मूलस्थानी जलसंधारणामुळे हिवरेगावाचा प्रवास समृध्दीकडून स्वयंपूर्णतेकडे

Submitted by Hindi on Sat, 08/12/2017 - 15:43
Source
जलसंवाद, जुलै 2017

सिने अभिनेता आमीर खान याच्या पुढाकाराने वॉटरकप स्पर्धा सुरु झाली. हिवरे गावाने या स्पर्धेत भाग घेण्यासाठी जलसंधारणाच्या कामाची धडाकेबाज अमलबजावणी सुरु केली. स्पर्धेच्या वातावरणामुळे श्रमदानाचा टक्का वाढला. कामाचा वेग वाढला. मात्र हिवरे गावाने स्पर्धेपूर्वी काही वर्षे आधीच गावाच्या कानाकोपर्‍यात बहुसंख्य कामे केली असल्यामुळे स्पर्धेच्या नियमानुसार ४५ दिवसांत करण्यासाठी मोठे असे कामच शिल्लक नव्हते.

सह्याद्री पर्वत रांगांच्या पायथ्याशी वसलेल्या हिवरे गावाचं पाणलोट क्षेत्र जलाजल करण्याचा ध्यास घेतलेल्या सरपंच अजित रघुनाथ खताळ यांच्या आजपर्यंतच्या प्रवासाचं वर्णन खडतर या शब्दातच होऊ शकेल. जलसंधारणाचं काम म्हणजे, केवळ साठलेल्या पाण्याच्या पार्श्वभूमीवर फोटो काढून तो व्हायरल करणं एवढ्या पुरता सीमीत नाही. अशी धारणा असलेल्यांनी अजित खताळ यांचा संघर्ष मुळापासून जाणून घेणं अगत्याचं ठरेल. गायरान जमीनीवर चराई बंदी, कुर्‍हाड बंदी केली म्हणून मेंढीपालनाचा व्यवसाय असलेल्या ९५ टक्के ग्रामस्थांच्या रोषाला त्यांना सामोरे जावे लागले. जलसंधारणाच्या कामांमुळे वाढलेली लोकप्रियता आपल्या वर्षानुवर्षाच्या सत्ता वर्चस्वाला सुरुंग लावण्यास कारणीभूत ठरु शकते; या धास्तीतून त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. प्रस्थापित सत्ताधार्‍यांनी अजित आणि त्यांच्या सहकार्‍यांना तुरुंगात धाडले. या संघर्षातून अधिक कणखर झालेल्या अजित खताळ आणि चमूने ग्रामपंचायतीची निवडणूक लढविली. ७ विरुध्द ० असा जनादेश घेत ग्रामपंचायतीची सत्ता हस्तगत केली. अजेंडा राबवायचा तो केवळ विकासाचा, गावाच्या समृध्दीचा अशी पक्की धारणा असलेल्यांचे आगमन ग्रामपंचायतीत झाले. अजेंडा ठरला. जलसंधारणाचे विविध प्रयोग अमलात आणण्यासाठी सत्तेची जोड मिळाली आणि हिवरे गावाचा प्रवास केवळ हिरवाई अथवा टँकरमुक्तीच्या दिशेने नव्हे तर समृध्दीकडून स्वयंपूर्णतेकडे सुरु झाला.

हिवरे हे सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील १३७८ वस्तीचं गाव. एकूण क्षेत्र ८७५ हेक्टर. पैकी २१८ हे वनक्षेत्र. सातारापासून ३० किमी तर कोरगांवपासूनचं अंतर पश्चिमेस अवघे १८ किमी. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या हिवरे गावाचा पृष्ठभाग काहीसा उथळ तबकडी सारखा दिसतो. हा परिसर भीमा नदी खोर्‍यात उंचावर असल्यामुळे पाटचारीचं पाणी या गावापर्यंत पोहचत नाही. आधीच पर्जन्यछायेचा प्रदेश. त्यात या तालुक्याची गेल्या पाच वर्षातील पावसाची सरासरी केवळ ७०० मिमी. त्यामुळे कोरेगावहून निघाल्यानंतर वाटेत आधी भेटणारी कुमठे, भोसे आणि चंचाळी या पाटाचं पाणी मिळणार्‍या गावांइतपत हिरवाई अजित खताळांच्या हिवरे गावात आढळत नाही. रखरखीत शिवारं आणि उजाड डोंगर हीच हिरवे गाव जवळ आल्याची खूण. गावाच्या तीन बाजूने डोंगर. डोंगरावर पडणारा पाऊस ओढे, नाले आणि वांगना नदीच्या माध्यमातून क्षणार्धात वाहून भीमेस मिळणारा. नोव्हेंबर/डिसेंबरपासूनच पाण्यासाठी वणवण ठरलेली. टँकरव्दारे पाणी पुरवठा ही नियतीचीच इच्छा अशी श्रध्दा (!) असलेलं ग्रामस्थ.

निमित्त सततच्या दुष्काळाचे :


बी.एस्सी. (Agri) पर्यंत शिक्षण झालेल्या अजित खताळ आणि त्यांच्या तरुण सहकार्‍यांना ही परिस्थिती अस्वस्थ करीत असे. दुष्काळाच्या दुष्टच्रकातून गावाला बाहेर कसं काढावं यावर चर्चा होतं असे. परंतू दिशा सापडत नव्हती. सेवानिवृत्तीनंतर स्वत:ची शेती कसण्यासाठी गावातच स्थायिक झालेले संदेश कुळकर्णी पूर्वी नोकरीनिमित्त महाराष्ट्र भर हिंडलेले. जलसंधारण विषय कामातून राज्यात अन्यत्र झालेले आमुलाग्र बदल त्यांनी पाहिले होते. ते या तरुणांची धडपड पाहत होते. स्वत: संदेश कुळकर्णी यांनी २००३ ते २००५ या तीन वर्षांच्या कालावधीतील दुष्काळाची झळ सोसलेली . पिण्यासाठी लागणारं पाणी टँकरव्दारे येत असे. शेतीसाठी पाणी नसल्यामुळे त्यांनी शेती करणे सोडून दिलं आणि ते सातार्‍यातील घरी येऊन राहिले. तत्पूर्वी त्यांनी १४ पैकी २ बैल ठेवले आणि बाकीचे वाटून दिले. या कालावधीत त्यांच्या बांधावरील १३५ पैकी केवळ ३५ आंब्याची झाडं शिल्लक राहिली. पुन्हा अशी वेळ येऊ नये असे त्यांना वाटत होते. अजित खताळ आणि चमू यांच्या समवेत होणार्‍या चर्चेतून अखेर परिसरातील डोंगरांचा उपयोग करुन पाणलोट क्षेत्र विकासाचं काम करण्याचा संकल्प सोडण्यात आला. या पध्दतीने पोपटराव पवार यांनी नगर जिल्हयातील हिवरे गावात केलेलं परिवर्तन पाहण्यासाठी अजित खताळ आणि ग्रामस्थांची सहल नेण्यात आली. या सहलीत महिलांचा सहभाग मोठ्याप्रमाणावर होता. त्यानंतर मात्र ग्रामस्थांची मानसिकता बदलली. जलसंधारणाच्या विविध प्रयोगांची अमलबजावणी करण्याचा धडाका सुरु झाला.

ध्यास.... पाणलोट क्षेत्र विकासाचा :


पाणलोट क्षेत्रात पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब मुरविण्याचाच असे पक्के ठरले. स्वत: बी.एस्सी.Agri असलेल्या अजित खताळ यांना जलसंधारणासाठी अत्यंत प्रभावी असलेले डीपसीसीटी आणि सीसीटी - समतल चर तंत्र चांगले अवगत होते. त्याअनुषंगाने स्थानिक मजूर तसेच उत्साही ग्रामस्थांना प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर माथा ते पायथा या तंत्रानुसार डीप सीसीटी, सीसीटी, मातीचे बंधारे, सिमेंट बंधारे आणि जुन्या पाझर तलावांमधून गाळ काढण्याचा धडाका सुरु झाला. हिवरे गावाच्या शिवारात जोरदार मोहीमच राबविली गेली. ही मोहीम राबविण्यापूर्वी ग्रामदैवत असलेल्या भैरवनाथ मंदिरास रंगरंगोटी करण्यात आली. यात्रेनिमित्ताने एकत्र आलेल्या ग्रामस्थांचे प्रबोधन करण्यात आले. पाणी साठविण्यासाठी मोठ्याप्रमाणावर भांडी तयार करण्यात आली. राज्य शासनाच्या विविध विभागांच्या अनेकविध योजनांच्या माध्यमातून प्राप्त झालेला निधी, लोकसहभाग, किसनवीर सहकारी साखर कारखान्याचा सहयोग आणि समर्पित भावनेने काम करणारं स्थानिक नेतृत्व यामुळे अल्पापधीतच अवघ्या १३७८ लोकसंख्या असलेल्या हिवरे गावाचं नाव पाणलोट क्षेत्र विकासाच्या बाबतीत सर्वत्र घेण्यात येऊ लागलं. अभिनेता आमीर खान यांच्या विशेष पुढाकाराने सुरु झालेल्या वॉटरकप स्पर्धेतील सहभागींसाठीचे प्रशिक्षण केंद्र म्हणून सन २०१६ मध्ये हिवरे गावाची निवड झाली. ग्रामस्थांच्या श्रमाचं चीज झालं.

तंत्र छोटे मंत्र मोठा - डीपसीसीटी, सीसीटी आणि बांधबंदिस्ती :


अर्थात हा बहुमान प्राप्त होण्यासाठी काही वर्षे जावी लागली. अनेक अडथळे पार करीत जलसंधारणासाठीचे काम नेटाने करावे लागले. जिथे जागा दिसेल तिथे डीपसीसीटी, सीसीटी खोदण्यात आल्या. बांधबंदीस्ती करण्यात आली. गावाच्या तीनही बाजूस असलेल्या डोंगरांवर हे काम करण्यात आले. या तंत्राचे एक वैशिष्टय अजित खताळ यांना अतिशय भावते. माथ्या पासून पायथ्याच्या दिशेने साखळी पध्दतीने स्थानिक भौगोलिक परिस्थितीनुसार डीपसीसीटी अथवा सीसीटी खोदण्यात येतात. त्यामुळे डोंगराच्या माथ्यावर पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब अन् थेंब जागेवरच अडविला जातो. पाऊस असतो तो पर्यंत पाणी साठलेले दिसते. नंतर सर्व पाणी मुरते. ते वाहून जात नाही. एका डीप सीसीटीचा आकार साधारण २० मीटर लांब,१ मीटर खोल आणि १ मीटर रुंद असा असतो. त्यामुळे पावसाचे पाणी तेथेच अडविले जाते. पुढे वाहताना दिसत नाही. अशा पध्दतीने प्रारंभीच्या टप्प्यात १७५०० मीटर डीपसीसीटीची कामे झालीत. तसेच सुमारे १७.५ किमीचे चर खोदण्यात आले. पुढे ओढे व नाल्यांवर मातीचे तसेच सिमेंट बंधारे उभारुन बांधबंदिस्ती करण्यात आली. यापैकी पिचिंग करणे, सांडवे काढणे, माती वाहून नेणे, झाडं लावण्यासाठी खड्डे खोदणे शिवाय जलसंधारणाची लहान मोठी कामे ग्रामस्थांनी श्रमदानातून केली. काही शेततळ्यांची उभारणी देखील लोकसहभागातून करण्यात आली.

लाखमोलाचा लोकसहभाग…


एरव्ही कोट्यावधी रुपये खर्चून झाली नसती अशी कामे श्रमदानातून उभारण्यात आली. अशा पध्दतीने सुमारे ४०० हेक्टरच्या आसपास बांधबंदिस्ती करण्यात आली . त्याआधी गाळ काढण्यात आला. त्यामुळे साठवण क्षमता वाढली. डोंगर उतारावर मुरलेले पाणी पुढे ओहोळ, ओढयांमध्ये प्रकट झाले ते अतिशय स्वच्छ व नितळ स्वरुपात. गावाजवळून वाहणार्‍या नदीत पाणी दिसत नव्हतं. मात्र हिवरे गावाजवळ असलेल्या तलावात पाणी होतं. जलसंधारणाच्या अनोख्या तंत्राची ही कमाल होती. अशा पध्दतीने डीपसीसीटी, सीसीटी आणि बांधबंदीस्तीचे हिवरे गावाच्या शिवारात जाळं तयार करण्यात आले. त्यामुळे अशा स्वरुपाची कामे करण्यासाठी आज एक जागा शिल्लक नाही. पुढच्या पिढीने यातील गाळ काढण्याचे काम जरी केले तरी पाणी टंचाईचे संकट हिवरे गावावर भविष्यात कधी येणार नाही. हिवरे गावास धरणाची गरज नाही, असे अजित खताळ ठामपणे सांगतात.

किसानवीर सहकारी साखर कारखान्याची मदत :


गेल्या काही वर्षांपासून सुरु असलेल्या या प्रयोगांचे दृष्य परिणाम आता दृष्टीपथात येऊ लागले आहेत. परिसरातील कवठी, कवडीवाडी तसेच अन्य गावांमध्ये एप्रिलमध्ये पाण्याची बिकट स्थिती असताना हिवरे गावाच्या शिवारात ऊसाचे पीक डोलतांना दिसते. ऐन उन्हाळ्यात विहिरींमध्ये दिसणारे पाणी पाहून वॉटरकप स्पर्धेच्या प्रशिक्षण वर्गात सहभागी झालेले मराठवाड्यातील स्पर्धक हारखून गेले होते. हिवरे ग्रामस्थांचा धडाका पाहून किसानवीर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मदनराव भोसले यांनी कारखान्याचे मालकीचे जेसीबी हिवरे गावात पाठवून दिले. डोंगरमाथ्यावर अतिशय उंचावर ते मशीन चढविण्यात आले. त्यामाध्यमातून डोंगर उंचावरील सुमारे ३०० हेक्टर परिसरत डीपसीसीटी व सीसीटीची कामे करण्यात आली. गावाच्या पूर्वेकडील पाणलोट क्षेत्र विकसित करणे या मदतीमुळे शक्य झाले. याशिवाय तेरावा वित्त आयोग, पर्यावरणाचा निधी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचा महत्वाकांक्षी उपक्रम असलेल्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत मिळालेले सहाय्य यामुळे हिरवे गावाच्या शिवारात जलसंधारणाची सर्वाधीक कामे झालीत. आज काम करण्यासाठी जागा शिल्लक नाही अशी अवस्था आहे. ही कामे करीत असताना अधून मधून खटके उडत. कुणाच्या खाजगी जागेत सीसीटी अथवा डीपसीसीटीची कामे घेतली जात. परंतू चर्चेतून मार्ग काढीत पुढे जाण्याचे धोरण टीम अजित खताळने स्वीकारले. पुढे जलसंधारण कामाचे दृष्य परिणाम दिसू लागले, नंतर मात्र ग्रामस्थांची मानसिकता बदलली. ठिंबक आणि तुषार सिंचनासाठी आता ग्रामस्थ पुढाकार घेऊ लागले आहेत.

ओढे-नाले जोड :


हिवरे गावाचे पाणलोट क्षेत्र विकसित करण्यासाठी जागोजागी डीपसीसीटी, सीसीटी, बांधबंदिस्ती अशा स्वरुपाची कामे करण्यात आली. आज अशा स्वरुपाची कामे नव्याने करण्यासाठी जागा शिल्लक नाही. मात्र पाऊस पडण्याचे ठिकाण निश्चित नसते. ज्या परिसरात पाऊस पडला. तेथे पाणी मुरते. काही अंतरावर ते प्रकट होते आणि ओढे नाले वाहताना दिसतात. त्याचवेळी ज्या भागात पाऊस पडत नाही. त्या परिसरातील ओढे-नाले कोरडे दिसतात. या पार्श्वभूमीवर पाणलोट क्षेत्रातील ओढे, नाले आणि चार्‍या एकमेंकांना जोडण्याचा उपक्रम राबविण्यात आला आहे. त्यामुळे गावाच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याचे चौफेर संचलन होऊ शकेल, शिवाय ओढे, नाले यामधून ओव्हरफ्लो होऊन पाणी अन्यत्र वाहून जाणार नाही. ते गावाच्या पाणलोट क्षेत्राच स्थिरावेल यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात येतात.

गरज ही शोधाची जननी - संदेश कुळकर्णी :


डोंगर रांगांच्या पायथ्याशी असल्यामुळे सुरुवातीपासूनच हिरवे गावात पाण्याची चणचण जाणवत असे. सन २००३ ते २००५ या कालावधीतील दुष्काळाची झळ स्वत: अनुभविली. त्या काळात मी सातार्‍यात जाऊन राहिलो. तेव्हा लोकं म्हंटले तुमचं ठीक आहे, तुमचं घर सातार्‍यात आहे. आम्ही कुठं जायचं. तेव्हा पासून काहीतरी कराचचं असं डोक्यात होतं. अजित खताळ आणि त्याची मित्रमंडळी याच विचारांची होती. गावाच्या गरजेतून पाणलोट क्षेत्र विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला. गावाच्या पाणलोट कमिटीचे अध्यक्षपद अजित खताळ यांच्याकडे सोपविण्यात आले आणि कामास सुरुवात झाली. पुढे पाणलोट कमिटीचा अध्यक्ष हाच गावाचा सरपंच असला पाहिजे असा निर्णय शासनाने घेतला. तेव्हा गावातील प्रस्थापित राजकारणी मंडळींचा पाणलोट संबंधीच्या कामांमध्ये रस वाढला. त्यांनी अजित आणि मित्र मंडळींची घौडदौड रोखण्यासाठी विविध उपाय करुन त्यांना जेरीस आणले. खोटे गुन्हे दाखल केले. त्यामुळे काही दिवस त्यांना तुरुंगवास देखील भोगावा लागला. नंतर मात्र पाणलोट क्षेत्र जर विकसित करायचे असेल तर त्या क्षेत्राची आवड असलेल्यांनीच ग्रामपंचायतीचे नेतृत्व करायला हवे असे ठरले आणि निवडणूक लढविण्यात आली. सात विरुध्द शून्य याप्रमाणे निकाल घोषित झाला आणि अजित खताळ यांचे पूर्ण पॅनेल निवडून आले. नंतर पाणलोट क्षेत्र विकसित करण्यासाठीचा अजेंडा राबविण्यासाठी ही टीम अहर्निश पाठपुरावा करताना दिसते. गावाच्या गरजेतून ही चळवळ निर्माण झाली. जलसंधारणाची ही कामे झाली नसती तर गावाची परिस्थिती कठीण होती, असे संदेश कुळकर्णी यांचे म्हणणे आहे.

पाणीदार कलेक्टर अश्विन मुदगल खंबीर पाठीराखे- अजित खटाळ :


सातारा जिल्ह्याचे पाणीदार कलेक्टर म्हणून ज्यांचा गौरवाने उल्लेख केला जातो त्या अश्विन मुदगल यांचा वरदहस्त हिवरे गावास लाभला. त्यामुळे विविध शासकीय योजनांच्या अमलबजावणीमधील क्लिष्टता टाळण्यास मदत झाली, पर्यायाने अधीक गतीने योजना राबविणे शक्य झाले. जिल्हाधिकारी मुदगल यांनी सातारा जिल्ह्यात राबविलेल्या जलयुक्त अभियानाची दखल राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे यांनी घेतली. महसूल, वन, जिल्हा परिषद आणि कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांच्या सकारात्मक सक्रीय पाठिंब्यामुळेच हिवरे गावाची वाटचाल जल समृध्दीकडून स्वयंपूर्णतेकडे होण्यासाठी हातभार लागला, असे सरपंच अजित खताळ यांचे म्हणणे आहे. याशिवाय ग्रामस्थांना देखील श्रेय द्यावे लागेल. विरोधकांनी विरोध केला नाही त्यामुळे काम सुरळित झाले. गावावर प्रेम करणार्‍या, नोकरी व्यवसायानिमित्ताने गावाबाहेर गेलेल्या असंख्य हिवरेवासीयांनी हे अभियान अधिकाधिक यशस्वी होण्यासाठी योगदान दिले आहे.

हिवरे गावातील...............कल्पक आणि वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम.....ग्रामपंचायतीच्या उत्पन्न वाढीसाठी सीताफळाची लागवड...

हिवरे गावाच्या पश्चिमेस ३३ हेक्टर क्षेत्र गायरान क्षेत्र आहे. याठिकाणी ५५०० सीताफळाची झाडं लावण्यात आली. ती जगविण्यासाठी विहिर खोदण्यात आली आणि ठिंबक सिंचनाव्दारे पाणी देऊन ही झाडं जगविण्यात आली. याशिवाय गावाच्या प्रवेशव्दाराच्या अलीकडे असलेल्या १५ हेक्टर गायरान क्षेत्रावर देखील सीताफळाची लागवड करण्यात आली. सीताफळावर प्रक्रिया करणारा उद्योग उभारण्याचा अजित खताळ यांचा मानस आहे. त्यासाठी आवश्यक असलेला कच्चा माल गावातूनच उपलब्ध करण्याची तरतूद यानिमित्ताने करण्यात आली आहे. एका झाडापासून १०० रुपये उत्पन्न गृहीत धरले तरी साडे पाच हजार झाडांपासून साडे पाच लाख रुपये या माध्यमातून ग्रामपंचायतीस मिळू शकतात. त्यामुळे सीताफळाची झाडं जगविण्यासाठी प्रारंभीची काही वर्षे टँकर व्दारे पाणी पुरवठा करण्यात आला. नंतर मात्र जलसंधारणाच्या विविध प्रयोगांमुळे विहिरी तुडुंब भरल्या. ठिंबक सिंचनाचे अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरुन सीताफळांस पाणी देण्यास सुरुवात झाली. सीताफळांची लागवड करण्यात आलेल्या गायरान क्षेत्रामध्ये जनावरांना चराईसाठी बंदी घालण्यात आली. स्थानिक मेंढपाळांना चराईसाठी अन्य पर्याय उपलब्ध करुन देण्यात आले.

स्वत:चा आरो प्लॅन्ट असलेली ग्रामपंचायत :


ग्रामपंचायतीची सत्ता ताब्यात आल्यानंतर अजित खताळ आणि चमूने पिण्याचं आणि शेतीचं पाणी या बाबीला अग्रक्रम देण्याचं ठरविलं. त्यामुळे आज हिवरे गावात रस्ते अथवा गटारींची अवस्था फारशी चांगली दिसत नाही. मात्र ग्रामस्थांसाठी शुध्द पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी ग्रामपंचायतीने आरओ प्लॅन्ट सुरु केला आहे. दहा रुपयात वीस लिटरचा जार उपलब्ध करुन देण्यात येतो.

४०० एकरसाठी ठिंबक सिंचनाचा एकत्रित प्रस्ताव पाण्याचा प्रत्येक थेंब त्या त्या पाणलोट क्षेत्रात जिरविण्यासाठी विविध उपाय अमलात आले. त्यामुळे विहिरींची पाण्याची पातळी वाढली. पाणी सहज उपलब्ध झाले. म्हणून पाण्याची उधळपट्टी होऊ नये यासाठी ठिंबक आणि तुषार सिंचनासाठी शेतकरी अनुकुल व्हावेत यासाठी त्यांचे प्रबोधन करण्यात आले. परिणाम स्वरुप ४०० एकरसाठी एकत्रित प्रस्ताव तयार झाला. ठिंबक सिंचनासाठीचं साहित्य उपलब्ध करुन देणार्‍या कंपनीने १२ टक्क्यापर्यंत सूट दिली. याशिवाय ठिंबक सिंचनासाठी सोसायटीमार्फत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून कर्ज घेतलेल्या कर्जदार शेतकर्‍यांना पाच हजार रुपयांपर्यंत व्याजात सूट देखील मिळाली. ठिंबक सिंचनामुळे पाण्याची उधळपट्टी तर थांबली शिवाय ऊसाचा दर्जा देखील सुधारला.

हिवरे राज्यातील पहिले वन ग्राम :


राज्यपालांच्या अध्यादेशानुसार हिवरे हे राज्यातील पहिले वनग्राम आहे. गायरान जमिनीवर मोठ्या प्रमाणावर केलेली सीताफळाची लागवड आणि अन्यत्र पडीक जमीनीवर केलेले वृक्षारोपन पाहून प्रभावित झालेल्या वन आणि महसूल विभागाच्या अधिकार्‍यांनी सकारात्मक भूमिका घेतल्यामुळे हिवरे गावास वन ग्राम दर्जा मिळाला आहे. सुमारे २१८ हेक्टर वनक्षेत्राची मालकी गावाकडे सोपविण्यात आली आहे. वृक्ष लागवडीकडे विशेष लक्ष दिल्यामुळे या परिसरात विविध प्राणी व पक्षी यांची रेलचेल वाढली आहे. या ठिकाणी वनशेती करण्याचा मानस आहे. तसेच वनपर्यटन आणि कृषीपर्यटन या दोन्हीं मेळ घालून या संकल्पना राबविण्याचा देखील अजित खताळ यांचा मानस आहे. राज्यातील हा पहिला प्रयोग ठरणार आहे. हिवरे गावास वनग्राम दर्जा प्राप्त झाल्यामुळे ५५० हेक्टरचे अतिरिक्त क्षेत्र वृक्षलागवडीसाठी उपलब्ध झाले आहे. याठिकाणी बांबू तसेच फळ झाडांची लागवड करण्याचा मनोदय व्यक्त करण्यात आला आहे. या ठिकाणी येणा-या पर्यटकांना त्या त्या ऋतूमधील फळं उपलब्ध व्हावीत असा मंडळींचा प्रयास आहे. एरव्ही वनविभागाच्या मालकीच्या क्षेत्रात रस्ते,धरणे अथवा बांध बंदिस्तीकरणे अशक्यप्राय ठरते. मात्र हिवरे गावच वनग्राम असल्यामुळे आठ किमीची पायवाट तयार करणे शक्य झाले. त्यामुळे एरव्ही वाठार स्टेशनला जाण्यासाठीचे २४ किमी अंतर पार करावे लागणे थांबले. वन, महसूल आणि जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी सकारात्मक भूमिका घेतल्यामुळे ही अशक्यप्राय बाब शक्य झाली.

वॉटर कप स्पर्धेसाठीचं ट्रेनिंग सेंटर :


सिने अभिनेता आमीर खान याच्या पुढाकाराने वॉटरकप स्पर्धा सुरु झाली. हिवरे गावाने या स्पर्धेत भाग घेण्यासाठी जलसंधारणाच्या कामाची धडाकेबाज अमलबजावणी सुरु केली. स्पर्धेच्या वातावरणामुळे श्रमदानाचा टक्का वाढला. कामाचा वेग वाढला. मात्र हिवरे गावाने स्पर्धेपूर्वी काही वर्षे आधीच गावाच्या कानाकोपर्‍यात बहुसंख्य कामे केली असल्यामुळे स्पर्धेच्या नियमानुसार ४५ दिवसांत करण्यासाठी मोठे असे कामच शिल्लक नव्हते. पूर्वीच सर्व कामे झाली होती. पूर्वी केलेल्या कामांमुळे पाण्याची पातळी वाढली होती. एप्रिलमध्ये विहिरींना पाणी होते. या कामाची कीर्ती वॉटरकप टीमकडे पोहोचली होती. सत्यजित भटकळ यांनी गावाची पाहणी केली. त्यामुळे स्पर्धेत सहभागी झालेल्या विविध गावांमधील नागरिकांना एक जलसंधारणाचे मॉडेल पाहण्यास मिळावे म्हणून हिवरे गावातच ट्रेनिंग सेंटर सुरु करण्यात आले. डॉ. अविनाश पोळ यांच्या मार्गदर्शनानुसार ट्रेनिंग सेंटरसाठी सोयी सुविधा निर्माण करण्यात आल्या. बीड जिल्ह्यातील स्पर्धेत या प्रशिक्षण वर्गात सहभागी झाले होते. मंडळी ऐन एप्रिलमध्ये तुडूंब भरलेल्या विहिरींमध्ये पोहण्यासाठी सूर मारीत.

श्री. संजय झेंडे, मो : ०९६५७७१७६७९
संपर्क :
Website : www.hivaregrmpanchayat.in, सरपंच : अजित रघुनाथ खताळ, मु.पो. हिवरे, ता.कोरेगाव, जि. सातारा , मोबाईल : ७२१९८१२११८