महाराजा सयाजीराव गायकवाड आणि त्यांनी दुष्काळ निवारणासाठी केलेली कामे

Submitted by Hindi on Sun, 09/10/2017 - 12:34
Source
जलोपासना, दिवाली विशेषांक 2014

हा दुष्काळ हे राज्याचे संकट समजून सगळ्यांनी त्यास तोंड देणे आपले राज्यकर्तव्य आहे. तात्कालिक मदत ही वर्तमान संकटावरचा उपाय आहे, पण पुढील काळासाठी चिरकाल स्वरूपाची कामेच संकटाची तीव्रता कमी करू शकतात.

छत्रपती शाहूंच्या काळात थोरल्या बाजीरावांच्या मराठा सेनेने दिल्‍लीपर्यंत धडक मारली. यावेळी मराठ्यांचे सेनापती होते खंडेराव दाभाडे. यांच्या सोबत होते एक मराठी सरदार दामाजीराव गायकवाड. दामाजीरावांनी गुजरातेतील मोगलांना काठीवाडपर्यंत मागे रेटले. दामाजीचे नातू पिलाजीरावांनी मोगल सरदारांकडून बडोदे काबीज केले आणि बडोद्यात मराठी सरदार गायकवाड घराण्याची सत्ता सुरू झाली. पुढे ईस्ट इंडिया कंपनीने एक एक संस्थान काबीज केले. त्यात बडोदाही एक होते. १८१८ ला मराठेशाही बुडाली आणि ब्रिटीश सत्तेचा हिंदुस्थानवर अंमल सुरू झाला.

बडोदा राजे खंडोराव गायकवाड यांचे १८७० ला अकस्मात निधन झाले. त्यांना मूळबाळ नव्हते. त्यांचे धाकटे बंधू मल्हारराव हे गादीवर आले. त्यांच्यात राज्य सांभाळण्याचे गुण नव्हते. त्यांनी मनमानी कारभार सुरू केला. प्रजा अन्याय, जुलूम अन् भ्रष्टाचाराने जेरीस आली. नजराणे स्वीकारणे, जो अधिक लाच देईल त्यास न्याय मिळे. राजा आणि अधिकार्‍यांचे बेताल वागणे पराकोटीला पोहचले, पण पापाचा घडा भरला. ब्रिटीश रेसिडेंटवर विष प्रयोग केल्याचा आरोप मल्हारराववर ठेवून त्यांना पदच्युत करण्यात आले. खंडेरावांच्या राणी जमनाबाईंना दत्तकपुत्र घेण्याची परवानगी मिळाली. मात्र तो अल्पवयीन आणि गायकवाड घरातील असावा अशी ब्रिटीश सरकारने अट घातली.

पानितपच्या तिसर्‍या लढाईनंतर बडोद्याचे एक भाऊ प्रतापराव गायकवाड खानदेशातील कवळाणा येथे स्थायिक झाले. त्यांचे वंशज काशीराव गायकवाडांच्या तीन मुलांतील बारा वर्षांचा गोपाळ दत्तकपुत्र निवडला आणि शेतकर्‍यांचा पोरगा २७ मे, १८७५ ला बडोद्याचा राजा बनला. त्याचे नाव ठेवले सयाजीराव तिसरे.

पहिल्या सहा वर्षात त्यांच्या गुरूजनांनी अक्षर ओळख, अंकज्ञान आणि इतिहास आणि राज्य प्रशासनाचे उत्तम धडे दिले. अनुभवी दिवाण टी. माधवरावांनी दोन कामे केली. या पोरगेल्या राजास राजकारभाराचे प्रशिक्षण दिले आणि बिघडलेली बडोद्याची घडी नीट बसवली. सयाजीराव जेव्हा राजे झाले त्यावेळी राज्याचा उत्पन्नापेक्षा एक कोटी खर्च अधिक होत होता. टी. माधवरावांनी ती तूट भरून येण्यासाठी खर्चात काटकसर करून राज्याचे उत्पन्न वाढविले. राज्यकारभारात किमान एक शिस्त आणली.

राज्याभिषेकानंतर सहा वर्षांनी २८ डिसेंबर १८८१ ला सयाजीराव गायकवाड यांच्या प्रत्यक्ष राजकारभार हाती आला. त्यावेळी ते अठरा वर्षांचे होते. या तरूण राजाने प्रथम प्रजेला भेटण्यासाठी आणि आपले राज्य पाहण्यासाठी दौरा केला. त्यांच्या लक्षात आले, बहुतांश प्रजा शेतकरी होती. शेती हा जगण्याचा मुख्य व्यवसाय होता. पावसाच्या पाण्यावर शेती केली जायची. बडोद्यात ३५०० खेडी होती. एकूण जमिनीपैकी ४९ लक्ष ६० हजार एकरांपैकी ४१ लक्ष एकर शेती लायक असून फक्त ३३ लक्ष एकरांवर शेती केली जाई. एक हजार प्रजेपैकी सुमारे ७०० माणसे शेती व्यवसायावर अवलंबून होते. कापूस, ज्वारी, बाजरी, भात, कडधान्य, करडी, भुईमूग ही पिके घेतली जात. सगळे पावसाच्या बेभरवशावर अवलंबून होते. पूर्ण राज्यात पाणी पुरवठ्याचे नदीवरचे दोन कालवे व थोड्या विहीरी होत्या. रस्ते धुळीने माखलेले, शिक्षणाची दुरावस्था, अशा परिस्थितीत या तरूण राजाने हेरले. शिक्षण हेच परिवर्तन आणि प्रगतीचे साधन आहे. एकूण प्रजा शेतीवर अवलंबून आहे. त्या शेती आणि शेतकर्‍यांकडे लक्ष दिले पाहिजे.

पहिली दहा वर्षे सयाजीरावांनी सर्व प्रकारच्या सुधारणांची घोडदौड सुरू केली. ते स्वत: जिज्ञासू विद्यार्थी होते. १८७७ - ७८ साली दक्षिण हिंदुस्थानात भयंकर दुष्काळ पडला होता. त्याची झळ बडोद्यासही लागली होती. हिंदुस्थानातील ठराविक अंतराने येणार्‍या अवर्षणाचा त्यांनी अभ्यास केला. ब्रिटीश सरकारने १८८० ला प्रकाशित केलेला Famine Commission चा रिपोर्ट बारकाईने वाचला. वारंवार येणार्‍या अवर्षणाच्या संकटाची कल्पना त्यांना आली. १८८० च्या अहवालातील त्रुटीही त्यांच्या लक्षात आल्या.

हिंदुस्थानभर रेव्हेन्यू खात्याचा भाग म्हणून शेतीकडे बघितले जाई. राज्यातील ७५ टक्के लोकांचे जीवन शेतीवर अवलंबून आहे, राज्याचे मुख्य उत्पन्नही शेतसारा रूपाने येत असते, अशा परिस्थितीत शेतीविषयक कामाकडे लक्ष देणे गरजेचे समजून सयाजीरावांनी तातडीने पुढील कामे सुरू केली. त्याकाळात विलायतेला शिकायला जाणारे बॅरिस्टर व्हायलाच जात. सयाजीरावांचे दत्तक घेणार्‍या जमनाबाईंचे भाचे खासेराव जाधवांना लंडनला शेतीच्या उच्चशिक्षणासाठी पाठविले. १८९५ साली पाटबंधारे व पाणी पुरवठा खाते सुरू करून शेतकर्‍यांना शेतावर झाडे लावण्यास उत्तेजन दिले.

१८९० साली खासेराव जाधव शेतकी शिक्षणाची पदवी घेवून परतले. येतांना त्यांनी या विषयाची खूप पुस्तके आणली. विलायतेत शेती कामासाठी नवीन हत्यारे, कीटकनाशके, खते, बी, फळबागा, दुग्धव्यवसाय कसा करतात याचा अहवाल महाराजांना दिला. बडोदा राज्यात शेतीविषयक प्रयोग सुरू झाले. शेतकर्‍यांना शेतात विहीरी खोदण्यास प्रोत्साहन दिले. १८९७ ला स्वतंत्र शेतकी खातीे सुरू करून खासेराव जाधवांना त्याचे प्रमुख नेमले. पावसाशिवाय पिकास पाणी द्यायचे, तर त्याकरिता विहीरी खोदणे आवश्यक. शेतकर्‍यांना या कामी सरकार अर्धी मदत देवू लागले. अर्धा खर्च शेतकर्‍यांच्या पतपेढ्यांकडून कर्जाऊ दिले जावू लागले. शेतकर्‍यांसाठी सहकारी पतपेढ्या हा हिंदुस्थानातला पहिला उपक्रम होता.

एकोणिसाव्या शतकाची शेवटची वर्ष प्लेग आणि अवर्षण या दैवी - भौतिक आपत्तीची ठरली. प्लेगने मुंबई आणि शेजारच्या बडोदा राज्यातही पाय पसरले. सयाजीरावांनी सर्व शक्तीनिशी या प्लेगच्या संकटास तोंड दिले. १८९९ साली जून, जुलै, ऑगस्ट पावसाविना कोरडे गेले. दुष्काळाची चाहूल ओळखून सयाजीरावांनी चारही प्रांतात दुष्काळ निवारणार्थ उपाययोजना करण्यासाठी रामचंद्र धामणस्कर यांना दुष्काळ निवारण अधिकारी (Famine Officer) नेमले. श्री. धामणस्करांनी दुष्काळी भागाची पाहणी करून महाराजांना अहवाल दाखल देला.

दुष्काळाचे स्वरूप भीषण होते. पावसाळ्याचे पाच महिने उलटून गेल्याने रानातले गवत वाळून गेले. गुरेढोरे चारापाण्याविना मरू लागली. शेतीवर अवलंबून असल्याने शेतकर्‍यांची उपासमार सुरू झाली. गुरे आणि माणसं मरू लागली. सयाजीरावांनी स्वत: कडी अमरेली, बडोदा आणि नवसारीचा दौरा केला. शेतकी खात्याचे प्रमुख खासोराव जाधव, दुष्काळ निवारण अधिकारी धामणस्करसोबत होते. बैलगाडी आणि घोड्यावर दौरा केला. भीषण दुष्काळाची तीव्रता ओळखून तात्काळ दिवाणांना हुकूम दिले. ‘ हे जुने फॅमिन कमिशनचे नियम चांगले आहेत, पण बदलत्या काळात मुलकी अधिकार्‍यांना तत्परतेने निर्णय घेता यावे, मदतीची अंमलबजावणी करता यावी म्हणून सुधारित हुकूम देत आहोत. या दुष्काळाच्या संकटास आपणा सर्वांना तोंड द्यावयाचे आहे. मुलकी अधिकार्‍याने आपल्या ताब्यातील गावात फिरत राहून तात्काळ लोकांना मदत करावी. सर्व भागात तात्काळ दुष्काळी कामे सुरू करावीत. गावोगाव नव्या विहीरीचे खोदकाम करावे. नदी - ओढ्यावर मातीचे बांध टाकून पाणी अडवावे. गावतलावाची कामे करावीत. निराधार व्यक्तीला निर्वाहासाठी तीस रूपये मदत द्यावी. गुरासाठी चारापाणी पुरवावे. शेतकर्‍यांना शेती कामासाठी बैलजोडी घेण्यासाठी सढळ हाताने पुढे तगावी मंजूर करावी. आम्ही सर्व दुष्काळी कामाची पुन्हा प्रत्यक्ष पाहणी करत आहोत.’ (गायकवाड, नोट्स ऑन फॅमिन टूर, ८२)

याच सुमारास राजकीय ऋषी आणि न्यायमूर्ती रानडे आणि न्या. चंदावरकरांचे वर्गमित्र मामा परमानंदाची सायजीरावांना पत्र येत होती. सयाजीरावांचे शिक्षण, प्रशासन, सामाजिक सुधारणेतील कामांबद्दल मामांना आदर वाटत होता. जोतिबा फुले गरीब दीन - दुबळ्यांसाठी पुण्यात हेच काम करतात, पण प्रस्थापितांचा विरोध, प्रतिकूल परिस्थिती अन् प्रकृती अस्वास्थ्याने जेरीस आले. बडोद्यात दानधर्माच्या आणि मिळणार्‍या पुण्याच्या नावाखाली ब्राम्हण आणि मुसलमानांना महिन्याला दीडेक लक्ष रूपयाची खिचडी वाटली जातेय. सयाजीरावांनी मामांचे पत्र आदराने वाचले आणि तात्काळ दोन निर्णय घेतले. जोतिबा फुले यांना मदत तर केलीच, पण दानधर्माच्या नावाखाली ऐदी लोकांना वाटणारी खिचडी बंद करून ती रक्कम दुष्काळी कामात अन्नछत्र उघडून इतर कामासासाठी वळती केली. सयाजीरावांनी पुन्हा दुष्काळी कामाचा दौरा सुरू केला.

अकराव्या शतकातील प्राचीन कलासंस्कृतीचे समृध्द केंद्र असलेले दभोईला सयाजीराव पोहोचले. जवळच्या धर्मशाळेत दुष्काळग्रस्त माणसांची राहण्याची, भोजनाची सोय केली होती. नुसते हाडाचे सापळे, निस्तेज डोळे खोल गेलेल्या महिला आणि मुले बसलेली. डोळ्यांभोवती पांढरा पूजमा झालेली. त्यावर माशा घोंगावत होत्या. हे विदारक दृश्य बघून सायजीराव थिजून गेले. दुष्काळाच्या भयाण दर्शनाने ते कष्टी झाले. बरोबरच्या खासेरावांना म्हणाले ‘ या देखाव्याचे विस्मरण आयुष्यभर होणार नाही. ईश्वर करो आणि माझ्या प्रजेचा असा देखावा पुन्हा पाहण्याची वेळ न येवो.’ सयाजीरावांनी हुकूम केला. दुष्काळ पीडितांना पोटभर खायला भाजी भाकरी आणि कपड्यांची सोय करा.

कोठेवाडातील एमरेळीचा दौरा करतांना गिरासिया वतनदारांची वस्ती मोठी होती. मूळत: चांगली परिस्थिती असलेल्या या भागातील लोकांना उघड मजुरी करण्यास लज्जा वाटत होती, हे सयाजीरावांच्या चटकन लक्षात आले. अवर्षणाने त्यांच्याही शेती जनावरांची दुरावस्था झाली होती. सयाजीरावांनी दुष्काळ निवारण अधिकार्‍यास हुकूम केला. ‘ या लोकांना मजुरीवर न लावता त्यांना अल्पदरात तगावी द्यावी. या रकमेतून त्यांनी आपल्या शेतावर विहीरी खोदाव्या. नाल्यावर बांध घालावे.’ (आपटे. १९३६, भा. २. ४८६) यामुळे वतनदार श्रीमंत मंडळींनाही दुष्काळाला तोंड देण्याचा मार्ग सापडला.

यानंतर नवसारीतील सोनगड या आदिवासी भागात दौरा सुरू झाला. राज्यकारभार हाती येताच दुसर्‍या वर्षी १८८२ ला त्यांनी या भागाचा दौरा केला होता. आदिवासी अन् पददलित प्रजेची अवस्था बघून त्यांच्या शिक्षणाचा हुकूमही काढला होता. या आदिवासींना कालीप्रजा म्हणत. यावेळी ही माणसं झाडावर, झुडुपाआड भिऊन दडून बसली होती, कारण आतापर्यंत कोणताही राजा त्यांना भेटायला आला नव्हता. पोलीस - तलाठी आले तरी ते भिऊन लपत. आपल्या प्रजेची ही अवस्था बघून राजाला खूप वाईट वाटले.

सयाजीरावांचा दौरा तापी काठच्या जंगलातून सुरू झाला. सोबत खासेराव, नायब सुभे श्री. वैद्य व वहिवाटदार होते. जंगलातील झाडांची पाने व गवत वाळून गेले होते. जमीन भेगाळली होती. जागोजागी जनावरे तडफडून मरून पडली होती आणि आकाशात गिधाडांची गर्दी दिसू लागली. आदिवासीच्या एका झोपडीजवळ थांबले. घोड्यावरून उतरले. हाडांचा सापळा राहिलेला लंगोटीवरचा वृध्द डगमगत उभा राहिला. सयाजीरावांनी चौकशी केली. राजा स्वत: भेटायला आला, ही गोष्टचं अप्रुप होती. तो म्हतारा हात जोडून म्हणाला, ‘ महाराज, तू आमचा देव आहेस. या देवाला वाहाण्यासाठी काही उरलं नाही. दोन जिते पोरं असते तर.... म्हतारा गप्प झाला.’ त्या म्हातार्‍याची सोनगडच्या निवार्‍याच्या ठिकाणी व्यवस्था केली. सयाजीराव सुन्न होवून खासेरावांच्या मागून निघाले. दुपारपर्यंत अनेक झोपड्यांतून, रस्त्यातून प्रेताच्या राशीतून दोन प्रहरी तंबूवर परतले. भीषण संहाराने मन सुन्न झाले. खासेरावांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. प्रजेवर लोटलेल्या संकटाने ते मोडून पडले. सयाजीराव मात्र गंभीर झाले. भावनावश न होता कर्तव्य भावनेने मन आवरले.

दुपारच्या जेवणानंतर त्यांनी तात्काळ निर्णय घेतला. हुकूम सांगू लागले, ‘ दुष्काळ आणि आपत्ती हा दैवाचा भाग नाही. तो मानवनिर्मितच आहे. निसर्गनिर्मित तर मुळीच नाही, पुरेशा नियोजनाचा अभाव आणि माणसांच्या आंधळ्या वृत्तीमुळे वारंवार दुष्काळास तोंड द्यावे लागत आहे. या दुष्काळाचे व्यवस्थापन नीट करणे ही राजाची खरी कसोटी आहे. माणसांना अन्न - वस्त्र पुरविण्याचे काम आपण करतोच, पण त्याचबरोबर गुरे - ढोरे खाटिकखान्यात जाणार नाही, ही आपलीच जबाबदारी आहे, त्यांच्या चारापाण्याची व्यवस्था केली पाहिजे. जेथे हे सहज उपलब्ध होईल तेथे गुरांचे स्थलांतरही करावे.’ (राईस, १९३१, लाईफ ऑफ सयाजीराव, १४६) सयाजीराव महाराज दुष्काळी भागाचा दौरा करून बडोद्यास परतले. सर्व राज्यावर ओढलेल्या भयानक संकटाची त्यांना कल्पना आली.

सयाजीराव महाराजांनी दिवाण, नायब दिवाण, दुष्काळ निवारण अधिकारी आणि मुख्य अभियंत्यास बोलावले. दुष्काळ निवारणाचा हुकूम सांगू लागले.

राज्यातील दुष्काळ निवारणार्थ पुढील योजनांची तात्काळ अंमलबजावणी व्हावी.

१. तात्कालिक मदत :


यावर्षी शेतात अन्नधान्य न पिकल्याने गरजू लोकांना धान्याची मदत करणे, अनाथगृहे उघडणे, लोकांना वस्त्रे पुरवणे ताबडतोब करावेत. गावोगावी विहीरी करणे, रस्ते दुरूस्त करणे अशी कामे सुरू करून लोकांना मजुरी मिळण्याची सोय करावी. चालू घटकेला लोकांची भूक शमविणे इतकाच या गोष्टींचा उपयोग होवू शकेल. माणसापेक्षा सर्वांत वाईट अवस्था जनावरांची होत आहे. त्यांच्यासाठी चारापाणी पुरवण्यासाठीही मार्ग काढावा. दुष्काळ नसलेल्या भागातून अन्न आणि चारा आणावा.

२. संपर्कासाठी सोयी करणे :


एका भागातून दुसर्‍या भागात जलदगतीने मदत पोहोचवण्याकरिता रेल्वे, सडकास वाहतुकीच्या साधनांची सोय व्हावी. याकरिता सडका दुरूस्ती आणि नवे रस्ते दुष्काळी कामाचा भाग म्हणून प्राधान्याने व्हावे. माणसाच्या शरीरात रक्त वाहून नेण्याचे काम जशा अनेक धमण्या करत असतात तसे रस्ते राज्याच्या प्रगतीसाठी मदत करत असतात. संकटात या रस्त्यांचीच मदत होते.

३. चिरकाल स्वरूपाच्या सोयी :


आमच्याकडे बहुतांश शेती पावसाच्या पाण्यावर केली जाते. अलीकडे आपण काही वर्षांपासून विहीर खोदून पिकासाठी पाणी द्यावे, असा प्रयत्न सुरू केला आहे, पण आताच्या दुष्काळाने तर माणसाच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्‍न गंभीर बनला आहे. पुढच्या काळातही अवर्षणाचे संकट पुन्हा येवू शकते. या संकटाला तोंड देण्यासाठी शेतकर्‍याने शेतात विहीरी खोदल्या पाहिजे. आता या दुष्काळी कामात प्राधान्याने विहीर खोदणे, पाटबंधार्‍याची कामे करणे, कालवे काढणे ही कामे करावीत. हीच कामे दुष्काळावर चिरकालिक साधन होवू शकेल.

हा दुष्काळ हे राज्याचे संकट समजून सगळ्यांनी त्यास तोंड देणे आपले राज्यकर्तव्य आहे. तात्कालिक मदत ही वर्तमान संकटावरचा उपाय आहे, पण पुढील काळासाठी चिरकाल स्वरूपाची कामेच संकटाची तीव्रता कमी करू शकतात.

सयाजीराव महाराजांनी सगळे लक्ष दुष्काळाच्या संकटास तोंड देण्यासाठी केंद्रीत केले. तीन महिन्यात ४७ लक्ष रूपयांची कामे मंजूर केली. याशिवाय त्यांनी स्वत:च्या खाजगी निधीतून ३.५ लक्ष रूपयांची मदतही केली. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरचे प्लेग आणि दुष्काळाचे संकट एवढे भीषण होते की, ४ लक्ष साठ हजार माणसे आणि ८ लक्ष ५० हजार गुरेढोरे मृत्युमुखी पडली. या दुष्काळाचा सयाजीरावांनी धीराने मुकाबला केला आणि येणार्‍या संकटास तोंड देण्यास सज्ज झाले. (नोट्स, गायकवाड, १३३)

सयाजीरावांनी दुष्काळाच्या अस्मानी संकटाचा सर्व शक्तिनिशी मुकाबला केला. एवढेच नाही तर ते कायमस्वरूपी उपायात शिक्षणाचे महत्वही विसरले नाही ते म्हणतात, ‘तथापि या प्रत्यक्ष उपायांखेरीज अप्रत्यक्ष उपायांचाही विचार केला पाहिजे व त्यात मुख्यत्वेकरून आपल्या लोकांच्या मनाची झालेली हीनदीन, दुर्बल व परावलंबी स्थिती सुधारण्याचा विचार येतो. संकटसमयी हताश होवून बसण्याच्या या त्यांच्या वृत्तीमुळे त्यांच्यात उद्योग, मेहनत वगैरेंचा संपूर्ण अभाव दिसून येतो. आपल्या देशातील लोकवस्तीचा मोठा भाग ज्याप्रमाणे मुख्यत्वे शेतीवर अवलंबून आहे, तशीच स्थिती रशियासारख्या देशाचीही आहे. तथापि युरोपात उद्योगधंद्यांचा उत्कर्ष झाल्यामुळे, त्यांची साधनसंपत्ती वाढून दुष्काळाशी झगडण्याचे त्यांचे सामर्थ्य वाढले आहे. या संपत्तीच्या साधनाने त्यांना परदेशातून धान्य विकत आणता येवून दुष्काळाशी टक्कर देता येते. त्या देशांइतकी उद्योगधंद्यांची व व्यापाराची वाढ आपल्या देशात होणे सांप्रत शक्य नसले, तरीपण त्या दिशेने आपली स्थिती सुधारण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे व तसा प्रयत्न करण्यास उपयुक्त शिक्षण हाच मुख्य उपाय होय. या दृष्टीने सर्व उपायांच्या मुळाशी शिक्षण हेच आहे. सरकारने आपत्तीच्या प्रसंगी कितीही मदत केली तरी ती दिलेली शिदोरी फारशी टिकणार नाही. याकरिता शिक्षणाने स्वावलंबी होवून आपल्या स्वत:च्या पायांवर उभे राहण्यास लोकांनी शिकले पाहिजे.’ (नोट्स, १३४)

या काळच्या महाराजांच्या खासगी पत्रातूनही या संकटाची छाया पसरलेली दिसून येते. उदाहरणार्थ, देवासच्या महाराजांना लिहिलेल्या सन १८९९ च्या ऑगस्टमधील एका मराठी पत्रात ते म्हणतात :

‘इकडे यंदा पर्जन्य मुळीच नसल्याने, भयंकर दुष्काळ पडण्याची भीती पडली आहे. गरीब रयतेची स्थिती फार बिकट आहे, याबद्दल आम्हास फार खेद होत आहे, गरीब लोकांना पोटापुरते अन्न मिळावे, म्हणून रिलिफ कामे राज्यात निरनिराळ्या ठिकाणी सुरू केली आहेत. रयतेची स्थिती फार दीनवाणी व काळजी उत्पन्न करण्यासारखी झाली आहे. दोन प्रहरी उन्हाळ्याप्रमाणे कडाक्याचे उन्ह पडते. हवेत गारवा मुळीच नाही. पर्जन्यकाळचे दिवस असून ते चैत्रवैशाखाप्रमाणे वाटतात.

त्याचप्रमाणे डॉ. नेव्हिन्स् यांना पाठविलेल्या याच सालच्या डिसेंबरमधील पत्रात ते लिहितात :
‘सांप्रत आम्ही भयंकर दुष्काळाच्या पकडीत आहोत. हल्‍लीच्या पिढीच्या हयातीत असा भयंकर दुष्काळ पडल्याचे कोणास आठवत नाही. गेल्या केवळ तीन महिन्यात मी लोकांच्या मदतीसाठी पंधरा लाख रूपये मंजूर केले आहेत. या कामी मला आपल्या सर्व प्रॉमिसरी नोटा विकून टाकाव्या लागतील व वर आणखी कर्जही काढावे लागेल असे वाटते व म्हणून काहीतरी पैशाची तजवीज करण्याच्या खटपटीत मी आहे.

दुसर्‍या वर्षीही दुष्काळाने हा हाकार केला. सयाजीरावांनी सगळी यंत्रणा दुष्काळ निवारण्याच्या कामी एकवटली. इतर खात्याचा खर्च कमी करून गुरेढोरे आणि माणसांच्या अन्नपाण्याची सोय करण्यावर लक्ष केंद्रीत केले. दोन वर्षातील दुष्काळ कामांचा खर्च एक कोटी रूपयांवरून अधिक झाला होता. एवढी रक्कम उभारतांना खाजगी खात्यातून रक्कम वळती केली. दिवाणखाण्याच्या मुख्यप्रवेशद्वारी सोन्याचे दोन सिंह होते. तेे वितळून सोने विकले. ती रक्कमही दुष्काळी कामाकडे वळती केली. दुष्काळाने उध्वस्त झालेल्या शेतकर्‍यांना शेतसारा भरण्याचे त्राण उरले नाही. त्यामुळे सर्रास शेतसारा माफ केला.

आणखी एक निर्णय सयाजीरावांनी घेतला. Famine Code मध्ये दुरूस्ती केली. पुढील काळात काही वर्षांच्या अंतराने दुष्काळाचे संकट येणारच, त्यामुळे या संकटास तोंड देण्यासाठी दरवर्षीच्या सरकारी उत्पन्नातून या कामासाठी तरतूद बाजूला ठेवली. (आपटे, १९३५, भाग. २, ४९३) या दूरदर्शी नियोजनाचा फायदा १९०३ - ४ साली पडलेल्या दुष्काळात लागलीच झाला. यावर्षी दुष्काळात लोकांचे व गुरांचे हाल पूर्वीपेक्षा कमी झाले. मृत्युसंख्याही पुष्कळ कमी झाली. दुष्काळानंतर उद्भवणार्‍या साथीच्या रोगांचा उपद्रवही कमी झाला. १९१० - ११ साली पुन्हा अशा भयानक दुष्काळाने पुन्हा प्रशासन आणि सामान्य माणसांची परीक्षा पाहिली. माणसासाठी अन्नधान्य आणि निवारा करता आला. पण जनावरांना चारापाण्याअभावी फार हाल सोसावे लागले. दुष्काळानंतर अतिवृष्टी झाली. तापीला पूर आला. जंगलात जनावरांना झाडांची पाने देता येतील म्हणून ती पलीकडे नेण्याचा प्रयत्न केला. मरतुकड्या जनावरांना पुरातून पलीकडे पोहून जाण्याचे त्राणही न राहिल्याने हजारो जनावरे वाहून गेली.

केवळ पावसावर अवलंबून राहण्यापेक्षा कायमस्वरूपाची पाणी पुरवठा योजना म्हणून १९०० साली ओरसंग पाटबंधार्‍याचे उद्घाटन केले. त्यावेळी उद्घाटन करतांना सयाजीराव गायकवाड म्हणाले, ‘ दुष्काळी म्हणून आरंभिलेले हे काम खूप महत्वाचे आहे. कारण तात्कालिक मदत देण्याखेरीज या कामाचे स्वरूप कायमस्वरूपाचे उपाय म्हणून मदत होणार आहे. आपद्ग्रस्तांना मदत करण्यात सरकारने मुळीच मागे - पुढे पाहिले नाही. ही कामे करतांना काही चुकाही झाल्या आहेत, त्या पुढे सुधारल्या जात आहेत. हिंंदुस्थानच्या लोकांचे जीवन दोन गोष्टींवर अवलंबून आहे. सुशिक्षिताचे सरकारी नोकरीवर, अशिक्षितांचे शेतीवर. एकट्या शेतीच्या जीवावर आपण देशाची सर्व शक्ती सर्वस्वी वाहत आहोत, ही परिस्थिती बदलली पाहिजे. दारिद्र्यातून वर येवून जगातील मोठमोठ्या व्यापारी राष्ट्राच्या पंगतीला बसण्यासाठी या दुष्काळाच्या आपत्तीतून आपण एक शिकावयाचे की, आता शक्यतोवर व्यापार व उद्योगधंद्यांची वाढ केली पाहिजे. उद्योगधंद्यांची वाढ करण्यासाठी प्रजेने शिक्षण घेतले पाहिजे. यातून मार्ग सापडेल आणि पुढील दुष्काळांना तोंड देता येईल.’ तत्पूर्वी १८८४ साली बडोद्याजवळ आजवा येथे तलाव बांधण्याचे काम सुरू केले होते. १८८१ साली पडोदे शहरास नळाने पाणीपुरवठा होवू लागला. हे उपयुक्त उदाहरण बघून राज्यातील मोठ - मोठ्या शहरात पाणीपुरवठा योजना पूर्ण केल्या. १९९१ साली पाटण, १८९८ सोनगड, भाद्रण, शिनोर ही कामे टप्प्याटप्प्याने तडीस नेली. १९०२ साली हिराणारा, कादरपूर, १९०८ साली जामगीर व घाटवड योजनाही झाल्या.

सयाजीराव नेहमी सांगत - आज सुबत्तेच्या काळातही भारतात शेतीची फळे अपुरीच आहेत. शेतकर्‍यांच्या उत्पन्नात भर घालण्यासाठी त्यांच्या रिकामपणाच्या वेळात जोडधंद्याचे उद्योग शोधणे काळाची गरज आहे. येणार्‍या दुष्काळास तोंड देण्यासाठी पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यासाठी चांगल्या गवताची वाढ केली पाहिजे. यामुळे दुष्काळात गुरांना चारा मिळेल. पडीत जमिनीवर आणि बांधावर झाडे लावून वाढविली पाहिजे. दुष्काळ हा माणसे, गुरेढोरे व शेती यांचा अमानुष संहार करणारा असला तरी, त्यास धैर्याने तोंड देण्यासाठी प्रत्येकाने सज्ज असले पाहिजे. पाणी म्हणजे ईश्वरी प्रसाद आहे. ते जपून वापरले पाहिजे. तिची नासधूस आणि गैरवापर टाळला पाहिजे. अशुध्द पाणी हा माणसासा शत्रू आहे. त्यामुळे प्रजेला किमान शुध्दपाणी पुरविणे हे राज्यकर्त्याचे पहिले कर्तव्य आहे. पाणी सोन्याहूनही मौल्यवान आहे. पैशाने सोने विकत मिळू शकेल, पण हे पाणीच संपले तर काय कराल ? पाणी म्हणजे जीवजंतू, पशुप्राणी, झाडा झाडोरा आणि माणसांसाठी प्रति प्राणच आहे. त्याचे रक्षण, संरक्षण, वाढ करण्याचे काम प्रत्येकाचे आहे. या दुष्काळापासून आपण एक शिकले पाहिजे, निसर्गाची घडी बिघडवून चालणार नाही. नाही तर निसर्गाचा नियमच आहे, नियम मोडला की तो शिक्षा करणारच ! निसर्ग नियम पाळणे यातच सर्वांचे कल्याण आहे.

श्री. बाबा भांड
११५, म.गांधीनगर, स्टेशन रोड, औरंगाबाद - ४३१ ००५, मो : ९८८१७४५६०४, ईमेल : baba.bhand@gmail.com