रोटरी क्लब पुणे, शनिवारवाडा ने उचलला गोवर्धन

Submitted by Hindi on Sun, 04/16/2017 - 13:11
Source
जलसंवाद, मार्च 2017

श्रीकृष्णाने गोवर्धन उचलला तेव्हा सर्व गावकर्‍यांनी त्याला टेकू दिला - ही कथा ऐकली होती. पण प्रत्यक्षात असे घडते हे अनुभवाला आले ते माझ्या ग्लोबलग्रँट मुळे. मी आणि मीना बोराटे कोरियाला कॉन्फरन्सला गेलो ते इथल्या वेगवेगळ्या प्रॉजेक्टची माहिती देवून त्यासाठी कुणी इंटरनॅशनल पार्टनर मिळतो ते पाहण्यासाठी, खूप लोकांनी इंटरेस्ट दाखवला त्यामुळे आशा होती की कुणीतरी पार्टनर मिळेल. पण तसे झाले नाही. जुलैअखेरपर्यंत अनेकदा पाठपुरावा करूनही हाती यश आले नाही म्हणून आम्ही दोघींनी निर्णय घेतला की आपणच ग्लोबलग्रँट करायची.

एक दिवस बसून आम्ही आमच्या ग्लोबलग्रँटचे रजिस्ट्रेशन केले. तो दिवस होता गणेश चतुर्थिचा. त्यानंतर डीजी प्रशांत व डीआरएफसी दीपक यांच्या ताब्यात प्राथमिक रकमेचा चेक दिला. हा प्रॉजेक्ट मोठा असल्यामुळे इतर क्लबच्या मदतीची गरज होती. काही प्रेसिडेंटबरोबर पहिली मिटींग झाली. प्रतिसाद खूपच चांगला होता. बर्‍याच क्लबने योगदान देण्याचे मान्य केले. दुसर्‍या मिटींगच्या वेळी डाउनटाउनच्या प्रे. पल्लवी साबळेने आणि भिगवणच्या प्रे. रियाज शेखने पहिला चेक दिला आणि हळूहळू एकेक चेक येत गेला. नुसते चेक नाही तर 2 प्रॉजेक्टही यात वाढले. आधी फक्त भिगवणजवळच्या मदनवाडीच्या व स्वामीचिंचोलीच्या ओढ्याचे खोलीकरण शिरपूर पध्दतीने करायचे ठरले होते. आता मेट्रोक्लबने याच ग्लोबल ग्रँटमधून सासवडजवळच्या काळदरी येथील जुने बंधारे दुरूस्त करायचे ठरविले, कॅन्टोन्मेंट क्लबने त्यांच्याबरोबर सामील व्हायचे ठरविले. रायगड जिल्ह्यातील कोरेगाव क्लबने रायगडमधल्या इतर दहा क्लबच्या मदतीने लोणारे येथे नवीन बंधारे बांधायचा प्लॅन केला. यात फक्त पुण्यातलेच क्लब नाही तर नगर रोड, सोलापूर रोड, नाशिक रोड, पुणे - मुंबई रस्ता, रायगड जिल्हा असे चहूबाजूच्या क्लबमधून मदत आली.

सगळ्यांना हे माहित होते की ग्लोबल ग्रँटमध्ये पैसे वाढतात. म्हणजे तुम्ही 1000/- डॉलर जमा केले तर त्याचे 2500/- डॉलर होतात. या चारही प्रॉजेक्टचा खर्च सुमारे 174000/- डॉलर होता. आम्ही अनेक क्लबचा पाठपुरावा केला. अखेरीस आमच्याकडे 5000/- डॉलर जमा झाले. म्हणजे याचे 125000/- डॉलर. यात एक प्रॉजेक्ट कमी करावा लागला. म्हणजे स्वामी चिंचोलीचा ओढा खोलीकरण. आम्हाला डीडीएफ कमी मिळाल्यामुळे रोटरी इंटरनॅशनलचेही योगदान कमी मिळाले त्यामुळे स्वामी चिंचोलीचा प्रॉजेक्ट पूर्ण रद्द करावा लागला.

या सर्व कामात माझ्याबरोबर होते रो. मीना बोराटे, रो. अविनाश भोंडवे, रो. चंद्रशेखर देसाई. मीना बोराटेमुळे प्रॉजेक्टची निवड करणे आणि अनेक क्लबकडून योगदान मिळवण्यात पुढाकार घेणे, अविनाश भोंडवेने अनेक क्लबला जावून प्रॉजेक्टची माहिती देवून चेक गोळा करून पाठवायचे काम केले. चंद्रशेखर देसाईने सर्व प्रॉजेक्ट रोटरीच्या वेबसाईटवर अपलोड करण्याचे काम केले. यासाठी लागणारी सर्व माहिती व कागदपत्रे भिगवण क्लब, मेट्रोक्लब व गोरेगावक्लबने पुरविली. हा आमच्या म्हणजे रोटरी क्लब शनिवारवाड्याचा प्रॉजेक्ट असल्यामुळे आमच्या क्लबच्या सर्व मेंबर्सनी देणग्या दिल्या. डिस्ट्रीक्ट 3131 मधले 32 क्लब, कॅलिफोर्नियाचा क्लब आणि आमचा शनिवारवाडा क्लब या सर्वांनी मिळून गोवर्धन उचलला आहे. त्या सर्वांची आणि या योगदान दिलेल्या सर्व क्लबांचे मी मेट्रोक्लब, भिगवण क्लब आणि गोरेगाव क्लब यांच्यावतीने आभार मानते.