Source
जल संवाद
देशातील सर्व नद्या या विषनद्या झालेल्या आहेत असे आपण सार्वत्रिकपणे वाचतो. पुण्यामधील मुळा - मुठा नदीचे पात्र या दिशेने प्रवास करण्यामध्ये पहिल्या क्रमांकावर आसावे. पुण्याची वाढ होत आहे. चारही दिशेने पुणे विस्तारले जात आहेत. पुणे शहराला एक ऐतिहासिक बैठक आहे. या शहराला एक वेगळेच आकर्षण आहे. पुण्यामध्ये रहिवास करणार्यांना या नद्या विषवाहिनी होण्यासंबंधी काहीही देणे - घेणे नसावे अशीच चर्चा सार्वत्रिकपणे ऐकावयास मिळते.
दोन - तीन दिवसांपूर्वी औरंगाबादहून पुण्याकडे प्रवास करीत होतो. दुपारची वेळ होती. नेवासा गावाच्यापुढे आलो. तेराव्या शतकात संत ज्ञानेश्वरांनी नेवासे येथे ज्ञानेश्वरीचे लेखन केले. ते बोलले, कुणीतरी शब्दांकन केले, संस्कृत भाषेतलं वेदाचं ज्ञान सर्वसामान्य लोकांना समजेल अशा प्राकृत भाषेत केले. ते ठिकाण ओलांडताना या दिव्य पुरूषाच्या कृतीपुढे मान लवते. या देशातील अनेक थोर पुरूषांनी जीवनाचे तत्वज्ञान अभंगांच्या, श्लोकांच्या पद्यांच्या माध्यमातून लोकांपुढे मांडले. सकळजनांना शहाणे करण्यासाठी त्यांनी अनेक मार्ग धुंडाळले. संत तुकाराम, नामदेव, चोखामेळा, सावतामाळी, कबीर, पुरंदरदास, ननाबाई, कान्होपात्रा किती नांव घ्यावीत? सर्वांनी त्यांच्या वाणीतून, निसर्गाचे विज्ञान उलगडून दाखविले, माणूसकीची व्याख्या केली, निसर्गात जे सत्य आहे त्याच्यावरील विश्वास म्हणजेच श्रध्दा अशी श्रध्देची सोपी व्याख्या केली. अखिल प्राणीमात्राशी संवेदनशीलपणे वागा हा संदेश दिला. असत्याची पूजा म्हणजेच कर्मकांड, अंधश्रध्दा असे वीर सावरकर म्हणत असत.नेवाशाच्या पुढे रस्ता दूतर्फा येणार्या - जाणार्या गाड्यांनी भरून वाहात होता. वेगवेगळ्या आकारांच्या, रंगांच्या, क्षमतेच्या गाड्यांनी परिसर भरलेला होता. या गाड्यांत बसलेली मंडळीपण बहुतांशी तरूण, स्वच्छ कपड्यातली, शिकलेली होती. महिला अभावानेत दिसत होत्या. ठिकठिकाणी टॅ्रफीक गर्दीत अडकून पडत होता. हळूहळू सुप्यापर्यंत येण झालं. सुप्याला फूलांचे मार्केट आहे. शेतकर्यांनी शेवंतीची, झेंडूची, त्यांच्याकडे असलेले तुटपुंजे पाणी वापरून फूले पिकविली होती. फुलांच्या माळा खरेदी करण्यासाठी झुंबड उडालेली होती. कशामुळे ही वाहनांची गर्दी व फूलांच्या माळांची विक्री हे मला कोडे पडले होते आणि मग चौकशीअंती असे समजले की तो शनिवारचा, पुन्हा अमावस्या आणि ती पण श्रावण मासातला. शेवटचा शनिवार. हा योग कधीतरी जुळून येतो. शनीदेवाला पाऊन घेण्यासाठी. शनिशिंगणापूरकडे गाड्यांची, माणसांची रीघ लागली होती. त्या दिवशी केलेली शनीदेवाची पूजा ही माणसाला लाभते आणि इप्सीत ते साधते असा लोकांचा भाव आणि त्यापोटी हा सगळा खटाटोप. हजारोंमध्ये गाड्या, लाखोंमध्ये माणसे, रात्री १२ वाजल्यापासून ते पुन्हा रात्री १२ वाजेपर्यंत गोडतेल अर्पण करून शनीची पूजा करणे, दर्शन घेणे ही परंपरा शेकडो वर्षांपासून जोपासली गेलेली आहे. दररोज पूजेचा, दर्शनाचा परिपाठ हा चाललेलाच असतो. पण वर्षातल्या अशा विशिष्ठ दिवशी हजारो आणि लाखोंमध्ये लोक दर्शनासाठी या ग्रामीण भागातल्या सुपीक व पिकाऊ जमिनीत स्थानापन्न झालेल्या देवाकडे येतात. कुणी १०० मि.ली. तेल अर्पण करतं (सांडत), कुणी एखादा उदार भाविक एक लिटरपेक्षाही जास्त तेल अर्पण करत असावा. माझ्या मनांत सहज विचार आला, आज किती हजार लिटर तेल शनीदेवाला अर्पण केले जाणार म्हणजेच सांडले जाणार याचा काही हिशोब लागेल का? गोडतेल हे माणसं, प्राणीमात्राचं खाद्य. निसर्गातील वनस्पतीने दिलेली ही देण. तेलबिया पिकविण्यात आपले देश अद्यापही स्वयंपूर्ण नाही. अशा स्थितीत या पध्दतीने आपण तेल मातीत आणि पाण्यात मिसळू द्यायच का? या भागातले भूजल प्रदूषित होणार, पाणी प्रदूषित होणार, तेलाचा ओढाच वाहणार ना! यालाच आपण देवपूजा म्हणतो. भक्ती म्हणतो, श्रध्दा म्हणतो, याला आपण काही पर्याय देऊ शकलो नाही ही पण एक शोकांतिकाच आहे. पुण्यातील एक जाणते विधिज्ञ पुणे विद्यापीठात व्याख्यान देत होते आणि मला ते ऐकण्याचा योग आला. ते सहजपणे बोलून गेले. ते म्हणाले आजकाल मंदिर, प्रार्थनास्थळं मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण केली जात आहेत. ज्यांना स्वत:च्या कृतीची भीती आहे तीच माणसे अशा प्रकारच्या कामात जास्त गुंतलेली आहेत. तेे खरं बोलून गेले असं वाटून गेलं.
या वर्षी पावसाळा कमी आहे. जुन - जुलै महिना कोरडा गेला. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात थोडा पाऊस झाला. पुन्हा हुलकावणी दिली. महाराष्ट्रावर खरीप हंगामात फार मोठा कठीण प्रसंग गुदरला आहे. राज्याच्या अनेक भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. जनावराच्या चार्याची तर फार परिस्थिती वाईट आहे. पशुधन कसायाच्या दावणीला बांधले जात आहे. ही करूण अवस्था आाहे. पाण्याची तूट म्हणजे मरण असा अर्थ निघतो. सुपेच्या ठिकाणी हजारो रूपयांची फूलं विकली जात होती. दुकाने फूलांच्या माळांनी सजलेली होती. देवीला फूल अर्पण करण्यासाठी आणि गाड्या सजविण्यासाठी फूलांच्या माळांची विक्री मोठ्या प्रमाणात होत होती. माझा चालक हळूच म्हणू लागला. साहेब निदान या वर्षी तरी शेतकर्यांनी फूले पिकविण्याऐवजी उपलब्ध असलेल्या पाण्यातून जर वैरण निर्माण केले असते तर किती मोठे पुण्याचे काम झाले असते ना ? संत एकनाथ महाराजांनी कावडीतील पाणी तहानेने व्याकुळ झालेल्या गाढवाला पाजले याची आपण आदराने आळवणी करतो, गुणगाण गातो. याच अर्थाने फूलांऐवजी वैरण म्हणजेच शेतकर्यांना प्रत्यक्ष कृतीने समजविण्याची भूमिका पार पाडता आली असती ना? त्यांच्या परीने ही प्राणीमात्राची सेवा ठरली असती. खर्या अर्थाने धार्मिक कार्य त्यांच्या हातून घडले असते. सहजपणे किती चांगलं तो बोलून गेला! आणि मला अंतर्मूख व्हावं लागलं. परवाच एका दैनिकात धर्माची व्याख्या डोळ्याखालून गेली. धर्म म्हणजे रीलीजन नाही. धर्म म्हणजे दैव, पाप - पुण्य, स्वर्ग - नरक, मुक्ती, कर्मकांड पण नाही. पूजाअर्चा, नैवेद्य नाही. धर्म म्हणजे समाज धर्म. समाजातील व्यवस्था कशी असावी ? त्याचे काय नियम असावेत ? असे सांगणारे जे शास्त्र आहे त्याला धर्म शास्त्र म्हणावे आणि या शास्त्राप्रमाणे घडणारा व्यवहार हा धर्म या व्याख्येत सामावला जावा. दैव, पाप - पुण्य, पूजाअर्चा, स्वर्ग - नरक, मुक्ती, कर्मकांड इत्यादी गोष्टी वैयक्तिक असतात. समाजाचा याच्याशी काहीही संबंध नसावा. किती सुंदर आणि सोपी व्याख्या केलेली आहे. या अर्थाने फूलाऐवजी वैरण पिकविणे निश्चितपणे धार्मिक काम राहणार आहे. पण कोण लक्षात घेतो ? तुटपुंज्या पाण्यातून फूलं पिकवायची, माळा करायच्या, धर्माच्या नावाखाली व्यवहारीक अर्थाने शोभेसाठी, सत्कारासाठी त्याचा व्यापार करायचा आणि एका क्षणातच त्या फूलांच निर्माल्यात रूपांतर करायचं. काय उपयोग झाला त्या फूलांचा ? कोणतेही जनावर फूल खात नाही. हृा सुजाण आणि अतिशय सोपा अर्थ जेव्हा कळेल तेव्हा समाज समृध्दीच्या दिशेने वाटचाल करेल. असेच म्हणावे लागेल.
हे दोन प्रसंग मनामध्ये घोळत माझा प्रवास पुण्याच्या दिशेने चालू होता. अनेक ठिकाणी गाड्या अडकून पडल्या होत्या. रस्त्यांचे चौपदरी करणाचे अर्थवट काम अडचणीमध्ये भर घालीत होते. सर्व दिवस निसर्गाने निर्माण केलेले आहेत आणि मग श्रावणी अमावस्या, शेवटचा शनीवार म्हणून तो फार शनीच्या पूजेसाठी वंदनीय दिवस हे कोणत्या धर्मशास्त्राच्या व्याख्योत बसणार आहे ? याचा सुजाण नागरीकाने विचार करण्याची गरज आहे. ज्याच्या त्याच्या श्रध्देचा हा भाग आहे असे समर्थन करून समाजामध्ये अशा विषयावर चर्चा घडू दिली जात नाही. वर उल्लेख केलेला धर्माचा विचार आणि प्रत्यक्षातला रस्त्यावरील या अनुभवाशी काय जुळवणी होणार ? हे प्रश्नचिन्ह राहणार आहे. शेवटी पुणे आले. कर्वे रोडला एका ठिकाणी मत्स्यविक्री चालू होती. मासे विकत घेण्यासाठी महिलांची रांग होती. शिकलेल्या, उच्च विद्याविभूषित आणि समाजिकदृष्ट्या तथाकथीत उच्च वर्गातल्या या समूहाचा हा अपेक्षाभंग नाही का ? यात काय! हा ज्याचा त्याचा चवीचा प्रश्न आहे असे समर्थन केले जाते.
देशातील सर्व नद्या या विषनद्या झालेल्या आहेत असे आपण सार्वत्रिकपणे वाचतो. पुण्यामधील मुळा - मुठा नदीचे पात्र या दिशेने प्रवास करण्यामध्ये पहिल्या क्रमांकावर आसावे. पुण्याची वाढ होत आहे. चारही दिशेने पुणे विस्तारले जात आहेत. पुणे शहराला एक ऐतिहासिक बैठक आहे. या शहराला एक वेगळेच आकर्षण आहे. पुण्यामध्ये रहिवास करणार्यांना या नद्या विषवाहिनी होण्यासंबंधी काहीही देणे - घेणे नसावे अशीच चर्चा सार्वत्रिकपणे ऐकावयास मिळते. दुसर्याच दिवशी पुण्यामध्ये एका नामवंत शिक्षण संस्थेच्या प्रांगणात एका आंतरराष्ट्रीय कार्यक्रमाचे आयोजन केले होते. तीन वाक्ये कानावर गुंजत राहीली. Pune is an IT hub, Pune is a cultural hub and above all, Pune is a city of knowledge. एका चाहत्याने या वाक्याला टाळी दिली. उपस्थित वेगवेगळ्या देशांतील ५०० लोकांनी टाळ्या वाजविल्या नाहीत. ज्यांनी टाळी वाजविली त्याने आतुरतेने इतरांकडे पाहिले. उपस्थितांपैकी एकाने म्हटलं कदाचित हे त्यांना मान्य नसावं. चांगुलपणा हा वरून खाली झीरपत असतो. या अर्थाने पुणे शहराने इतर शहरांना मार्गदर्शन होईल, धडा मिळेल या दृष्टीने व्यवहार करायला हवा. शहरातल्या हद्दीतील मलयुक्त पाणी आणि कारखान्यातून येणारे रसायनयुक्त पाणी हे प्रक्रियेवीना नदीत सोडणे हे अधार्मिक कर्तव्य आहे असे समजून वागणे गरजेचे आहे. गंगास्नान म्हणजे गंगेच्या पाण्याने स्नान, गंगा नदीत स्नान नाही हा अर्थ जाणण्याची गरज आहे. गंगा स्वच्छ पाण्याची आणि म्हणून ते पावित्र्याचे प्रतिक आहे. त्यामध्ये धर्माच्या नावाखाली, देवपूजेच्या नावाखाली स्नान करून मल विसर्जित करून, मूर्ती निर्माल्य विसर्जित करून गंगेच्या पाण्याला प्रदूषित करणे ही खचितच देवपूजा नाही. अहिल्यादेवी होळकरांनी नदीला घाट बांधले आणि त्याचाच कित्ता पुढे गाडगे महाराजांनी गिरविला. या घाटामागे त्यांचा विचार प्रामुख्याने नदीतून पाणी वाहून आणण्यास सुकर व्हावे हा होता. घाटाच्या मदतीने लाखो लोक नदी पात्रात जाऊन स्नान करावे आण नदीचे पाणी ओंगळ करावे हा नव्हता. हा अर्थ जास्त उशीर न होता या शिकलेल्या समाजाला समजणे गरजेचे आहे कारण यांच्याकडे पाहून न शिकलेला समाज अनुकरण करत असतो.
आता गणपती उत्सवात नदीतील, तलावातील पाणी जे काही ओंजळभर आहे त्याची अवस्था केविलवाणी झालेली असते. अनेक नदी- नाल्यांमध्ये पाणीच नाही. निसर्गाने त्यांची अडचण आपोआपच सोडवलेली आहे. तरीपण आपला विसर्जनाचा उत्साह कमी होत नाही. एक गाव, एक गणपती, मातीचा गणपती, न रंगवलेला गणपती, लहान गणपती, कमी उंचीचा गणपती, या दिशेने चर्चा खूप घडत आहे. पण देवधर्म याचा आधार घेऊन याला विरोध करणार्यांची संख्या कमी होत नाही हा यातील दुखा:चा भाग आहे.
इतिहासकाळात पाण्याच्या जवळ मंदिराच्या रूपाने देव गेला, लोकांना सहजगत्या वाटून गेले की हे पाणी तीर्थ आहे आणि म्हणून ते घाण करायचे नाही. त्याचे पावित्र्य राखायचे. आज आपला प्रवास बरोबर उलट दिशेने आहे. देवाच्याच नावाने आपण पाण्याचे पावित्र्य नष्ट करत आहोत. असे होणे थांबवावे यासाठी हा शब्दप्रपंच!