माझ्या शेतकरी नेत्यांकडून अपेक्षा

Submitted by Hindi on Mon, 12/14/2015 - 14:41
Source
जल संवाद

गेल्या 60 वर्षांत या देशानी खूप शेतकरी नेते पाहिले. या नेत्यांनी शेतक-यांमध्ये चांगल्या प्रकारची जागरुकता आणली. प्राणपणाने ते शेतक-यांचे प्रश्न घेवून सरकारशी भांडले व काही प्रमाणात का होईना त्यांनी शेतक-यांच्या पदरात काही लाभ पाडून घेतले. त्यात या नेत्यांची लढावू वृत्ती दिसून आली. पण शेतक-यांचे खरे प्रश्न हाताळण्यात ते कमी पडले असे खेदाने म्हणावेसे वाटते. धान्याचे भाव वाढवून मागणे, उसाचे भाव बांधल्या जाणे, त्या द्वारे शेतक-यांना अधिक लाभ मिळवून देणे हे शेतक-यांचे खरे प्रश्न आहेत काय हा महत्वाचा प्रश्न आहे. आपण जेव्हा एखाद्या गटाचा नेता म्हणवून घेतो त्यावेळी त्यांचे खरे प्रश्न कोणते याचा अभ्यास करणे गरजेचे आहे.

गेल्या 60 वर्षांत या देशानी खूप शेतकरी नेते पाहिले. या नेत्यांनी शेतक-यांमध्ये चांगल्या प्रकारची जागरुकता आणली. प्राणपणाने ते शेतक-यांचे प्रश्न घेवून सरकारशी भांडले व काही प्रमाणात का होईना त्यांनी शेतक-यांच्या पदरात काही लाभ पाडून घेतले. त्यात या नेत्यांची लढावू वृत्ती दिसून आली. पण शेतक-यांचे खरे प्रश्न हाताळण्यात ते कमी पडले असे खेदाने म्हणावेसे वाटते. धान्याचे भाव वाढवून मागणे, उसाचे भाव बांधल्या जाणे, त्या द्वारे शेतक-यांना अधिक लाभ मिळवून देणे हे शेतक-यांचे खरे प्रश्न आहेत काय हा महत्वाचा प्रश्न आहे. आपण जेव्हा एखाद्या गटाचा नेता म्हणवून घेतो त्यावेळी त्यांचे खरे प्रश्न कोणते याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. आज भारतीय शेतकरी पतक्षम नाही हे खरे दुखणे आहे. एका वर्षीचा दुष्काळ त्याची अर्थव्यवस्था पूर्णपणे बिघडवून टाकतो, तो सहन करण्याची, त्याला तोंड देण्याची क्षमताच त्याचे मध्ये नाही याचे महत्वाचे कारण म्हणजे त्याची शेती ही शाश्वत नाही. ही शाश्वतता निर्माण करण्यासाठी काय पाऊले उचलणे आवश्यक आहे याचा नेता म्हणून त्याने विचार करणे आवश्यक आहे. भाव बांधून मिळणे हा अल्पकालीन लाभ झाला. ताप आल्यावर तो कमी करण्यासाठी औषध महत्वाचे नाही, तर ताप न येण्यासाठी रोग्याची प्रकृती कशी धडधाकट करणे आवश्यक आहे याचा विचार प्रामुख्यांने केल्यास तो नेता उपकारक ठरु शकतो.

श्रमिक संघटना, शेतक-यांची संघटना, यासारख्या संघटनांचे कार्य दोन विभागात विभागले जावू शकते.

1) लढाऊ स्वरुपाची कार्ये (मिलिटंट फंक्शन्स)
2) रचनात्मक अथवा विकासात्मक कार्ये (डेव्हलेपमेंटल फंक्शन्स)

या सर्व संघटनांनी आपले संपूर्ण लक्ष हे लढाऊ स्वरुपाच्या कार्यावर केंद्रित केले . शेतक-यांसाठी हे सर्व नेते लढले, त्यांना काही लाभपण मिळवून दिले व त्यामुळे ते प्रसिद्ध पावले. शेतक-यांनाही त्यांचे नेतृत्व आवडले व त्यांनी या नेत्यांना चांगल्या प्रकारचे सहकार्य केले. या सर्व आंदोलनांमुळे शेतक-यांचा नेत्यांवरील विश्वासही वाढला. मात्र या विश्वासाचा या नेत्यांनी योग्य प्रकारे लाभ उचलला नाही. शेतक-यांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी यांचे प्रयत्न तोकडे पडले.

शेतक-यांचे खरे प्रश्न कोणते? : पाणी प्रश्न, कमी उत्पादकतेचा प्रश्न व शेतमालाच्या संग्रहणाचा प्रश्न हे शेतक-यांचे खरे प्रश्न आहेत. प्रश्नांची यादी एवढ्यावरच थांबत नाही पण ज्यांना कळीचे प्रश्न म्हणता येतील हे ते तीन प्रश्न होत. हे तीन प्रश्न सोडविण्यास त्यांना मदत करण्यात आली तर त्यांचे मोठ्या प्रमाणावर भले होवू शकते. या बाबत मात्र आजही ते संपूर्णपणे नेतृत्वहीन आहेत. शेतात पाणी उपलब्ध होवू शकले तर शेतीत शाश्वतता येते, उत्पादकता वाढली तर उत्पादन खर्च कमी येतो व त्यामुळे सध्या अस्तीत्वात असलेले बाजारभाव त्यांना परवडू शकतात आणि शेतमालाच्या संग्रहणामुळे शेतमालाच्या भावावर त्यांचे नियत्रण येवू शकते. पहिल्या दोन बाबी तसे पाहिल्यास एकमेकाशी निगडित आहेत. पाण्याच्या उपलब्धतेमुळे उत्पादकता वाढीस लागते पण उत्पादकता वाढविण्यासाठी तो एक मार्ग नाही. त्याशिवाय उत्पादकता इतरही वेगवेगळ्या बाबींवर अवलंबून असते म्हणून या प्रश्नाला यादीत स्वतंत्र स्थान दिले आहे. या तीन मुद्यांचा आपण आता थोडक्यात परामर्ष घेवू या.

पाण्याची उपलब्धता : आज शेतकरी संपूर्णपणे मोसमी पावसावर अवलंबून आहे. पाऊस पडला तर बरकत, नाही तर बरबादी हे शेतीचे सूत्र बनले आहे. पावसातली अनियमितता त्याचे आर्थिक स्थैर्य घालवून बसते. व एकदा आर्थिक घडी विस्कटली तर ती पुन्हा ताळ्यावर येणे सर्वस्वी अशक्य ठरते. शेतक-यांना स्वत:च्या शेतावर पाण्याचा संग्रह करायला प्रोत्साहित करणारा नेता ही आज काळाची गरज आहे. शेतावर पाण्याचा संग्रह झाल्यास शेतक-याला दोन पिके घेणे शक्य होते. एवढेच नव्हे तर ती दोनही पिके यशस्वी होण्यास पाण्यामुळे मदत होते. मनस्वास्थ्य असेल तरच माणूस दीर्घकालीन विकासाच्या योजनांवर आपले लक्ष केंद्रित करु शकतो. आज खायला नसतांना उद्याचा विचार करणे त्याला शक्य होत नाही.

बाबा आमटेंचेच उदाहरण घ्या. कुष्ठरोग्यांसाठी आश्रम स्थापण्यासाठी सरकराने त्यांना 500 एकर जागा दिली. ती दगड धोंड्यानी व्याप्त होती. पाण्याचा तिथे पत्ता नव्हता. या जमिनीचा विकास करायचा असेल तर सर्व प्रथम आपण पाण्यावर लक्ष केंद्रित करावयास हवे ही बाब त्यांच्या लक्षात आली. पाणी उपलब्ध झाल्याबरोबर त्या जागेचे आनंदवन नाही तर नंदनवन बनले. पाण्याअभावी आज शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतीबद्दल जे महत्वाचे निर्णय घ्यावे लागतात त्यासाठी आवश्यक असलेले मनस्वास्थ्य त्याचेजवळ नाही. म्हणून वर्तमानकाळाच्या कपड्याला थिगळे लावत बसणे हेे त्याचे एकमेव काम होवून बसले आहे.

मी शिरपूर येथील शेतक-यांचा अभ्यास केला. श्री. अमरिशभाई पटेल व श्री सुरेश खानापूरकर यांच्या अथक प्रयत्नाने या भागात पाण्याची उपलब्धता वाढली. अन्नाला मोताद असणा-या शेतक-यांना जेव्हा पाणी उपलब्ध झाले त्यावेळी त्यांची निव्वळ आर्थिक स्थितीच सुधारली नाही तर त्याचा पिकांच्या निवडीवरसुद्धा परिणाम झाला. रिकाम्या पोटावर भविष्यातील विकास क:पदार्थ ठरतो. शाश्वतता हीच विकासाकडे मार्गक्रमण करु शकते.

बरे, हे पाणी त्याचे जवळ नाही का? आहे की, पण ते साठवायचे कसे व वापरायचे कसे याबद्दल त्याला मार्गदर्शनाची गरज आहे. दरवर्षी जो पाऊस पडतो त्याद्वारे सरासरीने त्याचे शेतावर एकरी 25 ते 30 लाख लिटर पाणी पडते. या पाण्याचे योग्य संग्रहण न झाल्यामुळे आज तो अडचणीत आहे. हे पाणी अडविले, जिरविले तर त्याचे शेतात शाश्वतता आल्याशिवाय राहणार नाही. हे त्याला समजत नसेल असे नाही. योग्य नेतृत्व मिळाले तर तो हे सहजपणे करु शकतो. श्री. अण्णा हजारे, श्री पोपटराव पवार यांनी योग्य मार्ग दाखविल्याबरोबर तेथील शेतक-यांसाठी नवीन दालन उघडल्या गेले व आज ते स्वाभिमानाने जगत आहेत.शेतीची उत्पादकता वाढविणे : जगाने शेतमालाच्या उत्पादनाचे जे मानक (स्टॅंडर्ड्स) घालून दिले आहेत त्याचा विचार करता आपला देश खूपच मागे रेंगाळतांना दिसत आहे. नमुन्यासाठी ऊसाचेच उदाहरण घ्याना. जगात एकरी 125 ते 150 टन ऊस उत्पादित केला जातो.

आपल्या महाराष्ट्रात हेच प्रमाण सरासरीने 25 ते 30 टनाचे जवळपास घुटमळत असते. याचाच अर्थ असा की तेवढे उत्पादन मिळवण्यासाठी आपला शेतकरी पाचपट जमीन वाया घालवत असतो. उत्पादनाचा दर हा अनुभव व शास्त्रीय ज्ञान या दोन गोष्टींवर अवलंबून असतो. आपल्या शेतक-याजवाळ अनुभव भरपूर आहे. पण अनुभव हा एक माहागडा शिक्षक आहे हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. पास होण्याइतके मार्क अनुभवावरुन मिळू शकतात. पण पारंगत व्हायचे असेल तर शास्त्रीय ज्ञानाला पर्याय नाही. त्यासाठी जमिनीचे परीक्षण , तिचा पोत, तिच्यातील मायक्रोन्युट्रीयंट्सची परिस्थिती यासारख्या विविध बाबींचा विचार व्हावयास हवा. ते केले नाही तर बॉर्डरवर पास होण्याची नामुष्की पदरी येते. पाण्याच्या उपलब्धतेमुळे उत्पादनाचा दर वाढतो पण तो कमाल पातळीवर पोहोचू शकत नाही. ज्या शेतक-यांनी शास्त्रीय ज्ञान मिळविले ते आज शेती व्यवसायात आघाडीवर असलेले दिसतात.

शेतमालाच्या संग्रहण गृहाची सोय : आज शेतमाल तयार झाल्याबरोबर शेतकरी बाजाराकडे धाव घेतो. याचे प्रमुख कारण म्हणजे त्याचे बरेच खर्च वाट पाहात असतात. शेतमाल विकल्याबरोबर तो हे खर्च करण्यास सक्षम होतो, पण सर्वांचाच शेतमाल बाजारात आल्यामुळे भाव पडतात व उत्पादन खर्च भरुन निघत नसतांना सुद्धा माल विकून शेतकरी मोकळा होतो. यासाठी शेतमालाचे भाव बांधून घेणे हा मार्ग नव्हे तर माल ताबडतोब बाजारात जाणार नाही याची काळजी घेणे हा योग्य मार्ग आहे. खेड्यात जर संग्रहगृहाची सोय उपलब्ध असेल तर शेतमाल त्या ठिकाणी संग्रहित केला जावू शकतो. माल जमा केल्यानंतर जी पावती मिळते ती बँकेत नेवून त्यावर तात्पुरते कर्ज मिळू शकते व जसजसा भाव वाढत जाईल तसतसा माल बाजारत आणला जावू शकतो. या मुळे पुरवाठ्यावर नियंत्रण ठेवले गेल्यामुळे शेतमालाचे भाव स्थिर राहू शकतात.

खेड्यात ही संग्रहगृहे बांधायची कोणी हा प्रश्न आहे. सरकारने या संदर्भात योजना घोषित केल्या आहेत पण दुर्दैवैने त्याचा कोणी लाभ घेतांना दिसत नाही. खरे पाहिले तर गावातील काही बेकार तरुणांनी एकत्र येवून बचत गट स्थापन केला तर त्यांना ही योजना चांगल्या प्रकारे राबविता येवू शकते. आज बचत गट वेगवेगळ्या संधींच्या शोधात असतात. त्यांच्यासाठी ही एक उत्कृष्ट संधी ठरु शतते. प्रत्येक खेड्यात अशी संग्रह गृहे बनली तर शेतक-यांना योग्य भाव मिळाल्याशिवाय राहणार नाही.

या तीनही बाबतीत शेतक-यांचे प्रबोधन मोठ्या प्रमाणात होणे गरजेचे आहे. खेड्यातील तरुण वर्ग या संबंधात नेतृत्व करेल तर त्या तरुणांना नोकरीसाठी दारोदार भटकण्याची आवश्यकता पडणार नाही. हे सर्व रचनात्मक स्वरुपाचे कार्य आहे. या साठी आंदोलन नाही तर चळवळ आवश्यक आहे. ही चळवळ दीर्घ कालीन लाभ मिळवून देवू शकते. शेती शाश्वत बनते. उत्पादकता वाढल्यामुळे शेती आर्थिक दृष्ट्याही किफायतशीर बनते. शेतमालाचा उत्पादन खर्च घटतो. बाजारातील रास्त भाव सुद्धा शेतक-याला परवडू शकतो. मुख्य म्हणजे शेतमालाच्या पुरवठ्यावर शेतक-यांचा अंकुश राहतो व त्याचा फायदा शेतमालाला योग्य किंमत मिळण्यासाठी होतो.

हे रचनात्मक नेतृत्व निर्माण करणे ही काळाची गरज : लढावू नेतृत्व हे शेतकरी समाजाला सरकारच्या विरुद्ध उभे करते. त्यातून संघर्ष निर्माण होतो. त्या संघर्षाच्या झळा समाजाच्या सर्व घटकांना सहन कराव्या लागतात. शेवटी काहीतरी थातुरमातुर तोडगा काढला जातो. थोडे दिवस कोण जिंकले, कोण हरले याची चर्चा होते व शेवटी हे आंदोलन पुढील वर्षाची वाट पाहात संपते. हे असेच चालू राहणार आहे काय? या तात्पुरत्या उपायापेक्षा दीर्घकालीन उपाय योजना करण्यासाठी कोण प्रयत्न करणार? यासाठी ग्रामीण भागातील तरुणांनी एकत्र येवून मार्ग शोधण्याचा प्रयत्न करावयास काय हरकत आहे? ग्रामीण भागातील तरुणांना या संदर्भात काही प्रशिक्षण हवे असेल तर त्यांना मदत करण्यासाठी मी कार्यकर्त्याची एक टीम तयार केली आहे. आपणास मदत हवी असेल तर माझेशी संपर्क साधावा ही विनंती.

डॉ. दत्ता देशकर, संपादक, जलसंवाद मासिक, ए 201 मिराबंल अपार्टमेंट्स, पॅनकार्ड क्लबजवळ, बाणेर पुणे 411 045, मोबाईल : 093252 03109