Source
जल संवाद
चिलापी ऊर्फ डुक्करमासा :
साहेब, आता इथं दुसरा मासाच बघायला मिळत नाहीत, सापडतो तो फक्त चिलापी ! धरणात लावलेलं जाळं बाहेर काढलं की त्यात चिलापीच असतो, उगंच कुठं चार - दोन इतर मासे मिळतात.... भीमा नदीवरील उजनी धरणात मासेमारी करणारा मच्छिमार सांगत होता. त्याच्या सांगण्यात एका शब्दाचीही काहीही अतिशयोक्ती नव्हती.
साहेब, आता इथं दुसरा मासाच बघायला मिळत नाहीत, सापडतो तो फक्त चिलापी ! धरणात लावलेलं जाळं बाहेर काढलं की त्यात चिलापीच असतो, उगंच कुठं चार - दोन इतर मासे मिळतात.... भीमा नदीवरील उजनी धरणात मासेमारी करणारा मच्छिमार सांगत होता. त्याच्या सांगण्यात एका शब्दाचीही काहीही अतिशयोक्ती नव्हती. उन्हाळ्याच्या दिवसात दररोज मिळणाऱ्या 40 - 50 टन माशांमध्ये 95 टक्क्यांपेक्षा जास्त असतो तो चिलापीच, उरलेल्या दोन - पाच टक्क्यांमध्ये असतात रोहू, कटला, मरळ, वाम अशा जाती ! या जाती पाहायला तरी मिळतात, पण पंरपरागतरित्या आढळणारे आहेर, खद्री यासारखे मासे तर इथून कधीच हद्दपार झालेत.उजनी धरणाबरोबरच महाराष्ट्रातील (आणि देशातील सुध्दा) बहुतांश नद्या व धरणांमध्ये चिलापीची घुसखोरी झालीय. कोल्हापूरजवळ उगम पावणाऱ्या पंचगंगा नदीतही तो आहे. पंचगंगा व कृष्णा या नद्यांचा संगम कोल्हापूर जिल्ह्यात नरसोबाचीवाडी इथं होतो. त्याच्या जवळ तेरवाड नावाचं गाव आहे आणि छोटासा बंधारासुध्दा ! इथले मासेमारही असाच अनुभव सांगतात. तिथलं पाणी अतिशय प्रदूषित. इतकं की दुर्गंधीमुळे परिसरात थांबणेही नको होतं. तिथं आता केवळ एकाच जातीचा मासा सापडतो. तो म्हणजे - चिलापी. पंधरा - वीस वर्षांपूर्वी तिथं सतरा - अठरा जातींचे मासे मिळायचे, तेसुध्दा मोठ्या प्रमाणात. पण आता एकटा चिलापी तिथं टिकून आहे. इथल्या अतिशय घाणेरड्या पाण्यात हा मासा सापडतो. म्हणून स्थानिक मासेमारांनी त्याला नाव दिलंय - डुक्करमासा !
या डुक्करमाशानं आपल्याकडील नद्यांचा, तलावांचा ताबा घेतला. त्याच्या साक्षीने आपल्या स्थानिक जाती नष्ट होत गेल्या. अगदी हजारो वर्षांपासून पाहायला मिळणाऱ्या स्थानिक माशांच्या जातींना मागं टाकून चिलापीनं त्यांची जागा घेतली. मुख्यत: गेल्या पंधरा - वीस वर्षात हा बदल पाहायला मिळाला. त्याची सुरूवात आधीपासूनच झाली, पण दर्शनी स्वरूप लाभलं ते गेल्या दोन दशकांमध्ये. विशेष म्हणजे याच काळात नद्यासुध्दा भयंकर प्रदूषित होत गेल्या. हा बदलही या डुक्करमाशाच्या पथ्यावर पडला. स्थानिक माशांना हद्दपार करणारा हा मासा आपल्याकडे आला कसा, रूजला कसा याची कथा अतिशय रंजक आहे आणि बरंच काही शिकवणारीसुध्दा !
आपल्या संदर्भात सांगायचे तर त्याची कथा आहे गेल्या साठ वर्षांमधील. त्याचे मूळ नाव 'तिलापिया मोझांबिकास' किंवा 'ओरेक्रोमिस मोझांबिकस'. या तिलापियाचा अपभ्रंश होवून आपल्याकडे तो बनला चिलापी. भारत स्वतंत्र झाला तेव्हा चिलापी महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशातही अस्तित्वात नव्हता. कारण तो मूळचा आपल्याकडचा नाहीच. त्याचे मूळ स्थान आहे - बोत्सवाना या देशामधले.
परिसराशी उत्तमप्रकारे कसे जुळवून घ्यावे हे शिकावे याच माशाकडून ! अतिशय खडतर परिस्थितीत तो तग धरू शकतो. त्यामुळे एकदा का तो एखाद्या नदीत किंवा जलाशयात शिरला की त्याला तिथून हटविणं मुश्किल, अगदी चिवट तणाप्रमाणे ! त्याला कारणही तसंच आहे. उत्क्रांत होत असतांना या माशाला काही भन्नाट गुणधर्म लाभले आहेत. तो गोड्या पाण्यात राहू शकतो, तसाच मचूळ आणि अगदी खाऱ्या पाण्यातसुध्दा ! इतकंच नाही तर तो बऱ्यापैकी आम्लयुक्त आणि अल्कलीयुक्त पाण्यातही जगू शकतो.
प्रदूषणाचंही त्याला वाडं नसतं. पाण्याचं जैविक प्रदूषण असू द्या नाहीतर रासायनिक, त्यातूनही तो मार्ग काढतो. पाण्यात विरघळलेल्या ऑक्सिजनचं प्रमाण कमी झालं की मासे व इतर जलचर तेथून पळ काढतात. ते शक्य नसेल तर मरतात.
चिलापी मात्र ही स्थिती पचवून टिकून राहतो. त्याला खाण्याचंही वावडं नसतं. याबाबतीत तो सर्वहारी उंदराचाच भाऊ ! मुख्यत: पाण्यातील शेवाळ खातोच, पण गरज पडली तर पाणवनस्पती व अगदी इतर माशांची अंडीसुध्दा मटकावतो.
या माशाचं एक वैशिष्ट्य म्हणजे - पाण्यात त्याच्या पिलांना धोका वाटला की तो त्यांना तोंडात सामावून घेतो आणि सुरक्षा देतो....
याच्या पलीकडेही त्याची वैशिष्ट्य आहेत. ती त्याच्या पथ्यावर पडतात आणि इतर माशांना त्रासदायक ठरतात. याची उत्पादनक्षमता अफाट आहे. काही अभ्यासांमध्ये असे दिसून आलंय की, एका तळ्यात या माशाची बोटाएवढ्या आकाराची बारा - चौदा पिलं सोडल्यावर एक - दीड महिन्यात त्यांची संख्या तीन हजार बनली, तर अडीच महिन्यांमध्ये ती 14 हजारांवर पोहोचली. म्हणजे तळ्यात एकदा माशाचं बीज सोडलं की पुन्हा टाकायची अजिबात गरज नसते. त्याची संख्या वाढली की अर्थातच इतर माशांच्या संख्येवर विपरित परिणाम होतोच. हा मासा आपली अंडी तोंडात घेवून फिरतो. त्यामुळे पिलं बाहेर पडेपर्यंत त्यांना संरक्षण मिळतं. या माशाची आणखी एक खोड म्हणजे तो पुनरोत्पादनासाठी नदीचा, धरणाचा तळ ढवळतो. त्यामुळे पाणी मोठ्या प्रमाणात गढूळ बनतं. ते इतर माशांसाठी व वनस्पतींसाठी हानीकारक ठरतं.... एक ना दोन, याच्या अशा नाना तऱ्हा ! म्हणूनच तो कुठल्याही पाण्यात शिरला की तिथला ताबाच घेतो.
आता प्रश्न उरतो हा आपल्याकडे आला कसा ? त्याला कारणीभूत आहे त्याचं आणखी एक वैशिष्ट्य - याची वाढ अतिशय वेगाने होते, अगदी ब्रॉयलर चिकनप्रमाणे. त्यामुळेच त्याला 'अॅक्वॉटिक चिकन' असंही म्हणतात. त्यामुळे मासेमारीचं उत्पादन वाढविण्यासाठी तो आपल्याकडे आणण्यात आला, ते वर्ष होतं 1952. सुरूवातीला तो बंदिस्त तळ्यांमध्ये सोडण्यात आला, पण तिथून सुटून तो हळूहळू सर्व नद्यांमध्ये शिरला. तिथं घुसला तो कायमचाच ! उत्पादन वाढतं म्हणून सुरूवातीला तो उपयुक्त ठरला, त्याचा हा फायदा आजही आहे. पण त्याचे दुष्परिणाम आता चांगले जाणवू लागलेत. त्याच्यामुळे इतर
माशांना हद्दपार व्हावं लागतं. परिणामी पाण्यातील जैवविविधता नष्ट होत गेली. महाराष्ट्राप्रमाणेच इतर राज्यांमध्ये तसेच. श्रीलंका, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशांतही याची उदाहरणे आहेत. त्यांच्यामुळे स्थानिक मासे संपले. आफ्रिका खंडाच्या दक्षिण कोपऱ्यात वावरणारा हा मासा आता जगभरातील 90 पेक्षा अधिक देशांमध्ये पसरला. तिथं स्थिरावला आहे. तेच महाराष्ट्रात पाहायला मिळतंय. विविधता तर गेलीच, स्थानिक जातीसुध्दा नष्ट झाल्या आणि वाढला तो चिलापी ! उजनी धरणाचंच उदाहरण द्यायचं तर तिथून नष्ट झालेल्या आहेर - खद्री या जातींप्रमाणेच झिंगे, मरळ, वाम या जातीसुध्दा अपवादानंच पाहायला मिळतात. तिकडं पंचगंगा नदीत बंधाऱ्याजवळ माशांच्या शेंगाळो, मरळ, वडसुडा, तांबर, घुगरा, बरग, वाम, कटारना, आंबळी, खवली, तांबुडका, अरळी, कानस, डोकऱ्या अशा चौदा - पंधरा जाती सहजी मिळायच्या. पण आता यापैकी एकही मासा दिसला तरी नवल !
चिलापी वाढण्यास नद्यांचे प्रदूषणही कारणीभूत ठरलं. प्रदूषित पाण्यामुळे स्थानिक मासे आधीच टिकून राहण्यासाठी धडपडत होते. याशिवाय मासेमारीत जास्तीत जास्त उत्पादन मिळविण्यासाठीची बेशिस्त त्रासदायक ठरलीच होती. त्यात भर म्हणजे चिलापी. त्याच्यामुळे त्यांच्या अस्तित्वासाठीच स्पर्धा निर्माण झाली. स्थानिक मासे ही स्पर्धा हरले. चिलापीचा माणसावरही अप्रत्यक्ष परिणाम होतच आहे. माशांच्या इतर जाती नष्ट झाल्या. त्याचा मासेमारांच्या उत्पन्नावर विपरित परिणाम झाला.
हा मासा प्रदूषित पाण्यात वाढतो. त्याचा त्रास हा मासा खाणाऱ्यालाही होतो. कारण हा मासा प्रदूषित पाण्यात टिकतो म्हणजे प्रदूषित घटक त्याच्या शरीरात गेले तरी त्याला काही होत नाही. जड धातूसारखे अतिशय घातक घटक काही प्रमाणात त्याच्या शरीरात साठून राहतात. माणूस किंवा इतर पक्षी - प्राणी या माशाला खातात तेव्हा त्यांना त्याचा त्रास होतो. त्यामुळे काही अभ्यासक असे सांगतात की, प्रदूषणामुळे मासे मेलेले परवडले, पण ते जीवंत राहिले तर त्याचा माणसाला त्रास होवू शकतो.
गेल्या वीस वर्षांमध्ये झालेला हा बदल स्थानिक जीवांच्या विविधतेवर खोलवर परिणाम करणारा आहे. त्यातून शिकण्यासारखं बरंच आहे. एखाद्या प्रदेशात कोणत्याही प्राण्याची नवी जात आणताना त्याच्या परिणामांचा पूर्ण अभ्यास झालेला नसेल तर काय होवू शकतं, याचं हे उत्तम उदाहरण. चिलापी आणला उत्पादन वाढविण्यासाठी पण त्याच्यामुळे भलतंच घडलं. गाजरगवत, घाणेरी यासारख्या तणांच्या रूपानं जमिनीवर हे घडलंच आहे. आता पाण्यातही चिलापीच्या रूपाने तण वाढतंय. त्यामुळे असा खेळ अतिशय काळजीपूर्वक खेळावा लागतो. नाहीतर उपायापेक्षा इलाज भयंकर ठरतो. तेच चिलापी ऊर्फ ' डुक्करमाशा' नं दाखवून दिलंय.
श्री. अभिजीत घोरपडे, पुणे - मो : 9822840436