एक राष्ट्रीय वसा - शुध्द पाणी

Submitted by Hindi on Fri, 03/04/2016 - 10:58
Source
जल संवाद

नद्यांचा एक प्रश्न! उरलेले जलसाठे म्हणजे तलाव, सरोवरे, पायविहिरी, गाव तलाव, पाझर तलाव, बंधाऱ्यांमागचे जलसाठे इत्यादी. त्यांच्या वरील प्रकारे प्रदूषित होण्याबरोबरच धुणी धुणे, भांडी घासणे, साबण लावून आंघोळ करणे, जनावरे धुणे हे जलसाठे प्रदूषित होण्याचे इतर प्रकार आहेत.

पाणी ! जीवनाधार पाणी! चुकलो, सारे जीवन म्हणजेच पाणी किंवा पाणी म्हणजेच जीवन! पाण्याशिवाय जीवन हे कल्पनेतही शक्य नाही. हे त्रिकालाबाधित सत्य आहे.

आणि प्रत्यक्षातले वास्तव ! ह्या भीषण सत्याला किती भयानकता प्राप्त होऊ शकते ह्याचे प्रत्यक्षदर्शी चित्र आहे. जागतिक आरोग्य संघटनेचा गेल्या वर्षीचा अहवाल म्हणतो (WHO Report 2008) जगातल्या 11 कोटी लोकांना शुध्दपाण्याच्या संकल्पनेपर्यंतही पोहोचता येत नाही. जगातले 13 टक्के लोक हे शुध्द पाण्यापासून वंचित आहेत. काही आफ्रिकी देशात ( Sub Sahara African Countries) तर ही टक्केवारी 42 एवढी वाढते.

ह्या सगळ्याचा परिणाम म्हणजे शुध्द पाण्याअभावी दरवर्षी सुमारे एक लाख लोक मृत्युमुखी पडतात. त्याहून कितीतरी पट लोक हे जलजन्य विकारांचे शिकार ठरतात. कॉलरा, हत्तीपाय, कावीळ ह्यासारखे अनेक रोग हे ह्या अशुध्द पाण्याचे माध्यमातून निर्माण होतात.

ह्या शतकातील मानवाने साध्य करावयाच्या गोष्टींबाबत काही ध्येये युनोने निश्चित केली आहेत. (MGD - Millinum Goals of Development) त्यानुसार सन 2015 पर्यंत मानवी जीवन अधिक सुखकर व्हावे म्हणून सर्व जनतेला स्वच्छ व शुध्द पाणी मिळावे हे ध्येय जगासमोर ठेवण्यात आले आहे.

वास्तविक पहाता पाणी ह्या प्रश्नाचा आर्थिक उत्पन्नाशी सरळ संबंध नाही. तसा निदान तो नसावा. सर्व देशांच्या राजसत्ता आपल्या कल्याणकारी योजनांमध्ये पाणी हे समाजहिताचे म्हणून एक कर्तव्य आहे असे मानतात. पण तरीही ज्यांचे उत्पन्न कमी आहे अशा जगातल्या 25 टक्के लोकांना सन 2009 अखेरपर्यंत शुध्द पाणी मिळत नाही ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही.

ह्याच लेखात अन्यत्र दिलेल्या जगाच्या नकाशाकडे पाहिले तरी हीच वस्तुस्थिती ठळकपणे नजरेत भरते. ज्यांचे सरासरी दरडोई उत्पन्न 760 डॉलर्स पेक्षा कमी आहे अशा देशांमध्ये हा शुध्दपाण्याचा प्रश्न हा फार मोठ्या प्रमाणावर आढळून येतो. आणि तरीही दक्षिण अमेरिका, आफ्रिकेचा काही भाग येथील तपशीलवार आकडेवारी अंदाज अधिकृतपणे उपलब्ध नाही. दरडोई वार्षिक उत्पन्न 1381 डॉलर्स किंवा त्यापैक्षा अधिक अशा अर्थसंपन्न देशांना ह्या शुध्दपाणी पुरवठ्याचे प्रश्नावर मात करता आली आहे असे विधान निश्चितपणे करता येते.

जिथे कुठे सुबत्ता आहे तिथला विचार हा एक वेगळा प्रश्न झाला. परंतु नाही रे चे 25 टक्के क्षेत्र आहे त्याचा विचार केला नाही तर ह्या विषयाकडे आपण उघड्या डोळ्यांनी पाहिलेच नाही असे ठरेल. त्यामुळे ह्या दोन्ही विभागांचा स्वतंत्रपणे विचार मांडावा लागणार आहे. आणि हे एवढे सगळे ह्या एवढ्या छोट्याशा लेखात कोंबण्याची सर्कसही करावी लागणार आहे.

प्रश्न शुध्द पाण्याचा :


शुध्द पाण्याचा प्रश्न ज्या ज्या वळणांवरून हाताळावा लागतो त्या मुद्यांचा नुसता उल्लेख करतो. 1. पाण्याची उपलब्धता 2. पाण्यात विरघळलेली अशुध्दता 3. पाण्यात न विरघळलेली अशुध्दता 4. जैविक अशुध्दता 5. पाणी शुध्द करण्याची प्रक्रिया 6. पाणी शुध्द करण्यासाठी उपलब्ध असलेले वेगवेगळ्या पध्दतीचे तंत्रज्ञान 7. पाणी शुध्द करण्यासाठी ह्या विविध तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या पध्दती. 8. जलशुध्दतेच्या कामासाठी उपलब्ध असलेल्या वस्तु व साहित्य. 9. निसर्गाच्या स्वत:च पाणी, हवा शुध्द करून हवामानाच्या गुणधर्माचा वापर करून तयार होऊ शकणाऱ्या इको-फ्रेंडली जलशुध्दीकरणाच्या पध्दती. ह्या इतक्या मुद्यांचा उहापोह केला तर ह्या विषयासंबंधीत बाबींना नुसता स्पर्श केला असे म्हणता येईल.

पृथ्वीवर 70 टक्के भागात पाणी असले तरी मानवी गरजांना उपयुक्त असे पाणी केवळ 0.80 टक्के इतके कमी आहे. हे पाणी आपल्याला मिळावयाचा मुख्य स्त्रोत म्हणजे पाऊस ! हिमवृष्टी, बफळ प्रदेशात बर्फ वितळून तयार होणारे पाणी, दव व धुके यांतून मिळणारे पाणी, हे अन्य जलस्त्रोत आहेत. भूगर्भातील पाणीही काही अंशी उपलब्ध होते. पण ते ही पावसाच्या पाण्यामुळेच तेथे पोहोचलेले असते.

ढगातून मिळणारे पावसाचे पाणी हे बहुधा सगळ्यात शुध्द असते. पहिल्या पावसाचे वेळी हवेतील अशुध्दता, धुलीकण, आम्लधर्मी वापू वगैरे त्यात मिसळतात. त्यामुळे अनेक ठिकाणी पहिल्या पावसाचे पाणी आम्लधर्मी असल्याचे जाणवते मात्र त्यानंतर शुध्द पाऊस पडतो.

जमिनीचा स्पर्श झाला की तीन प्रकारच्या अशुध्दता ह्या त्या पाण्यात उतरतात. 1. पाण्यात विरघळलेली अशुध्दता अनेक प्रकारची रासायनिक द्रव्ये ही पाण्यात सहजपणे विरघळतात. त्यामुळे सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम पासून अर्सेनिक सारख्या विषारी घातुंपर्यंत अनेक पदार्थ हे सहजपणे पाण्यात विरघळतात. न विरघळणारे धुलीकण, गाळ व माती, शंख शिंपंले सारखे कॅल्शियम असलेल्या वस्तु, जैविक वस्तु उदा. पाने, झाडांची मुळे, गवत, मृत मासे व इतर जलजन्यजीव, नदीचे पात्रात फेकून दिलेले अन्य मृतप्राणी अथवा त्यांचे शरीर अंश, शेतात वापरलेली व त्यामुळे पाण्यात विरघळून वाहून आलेली खते व जंतुनाशके, अमिबासारखे सूक्ष्म जीव व असंख्य प्रकारचे जीवाणू आणि विषाणू! मानवी विष्ठा व मलमूत्र हेही ह्या अशुध्दता करण्याचे एक मोठे कारण आहे.

ही सगळी अशुध्दता काढून टाकून तसेच आम्लता अथवा अम्लारीता जी असेल ती दूर करून 7.00 चे आसपास पी.एच (PH) हे पाण्याची आम्लता वा अम्लारीता मोजण्याचे एकक असून त्यानुसार 1 ते 14 विभागात ही मोजली जाते. असलेले स्वच्छ व शुध्द पाणी मिळविणे हे साध्य करता येणे शक्य आहे.

न विरघळलेली अशुध्दता ही गाळणे (Filtration) तसेच स्थिरावणे (Settling) ह्या प्रक्रियेने दूर करता येते. इतर अशुध्दता काढून टाकण्यासाठी -

1. अजर्वपातव (Distilation)
2. आयन एक्चेंज
3. कार्बन अॅडॉप्शन
4. गाळण (Filtration)
5. अल्ट्राफिल्टरेशन
6.आर.ओ (Reverse Osnesis)
7. इलेक्ट्रो आयोनायझेशन
8. अल्ट्राव्हॉयलेट किरणे
9. ह्या एका पेक्षा अधिक वा सर्व प्रकारांच्या एकत्रित वापर.

अशा आठ प्रकारांचा घरगुती तसेच सार्वजनिक प्रमाणावर वापर केला जातो. घरगुती वापर करतांना उर्ध्वपतनापूर्वीची स्थिती म्हणजे पाणी उकळून वापरणे ही पध्दत मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. पाणी उकळल्याने 600 डिग्री. से. पेक्षा जास्त तपमानात अनेक जिवाणू व विषाणू हे नष्ट होऊ शकतात. अर्थात हे किती प्रमाणात साध्य झाले हे मोजावयाची प्रमाण यंत्रणा सामान्य माणसाला अद्याप उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे त्याची संख्याशास्त्रीय विश्लेषणात्मकता करणे कठीण आहे.

त्यामुळेच गाव पातळीवर, शहर पातळीवर काही प्रक्रिया ह्या मोठ्या प्रमाणावर केल्या जातात तर काही व्यक्तीगत किंवा घरगुती पातळीवर वापरल्या जातात.

इतर मार्ग, प्रक्रिया ह्या खूप महागड्या असून त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर हा अद्याप आर्थिकदृष्ट्या परवडणाऱ्या मर्यादेत आलेला नाही. मात्र तरीही प्रगत व सधन राष्ट्रांमध्ये अशुध्द सांडपाण्याचे रूपांतर पुनर्वापरासाठी करतांना ह्यातील अनेक पध्दती प्रत्यक्ष वापरल्या जातात. आपल्या राष्ट्रातही त्या तशाच मोठ्या प्रमाणात वापरून पाण्याची प्रमाणशीर (Standard) शुध्दता वाढवावी लागेल. हा दिवस फार दूर नाही.

रोजच्या वापरासाठी जेवढे पाणी आवश्यक आहे तेवढे उपलब्ध होईल अशी स्थिती आजही नाही. भविष्यकाळातली वाढती लोकसंख्या, त्यांना लागणारे अन्न, उद्योगधंद्याची गरज यामुळे मागणी वाढणारच आहे. त्यामुळेच पाण्याचा शुध्द करून केलेला पुनर्वापर ही मानसिकता असो की नसो, वस्तुस्थिती म्हणून स्वीकारावी लागणारच आहे.

ज्यांचेकडे साधनसामग्री आहे किंवा ती घेण्याची सुस्थिती आहे त्यांचेसाठी आवश्यक असेल तेवढे स्वच्छ व शुध्द पाणी मिळविणे ही शक्य कोटीतली बाब आहे. मुख्य प्रश्न आहे तो नाही रे वाल्यांचा ! आपण जर त्यांचा जगण्याचा व निसर्गातील सर्व गोष्टी (योग्य त्या दर्जाच्या) योग्य प्रमाणात मिळविण्याचा हक्क आहे हे मान्य करीत असू... आपण कोण टिकोजीराव आहोत मान्य न करणारे.... तर खालील बाबींचा विचार करणे गरजेचे आहे.

जगात असेल काहीही अवस्था, सुबत्ता असो, किंवा दारिद्र्य त्यामुळे माझ्या तोंडात पाण्याचा घोट सुखाने जाणार आहे काय? हाच प्रश्न ज्याचे त्याचे साठी महत्वाचा ठरतो. म्हणूनच यापुढच्या विवेचनात माझा भर हा भारतावर त्याही पेक्षा महाराष्ट्रावर असणार आहे.

काही महिन्यांपूर्वीच उत्तर महाराष्ट्रातील घरगुती वापराचा पाणीपुरवठा व स्वच्छता ह्या विषयावरील एक अहवाल तयार करण्यात सहभाग होता. पिंडी ते ब्रह्मांडी ह्याच उक्तीनुसार जे उत्तर महाराष्ट्रात तेच कमी जास्त प्रमाणात संपूर्ण महाराष्ट्रात आणि बऱ्याच अंशी भारतातही आढळले.

आमचा पाण्याचा स्त्रोत म्हणजे पाऊस व पावसामुळे वाहाणाऱ्या नद्या! ज्रद्या ह्या शब्दात ओहोळ, झरे, ओढे, तळे, ह्या सगळ्यांचा समावेश आहे. आज महाराष्ट्रातल्या सर्व नद्या मरणासन्न आहेत. त्या मेल्या असे म्हणता येणे इष्ट नाही म्हणून हा शब्द! आज नद्यांचे पात्रातून वहाते ते केवळ वरच्या शहरातून बाहेर पडणारे सांडपाणी ! त्याद्वारे किती प्रमाणात प्रदूषण होते हे सांगावयाचे तर उदाहरणादाखल कर्नाटकातील बंगलोर जवळची अकवती नदी घेता येईल.

ह्या नदीच्या उगमाजवळच (सुमारे 15 कि.मी) अंतरावर बंगलोर शहर आहे. शहराचे सर्व सांडपाणी येथेच टाकले जाते. परिणाम - परिणाम असा की शहराचे खालील भागात सुमारे 20 कि.मी. पर्यंत जिथे जिथे नारळाची झाडे आहेत तेथील नारळाचे पाणी हेही पूर्णपणे प्रदूषित असते. अनेक प्रकारचे जीवजंतू पाण्यात आढळतात व खालची गावे ही कायम स्वरूपी साथींच्या रोगांचे बळी ठरतात.

ही नदी हे केवळ एक उदाहरण ! बहुतेक सर्व नद्यांची अवस्था अशीच आहे. 900 कोटी रूपये खर्चून आणि सतत 22 वर्षे काम करूनही आम्ही गंगेचे प्रदूषण कमी करू शकलो नाही. यमुनाही स्वच्छ करू शकलो नाही. महाराष्ट्रात कृष्णा, पंचगंगा आणि गोदावरी ह्याही त्याच - अत्यंत प्रदूषित नद्या- रांगेत आहेत.

नद्यांचा एक प्रश्न! उरलेले जलसाठे म्हणजे तलाव, सरोवरे, पायविहिरी, गाव तलाव, पाझर तलाव, बंधाऱ्यांमागचे जलसाठे इत्यादी. त्यांच्या वरील प्रकारे प्रदूषित होण्याबरोबरच धुणी धुणे, भांडी घासणे, साबण लावून आंघोळ करणे, जनावरे धुणे हे जलसाठे प्रदूषित होण्याचे इतर प्रकार आहेत.

मला लिहावयाचे आहे ते शुध्द पाण्याबद्दल आणि मी तुम्हाला सांगतोय पाणी प्रदूषित कसे होते? पण हे लिहिल्याखेरीज खालील मुद्दे स्पष्ट होणार नाहीत म्हणून विषयांतर असले तरी हे लिहावेच लागले.

आणखी एका बाबीचा उल्लेध करूनच पुढे जातो. प्रत्येक प्रश्नात पर्यावरण संरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. तेव्हा निसर्गाला पूरक असा काही मार्ग समोर आढळतो का याचाही विचार करावा लागणार आहे.

महाराष्ट्रातील निम्याहून अधिक खेड्यांमध्ये पाण्याची उपलब्धता हाच प्रश्न गंभीर आहे. (यावर्षी 6000 खेड्यांपैकी 2800 खेड्यांमध्ये फेब्रुवारीतच पाणी टंचाई आहे) बहुसंख्य शहरांचीही स्थिती या पेक्षा वेगळी नाही. त्यात प्राथमिक शुध्दीकरणाचे जे उपाय केले जावेत अशी अपेक्षा असते तेही बहुसंख्य ठिकाणी केले जात नाहीत. जसे मिळेल त्याच स्वरूपात पाणी दिले जाते आणि पाणी मिळाले म्हणून बहुसंख्य ठिकाणी जनता समाधानी असते. शुध्दता हा विचारच त्यांच्या मनात येत नाही. त्यामुळेच हात धुवा सारख्या मोहिमा राष्ट्रीय पातळीवर राबवाव्या लागतात.

निसर्ग हा आपला समतोल राखणारा व परिस्थिती सुधारणारा स्वयंरक्षी वैद्य आहे. अर्थात आपण त्याचे कार्यात अडथळा आणला नाही तर... आपल्या देशात वर्षातले किमान 10 महिने भरपूर सूर्यप्रकाश असतो. वहाती हवा असते आणि सूर्यप्रकाश हा जलशुध्दीकरणाचा उत्तम उपचार आहे. त्यामुळेच सौरगाळणयंत्रे ही पाश्चात्य देशात आता वापरात येऊ लागली आहेत.

पाण्याची किमान शुध्दता दाखवून जर सर्वसामान्य जनतेला किमान (with allowable limts) दर्जाचे शुध्दपाणी द्यावयाचे तर खालील उपचार करणे गरजेचे ठरेल.

1. साठवण (Sedimentation) :
पाणी एका जागी 6 ते 8 तास स्थिर अवस्थेत साठवून ठेवले तर माती, गाळ आदी न विरघळलेल्या वस्तू ह्या खाली बसतात व वरचे पाणी बाजूला काढून घेता येते. प्रकारानुसार वेगवेगळ्या कालावधीसाठी पाणी साठवून ठेवले जाईल अशा साठवण टाक्या बांधून पहिल्या अशुध्दता काढू टाकता येईल.

2. हवेमुळे पाण्याच्या अंतर्कणांची हालचाल होऊन तसेच हवेतील प्राणवायूच्या विरघळलेल्या रासायनिक द्रव्यांशी संपर्क झाल्यामुळे त्याचे अतिद्राव्य अशा दुसऱ्या संयुगात रूपांतर होते. त्यामुळे हवेचा संपर्क (Airation) हा जलशुध्दीकरणाचा दुसरा सोपा मार्ग आहे.

3. सौरकिरणांचा वापर :
सूर्यकिरण तसेच त्यातील अल्ट्राव्हायलेट वगैरे अदृश्य किरण यांचा विषाणू व जीवाणूंपासून मुक्ततेसाठी वापर करता येतो. त्यामुळेच पाणी सूर्याचे उन्ह (किरणे) व हवा यांचे संपर्क 2 -3 तास येईल अशारीतीने सतत हलवत राहिले (स्प्रिंकर्ल्स, कारंजी हा त्यातला एक चांगला मार्ग आहे) तर दोघांच्याही गुणधर्मामुळे पाणी शुध्द होण्यास मदत होते.

4. गाळणे :
प्रथमत: अतिद्राव्य व मग विद्राव्य अशा अशुध्दता दूर केल्यानंतरही त्या पाण्यातच असतात. त्या काढून टाकण्यासाठी अनेक प्रकारची गाळण प्रक्रिया केली जाते. पाण्यात अशुध्दता जास्त प्रमाणात असेल तर लिक्वीड क्लोरीन, चुनखडी, ब्लिचिंग पावडर इत्यादी चा वापर केला जातो. त्या ठिकाणच्या पाण्यानुसार हा डोस किती प्रमाणात टाकायचा हे ठरविले जाते. तो डोस पाण्यात मिसळून मग गाळण प्रक्रिया केली जाते. रॅपिड सँडफिल्टर सारखी अनेक प्रकारची गाळणयंत्रे आज वापरात आहेत. अशारीतीने साठवणे, हवा व उन्ह यांचा संपर्क क्लोरिन, ब्लिचिंग पावडर वगैरे वापरणे व गाळणे त्यामुळे किमान दर्जाची शुध्दता शक्य होते.

त्यापेक्षाही महत्वाचा एक मार्ग उपलब्ध आहे असं माझे मत आहे. निसर्गाने दिलेले शुध्द पाणी आधी अयोग्य पध्दतीने वापरायचे, अशुध्द करायचे आणि मग शुध्द करीत बसायचे त्यापेक्षा ते अशुध्द होताच नाही याची आधीच पुरेशी काळजी घेतली तर... खालीलदिलेले काही छोटे छोटे सोपे उपाय केले तर आश्चर्य वाटेल असे छान परिणाम नक्कीच दिसतील -

1. पाणी हे जीवन आहे ते घाण करू नका. करू देऊ नका.
2. पाण्यात नदी-नाले ओढे-तलाव-विहिरी इ. ठिकाणी धुणी धुणे, भांडी घासणे, जनावरे धुणे, अंघोळ करणे हे करू नका.
3. देवाचे निर्माल्य व प्लॅस्टिकचा कचरा नदीत टाकू नका.
4. शहराचे सांडपाणी, गटारीचे पाणी नदीत सोडू नका. आधी त्यावर प्रक्रिया करून ते शुध्द करा. जो मिथेन निघेल त्याचा ऊर्जा निर्मितीसाठी वापर करा. मगच स्वच्छ झालेले पाणी नदीत सोडा.
5. शक्य झाल्यास त्या पाण्याचा बागेसाठी, शेतीसाठी वापर करा.
6. मेलेले पशुपक्षी, कारखान्याचे सांडपाणी, कपडा उद्योगाचे रंगीत पाणी, साबण, डिटर्जंट हे जलस्त्रोतात जाऊ देऊ नका.
7. उष्टे, खरकटे अन्न व जैविक कचरा नदीत जाऊ देऊ नका.
8. शहराचे मलमूत्र, ड्रेनेजचे पाणी प्रक्रिया केल्याशिवाय नदीत सोडू नका.
9. नदी नाल्यांचा शौचालयासाठी वापर करू नका.
10. शेतातील खते (युरिया सारखी) जंतुनाशके मिश्रित माती नदीपात्रात वाहून जाऊ देऊ नका. एक शोषखड्डा करून त्यात ते पाणी अडवा व नंतरच शेताबाहेर जाऊ द्या.

ह्या आणि यासारख्या अनेक गोष्टी सगळ्यांनी, सातत्याने रोज रोज पाळल्या आणि घेतला वसा टाकणार नाही, उतरणार नाही, मातणार नाही, अशी खुणगाठ बांधत, काम करीत राहिलेतर शुध्द पाणी ह्या शिडीची पहिला पायरी आपण निश्चितच गाठू शकू!

पुढचा मार्ग खडतर आहे, रस्ता कठीण आहे. पण प्रयत्नाच्या मार्गावर शेवटी शिखर हे लागतेच! येथेही तेच खरे ठरेल हे निश्चित ! शुध्दपाणी हे केवळ मनुष्यासाठीच नव्हे तर पशुंसाठी व शेतासाठी आणि वनस्पतीसाठीही लागते ही खुणगाठ बांधून ही वाटचाल करावी लागणार आहे. शुभंभवतु।।

श्री. मुकुंद धाराशिवकर, धुळे - (दूरध्वनी 02562-236987)