Source
जलसंवाद, स्मरणिका, जानेवारी 2018
भारतीय समाज व्यक्तीगत स्वच्छतेबद्दल बराच जागृत आहे. पण जेव्हा सामाजिक स्वच्छतेचा प्रश्न येतो त्यावेळी फारच निराशाजनक चित्र दिसते. प्रत्येक घरातून निघालेल्या कोरड्या व ओल्या कचर्याची कशी विल्हेवाट लावायची हा प्रश्न आज डोके वर काढावयास लागला आहे. इतके दिवस ग्रामीण भारत जागरुक नव्हता. शहरातील काडी कचरा गावाच्या बाहेर एखाद्या खेड्यात नेवून टाकला तरी कोणाची खास अशी हरकत नव्हती. पण आता तशी परिस्थिती राहिली नाही. कचरा टाकला तर आंदोलने व्हावयास लागली आहेत.
जगातल्या सर्वच संस्कृतींचा उगम पाण्याच्या अस्तीत्वाशी निगडित आहे. भटक्या मानवाला जे स्थैर्य आले ते पाण्यामुळेच. नदीच्या काठावर आल्यावर त्याच्या बर्याचशा गरजा भागावयास लागल्यामुळे तो नदीकाठीच स्थिर झाला व तिथपासूनच त्याचा सर्वार्थाने खरा विकास सुरु झाला. त्याला व त्याच्या जनावरांना अव्याहतपणे पाणी मिळावयास लागले व नदीकाठीच स्थिर होण्याची त्याची इच्छा बळावली. शेती करावयास सुरवात केल्यानंतर तर त्याला पाण्याचे खरे महत्व कळून चुकले. पाण्याचा स्वत:च्या स्वच्छतेसाठी, जनावरांसाठी, शेतीसाठी, दळणवळणासाठी जसजसा वापर वाढावयास लागला तसतशी जल संस्कृती अस्तीत्वात येवू लागली, विकसित होवू लागली व तिला स्थैर्य प्रप्त झाले. ज्या ज्या गोष्टींनी त्याला स्थैर्य मिळवून दिले त्यात्या वस्तुंना त्याने देवत्व बहाल केले. पाणी हे दुधारी शस्त्र आहे ही बाबही त्याच्या लक्षात आली. पाणी जीवनासाठी जसे उपकारक आहे तसे ते प्रलयसुद्धा घडवू शकते हे त्याच्या लक्षात यावयाव लागले. त्यामुळे पाणी आपल्या ताब्यात ठेवणे वा नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे ही बाबही त्याच्या लक्षात आली. ते जर आपल्या जीवनात एवढे माहत्वाचे आहे तर ते वाहून जावू न देता त्याला अडवून ठेवले तर ते जास्त हितकारक ठरेल ही त्याची भावना बळावली.पाण्याचा उपयोग लक्षात आल्याबरेबर त्याचा अमाप उपसा सुरु झाला. त्याचा जेव्हा अतिरेक सुरु झाला त्यावेळी जे पाणी त्याच्या संस्कृतीला खतपाणी घालत होते तेच पाणी संस्कृतीच्या नाशालाही कारणीभूत ठरु शकते हे ही त्याच्या लक्षात आले. पाण्याच्या आभावामुळे संस्कृती लयाला गेल्याची साक्ष इतिहास देत आहे. या पार्श्वभूमीवर आपण पाण्याचा ज्या पद्धतीने सध्या वापर करीत आहोत ती या लयाच्या दृष्टीने वाटचाल आहे की काय इतपत संशय यावयास जागा निश्चितच निर्णाण झाली आहे. पाण्यासाठी आपण एकमेकाच्या उरावर बसावयास लागलो आहोत. पाण्यासाठी आपण एकमेकाला पाण्यात पाहावयास लागलो आहोत. प्रदेशातील, राज्यातील, विविध देशातील पाण्यासाठी निर्माण होत असलेले तंटे ही तर सुरवात आहे. आजून पाण्याचे खर्या अर्थाने दुर्भिक्ष निर्माण झालेले नाही. ते जर झाले तर काय होईल याचा विचारही मनाला अस्वस्थ करतो.
पाण्याचे मोठे एकत्रीकरण त्रासदायक ठरु शकते:
धरणांद्वारे जे सध्या पाण्याचे एकत्रिकरण चालले आहे त्यामुळे भविष्यात आपल्यासमोर कोणत्या समस्या निर्माण होवू शकतात याचा विचार करण्यास काळाने आपल्याला भाग पाडले आहे. कोणतीही संपत्ती जेव्हा गडगंज बनते त्यावेळी ती प्राप्त करुन घेण्यासाठी कलह सुरु होतात. जे राजकारण आधी नव्हते ते पाणी एकत्र आल्यामुळे आज प्रकर्षाने जाणवावयास लागले आहे. जायकवाडी धरणाच्या संदर्भात माझ्या वाचनात एक लेख आला. ते धरण बांधल्यामुळे पाणी अडले पण त्यामुळे पुढील प्रवाहात ज्या उपसा जलसिंचन योजना साकारल्या होत्या त्यांना जो खीळ बसला त्याचे काय? जायकवाडी धरण आज भरत नाही असा ओरडा आपण करतो याचे कारण म्हणजे या धरणाचे वर गोदावरी नदी आणि तिच्या उपनद्या यांचे प्रवाहात बांधलेली आठ धरणे कारणीभूत आहेत हे आपल्याला दिसून आले आहे. एकाचे पोट भरण्यासाठी दुसर्याच्या ओठातील घास काढून घेण्याचाच हा प्रयत्न नव्हे काय? साप बेडकाला पकडतो, गरुड सापाला पकडतो अशीच एक साखळी आपण निर्माण करीत आहोत याची जाण आपल्याला आहे काय?
आणि एवढी धरणे बांधून आपण काय करतो? माझ्या शेतातून मी पाणी वाहू देतो. ते नाल्यांद्वारे नदीला मिळते. त्या नदीवर मी १०० किलोमिटरवर धरण बांधतो. तिथे अडलेल्या पाण्याचे मी काय करतो? तर ते मी पुन्हा माझ्या शेतावर आणतो. केवढा मोठा दारविडी प्राणायाम हा.माझ्या शेतावरील पाणी पुन्हा माझ्याच शेतात आणण्यामुळे मी काय साध्य केले?
मी काय साध्य केले ते बघा :
१. करोडो रुपये खर्च केले.
२. करोडो रुपये खर्च करणारी यंत्रणा कायमची निर्माण केली.
३. धरणातले पाणी कोणी वापरावयाचे याचे साठी कलह निर्माण केला.
४. त्यामुळे एकाच्या शेतातील पाणी दुसर्याचे शेतात वळवायला सुरवात केली.
५. चुकीची पिक पद्धती रुजविण्याचा प्रयत्न केला.
६. जमिन अधिग्रहणाचा प्रश्न निर्माण केला.
७. लोकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण केला.
८. पाण्याचे राजकारण सुरु केले.
९. जेवढी क्षमता आहे त्यापेक्षा जास्त धरणांचे काम हातात घेतले
१०. पैसे नसल्यामुळे असंख्य धरणे अर्धवट अवस्थेत आणून ठेवली.
११. ती धरणे पूर्ण करण्यासाठी ६९,००० कोटी रुपयांची जबाबदारी़ शिरावर आणून ठेवली.
१२. जनतेच्या अपेक्षा वाढवून ठेवल्या आणि आता त्यामुळे जो क्षोभ निर्माण करुन ठेवला.
१३. अनेक ठेकेदारांना गबर करुन ठेवले.
१४. अडवून ठेवलेल्या पाण्याची योग्य वितरण व्यवस्था निर्माण न केल्यामुळे धरणे बांधण्याचा उद्देशच सफल होवू शकला नाही.
पाण्याचे एवढे एकत्रीकरण खरेच आवश्यक आहे काय?
हे जे सर्व चालले आहे ते पाण्याच्या नियमाच्या अगदीच उरफाटे आहे.पाण्याचा नियम आपल्याला सांगतो की पाऊस जिथे पडतो तिथेच त्याला अडवून ठेवा (Catch the rain where it falls) त्याला वाहू दिले तर काय होते याची जंत्री आपण नुकतीच अभ्यासली आहे. त्याचबरोबर अनुभवही सांगतो की जर खरेच आशा पद्धतीने पाणी अडवून ठेवले तर परिस्थिती चांगल्या प्रकारे सुधारु शकते. खालील काही उदाहरणे बघा :
१. श्री अण्णा हजारे यांचा राळेगण सिद्धीचा प्रयोग
२. श्री. पोपटराव पवार यांचा हिवरे बाजार येथील प्रयोग
३. श्री. अमरिशभाई पटेल यांचा शिरपूर येथील प्रयोग
४. श्री. राजेंद्रसिंग यांचा राजस्थान मधील प्रयोग
५. गुजराथ राज्यातील प्रयोग
वर जी यादी दिली आहे ते सर्व प्रदेश हे कमी पावसाचे प्रदेश समजले जातात. इतके असून सुद्धा त्या सर्व प्रदेशांनी पाणी प्रश्नावर मात केली आहे. याचे महत्वाचे कारण की त्याठिकाणी पाणी अडविण्याचे व जिरविण्याचे प्रयोग अत्यंत यशस्वी ठरले आहेत. काही ठिकाणी तर वर्षातून तीन पिके काढण्यात येथील शेतकरी यशस्वी ठरले आहेत. अमरिशभाई पटेलांचा प्रयोग सोडला तर बाकी सर्व ठिकाणी हे यश लोकसहभागातून मिळाले आहे. शिरपूरचे यश पाहून तशाच प्रकारचे प्रयत्न वर्धा व जालना जिल्ह्यात सुद्धा सुरु करण्यात आले आहेत. अमरिशभाई पटेल यांचे सहकारी श्री. सुरेश खानापूरकर यांचे तर असे म्हणणे आहे की असे प्रयोग इतर ठिकाणीसुद्धा यशस्वी ठरु शकतात.
सुरेश खानापूरकर यांनी तर आणखी एक महत्वाचा मुद्दा मांडला आहे. धरणे आणि धरणांतून मिळालेल्या पाण्याचा लाभ देशातील फक्त १७ प्रतिशत जनतेला मिळत आहे. बाकीच्या जनतेचे काय असा ते सवाल विचारतात. त्यांनी असे कोणते पाप केले आहे की त्यांचे पाणी प्रश्न सोडविण्याचे दृष्टीने होणारे प्रयत्न अत्यंत तुटपुंजे दिसतात? कोरडवाहू शेती हा आपल्या देशाला मिळालेला एक शाप आहे. जोपर्यंत कोरडवाहू शेतकर्यांचा पाणी प्रश्न सोडविला जात नाही तोपर्यंत पाणी प्रश्न खर्या अर्थान् सुटू शकणार नाही असे त्यांचे मत आहे. त्यांचे प्रयोग सर्वत्र वापरण्यात आले तर या प्रश्नावर निश्चितपणे मात करता येईल असा त्यांना विश्वास आहे.
भारतासमोरील खरा प्रश्न वेगळाच :
भारतासमोर एक वेगळाच प्रश्न महत्वाचा बनला आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याची दरडोई उपलब्धता कमीकमी होत चालली आहे व वाढत्या जल प्रदूषणामुळे जे पाणी उपलब्ध आहे तेही पाणी वापरण्यास योग्य असे राहिले नाही. भूपृष्ठावरील नद्या व तलाव ही सांडपाण्याची डबकी बनली आहेत. आधीच पृथ्वीतलावर गोड्या पाण्याचे प्रमाण कमी, त्यातही एवढ्या मोठ्या प्रमाणात ते जर प्रदूषित स्वरुपात उपलब्ध असेल तर माणसाने जगावे कसे असा प्रश्न पडतो. प्रश्न एवढ्यावरच संपत नाही. भूपृष्ठावरील पाणी प्रदूषित झाल्यामुळे हे प्रदूषित पाणी आता जमिनीतही पाझरावयास लागले असून त्यामुळे भूजलही प्रदूषित व्हावयास लागले आहे. एकवेळ वेगवेगळे मार्ग वापरुन भूपृष्ठावरील पाणी शुद्ध करता येईलही पण भूजल शुद्ध करणे कठीण समजले जाते.
या प्रदूषणाचे दृष्य परिणाम दिसावयास लागले आहेत. विविध प्रकारचे साथीचे रोग दिवसेंदिवस बळावत चाललेले आपण पाहात आहोत. कॉलरा, कावीळ, मलेरिया, टॉयफॉईड, डेंगू, ,विविध प्रकारचे इन्फ्ल्यूएंझा, गॅस्ट्रो, जुलाब यासारख्या साथी मोठ्या प्रमाणात पसरत चालल्या आहेत. एका मल विसर्जनात एक कोटीचे वर विषाणू , त्याचबरोबर १००० परोपजीवी आणि १०० कृमींची अंडी असतात. बहुतांश ठिकाणी मलविसर्जन जलसाठ्याजवळच केेले जाते. त्यामुळे किती मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण वाढत असेल याची कल्पनाच केलेली बरी. याशिवाय कारखाने आणि शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण करीत असतो. आज आपण जी परिस्थिती अनुभवतो आहेात तीच परिस्थिती इंग्लंडमध्ये २०० वर्षापूर्वी होती. लंडनमधली थेम्स नदी मलमूत्राच्या पाण्याने पूर्णपणे प्रदूषित झाली होती. एवढेच काय तर त्या घाण पाण्याच्या वासाने तिथली पर्लमेंट हैराण होती. पण इंग्रज लोक लवकरच सावरले आणि त्यांनी हा प्रश्न तडीला लावला आणि आज तीच नदी लंडनच्या सौंदर्यात भर घालतांना दिसत आहे. संपूर्ण भारतातील जनता संडासाचा वापर करावयासाठी अजून २०० वर्षे तरी लागतील असा अंदाज एका जागतिक संघटनेने केला आहे. मुक्त हागणदारीमुळे पोलियो सारखा विकार बळावतो. निव्वळ याच कारणामुळे पोलियामुक्तीसाठी भारताला झगडावे लागत आहे.
भारतीय समाज व्यक्तीगत स्वच्छतेबद्दल बराच जागृत आहे. पण जेव्हा सामाजिक स्वच्छतेचा प्रश्न येतो त्यावेळी फारच निराशाजनक चित्र दिसते. प्रत्येक घरातून निघालेल्या कोरड्या व ओल्या कचर्याची कशी विल्हेवाट लावायची हा प्रश्न आज डोके वर काढावयास लागला आहे. इतके दिवस ग्रामीण भारत जागरुक नव्हता. शहरातील काडी कचरा गावाच्या बाहेर एखाद्या खेड्यात नेवून टाकला तरी कोणाची खास अशी हरकत नव्हती. पण आता तशी परिस्थिती राहिली नाही. कचरा टाकला तर आंदोलने व्हावयास लागली आहेत.
आपल्यासमोर खरा प्रश्न आहे, आपली संस्कृती टिकवून ठेवायची किंवा नाही. हे प्रदूषण अशाच प्रकारे चालू राहिले तर तो दिवस दूर नाही ज्यावेळी लाखोच्या संख्येने शुद्ध पाण्याअभावी जीव जातील व या तथाकथित विकासाची फळे चाखण्यासाठी लोकच उरणार नाहीत.
- डॉ. दत्ता देशकर - अध्यक्ष, भारतीय जल संस्कृती मंडळ (०९३२५२ ०३१०९)