पाण्याद्वारे मनोरंजन

Submitted by Hindi on Tue, 01/12/2016 - 14:51
Source
जल संवाद

संगीताच्या तालावर थुईथुई नाचणारी कारंजी, भर उन्हात बरसणाऱ्या पावसाच्या सरी, उंचावरून कोसळणारा एखादा धबधबा, खळखळणारा ओढा... ही दृष्यं डोळ्यांना सुखावतात आणि पाण्याचे किती वेगळे उपयोग असू शकतात, हे दाखवून देतात.

संगीताच्या तालावर थुईथुई नाचणारी कारंजी, भर उन्हात बरसणाऱ्या पावसाच्या सरी, उंचावरून कोसळणारा एखादा धबधबा, खळखळणारा ओढा... ही दृष्यं डोळ्यांना सुखावतात आणि पाण्याचे किती वेगळे उपयोग असू शकतात, हे दाखवून देतात.

खरंच , पाणी हे केवळ जीवसृष्टीला जन्म देण्यासाठी किंवा तृष्णा भागविण्यासाठी निर्माण झालं नाही, तर ते माणसाच्या मनोरंजनासाठीही आहे. या कारणासाठी त्याचा पूर्वापार उपयोग होत आलाय. अगदी कृष्णाच्या कथेतल्या जलक्रीडेपासून ते आजच्या वॉटर पार्क, वॉटर स्पोर्ट्स पर्यंत त्याचा मनोरंजनासाठी वापर सुरूच आहे.

महाभारत किंवा प्राचीन वाङ्मयात जलक्रीडेचे उल्लेख हमखास सापडतात. खट्याळ कान्हाच्या संदर्भात तर ते जागोजागी आढळतात. या जलक्रीडा म्हणजे एकप्रकारचे मनोरंजनच. इतरही देव, पुराणातील व्यक्ती, राजे-राजवाडे, बादशहा, नवाब यांबाबतही असे उल्लेख येतात. त्यांचे वाडे, महालांमध्ये आजही त्याचे पुरावे पाहायला मिळतात.

राजस्थानातल्या उदयपूरमधली सहेली की बाडी चा या बाबत मुद्दाम उल्लेख करावा लागेल. ही बाग तिथल्या राजकन्येची सहलीची जागा. त्या ठिकाणी कारंजी व पाण्याची व्यवस्था अशाप्रकारे केलीय, की पाऊस पडत असल्याचा भास होतो. त्या कोरड्या प्रदेशात मनाला दिसाला देण्यासाठी ते उपयुक्त ठरतं. पुण्यातल्या शनिवारवाड्यातलं हजारी कारंजं हेही त्याचंच उदाहरण. हजारी कारंजं किंवा इतरही काही कारंजी उडविण्यासाठी तिथं विशिष्ट व्यवस्था करण्यात आली होती. तिथं एक खास रहाटाची विहीर होती. रहाटाद्वारे पाणी वर चढवलं जायचं. मग हे उंचीवरचं पाणी वापरून कारंजी उडविण्यात यायची. हा सारा आटापिटा होता मनोरंजनासाठी!

अनेक राजवाडे, महालांमध्ये किंवा किल्ल्यांवरही राजघराण्यातल्या स्त्रियांसाठी स्नानाची स्वतंत्र व भव्य व्यवस्था असायची. तिथं त्यांचे स्नान साग्रसंगीत असायचं. ती नुसती अंघोळ नसायची ते ʅपाण्याचा आस्वाद घेणंʆ असायचं. याशिवाय मोघल काळात भारतात ठिकठिकाणी महालांमध्ये पाणी पुरवलेलं किंवा त्याची मनोरंजनासाठी व्यवस्था केल्याचं पाहायला मिळतं. मध्य आशियातून आलेल्या मोघलांना पाण्याचं अप्रूप असणं सहाजिक होतं. आग्र्याच्या ताजमहालासमोरच्या जागेवर खेळवलेलं यमुनेचं पाणी, दिल्लीच्या लाल किल्ल्यात फिरवलेलं पाणी यामूधन हे दिसतं. लाल किल्ल्यात तर सर्वत्र नेलेलं पाणी केवळ सुखावतं. आदिलशाही राजवटीत बांधला गेलेला उस्मानाबाद जिल्ह्यातील नळदूर्ग हा किल्ला तर याचा अफलातून नमुना! नदीचा प्रवाह किल्ल्यात वळवून संरक्षणासाठी व गरजा भागविण्यासाठी पाण्याचा वापर केलाच आहे. त्याचबरोबर या पाण्यामुळं मन प्रसन्न होतं. कारण पाणी अडविण्यासाठी असलेल्या बंधाऱ्याच्या भिंतीतच एक महाल काढलाय. त्यात पाणी फिरवून कारंजी उडवली आहेत आणि आपण महालाच्या गवाक्षांमध्ये उभे राहतो, तेव्हा वरून पाणी पडत असल्याचं कमानीतून दिसतं. हे पाणी व समोरचा जलाशय निश्चितच मन प्रसन्न करतो!

भारतात अशी कारंजी व पाण्याची व्यवस्था होत असतानाच जगात इतरत्रही अशा कारंजांची परंपरा होती. इराणमधली तत्कानीन उद्यानं व इटलीतल्या विविध बागांमध्येही सोळाव्या शतकात मनाला सुखावणारी अनेक कारंजी होतीच. ही कारंजी कधी एकटी उडायची, कधी एकमेकांच्या संगतीत नृत्य करायची, कधी एखादा पडदा म्हणून भिंतीवरून खाली उतरायची!

कारंज्यांप्रमाणंच नौकानयनाचा आस्वादही पूर्वापार लुटला जातोय. युध्द, व्यापार आदी गरजांसाठी नौकांवर स्वार होणं होतंच पण विहार करण्यासाठी व मनोरंजनासाठी नौका वापरण्यात आल्याचे उल्लेख ठिकठिकाणी आढळतात. काश्मीरमधल्या दल तलावापासून केरळमधल्या बॅक वॉटरपर्यंत असलेल्या हाऊसबोट हीच परंपरा सांगतात. केरळमध्ये आजही जोषात खेळल्या जाणाऱ्या नौकानयनाच्या परंपरागत स्पर्धा हाही त्याचाच एक भाग म्हणता येईल. इतरही अनेक राज्यांमध्ये अशा स्पर्धा पाहायला मिळतात.

भारताच्या बऱ्याचशा भागात साजरी केली जाणारी रंगपंचमी किंवा होली हीसुध्दा पाण्याद्वारे मनोरंजनाचीच उदाहरणं. उन्हाळ्याच्या तोंडावर पाण्यानं खेळला जाणारा हा सण म्हणजे तरी दुसरं काय असतं ? सतराव्या-अठराव्या शतकात मोघल आणि मराठा शैलीच्या चित्रांमध्ये तर रंगपंचमी जागोजागी पाहायला मिळते. पेशव्यांची रंगपंचमी साजरी करण्याची वर्णनं कागदपत्रांमध्ये पाहायला मिळतात. स्वत: पेशवे हत्तीवर बसून त्यात सहभागी होत असल्यानं पाणी, रंग, पिचकारीचा हा खेळ त्या काळी भरपूर रंगायचा.....

गुजरात, राजस्थानसह अनेक ठिकाणी बहुमजली विहीर पाहायला मिळतात. तिथं विविध मजल्यांवर महाल आहेत. तिथं उन्हाळ्याच्या कडाक्यात राजघराण्याची राहण्याची व्यवस्था असायची. इथलं पाणीसुध्दा मन रिझविण्यासाठी उपयोगी पडायचं.

जुन्या काळापासून चालत आलेली ही परंपरा आधुनिक काळातही कायम आहे. वॉटर स्पोर्टस्, वॉटर पार्कस् मध्ये विविध खेळ खेलले जातात ते मनोरंजनासाठीच. सर्फिंगच्या माध्यमातून लाटांवर आरूढ होणं, कयाकिंगद्वारे होड्या वल्हवणं किंवा वॉटर पोलोसारखा खेळ खेळणं हेही यासाठीच! आधुनिक पध्दतीचे वॉटर पार्कही अलीकडच्या काळातच म्हणजे साधारणत: 1950 च्या आसपास वाढले. आता तर त्यांनी सर्वच भागात जम बसवलाय.

श्रीमंतांच्या मनोरंजनासाठी हे खेळ असले तरी गरीबही मागं नाहीत. आम्हाला नदीत, कालव्यात, तळ्यात आणि विहीरीत भुश्श्या व सूर मारण्याची सोय असताना कशाला हवीत ही पार्कस् ? खरं तर साधं डुंबणं आणि पोहणं हाही आनंद मिळविण्याचा प्रकार. इतकंच कशाला? साधं अंघोळ करण्यातूनही मनोरंजन व मन रिझवणं शक्य आहे. विशेष म्हणजे, ते नित्य केलं जातं. त्यासाठीच तर शॉवर बाथ, टब बाथ, स्टीम बाथ, स्पंज बाथ असे पर्याय असतात. पाण्याचे काय काय उपयोग असू शकतात हे या उदाहरणांमधून पाहायला मिळतं आणि सोबत आपलं मनोरंजनही होतं!

अभिजीत घोरपडे, मुंबई