Source
जलसंवाद, सप्टेंबर 2017
जबर इच्छा शक्ती, पक्का निर्धार व प्रामाणिक प्रयत्न एकत्र आले तर जगात काहीही घडू शकते ही गोष्ट बारीपाडा (जिल्हा धुळे) प्रयोगावरुन सिद्ध झाली आहे. बरीच गावे, सरकार पुढे येईल, आपल्यासाठी काही करेल, त्याद्वारे आपली प्रगती होईल याची वाट पाहात असतात. चैतराम पवार या तरुणाच्या मार्गदर्शनाखाली बारीपाड्याचा जो विकास झाला त्यावरुन सरकारविनाही गावाचा विकास होवू शकतो हे जगाला दिसून आले आहे. चैतरामनी जे मॉडेल तयार केले आहे त्याची प्रतिकृती (replication) भारतातच नव्हे तर परदेशातही व्हायला सुरवात झाली आहे. बरीच गावे राजकीय पक्ष व सरकार आपल्यासाठी काही करतील अशी अपेक्षा बाळगतात पण या ठिकाणी तर उलटेच घडले. गावात जे काही घडले त्यावरुन सरकारला बरेच काही शिकायला मिळाले.
१९९० साली बारीपाडा हे गाव इतर गावांसरखेच एक गाव होते. अन्नधान्याची कमतरता, पाण्याचा दुष्काळ, जंगलाची बेसुमार कटाई आणि दुष्काजन्य परिस्थिती या गोष्टी इतर गावंप्रमाणे याही गावात होत्या. पण आज मात्र दररोज १०-१५ गावातील तरुण इथे झालेले काम पाहण्यासाठी गावाला भेट देत असतात. एवढेच नव्हे तर जर्मनीमधील एका विद्यापीठात काम करणारा प्राध्यापक या गावाचे मॉडेल अभ्यासण्यासाठी गावात मुक्कामाला येवून राहिला आहे.
चैतराम पवार हा बारीपाडा गावचा निवासी. एम.कॉम. पर्यंत शिकलेला. पदवी प्राप्त केल्यावर इतर तरुणांसारखाच नोकरीनिमित्त शहराकडे जाण्याच्या तयारीत असतांना तो श्री. आनंद पाठक या वनवासी कल्याण आश्रम या संस्थेच्या कार्यकर्त्याच्या संपर्कात आला व त्यांने शहराकडे जाण्याचा निर्णय रद्द केला व आपल्याच गावात राहून गावाचा विकास करण्याचे व्रत स्विकारले. आणि हे काम करत असतांना आपल्या गावाचे नाव जगाच्या नकाशात नेऊन पोहोचवले. असे काय केले त्याने?
१९९३ साली गावात त्याने कुर्हाड बंदी आणली. झाडे तोडण्यास बंदी घातली गेली. जो कोणी झाड तोडेल त्याला शिक्षा आणि जो कोणी झाड जगवेल त्याला पुरस्कार ही प्रथा त्यांने गावात रुजवली. ४५० एकरात वनविकासाची कामे हाती घेण्यात आलीत. तीन वर्षात त्या ठिकाणी आज दाट जंगल उभे राहिले आहे. या कामासाठी वनखात्याकडून गावाला १ लाख रुपयांचा पुरस्कारही देण्यात आला. वनस्पती लागवडीत विविधता यावी, पारंपारिक झाडांना प्राधान्य द्यावे यासाठी सध्या या गावात प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी १०० चौरस किलोमीटरचा भाग निवडण्यात आला आहे व त्यात विविध प्रकारची झाडे लावण्याचे काम चालू आहे. गाय हा विकासाचा केंद्रबिंदू स्विकारण्यात आला. शेणखताचा वापर करुन कोणतेही हायब्रीड बियाणे न वापरता उत्पादन वाढू शकते हा विश्वास त्याने गावकर्यांत निर्णाण केला. हाय ब्रीड बियाणांचा पुरस्कार करणार्या तंत्रज्ञांना विचार करायला लावणारा हा प्रयोग ठरला.
गावाच्या व विशेषतः शेतीच्या विकासासाठी पाणी हा एक आवश्यक घटक आहे याची जाणीव ठेवून जलसंवर्धनाचे प्रयत्न तर वाखाणण्यासारखे झाले आहेत. गावातील नाल्यांवर ४८० चेकडॅम बांधण्यात आल्यामुळे पाणी अडले व त्याद्वारे गाव जलसमृद्ध झाले. त्यामुळे पाण्याचा साठा तर वाढलाच पण त्याचबरोबर जमिनीची धूपही मोठ्या प्रमाणावर थांबली. गावात ५ किलोमीटर लांबीचे एक मीटर खोलीचे चर श्रमदानातून खोदण्यात आले. त्याचाही जलसंधारणावर अनुकूल असा परिणाम झाला. जे गाव पाच वर्षांपूर्वी ३-४ किलोमीटरवरुन पाणी आणत होते तेच गाव आता जवळपासच्या पाच गावांना पाणी पुरवायला लागले आहे.
गावाच्या विकासात महिलांना महत्वाचे स्थान असावे हा विचार डोळ्यासमोर ठेवून गावात महिला बचत गटांची स्थापना करण्यात आली. शेतमालाच्या विक्रीमध्येही सुधारणा करण्यात आली. निव्वळ तांदूळ विक्री करण्यासाठी पाच महिला बचत गटांनी पुढाकार घेतला आहे.
इतर गावांप्रमाणे याही गावात दारु गाळणे हा व्यवसाय जोरात चालू होता. या व्यवसायातून लोकांना दुसर्या व्यवसायाकडे वळविणे आवश्यक होते. त्यासाठी जमलेल्या पाण्यात मासेमारीचा व्यवसाय सुरु करण्यात आला. दारु गाळणारे गावकरी आता मासेमारी करण्यात गुंतलेले दिसतात.