Source
जल संवाद
पुण्यामध्ये भूजल मूबलक आहे; पण आज ते पिण्यालायक असेलच असे नाही. कात्रजच्या तलवातून येणारी नहर आजसुद्धा अविरतपणे वाहत आहे. या पाण्याकडे कोणाचे लक्षही नाही. एकूणच समाजमनामध्ये पाण्याबद्दल प्रेम नाही, आपुलकी नाही, भावनेचा भाग संपलेला आहे आणि त्यामुळे आधुनिक व्यवस्थापनेच्या माध्यमातून जे काही उपलब्ध होते ते जास्तीत जास्त आपल्या पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न केला जातो.
अलीकडेच पुणे येथे पाणीपुरवठ्याच्या ऐतिहासिक साधनाबद्दल दीडशेपेक्षा जास्त इतिहास तज्ज्ञ, जलतज्ज्ञ, विचारवंत व सामाजिक कार्यकर्ते इत्यादींच्या उपस्थितीत पारंपारिक जलव्यवस्थापनाची साधने व त्याची व्यावहारिक उपयोगिता या विषयाच्या वेगवेगळ्या पैलूवर चर्चा घडवून आणण्यात आली. भारत या देशाला पाण्याच्या इतिहासाचीदेखील महान परंपरा लाभलेली आहे. याची प्रचिती आपणास ऐतिहासिक ग्रंथ, साहित्याच्या वाचनातून, नोकरीतून आणि जल व्यवस्थापनेच्या पार्थिव सांगाड्यातून पुरेशा प्रमाणात येते. औरंगाबादचे अभ्यासू व्यक्तिमत्त्व आणि थोर इतिहासतज्ज्ञ डॉ. रा.श्री. मोरवंचीकर यांनी प्रथमत:च या विषयाला स्पर्श करण्याच्या दृष्टिकोनातून दोनएक वर्षांपूर्वी भारतीय जलसंस्कृती या नावाने मराठीत पुस्तक लिहिले आणि नुकताच त्या पुस्तकांचा इंग्रजी अनुवाद इंडियन वॉटर कल्चर या नावाने प्रसिद्ध झाला.पाणी, इतिहास, संस्कृती, लोकरिती याचा अभ्यास करणाऱ्या अनेक मंडळींना हे ग्रंथ बहुमोल मार्गदर्शन करणारे ठरणार आहेत. या चर्चासत्राच्या उद्घाटनपर सत्रात या इंग्रजी पुस्तकाचे प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. या पुस्तकाच्या रुपाने भारतीय संस्कृतीचे नाते पाण्याशी कसे आहे हे समजणे सोपे झाले. नदीला आपण माता म्हणतो आणि म्हणून तिचे पावित्र्य जपणे आणि संरक्षण करणे हे उपभोगकर्त्यांचे दायित्व ठरते. दुर्दैवाने गेल्या 40-50वर्षांच्या प्रवासात आपण भारतीय या नात्याला गालबोट लावतो आहेत. कुठे चुकले आणि काय चुकले हे समजण्यासाठी तरी या पुस्तकांच्या माध्यमातून जनमानसाला उपयोग होईल अशी अपेक्षा आहे.
कोणत्याही देशाला त्याच्या संस्कृतीचा, परंपरेचा, लोकोपयोगी रुढीचा सार्थ अभिमान असतो. श्रीलंकेतील पाण्याची महती सांगणारे पुस्तक फार पूर्वीच लिहिलेले आहे. तीच बाब बांगलादेशाच्या बाबतीत पण खरी ठरते. या दोन पुस्तकांना आपण वॉटर इन श्रीलंका आणि वॉटर इन इस्लाम अशा नावाने ओळखू या. योगायोगाने 4 ते 5 हजार वर्षांपासूनचा (सिंधुकाठची संस्कृती) इतिहास लाभलेल्या या देशाला आधुनिक युगात वॉटर इन इंडिया अशा अर्थाचे पुस्तक काढणे जमले नाही, ही इतिहास लेखनातली फार मोठी त्रुटी आहे असे म्हटले तर वावगे ठरु नये. जगामधल्या ज्या राष्ट्रांना प्राचीन संस्कृती लाभलेली आहे (इजिप्त, इराण, चीन, रोम) त्यांनीदेखील पाण्याच्या इतिहासावर प्रकाश टाकणारे विपूल असे लेखन केलेले दिसत नाही, जागतिक स्तरावर या विषयाचा पाठपुरावा करण्यासाठी आयडब्लयुएचए (इंटरनॅशनल वॉटर हिस्ट्री असोसिएशन) ही संस्था काम करत आहे. पाण्यातील वेगवेगळ्या पैलुंची उकल करण्यासाठी त्याच्या वेगवेगळ्या अंगावर प्रकाश टाकावा लागेल. ऐतिहासिक अंग, न्यायिक अंग म्हणून उल्लेख करावयास हरकत नाही. या सर्वत्र उपांगावर वरील ग्रंथात उपयुक्त अशी माहिती दिलेले आहे.
उद्घाटनाच्या सत्रानंतर विषयावर चर्चा, तीन सत्रात घडवून आणण्यात आली. जवळजवळ 20 अभ्यासकांनी या विषयाच्या वेगवेगळ्या पैलूंवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. या दिवसभराच्या चर्चेतून जे निष्कर्ष बाहेर आले ते या लेखाच्या शेवटी दिलेली आहेत. या निष्कर्षांचे अनुपालन आपणालाच करावयाचे आहे. शासनाकडे बोट दाखवून गप्प बसणे परवडणारे नाही.
इतिहास लेखनाचे, वाचण्याचे अभ्यासण्याचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे इतिहासातून शहाणपणा शिकण्याचे होय. देशभर वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या भौगोलिक, भूशास्त्रीय, सामाजिक, हवामानाच्या प्रदेशात पाणी हाताळण्यासाठीच्या शहाणपणाचे दिग्दर्शन करणारी लक्षावधी साधने आपल्याला पहावयास मिळतात. दुर्दैवाने गेल्या शंभरएक वर्षांमध्ये या साधनांची हेळसांड झाली. त्यातला लोकसहभाग संपला आणि या साधनांचे महत्त्व लोकांना वाटेनासे झाले. विदर्भाच्या वैनगंगा खोऱ्यात पाचशे, सहाशे वर्षांपूर्वी गोंड राजाने (ट्रायबल किंग) शेतीला पाण्याचा आधार देण्यासाठी आणि जनमानसाचे जीवन स्थिर व सुखी करण्यासाठी हजारो तलावांची निर्मिती केली. त्यापैकी आज किमान दहा हजार तलाव जीर्ण अवस्थेत कार्यरत आहेत आणि अभ्यास करण्यासाठी उपलब्ध आहेत. ब्रिटिश काळात पण काही तुरळक तलाव या भागात निर्माण करण्यात आले. दोन तलावांचा या ठिकाणी उल्लेख करीत आहे.
गोंडकालीन नवेगाव बांध आणि ब्रिटिश कालीन असोल मेंढा या परिसरातील लोकांना बोलते केल्यानंतर असे समजते की, नवेगाव बांध बांधताना जो लोक विस्थापित झाले, त्यांना कालव्याच्या शीर्ष भागात लाभ क्षेत्रात जमिनीला जमिनी देणयात आल्या. इतकेच नाही तर जे भूमिहीन बलुतेदार होते त्यांनाही लाभक्षेत्रात जमिनी देऊन शेतमालक करण्यात आले. आज त्यांचे वंशज पाण्याखालच्या जमिनीचा लाभ घेत असलेले दिसतात. असोल मेंढा येथील (1930 ला पूर्ण झाला) विस्थापित झालेल्या गावासाठी स्वतंत्र सिंचनाच्या व्यवस्था करण्यात आल्या. या दोन्ही ठिकाणी विस्थापितांची कसलीही तक्रार नाही. विस्थापितांचे प्रश्न मानवतेच्या दृष्टिकोनातून किती विशाल मनाने हाताळावयाचे असतात त्याची ही दोन प्रतिकात्मक उदाहरणे ग्वाही देतात. आपण हे का शिकलो नाही? पुनर्वसनाच्या नीतीमध्ये या पैलूचा इतिहासातील ज्ञानाच्या अनभिज्ञतेमुळे अंतर्भाव झालेला नाही असेच म्हणावे लागेल. लोकांचा राजा, शाहू छत्रपती यांनीही राधानगरी धरण बांधताना अशाच काही तत्वाचा अवलंब केलेला असणार म्हणूनच त्या ठिकाणीही विस्थापितांच्या कसल्याही तक्रारी समोर येत नाहीत.
स्वातंत्र्यानंतर निर्माण केलेला असा एकही प्रकल्प नसेल की ज्या ठिकाणी विस्थापितांचे प्रश्न नाहीत. या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यातील येलदरी या जलविद्युत प्रकल्पात 1962 साली विस्थापित झालेल्या सोनसांगली या 300 घरांच्या गावात आजपर्यंतसुद्धा वीज पोहोचलेली नाही हे वास्तव या विषयातला विदारक भाग पुढे आणते. यावर्षी जून अखेरपर्यंत पाऊस पडत नव्हता. जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात पावसाने थोडा आधार दिल्यामुळे पुण्यासारख्या शहराला जीवदान मिळालेले आहे असेच म्हणावे लागेल. पुण्याच्या उशाला 29 टीएमसीची चार जलाशये आहेत. जूनच्या अखेरीस या सर्व जलाशयातील एकूण पाणी केवळ 15 ते 20 दिवस पुरेल एवढेच शिल्लक होते. तव्यावरील तुझी आणि काठवटीतील माझी अशा प्रकारच्या नियोजनामुळे आपला समाज जीवनाला स्थिरता देऊ शकणार आहे का? हा कळीचा मुद्दा आहे. अशीच परिस्थिती राज्यातीलच नव्हे तर एकूण देशातील अनेक शहरांची झाली. लोक म्हणतात, 1961 ला पानशेत फुटले. पुणे शहर विहिरीवर व्यवस्थितपणे तग धरून होते. चारएक हजाराच्या पुढे विहिरींची संख्या असावी.
पुण्यामध्ये भूजल मूबलक आहे; पण आज ते पिण्यालायक असेलच असे नाही. कात्रजच्या तलवातून येणारी नहर आजसुद्धा अविरतपणे वाहत आहे. या पाण्याकडे कोणाचे लक्षही नाही. एकूणच समाजमनामध्ये पाण्याबद्दल प्रेम नाही, आपुलकी नाही, भावनेचा भाग संपलेला आहे आणि त्यामुळे आधुनिक व्यवस्थापनेच्या माध्यमातून जे काही उपलब्ध होते ते जास्तीत जास्त आपल्या पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न केला जातो.
चर्चेमध्ये तीन उदाहरणे समोर आली. शहरातील लोकसंख्या वाढली, पारंपरिक पाणीपुरवठ्याच्या व्यवस्था उभ्या करण्याची ओघानेच गरज निर्माण झाली. हे करत असताना मात्र आपण जुन्या व्यवस्थेकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले, अनेक ठिकाणी शहरातील आड, बारवा, गाव तलाव बुजवून टाकले, त्याच्यावर क्राँकिटचे स्लॅब टाकले. अंबाजोगाई, परळी, बीड, वाशी ही ठिकाणे आडाच्या घनतेमध्ये जगप्रसिद्ध आहेत. दुष्काळी प्रदेश, पण त्याकाळच्या लोकांनी भूजलाचा आधार घेऊन जीवनाला स्थैर्य निर्माण करून घेतले होते. स्वातंत्र्यानंतर शहरे विस्तारली, फुगली, जुन्या व्यवस्था अपुऱ्या पडल्या आणि म्हणून दूर अंतरावरुन अनेक ठिकाणी उचलून पिण्यासाठी पाणी आणण्यात आले. या नव्या योजना मूबलक पाणी आणू लागल्या. नळाद्वारे पाणी स्वयंपाकघरात आले. आडातील पाणी लोक उचलणार? शहरांमध्ये इंच इंच जागेला फार महत्त्व आले. आड, तलाव, बारवेची ठिकाण बंद करण्यात आली. ज्या ठिकाणी शिल्लक राहिली त्याचे उकिरड्यात रुपांतर झाले.
पावसाचा ताण जवळजवळ दरवर्षी बसतो. शहरे ऑक्सीजनवर जातात. चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहतात. अंधश्रद्धेचा कळस म्हणून बेडकाची लग्ने लावतात. अनेक प्रकार करतात, पण आपल्या पूर्वजांनी जो शहाणपणाचा वसा आपल्या हातात दिलेला आहे त्याचे मात्र अनुकरण करत नाहीत ही यातील शोकांतिका आहे. धुळे शहराच्या उशाला विसाव्या शतकाच्या सुरुवातीला जलाशय निर्माण करून प्रवाही पद्धतीने शहराला पाणीपुरवठा केला गेला. अशीही माहिती पुढे आली की, त्याकाळी पण या वापरलेल्या पाण्यावर प्रक्रिया करूनच ते नदीत वा सिंचनासाठी वापरले जात होते. देशात जे इतरत्र घडते ते धुळ्यात घडले आणि नवीन योजना कार्यान्वित कराव्या लागल्या. पण आनंदाची गोष्ट ही की असे करत असताना या ठिकाणच्या काही मंडळींनी जुन्या व्यवस्थेला विसरली नाहीत आणि जुने आणि नवे याची सांगड घालून धुळे शहराचा पाणीपुरवठा पुनर्जिवित करण्यात आला. असाच प्रकार पन्हाळ्याला पण घडला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला हा प्रसिद्ध किल्ला विपूल पाऊस पडणारा आणि म्हणूनच याचं नाव पन्हाळा. लोकसंख्या वाढली आणि जवळजवळ 600 मीटर उंचीवर पाणी उचलून पिण्याच्या पाण्याची गरज भागवावी लागली.
या ठिकाणीसुद्धा पन्हाळा या परिसरातील पारंपरिक जल व्यवस्थेचा आधार घेण्यात आला आणि त्याला नव्याशी जोडण्यात आले. नवे आणि जुने हे एकत्रितपणे नांदत आहेत. तिसरे उदाहरण म्हणजे 700 मीटर उंचीवरील पांचगणी या शहराचे. जवळच्याच कृष्णेच्या कालव्यातून पाणी उचलून या शहराला पाणीपुरवठा करण्याची योजना आखण्यात आली. पण काही मंडळींच्या हे लक्षात आले की, हे फार खर्चिक आहे, न परवडणारे आहे. याला उत्तर म्हणून त्यांनी महाबळेश्वर येथील उंचीवरील वेण्णा तलावाचे पाणी पांचगणीला उपलब्ध करून देऊन खर्चामध्ये आमूलाग्र बचत केली. ही तीन उदाहरणे अनुकरणीय आहेत. नव्या आणि जुन्याची सांगड हे भविष्यासाठी उत्तर आहे. असाच यातून आवाज निघतो. काही इतिहास तज्ज्ञांनी विदर्भातील पूर्णा खोऱ्यामधील उत्खननात सापडलेल्या पाणीपुरवठ्याच्या व्यवस्थेचीही मांडणी केली. खोल काळ्या मातीत विटामध्ये बांधलेल्या गोल आकाराच्या पाण्याचा लहान विहिरी आणि सिंचनासाठीचे बांधीव कालवे या उत्खननात दिसून आले. ही मांडणी फार अंतर्मूख करणारी होती. हजारो वर्षांपूर्वी पाणी कसे हाताळावयाचे याचे ज्ञान असलेली आपली संस्कृती होती. हेच यावरून दिसून येते.
आणखी एक महत्त्वाचा विषय पुढे आला. कोसी नदीच्या आकांडतांडवाचा. हिमालयात उगम पावणारी ही नदी नेपाळमधून भारतात पळत येते. उत्तर भारतातल्या नद्या या आखीव आणि रेखीव नाहीत. कारण सगळा भाग हा वालुकामिश्रीत सुपीक काळ्या मातीचा आहे. खोलवर पाया लागत नाही. नद्या पूरपरिस्थितीत वेड्यावाकड्या नाचतात. या बलशाली नदीला बंदिस्त करण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि तो म्हणजे दोन्ही बाजूला मातीचे भराव (लेव्ही) घालून काळाच्या ओघात हा अरुंद झालेला नदीचा मार्ग गाळाने भरून वर येऊ लागला, काही ठिकाणी वीसपंचवीस फुटाचे मंदिर, मशीद गाळामध्ये बुडून गेल्या. नदी पुन्हा काठ विरहित झाली आणि आता थोड्याशाही पुरामध्ये ती काठाला फोडते आणि स्वैरपणे सुपीक जमिनीवर, गावामध्ये हैदोस घालते. उत्तार भारतातील नद्यांना की ज्याचे पात्र अनेक किलोमीटर रुंद असतात, अशा पात्रांना संकुचित करणे हे कितपत व्यवहार्य आहे याचा विचार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. पारंपरिक अभियांत्रिकी उत्तर हे सदासर्वदा उपयोगी ठरतेच असे नाही, भूशास्त्र, भूगोल, हवामान या सर्वांचा एकत्रित विचार करुन या प्रश्नाची उत्तरे शोधावी लागतात आणि त्यात बदल करावे लागतात. तसे झाले नाही म्हणून दोन वर्षांपूर्वीचा कोसीचा आकांडतांडव दृष्टीस आला. करोडोचे नुकसान झाले. अनेक लोक बेघर झाले.
सिंहगडावर आणि अशा अनेक डोंगरी किल्ल्यावर तलावाचे पुंजके आहेत. काही तलाव खडकात कोरलेले आहेत तर काही तलाव पृष्ठभागावर पाणी साठवणारे आहेत. दरवर्षी पावसाचे पडणारे पाणी सच्छिद्र खडकातून जमिनीत मुरते आणि अपार्य खडकावर साठते. हेच पाणी आपण गडावर वापरतो. यालाच आधुनिक भाषेमध्ये वर्षा जलसंचयाची योजना म्हणतो. हे शहाणपण आपल्या पूर्वजांना सुचलेले होते. सिंहगडावर एकटा देवटाका वर्षाकाठी बारा ते चौदा लाख लोकांची पिण्याच्या पाण्याची गरज भागवतो. कोणत्याही गडावर पाणी कमी पडल्याचे आणि गड सोडून जावे लागल्याचे असे एकही उदाहरण इतिहासामध्ये नाही. उत्तर महाराष्ट्रातील भामेर या डोंगरी किल्ल्यावर 365 तलाव आहेत. एक तलाव एक महिना पाणीपुरवठा करणार असे जर मानले तर 365 महिन्याची पाण्याची तरतूद या गडावर योजनाकारांनी केली अहे असे म्हटले तर जास्त अतिशयोक्ती ठरू नये.
आपल्या गावोगवी गावतलाव होते, ही पुनर्भरणाची साधने होती. त्यामुळे सार्वजनिक विहिरींना, वाड्यातील विहिरींना भूजलाचा भक्कम आधार मिळत असे. असे सर्व तलाव आपण बुजवले आणि आज पंगु झालो. इतिहासात खूप काही शिकण्यासारखे आहे आणि अशा योजना ग्रंथरूपात मांडणी केलेल्या जरी आपल्याला दिसल्या नाही तरी जमिनीवरील त्यांचे सांगाडे पाहून आपणाला त्यातून त्याकाळचे वैचारिक वैभव निश्चितपणे लक्षात येते. तो समाज पाण्यावर प्रेम करणारा होता. वेरूळ इत्यादी ठिकाणचे जलमहाल हे राणीच्या महालापेक्षा काकणभर उजवे आहेत. राजाला याबद्दल कधी मत्सर वाटला नाही. गुजरातमधील पाटणची सात मजली बारव हे पाण्याला सौंदर्य देण्याचे जगातले अप्रतिम उदाहरण आहे. या बारवेच्या प्रत्येक दगडावर एक शिल्प आहे आणि यातून जीवनाचा एक वेगळा अर्थ ध्वनीत होत असतो.
वराहमिहीर हा भूजल शास्त्रज्ञ, त्यांनी भूजलाबद्दल (विहीर) अनेक मापदंड दिलेले आहेत. पुणे आणि बाशी येथील शास्त्रज्ञांनी या जुन्या काळच्या भूजलाच्या तत्त्वाची व्यावहारिक उपयोगिता तपासण्याचा प्रयत्न केलेला आहे. शास्त्रज्ञांच्या मांडण्यातून असे दिसून आले आहे की, वराहमिहीर यांचे तत्त्वज्ञान हे विज्ञाननिष्ठ होते आणि आहे. आज त्याची प्रचिती सोलापूर भागामध्ये अनेक ठिकाणी येत आहे. याला कुणी चमत्कार समजू नये कारण हे वैज्ञानिक तत्त्वावर आधारलेले सत्य आहे.
भारतीय जलसंस्कृती मंडळ, पुणे या शाखेने पुणे शहरामध्ये या विषयावर पाण्याचा ताण बसत असलेल्या काळात चर्चा घडवून आणून एका जुन्या पण अतिमहत्त्वाच्या विषयाला हात घातलेला आहे. कात्रजच्या नहरीतील पाणी किमान एक लाख लोकांची तहान निश्चितपणे भागवेल. या शहरात अशा पाच नहरी होत्या. ठिकठिकाणी त्याचे अस्तित्व आजसुद्धा दिसते आणि त्याचे पाणी अनेक ठिकाणी वापरले जाते. पण याकडे कोण लक्ष देणार? परिस्थिती लक्ष देण्यास शिकवेल. पुणे शहराचा प्रतिमाणसी पाणीपुरवठा हा जगामध्ये सर्वात जास्त आहे असे दिसून आले आहे. पस्तीस लक्ष लोकांना सोळा टीएमसी पाणी (1 टीएमसी ग 30 हजार दशलक्ष लीटर) हे कोष्टक आहे. या लोकसंख्येतील 40 टक्के लोक हे झोपडपट्टी निवासी आहेत. गणितीय पद्धतीने हा जर हिशेब मांडला तर काही लोकांना विश्वास बसणार नाही इतके जास्त पाणी उपलब्ध होते तर काही लोकांना दिवसाकाठी 40-50 लिटरसुद्धा मिळत नाही. शहराच्या अनेक भागात नळ कधीही बंद होत नाहीत.
पाण्याचा ऱ्हास 50 टक्केपर्यंत आहे. असे म्हणून जास्तीच्या पाण्याचे समर्थन आपणच करतो. गळकी वितरण व्यवस्था कोण दुरुस्त करणार? याच्या खोलीत जाण्यास आपणाला रस नाही. या चर्चासत्राच्या 2-3 दिवसानंतर शहरात फेरफटका मारत असताना (काळाचौक, बदामी चौक मंडई इ.) असे लक्षात आले की, आजसुद्धा या नहरीतून पाणी वाहत आहे. या व्यवस्थेला कसलेही नियंत्रण करणारी व्यवस्था नाही. पाण्याची पातळीच पाण्याचे नियंत्रण करते. हे जलगती शास्त्रातले आश्चर्य आहे असे मानावे लागेल. पण हे पूर्णपणे विज्ञानावर आधारलेले आहे. या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात नजर टाकल्यानंतर असे लक्षात येते की, आजूबाजूच्या वस्तीतील सर्व घाण या तलावाच्या पाण्यात मिसळत आहे. पाण्याबद्दलची ही पराकोटीची अनास्था आहे असेच म्हणावे लागेल. या अनास्थेचा परिणाम म्हणून आज देशातील बहुतांशी नद्या आणि नाले हे टोकांचे प्रदूषित होऊन गटारे झालेली आहेत. 25-30 वर्षांपूर्वी असे काही होईल असे वाटले नव्हते. आजसुद्धा आपले डोळे उघडत नाहीत, वारेमाप पाणी वापरायचे व घाण करायची. हे घाण पाणी स्वच्छ कोण करणार यातल्या तपशिलात जाण्यात आपल्याला वेळ नाही.
पुणे हे जाणकारांचे शहर आहे. शहराने देशाला वेगळा धडा घालून देण्याची गरज आहे. शास्त्रज्ञ आणि विषय समजून जर पाण्याचे नियोजन आणि वितरण केले तर या शहराला 7 ते 8 टीएमसीपेक्षा जास्त पाणी लागणार नाही ही वास्तविकता आहे. पण खालच्या ग्रामीण भागातील शेतीची पर्वा न करता 1985 पासून साडेअकरा टीएमसी पाणी पिण्यासाठी आरक्षित केले गेले. आपण शीर्ष भागात आहोत. आपल्याला बगलेखालून पाणी जातय, त्याचा आपण कसाही वापर करणार ही भूमिका पाण्याची संस्कृती दाखवत नाही. गरजेइतकेच पाणी वापरू, जास्त पाण्याचा वापर म्हणजे जास्त प्रदूषण हे वैज्ञानिक सत्य आहे. आज पाऊस पडून पाण्याची परिस्थिती थोडी सुधारली आहे. मधल्या काळात 50 टक्क्यांपर्यंत पाणी वापरायचे असे आपण ठरवत आहोत. हे संयुक्तिक आहे का? उलट या परिस्थितीने आपले डोळे उघडले आहेत. आपण पाणी कमी वापरू व शेतीचे पाणी शेतीला देऊ, नद्या पण कमी प्रदूषित होतील. अन्यथा ग्रामीण विरुद्ध शहरी असे पाण्यातील तंटे विकोपाला जातील. इतिहासातून शहाणपण शिकावे हा एक संदेश या चर्चासत्रातून पुढे आला एवढेच म्हणावेसे वाटते. चर्चेच्या निष्कर्षातून आपल्याला खूप काही शिकायचे अहे आणि पुढे जावयाचे आहे.
निष्कर्ष :
1) या देशातील पाण्याचा वारसा जतन करण्यासाठी पारंपरिक जलव्यवस्थापनाच्या साधनाची जपणूक करावी व लोकशिक्षणाद्वारे त्या साधनांची व्यावहारिक उपयोगिता लोकांना पटवून द्यावी.
2) परिसरातील साधनाची (आड, बारव, नहर, गावतलाव, गडतलाव, वर्षा व छतावरील जलसंचय करणारी जुनी साधने, रहाटगाडगे इ.) सुची करून त्याचे वर्गीकरण करावे व या साधनाच्या पुनरुज्जीवनाची शक्यता व त्यानुसार दुरुस्ती करून उपयोगात आणावेत.
3) प्रचलित कायद्याची, नियमाची, धोरणाची ओळख करून घेऊन 73 व 74 व्या घटना दुरुस्तीला अनुसरुन पंचायतींना (ग्राम, तालुका, जिल्हा) यामध्ये सहभागी करून घ्यावे व या संस्थांचेपण प्रबोधन करावे. या स्थानिक संस्थांनाही या कार्यात सहभागी करून घ्यावे.
4) जलव्यवस्थापनाची ही जुनी ऐतिहासिक साधने आत्ताच्या परिभाषेत पाणलोट क्षेत्र विकासाचीच साधने आहेत. म्हणून पाणलोट क्षेत्राचा विकास करताना या जुन्या साधनांचाही त्यात अंतर्भाव करावा, त्यांचे पुनरुज्जीवन करावे व त्याचा वापर करावा,
5) केंद्र सरकार, राज्य सरकारच्या वेळोवेळीच्या धोरणांचा- रोहयो, अवर्षण-प्रवण क्षेत्र योजना इत्यादींचा या व्यवस्थेला सुस्थितीत आणून लाभ करून घेण्याबद्दल स्थानिक स्वराज्य संस्थांना शहाणे करावे.
6) इतिहासकालीन वराहमिहीरच्या जलनीतीला वैज्ञानिक आधार आहे. स्थल, हवामान, परिस्थितीच्या बदलानुसार भूजलाचा अंदाज बांधण्यासाठी ठरवून दिलेल्या मापामध्ये योग्य तो बदल करून वापर करावा.
7) काळाच्या ओघात पाण्याच्या गरजा वाढल्यामळे जुनी साधने अपुरी पडतात. अशा ठिकाणी नव्या योजनेच्या आराखड्यात जुन्या साधनांचाही अंतर्भाव करून जुने व नवे एकत्रितपणे वापरावे.
8) जुन्या साधनांची हेळसांड करू नका. खर्च कमी करण्यासाठी आवश्यक त्या बदलासह त्याचादेखील वापर करा. पारंपरिक साधनांना विसरू नका.
9) भूजल व पृष्ठभागावरील पाण्याचे प्रदूषण थांबविण्यासाठी वापरलेल्या पाण्याची प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करा, हा विषय फार संवेदनशील झालेला आहे. म्हणून त्याला नजरेआड करू नका. नद्यांचे गटारीकरण थांबवा.
डॉ. दि.मा.मोरे, पुणे