एक बादली गरम पाण्यासाठी

Submitted by Hindi on Tue, 12/01/2015 - 12:58
Source
जल संवाद

एका होस्टेलमध्ये मुक्कामी होतो. उठल्यावर गरम पाण्याचा नळ सुरू केला. बादली भरली तरी गरम पाणी येईना. मग तिथल्या कर्मचाऱ्याला बोलावले. त्याने मोठ्या प्रेशरने नळ सोडला. जवळजवळ सात - आठ बादल्या पाणी वाहून गेले... मग तो पाण्याच्या धारेखाली हात धरून बोलला, 'साहेब, आलं बरं का गरम पाणी !' मी कपाळावर हात मारला. म्हटलं, 'कुठून याला सांगितलं. हा तर रोगापेक्षा इलाज भयंकर....'

एका होस्टेलमध्ये मुक्कामी होतो. उठल्यावर गरम पाण्याचा नळ सुरू केला. बादली भरली तरी गरम पाणी येईना. मग तिथल्या कर्मचाऱ्याला बोलावले. त्याने मोठ्या प्रेशरने नळ सोडला. जवळजवळ सात - आठ बादल्या पाणी वाहून गेले... मग तो पाण्याच्या धारेखाली हात धरून बोलला, 'साहेब, आलं बरं का गरम पाणी !' मी कपाळावर हात मारला. म्हटलं, 'कुठून याला सांगितलं. हा तर रोगापेक्षा इलाज भयंकर....'

गरम पाण्याच्या एका बादलीसाठी इतकं पाणी वाया जातं. सर्वच ठिकाणचा हा अनुभव... माझा... तसाच इतरांचाही असेल. काय करता येईल का यावर ?

'गरम पाणी मिळणार नाही वाटतं इथं ?' मी मनाशी पुटपुटलो. पाठोपाठ इंटनकॉमवर फोन लावला.

पलीकडून त्या होस्टेलचा कर्मचारी बोलला , 'साहेब, जरा वेळ नळ सुरू ठेवा. सुरूवातीचे पाणी वाहून गेलं की आपोआप गरम पाणी येईल...' त्याने मलाच अक्कल शिकवली. जानेवारी महिना होता. चांगलाच गारठा होता. वेळही भल्या सकाळची... त्या कर्मचाऱ्याची आज्ञा पाळून नळ सोडला, बादली गार पाण्याने भरली, तरी गरम पाण्याचा पत्ता नव्हता. पाणी वाहू देण्याचे मन होईना. मग त्या कर्मचाऱ्यालाच बोलावून घेतले.

तो झपाझप आला. लग्गेच प्रश्न सोडवतो. अशा अविर्भावात माझ्याकडे पाहिलं आणि बाथरूममध्ये गेला. त्याने मोठ्या प्रेशरने नळ सोडला. जवळजवळ आठ - दहा मिनिटं नळ वाहत होता. माझ्या डोक्यात वाहणाऱ्या पाण्याचा हिशेब सुरू झाला. साधारण सात - आठ बादल्या पाणी वाहून गेलं असावं...

'आलं बरं का गरम पाणी !' त्या कर्मचाऱ्याच्या बोलण्याने माझी तंद्री भंगली. वाहत्या नळाच्या धारेखाली हात धरून त्याने गरम पाणी आल्याचे पुन्हा एकदा सांगितले. मी कपाळावर हात मारला. मनात म्हटलं, 'कुठून याला सांगितले. हा तर रोगापेक्षा इलाज भयंकर.'

जानेवारी महिन्यात खांदेशात व्याख्यानासाठी गेलो होतो. त्या वेळी तिथल्या एका प्रसिध्द गेस्ट हाऊसवर उतरलो होतो. तिथली ही गोष्ट. तिथं पाण्याचा विचार केला जातो. तरीसुध्दा ही अवस्था, मग इतर ठिकाणची काय गत ? त्याच दिवशी कार्यक्रमानिमित्त जळगाव जिल्ह्यात भुसावळला जावे लागलं. तिथं एका हॉटेलात उतरलो. गावाच्या मानानं मध्यम आकाराचं हॉटंल. तिथंसुध्दा असंच उत्तर.... 'दोन बादल्या गार पाणी वाहून जावू द्या. आपोआप गरम पाणी येईल...' गरम पाण्याच्या एका बादलीसाठी इतकं पाणी वाया घालवावं लागतं.

हे असं सगळीकडंच चाललं आहे. हे होस्टेल की ते हॉटेल किंवा हे गाव की ते शहर... .एवढाच तपशिलाचा फरक, बाकी पाणी वाहू देणं हा सगळीकडचा सारखाच प्रश्न ! लहान गाव - नगर तर आलीच, मुंबई - दिल्लीसारख्या महानगरातही हेच चालतं. पाण्याची किंमत कुठंच केली जात नाही. एकदा हरियाणातील मानेसर या ठिकाणी एका कार्यशाळेसाठी गेलो होतो. हेरिटेज, वगैरे नावाचं उत्तम रीसॉर्ट होतं. तिथल्या कर्मचाऱ्यानं तर गरम पाण्यासाठी इतकं पाणी वाहू दिलं की त्यात एखाद्याची महिन्याभर आंघोळ झाली असती. तेवढं करूनही पाणी आलंच नाही, शेवटी बादलीतूनच गरम पाणी आणून दिलं.

माझी नेहमीची तक्रार असते - गरम पाणी हवं, तर ते लगेच का येत नाही. त्याच्यासाठी दोन - तीन बादल्या तरी पाणी का वाहू द्यावं लागतं ?... त्याचं अजून तरी समाधानकारक उत्तर मिळालेलं नाही. काही जण त्याचा दोष पाणी गरम करण्याच्या मध्यवर्ती व्यवस्थेला देतात. हॉटेलमधील मध्यवर्ती ठिकाणावरून गरम पाणी इतरत्र पोहोचतं. त्यामुळे सुरूवातीला बरंचसं गार पाणी सोडून द्यावं लागतं. हीच व्यवस्था प्रत्येक खोलीत असेल तर कदाचित असं होणार नाही. फारसं पाणी वाया जाणार नाही. मध्यवर्ती यंत्रणेतही पाणी वाहून नेणाऱ्या पाईपला चांगल्या दर्जाचं उष्णतारोधक आवरण (इन्सुलेशन) असले तरीही पाणी वाचू शकेल. अर्थातच हॉटेल व्यावसायिक खर्च आणि सोय पाहूनच याबाबत निर्णय घेत असतील. त्यात या वाहून जाणाऱ्या पाण्याचं मोल दुय्यम ठरत असावं. खरं काय ते त्यांनाच ठाऊक.

लहान - मोठी काळजी घेतली तरी बरंचसं पाणी वाचवणं शक्य होतं. अनेक ठिकाणं अशी आहेत, तिथं गरम पाण्याचा नळ कुठला आणि गार पाण्याचा कुठला ? हे समजतच नाही. एकतर त्यावर तशी स्पष्ट खूण नसते, ती निघून गेलेली असते किंवा समजण्याजोगी नसते. काही ठिकाणी अशी खूण असते, पण चुकवलेली ! त्यामुळे काही समाजायच्या आत चार - सहा बादल्या पाणी वाया जातं. हे हॉटेलच्या प्रत्येक खोलीचं आणि तेसुध्दा रोजचं. वाहून जाणाऱ्या पाण्याचा नेेमका आकडा सांगता येणार नाही, पण हिशेब केला तर तो मोठा असणार हे निश्चित !

आता तर हे हॉटेलपुरतं राहिलेलं नाही, मोठ्या सोसायट्यांमध्येही सकाळी गरम पाणी येण्यासाठी आधी काही बादल्या पाणी सोडून दिलं जातं. हे तर आणखीच गंभीर... कारण हे पाणी वापरणाऱ्यांची संख्या जास्त. शिवाय घरगुती वापराच्या पाण्याला फारसे पैसे मोजावे लागत नाहीत. त्यामुळे वाहून जाणाऱ्या पाण्याकडं लक्ष दिलं जातंच असं नाही.

बरं, हे सोडावं लागणारं पाणी तसंच वाहून द्यायचं का ? घडीभर असं गृहित धरू की सुरूवातीचं काही पाणी सोडावं लागेल... पण मग हे पाणी कुठंतरी साठवण्याची व्यवस्था करा की. यात बरंच काही करणं शक्य आहे. फक्त तसं करायची इच्छा हवी. अगदी साधा उपाय म्हणजे बाथरूममध्ये एका पाईप द्या. सुरूवातीचं गार पाणी येईपर्यंत तो नळाला जोडायला सांगा. ते पाणी पाईपद्वारे एकत्रित जमा करण्याची व्यवस्था ठेवा. ते पाणी तसंच्या तसं पुन्हा वापरता येईल... आणखीही काही मार्ग काढता येईल का ? आपण विज्ञान, तंत्रज्ञानातल्या प्रगतीच्या गोष्टी सांगतो. मग तंत्रज्ञान वापरून इथं काही उपाय केला जाईल का ?

बऱ्याचदा होतं असं, बहुतांश जणांची पाणी वाचवण्याची इच्छा असते, पण पर्यायच उपलब्ध नसतो. वाईट वाटतंच. मोठ्या प्रमाणावर पाणीही वाया जातं. या सर्व समस्यांची उत्तरं आहेत. नक्की आहेत. फक्त ती शोधण्याची प्रामाणिक इच्छा असायला हवी... खरं तर यावर वैयक्तिक शिस्त गरजेची आहे. ती नसेल तर शेवटी नियमन करण्याची वेळ येईल. ते करावंच लागेल... कारण पाण्याला मोल आहे, दिवसेंदिवस ते वाढतच जाणार आहे !

श्री. अभिजीत घोरपडे, पुणे - मो : 9822840436