पाऊलवाटा - प्रकाश वाटा - लोकसहभागातून जलसंवर्धन (भाग-2)

Submitted by Hindi on Thu, 12/17/2015 - 13:52
Source
जल संवाद

जिल्हा धुळे तालुका साक्रीच्या उत्तर सीमेवरचे, छडवेल कोर्डे हे गाव, गावची भौगोलिक परिस्थिती पहाता पहाडी, डोंगराळ आणि खडकाळ. हा भाग छत्रीसारखा. जसा छत्रीवर पडणारा पावसाच्या पाण्याचा थेंब सर्व बाजूंना निघून जातो. त्याला जागेवर थांबायला नैसर्गिक परिस्थिती नसते. तशीच अवस्था ह्या परिसराची आहे.

जिल्हा धुळे तालुका साक्रीच्या उत्तर सीमेवरचे, छडवेल कोर्डे हे गाव, गावची भौगोलिक परिस्थिती पहाता पहाडी, डोंगराळ आणि खडकाळ. हा भाग छत्रीसारखा. जसा छत्रीवर पडणारा पावसाच्या पाण्याचा थेंब सर्व बाजूंना निघून जातो. त्याला जागेवर थांबायला नैसर्गिक परिस्थिती नसते. तशीच अवस्था ह्या परिसराची आहे. पडणाऱ्या पावसाचे पाणी कोठेही न थांबता आजूबाजूला 7 - 8 किलोमिटरच्या परिसराच्या पुढे असलेल्या उताराकडे वाहून जाते.

माजी आमदार कै.कर्मवीर आप्पासाहेब बेडसे ह्याच भूमीत जन्मले. त्यांनी गावच्या लोकांच्या सहकार्याने श्रमदानाने गाव तलाव निर्माण केला. पुढे शासकीय योजनांमधून भागात मेंढेचा नाला व गावाच्या परिसरात असलेल्या नाल्यांवर सिमेंट बंधारेही बांधले गेलेत.

बांधलेले सिमेंट बंधारे व मेंढेड नाल्यावर झालेले काम पाणी साठवण्याच्या उद्देशाने शासनाच्या निधीतून तयार झालेले. पण त्यापासून व्हावी तशी उद्दीष्टपूर्ती न झाल्याने व दरवर्षी कमी कमी होणारे पाऊसमान आणि गळकी कामे ह्यामुळे ग्रामस्थ अतिशय चिंताग्रस्त होऊ लागले.

अशाच एके दिवशी मी व माझे सहकारी बांधव यांनी एकत्र येऊन पडणाऱ्या पावसाचे पाणी अजिबात गळून जाणार नाही, ह्यासाठी काय करता येईल ? ह्यासंबंधी विचार करू लागलो त्यातूनच आम्हाला मा.श्री.एन.झेड देवरे, मा.सुरेश खानापूरकर साहेब यांच्याशी चर्चा करून काम कसे करावे ? हे ठवरले.

छडवेल कोर्डे येथे मा.कै. कृष्णाजी माऊली ह्याच्या सौजन्याने फिरत्या नारळाचा कार्यक्रम 10.12.2009 रोजी संपन्न झाला. कार्यक्रमासाठी जो निधी जमा झाला त्यापैकी रूपये एक लाख ह्या कामासाठी राखून ठेवला व उर्वरित पिण्याच्या पाण्याची तातडीची गरज म्हणून खर्च केला. ह्यासाठी एवढासा निधी अत्यल्प होतोय म्हणून धरणाखाली येणाऱ्या 67 विहीरींच्या मालकांनी सढळ हाताने प्रत्येकी रूपये 3 हजार प्रमाणे जमवले. असे एकूण दोन लाख दहा हजार पाचशे त्रेचाळीस रूपये जमा झाले. काही जणांनी जरी अल्पसा निधी दिला तरी तो स्विकारून कामाला लागलो.

छडवेल कोर्डे परिसरात सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीने वीज निर्मितीसाठी टॉवर्स उभारलेले आहेत. त्यांच्याकडे आम्ही वरील कामाला आपण सढळ हाताने मदत करावी, अशी विनंती मा.श्री.ढोबळे साहेब व श्रीमती पवार मॅडम यांच्याकडे केली. त्यांनी आम्हाला 240 तास जे.सी.बी देवू असे मान्य केले आणि आम्हाला अधिकच बळ आले.

मेंढेडच्या मातीच्या धरणाला दुरूस्त करायला जिल्हा परिषद धुळे यांच्याकडून (म.मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब धुळे यांच्याकडून) त्यांचे 14.3.2011 च्या पत्रान्वये परवानगी मिळाली. पण अपुऱ्या निधीमुळे काम तात्काळ सुरू करता आले नाही. पण पवन उर्जाच्या दि. 12.5.2012 च्या पत्रान्वये काम गतीमान झाले आणि माझे सहकारी श्री.दत्ताजीराव, दैवा बापू, भगवान दादा, धर्मा आप्पा, वसंत आप्पा, गोकुळ बापू, जगन्नाथ बापू, धोंडू आप्पा व अन्य बांधव ह्यांच्या सक्रिय पाठींब्याने दि.17.3.2012 रोजी श्रीगणेशा केला. मूळ धरणापासून 3 मिटर अंतरावर 2.5 मिटर रूंदीचा खंदक खडकापर्यंत खाली जे.सी.बी.ने. कोरला. खडकाचा एक थर ब्लास्टींग करून पूर्ण दगड बाहेर काढला. तेथून थेट 500 जी.एस.एम जातीचा कादग टाकला. तो पाण्याच्या प्रवाहांच्या विरूध्द दिशेने 156 मिटर लांब व 6 मिटर रूंदीचा काही ठिकाणी जमीनपातळीच्या वर पर्यंत बांधाच्या उतरत्या भागावर टाकला, त्या खंदकात ट्रॅक्टरच्या 559 खेपा काळी माती भरली. भरून आणता आणता पाणी मारले व काम दि.19.6.2012 पर्यंत पूर्ण केले.

ह्याच परिसरांतील नाल्यांवर सिमेंट बांध शासकीय निधीतून बांधलेले आहेत. पण पाऊस रात्री आल्यावर भरलेले, पण सकाळी एक थेंबही पाणी नसायचे. त्यांना आम्ही ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत 10 ते 15 ट्रीप ट्रॅक्टरने काळ्यामातीचा उतरता लेप दिला. त्यावर 1 फूट मुरमाचा थर टाकला व वरून 1 ते 3 प्रमाणे दगडी पिचींग केले. अशारितीने 10 सिमेंटचे निरूपयोगी बंधारे कामाला आणले. ह सर्व माध्या सहकाऱ्यांच्या तन-मन-धनाच्या सहभागानेच मी करू शकलो त्याचे सारे श्रेय त्यांनाच जाते. त्याचा दृश्य परिणाम ह्याच पावसाळ्यात जाणवला सुध्दा.

या महिन्यापासून जलक्षेत्रात आढळणाऱ्या यशोगाथा वाचकांसमोर अनुकरणार्थ सादर करण्यात येत आहे.

(सुधाकर स्मृती कोषातर्फे )
श्री. उत्तमराव बोरसे (मो. 9420203991)