Source
जलसंवाद, डिसेंबर, 2017
देश भरातील १६ लोकांना हा सन्मान प्रदान करण्यात आला त्यात श्री शिरीष आपटे याचं नाव असणे हे त्यांना तर अभिमानाचे आहेच पण विदर्भाचे असल्या कारणाने आम्हाला पण त्यांचा अभिमान आहे. पाच वर्षा नंतर त्यांच्या कामाची दखल घेतल्या गेली हे महत्वाचे आहे. चांगल आणि निस्वार्थ भावनेने जो काम करतो त्याची नोंद कुठे ना कुठे होते हे यावरून सिद्ध होत.
सन २०१२ मधला एक मालगुजारी तलावांचा उल्लेख असलेला लेख वाचण्यात आला. त्याच्यात महाराष्ट्र शासनातील ग्रामीण विकास विभाग आणि जल -संरक्षण विभाग यांनी असे नमूद केले होते की पूर्व-विदर्भा कडील १२५००० हेक्टर जमीन , सिंचन क्षमता असून सुद्धा सन १९५० पासून सिंचनाची वाट पहात आहे. या भागात जवळ जवळ ७००० सिंचन तलाव आहेत आणि याच तलावांची सिंचन क्षमता १२५००० हेक्टर असून हेच तलाव जल पुनर्भरणा चे काम पण करू शकतात.इतकी मोठी सिंचन क्षमता असून सुद्धा फक्त २० टक्के जमिनीचेच सिंचन होते आणि बाकी सगळी शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. या विषयावर तज्ञांचे असे मत आहे की जिल्हा परिषद जे ह्या तलावांचे रख-रखाव करते त्यांच्या कडील काम काढून ते शासन आणि लोक सहयोगाच्या माध्यमाने करावे.
हेच तलाव ज्यांना आपण मालगुजारी तलाव किंवा मामा तलाव म्हणतो ते कित्येक दशकां पासून नेते व सामाजीक संस्थांच्या उदासीनते मुळे रख-रखाव च्या कामा करीता रखडले आहे. पूर्व विदर्भातील मालगुजारी तलावांची संख्या व त्यांची सिंचन क्षमता अशा प्रकारे आहे.
जिल्हे | तलावांची संख्या | सिंचन क्षमता हेक्टर मधे |
नागपूर | २१६ | ६०८५ |
भंडारा | १४६२ | २१६८१ |
गोंदिया | १७८६ | ३५१७४ |
चंद्रपूर | १७२९ | ३८६०५.८७ |
गडचिरोली | १६६९ | २४४४०.७० |
एकूण | ६८६२ | १२५९८६.५७ |
मालगुजारी तलावांचा इतिहास बघितला तर तो ३००-३५० वर्ष जुना. हे तलाव गोंड राजानी आपल्या भागातील भाताच्या पिकाच्या रक्षणा करिता तयार केले व प्रत्येक मालगुजाराला त्याचा मालकी हक्क दिला. म्हणजे तलावाचे पाणी त्यांनी वापरायचे आणि त्याचे रख रखाव पण त्यांनीच करायचे. पण स्वातंत्र्या नंतर ,१९५० पासून मालगुजारी पद्धत बंद झाली व १८६ तलाव ज्यांची सिंचन क्षमता १०० हेक्टर किंवा जास्त होती ती इरिगेशन विभाग आणि १०० हेक्टर पेक्षा कमी ते जिल्हा परिषदेकडे हस्तांतरीत करण्यात आले.
पण या तलावातून दोन्ही विभागांना काही उत्पन्न होत नसल्या कारणाने तलाव दुर्लक्षीत राहिले व शेतकर्यांना निस्तार हक्क मिळाल्याने, पाणी, पैसे न देता वापरायला लागले व तलावांची स्थिती खराब होत गेली. आज काही मालगुजारी तलावां मधे तळाशी इतका गाळ जमला आहे व काही तलावांचे अतिक्रमण झाल्या मुळे सिंचन क्षमता तलावांच्या क्षमतेच्या १० टक्क्या वर आली.
मुख्य मंत्र्यांनी या समस्येचे निदान करण्याच्या दृष्टीने असा सल्ला दिला की ह्या तलावांची डागडूगी व पुनरुजीवनाचे काम तलावांच्या सिंचन क्षमतेच्या हिशोबाने वेगवेगळ्या विभागांकडे सोपविण्यात यावे. मुख्य मंत्र्यांच्या आदेशानुसार खालील प्रमाणे मालगुजारी तलाव, वेगवेगळ्या विभागांकडे हस्तांतरीत करण्यात आले ते असे,
२५० हेक्टर सिंचन क्षमतेच्या वर - जलसंपदा विभागा कडे
१०० ते २५० हेक्टर सिंचन क्षमते वाले - जलसंधारण विभाग कडे
१०० च्या आत सिंचन क्षमते वाले - जिल्हा परिषद कडे.
अशा खराब आणि दुर्लक्षित अवस्थेत असलेल्या मालगुजारी तलावांच्या पुनरुजीवनाचे काम जर कोणी मनापासून व समाजा प्रती आपले असलेले कर्तव्य हे ध्येय समोर ठेवून जर कोणी काम केले असेल तर श्री शिरीष आपटे यांनी.
श्री शिरीष आपटे यांचे शालेय जीवन हे भंडार्याला गेले असल्या मुळे त्यांना त्या भागाची माहिती पण भरपूर. शालेय शिक्षण आटोपल्या वर नोकरीच्या निमित्याने त्यांना भंडार्याला यावे लागले आणि ते पण मायनर इरिगेशन चे कार्यकारी अभियंता म्हणून. आपण ज्या भागात शिकलो, लहानाचे मोठे झालो तर त्या भागाची सेवा करण्याची चालून आलेली संधी त्यांना गमवायची नव्हती. या दरम्यान भंडारा शहराचा विकास तर झाला पण ग्रामीण भाग मागासलेलाच राहिला . ग्रामीण भाग हा शेतीवरच अवलंबून असल्या कारणाने तिथल्या लोकांच्या आर्थिक उन्नती करिता तलावांचे पुनरुजीवन करणे गरजेचे आहे.
श्री आपटे यांनी आपल्या कार्यकाळात म्हणजे सन २००८ ते २०१२ या काळात २२ मालगुजारी तलावांची स्थिती गंभीर असल्या मुळे त्यांचे पुनरुजीवन केले. त्यांच्या खात्या अंतर्गत २८ तलाव होते पण ६ तलावांची स्थिती चांगली असल्या मुळे त्यांना २२ तलावांचे काम करावे लागले.
श्री आपटे सरांची भेट घेतली असता , माझ्या मनात आलेला पहिला प्रश्न म्हणजे हे मालगुजारी तलाव म्हणजे काय? त्याची कल्पना कुठून मिळाली ? आणी या तलावांचे पुनरुजीवन केले म्हणजे काय केले व कसे केले. पुनरुजीवन केल्या मुळे शेतकर्यांवर काय परिमाण झाला व त्यांच्या कडून सहकार्य मिळाले का? असे अनेक प्रश्न विचारले असता सरांनी सुंदर रित्या सांगायला सुरवात केली.
एकदा गोंड राजा काशी यात्रेला गेले असता त्यांना असे आढळुन आले की लोकांनी नाल्या किनारी तलाव बांधले व ते पक्के पण केले, व ते पाणी शेतकरी ऊसाच्या शेती करिता वापरू लागले. हे तिथल्या राज्याच्या लक्षात आले. राजाने त्या शेतकर्यांना तलावांचा मालकी हक्क दिला व त्यांना उसाचे ट्रेडिंग करायला सांगितले. या मुळे राज्याचे राजस्व वाढले. गोंड राजाला ही कल्पना आवडली.
परत आल्या वर राजानी लोकांना जमिनी दिल्या , तलाव बांधायला सागितले व त्यांना त्या जमिनीचा आणि तलावांचा मालकी हक्क दिला , म्हणजे जमिनी त्यांच्या आणि तलाव पण त्यांचे. अशा प्रकारे मालगुजारी तलावांची सुरवात झाली. याचा इतिहास तसा ३०० ते ३५० वर्ष जुना. गोंड राजा नंतर भोसलेंच राज्य आलं आणी त्यांनी पण मालकी हक्क दिले व त्याची नोंद रेव्हेन्यू रेकॉर्ड मधे केली. त्यावेळी ही सगळी नोंद फारसी भाषेत लिहिल्या जायची व तिला वाजिब उल अर्द असे म्हणायचे याचा अर्थ रेकॉर्ड ऑफ राईट्स असा होतो. अशा रीतीने लोकांना पाण्याचे हक्क दिल्या गेले.
हे सगळे तलाव, माथा ते पायथा या पद्धतीने बांधल्या गेले आहेत. म्हणजे एक तलाव माथ्यावर बांधायचा, त्याचा ओव्हर फ्लो दुसर्या तलावात घ्यायचा, दुसर्याचा ओव्हर फ्लो तिसर्यात घ्यायचा आणि अशा प्रकारे कुठे सात, कुठे पाच तर कुठे तीनच तलाव बांधल्या जायचे . हे सगळे उतारावर निर्भर करायचे .
श्री आपटे यांनी २८ पैकी २२ तलाव जे वाईट परिस्थितीत होते ते निवडले व त्यावर काम करायला सुरवात केली. तलावांची रख-रखावाची जवाबदारी यांच्या खात्याची असल्या कारणाने यांच्याच विभागातील दुसर्या खात्यात रिकाम्या पडलेल्या मशीनचा उपयोग करून घेतला कारण त्यांना पैसे द्यायची घाई नाही किंवा द्यायची गरज पडली तर टप्प्या टप्प्याने देणे सोपे जाईल हा विचार करून कामाला सुरवात केली.
खरिप पिकाच्या हंगामा नंतर यांनी तलावांच्या पुनरुजीवनाच्या कामाला सुरवात केली व त्यांच्या लक्षात आले की दीड ते दोन मीटर गाळ साचला आहे व तो काढल्यावर टाकायचा कुठे , म्हणुन या कामात ग्रामपंचायतला बरोबर घेतले. ग्रामपंचायतचा सहभाग मिळाल्या मुळे गावकर्यांचा सहभाग मिळाला . निघालेल्या गाळाचे काय करायचे, तर शेतकर्यांना न्यायला सांगितले . शेतकर्यांनी निघालेला गाळ शेतात टाकल्या मुळे जमिनी दमदार झाल्या .
गरीब शेतकरी ज्यांना गाळ नेणे परवडत नसे त्यांना विभागाने त्यांच्या शेतात नेऊन टाकला. अशा प्रकारे १६ ते १७ लाख cu.mt.. गाळ काढून ,लोक सहयोगाने तलाव स्वच्छ करण्यात आला व त्याच बरोबर त्यांची सिंचन क्षमता ही वाढली. त्याचाच दुसरा फायदा म्हणजे ग्राउंड वॉटर चार्जिंग वाढले परिणामी आजुबाजुच्या विहिरींच्या पाण्यात वाढ झाली .
गाळ निघाल्यावर लक्षात आले की खाली मुरूम आहे. मग तो मुरूम काढून तलावाच्या बर्म वर टाकून तलाव मजबूत करण्यात आले . अशा प्रकारे सिंचन क्षमता ६००० हेक्टर ने वाढली. या सगळ्या कामाचे श्रेय, आपटे सर, लोक सहयोगाला देतात आणि त्यांचे मत असे आहे की लोक सहयोगाविना हे काम शक्यच नव्हते .
सिंचन क्षमता वाढल्या कारणांनी शेतीत पिक चांगल्या प्रकारे येऊ लागले त्याला साथ मिळाली ती तलावातून निघालेल्या गाळाची . ज्यांच्या कडे विहिरी होत्या ते विहिरीच्या पाण्याने सिंचन करू लागले. शेतकरी ऊसाचे पिक घेऊ लागले. ऊस विकल्या ने शेतकर्यांचे उत्पन्न वाढले , पैश्याची आवक वाढली म्हणजे शेतकरी आर्थिक दृष्टी मजबूत होऊ लागला. कच्या घरांचे परिवर्तन पक्क्या घरात होऊ लागले आणी जे पक्के होते त्यांचावर मजले रचल्या गेले. याचा एकच अर्थ हा की शेतकरी संपन्नते कडे वाट चाल करू लागले.
हातात पैसा असल्या कारणानी आजारपणाच्या वेळी सरकारी दवाखान्यावर अवलंबून न राहता ते भंडार्याला प्रायव्हेट दवाखान्यात येऊ लागले. गावात मोटार सायकली आल्या.
आपटे सरांनी भंडारा जिल्ह्यातील जांभोरा गावाच उदाहरण दिले, ज्या गावात एकेकाळी काहीच नसताना त्या गावात सिंचन क्षमता वाढल्या पासून ६५ ट्रॅकटर दिसू लागले म्हणजे त्या मागोमाग दुरुस्ती वाले पण आले. नुसती सिंचन क्षमता वाढल्या बरोबत गाव आर्थिक उन्नती कडे वाटचाल करू लागले. आर्थिक प्रगती बरोबर औद्योगिकरणाला पण सुरवात झाली. त्याची तशी मागणी जनरेट झाली. आमडी गावात tractar trolly चे काम सुरु झाले.
या २२ तलावांच्या पुनरुजीवना मुळे ३३ गावांना फायदा झाला. प्रत्येक घरात मोटार सायकली आल्या . मग त्यांना रिपेअर करणारे मेकॅनिक आले , ट्रॅकटर वाढल्या मुळे त्याचे ड्रायव्हर आले , इत्यादी इत्यादी . गावा मधेच रोजगार उपलब्ध होत असल्या कारणाने , गाव सोडुन जाणार्यांची संख्या मंदावली. सरांचा सांगायचा उद्देश हाच की फक्त आर्थिक उन्नती झाल्याबरोबर बाकीच्या गोष्टींची डिमांड आपोआप जनरेट होते आणि चोही बाजूने विकास होतो व ते सातत्याने एका चळवळीतून प्राप्त होतो.
आर्थिक उन्नती झाल्याबरोबर गावातील लोकांच्या राहणीमानात पण बराच फरक पडला. त्यांना शाम्पू , पावडर आदी गोष्टींची पण आवश्यकता भासू लागली. खाण्या पिण्याच्या सवयी बदलल्या . तर हे सगळे कशा मुळे तर शेतकर्यांच्या आर्थिक उन्नती मुळेच ना !
या तलावांच्या पुनरुजीवना मुळे अप्रत्यक्ष फायदे पण दिसू लागले. भंडारा जिल्ह्यात नागझिरा अभयारण्य पण आहे. तिथे पण नाल्यात किंवा लहान मोठ्या तलावात बारमाही पाणी दिसू लागले. जनावरांना जंगलातच पाणी मिळू लागल्या मुळे, त्यांचे जंगलाच्या बाहेर येणे कमी झाले. गावकर्यांना माकडांचा त्रास कमी झाला. जनावरांना प्रजनन वाढवायला जसे वातावरण पाहिजे तसे जंगलात निर्माण झाले व त्यांची प्रजनन शक्ती पण वाढली. हे सगळे अप्रत्यक्ष फायदे म्हणायला हरकत नाही असे श्री आपटे सरांचे मत आहे पण हे सगळे हळू हळू अभ्यास करून त्यांच्या लक्षात आले.
तलावांच्या देखरेखी करिता ग्रामपंचायत व गावातील लोकांचा सहयोग वाढविला. ही कामे ते सहसा उन्हाळ्यात करायचे. भंडारा जिल्ह्यात सामुहिक लग्नाची पद्धत आहे. जवळ जवळ १०० ते १५० जोडप्यांचे लग्न लागत असे. लग्नात आजूबाजूच्या जिल्हयातील व गावातील लोकं यायचे . या गावाची आर्थिकदृष्ट्या झालेल्या प्रगतीचे कारण विचारायचे . मग याच धर्तीवर आपण आपल्या भागाची प्रगती का करू नये हा विचार त्यांच्या मनात आला व अशा प्रकारे ही एक चळवळ सुरु झाली. श्री आपटे सरांच्या कामाच्या पद्धतीचे अनुकरण करून गोंदिया जिल्ह्यातील जल-संपदा विभागाने, ९० मालगुजारी तलावांचे पुनरुजीवन केले आणी ह्या सगळ्या कामा मध्ये आपटे सरांची मेहनत, त्यांची काम करण्याची पद्धत आणि त्यांचा अनुभव या सगळ्यांचा सिंहाचा वाटा आहे असे मानायला हरकत नाही.
आपटे सरांनी बोलता बोलता आणखी अशी एक माहिती दिली की रब्बीच्या पिकानंतर सुद्धा तलावात पाणी शिल्लक राहायला लागल्या मुळे शेतकरी ऊसाच्या शेती कडे वळले. ऊसाची लागवड सुरु झाल्या मुळे , साखर कारखाने आले. ऊस साखर कारखान्यात जायला लागल्या बरोबर उत्पन्नात पुन्हा वाढ झाली. ज्या शेतकर्यांचे ऊस कारखान्या लायक नव्हते ते गुळ बनवायला लागले.
काही स्वयं सेवी संस्था ज्या पाण्याच्या क्षेत्रात काम करतात , आणि, पाणी हा ज्यांचा जिव्हाळ्याचा विषय असतो त्या लोकांनी सरांच्या कामाची एक स्टोरी इंडिया वॉटर पोर्टल वर प्रकाशित केली व त्याचीच दखल घेऊन Better India on-line magazine ने पण प्रकाशित केली होती.
सन २०१४ साली drought फ्री महाराष्ट्रा करिता सकाळ इंडिया ग्रुप ,महाराष्ट्र शासन व मलेशिया सरकार ने सहा आठवड्याची कार्यशाळा आयोजित केली होती, त्यात श्री आपटे सरांचा अनुभव लक्षात घेऊन विदर्भातून त्यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्या कार्य शाळेत सरांच्या कार्य करण्याच्या पद्धतीचा उपस्थितांना भरपूर फायदा झाला.
टाटा समुहाने पण मालगुजारी तलावांच्या पुनरुजीवना करिता ३२ कोटी रुपये दिले आहे ही माहिती पण सरांनी बोलताबोलता दिली. आपटे सरांना एक प्रश्न पुन्हा विचारण्यात आला की १९८० चा जो वन कायदा आला त्याचा तुमच्या कामात काही अडथळा आला का? सर म्हणाले की या वन कायद्याचा त्यांच्या कामावर विशेष असा परिणाम झाला नाही, कारण ही सगळी कामे १९८० च्या आधी ची आहे. पण सगळ्यां कडून सहकार्यच मिळाले . कामा मधे अशा विशेष अडचणी नाही आल्या. सहकार्या बद्दल बोलायचे झाले तर त्यांनी Paulo Coelho यांनी लिहलेल Alchemist या इंग्रजी पुस्तकातल्या चार सुंदर ओळी सांगितल्या, When you have a dream , you share your dreams with others . Then it becomes their dream. When you share your dreams , collectively it becomes your desire. So it becomes desire of society. When it becomes desire of society , then whole society is with you to help for achieving your goal.
या पद्धतीने त्यांना सगळ्यांचेच सहकार्य लाभले. आणि समाजाचे सहकार्य लाभल्या बरोबर राजकीय सहकार्य पण अपोआप मिळू लागले.
श्री आपटे सरांची काम करण्याची पद्धत, कामाची तळमळ व समाजाला संघटीत करून भंडारा जिल्ह्यात मालगुजारी तलावांच्या पुनरुजीवनाचे जे काम त्यांनी सन २००८ ते २०१२ पर्यंत केले त्याची दखल घेऊन इंडिया टुडे च्या दी बेटर इंडिया ग्रुप ने त्यांना सन २०१७ चा सफाई-गिरी पुरस्काराने सम्मानित केले .
देश भरातील १६ लोकांना हा सन्मान प्रदान करण्यात आला त्यात श्री शिरीष आपटे याचं नाव असणे हे त्यांना तर अभिमानाचे आहेच पण विदर्भाचे असल्या कारणाने आम्हाला पण त्यांचा अभिमान आहे. पाच वर्षा नंतर त्यांच्या कामाची दखल घेतल्या गेली हे महत्वाचे आहे. चांगल आणि निस्वार्थ भावनेने जो काम करतो त्याची नोंद कुठे ना कुठे होते हे यावरून सिद्ध होत. हे पारितोषिक त्यांना भारताचे उप-राष्ट्रपती श्री व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
अशाच पद्धतीने व निस्वार्थ भावनेने जर नागपूर जिल्ह्याचे २१६, गोंदियाचे १७८६ , चंद्रपूरचे १७२९ व गडचिरोलीचे १६६९ मालगुराजी तलावांचे काम झाले तर ह्या भागांची आर्थिक उन्नती व्हायला वेळ लागणार नाही पण त्या करिता श्री शिरीष आपटे सारख्या माणसांची आवश्यकता आहे.
श्री आपटे सरांच्या बोलण्या वरून असा निष्कर्ष निघतो की कोणत्याही भागाची, राज्याची किंवा देशाची आर्थिक उन्नती घडवून आण्याची असेल तर पाणी हा मुख्य घटक आहे.
श्री शिरीष आपटे हे सध्या महाराष्ट्र शासनाच्या ,पाटबंधारे विभागात , अधीक्षक अभियंता व परिमंडळीय अधिकारी , दक्षता पथक ( नागपूर परिमंडळ ) या पदावर कार्यरत आहेत.
श्री. विनोद हांडे, नागपूर - मो : ९४२३६७७७९५