वराहमिहीर (सन 487 ते 550) हा थोर विचारवंत, पर्यावरणतज्ञ व निष्णात ज्योतिशी उज्जैन (मध्यप्रदेश) च्या परिसरात होऊन गेला. त्याचा बृहसंहिता हा अतिप्रसिध्द असलेला ग्रंथ गर्भलक्षणाध्याय, गर्भधारणाध्याय, प्रवर्षणाध्याय आणि दकर्गलाध्याय असे चार अध्याय पाणी ह्या विषयासंबंधी विस्तृत माहिती देतात. ह्या लेखात ह्या चार अध्यायांपैकी दकर्गलाध्याय (अध्याय 54 वा) ह्याबद्दल विचार करणार आहोत.
वराहमिहीर (सन 487 ते 550) हा थोर विचारवंत, पर्यावरणतज्ञ व निष्णात ज्योतिशी उज्जैन (मध्यप्रदेश) च्या परिसरात होऊन गेला. त्याचा बृहसंहिता हा अतिप्रसिध्द असलेला ग्रंथ गर्भलक्षणाध्याय, गर्भधारणाध्याय, प्रवर्षणाध्याय आणि दकर्गलाध्याय असे चार अध्याय पाणी ह्या विषयासंबंधी विस्तृत माहिती देतात. ह्या लेखात ह्या चार अध्यायांपैकी दकर्गलाध्याय (अध्याय 54 वा) ह्याबद्दल विचार करणार आहोत.दकर्गल (उदक + अर्गल) म्हणजे अडथळ्यांमागचे पाणी म्हणजेच भूगर्भातील पाणी किंवा भूगर्भजल! हा विषय ग्रंथात मांडल्यावर त्यावर किमान साठ विद्वानांनी टीका लिहिल्या आहेत. भास्कराचार्यांच्या लीलावती ह्या ग्रंथाचा अपवाद वगळता बृहत्संहिता हा सर्वाधिक टीकाकार आणि विद्वानांना अभ्यासाचा विषय झालेला आढळतो. ह्या लेखातील विवेचनासाठी मी श्री.महोत्पल विवर्ती यांनी संपादित केलेली प्रत वापरली आहे.
वराहमिहीरने काय सांगितले हे पहाण्यापूर्वी आपण ह्या विषयाची थोडी तोंडओळख करून घेऊ या. वहामिहीराने भूगर्भजल शोधतांना मुख्यत: तीन गोष्टींच्या निरीक्षणावर भर दिला. त्यात उपलब्ध वृक्ष, वृक्षांजवळील वारूळे, त्या वारूळाची दिशा व त्यात रहाणारा प्राणी आणि तिथली जमीन! जमीन म्हणजे तिचा रंग, पोत आणि चव!
आजही विहीरीला पाणी लागेल की नाही हे शंभर टक्के बिनचूक निदान करता येईल असे शास्त्र व पध्दत सामान्य माणसाला उपलब्ध झालेली नाही. त्यासाठी अजूनही ग्रामीण भागात पाणभाक्या म्हणजे पाण्याचा अंदाज सांगणारा माणूसच बोलविला जातो. अनेकदा तो पायाळू असतो. तो जमिनीला कान लावून आवाज येतो का याचा अंदाज घेतो. हातात रूई अथवा त्याच्या पध्दतीने इतर कुठल्यातरी वृक्षाची / झुडप्याची फांडी घेऊन चालतो आणि पाणी कुठे लागेल याचा अंदाज सांगतो.
भूगर्भशास्त्र हे आज चांगले प्रगत झालेले शास्त्र आहे. अत्याधुनिक यंत्रणा, उपग्रहातून घेतलेली छायाचित्रे ही भूगर्भातील तसेच समुद्रात खूप खोलवर असलेले तेल साठे शोधून काढू शकतात. त्यांचे निष्कर्ष हे बिनचूक ठरतात. मात्र अगदी पिण्यासाठी किंवा शेतीसाठी पाणी शोधावयाला आपण आजही हे ज्ञान वापरीत नाही. त्यादृष्टीने गेल्या शतकात अगदी सुरवातीच्या काळात अमेरिकन भूगर्भ शास्त्रज्ञ मेनझर याने सुरवात केली. तोच आधुनिक शास्त्रज्ञ ह्या विषयाचा मूळपुरूष मानला जातो. त्याच्या सुमारे दीड हजार वर्षे आधीच वराहमिहीराने ह्या विषयावर सविस्तरपणे लिहून ठेवले आहे.
हे सगळे संशोधन करतांना वराहमिहीरने प्रत्यक्ष जागेवर अथवा प्रयोगशाळेत कोणते प्रयोग केले होते? तसा कोणताही उल्लेख तो करीत नाही. तशी प्रयेगासाठी काही साधने होती काय आणि तसे प्रयोग कुठे इतरत्र होत असत काय? याचाही तो कुठे उल्लेख करीत नाही. मात्र आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते ती हीकी वराहमिहीर हा मुख्यत्वे ज्योतिशी होता. खगोलशास्त्रज्ञ होता. त्याने अवकाशनिरीक्षणासाठी आयुष्याचा बराच काळ निसर्गाच्या सानिध्यात घालवला. अनेक ग्रंथ त्या विषयांवर लिहीले. स्वत: समृध्द होत गेला. वृहतूसंहिता हा त्याचा शेवटचा ग्रंथ! एक सर्वोत्कृष्ट ग्रंथ म्हणून आजही नावारूपाला आलेला! त्यात आपली निरीक्षणे व ज्ञान हे त्याने पूर्णपणे कसाला लावले आणि लिहिले. आपणाला आजही ते उपलब्ध आहे हे आपले भाग्यच!
वरील निरीक्षणे मांडतांना वराहमिहीरने सुमारे पंचावन्न वृक्ष व वनस्पतींचा अभ्यास करून मांडणी केली आहे. त्यातील काही वृक्ष हे खालील प्रमाणे - जांभूळ, आंबा, वड, पिंपळ, कंदब, शमी, शिरीष, पळस, बेल, औदुंबर, नारळ, दाऊहळद, बिब्बा, दर्भ, बेहडा, कदंज, कांचन, जेष्ठमध, कवठ, दुर्वा इत्यादी! तसेच ह्या वृक्षाजवळील वारूळात रहाणारे बेडुक, मासा, साप, पाल, घोरपड, सरडा, मुंगुस, नाग, कासव इत्यादी प्राण्यांचे उल्लेख आढळतात. त्यातील बेडुक हा उभयचर म्हणजे पाणी व जमीन दोन्हीकडे रहाणारा! उन्हाळ्याचे चार महिने तो भूगर्भात झोपतो. त्याची बिळे ही 2 ते 2.5 मीटर्स एवढी खोल आढळली आहेत. तर जिथे पाणी आहे तिथे माशांसारखे जलचर प्राणीही सापडतात. ह्या सगळ्यांचे बिळांचा - वारूळांचा अभ्यास हा वराहमिहीरचे अभ्यासात महत्वाचे स्थान पटकावतो.
वृक्ष / झाड | जवळील वारूळात / बिळात राहणारा प्राणी | बिळात राहणारा प्राणी | पाणी कसे आढळेल |
वेत | बेडुक | पांढरी | गोड पाणी (मिष्ठ) |
जांभूळ | भेकर | पिवळी | भरपूर प्रमाणात |
औदुंबर | साप | लोह युक्त |
|
अर्जुन | पाल | निळी | गोड (स्वादू) |
निर्गुडी | कुमुदा | काळा खडक | अति विपुल(महाजल) |
फल्गुवृक्ष | कासव | काळपट पांढरी | सलील जल |
दर्भ | नाग | काळा पाषाण | खडकाखालील पाणी |
मधुक | बदरी | मृत / पिवळसर | अक्षय |
आंबा | दंन्तौ | पिष्टवर्ण पाषाण | - |
बुटकी झाडे | मजबूत पायाचा प्राणी | अतृप्ता भूमी | कमी प्रमाणात |
माती किंवा भूगर्भातील पाणी हा त्यांचे निरीक्षणचा तिसरा महत्वाचा भाग! स्थळपरत्वे तसेच वेगवेगळ्या खोलावर मातीचे वेगवेगळे थर आढळतात. खोदलेली विहीर अगर घराचा पाया ज्यांनी बघितला असेल त्यांना त्याचा अनुभव हा आला असणारच! वराहमिहीरांनी ह्या मातीचे वर्गीकरण खालील पध्दतीने केले आहे - काळी माती, भुरकट माती, पिवळी माती, पांढरी माती, लाल माती, वाळू मिश्रीत माती, लोहयुक्त माती, निळसर माती, पिवळसर काळी माती, लालसर पिवळी माती, पांढरट माती, क्षारयुक्त माती, वाळू, ओसाड म्हणजे गवताचे पानेही न उगवणारी माती!
खडकांचे वेगळे निरीक्षण ते मांडतात. काळा पाषाण, हिरवट छटा असलेला पाषाण, निळसर काळा पाषाण, करडा-मातकट रंगाचा दगड, चटकन पीठ होईल असा ठिसूळ दगड, थरांचा दगड, तेलकट - मेणचट पाषाण इत्यादी!
वहारमिहीर हे उज्जैनचे. मुख्यत: काळ्या पाषाणाच्या / बसाल्टच्या क्षेत्रात राहणारे. त्यामुळे महाराष्ट्र, मध्यप्रदेश जवळचाच राजस्थान या भागात वर लिहिलेल्या प्रकारचे खडक आढळतात हे अभ्यासकाच्या सहज लक्षात येते.
हे तीनही भाग म्हणजे प्राणी, वृक्ष आणि माती व खडक यांच्या निरीक्षणातून हे पाणी शोधावयाचे. त्याचे वर्गीकरण महारमिहीर खालील प्रकारे करतात मात्र एका गोष्टीचा मुद्दाम उल्लेख करून ठेवतो. ही निरीक्षणे खोदलेल्या, उथळ विहीरींबद्दलची आहेत. अर्ध पुरूष म्हणजे एक मीटर ते द्वादश पुरूष म्हणजे 24 मीटर्स एवढ्या खोलापर्यंतही. त्याखालील पाण्याचेही उल्लेख आहेत पण ते तुरळकच. गोड पाणी, मधुर पाणी, तुरट पाणी, क्षारयुक्त पाणी, खारट पाणी असे पाण्याचे वर्गीकरण त्यांनी केले आहे. हे उपलब्ध पाणी त्यांनी तीन गटात विभागलेले आहे.
1. भूगर्भाचे आतून वाहणारे पाणी
2. ठराविक प्रकारची रचना असलेल्या भूगर्भातच आढळणारे स्थिर पाणी, आणि
3.वरील दोन्ही प्रकारात न मोडणारे भूगर्भातील पाणी
38 श्लोकांमध्ये वेगवेगळ्या निरीक्षणांमधून हा पाण्याचा आढळ त्यांनी मांडून ठेवला आहे.येथे मी प्रत्येक श्लोकाचे भाषांतर करणार नाही परंतु एक तक्ता देत आहे त्यावरून त्यांच्या निरीक्षणाची कल्पना येऊ शकेल.
अशा प्रकारे वर्णन करतांनाच वराहमिहीर खालील निरीक्षणे नोंदवून ठेवतात -
1. भरपूर फांद्या व तेलकट साल असलेले ठेंगणे झाड असेल तर पाणी आढळते.
2. उन्हाळ्यात जमिनीतून वाफा येतांना दिसल्या तर पृष्ठभागाजवळ पाणी असते.
3. झाडाची एकच फांदी जमिनीकडे झुकली असेल तर तिच्या खालील भागात पाणी आढळते.
4. काटेरी झाडांचे काटे बोथटलेले असतील तर हमखास पाणी मिळते.
5. जेव्हा जमीन गरम झालेली असते तेव्हा एखाद्याच ठिकाणी थंड लागली तर तिथे पाणी असते.
6. जमीन उन्हाने तापून गर्दभवर्णाची झाली असेल तर तिथे खडकाच्या खाली पाणी आढळते.
7. जिथे झाडे विरळ असतात तिथे पाणी खूप खोल आढळते.
8. जमीन / खडक तेलकट अथवा मेणचट असेल तर तिथे स्थिर पाणी आढळते.
ही त्यांच्या निरीक्षणांपैकी कारी महत्वाची निरीक्षणे. ही केवळ पुराणातील वांगी म्हणून वाचून सोडून द्यायची का? जुने ते सोने म्हणून त्यावर अंधविश्वास ठेवावा असे कोणीही ज्ञानी माणूस म्हणणार नाही. मी ही म्हणत नाही. त्याबरोबर जुने जावू द्या मरणा लागूने हाही माझी दृष्टीकोन नाही. त्यामुळेच हे ज्ञान आज आपल्याला उपयोगी पडू शकते काय? या दृष्टीने घासून पुसून व तपासून घ्यावे म्हणून हा अभ्यास सुरू केला.
सुदैवाने या वराहमिहीरीच्या अभ्यासाचा प्रत्यक्ष पडताळा पहावा म्हणून आंध्रप्रदेशातील तिरूपती विद्यापीठाने विसाव्या शतकाच्या शेवटीशेवटी प्रत्यक्ष विहिरी खोदून पहावयाचे ठरविले. वराहमिहीराच्या निरीक्षणानुसार योग्य ठरतील अशा जागा निवडाल्या. सुमारे 300 विहिरी खोदल्या व त्यात 95 टक्क्यांपेक्षाही जास्त ठिकाणी त्याचे निरीक्षण योग्य असल्याचे आढळून आले.
या अभ्यासातून व निरीक्षणातून खालील गोष्टी आजही करता येणे शक्य आहे.
1. जलपुनर्भरण व भूगर्भजल पातळी वाढविण्यासाठी योग्य जागांची निवड करणे.
2. ही निरीक्षणे आपल्या भागात असलेल्या काळ्या पाषाणाबद्दल असली तरी जिथे थरांचे खडक तसेच ग्रॅनाईट सारखे थर नसलेले खडक आहेत तेथे काय फरक आढळतो हा अभ्यास करता येईल.
3. पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यास मदत होईल.
4. महापूर व दुष्काळ दोन्ही टाळण्यासाठी योजना तयार करता येईल.
5. वराहमिहीराने दिलेल्या खोलीपेक्षा जास्त खोलीसाठी खास अभ्यास करून तो सिध्दांत जगासमोर मांडता येईल.
6. या संशोधनाचा वापर करायचा झाल्यास त्या जीववैविध्य असलेली झाडे, वृक्ष संभाळावी लागतील.
8. तिरूपती विद्यापीठाचा आदर्श समोर ठेवून ठिकठिकाणी हे प्रयोग राबविता येतील.
असे सगळे घडले तर वरहामिहीराची बृहतसंहिता व त्यातील दकर्गलम् याचा आजही आपण खरा उपयोग करून घेऊ शकू.