Source
जल संवाद
श्री. अनुपमजी हे पर्यावरण क्षेत्रातील सरळ स्वभावाचे कार्यकर्ते आहेत. आपण बरं आणि आपल्यावर सोपवलेलं काम बरं अशी त्यांची स्वच्छ भूमिका असते. परंतु जे काम करायचं ते पूर्णत्वाला नेण्याची, त्यासाठी कष्ट सोसायची त्यांची तयारी असते. कोणत्याही प्रसिध्दीसाठी काही स्वत:हून करणं त्यांना अजिबात मान्य नाही. अगदी निगर्वी, विनयशील. त्यांना आपल्या संस्कृतीचा सार्थ अभिमान असला तरी चुकीच्या रीती किंवा पायंड्यांविषयी परखड शब्दांत ते बोलतात पण तिथेही काटेदार बोचरेपणा टाळण्याचाच त्यांचा प्रयत्न असतो.
आज भी खरे हैं तालाब हे सत्य अभिमानाने ठासून सांगणारा, एक सौम्य प्रकृतीचा साधा - सरळ आपल्या पध्दतीने पर्यावरणाची सेवा करणारा गांधी शांति प्रतिष्ठान चा सेवाधर्मी म्हणजे या पुस्तकाचे लेखक श्री. अनुपम मिश्र. प्रतिष्ठानचे काम करता करता भारतभरच्या तलावांचा सर्व अंगांनी अभ्यास करायचे ठरवून ८ -१० वर्षांच्या अभ्यासानंतर त्यांनी हे अप्रतिम पुसत्क लिहिले आहे.या पुस्तकाचा वेगळेपणा प्रारंभापासूनच लक्षात येतो. पुस्तकाचं नांव आहे, सीताबावडीचं रेखाचित्र आहे, पण लेखकाचं नांव नाही, ते आतल्या पानावर बाकीच्या गोष्टीबरोबरच बारीक अक्षरात छापलेलं, आणि एक तशीच छोटी तळटीप.
‘इस पुस्तककी सामग्रीका किसी भी रूपमें उपयोग किया जा सकता है। स्त्रोतका उल्लेख करें, तो, अच्छा लगेगा।’
आणि..... मग सुरू होतो एक असा शब्दप्रवाह जो आहे साधा सरळ परंतु आत्मीय भावनेने भारलेला ! तो फक्त तलावांची रूक्ष माहिती देत नाही, तर तो आहे त्या भारतीय समाजमनाचा असा आरसा, ज्यामध्ये पाणी, तलाव, त्यांची निर्मिती करणारे, रक्षण करणारे, त्यांचे कोडकौतुक करणारे, त्यांचा मान - मरातब जपणारे, त्यांच्या विषयी ममत्व बाळगणारे सर्व कारागीर आणि गांवकरी यांचं उत्कट मनोज्ञ प्रतिबिंब. समृध्द वारशाची, समृध्द कहाणी, प्रत्येक वाक्यात काहीतरी सांगू पहाणारी, लेखकाची तळमळ वाचकांच्या मनाला भिडतेच मुळी !
पुस्तक वाचता - वाचता भारावलेला वाचक मनाशी ठरवून टाकतो - आपण काहीतरी करायलाच हवं आता.
आणि सिलसिला चालू होतो, कुठे भाषांतराचा तर कुठे पुस्तकाच्या झेरॉक्स प्रती काढून इतरांना देण्याचा आणि आग्रही सांगणं- तुम्ही हे वाचलंच पाहिजे, खरंच !
कॉपीराईटचा प्रश्न तर लेखकाने आधीच निकाली काढला आहे. तर या पुस्तकाच्या वेगवेगळ्या राज्यांमधले भाषांमधले, भाषांतरे आणि प्रती काढण्याचे किस्सेही तसेच उल्लेखनीय आहेत. व्यक्तिगत मागणीवरूनच ह्या पुस्तकाच्या प्रती जास्त वितरित झाल्या आहेत.
प्रतिष्ठानने, १९९३, ९४, ९८ मध्ये एकूण १०,००० प्रति छापून आणल्या. मध्येप्रदेश जनसंपर्क विभाग - २५००० प्रति छापून त्यांचे नि:शुल्क वितरण, अहमदाबाद - उत्थान माहिती संस्थेने झेरॉक्स प्रती काढून वाटल्या. अनेक प्रकारे, पूर्ण रूपात, संक्षित्प स्वरूपात, बाल - साहित्य स्वरूपामध्ये, खाजगी वितरण रूपामध्ये, आजवर ह्या पुस्तकाने दोन लाखांचा आकडा सहज पार केला आहे.
देशातील अनेक आकाशवाणी केंद्रांवरून ह्या पुस्तकाचे, त्यातील सामग्रीचे अभिवाचनाचे कार्यत्कम झालेले आहेत. काही ठिकाणी तर खास श्रोत्यांच्या आग्रहावरून त्या कार्यक्रमांचे पुन:प्रक्षेपण ही केले गेले.
आजवर सुमारे दोनशेपेक्षा अधिक दैनिकांमधून या पुस्तकाची दखल घेतली आहे. अजूनही नव्या भाषांतरांच्या नव्या आवृत्तीला कुठे ना कुठे पुस्तक - परिक्षणाचा मान मिळतोच आहे. महत्वाच्या दैनिकातील काही शीर्षकेच पहावीत.
इंडिया टुडे - (३.७.२००६) जल संधारणाचा क्रांतीकारी कन्सेप्ट. Prime Page Turners - Swagata Sen flips the pages of the 30 books that remain Unputdownable- ह्या तालाब पुस्ताकाच ह्या ३० पुस्तकांच्यामध्ये समावेश आहे.
हिंदुस्थान - एक किताबसे सामाजिक क्रांति - आणखी एक शीर्षक (संदर्भ उपलब्ध नाही) किताब पढकर कर्तव्य सूझा ।
- Little Drop - (Bharat too) For centuries, they served as the lifehood of rural India, And still do. Avjit Ghosh revisits a book that records the unknown history of ponds ( छपाईचा मूलस्त्रोत ज्ञात नाही.)
आजवर सुमारे ४० भाषांमध्ये ह्या पुस्तकाचे अनुवाद झाले आहेत, आणि विशेष म्हणजे त्यातील बहुतेक हे एका - एका व्यक्तीने पुस्तक आवडलं ह्या कारणासाठी, त्याचा आनंद इतरांनाही मिळावा ह्या केवळ सद्भावनेपोटी, हे अनुवाद केलेले आहेत. काहींचा उल्लेख करणे खूप आवश्यक वाटते.
श्री. सुरेंद्र बंसल - जनसत्ता दैनिकातून रिव्ह्यु वाचून अनुपमजींकडून पुस्तक मागवून अनुवाद केला. आपलं आवडतं कॅक्टस चं कलेक्शन विकून त्या पैशातून प्रती काढून ते सर्वांना वाटतात. ह्या पुस्तकाने माझं पूर्ण आयुष्यच बदलून टाकलंय. हे त्यांचे शब्द आहेत.
निरूपमा अधिकारी - बंगालच्या फ्रिलान्स पत्रकार - २००२ च्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर काम करीत असतांना त्यांना कुणीतरी हे पुस्तक दिलं. अतिशय आवडल्यामुळे त्यांनी लगेच त्याचा बंगाली भाषेत अनुवाद केला आण पुस्तकरूपाने वितरित केला.
दिनेशभाई संघवी - कच्छ भूजमधल्या प्रलयंकारी भूकंपाची पार्श्वभूमी यांच्या अनुवादाला आहे. ते काम करीत होते त्या संस्थेची संपूर्ण ऑफीस इमारत नष्ट झाली होती. अनुपमजींची अनुमती मागता ते म्हणाले की भूकंपाच्या हानीतून आधी पुनर्वसनाचे काम हाती घ्या. अनुवादाच्या कामाला आत्ता कां हात घालता. ते नंतरही होईल. दिनेशभाईंचे उत्तर होतं - नवनिर्माण करायचं ते पाण्याशिवाय तर शक्य नाही ना ? हा अनुवाद आत्ताच माझ्या सगळ्या लोकांमध्ये पोहोचणं गरजेचं आहे - जन्मभूमी प्रवासी ह्या दैनिकामधून तालाब चा गुजराथी अनुवाद संपूर्ण छापून आणला गेला. मागाहून पुस्तक झालं.
अॅनीमोंतो - ह्या विदूषीने तालाब आणि राजस्थानकी रजत बूंदे या दोन पुस्तकांना जोडून त्यांचा फ्रेंच भाषेत अनुवाद केला. नंतर त्याचा इंग्रजी अनुवादही प्रसिध्द झाला.
ब्रेल लिपीमध्येही तालाब पुस्तक छापले गेले आहे. आणि दृष्टीहिनांनाही त्याला अगदी डोळसपणे प्रतिसाद दिला आहे.
श्री. प्रदीप भलगे - मराठीमध्ये तालाब चे भाषांतरीत रूप आणण्याचे कार्य श्री. प्रदीप भलगे (औरंगाबाद) यांनी जलयोगी श्री. माधवराव चितळे यांच्या प्रेरणेने केले. त्यांनी पुस्तकाचे नाव दिले आहे ते ‘तलावांची भारतीय परंपरा ’ अगदी अन्वर्थक आहे ते. हे खरेच आहे की, प्रत्येक ठिकाणी तलावांशी असलेली तिथल्या लोकमानसाची भावनिक गुंतवणूक आणि त्यातूनच होत असलेली तलावांची जपणूक हे भारतीयत्व आहे आणि हे समजल्याशिवाय या परंपरेची लांबी - रूंदी समजेल पण गहराई खोली समजणं अवघड आहे. अनुपमजींसारखी शंभर टक्के भारतीयत्व मनापासून जपणारी व्यक्तीच तालाब सारखे पुस्तक लिहू शकते.श्री. अनिल यादव - मध्यप्रदेशातील या पत्रकाराने तालाब पुस्तकातून प्रेरणा घेवून केवळ मध्यप्रदेशातील जल-संचय-प्रणाली या विषयावर पुस्तक लिहिले.
मी हे खात्रीपूर्वक म्हणू शकते की या पुस्तकाचे अजूनही , आजही कुठे नवीन संस्कारण होत असेल. या पुस्तकाला कॉपी राईट प्रकार नसल्यामुळे काही ठिकाणी काही अंशी थोडे गैरप्रकार घडले आहेत त्यांची इथे चर्चा नकोच. आणि अनुपमजींना त्यांची पूर्ण कल्पना आहे. त्यांची अपेक्षा फक्त एवढीच आहे की पुस्तकाचे मूळ शुध्द स्वरूप अगदीच बिघडवले जावू नये.
अनुपमजींची उदार - मानसिकता अशी की किती अनुवाद झाले, किती प्रती निघाल्या ह्या व्यावहारिक गोष्टींच्या पलीकडे जावून त्यांना फार मोठा आनंद या गोष्टीचा आहे की त्यांच्या पुस्तकाने इतक्या जणांना प्रेरणा दिली की त्यांतून सुमारे ३० -३५ हजार तलाव आणि जलसाठे यांच्याकडे लोकांचे लक्ष गेले आणि त्यांची डागडूजी, सफाई होवून पुनरूज्जीवन झाले. शिवाय व्यक्तिगत पातळीवर अनुपमजींचे अनेकानेक वाचकांशी मित्रत्वाचे सख्यत्वाचे संबंध निर्माण झाले. अशा प्रेमाला प्रतिसाद देण्यात आणि त्या संबंधीची जपणूक करण्यात अनुपमजी स्वत:ला भाग्यवान समजतात.
श्री. अनुपमजी हे पर्यावरण क्षेत्रातील सरळ स्वभावाचे कार्यकर्ते आहेत. आपण बरं आणि आपल्यावर सोपवलेलं काम बरं अशी त्यांची स्वच्छ भूमिका असते. परंतु जे काम करायचं ते पूर्णत्वाला नेण्याची, त्यासाठी कष्ट सोसायची त्यांची तयारी असते. कोणत्याही प्रसिध्दीसाठी काही स्वत:हून करणं त्यांना अजिबात मान्य नाही. अगदी निगर्वी, विनयशील. त्यांना आपल्या संस्कृतीचा सार्थ अभिमान असला तरी चुकीच्या रीती किंवा पायंड्यांविषयी परखड शब्दांत ते बोलतात पण तिथेही काटेदार बोचरेपणा टाळण्याचाच त्यांचा प्रयत्न असतो.
त्यांच्या ‘रजतबुंदे’ व ‘तालाब’ या पुस्तकांचं एवढं भरभरून स्वागत होईल आणि लोक खरोखरच त्यातून कार्यप्रवण होतील अशी त्यांची अपेक्षा नव्हती. पण त्यातून सुरू झालेल्या लोक - चळवळीमुळे ते अत्यंत समाधानी आहेत, वाचकांशी त्यांचं सौहार्द जुळलेलं आहे. आज घडीला कॅन्सर सारख्या आजाराला तोंड देत असतांना सुध्दा त्यांना आलेल्या वाच- पत्रांना ते उत्तरे देण्याचा कसोशीने प्रयत्न करतात. पाण्याच्या कामांविषयी त्यांना खरोखरची तळमळ आहे. पण आपल्या देशांतर्गत पाण्याच्या कामांकरिता परदेशातून मदत मागितली जावी ही गोष्ट त्यांच्या मनाला क्लेशकारक वाटते. स्थानिक समस्यांवर स्थानिक लोकांच्या अर्थसहभागातून आणि श्रमसहभागातून शक्यतो तिथलीच साधन सामग्री वापरून समस्या सोडवण्याचा मार्ग हा स्वाभिमान वाढवणाराच ठरतो आणि त्याची यशस्विता मूलभूत स्वरूपाची असते असे त्यांचे आग्रही मत आहे.
सम्पर्क
सौ. प्रज्ञा सरखोत, डोंबिवली मो : ०७७३८२४०८३६