कसे वाटते हे वाचायला आणि ऐकायला ! हे विचित्र जरी वाटत असले तरी हे सत्य आहे. खरेच गुदमरतोय जीव गंगेचा, काय होती ती, काय झाले आहे आज तिचे. भारतातील पवित्र नदी, जिच्यावर लाखो लोकांची उपजिवीका आहे. जवळ जवळ 40 टक्के भारतीयांना गंगा पाणी पुरवते, ती आज अत्यंत दयनीय अवस्थेत आहे. या कचाट्यातून ती बाहेर पडेल असे जराही वाटत नाही. 2007 च्या एका अहवालानुसार गंगा जगातील दूषित नद्यांच्या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे.
कसे वाटते हे वाचायला आणि ऐकायला ! हे विचित्र जरी वाटत असले तरी हे सत्य आहे. खरेच गुदमरतोय जीव गंगेचा, काय होती ती, काय झाले आहे आज तिचे. भारतातील पवित्र नदी, जिच्यावर लाखो लोकांची उपजिवीका आहे. जवळ जवळ 40 टक्के भारतीयांना गंगा पाणी पुरवते, ती आज अत्यंत दयनीय अवस्थेत आहे. या कचाट्यातून ती बाहेर पडेल असे जराही वाटत नाही. 2007 च्या एका अहवालानुसार गंगा जगातील दूषित नद्यांच्या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. जगातील चार नद्या गंगेपेक्षाही प्रदूषित आहेत, हीच ती काय समाधानाची बाब. कशी व का आली गंगा या धरतीवर, याच्या मागे एक कथा आहे ज्याचा उल्लेख रामायण, महाभारत आणि अनेक हिंदू धर्म ग्रंथात आहे.कशी आली गंगा धरतीवर ? हिंदू धर्माप्रमाणे ही मान्यता आहे की भगीरथाचे पूर्वज म्हणजे सागरपूत्र जवळ जवळ साठ हजार वर्ष एका मुनीच्या शापामुळे नरकात पडले होते व अंशुमनचे (भगीरथाचे आजोबा) म्हणणे होते की जर गंगा नदीला शुध्द स्वरूपात आणून तिचा स्पर्श सागरपुत्रांच्या रक्षांना केला तरच त्यांना स्वर्गप्राप्ती होवू शकेल. भगीरथाच्या तपस्येला यश प्राप्त झाले, गंगा पृथ्वीवर अवतरली, तिच्या जोराने पृथ्वी चे नुकसान होवू नये म्हणून शिवानी आधी आपल्या डोक्यावर स्थान दिले नंतर तिचे पृथ्वीवर आगमन झाले. सगळी पृथ्वी पवित्र, उपजावू आणि नदी पाप धुणारी झाली. सागरपुत्रांना मोक्ष प्राप्त झाले, आणि तिथूनच राख किंवा अस्थी गंगेमध्ये शिरवायची प्रथा पडली असावी, जेणे करून मेलेल्या माणसाला मोक्ष प्राप्त होईल. गंगा ही स्वर्गातून आल्यामुळे, स्वर्गात जायला हाच मार्ग आहे असे लोकांना वाटू लागले.
वरील कथेवरून गंगेला धरतीवर आणायचा उद्देश तर कळतो पण तोच चुकीचा होता असे आता वाटायला लागले आहे, गंगेच्या आजच्या स्थितीला जर कोणाला जबाबदार ठरवायचे असेल तर ते आहे अंशुमन (भगीरथाचे आजोबा), त्यांनी जर भरीरथाकडे आग्रह धरला नसता तर गंगा पृथ्वी (भारतात) वर आलीच नसती आणि तिचे हे हाल झाले नसते. स्वर्गातून आली म्हणून पूजा करायची आणि ज्या कामाकरिता आली त्याकरीता तिला दूषित करायचे. गंगा जर भारतात नसून इतर दुसऱ्या देशात असती तर तिची स्थिती आज वेगळी असती.
वरील कथेत स्पष्ट लिहिले आहे की 'गंगा नदीला शुध्द स्वरूपात आणून तिचा स्पर्श सागरपुत्रांच्या रक्षांना केला तरच त्यांना स्वर्गप्राप्ती होवू शकेल'. पण गंगा आज शुध्द व स्वच्छ आहे का?
गंगोत्रीहून निघालेली गंगा आपला 2525 कि.मी चा प्रवास ऋषिकेश, हरिद्वार, कानपूर, अलाहबाद, वाराणसी आणि पश्चिम बंगाल मधून होत बंगालच्या खाडीत सामावते. गंगेच्या प्रवासामध्ये उत्तराखंड, उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगाल ही पाच राज्ये येतात आणि त्यातल्या 29 मोठे शहरे, 23 लहान शहरे आणि 48 गावे यातून वाहत जाते. काय केले या शहरांनी, अनेक चर्मउद्योग कारखाने, केमीकल प्लांट्स, कापड उद्योग, दारूचे कारखाने, कत्तलखाने, दवाखाने उभारले आणि गंगेचे पाणी घेवून त्यात दूषित पाणी सोडत गेले. घरात वापरलेले सांडपाणी सरळ गंगेत जावू लागले. धार्मिक पर्वाच्या वेळी 70 मिलियनच्या वर लोकं आपले पाप धुवायला पाण्यात डुबकी मारतात. कसे रहाणार पाणी स्वच्छ !
उत्तरांचलच्या पर्यावरण विभागाने पाण्याचे चार प्रकारचे वर्गीकरण केले आहे -
1. पिण्यायोग्य
2. अंघोळीसाठी योग्य
3. शेती योग्य आणि
4. अतिप्रदूषित
काय कारण आहे प्रदूषणाचे ? ऋषिकेश पासून ते कोलकत्ता, गंगेच्या किनाऱ्यावर परमाणु वीज निर्मिती पासून रासायनिक खताचे अनेक कारखाने आहे आणि कानपूर तर चर्म उद्योगाकरिता प्रसिध्दच आहे. अलाहाबाद आणि वाराणसी पर्यंत पाणी इतके घाण होते की डुबकी तर दूर जवळ उभे राहिले तरी श्वास घ्यायला त्रास होतो. गंगेची ही स्थिती पाहून प्रसिध्द मैगेसेस पुरस्कार विजेते एम.सी.मेहता यांनी 1985 ला गंगेच्या किनाऱ्यावर लागलेले कारखाने आणि शहरातून निघणाऱ्या सांडपाण्यावर बंदी घालायला सुप्रीम कोर्टात अपील केली होती. या अपील ची दखल घेत ततकालीन प्रधान मंत्री राजीव गांधी यांनी 1985 ला गंगा एक्शन प्लान ची सुरूवात केली.
एप्रिल 1985 ला गंगा एक्शन प्लान ची सुरूवात झाली आणि वीस वर्षात 1200 करोड रूपये खर्च झाले. प्लान अंतर्गत शहरातून आणि कारखान्यातून निघणाऱ्या दूषित पाण्याला स्वच्छ करायला प्लांट लावले गेले. या प्रतिक्रियेने थोडा फरक तर पडला पण गंगेच घाण पडणे थांबेना, शेवटी असे समजण्यात आले प्लान असफल झाला आणि मार्च 2000 मध्ये काम बंद करण्यात आले.
गंगा दूषित होण्याकरिता फक्त कारखानेच जबाबदार आहे असे नाही तर शहरातून निघणाऱ्या सांडपाण्याच्या रूपात प्रक्रिया न केलेल 1 बिलियन लिटर पाणी रोज गंगेत सोडण्यात येते. गंगा दूषित होण्याकरीता अनेक कारणे, त्यातल्यात्यात मुख्य आहे कारखाने, प्रक्रिया न करता शहरातले सांडपाणी नदीत सोडणे, नदीचा वापर अस्थी आणि राख शिरायला करणे, पूजा करून निर्माल्य नदीत टाकणे आणि आपले पाप धुवायला गंगेत स्नान करणे.
वीस वर्षांचे अथक प्रयत्न गंगा एक्शन प्लान 1 व 2 आणि 1200 करोड रूपये खर्च करून आज स्थिती पुन्हा शून्यावर आहे. 20 फेब्रुवारी 2009 ला गंगेला राष्ट्रीय नदी म्हणून घोषित करण्यात आले व वर्ल्ड बँकेने गंगा शुध्दीकरणाला 1 बिलियन डॉलर देण्याचे केले. आपण आपल्याच कर्माने कर्ज बाजारी झालो.
2009 ते 2011 सीवर वाटर जनरेशन आणि ट्रीटमेंट कॅपॅसिटी जनरेटेड च्या स्थितीत जरा लक्ष घालूया -
| 2009 | 2011 |
सिवेज जनरेशन (एस.एल.डी) | 2638 | 2730.30 |
ट्रीटमेंट कॅपॅसिटी (एम.एल.डी) | 1174 | 1208.80 |
गॅप (एम.एल.डी) | 1464 | 1514.50 |
% गॅप | 55 | 55 |
सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड च्या 2012 - 13 रिपोर्ट प्रमाणे कारखाने किती दूषित पाणी जनरेट करतात ते बघूया -
गंगे किनारी सर्व प्रकारचे कारखाने पकडले तर ते 764 होतात आणि त्यातून निघणारे दूषित पाणी हे 501 एम.एल.डी (मिलियन लिटर्स ए डे) सिवेज जनरेशन 2730.30 एम.एल.डी आणि कारखान्यातून निघणारे दूषित पाणी 501 एम.एल.डी. कारखान्यातून निघणाऱ्या दूषित पाण्याचे, गंगेत सोडायच्या आधी शुध्दीकरण करायला कारखाना मालकांना बाध्य करता येईल, तरी पण लहान कारखानदार ज्यांना हे प्लांट लावणे परवडणारे नसेल किंवा ज्यांची कारखान्याची किंमत ट्रीटमेंट प्लांट पेक्षा कमी असेल तर ते कारखानदार दूषित पाणीच नदीत सोडणार. एक एम.एल.डी प्लांट ची किंमत रूपये 1 ते 1.25 करोड पर्यंत जाते.
मुख्य मुद्दा हा शहरातून निघणाऱ्या सांडपाण्याचा आहे. 2730 एम.एल.डी दर दिवसाला निघण्याचे फक्त 1208 एम.एल.डी चेच शुध्दीकरण करून बाकीचे 1514 एम.एल.डी अशुध्द पाणी गंगेमध्ये सोडण्यात येते. याचा अर्थ गंगा रोज 1514 एम.एल.डी पाण्याने प्रदूषित होते. इतके मोठे अशुध्द पाणी शुध्द करायला ट्रीटमेंट प्लांट बसवायला शहरात जागा मिळायला हवी. कानपूर, अलाहबाद आणि वाराणसी या गजबजल्या आणि गर्दीच्या शहरात तर हे अत्यंत कठीण आहे. एक एम.एल.डी ट्रीटमेंट प्लांट बसवायला जागेची किंमत आणि इतर गोष्टी पकडून रूपये 3 ते 6 करोड रूपये खर्च येवू शकतो. इतके करून हे प्लांट फुल कॅपॅसिटी मध्ये नॉन स्टॉप काम करायला हवे. मध्ये मध्ये लाईट गेले तर पुन्हा अशुध्द पाणी गंगेत शिरणार. एकंदरीत पाहता केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकारे असो हे प्रकरण जरा कठीणच आहे, कारण दर वर्षी जनसंख्या वाढत राहणार आणि सांडपाण्याचे प्रमाण पण वाढत राहणार. ही एक न थांबणारी प्रक्रिया आहे.
नरेंद्र मोदी वाराणसीतून निवडून आल्यावर त्यांनी तर गंगा बचाव अभियान सुरू केले. गंगा शुध्दीकरण जे आधी पर्यावरण मंत्रालय कडे होते त्याच्या करीता एक स्वतंत्र मंत्रालय नेमले आहे आणि त्याची जबाबदारी उमा भारती यांना देण्यात आली आहे. उमा भारती यांनी फरमान काढले की जे गंगेत थुंकतील किंवा थुंकतांना आढळतील त्यांच्या कडून 10000 रूपये दंड वसूल करण्यात येईल. गंगेत थुंकणारे किती लोकं असतील, पण जे लोखोंच्या संख्येत पवित्र होण्याकरिता किंवा आपले पाप धुण्यासाठी गंगेत आंघोळ करून तिला दूषित करतात त्यांचे काय ? त्यांना कोण थांबवणार, कुंभ आणि महाकुंभ जे 55 दिवस चालतात, तिथे तर विचारायला नको. जो तो आपले पाप धुण्याकरीता धडपडत असतो. गंगेत आंघोळ केल्याने मोक्ष मिळतो की नाही हे माहीत नाही पण नदी दूषित होते हे नक्की. कुंभ करीता एक स्वतंत्र गाव उभारले जाते. इथून निघणारे सांडपाणी प्रक्रिया करून गंगेत सोडले जाते का ? उत्तर आहे नाही. अलाहबाद आणि कुंभ इथे किती पाणी रोज पुरवल्या जाते, किती सांडपाणी तयार होते आणि कितीवर प्रक्रिया होते हे बघुया -
सप्लाय केलेले पाणी | ||
| अलाहबाद | कुंभ सिटी |
(एल.एल.डी) | 277 | 80 |
सांडपाणी (एम.एल.डी) | 216 | 231 (80 म्युनसिपल सप्लाय + बोर वेल + विहीर) |
ट्रीटमेंट प्लांट | 60 | 0 |
(एम.एल.डी) |
|
|
डीफरन्स | 156 | 231 |
याचा अर्थ रोजच्या 156 एम.एल.डी व्यतिरिक्त 55 दिवस चालणाऱ्या कुंभच्या वेळेला 231 एम.एल.डी दूषित पाणी गंगेत सोडल्या जाते. कसे आवरणार हे सगळे उमा भारती आणि नरेंद्र मोदी. हिंदू लोकांच्या आस्थेला किंवा विश्वासाला आळा घालता येईल का ? जर हे करणे अशक्य नसेल तर गंगा स्वच्छ किंवा शुध्द कशी होणार ? हे विचार करण्यासारखे प्रश्न आहे. कुंभाच्या व्यतिरिक्त रोजच्या आंघोळी, कपडे धुणे, गंगेची पूजा, फुले, पत्रावळी गंगेत वाहणे हे प्रकार सुरूच राहतात.
दर वर्षी होणाऱ्या चारधाम च्या यात्रा पण गंगा दूषित करण्यात अजून भर घालतात. गंगोत्री पासून तर डायमंड हार्बर पर्यंत फिकल कॉलिफॉर्मचे (विष्ठाद्रव्ये) चे प्रमाण मान्यता पातळी पेक्षाही जास्त आहे व दर वर्षी वाढत आहे. आश्चर्य किंवा चिंतेची बाब म्हणजे रूद्रप्रयाग आणि देवप्रयाग येथे ही विष्ठाद्रव्ये प्रमाण दर वर्षी वाढत आहे हे पण एक चिंतेचे कारण आहे. याला जबाबदार कोण ? तर नक्कीच वाढती यात्रेकरूंची संख्या आणि सरकार.
वाराणसीला आणखी गंगा दूषित व्हायचे कारण म्हणजे तिथले दहन घाट. डॉक्टर बी.डी. त्रिपाठी, बनारस हिंदू युनिवर्सिटी येथे सेंटर फॉर इंविरोनमेंटल सायन्स येथे कार्यरत आहे, त्यांच्या मते दर वर्षी वाराणसी येथे 32000 शवांचे दहन केले जाते आणि त्याच्या करीता 16000 टन लाकूड वापरल्या जाते आणि त्याची जवळ जवळ 7000 टन राख गंगेत शिरवली जाते.
सगळ्यांना लाकूड परवडतेच असे नाही, तर असे लोकं अर्धवट जळलेले मृत देह गंगेत अशेच वाहून देतात किंवा सरळ मृतदेह नदीत ढकलून देतात. अशा प्रकारे नदीत किती दूषित होत असेल कोण जाणे. ही तर फक्त वाराणसीच्या दहन घाटाची स्थिती आहे, इतर अजून ठिकाणी काय होत असेल देव जाणे !
याच्यावर मंत्रालय कसे नियंत्रण आणणार. इथे तर हिंदू लोकांच्या भावनेचा प्रश्न आहे. वाराणसीला तर म्हणे दाहसंस्कार केल्याने सरळ मोक्ष प्राप्ती होते तर हे सगळे प्रकार थांबवणे शक्य आहे का ?
नॅशनल गंगा रीवर बसीन अथॉरिटी जी गंगा नदीला शुध्द करण्याचे प्रयत्न करतात त्यांच्या मते नदीत विषारी पदार्थ, केमिकल्स आणि जीवघेणे बॅक्टेरिया चे प्रमाण वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ने प्रमाणित केलेल्या सेफ लेव्हल पेक्षा 3000 पटीने जास्त आहे.
कशी होणार गंगा स्वच्छ ? कुठे तरी असे वाटते का की गंगा पूर्वी सारखी स्वच्छ आणि पवित्र होवू शकेल? उमा भारती म्हणाल्या होत्या की गंगा तीन वर्षात प्रदूषण मुक्त करू, पण प्रधान मंत्री कार्यालयाने आत्ताच सर्वोच्च न्यायालयाला कळविले की गंगा प्रदूषण मुक्त करायला 18 वर्षांचा अवधी लागेल. याला काय समजावे ?
आपले प्रधान मंत्री, नरेंद्र मोदी जपान दौऱ्यावर असतांना, गंगेला तिथल्या नदी सारखे स्वच्छ करू असे स्वप्न पाहत आहे. तिथले लोकं नदीत प्रदूषित पाणी सोडत नाही, कुंभ मेळे भरून नदीला दूषित करत नाही, नदीकाठी दहन विधी करून त्याची राख नदीत प्रवाहित करीत नाही, नद्यांची पूजा करून फुले आणि पत्रावळी नदीला अर्पण करत नाही, मेलेली माणसे आणि जनावरे नदीच्या स्वाधीन करत नाही. मोदींनी स्वच्छ गंगेचे स्वप्न स्वत: करीता नाही तर देशाकरीता पाहिले आहे, तर त्यांच्या नाही, तरी या देशाच्या आणि पर्यावरणाच्या रक्षणाकरीता गंगेला स्वच्छ आणि निर्मल ठेवणे सगळ्यांचे प्रथम कर्तव्य आहे. आपण त्यांना या कार्यात मदत करायला हवी.
एक प्रधान मंत्री, त्यांच्या मंत्री उमा भारती. एक सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड, पाच राज्याचे पाच मुख्य मंत्री आणि त्या राज्यांचे स्टेट पोल्युशन कंट्रोल बोर्ड यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. हे सगळे मिळून कारखानदारांवर दबाव आणून त्यांना प्रक्रिया केलेले पाणी नदीत सोडायला बाध्य करू शकतात. सांडपाण्यावर प्रक्रिया करूनच पाणी नदीत सोडायचा प्रयत्न करतील हेच त्यांच्या हातात आहे. पण जिथे नदी आस्था आणि विश्वासामुळे दूषित होते आहे. त्याच्यावर कसे नियंत्रण आणणार आणि हेच तर गंगेचे दुर्भाग्य आहे. इथे हिंदू लोकांच्या भावनेचा प्रश्न आहे. या भावनेपोटी 1985 पासून आतापर्यंत झालेल खर्च -
1. 1985 ते 2000 गंगा एक्शन प्लान - 1200 कोटी
2. 2009 मध्ये वर्ल्ड बँक कडून 1 बिलियन अमेरिकन डॉलर
3. 2014 मध्ये नमामी गंगे करीता 2073 कोटी रूपये
4. या व्यतिरिक्त मोदींनी जपान सरकार कडून गंगेच्या शुध्दीकरणाकरीता मिळवलेले कर्ज
प्रत्येक नदीच्या पाण्यामध्ये स्वत:ला स्वच्छ करायची शक्ती असते पण त्याच्याकरीता पाणी वाहते असायला हवे. गंगेत ही शक्ती जास्त आहे. स्वत:ला स्वच्छ करायला नदीच्या पाण्यात प्राणवायू असेल तरच ती स्वत:ला स्वच्छ ठेवू शकेल. वरच्या भागाला धरणे बांधल्या गेल्यामुळे नदीचा प्रवाह थांबला. खालच्या भागाकडे नदीतले पाणी काढून, दूषित पाणी सोडले जाते. इतके सगळे स्वच्छ करायला नदीला अधिक मात्रे मध्ये प्राणवायूची आवश्यकता आहे, म्हणून तिचा जीव गुदमरतोय. लक्ष दिले नाही तर गंगेत दूषित पाण्या व्यतिरिक्त काही राहणार नाही. गंगा ही माते समान आहे, जर माताच कोमात गेली तर तिच्याकडून आपण कशी काय अपेक्षा करू शकू, की ती आपले पाप धुवून आपल्याला पवित्र करेल?
जर आपल्याला इमानदारीने गंगा शुध्द, पवित्र, जीवंत ठेवावयाची असेल तर विकासाच्या दृष्टीकोनात बदल आणावा लागेल, सामाजिक परिवर्तन अत्यंत गरजेचे असून शासन व्यवस्थेत व्यापक बदल आणावा लागेल. श्री मोदींनी आताच अस्सी घाटला जावून स्वच्छतेची सुरूवात केली आहे. बघूया त्यांना जनता किती साथ देते ती.
लोकांनी आपल्या भावना बाजूला ठेवून मरणोत्तर दशेला आलेल्या गंगेच्या रक्षणाकरीता वैचारिक आणि धार्मिक बदल घडवून आणायची अत्यंत आवश्यकता आहे, नाहीतर हेच म्हणावे लागेल की हे दुर्भाग्य गंगेचे की ती भारतात अवतरली.
श्री. विनोद हांडे, नागपूर - मो : 09423677795