध्ये पाण्याची भूमिका सर्वात महत्वाची. पाण्याअभावी शेती बेभरोशाची झालेली. त्यामुळे गावाच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणारा युवक उपजिवीकेसाठी तात्पुरता स्थलांतरीत होत असे. एकूण असे चित्र या गावांमध्ये आढळून आले. निसर्गाशी लोकांनी जुळवून घेतलं व त्याच्या सोबत सुसंवाद निर्माण केला तरच उपलब्ध स्थानिक नैसर्गिक साधनांचा आपल्या उपजिवेकेशी व जीवनाशी असलेला संबंध दृढ होण्यास मदत होईल. या धारणेतून उपलब्ध पाण्याचे नियोजन आणि वापर याबाबींवर भर देण्याची आवश्यकता पुढे आली. त्यातूनच देवनदीवरील परंपरागत पाट व्यवस्था पुन्हा सुरु व्हावी ज्यातून वीजबील, भारनियमन या प्रश्नांवर पर्याय निघेल. त्याचप्रमाणे नष्ट होत चाललेल्या जैवविविधतेचं संवर्धन करता येईल त्याचप्रमाणे पाण्याचं प्रदुषणही रोखता येईल. या पर्यायाची अमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

पाणी वाटपाची पारंपारिक व्यवस्था पुनर्जीवीत :


देवनदीचे पुनरुज्जीवन करण्याचा संकल्प सोडण्यात आला. मात्र यासंदर्भात नेमके काय करायचे याविषयी युवामित्रचे सर्वच सदस्य अनभिज्ञ होते. गावागावात जाऊन नदी पुनरुज्जीवनाचा विषय छेडण्यात येत असे. छात्रभारतीमध्ये जडणघडण झालेल्या सुनील पोटे यांनी अतिशय हिरीरीने हा विषय गावागावात पोहचविला. परंतू ग्रामस्थांनी याविषयाकडे फारसे गांभीर्याने लक्ष दिले नाही. फारसा प्रतिसाद मिळाला नाही. यात एक वर्ष संपले. पुन्हा मंथन सुरु झाले. संपूर्ण देवनदीच्या पुनरुज्जीवनाविषयी कदाचित ग्रामस्थांना आस्था वाटत नसेल, परंतू ज्या ब्रिटीशकालीन पाट व बंधार्‍यांमुळे ग्रामस्थ नदीशी जोडले गेले आहेत, त्या पाट व बंधार्‍यांच्या पुनरुज्जीवनाचा विषय घेऊन लोणारवाडी, भाटवाडी आणि वडगांव या गावांवर लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय घेण्यात आला.

नदी सर्वांची पाट मात्र माझ्या गावाचा आहे, अशी भावना असल्यामुळे ग्रामस्थांचा प्रतिसाद वाढला. २००९ मध्ये तज्ञांच्या मदतीने एक पथदर्शी प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला. मुंबईतील सर दोरावजी टाटा ट्रस्ट यांच्याकडून मिळालेले अर्थसहाय्य आणि ग्रामस्थांचा सहभाग यातून वडगावचा तीन किमीचा आणि भाटवाडीचा ३.२ किमी चा पाट दुरुस्त करण्यात आला. पाटाची गळती, तुटफुट दुरुस्त करण्यात आली. सुदैवाने २००९ मध्ये चांगला पाऊस झाला. चांगलं उत्पादन आलं. जिथे पाणी येऊ शकत नाही तिथे पाणी पोहचलं. विहीरींची पातळी वाढली. विहिरी काठोकाठ भरल्या. सहा सहा महिने पाणी शिवारात फिरलं. हे सगळं पाहून इतर शेतकरी जागे झाले.

२०१२-२०१३ दरम्यान देवनदीवरील लोणारवाडी गावासाठीची व्यवस्था असलेल्या निफाडी बंधारा व त्यावरील ३.५ किमी पाटव्यवस्थेची डागडुजी व दुरुस्ती करण्यात आली. त्यामुळे लोणारवाडी गावाचे ३२०.९ हेक्टर क्षेत्र ओलीताखाली आले. तसेच वेलांबे बंधारा व त्यावरील २.९ किमी पाटव्यवस्थेची दुरुस्ती करण्यात आली. त्यामुळे ७५.११ हेक्टर क्षेत्राला पाण्याची व्यवस्था झाली. यासाठी नाशिकच्या रन चॅरिटेबल टस्ट्रचे सहाय्य लाभले. पुढच्या टप्प्यात ही संख्या वाढली. मुख्य पाटांतून शेताला व उपचारीला पाणी जाण्यासाठी बारे व त्यावर लोखंडी गेट बांधण्यात आले. एकट्या निफाडी बंधार्‍यावर २८ बारे आहेत. ब्रिटीशांनी विकसित केलेल्या पाणीवाटपाच्या धोरणामध्ये आवश्यक ते बदल करुन पाणी वाटपाची पध्दत सध्या या भागात रुढ करण्यात आली आहे. देवनदी शोध यात्रेच्या निमित्ताने केवळ ब्रिटीशकालीन बंधार्‍यांचेच पुनरुज्जीवन झाले असे नाही तर, लोकसहभागावर आधारलेल्या पाणी वाटप व पाणी व्यवस्थापनाच्या पारंपारिक व्यवस्था देवनदी परिसरात पुनर्जीवीत झाली आहे. सिंचनाच्या या धोरणामुळे चारही गावांची १५२६ हेक्टर जमिन सिंचित होत आहे. ४७२ विहिरींची पाण्याची पातळी राखली जातेय. ७२५ एकरावर ठिबकसिंचन करण्यात आलं आहे. ज्या गावांमध्ये तिसरे पिक घेणं केवळ अशक्य होतं, तिथे तिसर्‍या पिकाबरोबरच शेतकरी परदेशी भाजी पाल्याचेही उत्पादन घेऊ लागले आहेत.

वडगाव, भाटवाडी, लोणारवाडी आणि सिन्नर या गावांमध्ये झालेले परिवर्तन पाहून नदी किनार्‍यावरील अन्य १६ गावातील ग्रामस्थ पाट दुरुस्तीसाठी पुढे येण्यास सुरुवात झाली आहे. या प्रेरणतून देवनदीवरील २० बंधार्‍यांचे आतापर्यंत पुनरुज्जीवन झाले आहे. या व्यतिरिक्त सिन्नर तालुक्यात असलेले व्दितीय श्रेणीतील ३७ बंधारे आणि नाशिक जिल्ह्यातील २९७ बंधार्‍यांचे या पध्दतीने काम झाले तर, कमीत कमी चाळीस हजार एकर जमीन पुन्हा ओलिताखाली येईल,असा युवामित्रचा दावा आहे.

या कामापासून प्रेरणा घेऊन सिन्नर भागातील बलक बंधारा व त्यावरील २.२ किमी पाटव्यवस्था तसेच मुसळगाव मधील बंधारा परिसरातील ग्रामस्थांनी लोकवर्गणी व श्रमदानातून दुरुस्त केला. त्यामुळे तब्बल ३६९ हेक्टर क्षेत्राला पाणी मिळाले. म्हाळूंगी नदीवरील आशापूर येथे या स्वरुपाचा उपक्रम राबविण्यात येत आहे.

कडवा बंधार्‍यावरील ८८ किमी लांबीच्या कालव्यावर पाणी वापर संस्था स्थापन करण्यासाठीही युवामित्र पुढाकार घेतला. त्यामुळे या पाण्यावर अधिकृतपणे शेतकर्‍यांचा हक्क प्रस्थिापित झाला. अन्यथा परिसरातील कारखानदारांच्या घशात हे पाणी गेले असते. जलयुक्त शिवार उपक्रमांतर्गत १९ गावांच्या शिवारातील २६ बंधारे उकरण्यात आले. गेल्या पन्नास वर्षांत साचलेला गाळ निघाल्यामुळे या प्रकल्पांमध्ये भविष्यात सुमारे ७० एमसीएफटी अतिरिक्त पाणी साठण्यची क्षमता निर्माण झाली आहे.

पाच गुंठे शेती :


केवळ पाटाचे पाणी गावांपर्यंत पोहचवून न थांबता मिळालेल्या पाण्याचा अधिकाधिक वापर काटकसरीने करण्यासाठी शेतकर्‍यांचे प्रबोधन करण्याचा उपक्रम युवामित्रने सुरु केला. मात्र केवळ भाषणबाजीने हा प्रश्न सुटणारा नव्हता. त्यामुळे शेतीमध्ये नवनविन प्रयोग करायला सुरुवात केली. त्याआधी शेतकर्‍यांचे प्रशिक्षण, अनुभव सहली आणि तज्ञांच्या भेटीगाठी आयोजिता करण्यात आल्या. एका वेळेला एकच पिक घेण्याचा पायंडा सिन्नर तालुक्यात आहे. त्यामुळे एकाच पिकाचे उत्पादन जास्त येते आणि उत्पन्न कमी मिळते. यासंदर्भात शेतकर्‍यांची चर्चा करुन पिक लागवड पध्दतीत बदल करण्यासाठी युवामित्रने प्रयत्न सुरु केले. लोणारवाडी, वडगाव आणि भाटवाडी या गावांची निवड प्रयोगभूमी म्हणून करण्यात आली. या गावातील शेतकर्‍यांचे गट तयार करण्यात आले. त्यांना प्रत्येक प्रकारचा वाण फक्त ५ गुंठे क्षेत्रावर करण्यास तयार केले. त्यामुळे एक एकर क्षेत्रात थोड्या थोड्या अंतराने ८ प्रकारच्या भाज्यांची लागवड केल्यामुळे मिळालेले उत्पादन थोडयाप्रमाणात आल्यामुळे ते शेतकर्‍याला स्वत: बाजारात नेऊन विकणे शक्य झाले. दररोज विक्रीसाठी थोडाफार माल मिळाल्यामुळे नियमित पैसे मिळण्यास सुरुवात झाली. भाव कमी जास्त झाला तरी तोट्याची अथवा नुकसानीची तीव्रता कमी झाली. या उपक्रमातील १२ शेतकर्‍यांनी शेडनेट व पॉलिहाऊस सुरु केले आहे. त्याचबरोबर १५ शेतकर्‍यांनी शेततळे तयार केले आहेत.

देवनदी व्हॅली अ‍ॅग्रीकल्चरलं प्रोड्युसर्स कंपनी लि. :


पाच गुंठ्याचा प्रयोग करणार्‍या शेतकर्‍यांना बरोबर घेऊन युवामित्रने देवनदी व्हॅली अ‍ॅग्रीकल्चरल प्रोड्युसर्स कंपनीची स्थापना केली. या कंपनी मार्फत नाशिक जिल्ह्यातील तसेच राज्यातील व राज्याबाहेरील बाजार पेठांमध्ये संबंध प्रस्थापित करुन शेतमालाचा भाव ठरविला गेला. या माध्यमामुळे स्थानिक शेतकर्‍यांचा कांदा पंजाब आणि बेंगलोर येथे पाठविण्यात आला. त्याचप्रमाणे नाशिक मधील मॉल्स बरोबर करार करुन त्याठिकाणी भाजीपाला पुरवठा सुरु झाला. नाशिक शहरातील निवडक कॉलन्यांमध्ये या कंपनीतर्फे भाजीपाला विक्री केंद्र सुरु करण्यात आली आहेत. या कंपनीची उलाढाल दीड ते दोन कोटी रुपयांच्या घरात जाते असे संबंधितांचे म्हणणे आहे. अलीकडे देवनदी ग्रो मॉलची देखील सुरुवात करण्यात आली आहे. ग्रो मॉलच्या माध्यमातून शेतकर्‍यांसाठी आवश्यक असलेले बि-बियाणे, खते ,औषधे योग्य दरात उपलब्ध करुन देण्यात येतात.

घटका, पळ आणि पारग :


ब्रिटिशांनी १८७० ते १८८० या दशकामध्ये देवनदीवर २० वळण बंधारे बांधले होते. प्रत्येक बंधार्‍यातून त्या गावाला पाणी जाण्यासाठी पाट व्यवस्था तयार करण्यात आलेली होती. या २० बंधार्‍यातून २० गावांची ६३०० हेक्टर जमिन वर्षातील ९ महिने ओलिताखाली येत असे. प्रत्येक बंधा-याला नंबर देण्यात आला होता. कोणत्या गावाला किती पाणी कोणत्या वेळेला मिळायला पाहिजे आणि त्या मिळणार्‍या पाण्यावर कोणाचा अधिकार असेल हे स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते. या नोंदीच प्रत युवामित्रकडे उपलब्ध आहे. या नोंदीनुसार ब्रिटीशांनी त्या त्या ठिकाणच्या जल स्त्रोतांचे अधिकार स्थानिक लोकांच्या नावाने केलेले होते. त्याचबरोबर शेतकर्‍यांकडून जो शेतसारा महसूल विभागामध्ये भरला जायचा त्यामध्ये पाणी पट्टी सुध्दा घेतली जायची. जी परत १०० टक्के त्या त्या गावच्या ग्रामपंचायतींना कारभार चालविण्यासाठी परत करण्यात येत असे. सिंचन प्रणाली नियमन, स्थानिक जलवितरण आणि व्यवस्थापन हे समित्यांव्दारे केले जायचे. त्यासाठी प्रत्येक गावाची समिती होती. कोणत्या शेतकर्‍याला किती पाणी व कधी द्यायचे याचा निर्णय ती समिती घेत असे. अर्धा एकर क्षेत्र भिजविण्यासाठी २४ मिनिट वेळ लागायचा हे लक्षात घेऊन पाट आणि पोटचा-यातून मिळणार्‍या पाण्याचा घटका (२४ मिनिट), पळ (३ घटका) आणि पारग (३ पळ) या स्वरुपात वितरण केले जायचे. प्रत्येक शेतकर्‍याला त्याचे क्षेत्र, मातीचा प्रकार, जमिनीची व पिकाची पाण्याची गरज आणि मेन गेट मधून वाहणार्‍या पाण्याचा वेग लक्षात घेऊन पाणी मिळायचे. सर्व शेतकर्‍यांचे क्षेत्र भिजवत सातव्या किंवा तेराव्या दिवशी आवश्यकतेनुसार पुन्हा पाण्याची दुसरी पाळी मिळायची. त्यामुळे सगळ्या गावाची जमिन तर भिजायचीच त्यामुळे पाण्याची कमतरता भासत नव्हती.

वडगावचे अण्णा नारायण कोटकर :


पाटचार्‍या पुनरुज्जीवित झाल्याचा आम्हांला शंभर टक्के फायदा झाला. त्यामुळे आम्ही उन्हाळी पिकं घेऊ शकतो. लागवडी संदर्भातच्या ज्ञानेश्वर बोडकेंच्या प्रशिक्षण वर्गात सहभागी झाल्यामुळे पाण्याचा काटसरीने वापर करुन शेती करण्याचे तंत्र आत्मसात झाले. देवनदी व्हॅली कंपनीस आम्ही भाजीपाला देतो. थेट पंजाबमधील मलरकोटपर्यंत आमचा कांदा जातो. स्थानिक व्यापार्‍यांपेक्षा आम्हास १५० रुपये प्रती क्विटंलमागे जास्त मिळतात. अंधेरीच्या स्टार इंडिया मॉलमध्ये आमचा जातो हे परिवर्तन केवळ युवामित्रने पुढाकार घेऊन अमलात आणलेल्या उपक्रमांमुळे शक्य झाले असे वडगावचे शेतकरी अण्णा नारायण कोटकर यांचे म्हणणे आहे.

श्री. संजय झेंडे, धुळे - मो : ०९६५७७१७६७९