Source
जलसंवाद, जून 2012
पावसाचा थेंब कसा अडवायचा याचे उत्कृष्ठ उदाहरण मी गुजराथमध्ये अभ्यासले, गुजराथमध्ये पाणी प्रश्नावर विजय मिळविला ही बातमी मी जेव्हा वर्तमानपत्रात वाचली त्यावेळी मला आश्यर्च वाटले. महाराष्ट्रापेक्षा निम्मा पाऊस पडत असूनसुध्दा हे कसे शक्य आहे हा प्रश्न माझ्या मनाला पडला. म्हणून मी प्रत्यक्ष जावूनच बघायचे ठरविले. जे मी बघितले ते निश्चितच अचंबा करण्यासारखे होते.भारतातील नद्यांची दोन भागात विभागणी केली जाते. हिमालयातून उगम पावणार्या व इतर डोंगर कपारीतून उगम पावणार्या अशी ती विभागणी होय. हिमालयातून उगम पावणार्या नद्यांना बारमाही प्रवाह असतो. पावसाळ्यात पावसामुळे आणि उन्हाळ्यात वितरणारा बर्फ पाणी पुरवित असल्यामुळे त्या बारमाही प्रवाही असतात. पण इतर डोंगर कपारीतून उगम पावणार्या नद्या मात्र बारमाही प्रवाही राहतांना अडचण येते कारण पावसाळा संपल्यानंतर त्यांच्या जल पुरवठ्याला खंड पडतो व त्या कोरड्या पडतात.
पण काही दशकांपूर्वी परिस्थिती थोडी फार वेगळी होती. पूर्ण बारा महिने जरी नाही तरी आठ महिने त्यांना पाणी राहात असे. इतर दिवसात पृष्ठभागावरील वाळू बाजूला केली तरी पात्रात पाण्याचे अस्तित्व जाणवत असे. पण आज मात्र परिस्थिती झपाट्याने पालटत आहे. पावसाळा संपला रे संपला की नदीपात्र कोरडे ठक्क पडते व पाण्याचा मागमूसही आढळत नाही. असे का म्हणून घडते ? याचे महत्वाचे कारण म्हणजे भूजलाची खालावलेली पातळी. ही पातळी घसरण्यासाठी खालील कारणे दाखविता येतील.
1. पाण्याचा अमाप उपसा हे त्याचे प्रमुख कारण होय. पूर्वीचे काळी उपसा हा मानवी आणि प्राण्यांच्या मदतीने व शक्तीने होत असल्यामुळे त्याची गती व परिमाण कमी होते. दोर बादलीने पाणी शेंदणे, बोअरमधून पाणी हापसणे, मोटेनी पाणी काढणे, रहाट गाडग्याने पाणी काढणे यासारखे मार्ग उपलब्ध असल्यामुळे उपसा कमी होता. आता मात्र पंपाचे बटन दाबले म्हणजे कोणत्याही शारिरिक श्रमाशिवाय अमाप उपसा करणे शक्य झाले असल्यामुळे त्याला कोणताही धरबंध राहिला नाही. भूजलाची पातळी खाली जात आहे याची तमाही कोणाला राहिली नाही.
2. बदलती पावसाची पध्दतीही यासाठी कारणीभूत ठरली आहे. आज पासाचे दिवस कमी होत आहेत पण पावसाचे परिमाण मात्र जवळपास तेवढेच आहे. यामुळे पावसाचा वेग वाढला असून जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण कमी झाले आहे. जमिनीवरून वेगाने वाहात जाणारे पाणी कमी प्रमाणात मुरते, दिवसेंदिवस पूराचे प्रमाणही याच कारणामुळे वाढत चालले आहे.
3. वनराजी, झाडे वाहत्या पाण्याला अडथळा करतात. पण अति वृक्षतोडीमुळे वाहत्या पाण्याला येणारा अडथळा दूर झालेला असल्यामुळे पाणी सूसाट वाहात जाते व ते जमिनीत मुरण्याचे प्रमाण कमी झाले आहे.
4. तलावांमध्ये साचलेला गाळ, घरोघरी आंगणात बसलेलेल पेव्हर ब्लॉग्स, फरश्या, रस्त्यांचे वाढते डांबरीकरण आणि सिमेंटीकरण इत्यादीमुळे जमिनीत पाणी मुरणारी छिद्रे बंद झाली असून पाणी मुरण्याची क्रिया मंदावत चालली आहे. यामुळेही भूजल पातळी घसरते आहे.
5. हे होणारे नुकसान आपण मानवी प्रयत्नांनी थोपवू शकलो असतो. कृत्रिम जल पुनर्भरणाने आपण हे साध्य करू शकलो असतो. माणसाची बेफिकीर वृत्ती, जल पुनर्भरणाबाबतचे अज्ञान यामुळे या चळवळीला योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही व आज घसरती भूजल पातळी हे एक संकट बनले आहे.
खाली दिलेली दोन चित्रे नक्की काय घडले आहे हे आपल्याला समजावून सांगू शकतील.
पहिल्या चित्रात भूजल पातळी नदीच्या जल पातळीपेक्षा वर आहे. पाणी नेहमी समपातळी शोधत असल्यामुळे भूजलाचा सातत्याने नदीकडे ओघ राहात असे. पाझर नेहमेमीच हळू असतो. त्यामुळे हा ओघ संथपणे वर्षभर टिकून राहात असे. पण आता मात्र भूजल पातळी नदी जल पातळीपेक्षा खोल गेल्यामुळे पाझराचा प्रश्नच उपस्थित होत नाही. यावर उपाय एकच आहे, तो म्हणजे भूजल पातळीत वृध्दी घडवून आणणे. नैसर्गिक पुनर्भरण आवश्यक त्या प्रमाणात होत नसेल तर कृत्रिम जल पुनर्भरणाची कास धरणे गरजेचे ठरते.
यासाठी लोकसहभाग महत्वाचा :
जल पुनर्भरण करून भूजल पातळी वाढविणे हे एकट्या दुकट्याचे काम नव्हे. या कामात लोकसहभाग वाढविण्याची नितांत गरज आहे. पावसाच्या पाण्याचा एक महत्वाचा नियम आहे. पावसाचा थेंब जिथे पडले तिथेच त्याचा निचरा करणे आवश्यक आहे. (Catch the rain where it falls) त्याला वाहू दिले तर तो आपल्या हातातून कसा निसटून जातो ते आपल्या लक्षातही येत नाही. दुर्दैव हे आहे ती तो आपल्या हातातून निसटतो, तो नाल्यांद्वारे नदीपर्यंत पोहोचतो, या नदीवर दूर अंतरावर आपण धरण बांधतो, त्याला तिथे अडवितो आणि अव्वाच्या सव्वा खर्च करून पाईपद्वारे वाजतगाजत पुन्हा आपल्या घरी घेवून येतो. आणि या सर्वाला विकास नावाचा शिक्का मारून जनतेच्या डोळ्यात धूळफेक करतो. हा विकास नसून विकासाची थट्टा आहे.
गुजराथ - लोकसहभागाचे उत्कृष्ठ उदाहरण :
पावसाचा थेंब कसा अडवायचा याचे उत्कृष्ठ उदाहरण मी गुजराथमध्ये अभ्यासले, गुजराथमध्ये पाणी प्रश्नावर विजय मिळविला ही बातमी मी जेव्हा वर्तमानपत्रात वाचली त्यावेळी मला आश्यर्च वाटले. महाराष्ट्रापेक्षा निम्मा पाऊस पडत असूनसुध्दा हे कसे शक्य आहे हा प्रश्न माझ्या मनाला पडला. म्हणून मी प्रत्यक्ष जावूनच बघायचे ठरविले. जे मी बघितले ते निश्चितच अचंबा करण्यासारखे होते.
तिथे मी काय बघितले?
1. प्रत्येक गावातील लोक एकत्र आले.
2. राजकारण, जात, धर्म, आर्थिक पातळी या सर्व बाबी बाजूला काढायचे ठरले.
3. गावातील सर्व नाल्यांची मोजणी केली गेली.
4. प्रत्येक नाला रूंद केला गेला.
5. प्रत्येक नाला खोल केला गेला.
6. प्रत्येक नाल्यावर 15 ते 20 साखळी बंधारे बांधण्यात आले.
7. पावसाळा सुरू झाल्यावर सर्व बंधारे तुटुंब भरले.
8. गावातले पाणी गावाचे बाहेर जाणे बंद झाले.
9. भूजल पातळीत लक्षणीय वाढ झाली.
त्याचा परिणाम म्हणून शेतकरी वर्षातून तीन पिके काढावयास लागले, शेती उद्योगात शाश्वतता आली, पाणी उपसून सुध्दा पाण्याची पातळी खाली घसरत नव्हती, ग्रामीण विकासाचा दर 11 टक्क्यांपर्यंत वाढला, ग्रामीण रोजगार वाढल्यामुळे शहरात गेलेले गावकरी खेड्यात परत आले व घराघरात समृध्दी दिसायला लागली. आता तिथे टँकर आढळत नाहीत, पाणी आता संपूर्णपणे अडविले गेल्यामुळे पूर येणेही बंद झाल्याचे गावकरी बोलले.
शिरपूरचे उदाहरण :
जी परिस्थिती वर वर्णिलेली आहे अगदी तशीच परिस्थिती धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील प्रयोगातही दिसून आली. या गावातील आमदार श्री. अमरिशभाई पटेल यांनीसुध्दा हाच प्रयोग आतापावेतो 25 गावात केलेला आहे. व त्यांनाही वरील सारखेच निष्कर्ष मिळाले आहेत. सध्या महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी पाण्याची ओरड चालू असतांना येथील बंधारे आजही भरपूर पाणी अडवून बसले आहेत. प्रत्येक बंधार्याच्या पलिकडे पाझर फुटले आहेत. या पाझरातून सतत पाणी वाहतांना दिसते. ही तर नुसती सुरूवात आहे. त्यांचा 120 गावात ही परिस्थिती निर्माण करण्याचा संकल्प आहे. धुळे जिल्हा हा अवर्षण ग्रस्त प्रदेशात मोडतो. इतके असून सुध्दा तिथे हा प्रयोग यशस्वी झाला आहे. याच जिल्ह्यात पांझरा नदीला बारमाही करण्याच्या प्रयत्नाला यश आलेले आहे.
वरील दोन प्रयोगात एक महत्वाचा फरक आहे. गुजराथमधील कार्य लोकसहभागातून चालू आहे तर शिरपूर येथील कार्य आधुनिक यंत्रसामुग्री वापरून करण्यात येत आहे. ते कसे होत आहे याचे पाण्याला काहीच सोयरसुतक नाही. अडविले तर जिरणे ही त्याचा स्वभाव धर्म आहे. तो ते पार पाडणारच.
या प्रयोगापासून आपण काही शिकणार आहोत किंवा नाही हा खरा प्रश्न आहे. गेल्या साठ वर्षांपासून आपण राबवित असलेले धोरण चुकले तर नाहीना असे विचारावयाची पाळी आज आली आहे. या मरणासन्न नद्या वाचवण्यासाठी आपल्याला आवाहन करीत आहेत. ऐकणार नं त्यांची ही हाक?