जतन पाण्याचे

Submitted by Hindi on Sat, 06/04/2016 - 13:08
Source
जल संवाद

पाणी हे कारखान्यात निर्माण करता येत नाही. पाहिजे तेव्हा, पाहिजे तितके पाणी उपलब्ध करता येत नाही. पाणी हे ऋतुमानानुसारच पडते. पडलेले पाणी अडविणे, अडविलेले पाणी जिरवणे, जिरवलेले पाणी जपून उपसणे, हे मात्र मनुष्याच्या हाती आहे. पण, याकरिता अनेक छोट्यामोठ्या गोष्टी करणे आवश्यक आहे.

पाणी ही एक नैसर्गिक परंतु मर्यादित संपत्ती आहे. संपत्ती ही येते आणि जाते. मग ती पैशाच्या रूपात असो की, पाणी, झाडे, जमीन जुमला असो की गाडीघोडी. म्हणूनच आपण संपत्तीचा नेहमी काटकसरीनेच वापर करतो. नाही तर, आज आहे ते उद्या राहीलच याचा काही नेम नसतो. असलेल्या संपत्तीचा फक्‍त उपयोग केला अन् त्यात काहीच भर टाकली नाही तर, ती संपत्ती किती दिवस तुम्हाला पुरणार? म्हणूनच जो तो संपत्ती वाढविण्याचा प्रयत्न करताना दिसतो. पण वाढ होणारी ही संपत्ती व्यक्‍तिगत असते. घर, जमीन, बंगला, सोनेनाणे, पैसा इत्यादी. नैसर्गिक संपत्ती ही मोफत मिळते, त्यासाठी फार कष्ट करण्याची आवश्यकता नाही, असा समज झाल्यानेच आपण या मौल्यवान संपत्तीचे संवर्धन करण्यासाठी किंवा त्यात भर घालण्यासाठी काम करत नाही.

आपल्या शरीराचा ६० टक्के, मेंदूचा ७० टक्के आणि रक्‍ताचा जवळपास ८० टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे. ही बाब लक्षात घेता आपले शरीरसुद्धा एक संपत्ती आहे व त्यामध्ये पाण्याला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. मानवाच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी नैसर्गिक स्त्रोतांचा मोठ्या प्रमाणात वापर वाढल्याने या संपत्तीचा हळूहळू का होईना परंतु निश्‍चितपणे र्‍हास होत आहे. नैसर्गिक संपत्ती कमी होत आहे आणि त्या तुलनेत लोकसंख्या वाढत असल्याने आपल्याला त्याची प्रकर्षाने जाणीव होत आहे. प्रभावी नियोजनाअभावी पाणी नावाची नैसर्गिक संपत्ती आपणास अपुरी पडू लागली आहे. तसे पाहिले तर संपूर्ण पृथ्वीवर एकूण उपलब्ध पाण्यापैकी ३ टक्केच पाणी पिण्यायोग्य किंवा गोड असून उरलेले ९७ टक्के पाणी पिण्यायोग्य नाही. या तीन टक्के पाण्यापैकी साधारणत: ७० टक्के पाणी गोठलेल्या स्वरूपात असून, उरलेले ३० टक्के पाणी पिण्यासाठी वेगवेगळ्या स्वरूपात उपलब्ध आहे. कारण काहीही असो, मात्र गरज एकच आहे ती म्हणजे या नैसर्गिक संपत्तीचा ठेवा वाचविणे, वाढविणे.

पाणी हे कारखान्यात निर्माण करता येत नाही. पाहिजे तेव्हा, पाहिजे तितके पाणी उपलब्ध करता येत नाही. पाणी हे ऋतुमानानुसारच पडते. पडलेले पाणी अडविणे, अडविलेले पाणी जिरवणे, जिरवलेले पाणी जपून उपसणे, हे मात्र मनुष्याच्या हाती आहे. पण, याकरिता अनेक छोट्यामोठ्या गोष्टी करणे आवश्यक आहे.

पाण्याचा गंभीर प्रश्‍न निर्माण होण्यामध्ये आपला खारीचा का होईना, परंतु वाटा आहे. पाण्याची आठवण होते म्हणजे काय? ज्यावर्षी सरासरीपेक्षा कमीअधिक प्रमाणात पाऊस पडतो. त्या पावसाचे पडणारे पाणीही बर्‍याच प्रमाणात समुद्रात वाहून वाया जाते. अशावेळी दुष्काळ हा शब्द पावलोपावली कानावर येतो. गेल्या काही वर्षांपासून असेच होत आहे. याचे एक उदाहरण म्हणजे जगातील सर्वात जास्त पाऊस पडणार्‍या चेरापुंजीचे देता येईल. येथे दरवर्षी सरासरी ११,७७७ मिमी (४६३.७ इंच) पाऊस पडूनही तेथील जनतेला अनेकदा पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. अनेक तास पायपीट करून पाणी आणावे लागते. याचे मुख्य कारण काय तर एवढा पाऊस पडूनही तेथे पाणी साठवण्याची सोय नाही. पाण्याचे योग्य नियोजन नसलेली अनेक शहरे, गावे भारतात दिसून येतात. आपल्या महाराष्ट्रावर निसर्गाचा वरदहस्त असतानासुद्धा त्या पाण्याचे नियोजन व संधारण हा या समस्याचक्रातील मूळ मुद्दा आहे.

दुष्काळाच्या झळा घराच्या उंबरठ्यावर उभ्या राहतात, तेव्हाच भयावह परिस्थितीची आपल्याला कल्पना येते. महाराष्ट्राने याअगोदर अनेक दुष्काळ बघितले आहेत. त्यात १९७२ चा दुष्काळ हा सर्वात भीषण होता, असे बोलले जाते. त्यानंतर २००४, २०१२ आणि गेल्या काही वर्षांपासून तर दरवर्षीच दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे. बरं, दुष्काळ सर्व ठिकाणी एकसारखाच असेल असेही नाही. कधी विदर्भात, कधी मराठवाड्यात, तर कधी पश्‍चिम महाराष्ट्रात दुष्काळाचे चटके हे कमीजास्त प्रमाणात बसतच असतात. त्यामुळे दुष्काळाचे महत्त्व वाढले आहे. हा दुष्काळ पडू नये म्हणून सरकार नेहमीच प्रयत्नशील असते. पण, कोणतेही सरकार दुष्काळरूपी राक्षसासमोर कमकुवतच ठरले असल्याचे आजपर्यंतच्या परिस्थितीवरून सहज लक्षात येईल. मग दुष्काळ पडू नये म्हणून काय केले पाहिजे, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्‍न सर्वसामान्य नागरिकांना पडणे साहजिक आहे.

सरकार आपल्या पातळीवर यासाठी उपाययोजना करत असते. पाणलोट क्षेत्र विकास हा एक महत्त्वाचा दुवा आहे. यामध्ये माथा ते पायथा, असा कार्यक्रम राबविणे गरजेचे आहे. डोंगरावरून वाहून जाणारे पाणी अडविणे अद्याप तरी शक्य झालेले नाही. बोअरवेल आहे जे पाणी आपण अधिकाधिक खोल जाऊन उपसतो. परंतु, ही पद्धत तत्काळ बंद करणे आवश्यक असले तरी अद्याप आपण त्यात यशस्वी ठरलो नाही. २०० फूट खोल जाऊनही पाणी लागले नाही, तर दुसरा २५० फूट, तिसरा ३०० फूट, तर चौथा एक हजार फुटांपर्यंत खाली जातो. अशी ही अघोरी स्पर्धा तेथील जलसाठा नष्ट करते. पावसाचे पाणी समुद्रात वाहून न जाता ते भूगर्भात जिरावे यासाठी आवश्यक असलेली रेनवॉटर हार्वेस्टिंगची पाहिजे तशी सक्षम यंत्रणा आपण उभारूच शकलो नाही. भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविणे, पावसाच्या पाण्याच्या जमिनीवरील साठ्याच्या होणार्‍या बाष्पीभवनाचे प्रमाण कमी करणे, हे नियम सिमेंटचे जंगल उभे करताना पाळावे लागतात.

परंतु, त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे होत नसल्याचे निदर्शनास येते. छतावरील/परिसरातील पावसाच्या पाण्याने भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविणे, आवश्यक आहे. इमारतीचे, घराचे छत, गच्ची येथे पडणारे पाणी गोळा करून ते जलसंधारणाद्वारे जमिनीत मुरविले तर भविष्यात त्याचा आपल्यालाच फायदा होतो. पाणीपुरवठ्यासाठी बाह्य यंत्रणेवर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही. भूगर्भातील पाण्याची पातळी वाढल्यास पाण्याचा उपसा करण्यासाठी येणारा विजेचा खर्चही कमी होईल, परिणामी विजेची बचत होईल. मीटर किंवा स्किमनुसार वर्षभरात जेवढे पाणी वापरले जाते त्याच्या १० ते १२ पट पाणी रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून मुरवता आले पाहिजे. याची अंमलबजावणी अतिशय कठोरपणे होणे आवश्यक आहे. वृक्षतोड थांबविण्यासाठी त्यासंबंधीचे नियम कडक करून त्यांचीही कठोरपणे अंमलबजावणी होणे गरजेचे असून, या कामी सरकारसोबतच सामाजिक संस्थांनीही योगदान देणे आवश्यक आहे.

या वर्षी सरकारने १६ मार्च ते २२ मार्च हा जलसप्ताह साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. अमूल्य अशा पाणी या नैसर्गिक स्रोताचे संवर्धन व त्याचे महत्त्व पाण्याच्या संवर्धनासाठी विशेष प्रयत्न होण्याची गरज आहे. म्हणूनच एकाचवेळी अनेक स्तरांवर जनजागृती सप्‍ताहासारखे कार्यक्रम होणे गरजेचे आहे. त्याकरिताच मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्र्याच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासनाचा जलसंपदा विभाग, कृषी विभाग, पाणीपुरवठा विभाग, पर्यावरण विभाग, ग्रामविकास विभाग , नगरविकास विभाग, उद्योग या विविध विभागांच्या सहकार्याने हा सप्‍ताह साजरा होत आहे. या माध्यमातून ३६ जिल्ह्यातील ३५८ तालुके आणि ४३, ७११ गावांमध्ये हा सप्‍ताह साजरा होणार आहे.

यात ३५ जिल्हा परिषदांमधील ३५१ पंचायत समित्यांद्वारे २७,९०६ ग्रामपंचायतींपर्यंत पाणी जपून वापरण्याचा हा संदेश पोचविला जाणार आहे. याशिवाय पाण्याचा सर्वात जास्त वापर करणार्‍या ३७८ शहरांमधील २६ महानगरपालिका, तसेच २२६ नगरपरिषदांच्या माध्यमातून जलजागृतीचा संदेश घरोघरी-दारोदारी पोचणार आहे. ही आनंदाची व समाधान देऊन जाणारी बाब असली तरी हे प्रयत्न फक्‍त सप्‍ताहापुरते मर्यादित न राहता वर्षभर याकडे लक्ष दिल्यास आज जे दुष्काळी परिस्थितीचे विदारक चित्र दिसत आहे, तसे भविष्यात दिसणार नाही व आहे ती सद्य:स्थिती आणखी गंभीर होणार नाही.

प्रवीण महाजन, नागपूर, मो : ०९८२२३८०१११