Source
जल संवाद
विदर्भामध्ये अकोला सिंचन विभागामध्ये डॉ.संजय बेलसरे यांनी असेच आगळे वेगळे काम करून दाखविले आणि काटेपूर्णा प्रकल्पाअंतर्गत व विभागातील अन्य प्रकल्पात पाणी वापर संस्थेची चळवळ रूजविली. अन्य संबंधित खात्यातील अधिकारी, लोकप्रतिनिधी, शेतकरी, महिला शेतकरी या सर्वांशी सलोख्याचे संबंध ठेवून स्वत:च्या विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना विश्वासात घेऊन डॉ.संजय बेलसरे यांनी नवनवीन प्रयोग केले.
जुलै 2010 चा जलसंवादचा अंक पाणी वापर संस्था विशेषांक म्हणून काढण्याचे प्रस्तावित आहे असे जूनच्या अंकात वाचले. संपादकद्वयांनी संबंधितांना लेख पाठविण्याचे आवाहनही केलेले आहे. दरम्यान या अंकाचे मानद अतिथी संपादक वाल्मीचे डॉ.रे.भ.भारस्वाडकर यांनीही याबाबत आठवण केली. परिणामत: काही तरी लिहावे असे वाटू लागले आणि अचानक असे लक्षात आले की 1985 च्या सुमारास जलव्यवस्थापनामध्ये लोकसभाग हा विषय हळूहळू पुढे येऊ लागला होता. बोलता बोलता 25 वर्षांचा कालावधी गेला. या 25 वर्षांमधील माझ्या स्मृती पटलावरील अनेक घटना समोर दिसू लागल्या आणि त्यापैकी काही घटनांचे शब्दांकन म्हणजे हा छोटेखानी लेख आहे.मुळात संख्याशास्त्रामध्ये पीएच.डी मिळवून प्रामुख्याने संख्याशास्त्र व अर्थशास्त्राचा काही भाग प्रशिक्षणार्थींना समजावून सांगण्यासाठी म्हणून 1981 साली मी तत्कालीन मराठवाडा विद्यापीठातील अधिव्याख्यात्याची नोकरी सोडून जल व भूमी व्यवस्थापन संस्थेमध्ये (वाल्मी) सहयोगी प्राध्यापक म्हणून रूजू झालो. सुरूवातीला संख्याशास्त्र, अर्थशास्त्र, संगणकशास्त्र असे विषय मी हाताळत होतो. 1984 साली मला संस्थेने अमेरिकेतील कोलोरॅडो स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये ' प्रशिक्षकांचे प्रशिक्षण ' या कार्यक्रमाअंतर्गत सात महिन्यांसाठी प्रशिक्षणास पाठविले. यामध्ये प्रा.डॉ.डेव्हीड फ्रिमन यांचा सिंचन व्यवस्थापनामधील सामाजिक आणि संघटनात्मक बाबी या विषयावरील विशेष प्रशिक्षण कार्यक्रम समाविष्ट होता. डॉ.फ्रिमन यांचे या विषयातील प्रगाढ ज्ञान, अमेरिका व पाकिस्तान येथील प्रचंड क्षेत्रीय अनुभव, शिकवण्याची विलक्षण हातोटी व अंतरिक तळमळ या सर्वांचा माझ्यावर प्रचंड परिणाम झाला आणि मी या विषयाकडे आकर्षित झालो. वाल्मीमध्ये परतल्यावर मी सिंचन व्यवस्थापनामध्ये शेतकऱ्यांचा सहभाग, सहभागी सिंचन व्यवस्थापन आणि पुढे पाणी वाटप संस्था या विषयांमध्येच अधिक रमलो.
सुरूवातीला पाणी वाटप संस्था (वॉटर डिस्ट्रीब्युशन सोसायटी) असाच शब्द प्रयोग केला जायचा. नंतर केवळ पाणी वाटप नव्हे तर पाण्याचं वाटप आणि सुयोग्य वापर हे अशा संस्थांचे उद्दिष्ट असल्याने पाणी वापर संस्था (वॉटर युजर्स असोसिएशन) हा शब्दप्रयोग आता प्रचलित आहे. दरम्यानच्या काळात अशा संस्थांचे रजिस्ट्रेशन सहकार कायद्याअंतर्गत महाराष्ट्रात होत असल्याने त्यांना पाणी वापर सहकारी संस्था असे म्हटले जायचे. आता 2005 च्या नवीन कायद्यानुसार स्थापन होणाऱ्या संस्था पाणी वापर संस्था या नावाने ओळखल्या जातात. गेल्या 25 वर्षात असे अनेक बदल होत गेले. अगदी सुरूवातीला शेतकऱ्यांचा सिंचन व्यवस्थापनामध्ये सहभाग, शेतकऱ्यांचे सहकार्य, शेतकऱ्यांचे आर्थिक / श्रम स्वरूपात योगदान, शेतकऱ्यांच्या संघटना असे अनेक शब्दप्रयोग कधी कधी समानार्थी वापरले जायचे. पुढे पुढे याबाबी बऱ्याच स्पष्ट होत गेल्या.
1985 च्या सुमारास कसाड म्हणजे आताचे सोपेकॉम या संस्थेचे श्री.एस.एन.लेले साहेब व प्रा.आर.के. पाटील यांचा माझा परिचय झाला. या दोघांनी पाणी वापर संस्था हा विषय अत्यंत तळमळीने, पोटतिडकीने व अभ्यासपूर्ण महाराष्ट्रभर मांडला, तत्कालीन पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांसमवेत चर्चा केल्या आणि दत्त पाणी वापर सहकारी संस्थेच्या संदर्भात शासनाबरोबर पहिला मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडींग मान्य करून घडवून आणला. त्यावेळी सहसचिव व नंतर सचिव झालेले श्री.द.ना.कुलकर्णी यांचे या विषयामधील योगदान अतिशय महत्वाचे ठरले. प्रा. आर. के. पाटील व श्री.द.ना.कुलकर्णी यांनी लिहिलेला फड सिंचन पध्दतीवरील लेख आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रसिध्द झाला. मी कोलोरॅडो विद्यापीठात प्रशिक्षण घेत असताना तेथील काही प्राध्यापकांनी या लेखाचा उल्लेख करून माझ्याकडून याबाबतची अधिक माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला. सहभागी सिंचन व्यवस्थापनाच्या क्षेत्रामधील भिष्माचार्य म्हणून श्री.लेले साहेबांचा उल्लेख आवर्जून करावासा वाटतो.
गिरणा प्रकल्पावर कार्यकारी अभियंता, मुळा प्रकल्पावर अधिक्षक अभियंता व लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे प्रशासक, केंद्र शासनाच्या लाभक्षेत्र विकास विभागातील मुख्य अभियंता म्हणून लेले साहेबांनी नेहमीच शेतकऱ्यांच्या सहभागाने सिंचन व्यवस्थापन प्रत्यक्षात घडवून आणण्याचे अथक परिश्रम घेतले होते. निवृत्तीनंतर त्यांच्या स्वयंसेवी संस्थेमार्फत ते आजपर्यंत कार्यरत आहेत. वयाची पंच्याहत्तरी उलटल्यानंतरही त्यांचा या क्षेत्रातील उत्साह अनेकांना प्रेरणादायी आहे. तत्कालीन पाटबंधारे खात्यातील या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्यांची काही नावे सहज आठवतात.
यामध्ये पाणी मोजून देण्याबद्दल व त्याचे मोजमाप सोप्या पध्दतीने शेतकऱ्यांना समजावे यासाठी भरीव प्रयत्न करणारे कार्यकारी अभियंता श्री.हुसैनी, डि.आय.आर.डी मध्ये कार्यरत व या विषयातील संनियंत्रण व मूल्यमापन पध्दती विकसीत करून पाणी वापर संस्थांना सक्षम बनविण्याचे जणू व्रत घेतलेले निवृत्त कार्यकारी अभियंता कै.गं.दि.जोगळेकर, मराठवाड्यामध्ये विशेषत: जायकवाडी प्रकल्पामध्ये पाणी संस्थांना मनापासून प्रोत्साहन देणारे व सहकार्य करणारे आता मुख्य अभियंता व मुख्य प्रशासक (ला.क्षे.वि.)पदावर कार्यरत श्री.आर.बी.घोटे अशा अनेकांची आवर्जून आठवण येते. वाल्मीचे संचालक म्हणून काम करतांना श्री.जंगले साहेबांनी आम्हाला संवत्सर पाणी वाटप संस्थेला अवश्य भेट देण्याचा सल्ला दिला व जुन्या गोदावरी सिस्टीममधील घनमापन पध्दतीने पाणी घेणारी एकमेव पाणी वापर संस्था सुमारे 70 वर्षांपासून कार्यरत आहे, याची नोंद घेऊन त्याबाबत सर्व महाराष्ट्राला पुन्हा एकदा त्या संस्थेची लेखाद्वारे, व्हिडिओ फिलमद्वारे व प्रशिक्षणाच्या माध्यमातून ओळख करून देण्याचे काम श्री. जंगले यांच्यामुळेच घडले.
आज ओझरजवळील तीन पाणी वापर संस्था केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर ख्याती प्राप्त व यशस्वी पाणी वापर संस्था म्हणून प्रसिध्द आहेत. यामागे कै.बापू उपाध्ये व त्यांचे सहकारी भरत कावळे यांचे अथक परिश्रम कारणीभूत आहेत. त्यांना जिवापाड परिश्रम घेऊन साथ देणारे राजाभाऊ कुलकर्णी, श्री. वाबळे यांचेही योगदान लक्षात येण्याजोगे आहे. बापूसाहेब उपाध्ये यांनीसुध्दा लेले आणि पाटील यांचेकडूनच प्रेरणा घेतली. ओझर येथील शेतकऱ्यांना व पाणी वापर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना सर्व बाबी व्यवस्थित समजाव्यात यासाठी वाल्मीकडे प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्याबाबत बापूसाहेब कमालीचे आग्रही होते. त्यांच्या संस्थांच्या कार्यक्षेत्रात आम्ही अनेक प्रशिक्षण वर्ग वाल्मीतर्फे घेतले. या सर्व वर्गांना भरभरून प्रतिसाद मिळायचा. त्या काळात कार्यरत असलेले कार्यकारी अभियंता भाई भंग, श्री.एम.व्ही. पाटील (आता तेथेच मुख्य अभियंता असलेले) यांचेही या सर्व कामाला मनोमन सहकार्य लाभले आणि आज महाराष्ट्रातील पहिली प्रकल्पस्तरीय पाणी वापर संस्था त्या ठिकाणी होऊ शकली.
विदर्भामध्ये अकोला सिंचन विभागामध्ये डॉ.संजय बेलसरे यांनी असेच आगळे वेगळे काम करून दाखविले आणि काटेपूर्णा प्रकल्पाअंतर्गत व विभागातील अन्य प्रकल्पात पाणी वापर संस्थेची चळवळ रूजविली. अन्य संबंधित खात्यातील अधिकारी, लोकप्रतिनिधी, शेतकरी, महिला शेतकरी या सर्वांशी सलोख्याचे संबंध ठेवून स्वत:च्या विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना विश्वासात घेऊन डॉ.संजय बेलसरे यांनी नवनवीन प्रयोग केले. एका जीपचे प्रचार वाहनामध्ये रूपांतर केले, सिंचन गीतांच्या कॅसेट्स काढल्या, काटेपूर्णा प्रकल्पाचा रौप्य महोत्सव तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत घडवून आणला, पाण्याची उत्पादकता वाढविली, आणि त्यामुळेच त्यांच्या या सामुहिक कार्याला नॅशनल प्रॉडक्टिव्हिटी कौन्सिलचे पारितोषिक तसेच वॉट सेव पारितोषिकही मिळाले. एवढे प्रचंड काम करीत असतानाच याच कामावर आधारित लेखन करून त्यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची पीएच.डी ही बहुमानाची पदवी मिळविली. आजही ते महाराष्ट्रातील पहिली प्रकल्पस्तरीय पाणी वापर संस्था यशस्वी व्हावी यासाठी नाशिक येथे प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. तत्कालीन पाटबंधारे विभागातील व आताच्या जलसंपदा विभागातील अनेक अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी सहभागी सिंचन व्यवस्थापनाच्या चळवळीमध्ये आपल्या परीने योगदान दिले. सचिव (लाक्षेवि) या सर्वाेच्च पदावरून निवृत्त झालेले श्री. सुरेश सोडल साहेबांचे योगदान म्हणजे ʅकळसाध्यायʆ म्हणावा लागेल. उजनी प्रकल्पाचे लाभक्षेत्रात पाणी वापर संस्थेचे जाळे विणणारे नंतर मंत्रालयात व 2006 चे नियम मान्य करवून घेणाऱ्या सोडलसाहेबांचे या क्षेत्रात कार्य संस्मरणीय आहे.
पाणी वापर संस्था व एकूणच सहभागी सिंचन व्यवस्थापनाचे महत्व देशभरात इतके वाढत गेले की या कामाशी संबंधित अशा मंडळींनी इंडियन पिम अशी राष्ट्रीयस्तरावरील संघटना स्थापन केली. यामध्ये आंध्र प्रदेशमधील तुराबुल हसन, सीतापतीराव, केरळमधील जॉर्ज चेकाचेरी, उत्तर प्रदेशातील फणीश सिन्हा, दिल्लीचे वाय.डी.शर्मा, महाराष्ट्रातील एल.के.जोशी, एस.एन.लेले, डॉ. संयज बेलसरे अशा अनेक कार्यकर्त्यांचा सहभाग आहे.
वाल्मीतर्फे या विषयावरील प्रशिक्षणाचे काम खरोखरच अतिशय उल्लेखनिय तसेच उपयुक्त ठरले आहे. वाल्मीने या विषयावर संबंधीत अधिकाऱ्यांसाठी, पाणी वापर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी, पाणी वापर संस्थेच्या कर्मचाऱ्यांसाठी, स्वयंसेवी संस्थांसाठी अक्षरश: शेकडो प्रशिक्षण वर्ग गेल्या पंचवीस वर्षात आयोजित केले आहेत. वाल्मीने या विषयावर तयार केलेल्या ʅगंगा आली रे अंगणीʆ सारख्या व्हिडिओ फिल्म्स, तसेच दूरदर्शनवरील आमची माती आमची माणसं कार्यक्रमासाठी तयार केलेल्या चित्रफिती अतिशय उपयुक्त ठरल्या आहेत. वाल्मीचे या विषयावरील प्रशिक्षण साहित्य सर्वांनाच संदर्भ पुस्तक म्हणून उपयुक्त ठरत आहे. वाल्मीने पाणी वापर संस्था या विषयावर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात प्रशिक्षण वर्ग घेतले आहेत.
या लेखात सहजपणे आठवलेल्या काही बाबींचाच उल्लेख करीत आहे. सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी या विषयाचा एक विद्यार्थी व प्रशिक्षक म्हणून मी या क्षेत्राकडे केवळ अपघाताने वळलो. माझा खारीचा वाटा उचलला. पंचवीस वर्षांपूर्वी असं कधीही वाटलं नव्हतं की पाणी वापर संस्था आणि एकूणच सहभागी सिंचन व्यवस्थापन हा विषय इतकी कळीचा मुद्दा बनेल की जलसंवाद मासिकाला पाणी वापर संस्था या विषयावर विशेषांक काढावा असे वाटेल. जलसंवाद आणि सर्व पाणी वापर संस्थांना त्यांच्या भविष्यातील यशस्वी वाटचालीसाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा!
प्रा. डॉ.शरद भोगले, औरंगाबाद - (भ्र : 09850953867)