जल-साहित्य संमेलन - संकल्पना व उद्दिष्ट्ये

Submitted by Hindi on Tue, 03/06/2018 - 18:18
Source
जलसंवाद, स्मरणिका, जानेवारी 2018

जलसाहित्य संमेलनांच्या चर्चा चर्वणातून त्या ठिकाणच्या लोकांना स्फुर्ती मिळावी, त्यातून जल विकासाचे कामी लोकांचे विविध पाणी विकास मंच स्वयंस्फुर्तीने निर्माण व्हावेत, विकसित झालेला सांस्कृतिक वारसा यांचे अध्ययन व जतन करणे, विविध पाणी प्रश्नांचा अभ्यास करून त्याबद्दल उपाय योजना सुचविले जावेत, कार्यकर्त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून मिळावे, सामान्य जनतेला जलसाक्षर करून पाणी प्रश्ना संदर्भात समाजाचा बघण्याचा दृष्टीकोन बदलणे अशा विविध सामाजिक प्रगतीला चालना देणे हा जलसाहित्य संमेलनांच्या आयोजना मागचा मुख्य हेतु आहे.

वेदकाळापासून भारतीय संस्कृतीचा जलविकासाशी अतूट असा संबंध राहिला आहे. सौर-सूक्त, वरुण-सूक्त, पर्जन्य-सूक्त आजही वरील विधानाची साक्ष देतात. भारतीय संत परंपरेने तर जीवनमय असलेल्या पाणी-पीक-जमिनीविषयी अभंग, दोहे, आर्या, गौळणी, भारुडे यातून लोक जागरणाचे काम सातत्याने केले आहे. संत नामदेव, ज्ञानेश्वर, एकनाथ, समर्थ, तुकाराम, कबीर, रोहिदास, गोरा कुंभार, सावतामाळी, जनाबाई अगदी संत बहिणाबाई तुकडोजी पर्यंत ही परंपरा चालत आली आहे.

अशा सामाजिक सांस्कृतिक पार्श्वभूमीवर अकरावे अखिल भारतीय जल-साहित्य संमेलन धुळे येथे २०-२१ जानेवारी २०१८ दरम्यान साजरे होत आहे, ही सर्वांसाठी एक आनंददायी आणि तेवढीच उत्कंठतेची बाब आहे. या निमित्ताने मानवी जीवनाशी निगडीत सर्वांच्या जिव्हाळ्याच्या पाणी या विषयावर चर्चा करण्यासाठी नामवंत तज्ज्ञ मंडळी, साहित्यिक, जल-कार्यकर्ते एकत्र येत आहेत. अनेकांचे डोळे त्यामुळेच या संमेलनाकडे मोठ्या अपेक्षेने लागलेले आहेत.

साहित्य संमेलने अनेक ठिकाणी आयोजित होत असलेली आपण पाहत आलो आहोत आणि त्यामागील उद्देशांबाबत आपल्या समाजास सुव्यवस्थित अशी समज आहे. तथापि, जलसाहित्य संमेलने म्हणजे नेमके काय आणि त्यांच्या आयोजनामागे काय उद्देश असतो या बाबत सर्वांना माहिती असेलच असे नाही. जलसाहित्य संमेलन ही भारतीय जल संस्कृती मंडळाने रूढ केलेली एक महत्वपूर्ण संकल्पना आहे. त्या अनुषंगाने जलसाहित्य संमेलनाची संकल्पना समजून घेणे आणि ती सुयोग्यरित्या समजावी यासाठी तत्पूर्वी भारतीय जलसंस्कृती मंडळाचे कार्य जाणून घेणे आवश्यक ठरते. याबाबत थोडक्यात विवेचन करीत आहे.

भारतीय जलसंस्कृती मंडळ - थोडक्यात परिचय :


भारतीय जलसंस्कृती मंडळाचे जल व संस्कृती या क्षेत्रातील कार्य तसे बहूतेकांस सुपरिचित आहे. पाण्यासंदर्भात राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक समस्या निर्माण झालेल्या आपण पाहत असतो. याचे मुख्य कारण म्हणजे पाणी व्यवस्थापनातील - पाणी वापरातील सुसूत्रतेचा अभाव हे होय. आपल्या देशाला पाणी व्यवस्थापनातील वैभवशाली परंपरा लाभली असतांनाही आज याबाबत मोठी दुरावस्था दिसून येते. आधुनिक तेच उत्तम व जुने ते टाकाऊ या हल्लीच्या मनोवृत्तीमुळे या परंपरेंकडे दुर्लक्ष केले गेले अशी खंत आज आपणास आहे. या चुकीच्या मनोवृत्तीतूनच आपली अमूल्य जलसंस्कृती दुर्लक्षित झाली आहे. त्यामुळे या वैभवशाली जलसंस्कृतीकडे चिकित्सक दृष्टीने पाहून तिचे महत्व जाणण्याची आज अत्यंत गरज आहे.

हे सर्व लक्षात घेता जलविषयक विकासाच्या माहितीचे व्यापक प्रमाणात पध्दतशीरपणे संकलन व्हावे, त्यातील अधिकाधिक तपशील व निष्कर्ष भारतीय समाजासमोर व्यवस्थितपणे मांडले जावेत, पाण्याची उपलब्धता व योग्य वापर याबद्दलच्या लोक-जाणिवा जागृत कराव्यात या उद्देशाने भारतीय जल संस्कृती मंडळाची स्थापना वर्ष २००२ मध्ये करण्यात आली. डॉ.माधवराव चितळे, न्या. नरेंद्र चपळगावकर, डॉ. रा.श्री. मोरवंचीकर, डॉ. दि.मा. मोरे यांजसारखे दिग्गज मंडळास मार्गदर्शक म्हणून लाभले आहेत. डॉ. दत्ता देशकर हे संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आहेत.

मंडळाचे कामकाज मुख्यत्वे पाच मुख्य धारांना डोळ्यासमोर ठेऊन पार पाडले जाते.

१. जल प्रबोधन धारा : पाण्यासंदर्भात लोक प्रबोधनाचे अभियान राबविणे, पाण्याचे महत्व व मूल्य समजावून सांगून लोक सहभागातून पाणी प्रश्नाची सोडवणूक करण्याचे प्रयत्न करणे.

२. जल परंपरा (स्थापत्य) धारा : ऐतिहासिक जल व्यवस्थापनाची स्थळे अधिकाधिक संशोधन करुन लोक निदर्शनास आणणे आणि नुतनीकरणास उपलब्ध करुन देणे.

३. लोक व्यवहार धारा : पाण्याचे विविध उपयोग व वापरांसंदर्भात नियम व नियमावलींचा अभ्यास करणे, त्यात संशोधन करून आवश्यक दुरूस्त्या सुचविणे, यास्तव कार्यशाळांचे आयोजन करणे, लोक प्रबोधनपर अभियान राबविणे

४. पर्यावरण धारा : जल प्रदूषण नियंत्रण व पर्यावरण रक्षण करण्याच्या दृष्टीने सरकार व त्या क्षेत्रात कार्य करणार्‍या समाजसेवी संस्थांना सहकार्य करणे.

५. जल साहित्य धारा : भारताच्या जलविकास इतिहासाची संदर्भसूची बनविणे, या विषयाशी संबंधीत ग्रंथ व लेख यांचे संकलन करणे, भारतीय जल संस्कृतीचा उज्ज्वल वारसा विषद करणार्‍या उत्तमोत्तम व अभ्यासपूर्ण ग्रंथांचे विविध भाषा भाषिकांसाठी अनुवाद करणे, जल-सहित्य संमेलने आयोजित करणे.

या मुख्य धारा समोर ठेवून मंडळाने आपली उद्दिष्ट्ये खालील प्रमाणे निश्चित केली आहेत.

१) भारताच्या इतिहासातील पाण्याचे महत्व, पाण्याच्या व्यवस्थापनाचे प्राचीन काळापासूनचे भारतातील प्रयत्न, त्यातून विकसित झालेला सांस्कृतिक वारसा आणि त्याचे अध्ययन व जतन करणे.

२) विविध पाणी प्रश्नांचा अभ्यास करून त्याबद्दल उपाय योजना सुचविणे व कार्यकर्त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे.

३) सामान्य जनतेला जलसाक्षर करून त्यांच्या पाणी प्रश्नाकडे बघण्याच्या दृष्टीकोनात बदल घडवून आणणे.

४) पाणी प्रश्ना संदर्भात जनमत निर्माण करण्यासाठी सभा, संमेलने, कार्यशाळा आणि परिषदा इत्यादींचे आयोजन करणे.

५) सामान्य स्तरापर्यंत पाणी प्रश्नाचे स्वरूप व व्याप्ती स्पष्ट करण्यासाठी प्रचार साहित्य व चित्रफिती यांची निर्मिती करणे आणि अशा उपक्रमांना प्रोत्साहन देणे.

६) अस्तित्वात असलेल्या समाजसेवी संस्थांचे सहकार्य घेऊन पाणी प्रश्नाची उकल करण्या करीता जाळे विणणे.

७) पाणी व्यवस्थापनाचे महत्व समाजमनावर बिंबविण्याकरिता ललित व वैज्ञानिक साहित्यास व इतर माध्यमांना प्रोत्साहन देणे.

८) जगात पाणी प्रश्न सोडविण्यासाठी योजिलेल्या मार्गाचा अभ्यास करून स्वदेशात ते कितपत वापरले जाऊ शकतील याचा मागोवा घेणे.

९) पाण्याच्या क्षेत्रातील कायदे व अधिनियम यांच्या वर्तमान परिस्थितीचा अभ्यास करून राज्यकर्त्यांना सुधारणा सुचविणे.

१०) जल प्रदूषण नियंत्रण व पर्यावरण रक्षण करण्याच्या दृष्टीने सरकार व त्या क्षेत्रात कार्य करणार्‍या समाजसेवी संस्थांना सहकार्य करणे.

हे काम इतिहासतज्ञ, पुरातत्ववेत्ते, समाजशास्त्राचे अभ्यासक, मानसशास्त्रज्ञ, डॉक्टर्स, अभियंते, भूजल-शास्त्रज्ञ, संस्कृत-पाली अर्धमागधी तसेच विविध प्राचीन आणि देशी भाषांचे जाणकार, तळमळीचे कार्यकर्ते, दानशूर नागरिक अशा प्रकारच्या विविध क्षेत्रातील जाणकार संस्था व हौशी व्यक्तींच्या सहभागाने पार पाडले जात आहे.

जलसाहित्य संमेलन - संकल्पना :


वर नमुद केल्याप्रमाणे जलसाहित्य संमेलन ही भारतीय जल संस्कृती मंडळाने रूढ केलेली एक महत्वपूर्ण संकल्पना आहे आणि मंडळाच्या साहित्य धारेतील कामाचा तो एक महत्वाचा भाग आहे. जलसाहित्य संमेलनांचे आयोजन करून लोकप्रबोधनपर कार्य करणे हा त्या मागचा मुख्य हेतू आहे. पाणी विषयक समस्यांचे निवारण करण्यामागे विविध संस्था तसेच वैयक्तीक पातळीवरही मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू असलेले आपण पाहतो. अशा संस्था व व्यक्तींच्या सहकार्याने जलसाहित्य संमेलने आयोजित करण्यात येतात. मंडळाच्या संकल्पनेनुसार व आधीच्या अनुभवाचा योग्य तो बोध घेऊन असे संमेलन प्रतिवर्षी सुयोग्य पध्दतीने पार पडावे, त्यासाठी एक सर्वसाधारण कार्यपध्दती - नियमावली खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आली आहे.

♦ या संमेलनांसाठी भारतीय जल संस्कृती मंडळ हे प्रवर्तक म्हणून काम करेल व संमेलन या मंडळाच्या वतीने भरेल.

♦ मंडळाच्या संकल्पनेनुसार ते नियमित रुपात दरवर्षी संपन्न व्हावे व त्याचे आयोजन शक्यतो जलपूजनाचे दृष्टीकोनातून अत्यंत पवित्र अशा कार्तिकी पौर्णिमेच्या (त्रिपुरारी पौर्णिमा) आधीच्या शनिवार / रविवार या कालावधीत व्हावे.

♦ संमेलन घ्यावयाचे त्या गावी भारतीय जल-संस्कृती मंडळाची शाखा असावी व तशी ती नसल्यास मंडळाची शाखा प्रथम प्रस्तावकर्त्यांनी आधी त्या ठिकाणी स्थापन करावी व त्या शाखेमार्फत निमंत्रण प्राप्त झाल्यास त्या ठिकाणी त्या वर्षी जल साहित्य संमेलन घेतले जावे.

♦ भारतीय जलसंस्कृती मंडळ आपले कामकाज मुख्यत्वे वर नमुद केलेल्या १) जल प्रबोधन धारा, २) जल परंपरा (स्थापत्य) धारा ३) लोक व्यवहार धारा ४) पर्यावरण धारा व ५) जल साहित्य धारा - या पाच मुख्य धारांच्या अनुषंगाने चालवत असल्याने या पाच धारांचे यथार्थ चित्र जलसाहित्य संमेलनातून उमटावे.

जल-साहित्याची सर्वसाधारण व्याख्या :


साहित्य म्हणजे काय याची एक फार सुंदर व्याख्या केली जाते ती अशी की साहित्य म्हणजे लोकांशी सुसंवाद साधण्यासाठी वापरण्यात येणारे सुसंगत असे साधन अथवा माध्यम. मग ते साधन अथवा माध्यम बहुविध असेल. एरवी साहित्य म्हणजे कथा, कादंबरी, नाटक, कविता आदीं प्रकारच सामान्यपणे गृहीत धरण्याची चूक आपण करीत असतो. चार दोन कविता लिहिणाराही मग साहित्यिक म्हणवला जातो. पण तेच एखाद्या विषयावर मोठ्या प्रमाणावर चित्रांचे रेखाटन करून आपल्या चित्र-प्रदर्शनीद्वारे लोक प्रबोधनाचे कार्य साधणार्‍या चित्रकाराची आपण साहित्यिक या परिभाषेत गणना करतो काय ? लेखक आपल्या लेखणीच्या माध्यमातून लोकमानसावर जो परिणाम साध्य करत असतो तसाच परिणाम चित्रकाराच्या कुंचल्यातूनही साध्य होत असतो. मग असे असेल तर या दोहोंची गणना एकाच प्रकारात व्हावयाला हवी. या व्याख्येने साहित्याबाबत सर्वसामान्यांना जोखडून ठेवलेल्या कल्पनांच्या कक्षा अधिक विस्तारित केल्या आहेत. त्यात जीवनातील व्यापकतेला अधिक परिपूर्णरित्या सामावून घेतलेले दिसत असून साहित्याचे भांडार अधिक विस्तृत केले आहे.

हा विचार आता सुस्पष्टपणे समजून घेण्याची खरी गरज आहे. जेणेकरून जलसाहित्य संमेलनांमध्ये या विस्तारीत बाबींचे यथायोग्य समावेशन हे संमेलनांच्या अंतिम उद्दीष्टपूर्तीच्या दृष्टीकोनातून अधिक उपयुक्त ठरेल. या अनुषंगाने व्याख्यान / प्रवचन / किर्तन / भारूड / पोवाडा तद्वतच चित्रफीत अथवा विशिष्ट विषयावरील चिंत्रांचे रेखाटन व त्याही पुढे जात पथनाट्य व जल दिंडी हे लोकप्रबोधनाचे प्रकार देखील त्या विषयावरील प्रभावी साहित्यच ठरतात. त्यादृष्टीने जल-साहित्याची व्याप्ती खालील प्रकारात होउ शकते.

ग्रांथिक : ललित (काव्य - कादंबरी), वैचारिक, वैज्ञानिक
मौखिक : अनुभव कथन, नाट्य, पथनाट्य, जलदिंडी
चित्र : छायाचित्र, चलचित्र

पूर्वी पार पडलेल्या संमेलनांविषयी थोडक्यात :


यापूर्वी दहा जलसाहित्य संमेलने भारतीय जलसंस्कृती मंडळाच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेली आहेत. त्याबद्दल थोडक्यात माहिती खाली देत आहे.

प्रथम संमेलन हे नागपूर येथे २००३ मध्ये महिला पाणी मंच नागपुरच्या सहकार्याने पार पडले. यास श्री ना.धो. महानोर हे अध्यक्ष म्हणून लाभले होते. तर डॉ. माधवराव चितळे हे विशेष अतिथी होते. या पहिल्याच संमेलनाची छाप आंतरराष्ट्रीय स्तरावर पडली. महिला पाणी मंच नागपूरच्या श्रीमती अरूणा सबाने यांनी या संमेलनासाठी विशेष पुढाकार घेतला होता. या संमेलनाचे यश बघून जपान येथे भरलेल्या एका आंतरराष्ट्रीय पाणी परिषदेत या संमेलनाची माहिती सादर करण्यासाठी त्यांना विशेषाने पाचारण करण्यात आले होते.

दुसरे संमेलन पुणे येथे २००५ मध्ये इंस्टीट्युट ऑफ इंजीनिअर्स व अभियंता मित्र मासिक यांच्या सहकार्याने पार पडले. या संमेलनास श्री मधुमंगेश कर्णीक हे अध्यक्ष म्हणून तर श्री अनुपम मिश्र हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते. अभियंता मित्रचे संपादक श्री कमलाकांत वडेलकर यांचा या संमेलनासाठी विशेष पुढाकार होता. संमेलनास डॉ.माधवराव चितळे, न्या. नरेंद्र चपळगावकर, डॉ. दि मा मोरे, श्री वि.म.रानडे, आदींचा परिसंवादात कृतीशिल सहभाग लाभला. विविध विषयावरील परिसंवाद, भारूड, जलकिर्तन, पथनाट्य, चित्रकला, जलकविता यांच्या माध्यमातून संमेलनात प्रबोधन करण्यात आले.

तिसरे संमेलन रत्नागिरी जिल्ह्यात मालगुंड या केशवसुतांचे जन्मग्रामी संपन्न झाले. या संमेलनास कवीवर्य श्री मंगेश पाडगावकर हे अध्यक्ष म्हणून लाभले होते तर दापोली कृषी विद्यापिठाचे कुलगुरू श्री मगर, डॉ. माधवराव चितळे, साहित्यिक श्री मधुमंगेश कर्णीक, सकाळचे संपादक श्री उत्तम कांबळे, न्या. नरेंद्र चपळगावकर, डॉ. रा.श्री. मोरवंचिकर, हे प्रमुख वक्ते म्हणून लाभले. मालगुंडचे श्री किमयेकर यांनी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.

चौथे जलसाहित्य संमेलन नाशिक येथे १६ व १७ फेब्रुवारी २००८ दरम्यान संपन्न झाले. हे संमेलन भारतीय जलसंस्कृती मंडळाच्या नाशिक शाखेने नाशिक एज्युकेशन सोसायटी, नाशिक व गोखले एज्युकेशन सोसायटी, नाशिक या संस्थांच्या सहयोगाने पार पाडले. संमेलनाध्यक्षपदी आंतरराष्ट्रीय किर्तीचे जलतज्ज्ञ डॉ.माधवराव चितळे हे लाभले हा या चळवळीसाठी भाग्योदयच समजावयाला हवा. संमेलनास प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध उद्योगपती श्री भंवरलालजी जैन यांची उपस्थिती लाभली. या संमेलनात १. जलसाहित्य - व्याप्ती व स्वरूप २. पाणी व पर्यावरण ३. जल साक्षरता ४. जलविकास गौरवगाथा - अनुभवाचे बोल ५. कवी संमेलन ६. पथनाट्य, ७. प्रगट मुलाखत आदी विषयांवर परिसंवाद / चर्चा / कवी संमेलन आयोजित करण्यात आले होते.

या संमेलनासाठी नाशिक एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री सूर्यकांत राहाळकर, गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सौ. आशाताई वेरूळकर, श्री गजानन देशपांडे, सौ. छाया मुराळकर, प्रा. दिलीप फडके, श्री दिलीप अहिरे, श्री शशांक मदने यांनी विशेष परिश्रम घेतले. संमेलनास न्या नरेंद्र चपळगावकर, डॉ. रा.श्री.मोरवंचीकर, डॉ. दि मा मोरे, श्री बाळासाहेब वाघ, डॉ.मो.स.गोसावी, डॉ. हरीश्च्ंद्र बोरकर आदी मान्यवर विशेषाने उपस्थित होते. श्री संदीप सावंत, डॉ.दत्ता देशकर, प्रा.सुनिल कुटे, श्रीमती अरूणा सबाने, श्री सुधीर भोंगळे, प्रा,मोहन कोडारकर, डॉ. विश्वास येवले, श्री अभिजित घोरपडे, श्री अतुल देऊळगावकर, श्री मोहन कुलकर्णी, डॉ.अर्चना गोडबोले, श्री भरत कावळे, श्री राजन जयस्वाल, डॉ. धनंजय नेवाडकर, श्री रविंद्र शुक्ल, आदींचा या परिसंवादांत सहभाग लाभला.

पाचवे संमेलन जळगाव येथे दिनांक ०७ व ०८ ऑगस्ट २००९ दरम्यान भारतीय जलसंस्कृती मंडळ आणि जैन इरीगेशन समुहाच्या सहकार्याने संपन्न झाले. संमेलनाध्यक्षपदी प्रसिद्ध पर्यावरण तज्ञ डॉ.माधव गाडगीळ हे होते तर विशेष अतिथी म्हणून पद्मश्री भंवरलालजी जैन, लोकमतचे संपादक श्री सुरेश द्वादशीवार, श्री मु.ब.शहा, लाभले. या संमेलनात १. जलाधारीत व्यवसायी समाजाचे साहित्य २. जलाधारीत विकासाचे क्षेत्रीय निरीक्षण ३. लोक साहित्यातील पाणी ४. शैक्षणिक अभ्यास क्रमात पाणी या विषयाचा अंतर्भाव व त्यास अनुसरून साहित्य ५. पाण्याचा विवेकी वापर - वैज्ञानिक व तांत्रिक व कृषी प्रगतीसाठी उपलब्ध पाणी आदी विषयांवर परिसंवाद / चर्चा / कवी समेलन आयोजित करण्यात आले होते.

या संमेलनासाठी श्री तसेच संमेलनास डॉ.माधवराव चितळे, न्या नरेंद्र चपळगावकर, डॉ. रा.श्री.मोरवंचीकर, डॉ. दि मा मोरे, प्रा शरद भोगले, श्री विजय दिवाण डॉ. दत्ता देशकर, मुकुंद धाराशिवकर, गजानन देशपांडे, श्री विनोद रापतवार यांनी परिसंवादात उपस्थिती व सहभाग लाभला.

सहावे संमेलन चंद्रपूर येथे वर्ष २०१० मध्ये पार पडले. या संमेलनास अध्यक्ष म्हणून डॉ. विकास आमटे हे अध्यक्ष म्हणून लाभले. या संमेलनास डॉ.माधवराव चितळे, न्या नरेंद्र चपळगावकर, डॉ. दि मा मोरे, डॉ. दत्ता देशकर, श्रीमती अरूणा सबाने यांचा परिसंवादात सक्रीय सहभाग लाभला.

सातवे जलसाहित्य संमेलन नांदेड येथे १० आणि ११ डिसेंबर २०११ दरम्यान संपन्न झाले. हे संमेलन भारतीय जलसंस्कृती मंडळ, नांदेड शाखेने नरहर कुरुंदकर प्रगत अध्ययन आणि संशोधन केंद्र आणि श्री गुरु गोविंद सिंघजी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, नांदेड या संस्थांच्या सहयोगाने पार पाडले. संमेलनाध्यक्षपदी प्रसिद्ध कवी प्रवीण दवणे तर लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित लाभली. या संमेलनात १. साहित्यात व्यक्त होणारे नद्यांचे मानवाशी नाते, २. पर्यावरण आणि पाणी, ३. जल साक्षरता ४. कवी संमेलन ५. जलव्यवस्थापन आणि इतिहास लेखन ६. पारंपारिक जलव्यवस्थापन पद्धती, ७. लोकव्यवहार -पाणी आणि कायदा आदी विषयांवर परिसंवाद / चर्चा / कवी समेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनातील एका सत्रात प्रसिद्ध वैज्ञानिक डॉ.प्रमोद मोघे पुणे यांची प्रगट मुलाखतीचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.

या संमेलनासाठी श्री गजानन पिंपरखेडे, प्रा. उपेंद्र कुलकर्णी, सुरेश जोंधळे , डॉ. विजय पवार, डॉ. संजय पतंगे, डॉ.राजूरकर, मधुसुदन दोड्या, शिवाजी वडजे, बापू दासरी, राजीव मुंदडा, आर एम देशमुख, धनंजय जोशी, डॉ. वेसनेकर यांवी विशेष परिश्रम घेतले. तसेच संमेलनास डॉ.माधवराव चितळे, न्या नरेंद्र चपळगावकर, डॉ. रा.श्री.मोरवंचीकर, डॉ. दि मा मोरे, प्रा शरद भोगले हे विशेषाने उपस्थित होते. शिरपूर चे सुरेश खानापूरकर, जलदिंडीचे डॉ. विश्वास येवले, डॉ. दत्ता देशकर, मुकुंद धाराशिवकर, गजानन देशपांडे, श्रीनिवास गोगटे, डॉ. सतीश साळुंखे, डॉ. पराग सदगीर यांचा परिसंवादात उपस्थिती व सहभाग लाभला.

आठवे संमेलन कोल्हापूर येथे १९ व २० जानेवारी २०१३ दरम्यान संपन्न झाले. हे संमेलन भारतीय जलसंस्कृती मंडळ, कोल्हापूर शाखेच्यावतीने पार पडले. संमेलनाध्यक्षपद प्रसिद्ध साहित्यिक डॉ. चंंद्रकुमार नलगे यांनी भूषविले. या संमेलनात १. दक्षिण काशी खोर्‍यातील जलसाहित्य, २. जलक्षेत्रातील पारंपारीक शहाणपण - वर्तमानातील उपयुक्तता ३. जलदिंडी - जलसाक्षरतेतील अभिनव प्रयोग ४. पाण्यावरच्या कविता ५. लोकसाहित्य आणि पाणी ६. पंचगंगा प्रदूषण मुक्ती ७. महाराष्ट्रातील सिंचन व्यवस्थापन - दशा आणि दिशा आदी विषयांवर परिसंवाद / चर्चा / कवी समेलन आयोजित करण्यात आले होते.

संमेलनास डॉ.माधवराव चितळे, डॉ. दि मा मोरे, हवामान शास्त्रज्ञ डॉ. आर.आर. केळकर, डॉ. दत्ता देशकर, डॉ. विश्वास येवले, डॉ. अनिलराज जगदाळे, गजानन देशपांडे, सौ.पल्लवी कोरगावकर,श्री रावसाहेब गोंदील, सौ.मिलन होळणकर, श्री शामराव देसाई आदींचा परिसंवादांत कृतीशिल सहभाग लाभला.

नववे संमेलन औरंगाबाद येथे १३ व १४ मार्च २०१४ दरम्यान संपन्न झाले. हे संमेलन भारतीय जलसंस्कृती मंडळ, औरंगाबाद शाखेने एम.आय.टी.औरंगाबाद या शिक्षण संस्थेच्या सहयोगाने पार पडले. संमेलनाध्यक्षपदी न्या.नरेंद्र चपळगावकर तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित लाभली. या संमेलनात १. साहित्यात अवर्षणाचे पडलेले प्रतिबिंब, २. जलप्रदूषण ३. उद्योगासाठी पाणी ४. पाण्यावरच्या कविता ५. जल दिंडी संदर्भात डॉ. विश्वास येवले यांची खुली मुलाखात, ६. समन्यायी पाणी वाटप, ७. पाण्याची साठवण व्यवस्था ८. जलसाक्षरतेचा प्रचार आणि प्रसारआदी विषयांवर परिसंवाद / चर्चा / कवी समेलन आयोजित करण्यात आले होते.

संमेलनास डॉ.माधवराव चितळे, डॉ. रा.श्री.मोरवंचीकर, डॉ. दि मा मोरे, श्री मुनिश शर्मा, श्री लक्ष्मीकांत धोंड, श्री किशोर शितोळे, डॉ. अशोक तेजनकर, श्री शामराव नाईक, श्री जयप्रकाश संचेती, श्री मुकूंद कुलकर्णी, मिलींद कंक, श्री मुकूंद बडवे, गजानन देशपांडे, डॉ.दासु वैद्य, डॉ. क्षमा खोब्रागडे, डॉ. शिवाजी सांगळे, श्री रमेश पांडव, जलदिंडीचे डॉ. विश्वास येवले, डॉ. दत्ता देशकर, श्री बाबा भांड, श्री मुकुंद धाराशिवकर यांची परिसंवादात सहभाग व उपस्थिती लाभली.

दहावे संमेलन चिपळूण येथे १३, १४ व १५ जानेवारी २०१७ दरम्यान संपन्न झाले. हे संमेलन भारतीय जलसंस्कृती मंडळ, चिपळूण शाखेने लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर, चिपळूणच्या सहयोगाने पार पडले. संमेलनाध्यक्षपदी डॉ. अशोक कुकडे यांनी भूषविले तर अवजड उद्योग मंत्री श्री अनंतरावजी गिते हे उद्घाटक पाहुणे तर मा.मंत्री श्री रविंद्रजी वाईकर, ना.विनायकजी राऊत, आ.सदानंदजी चव्हाण, डॉ.माधवराव चितळे हे विशेष अतिथी म्हणून लाभले. या संमेलनात १. कोकणातील जलसाठवणूक २. निसर्गस्नेही जीवन पद्धती ३. फेरोसिमेंट टाकीचे बांधकाम ४. पाण्यावरच्या कविता ५. कोकणातील पाणी आणि पर्यटन विकास ६. कोकणातील पाणी आणि औद्योगिकरण ७. जलसाक्षरतेचा प्रचार आणि प्रसार ८. पाणी आणि ग्राम विकास यावर डॉ. प्रसाद देवधर यांची मुलाखत आदी विषयांवर परिसंवाद / चर्चा / कवी समेलन आयोजित करण्यात आले होते.

संमेलनास डॉ. दि मा मोरे, डॉ. दत्ता देशकर, डॉ. विश्वास येवले, श्री विजय जोगळेकर, डॉ. प्रमोद मोघे, सौ.मंजूषा ओक, श्री श्रीधर खंडारपूरकर, श्री अरूण इंगवले, श्री उल्हास परांजपे, श्री दिलीप भाटकर, गजानन देशपांडे, डॉ. चंद्रकांत मोकल, डॉ. उमेश मुंडले, श्री सतीश खाडे आदीं मान्यवरांचा परिसंवादात सक्रीय सहभाग लाभला. या संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री प्रकाश देशपांडे, श्री प्रकाशबापु काणे, श्री धनंजय चितळे, सौ. प्राची जोशी, सौ,अंजली बर्वे आदींनी विशेष परिश्रम घेतले.

आता अकरावे संमेलन भारतीय जलसंस्कृती मंडळ, धुळे शाखेच्या वतीने आणि देशबंधु आणि मंजु गुप्ता फाउंडेशनच्या सहकार्याने धुळे येथे दिनांक २० व २१ जानेवारी २०१८ रोजी संपन्न होत आहे. या संमेलनास अध्यक्ष म्हणून श्री डवले, सचिव जलसंधारण विभाग हे लाभले असून संमेलनाचे उदघाटन श्री अमरीशभाई पटेल यांचे हस्ते होईल. डॉ. माधवराव चितळे व सीताराम गुप्ता हे विशेष अतिथी आहेत. यात खालील विषयांवर परीसंवाद आयोजित करण्यात आले आहेत. १) देशबंधु आणि मंजु गुप्तां फाउंडेशनचे जलक्षेत्रातील कार्य २) जलयुक्त शिवार योजनेतील लोकसहभाग ३) खानदेशची जलसंस्कृती ४) युवा पिढी आणि पाणी ५) माध्यमे आणि पाणी ६) जल उत्पादकता आदी विषयांवर या परिसंवादांत चर्चा होणार आहे. या संमेलनात डॉ. दत्ता देशकर, डॉ. दि.मा.मोरे, डॉ. नारायणपेटकर, श्री ईरफान शेख, डॉ. शिवाजी सांगळे, श्री सतीश खाडे, श्री बाबा शिंदे, डॉ. नेवाडकर,डॉ. विवेक चौधरी, श्री बी.बी. ठोंबरे, डॉ.सुधीर भोंगळे, श्री सूर्यकांत राहाळकर, श्री गजानन देशपांडे, श्री मयुरेष कोण्णूर, श्री एस.डी.कुलकर्णी, श्री अविनाश सुर्वे, श्री रावसाहेब बढे, डॉ. संजय पी. पाटील, डॉ. सर्जेराव भामरे, श्री संदीप सावंत, श्री शरद मांडे आदींचा सक्रीय सहभाग राहणार आहे. जलगौरव पुरस्कार : जलसाहित्य संमेलनाच्या निमित्ताने प्रतिवर्षी त्या भागातील जल विकास क्षेत्रात काम करणार्‍या प्रतिथयश सामाजिक कार्यकर्त्यास भारतीय जल संस्कृती मंडळातर्फे जलगौरव पुरस्कार प्रदान करून स्थानिक कार्याचा सन्मान करण्यात येतो.

जलसाहित्य संमेलनांच्या चर्चा चर्वणातून त्या ठिकाणच्या लोकांना स्फुर्ती मिळावी, त्यातून जल विकासाचे कामी लोकांचे विविध पाणी विकास मंच स्वयंस्फुर्तीने निर्माण व्हावेत, विकसित झालेला सांस्कृतिक वारसा यांचे अध्ययन व जतन करणे, विविध पाणी प्रश्नांचा अभ्यास करून त्याबद्दल उपाय योजना सुचविले जावेत, कार्यकर्त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून मिळावे, सामान्य जनतेला जलसाक्षर करून पाणी प्रश्ना संदर्भात समाजाचा बघण्याचा दृष्टीकोन बदलणे अशा विविध सामाजिक प्रगतीला चालना देणे हा जलसाहित्य संमेलनांच्या आयोजना मागचा मुख्य हेतु आहे.

शेवटी, लोक सहभाग निर्माण होण्यासाठी समाजात पाणी प्रश्नासंदर्भात आस्था व मनस्वी कळकळीची भावना निर्माण होणे गरजेचे आहे. ती निर्माण झाली की जलसंस्कृती एक चळवळ होण्यास वेळ लागणार नाही. पाण्याचे महत्व, अभाव असलेल्या पाण्याचे मुल्य समजून घेणे आणि काटकसरीची जबाबदारी अंगीकारुनच ही चळवळ सशक्त होऊ शकेल. असे झाले तरच जलसाहित्य संमेलनांचे आयोजन सफल झाले असे म्हणता येईल.

गजानन देशपांडे, सचिव, - भारतीय जल-संस्कृती मंडळ