शिरपूर पॅटर्न- जलक्रांतीचा नवा मंत्र

Submitted by Hindi on Fri, 01/12/2018 - 13:35
Source
जलोपासना, दिवाली, 2017

श्री. नितीन गडकरी हे आता जल खात्याचे मंत्री झाले याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. आता देशात पाण्याच्या कामाला वेग येईल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. रस्ते आणि पाणी या दोन गोष्टींना जोड़णारी एक अफलातून कल्पना खानापूरकरांनी गडकरींसमोर नुकतीच मांडली. राष्ट्रीय हमरस्ते बांधतांना मोठ्या प्रमाणात मुरमाची आवश्यकता भासते.

नेमेची येतो मग पावसाळा या म्हणीसारखी दुसरीही म्हण आज प्रचारात आली आहे. ती म्हणजे नेमेची येतो मग दुष्काळ. हवामान बदलाचा परिणाम म्हणून की काय तर आजकाल दुष्काळाची वारंवारिता वाढीस लागली आहे. याचा अर्थ असा का की पाऊस पडतच नाही? पाऊस बिचारा विनाकरणच बदनाम झाला आहे, तो दरवर्र्षी पडतो पण आता मात्र तो आपल्या मर्जीप्रमाणे नाही तर स्वतःच्या मर्जीप्रमाणे पडायला लागला आहे. असे एक तरी वर्ष दाखवून द्या की ज्या वर्षी पाऊस पडलाच नाही. एखादे कमनशीबी गाव असेल की जिथे एखादे वर्षी पावसाने दांडी मारली आहे. पण थोड्या फार फरकांने दरवर्षी प्रत्येक ठिकाणी पाऊस पडतोच पडतो. आणखी एक गोष्ट स्पष्ट करणे आवश्यक आहे. ती म्हणजे दरवर्षी तो वार्षिक सरासरीच्या जवळपास घुटमळत असतो. कधी कमी तर कधी जास्त.

आता तर दुसरे एक संकट यावयास लागले आहे. ते म्हणजे पावसाचे दिवसच कमी होत चालले आहेत. पूर्वी ७०-८० दिवस पडणारा पाऊस आता फक्त तीस दिवसातच पडतो. याचा दुसरा अर्थ हा की ३० दिवस पडणारा पाऊस आपल्याला ३६५ दिवस पुरवायचा आहे. म्हणजेच आपल्याला पाणी साठवण्याची भांडी मोठी करायची आहेत. जमिनीतील चढ उतारामुळे आपल्याला प्रत्येक शेतात एक तरी नाला आढळतो. पावसाचे दिवसात हा नाला भरभरुन वाहत असतो. वर्षानुवर्षे वाहून या नाला गाळाने भरुन गेलेला आढळतो. या नाल्याला थोडे खोल केले, थोडे रुंद केले आणि वाहते पाणी थांबवण्यासाठी त्यावर ठिकठिकाणी बंधारे बांधले तर आपल्याला पाहिजे तेवढी पाणी साठवण भांडी तयार करता येतील.

किती पाणी जमवायचे ? :


याठिकाणी आणखी एक विचार महत्वाचा ठरतो. तो म्हणजे, पुढल्या वर्षी पाऊस पडलाच नाही तर? याचा अर्थ असा की आपल्याला एवढे पाणी साठवून ठेवावे लागेल की त्याच्या पुढील वर्षासाठी सुद्धा ते पुरले पाहिजे. आणि ते कुठे साठवून ठेवायचे? ते अशा ठिकाणी की जिथे पाष्पीभवनामुळे त्याचे नुकसान होणार नाही. अशी एकमेव जागा म्हणजे म्हणजे जमिनीचे पोट, ज्याला आपण भूगर्भ म्हणतो. नाल्याचे खोलीकरण व रुंदीकरण करुन बंधार्‍यांद्वारे ते अडवले की ते जमिनीत मुरणार व आपला उद्देश सफल होणार. ही कल्पना ज्याने निव्वळ मांडलीच नाही तर अंमलात सुद्धा आणली अशी व्यक्ती म्हणजे श्री. सुरेश खानापूरकर, निवृत्त ज्येष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण विकास खाते, महाराष्ट्र राज्य आणि या प्रयोगाची जागा म्हणजे शिरपूर तालुका, जिल्हा धुळे.

या अवलियाला दुसरा अवलिया मिळाला आणि दोघांनी मिळून ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली. या दुसर्‍या अवलियाचे नाव आहे श्री. अमरिशभाई पटेल. अमरिशभाईंची तीव्र इच्छा होती की आपल्या मतदारसंघात जलसंधारणाचे काम करुन शेतकर्‍यांचा पाणी प्रश्‍न कायमचा सोडवायचा. या दोघांची भेट शिरपूरकरांसाठी वरदानच ठरले. अर्थ प्रबंधन आणि हिंमत अमरिशभाईंची आणि काम करण्याची जिद्द खानापूरकरांची. या दोघांच्या संयुक्त प्रयत्नाचे फळ म्हणजे शिरपूर तालुक्यातील जलसंधारण आणि आलेल्या यशामुळे जो पॅटर्न बनला तो ओळखला जातो शिरपूर पॅटर्न या नावाने.

निवृत्तीनंतर खानापूरकर शिरपूरला आले. त्यांनी जवळपास एक वर्ष जातीने हिंडून कामाचा आवाका तपासला आणि मग प्रत्यक्ष कामाला सुरवात केली. श्री. अमरिशभाई पटेल यांची शरपूर तालुक्यात एक सूत गिरणी आहे. त्या सूत गिरणीतून होणार्‍या नफ्याचा एक हिस्सा ते या कामासाठी खर्च करतात. त्यात आवश्यक ती यंत्रसामुग्री (जसे पोकलेन, जेसीबी, डंपर्स इ.इ.) खरेदी केली जाते. व त्याच्या सहाय्याने खानापूरकर नाल्याचे खोलीकरण, रुंदीकरण आणि बंधारे बांधणे हे काम करतात. आतापावेतो शिरपूर तालुत्यातील ५४ गांवांचे काम पूर्ण झाले असून त्या ठिकाणी ४१ कोटी रुपये खर्च करुन १७७ बंधारे बांधल्या गेले आहेत. जमलेल्या पाण्यामुळे ८२५९ हेक्टर क्षेत्र पाण्याखाली आहे आहे. शिरपूर तालुक्यात १४९ गावे आहेत. त्या सर्व गांवात ही योजना राबविली जाणार आहे. अजूनही जवळपास ३०० बंधारे नव्याने बांधले जाण्याची शक्यता आहे.

यंत्रांचा मोठ्या प्रमाणात वापर :


जलसंधारणाची ही सर्व कामे यंत्रांच्या सहाय्याने केली जातात. मजूरांची मदत कमीतकमी राहते. सरकारी कामे मजूरांच्या मदतीने होतात, पण तुमची कामे यंत्रांच्या सहाय्याने होतात, यामुळे रोजगारी निर्माण होत नाही हा या योजनेचा दोष नाही काय असे विचारताच खानापूरकर म्हणतात, दुष्काळाला आपल्याला ताबडतोब उत्तर हवे आहे, आपल्याला घाई करायची आहे, लवकरात लवकर कामे पूर्ण करायची असल्यामुळे मजूरांचे सहकार्य मदतकारक ठरणार नाही म्हणून यंत्रांचा वापर करणे आवश्यकच आहे. मला शेतकर्‍यांना एका वर्षात पाणी उपलब्ध करुन द्याचे आहे, १५ वर्षांनंतर नाही असे ते म्हणतात. प्रत्यक्ष कामात जरी नाही तरी इतर कामात मला लोकसहभाग निश्‍चितच मिळतो, जसे माती उचलून घेऊन जाणे, खोदलेला माल टाकण्यासाठी जागा उपलब्ध करुन देणे, उपलब्ध झालेले पाणी वाटून घेण्यासाठी सहाय्य देणे यालाच मी लोकसहभाग म्हणतो. एका बंधार्‍याच्या बंधकामाचे वेळी माल कुठे टाकायचा हा प्रश्‍न मला पडला. एका शेतकर्‍यांने आपले उभे पीक मोडले व मला माल टाकण्यासाठी जागा उपलब्ध करुन दिली, तू असे का केले असे विचारताच तो म्हणाला, साहेब या कामाचा मलाच भविष्यात फायदा होणार आहे. तो कायमचा होणारा लाभ मला जास्त महत्वाचा वाटतो म्हणून मी पीक मोडायची तयारी दाखविली.

सुरवातीला विरोध, पण नंतर मात्र स्वागत :


सुरवातीला खानापूरकरांच्या कामाला शेतकर्‍यांकडून तीव्र विरोध झाला. त्यांना गावात येवू देण्यास लोक तयार नसत. या कामामुऴे आपले नुकसान होईल ही भिती त्यांना वाटत होती. पण हळूहळू जेव्हा या कामाचा लाभ व्हायला सुरवात झाली तेव्हा मात्र तेच शेतकरी त्यांचा सत्कार करु लागले. कोणतीही जलसंधारण योजना शेतकर्‍यांना मार्च, एप्रिल, मे, जून या चार महिन्यात पाणी देवू शकत असेल तरच ती यशस्वी झाली आहे असा निकष मी लावतो असे खानापूरकरांचे म्हणणे आहे. एखाद्या मॉडेलची वारंवार प्रतिकृती (replication) व्हायला सुरवात होते ती यशस्वी असल्यामुळेच ना़? आज गाावोगाव हे मॉडेल वापरले जात आहे ही या योजनेच्या यशाची पावतीच आहे असे मी समजतो.

गाळाची जमीन आहे म्हणून यशस्वी ?


तापी खोर्‍यात गाळाची जमीन आहे, म्हणून तुमची योजना त्या भागात यशस्वी झाली आहे असे तुमचे टीकाकार म्हणतात असा प्रश्‍न उपस्थित करता ते म्हणाले, टीकाकारांचा माझ्या कामासाठी विरोध हा गैरसमजातून झाला आहे, पूर्ण तापी खोरे हे काही गाळाने व्यापलेले नाही, काही भागात डेक्क्न ट्रॅप सुद्धा आहे अणि त्या भागात माझे बंधारे यशस्वीपणे पाणी अडवित व जिरवित आहेत. मी बांधलेले अर्ध्यापेक्षा जास्त बंधारे गाळाच्या जमिनीतले नाहीत याची टीकाकारांनी खात्री करुन घ्यावी व मगच टीका करावी असे ते म्हणतात. माझ्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील २० जिल्ह्यात जलसंधारणाची कामे चालू आहेत. नगर जिल्ह्यात, वर्धा जिल्ह्यात, जालना जिल्ह्यात तर गाळाची माती नाही ना? तिथे ते अत्यंत यशस्वी झाले आहेत. सध्या मध्यप्रदेश व कर्नाटक या दोन राज्यात माझ्या मार्गदर्शनाखाली जलसंधारणाची कामे चालू आहेत.

महाराष्ट्रातील खडक पाणी स्विकारण्यासाठी कमी प्रमाणात मदत करतात, तिथे तुमच्या पद्धतीने जलसंधारण करुन काही लाभ होवू शकेल काय असे मी त्यांना विचारले. महाराष्ट्रातील खडक २.५ टक्कयापर्यंत पाणी स्विकारतात हे मलाही माहित व मान्य आहे. पण पाणी भरणे आणि उपसणे या देानही क्रिया बरोबरच चालू असतात. त्यामुळे हे अडीच टक्के पाणी दोन तीनदा स्विकारले गेले तर त्याचा लाभ होवू शकतो याचाही विचार व्हायला हवा. जास्त खोलीकरणामुळे जो पाण्याचा कॉलम तयार होतो व त्याचबरोबर त्यावर जो हवेचा दाब असतो तो पुनर्भरणाच्या क्रियेला मदतकारक ठरतो असे माझे मत आहे.

जलसंधारणाची अँजियोप्लास्टी :


खानापूरकरांनी जलपुनर्भरणात अंजियोप्लास्टी हा शब्द फारच पॉप्युलर केला आहे. याचा नेमका अर्थ काय हा प्रश्‍न मी त्यांनी विचारला. त्यांनी मला भूगर्भाची रचना समजाऊन सांगण्याचा प्रयत्न केला. गेल्या हजारो, लाखो वर्षात जो ज्वालामुखीचा उद्रेक झाला तो काही सलग झालेला नाही, तो क्रमाक्रमाने झाला. त्यामुळे लाव्हा रसाच्या जसजशा लाटा आल्या तसतसे खडकांचे थर बनत गेले. काहीकाही भागत तर ३०-४० फुटांचे भरपूर थर आलेले आहेत. एक थर येवून गेल्यानंतर दुसरा थर येण्यासाठी बराच कालखंड लोटला. त्यामुळे दोन थरांमध्ये मुरुमाचे, वाळूचे थर आढळून येतात. हे थर पाणी स्विकारायला तयार असतात. पण वरचा थर खालच्या थरात पाणी जाऊ देत नाही. त्यासाठी जर आपण रक्ताचा प्रवाह मोकळा होण्यासाठी जशी अँजियोप्लास्टी करतो तशीच क्रिया आपल्याला इथे करायची आहे व वरच्या थरातून पाणी खाली जाण्यासाठी वाट मोकळी करुन द्यायची आहे. भारताच्या दक्षिण भागात मात्र आलेले थर इतके मोठे आहेत की तिथे मात्र हा प्रयोग यश्सवी ठरु शकणार नाही. मी जे खोदकाम खोल करा याचा आग्रह धरतो याचे हेच प्रमुख कारण आहे. दोन थरांची एकमेकांशी भेट करुन देणे यालाच मी अँजियोप्लास्टी हा शब्दप्रयोग वापरतो.

पावसात अनियमितता झेलण्याची ताकद :


माझ्या कामाचे जलपुनर्भारणाशिवाय आणखी तीन महत्वाचे लाभ आहेत, त्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. पहिला लाभ म्हणजे जलसाठे एवढ्या मोठ्या प्रमाणात तयार झाले आहेत की एखाद्या वर्षी पाऊस आला नाही तरी पाणी मिळण्याची क्रिया बंद होत नाही. मी जमिनीत इतके पाणी जमा केले आहे की भूजल पातळी खूपच वर आलेली आहे व तिचा लाभ शेतकरी मोठ्या प्रमाणात घेत आहेत. त्यांच्या चेहेर्‍यावरचे हसू मला खूप समाधान देवून जाते. महाराष्ट्रातील शेतकरी पाण्यासाठी तडफडत असतांना माझे शेतकरी मात्र आनंदाने आफल्या शेतात पिके घेत असतात. उशाशी पाणी असणे यामुळे शेतकर्‍याचा शेतीवरचा व स्वतःवरचा विश्‍वास कायम टिकून राहतो व तो अधिक हिंमतीने शेती करु शकतो.

पूर निवारणाचाही लाभ :


दुसरा लाभ म्हणजे पाऊस जास्त पडून सुद्धा या भागात पूर येणे बंद झाले आहे. वाढता पाणी जिरण्याचा वेग व कमी वेगाने पाणी वाहणे यामुळे हे शक्य झाले आहे. पाण्याचा हा एक महत्वाचा नियमच आहे. Catch the rain where it falls असे इंग्रजी भाषेत एक वचन आहे. पावसाचा थेंब जिथे पडतो तिथेच अडवला गेला तर त्यापासून पुढे होणारे पूराचे दुष्परिणाम टाळता येतात. पाण्याच्या पायात जणू काय बेड्याच टाकण्यात आल्या आहेत असे म्हणाना.

नद्या जीवंत करण्याची ताकद :


तिसरा लाभ पाझरांचे दृष्टीने महत्वाचा आहे. भूजलाची पातळी वाढली तर जमिनीतील पाण्याची पातळी नदी नाल्यांच्या पाण्याच्या पातळीपेक्षा वर राहते. जमिनीतील आतले खडकांचे उतार नेहेमी नदी नाल्यांचे बाजूने असतात. त्यामुळे हे पाणी खाली सरकायला सुरवात होते व त्यामुळे नदी नाल्यांना हळूहळू पाझर सुरु होतात. माझा तर असा दावा आहे की माझ्या पद्धतीने काम झाल्यास नद्या व नाले जास्त काळासाठी वाहू लागतील. हे प्रवाह बारमाही झाल्यास नवल वाटून घेवू नका. आज नद्या कोरड्या व शुष्क पडत आहेत. कारण त्यांना मिळणारे पाझरच बंद झाले आहेत. ते पुन्हा सुरु झाले तर त्या जास्त काल सेवा देऊ शकतील.

जल मंत्रालयाला सादर केलेली नवीन योजना :


श्री. नितीन गडकरी हे आता जल खात्याचे मंत्री झाले याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. आता देशात पाण्याच्या कामाला वेग येईल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. रस्ते आणि पाणी या दोन गोष्टींना जोड़णारी एक अफलातून कल्पना खानापूरकरांनी गडकरींसमोर नुकतीच मांडली. राष्ट्रीय हमरस्ते बांधतांना मोठ्या प्रमाणात मुरमाची आवश्यकता भासते. ती गरज पूर्ण करण्यासाठी ठेकेदार लोक टेकडया उकरुन मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. ते थांबवायचे असेल तर अशा हमरस्त्याच्या दोहो बाजूस चार किलोमीटरपर्यंत जे नाले आहेत, त्यांना खोदून हा मुरुम घेवून जावा म्हणजे रस्त्याचेही काम होईल व त्याचबरोबर नाले खोलीकरणाचेही काम विनामूल्य होईल अशी दुहेरी लाभांची कल्पना त्यांनी गडकरींना सुचविली आहे. तशा प्रकारची नोट तयार करुन ती त्यांनी गडकरींच्या विचारार्थ पाठविल्याचे ते मजजवळ बोलले. पाहू या या नोटला काय प्रतिसाद मिळतो ते !

वादळी व आक्रमक व्यक्तीमत्व :


धडाकेबाज काम हा खानापूरकरांचा स्थायीभाव. जितके स्तुती करणारे तितकेच विरोधकही. माझ्या कामाचा जोपर्यंत शेतकर्‍यांना लाभ होत आहे तोपर्यंत अशा टीकाकारांना मी जुमानत नाही असे त्यांचे रोखठोक उत्तर. आज कित्येक जलतज्ञ होवू गेले पण ते कोणीही पाणी प्रश्‍न सोडवू शकले नाहीत. कोणी एखादा पुढे येवून हा प्रश्‍न सोडवून दाखवित असेल तर मी त्याला दंडवत घालायला तयार आहे असे त्यांचे म्हणणे आहे. जालना जिल्ह्यात तर त्यांनी सरकारला आव्हानच दिले. मला अमुक एक रक्कम द्या, मी जालना जिल्ह्याचा पाणी प्रश्‍न कायमचा सोडवून दाखवतो असे रोखठोक आव्हानच त्यांनी दिले. त्यांनी जलसंधारणासाठी समाजाला एक संदेश दिला आहे :

पाणी अडवा हावरटपणे
पण वापरा मात्र विवेकाने


मी स्वतः आतापर्यंत शिरपूरला अनेकदा जाऊन आलो. प्रत्यक्ष काम पाहिले, शेतकर्‍यांशी गप्पा मारल्या, त्यांना प्रत्यक्षपणे झालेला लाभ पाहिला व खानापूरकरांचा स्तुतीपाठकच झालो. माझे काही मित्र मला त्यासाठी नावेही ठेवतात. मला पाण्यामागचे शास्त्र काय आहे हे काही समजत नाही हे मी कबूल करतो. भूगर्भ शास्त्र व जलशास्त्र माझ्यापासून कोसो किलोमीटर दूर आहे. तरीपण शेतकर्‍यांना झालेला लाभ जेव्हा मी बघतो, त्यांच्या चेहेर्‍यावरचा आनंद जेव्हा बघतो, त्यांच्या कच्च्या घरांचे पक्क्या घरात रुपांतरण मी बघितले तेव्हा खानापूरकरांचा स्तुतीपाठक बनण्याशिवाय गत्यंतर नाही असे मला वाटते.

डॉ. दत्ता देशकर - मो : ०९३२५२०३१०९