Source
जल संवाद
दोन वर्षांपूर्वी, पंजाबमध्ये सतलज नदीवर बांधलेल्या भाक्रा नांगल या प्रकल्पास भेट देण्याचा योग आला. भाक्रा येथे मुख्य साठा असून नांगल या ठिकाणी बंधारा बांधून कालवे काढण्यात आले आहेत. भाक्रा हे काँक्रिटमध्ये बांधलेले देशातील सर्वांत उंच धरण आहे. हे धरण बांधून व त्यामध्ये पाणी साठविण्यास सुरूवात होऊन चाळिस वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला आहे. देशातील हे आकाराने दुसऱ्या क्रमांकाचे जलाशय आहे. पहिल्या क्रमांकावर नर्मदा खोऱ्यातील इंदिरा सागर आहे.
दोन वर्षांपूर्वी, पंजाबमध्ये सतलज नदीवर बांधलेल्या भाक्रा नांगल या प्रकल्पास भेट देण्याचा योग आला. भाक्रा येथे मुख्य साठा असून नांगल या ठिकाणी बंधारा बांधून कालवे काढण्यात आले आहेत. भाक्रा हे काँक्रिटमध्ये बांधलेले देशातील सर्वांत उंच धरण आहे. हे धरण बांधून व त्यामध्ये पाणी साठविण्यास सुरूवात होऊन चाळिस वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला आहे. देशातील हे आकाराने दुसऱ्या क्रमांकाचे जलाशय आहे. पहिल्या क्रमांकावर नर्मदा खोऱ्यातील इंदिरा सागर आहे. या जलाशयात नेमका किती गाळ साठला आहे याचा अचुक अंदाज बांधण्याचा प्रश्न प्रकल्प अधिकाऱ्यांना अनेक वर्षांपासून भेडसावत होता. हा प्रश्न महाराष्ट्रातील 'मेरी' ही संस्था सोडवू शकेल अशी प्राथमिक बोलणी या भेटीत 'मेरी' या संस्थेचा महासंचालक या नात्याने करता आली. तसा विश्वासपण मला होता. सुरूवातीची चर्चा पुढे फळाला येऊन 'मेरी' वर हे काम सोपविण्यात आले आणि 2005 या वर्षी 'मेरी' च्या अधिकाऱ्यांनी हे काम यशस्वीरित्या अनेक अडचणींवर मात करून पूर्ण केले. जगातील एका मोठ्या जलाशयाच्या गाळाच्या अभ्यासाचे काम डीजीपीएस माऊंटेड बोटीच्या मदतीने ʅमेरीʆ ने पूर्ण करून देशपातळीवर आपली या क्षेत्रातील कार्यक्षमता सिध्द केली. महाराष्ट्राच्या जलसंपत्ती खात्याला ही एक अभिमानाची बाब ठरली.भाक्रा धरण पाहात असतांना धरणा शेजारच्या मॉडेल रूम मध्ये जाण्याचा योग आला. या संग्रहालरूपी वास्तूत बांधकामाचे अनेक दुर्मिळ फोटो लावलेले आहेत. या फोटोमध्ये लक्ष वेधून घेणारे एक चित्र दिसून आले. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू प्रकल्पावर देखरेख करणाऱ्या एका उच्च पदस्थ वरिष्ठ अभियंत्याला स्वत:च्या हाताने चहा तयार करून चहाचा कप त्याच्या हातात देत आहेत असे. एका विशाल देशाचा पंतप्रधान एका जाणकार अभियंत्याबरोबर कसा वागतो हे त्या चित्रातून दिग्दर्शित होत होते. पंडित नेहरू या प्रकल्पाचे बांधकाम पाहण्यासाठी, कामाला गती देण्यासाठी वारंवार भेटी देत असत, मुक्काम करीत असत असही समजलं. आज अभियंत्याला पण हे जमत नाही. कारणे असतील. पण हे सुचिन्ह नाही. यापेक्षा महत्वाचे म्हणजे देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी जल विकासाचे मोठे प्रकल्प द्रूतगतीने आणि अचुकतेने पूर्ण करणे किती निकडीचे आहे याची प्रकर्षाने जाणिव होती हा संदेश यातून दिला जात होता. हे चित्र मला फार भावले.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर उद्योगधंद्यामध्ये भरारी मारून देशाचा आर्थिक विकास करण्याचे स्वप्न पंचवार्षिक योजनेच्या माध्यमातून आखण्यात आले. याचाच परिपाक म्हणून देशातल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये मोठाले जलविकासाचे प्रकल्प हाती घेण्यात आले. पंजाबमध्ये भाक्रा तर महाराष्ट्रात कोयना जल-विद्युत प्रकल्पाला हा मान मिळाला. महाराष्ट्राच्या निर्मिती बरोबरच कोयना प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले. कोयना ही कृष्णेची उपनदी. या नदीवर साधारणता 100 मीटर उंचीचे धरण बांधून 100 टी.एम.सी पाणी साठवून कोकण कड्याच्या 400 मीटर उंचीवरून खाली सोडून विजनिर्मिती करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला. या प्रकल्पाची अनेक वैशिष्ठ्ये आहेत. हा प्रकल्प भुयारी आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून पूर्व वाहिनी पाणी परिचम वाहिनी करण्यात आले आहे. राज्यातील हे एकमेव धरण काँक्रिटमध्ये बांधलेले आहे. धरण पूर्ण होण्याच्या आधीच 1967 ला या परिसरात मोठा भूकंप (6 रिष्टर स्केल पेक्षा जास्त ताकदीचा) झाला. यामुळे धरण आणि भूकंप यांचा संबंध लावण्यासाठी एक सोयीस्कर उदाहरण मिळाले. राज्याच्या सिंचन व विद्युत विभागांवर हे काम सोपविण्यात आले. आजसुध्दा जलविद्युत निर्मितीचे प्रकल्प पाटबंधारे / जलसंपत्ती विभागाशीच जोडलेले आहेत. हा अवघड, पूर्णत: भूमिगत विद्युत निर्मितीचा प्रकल्प अनेक अडचणींवर मात करून पूर्ण करणे सिंचन विभागाला एक आव्हान होते. या प्रकल्पासाठी एक स्वतंत्र मुख्य अभियंता हे पद निर्माण करण्यात आले होते. काँक्रीटचे धरण, भूयारी विद्युतगृह, बोगदे यांचे हे एक जाळेच होते. राज्यातील जवळजवळ 50 टक्के अभियंते याच प्रकल्पावर काम करत होते असे म्हंटले तर चुक ठरू नये. स्वातंत्र्यानंतरचा एक मोठा आणि महत्त्वाचा प्रकल्प असल्यामुळे या प्रकल्पावर काम करणारे सर्व अभियंते स्वत:ला भाग्यवान आणि इतरांपेक्षा वेगळे समजणारच.
1980 ला मी सीडीओ नाशिकला आलो. कार्यकारी अभियंता म्हणून. सुरूनातीला मी पेंच जलविद्युत प्रकल्पाचे डिसाईन्सचे काम पहात होतो. 5 अधिक्षक अभियंते, 25 ते 30 कार्यकारी अभियंते, 125 उप अभियंते, शंभरेक शाखा अभियंते असा ताफा होता. दुपारी अडिच वाजता टी क्लबमध्ये चहा घेणे आणि अनेक विषयांवर, राजकारणावर मत मांडणे, चर्चा करणे हा अनेकांचा आवडीचा विषय होता. टी क्लबमध्ये उपस्थित ही कार्यालयातील उपस्थिती समजली जायची. अनेक अधिकारी बऱ्याचवेळा या कारणामुळे टी क्लबचा वेळ चुकवीत नसत. अधिक्षक अभियंता व कार्यकारी अभियंतांचा मिळून एक क्लब होता. सीडीओमध्ये कोयना प्रकल्पावर काम केलेले वा त्या प्रकल्पाशी या ना त्या कारणाने संबंध आलेले अधिकारी जास्त होते. उर्वरित हे खात्यामध्ये नवीम आलेली व कोयनेशी संबंध नसलेली होती. सर्वश्री. रत्नपारखी, फडके, भिंगारे , भावे, डोडीयाळ इत्यादी अनेक लोक कोयनेच गुणगान करणारे होते. चर्चेची सुरूवात बहुतेक वेळी याच मंडळीकडून होत असे आणि एकूणच क्लब कोयनामय होण्यास वेळ लागत नसे. ज्या दिवशी ही मंडळी क्लबमध्ये नसायची त्या दिवशी इतरांना स्वतंत्रता मिळाल्यासारखी वाटायची.
अनेकवेळा असे वाटून जायचे की आपण कोयनेत काम केले नाही म्हणजे फार मोठा गुन्हा केला का? नंतर नंतर आमचीपण भीड मोडली व आम्ही बोलायला लागलो. असा हा कोयनावासीयांचा प्रभाव जाणवत असे. कोयना प्रकल्पामध्ये काम करण्याची पध्दत वेगळी होती. गाड्यांसाठी सेंट्रल पूल, सेंट्रल अकौंटींग सीस्टीम इत्यादी बाबींमुळे जबाबदाऱ्यांचे विकेंद्रीकरण झालेच होते. एकाच ठिकाणी वरिष्ठांपासून ते कनिष्ठ स्तरापर्यंत सर्वच अधिकारी एकमेकांवर अवलंबून राहून काम करण्याची पध्दत रूजलेली होती असेही कळून यायचे. यामुळे चुका ह्या निश्चितच कमी होणार. पण स्वतंत्रपणे निर्णय घेण्याच्या वृत्तीचा विकास होत नाही हे ही ध्यानात येण्यात ऊशीर लागत नाही. कोयना प्रकल्प म्हणजे पाटबंधारे विभाग नाही हा भाव रूजला नव्हता. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्यातल्यात्यात गरीब शेतकऱ्याला आर्थिक बळ देण्यासाठी कोयनेपेक्षा देशावरील इतर लहान सहान प्रकल्प फार महत्त्वाची भूमिका वठवितात हे लक्षात यायला उशीर लागत होता. ह्यात पुन्हा दोन धारा पुढे आलेल्या होत्या. एक मोठी धरणे, कालवे बांधणाऱ्यांची तर दुसरा वर्ग लहान प्रकल्पाचा गौरव करणारा. आमच्यासारख्या नवशिक्यांत मात्र हा सगळा प्रकार संभ्रम निर्माण करायचा. नंतर आवडी निवडी, त्याचा -माझा हे सर्व समजू लागले आणि आम्हीपण नेटाने तग धरू लागलो.
अलीकडे दुष्काळ पडतो. इतिहास काळातपण दुष्काळ पडल्याच्या घटना अनेक आहेत हे इतिहास वाचनातून आपणास समजते आणि म्हणून दुष्काळाबद्दल नाविन्य असे काही वाटत नाही. 1967 ला प्रथमत:च स्वातंत्र्यानंतर भूकंपाचा अनुभव आला आणि कोयना परिसरात भूकंप होणे ही एक नवीन घटना वाटू लागली. कोयना जलाशय निर्मितीपूर्वी या परिसरात भूकंप होत नव्हते का हा मुद्दा. पण या बद्दल ठामपणे कोणी बोलत नव्हते वा इतिहास वाचनातही हे कुठे येत नव्हते. म्हणजेच भूकंपाचा इतिहास हा लिहीला गेला नव्हता असेच म्हणावे लागेल. पावसाची मोजणी, नोंद याची सुरूवात भारतात साधारणत: 100 वर्षांपासून झालेली आहे. याचा अर्थ 100 वर्षांपूर्वा पाऊस पडत नव्हता असा होतो का? अनेक जुन्या मंडळींशी बोलताना असे लक्षात आले की भूकंप हा त्या परिसराला नवीन नव्हता. त्याची मोजणी झाली नाही, नोंद झाली नाही एवढेच खरे. आणि म्हणून धरण आणि भूकंप याची सांगड घालण्याचा प्रयत्न करणे हे वास्तवापासून दूर गेल्यासारखे वाटते. 1967 चा भूकंप झाल्यानंतर पण त्याच परिसरात कोळकेवाडी हे दगडी बांधकामातील धरण हाती घेऊन पूर्ण करण्यात आले, याचाही उल्लेख अनेकवेळा होतो. जगभरामध्ये अनेक ठिकाणी भूकंपप्रवण भागातपण मोठी धरणे बांधण्याचा तो काळच होता. महाराष्ट्र त्यात मागे राहिला नाही ही एक जमेची बाब. ह्या घटनेने दगडी धरणाच्या मजबुतीकरणाच्या प्रक्रियेची सुरूवात करून दिली. 2005 या वर्षी कोयना धरणाचा उंच सांडवापण मजबूत करण्यात आला. ही एक वैशिष्ट्यपूर्ण घटना. कदाचित या क्षेत्रातील जागतिक स्तरावरील हा पहिला उपक्रम ठरावा.
भुयारी काम, बोगदे, वीजगृह हे त्या अर्थाने सोपे काम असत. जोपर्यंत खडक हा मजबूत व अनुकूल असतो. कोयना परिसरात साधारणत: खडकाने अभावानेच प्रतिकूलता दाखविली असावी. खडकालाच कोरतो आणि खडकाचीच मदत घेतो. भूगर्भात काम चाललेले असते, पृष्ठ भागावरून दिसत नाही आणि म्हणून तो कौतुकाचा विषय ठरत असतो. प्रतिकूल खडकात काम करणे हे कठीण व जबाबदारीचे असते. पेंच प्रकल्पाच्या बोगद्यात अशा परिस्थितीला तोंड द्यावे लागले. इतिहास काळात दोन-अडीच हजार वर्षांपूर्वी मऊ मातीतून बोगदे केल्याची उदाहरणे आपल्या देशात, महाराष्ट्रात सापडतात. अडिच हजार वर्षांपासून ते टिकून आहेत आणि कार्यरतपण आहेत. विज्ञानाची, तंत्रज्ञानाची माहिती नसलेला तो काळ. पण पारंपारिक शहाणपण या सगळ्यावर मात करणारे ठरले असच म्हणाव लागेल.
सीडीओच्या माझ्या कालावधीत माझाही कोयनेशी चांगलाच संबंध आला हा योगायोगच म्हणावा. कोयना टप्पा 4 ची ती सुरूवात होती. कोयनेची क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने वेगवेगळे उपक्रम त्या परिसारत राबविण्यात आलेले आहेत. एक लहानसा बंधारा आहे आणि त्या बंधाऱ्याला सगळ्या प्रकारचे सांडवे (स्वयंचलित दरवाजा, ब्रीचींग सेक्शन इ.) आहेत. अलिकडचे कोयनेचे युग तर लेक टॅपींगचे सुग म्हणून ओळखले जाईल. हे पण काही अवघड नाही अस अनुभवाअंती वाटत असाव.
स्वातंत्र्यानंतर लागलीच सुरूवात करण्यात आलेला हा प्रकल्प. अनेक टप्पे ओलांडत आहे. संपणार कधी? याचे उत्तर देणं कठीण आहे. तिसऱ्या पीढीत तो प्रवेश करित आहे. प्रकल्प पूर्ण झाला असं म्हणण्यास वाव न देता.
डॉ. दि.मा.मोरे, पुणे