Source
जलसंवाद, मई 2012
मोठ्या धरणांनी जे पाणी अडविले आहे त्याचा आपण काय व कसा वापर करीत आहोत ? त्यामुळे समस्या सुटल्यातर नाहीतच, मात्र त्या वाढतच आहेत. आपल्या देशात पाणी प्रश्न नाहीच. आहे तो हे पाणी चांगल्या प्रकारे अडविण्याचा. यानंतर पाऊस असाच पडत राहणार. त्याच्या प्रमाणात नव्हे तर पडण्याच्या पध्दतीत फरक पडत चालला आहे. याला तोंड द्यावयाचे असल्यास आपल्याजवळ एकच मार्ग उपलब्ध आहे. तो म्हणजे जलसाठे वाढविणे.महाराष्ट्रात बर्याच कालावधीनंतर मोठ्या प्रमाणात दुष्काळ सदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. आता पर्यंत अशी परिस्थिती राज्यातील काही भागात थोड्याफार प्रमाणात जाणवत होती. पण यावर्षी मात्र त्याची व्याप्ती बरीच वाढलेली दिसून येत आहे. पाण्याचा दुष्काळ फक्त शेतीलाच अपायकारक ठरला नाही तर गावोगाव पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही तीव्रतेने जाणवत आहे. यावर्षी तुलनेने पाऊसही बर्यापैकी झाला होता. पूर्ण नाही तरी त्याने सरासरी गाठण्याचा प्रयत्न केला होता. इतके असूनसुध्दा अशी परिस्थिती का म्हणून निर्माण झाली असा प्रश्न सर्वसामान्य माणसाला पडलेला दिसून येत आहे.
याचे उत्तर अत्यंत स्पष्ट आहे. ते हे की गेल्या काही वर्षांपासून पावसाच्या प्रमाणात जरी नाही तरी पावसाच्या पध्दीत बराच जाणवण्यासारखा फरक पडत चालला आहे. पावसाळा उशीरा सुरू होत आहे, पावसाळा लवकर संपत आहे, पावसाचे दिवस कमी होत चालले आहेत, प्रमाण तेच राहून दिवस कमी झाल्यामुळे पाऊस पडण्याचा वेग वाढत चालला आहे व वाढत्या वेगामुळे जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण कमी होत चालले आहे हे ते बदल आहेत. दुर्दैव हे आहे की हे बदल होत असतांना माणसाने या बदलांची नोंद मात्र घेतलेली नाही.
महाराष्ट्रात बर्याच भागात परतीच्या मोसमी वार्यापासून दरवर्षी पाऊस पडत असतो. त्यामुळे रब्बी पिकाची पाण्याची बर्यापैकी गरज भागत असते. या वर्षी हा परतीचा पाऊसही दगा देवून गेला. हा पाऊस रब्बी पिकाला, जनावरांच्या चार्याच्या दृष्टीने त्याचप्रमाणे पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीनेही फार उपकारक ठरत असतो. पण या वर्षी हा पाऊस फारच कमी ठिकाणी फारच कमी प्रमाणात पडल्यामुळे पाण्याची तीव्रता फारच प्रकर्षाने जाणवत आहे.
काहीजण असाही आरोप करीत आहेत की दुष्काळाची आवई जबरदस्तीने पसरवली जात आहे. गेल्या दीड दोन महिन्यात या संदर्भात कोणतीही चर्चा नसतांना एकदमच दुष्काळ, दुष्काळ असा ओरडा सुरू झाला आहे. सांगितले गेलेले कारण असे की अंदाजपत्रकाचा मोठा हिस्सा आपल्या भागाकडे ओढून नेण्यासाठी ही ओरड चालू आहे. आपल्या देशात काहीही शक्य आहे. यात किती तथ्य आहे याची पडताळणी करीत बसण्यापेक्षा आहे त्या दुष्काळाला कसे तोंड द्यावयाचे याबद्दल विचार करण्याची गरज आहे.
संपूर्ण राज्यभर जरी दुष्काळाची ओरड चालू असली तरी आपल्याच राज्यात असा एक प्रदेश आहे की ज्या ठिकाणी शेतकरी अत्यंत आनंदाने शेती करीत आहेत. आजही नाल्यांवर बांधलेल्या बंधार्यात 10 ते 15 फूट जमलेले आहे. विश्वास बसत नाही ना ? मग चला तर, आपण धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात एक चक्कर मारून येवू या.
या शिरपूर चे आमदार श्री.अमरिशभाई पटेल आणि त्यांचे सहकारी श्री.सुरेश खानापूरकर यांनी हा चमत्कार घडवून आणला आहे. श्री अमरिशभाई पटेल यांची या तालुक्यात एक सूत गिरणी आहे. या गिरणीच्या नफ्यातून दरवर्षी अमरिशभाई 2 कोटी रूपये जलसंधारणाच्या कामासाठी बाजूला काढून ठेवतात. या पैशातून त्यांनी आतापावेतो मोठमोठ्या यंत्रसामुग्री खरेदी केल्या आहे. यात पोकलेन, जेसीबी. डंपर्स यांचा प्रामुख्याने समावेश आहे. त्यांनी ही समुग्री श्री.सुरेश खानापूरकर यांना सोपविली असून त्यांच्या सहाय्याने खानापूरकरांनी तीन महत्वाच्या गोष्टी केल्या आहेत. त्या म्हणजे :
1. गावातील नाले खोल केले.
2. गावातील नाले रूंद केले.
3. या नाल्यांवर थोड्याथोड्या अंतरावर सिमेंटचे बंधारे बांधले.
आतापर्यंत हे काम 25 गावात पूर्ण केले गेले असून एकूण 150 गावात असे काम करावयाचा त्यांचा संकल्प आहे. मी स्वत: हे काम बघितले असून त्याचा गावकर्यांना झालेला फायदा बघून मन प्रसन्न होते. यामुळे नेमके काय साध्य झाले आहे ते आपण तपासून बघू या :
1. संपूर्ण महाराष्ट्रात भूजल पातळी सारखी घसरतांना आपण बघतो. या ठिकाणी नेमकी उलटी परिस्थिती आहे. काही ठिकाणी तर ती वाढत वाढत 25 - 30 फूटांवर आलेली आहे. याला म्हणतात जलसंधारण. बाकीच्या ठिकाणी चालते ती जलसंधारणाची थट्टाच.
2. यामुळे शेतकरी अत्यंत आनंदात आहेत. ते आता वर्षात आपल्या शेतात दोन पिके काढावयास लागले आहेत. त्यांचे निसर्गावर अवलंबून रहाणे कमी झाले आहे. शेतीत शाश्वतता आली आहे.
3. मी स्वत: शेतकर्याच्या मुलाखती घेतल्या. त्यात असे दिसून आले की जवळपास सर्वच शेतकर्यांचे उत्पादन दीड ते दोन पटींनी वाढले आहे. सुरूवातीला खानापूरकर जेव्हा काम करावयास जात त्यावेळी शेतकरी त्यांना विरोध करीत असत. काही ठिकाणी तर त्यांना हाकलून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण आता तेच शेतकरी त्यांचा वर्गणी जमा करून सत्कार करतांना दिसतात.
4. पिकांचा दर्जाही डोळ्यांना सुखावणारा होता. शेतामध्ये असलेले कापूस व तूरीचे पिक डोक्यापेक्षा उंच होते. पिकावर असलेली कापसाची बोंडे आणि तुरीच्या शेंगांचे झुपके बघतांना त्यांची संख्या बघून आश्चर्य वाटत होते.
5. उशाशी पाणी असल्यामुळे कापसाची पेरणी मे महिन्यातच आटोपली होती. बाकीच्या जिल्ह्यात उशीरा आलेल्या पावसामुळे जेव्हा पेरणी होत होती त्यावेळी या प्रदेशात कापसाचे पिक हिरवेगार होते व रोपांची सरासरी उंची दोन ते अडीच फूटांपेक्षा जास्त होती.
6. प्रत्येक बंधारा पाण्याने तुडुंब भरलेला होता. एवढेच नव्हे तर नाल्यांना पाझर फुटले होते. असेच जर चालू राहिले तर पांझरा नदीला काही दिवसांनंतर बारमाही पाणी राहू शकेल असा विश्वास श्री.खानापूरकर देत होते.
7. शेतकर्यांचे दु:ख वेगळेच होते. त्यांच्याजवळ पाणी होते पण ते पिकांना देण्यासाठी सोळा तासांच्या भारनियमनामुळे विजच नव्हती. काय दैव दुर्विलास हा. हाही प्रश्न अमरिशभाईंनी फारच चांगल्या पध्दतीने सोडविला. त्यांनी मोठ्या प्रमाणात ऑईल इंजिने व पीव्हीसी पाईप विकत घेवून तो शेतकरी गटांना पुरविला व त्याद्वारे सिंचनाचा प्रश्न चुटकीसारखा सोडविला. मनात इच्छा असेल तर कोणताही प्रश्न योग्य रितीने सोडविला जावू शकतो हे त्यांनी सिध्द करून दाखविले.
8. महाराष्ट्रात धुळे जिल्हा हा तुलनात्मक दृष्ट्या कमी पावसाचा गणला जातो. इतके असून ही परिस्थिती. ज्या ठिकाणी यापेक्षा जास्त पाऊस पडतो त्याठिकाणची परिस्थिती आपण तपासून बघा. सर्वत्र दुष्काळ एके दुष्काळ हीच चर्चा दिसून येत आहे. यावरून महाराष्ट्रात इतर ठिकाणी पाणी नाही तर पैसा जिरतो आहे असे म्हटल्यास ते चूक ठरू नये.
माझी श्री. खानापूरकर यांचेशी याबाबत सविस्तर चर्चा झाली. त्यांचे म्हणणे असे आहे की आपले सिंचन धोरण मुळातच चुकले आहे. आपण 83 टक्के कोरडवाहू शेतकर्यांशी प्रतारणा करून आपले धोरण राबवित आहोत. मोठ्या धरणांनी जे पाणी अडविले आहे त्याचा आपण काय व कसा वापर करीत आहोत ? त्यामुळे समस्या सुटल्यातर नाहीतच, मात्र त्या वाढतच आहेत. आपल्या देशात पाणी प्रश्न नाहीच. आहे तो हे पाणी चांगल्या प्रकारे अडविण्याचा.
यानंतर पाऊस असाच पडत राहणार. त्याच्या प्रमाणात नव्हे तर पडण्याच्या पध्दतीत फरक पडत चालला आहे. याला तोंड द्यावयाचे असल्यास आपल्याजवळ एकच मार्ग उपलब्ध आहे. तो म्हणजे जलसाठे वाढविणे. जितके लवकर आपण हे करू तितक्या लवकर आपण पाणी प्रश्नावर व दुष्काळावर मात करू शकू.