प्राचिन वास्तूशास्त्र विषयक ग्रंथात भू-परिक्षा विषयक तपशील मिळतात. माणसार वास्तूशास्त्र विषयक ग्रंथात भू-परिक्षा विधान याविषयी चर्चा आली आहे. याविषयीचे काही सूत्र परंपरेने केलेल्या सूक्ष्म निरिक्षण व अवलोकनानंतर दिली गेली. कुठलाही जलाशय निर्माण करण्यापूर्वी पारंपारिक शहाणपण व त्यातून सिध्द झालेली काही सूत्रे यांचा उपयोग होत होता.
विहीर ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली देणगी आहे असे मानले जाते. भारतीय संस्कृती मध्ये अगदी पारंपारिक काळातसुध्दा उपलब्ध नैसर्गिक पर्यावरणाचा आणि भूस्तर रचनेचा अभ्यास करण्यात आला होता. असे वैदिक वाङमयातील नोंदी विशेषत: ऋग्वेद, अथर्ववेद परिशिष्ट यात पाणी व्यवस्थापन व जलप्रवाहाच्या संदर्भात काही नोंदी मिळतात. राहाटगाडगे किंवा अश्मचर्क याविषयीच्या नोंदी आल्या आहेत, वहारमीहीर याच्या बृहत्संहितेमध्ये उदकार्गल नामक अध्यायामध्ये (५८) याविषयाच्या काही नोंदी आहेत. तसेच कौटिल्य अर्थशास्त्रात सुध्दा आपणाला उपलब्ध होणार्या माहितीचा विचार आहे. कुठल्या भूप्रदेशात निश्चित किती पाणी उपलब्ध होईल, त्यात पावसापासून उपलब्ध होणारे पाणी किती असेल, याविषयीचे काही आराखडे नोंदविले आहेत. याशिवाय अगदी महाभारत, रामायण सारखे महाकाव्य, बौद्ध जातक कथा व वाडमय या सर्वांमधून पाणी व्यवस्थापनाविषयी नोंद मिळते. पौराणिक साहित्याचा विचार करता माणसाने करावयाच्या समाज उपयोगी कामामध्ये वापी, कुप, तडाग यासारख्या वास्तूंच्या निर्मितीसाठी प्रोत्साहन दिल्याचे दिसते.
वापी कूप तडागानि देवतायतनानि च।
अन्नप्रदानमारामं पूर्तमित्यभिधोयते॥
अपरार्क टिकेमध्ये पूर्तकर्मविषयक आलेला हा श्लोक महाभारतातून घेतला आहे.
इष्टकर्म हे माणसाच्या व्यक्तिगत जीवनात महत्वाचे असले तरी पूर्तकर्म हे समाजासाठी अशा प्रकारची बांधकामे करतांना परिसरातील भूस्थर रचनेची चांगली माहिती असावी लागते. भावप्रकाश या ग्रंथात विहीरीचे लक्षणनोंदवतांना म्हटले आहे की, अल्पविस्तार असलेल्या भूमीत खोल व गोलाकार, खणलेली - बांधलेली विहीर होय. कौटिल्य अर्थशास्त्रामध्ये नोंदवले आहे की, मातीला लोणा लागणार नाही, अशा जागी चौकोनी विहीर खोदावी. तिचा तळ आणि सर्व बाजू बांधून काढाव्यात. तिला भुईसपाट लाकडाची बळकट दारे असावीत, तिच्यात तीन मजले व अनेक कोठड्या असाव्यात. अशा विहीरींच्या संदर्भात अनेक प्रकारच्या साहित्यिक नोंदी उपलब्ध होतात.
प्राचिन वास्तूशास्त्र विषयक ग्रंथात भू-परिक्षा विषयक तपशील मिळतात. माणसार वास्तूशास्त्र विषयक ग्रंथात भू-परिक्षा विधान याविषयी चर्चा आली आहे. याविषयीचे काही सूत्र परंपरेने केलेल्या सूक्ष्म निरिक्षण व अवलोकनानंतर दिली गेली. कुठलाही जलाशय निर्माण करण्यापूर्वी पारंपारिक शहाणपण व त्यातून सिध्द झालेली काही सूत्रे यांचा उपयोग होत होता. आजही अंगी असलेल्या काही दैवी शक्ती आधारे परिसराची पहाणी करून विहीरींची जागा दाखवणार्या व्यक्ती मिळतात. अशा व्यक्तींना पायाळू असे संबोधतात.
त्या त्या विशिष्ट प्रदेशातील भूस्थर रचना यांचा अचूक अंदाज घेवूनच प्राचिन शास्त्रग्रंथातून भूमी परिक्षा करण्यासाठी उपलब्ध क्षेत्र त्या परिसरातील वृक्ष जमिनीचा स्पर्श, गंध, रंग व नाद यांचा आधार घेतला जाई. परिसरातील खडकाची घडण, मातीचा पोत, स्थानावरील वनस्पती व प्राणीजन्य खुणा यांचा अभ्यास करण्यात येई व अनेक वर्षांच्या अनुभवानंतर काही सूत्र सिध्द करण्यात आलेली होती. उदा. जर जांभळाच्या पूर्वेस जवळ वारूळ असेल तर त्याच्या दक्षिणेस दोन पुरूष खोलीवर गोड पाणी लागते.
ज्या वृक्षाच्या फळास किंवा पुष्पास विकार (फळ किंवा पुष्प सदृष्य) असेल त्या वृक्षाच्या पूर्वेस तीन हात पुढे चार पुरूष खणले असता पाणी लागते. त्याची खूण म्हणजे खाली दगड व पीतवर्ण (पिवळ्या रंगाची जमीन) असेल.
वड, पळस, उंबर हे एकत्र असतील, तेथे खाली उदक आहे. वड व पिंपळ हे एकत्र असतात, तेथेही वृक्षांच्या उत्तरेकडे चार हात खणले तर पाणी लागेल.
ज्या भूमीवर मुंज, काश कुश यापैकी एका प्रकारचे गवत उपलब्ध आहे व जमीन निळसर, खडकाळ आहे, किमान काळी अथवा तांबड्या (लाल) रंगाची असेल, तेथे विपुल गोड पाणी असते. अग्निपुराण तसेच कृषिपराशर व अन्य स्मृती ग्रंथात याविषयीच्या नोंदी आहेत.
विठ्ठलाजी शास्त्री धारूरकर यांनी उपयुक्त धर्मशास्त्र संग्रह या ग्रंथात (मुंबई शके १८२६) याविषयी चर्चा केली आहे. तर च.धु. देशपांडे यांनी महाराष्ट्राचा भूगोल (दिल्ली १९७६) यामध्ये महाराष्ट्राच्या भूस्तर रचनेची व डेक्कन ट्रॅप किंवा बेसाल्ट या अग्निजन्य खडकाची वैशिष्ट्ये स्पष्ट केली आहेत. यातून भूपृष्ठ व भूजल यांच्या वापराविषयी नोंद केली आहे. अग्निजन्य खडकाची सच्छिद्रता १ ते ३ टक्क्यांपेक्षा जास्त नाही. ग्रॅनाईट किंवा बेसाल्टमधून पाणी झिरपणे कठीण असते. चिकण मातीच्या थरातून सहसा पाणी जिरत नाही. उलट, वालूका स्थर किंवा लाईमस्टोन (चुनखडी) खडकातून पाणी मिळते. जमिनीखाली काही विशिष्ट खोलीवर सर्व प्रकारच्या सछिद्र भेगांनी युक्त खडक असतात. ते भूजलाने ओतप्रोत असतात. या अंतरभौम जलपातळीत भूजल पृष्ठ म्हणतात. देशपांडे नोंदवतात महाराष्ट्रातील विहीरींचे प्राकृतिक स्वरूप केवळ भूपृष्ठ रचनेमुळे निश्चित झाले नसून भूमीगत पाण्याचाही बराच प्रभाव आहे. राज्याच्या जलसिंचनाच्या एकूण गरजेपैकी ५० टक्के गरज विहीरी भागवतात. असे असूनही आतातपर्यंत भूमिगत जलपातळीबाबत राज्यात नगण्य संशोधन व्हावे ही आश्चर्यकारक वस्तूस्थिती आहे. आज या क्षेत्रात जाणीपूर्वक लक्ष दिले जात आहे. नवीन तंत्रज्ञानाआधारे भूजलाचा शोध घेणे शक्य झाले आहे.
शिवाय वैज्ञानिक दृष्टीकोनातून एखाद्या भूभागाची पाहाणी करून पुनर्भरणाचा विचारही केला जावू शकतो. तथापि मध्ययुग व त्याहीआधी जो भाग सदैव भूजलाने ओतप्रोत भरलेला होता त्याचा अचूक शोध घेण्यात आला. यासाठी परंपरेने व सातत्याने केलेल्या परिसराच्या निरीक्षणाचा फायदा त्यांना झाला. पारंपारिक, अनुभवजन्य शहाणपण अशी याची नोंद केली जावू शकते. भारताच्या विविध भागाचे भूस्थर रचना समजावून घेतांना त्या त्या क्षेत्रात असलेले नैसर्गिक वैशिष्ट्ये लक्षात घेतली गेली, शिवाय सिंधू, सरस्वती नदीचे खोरे, ब्रम्हपुत्रा, गंगा, नर्मदा, गोदावरी, कावेरी या व अशा प्रत्येक नदीखोर्याची स्वत: ची अशी वैशिष्ट्ये होती. महाकाव्यातून व पौराणिक ग्रंथातून त्यांची नोंद केली आहे. अशी नोंद करतांना स्थल महात्म्य, लोकस्मृती, परंपरा यांचाही विचार केला गेला. व त्या त्या क्षेत्रांचे वैशिष्ट्य लक्षात घेवून जागा नागरिकांसाठी किंवा मानवी वसाहतीसाठी उपयुक्त असणार्या भूमीअंतर्गत जलस्त्रोतांचा शोध घेण्यात आला, यानंतर त्या क्षेत्रात निर्माण करण्यात आलेल्या वास्तूंची प्रदेशनिहाय अशी वेगळी वैशिष्ट्ये पहावयाला मिळतात. बर्याचदा मंदीर स्थापत्यामध्ये जसे वैविध्य आढळते, तसेच वैविध्य जलव्यवस्थापनाच्या क्षेत्रात जाणवते.
दक्षिणेतील द्रवीड स्थापत्य शैली, उत्तरेतील नागरशैली किंवा गोदावरी खोर्यात आढळणारे भूमीज व वेसर (खेचर) स्थापत्यांचा प्रभाव आपणाला त्या त्या क्षेत्रातील बारव स्थापत्यावर पडल्याचे आढळते. याशिवाय भौगोलिक वैशिष्ट्यांचा परिणाम म्हणून निर्माण होणारी लयन स्थापत्य (गुहाशिल्प) दुर्ग स्थापत्य व मंदीर स्थापत्य या प्रत्येक वास्तूंच्या मधला वेगळेपणा त्या परिसरातील जलव्यवस्थापन मध्येही आढळतो. रामायणासारख्या ग्रंथात दैवमातृक आणि नदीमातृक शेतींचा उल्लेख येतो. पावसाच्या पाण्यावर भिजणारी जमीन ही देवमातृक मानली गेली. तथापि यापेक्षा वेगळ्या पध्दतीने मानवाने शेती करून पिक पध्दती विसकित केली. त्यासाठी नदी, विहीरी, जलाशय, कालवे यासारख्या पाणी व्यवस्थापन पध्दतीचा आधार घेतला. त्याला अदेवमातृक किंवा नदीमातृकम्हटले गेले आहे.
ज्या ठिकाणी नदीच्या काठावर किंवा तिच्या उपनद्यांच्या काठावर एका मर्यादित प्रमाणात मानवी वसाहत होती, तेव्हा प्रारंभिक काळात विहीरींची आवश्यकता नव्हती. पण ज्यावेळी निसर्गत: सहज उपलब्ध असणार्या जलप्रवाहाच्या पलीकडील क्षेत्रात वसाहतीकरणाची गरज माणसाला वाटली तेव्हा भूमीअंतर्गत असलेल्या भूगर्भजलाचा शोध घेतला गेला. व त्यातून विहीर, वापी, बारव या जलस्थापत्य प्रकाराचा विकास झाला. त्यामुळे माणसांना वेगवेगळ्या क्षेत्रात वसाहती करणे शक्य झाले.
वास्तविक पाहाता बारव निर्मितीच्या मागे असलेली प्रेरणा ही मानवी वसाहतीची गरज हीच होती. विहीरींच्या विविध आकार - प्रकारांचे व तिच्या शुशोभिकरणाचे प्रयोग करताना त्या त्या स्थानाचे भौगोलिक वैशिष्ट्य, पाण्याचे पावित्र्य, शुध्दता जपण्याचा केलेला प्रयोग आपण या अशा वास्तूत जपण्याचा केलेला प्रयोग आपण या अशा वास्तूत असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण देवतांच्या मधून अनुभवी शकतो.
यासाठी म्हणून विविध कथानकांची व परंपरांची निर्मिती ही झाली. याची नोंद मध्ययुगीन साहित्यात पाहावयास मिळते. महानुभाव पंथ संस्थापक चक्रधर स्वामी, श्री ज्ञानदेव किंवा संत रामदास यांच्या दासबोध या ग्रंथात याविषयीचे उल्लेख पाहावयास मिळतात.
प्रत्येक स्थानावर असलेल्या वास्तूची वैशिष्ट्य व त्या त्या काळामध्ये जाणीवपूर्वक, विकसित झालेल्या जल व्यवस्थापनाच्या वैशिष्ट्यांचा परिचय करून घेणे ज्ञानवर्धक व रंजक ठरते.
श्री. अरूणचंद्र शं. पाठक - मो : ९६१९०४६०६९