सुप्रभा मराठे : व्यक्ती परिचय

Submitted by Hindi on Thu, 01/14/2016 - 08:52
Source
जल संवाद

धो धो कोसळणाऱ्या पावसाने शहरांचा सगळा कारभार ठप्प केला, की घरात बसलेल्या मंडळींचे गरमागरज भजी खाण्याचे किंवा पावसाळी सहलीला जाण्याचे बेत सुरू होतात. मात्र याच काळात काही मंडळी जलसाक्षरतेच्या कामात मग्न असतात.

धो धो कोसळणाऱ्या पावसाने शहरांचा सगळा कारभार ठप्प केला, की घरात बसलेल्या मंडळींचे गरमागरज भजी खाण्याचे किंवा पावसाळी सहलीला जाण्याचे बेत सुरू होतात. मात्र याच काळात काही मंडळी जलसाक्षरतेच्या कामात मग्न असतात. या अशा मंडळींपैकी एक नाव मुंबई महानगरपालिकेच्या अभियंता सुप्रभा मराठे यांचं आहे. पावसाचं पाणी अडवायला हवं, जपायला हवं, साठवायला हवं, हे त्या सातत्याने सांगत असतात.

पावसाचं पाणी अडवणं आणि साठवणं हा फक्त ग्रामीण भागापुरताच मर्यादित विषय नाही. तोे शहरांशीही तितकाच निगडीत आहे. अशा परिस्थितीत पावसाच्या पाण्याचं मोल ओळखून त्याचं जतन करण्याचा प्रयत्न मुंबई महानगरपालिकेचा वर्षा जलसंचयन विभाग गेली आठ वर्ष सातत्याने प्रयत्न करत आहे. मुंबईची पाण्याची गरज, भूजलाची, जमिनीची स्थिती, पाण्याचे स्त्रोत इत्यादी गोष्टींचा अभ्यास करून या शहरासाठी उपयुक्त अशी वर्षा जलसिंचन यंत्रणा त्यातून तयार झाली आहे. या प्रयत्नांमध्ये सुरूवातीपासून सहभागी असणाऱ्या या विभागाच्या प्रमुख सहाय्यक अभियंता सुप्रभा मराठे यांचं या सगळ्या कामातलं योगदान मोलाचं आहे. फक्त प्रकल्प उभारणीतच नाही, तर इथल्या लोकांमध्ये जलसाक्षरता आणण्यासाठी त्या तळमळीने प्रयत्न करत आहेत.

आपल्या कामाची प्राथमिक माहिती देताना सुप्रभा मराठे यांनी सांगितलं की मुंबईला असणाऱ्या पाण्याच्या रोजच्या 3 हजार 900 दशलक्ष लिटर्स गरजेपैकी 2 हजार 900 दशलक्ष लिटर पाणी महानदरपालिका पुरवते. या पाण्याचा दर्जा अतिशय चांगला असतो. भरपूर पैसे खर्च करून शुध्द केलेलं हे पाणीच शौचालयांत, गाड्या धुण्यासाठी, इतर दुय्यम कामांसाठी सरस वापरलं जातं. पण शहराची वाढती लोकसंख्या बघता आता दुय्यम वापराच्या पाण्याला दुसरे पर्याय शोधणं आवश्यक बनलंय. रॅन वॉटर हार्वेस्टिंग किंवा वर्षा जलसंचयनाचा इथे उपयोग होऊ शकतो.

महानगरपालिका मुख्यालयातल्या मराठे यांच्या छोट्याशा कार्यालयात, खच्चून भरलेल्या धारीका, प्रकल्प अहवाल, मधूनच डोकावणारे पाणी वाचवाचा संदेश देणारे चित्रफलक यांच्या गराड्यात त्यांचं काम सुरू असतं. 2002 मध्ये हा विभाग स्थापन झाला, तेव्हापासून त्यांचं हे काम सतत विस्तारत आहे. माहितीसाठी, कुतूहलापोटी अनेकांकडून चौकशी होते, तेव्हा मुळात रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे काय, हा पहिला प्रश्न विचारला जातोच. सुप्रभा मराठे सांगतात - उत्तर अगदी साधं आहे. चार महिन्यांत मिळणारं पावसाचं पाणी हे पाणी पुढच्या आठ महिन्यांसाठी साठवायचं. इमारतींच्या, घरांच्या छतांवर किंवा जमिनीखाली त्यासाठी टाक्या बांधून त्यात हे पावसाचं पाणी जमा करायचं आणि पाईपद्वारे फल्श इत्यादी यंत्रणांना जोडायं. दुसरं म्हणजे, या पाईपची जोडणी बोअरवेल्सना देऊन भूजलस्तरांचं पुनर्भरण करायचं म्हणजे त्या उन्हाळ्यात लवकर कोरड्या पडणार नाहीत.

एखाद्या मिशनसारखं सोप्या शब्दांत नागरिकांना ही माहिती पुरवण्याचं काम करणाऱ्या सुप्रभा मराठेंनी यासाठी मिळालेल्या प्रत्येक संधीचा उपयोग केला आहे. 2003 मध्ये मुंबईत या विषयावरची पहिला परिषद घेतली गेली. त्या विषयी सुप्रभा मराठे सांगतात - इंडियन वॉटर असोसिएशनचे अधिकारी के.एस. क्षीरसागर यांच्या सूचना आणि आमचा अभ्यास, या जोरावर ती परिषद आम्ही घेतली होती. मग कधी नागरिकांसाठी व्याख्यानं, महापालिकेच्या शाळांतल्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा भरवून, प्रदर्शनं-मेळावे आयोजित करून, दिनदर्शिका, छापील पुस्तिकांचं वाटप करून अगदी जमेल त्या मार्गाने हा विषय अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवायचा प्रयत्न आम्ही केला. अर्थात, हे काम सोपं नव्हतं. कारण मुळात मुंबईसाठी ही संकल्पना अगदी नवी होती. अशा प्रकारे पाणी साठवून वापरता येईल, हेच अनेकांना मान्य नव्हतं. बरं, एरवीची पाणी अडवा, पाणी जिरवा ही पध्दतही शहराला मानवण्यासारखी नव्हती. कारण समुद्र जवळ असल्याने इथला भूजलस्तर आधीच उंचावलेला आहे. शिवाय कुठे दुषित पाणी मिसळण्याची शक्यता, कुठे पाण्याच्या पाईप्समध्ये लीकेज, कुठे जमिनीखालच्या जलस्त्रोतांना सांडपाण्याचे मार्ग जोडलेले. अशा अडचणींमुळे जमिनीत पाणी साठवण्याच्या पध्दतीला मर्यादा होत्या.

सुप्रभा मराठे सांगतात, ही संकल्पना तशी पारंपारिक असली, तरीही मुंबईसारख्या शहरासाठी आम्हाला तिची स्वतंत्र, नव्याने आखणी करावी लागली. केरळ, दिल्ली, जयपूर मॉडेल्सचा अभ्यास आम्ही केला. प्रत्यक्ष कामाला सुरूवात करण्याआधी अभ्यासाचे तब्बल 21 मुद्दे आम्ही तयार केले होते. मुंबईतल्या विहीरींची पाहणी, वेगवेगळ्या ठिकाणच्या मृदेचा अभ्यास, भूजलस्तराची तपासणी अशा अनेक गोष्टींचा त्यात समावेश होता. म्हणजे आमचा पाया अगदी पक्का बनला होता. त्यामुळेच या कामामध्ये आम्हाला यश मिळत गेलं.

व्ही.जे.टी.आय. मधून इंजिनिअरींगचं पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या सुप्रभा या खरे तर त्यांच्या बॅचमधल्या हुशार विद्यार्थ्यांपैकी एक होत्या. विद्यापीठातून त्यांचा तिसरा नंबर आला होता. त्यामुळे त्यांनी इंजिनीयर झाल्यावर इमारतबांधणीसारख्या अधिक क्रिएटिव्ह आणि लोकप्रिय क्षेत्रात करियर करावं, हेच स्वाभाविक होतं. त्या तुलनेत हे पाण्यांच्या टाक्या बांधण्याचं काम अगदीच नीरस आणि नॉन ग्लॅमरस वाटू शकतं. मुळात महानगरपालिकेत रूजू होण्याचा त्यांचा निर्णयही त्यांच्या अध्यापकांना रूचला नव्हता. पण सुप्रभा यांचा या निर्णयाकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा आहे. त्यांच्या दृष्टीने बाहेरून यंत्रणेला दोष देण्याऐवजी तिचा भाग बनून ती सुधारणं जास्त गरजेचं आहे.

त्या सांगतात, माझ्यातली ऊर्जा माझ्या कामासाठी पूरक वाटणाऱ्या सकारात्मकरीत्या मदत करणाऱ्या अनेक गोष्टी पाहात, शिकत असते. त्यामुळे मी पुस्तकी अभ्यासाच्या बाहेरच्या खूप गोष्टी पाहिल्या, अनुभवल्या आहेत. पाणीयात्रेचा भाग म्हणून मध्य प्रदेशातल्या पारंपारिक जलसंचयन पध्दती पाहिल्या. ट्रेक्सच्या निमित्ताने सह्याद्रीच्या डोंगरात पाण्यासाठी बांधलेल्या टाक्या पाहिल्या, पर्यावरण विषयक कायद्यांचा अभ्यास केला, यातून माझं सामाजिक भान विकसित होत गेलचं. पण हेही कळत गेल की, समाजसेवा वगैरे गोष्टी खरं तर तुम्ही स्वत:साठी, स्वत:च्या समाधानासाठी करत असता।

हे समाधान मिळवायचं तर समाजाशी जोडलेल्या एखाद्या कृतीचा भाग बनणं आवश्यक बनतं. तशी संधी सुप्रभा यांना महापालिकेच्या कामात मिळाली. सरकारी यंत्रणेशी जुळवून घेण्याच्या पहिल्या थोड्या काळानंतर लगेचच मुंबईच्या पूर समस्येवर काम करणाऱ्या ब्रीमस्टोवॅड प्रकल्पात त्यांचा समावेश झाला.

आपण केलेल्या कामाचा थेट परिणाम सुप्रभा यांना 26 जुलै 2005 साली रोजी झालेल्या रेकॉर्ड ब्रेक पावसात पाहायला मिळाला. बदलापूरला झालेल्या त्यांच्या एका व्याख्यानानंतर तिथल्या काही सोसायट्यांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या टाक्या बसवल्या गेल्या होत्या. पावसात इतर सगळ्या यंत्रणा कोलमडल्यावर पाणीपुरवठ्याचा प्रश्नही उभा राहिला होता. मात्र अशा आणीबाणीच्या प्रसंगी या यंत्रणेद्वारे साठवलेलं पाणी त्या सोसाट्यांना वापरता आलं. अशी उदाहरणं अनेक आहेत. गोदरेजच्या साबण फॅक्टरीला लागणारं पाणी आज, संपूर्णपणे या यंत्रणेद्वारे वापरलं जातंय. त्यासाठी पालिकेच्या पाण्यावर अवलंबून राहण्याची गरज संपली आहे. अनेक सोसायट्यांच्या बोअरवेल्स अधिक काळ कार्यरत राहिल्याने उन्हाळ्यात टँकर मागवण्याचा, त्या सोसायट्यांचा खर्च वाचला आहे. या छोट्या छोट्या गोष्टींमधलं यश सुप्रभा यांच्यासाठी मोलाचं आहे. त्यातून सर्वसामान्यांमध्ये तयार होणारी पाण्याबद्दलची आपुलकी मोलाची आहे. आपल्याकडे घर बांधणारा वेगळा आणि राहणारा वेगळा, असं असल्यामुळे ही आपुलकी कमी दिसते. नाहीतर पूर्वी घराघरांतून छतांवर पन्हाळी बसवून पावसाचं पाणी साठवलं जायचंच ना? त्या विचारात यावेळी सुप्रभा आवर्जून आपल्या आईचं उदाहरण देऊन सांगतात. ही साठवणुकीची वृत्ती मला माझ्या आईकडून शिकता आली.

आमच्या टिळकनगरच्या घरात वर्षानुवर्षे ती हा प्रयोग करतेय. आज वयाच्या पंचाहत्तरीतही ती पावसाळ्यात कटाक्षाने छपरावरून साठवलेलं पाणी वापरते. तिची चिकाटी मला माझ्या कामासाठीही खूप उत्साह देऊन जाते. मुंबईकरांनीही ही वृत्ती आत्मसात करावी. निसर्गाचं हे देणं योग्य तऱ्हेने वापरावं. इतर कुणासाठी नाही, तर स्वत:साठीच पाणीबचतीची, संचयनाची वाट चोखाळावी, हे त्याचं सांगणं असं स्वत:च्या अनुभवांतून सिध्द झालेलं आहे.

चैताली भोगले, मुंबई