Source
जल संवाद
श्री अनुपम मिश्र यांच्या पुस्तकाचे स्वैर भाषांतर
भूणो तुझे बारा मास :
धरातल आणि पाताळ जोडायचे तर असतात, पण अशी सावधगिरी बाळगायची असते की धरातल पाताळांत कोसळू नये - म्हणूनच इतक्या वेगवेगळ्या प्रकारचं चिणकाम केलं जातं. ओल्या चिणकामांत सुध्दा साध्या कळीच्या चुन्याने काम भागत नाही. त्यांच्यात विटांची राख, बेलाची फळं, गूळ आणि सन चे बारके कुरतडलेले तुकडे मिसळले जातात.
खोल विहिरीच्या कठड्यावर लावलेली लाकडाची 'घिरर्' (चक्री) म्हणजे 'भूण' बारा महिने फिरत असते, पाताळांतले पाणी वर आणत असते. 'घिरर्' ला म्हणजे 'भूण' ला मरूभूमीत बाराही महिने काम करण्याची संधी असते.... आणि देवराज इंद्राला ? त्याला फक्त घडीभर - म्हणून 'भूणा तुझे बारा मास, इंद्रा तुझी एक घडी'. ही म्हण इंद्राला मान देण्यासाठी आहे, की भूणच्या मोठेपणाची दर्शक - नक्की सांगता येत नाही. एक अर्थ असा निघू शकतो, की इंद्रराज एका घडीभरांत, एका वेळीच, इतका पाऊस पाडून जातो... की जितकं बिचारा भूण बाराही महिने फिरफिरून देवू शकतो... तर दुसरा संकेत असाही निघतो, की मरूभूमीत देवराज इंद्रासाठी, बस् , फक्त एक घडी लिहिली आहे, तर भूण मात्र बाराही महिने चालत असतो. दोघांपैकी कोणातरी एकाला कमीपणा आणण्याऐवजी इथे इंद्र आणि भूण म्हणजे 'पालरपाणी' आणि 'पाताळपाणी' यांच्या शाश्वत संबंधावरच भर दिलाय. घडीभर बरसलेलं पालरपाणी हळूहळू झिरपत झिरपत पाताळपाण्याचं रूप घेतं. दोन्ही रूप सजीव आणि प्रवाही आहेत. जमिनीवरून वाहणारं पालरपाणी दृष्टीला दिसतं, तर पाताळपाणी दिसत नाही.ह्या दिसू न शकणाऱ्या पाण्याला, भूजलाला पाहण्यासाठी एक खास नजर हवी. भूपृष्ठाखाली, कुठेतरी खोलवर वाहणाऱ्या पाण्याचं एक संबोधन 'सीर' असं आहे आणि 'सिरवी' म्हणजे अशी व्यक्ती जी त्या पाण्याला 'पाहू ' शकते. पाताळपाण्याला फक्त 'पाहणारी' नजर पुरेशी मानलेली नाही आहे, तर त्याकडे पाहण्याचा समाजामध्ये एक विशिष्ट दृष्टिकोन सुध्दा आहे. ह्या दृष्टिकोनात 'पाताळपाणी' पाहणे, शोधणें, बाहेर काढणे आणि मिळवणे यांच्या बरोबरीनेच, एकदा ते मिळालं की त्याला कायमचं गमावण्याच्या भयंकर चुकीपासून वाचविण्याची - जपणूक करण्याची 'कोशिश' किंवा प्रयत्नही अंतर्भूत आहेत.
विहीर पुऱ्या देशांत बनत राहिल्या आहेत, पण राजस्थानच्या बहुतेक भागांत - विशेष करून मरूभूमीमध्ये 'विहीर' चा अर्थ म्हणजे जमिनीवरून खरोखरच 'पाताळांत उतरणं' होय. राजस्थानांत जिथे पाऊस जास्त असतो, तिथे पाताळपाणी देखील कमी खोलीवर असतं आणि जिथे पाऊस कमी असतो, तिथे त्या प्रमाणात त्याची खोली वाढत जाते.
मरूभूमीमध्ये ही खोली 100 मीटर्सपासून 130 मीटर्सपर्यंत - म्हणजेच 300 फुटांपासून ते सुमारे 400 फुटांपर्यंत असते. इथे ह्या खोलीला समाज आपल्या हातांनी, अत्यंत आत्मीयतेने मापतो. मापण्याचा मापदंड इथे 'पुरूष' किंवा 'पुरस' म्हटला जातो. एक पुरूष आपले दोन्ही हात जमिनीला समांतर पसरवून उभा राहिला, तर त्याच्या एका तळहातापासून ते दुसऱ्या तळहातापर्यंतची लांबी 'पुरूष' म्हटली जाते. ढोबळ मानाने ही लांबी 5 फुटांच्या जवळपास असते. चांगल्या खोल विहीरी 60 पुरूष (सुमारे 300 फूट) इतक्याही खोल असतात. पण म्हणतांना त्यांना '60 पुरूष खोल' असे न म्हणता प्रेमाने फक्त 'साठीभर' असं म्हटलं जातं.
इतक्या खोल विहीरी एक तर देशांत अन्य कुठेही खोदल्या जात नाहीत - तेवढी गरजही नसते, पण खोदू म्हटलं तरी सर्वसाधारणपणे ते शक्यही होणार नाही. खूप खोल विहीरी खणतांना त्यांची 'माती थोपवणं' हे एक मोठंच कठीण कर्म असतं. राजस्थानात पाण्याचं काम करणाऱ्यांनी हे कठीण काम अगदी सोपं करून टाकलं आहे ही गोष्ट वेगळी, पण हे कठीण काम सोपं करण्यासाठी त्यांनी विविध प्रकारच्या युक्त्या शोधून काढल्या.
'कीणना' म्हणजे खोदण्याची क्रिया आणि 'कीणियां' म्हणजे विहीर खोदणारे.. हे कीणियां जमिनीच्या कणाकणांशी परिचित असतात. सिध्द नजरेचे 'सीरवी' पाताळांतलं पाणी 'बघतात' आणि मग सिध्दहस्त कीणियां तिथे खोदकाम सुरू करतात. कीणियां ही काही वेगळी जमात नाही, तर कोणत्याही जातीमध्ये त्या कामांत निपुण लोक कीणियां बनतात.... पण मेघवाल, ओज आणि भिल्ल कुटुंबामध्ये कीणियां सहजी आढळतात.
जमिनीच्या आंतमध्ये वाहणाऱ्या पाण्याच्या प्रमाणावरून विहीरीचा व्यास निश्चित केला जातो. पाणी मोठ्या प्रमाणावर लागण्याची शक्यता असेल, तर व्यास मोठा ठेवतात, तेव्हा पाणी काढण्यासाठी एकच नव्हे, तर दोन किंवा चार 'चडस' सुध्दा लागू शकतात - आणि तेही खालून वर येतांना एकमेकांवर आपटणार नाहीत अश्या प्रकारे.
राजस्थानच्या त्या भागांत, जिथे भूजल फार खोलवर नाही तिथे, फुरी खोदाई झाल्यानंतर, पाणी लागल्यावर, खालून 'चिणाई ' केली जाते - ती साधारण दगड आणि विटांनी केली जाते - अश्या चिणाईला 'सीध' म्हणजे चिणाई म्हणतात.... पण जिथे भूजल खूप खोलवर असतं, तिथे जर सतत खोदत गेलं, तर माती ढासळण्याची धास्ती असते - अश्या भागांमध्ये विहीरींची चिणाई 'वरून खाली' अश्या प्रकारे केली जाते. थोडं खणलं, तितकंच बांधून काढलं, मग पुढे गेलं अशी - अश्या उलट्या बांधकामाला 'ऊँध' म्हणतात... परंतु जिथे पाणी अजूनही खोल असेल, तिथे साधारण दगडांचं बांधकाम - भले खालून वर असो, की वरून खाली - एवढी मजबुती देवू शकत नाही. अश्या ठिकाणी मग प्रत्येक दगड अक्षरश: तासला जातो. प्रत्येक तुकडा आपल्या शेजारच्या तुकड्यांत 'गुटका आणि फास' यांच्या आधारे (एकमेकांत) पक्का बसतो. 'गुटका आणि फास' हे डाव्या - उजव्या बाजूप्रमाणेच वर खाली सुध्दा असतात. ह्याला कोरडं बांधकाम म्हणजे 'सूखी चानाई' म्हणतात. अश्या प्रकारे तासलेले दगडांचे तुकडे बसवून बसवून हळूहळू बांधकामाचा एकेक घेरा पूर्ण केला जाते आणि मग खालचं खोदकाम सुरू होतं.
कुठे कुठे जास्त खोलपणाबरोबरच मातीचा गुणधर्म असा काही असतो, की हे तीनही प्रकार - सीध, ऊँध आणि सूखी चिनाई यांनीही काम चालू शकत नाही, तेव्हा पूर्ण विहीरीत थोडसं खोदकाम - की लेगच थोडंसं चिणकाम गोलाकारांत केलं जातं.... पण चांगलं खोलवर गेलं, की पूर्ण खोदकाम थांबवून 'फांक खुदाई' केली जाते... म्हणजे गोलाकाराचा फांकेसारखा एक चतुर्थांश भाग खोदून, तितक्याच भागाचं चिणकाम करून, त्या तेवढ्या भागाला मजबुती दिली जाते... मगच त्याच्या समोरचा दुसरा पाव भाग खोदतात. अश्या तऱ्हेने 4 हात खणायचं असेल, तर चार - चार हातांच्या हिश्श्यांमध्ये खणतात - चिणतात आणि खोल पाताळपाण्यापर्यंत उतरत जातात. मध्येच कधी जर दगड लागला, तर तो सुरूंग लावून फोडला जात नाही - कारण स्फोटाच्या धक्क्यामुळे वरचं चिणकाम कमजोर होवू शकतं - त्यामुळे दगड लागल्यावर त्याला हातानेच हळूहळू तोडून काढलं जातं.
धरातल आणि पाताळ जोडायचे तर असतात, पण अशी सावधगिरी बाळगायची असते की धरातल पाताळांत कोसळू नये - म्हणूनच इतक्या वेगवेगळ्या प्रकारचं चिणकाम केलं जातं. ओल्या चिणकामांत सुध्दा साध्या कळीच्या चुन्याने काम भागत नाही. त्यांच्यात विटांची राख, बेलाची फळं, गूळ आणि सन चे बारके कुरतडलेले तुकडे मिसळले जातात. कधी कधी 'घरट' मध्ये म्हणजे बैलांच्या सहाय्याने चालणाऱ्या दगडी चक्कीमध्ये बारीक केलेला हा जाडसर चुना, मग हात चक्कीवर आणखीनच बारीक दळला जातो, अश्यासाठी की इतक्या खोलवरच्या आणि वजनी कामाला टिकवून धरण्याची ताकद त्यामध्ये यावी.
आतलं सारं काम थांबलं की वर जमिनीवरचं काम सुरू होतं. इथेही विहीरीच्या वर फक्त एक 'जगत' म्हणजे भिंत (कठडा) बनवून थांबत नाही. मरूभूमीच्या विहीरींच्या 'जगती' वर, तिच्या वर आणि आजूबाजूला दुनियेभरची कामं मिळतात. त्याची अनेक कारणं आहेत. एक तर पाणी फार खोलवरून वरती आणायचं असतं. छोट्याश्या बादलीने तीनशे हात खोलवरचं पाणी काढून एवढ्या परिश्रमाचं फळ ते काय मिळणार ? म्हणून मोठा 'डोल' किंवा 'चडस' यांनी पाणी खेचलं जातं. त्याच्यामुळे 8 ते 10 बादल्या पाणी एका वेळी बाहेर येतं. ह्या एवढ्या वजनाचा डोल खेचण्यासाठी जी 'घिरर्' (चक्री) किंवा 'भूण' लागेल, तोही मजबूतच हवा. तो ज्या खांबांच्या सहाय्याने उभा राहणार, ते देखील एवढं वजन सहन करण्याच्या लायकीचे हवेत. पुन्हा इतक्या प्रमाणांत पाणी वर येईल, तर ते नीटपणे ओतता येईल असं कुंड - त्या कुंडातून वाहात येणारं पाणी साठवायला आणखी एक मोठ कुंड, की जिथून ते पाणी सहजपणे घेता येईल. ह्या साऱ्या उस्तवारीत जे थोडंफार पाणी 'जगडी' वर पडेल, ते सुध्दा गोळा करून गुराढोरांसाठी सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था हे सगळं करता करता विहीरींवर इतकं काही बनतं, की त्या विहीरी केवळ विहीरी न राहतां, कधी छोटी छोटी घरं, कधी विधालय आणि कधी तर महालांसारख्या दिसू लागतात.
पाणी पाताळांतून वर आणायचं झालं, तर कितीतरी गोष्टींची मदत हवी. ह्या विशाल योजनेंतील छोट्यांत छोटी गोष्टही महत्वपूर्ण आहे, कारण त्याशिवाय मोठ्या गोष्टीही कामाला येणार नाहीत. प्रत्येक गोष्ट कामाची आहे, म्हणूनच तिला 'नांव' ही आहे.
सर्वांत प्रथम आपण भूजलाची नावं पाहुंया. 'पाताळपाणी' हे तर एक नांव आहेच... पण मग सेवो, सेजो, सोता, वाकळपाणी, वालियो, भुंईजल सुध्दा आहेत. तसेच 'तलसीर' आणि फक्त 'सीर' सुध्दा आहे. सीर ह्या शब्दाचे 'भूजल' ह्या अर्थाखेरीज आणखी दोन अर्थ निघतात....एक अर्थ आहे 'गोड' आणि दुसरा अर्थ आहे 'कमाईचं' नित्य साधन. एका तऱ्हेने हे दोन्ही अर्थ विहीरीच्या पाण्याला लागू होतात. नित्य साधन कमाई सारखी विहीर सुध्दा नियमित पाणी देते - पण 'तेवड' म्हणजे फायदा, काटकसर किंवा उत्तम व्यवस्थेशिवाय ही 'कमाई' पुरायची सुध्दा नाही.
मग ह्या भवकूपांत, संसाररूपी विहीरीत कितीतरी प्रकारच्या विहीरी आहेत. द्रह, दहड आणि दैड, ही कच्च्या - न बांधलेल्या विहीरींची नावं. 'ब' आणि 'व' च्या फरकाने 'बेरा - वेरा', 'बेरी - वेरी' ही देखील आहेत. 'कूंडो, कूप' आणि एक नांव 'पाहूर' सुध्दा आहे. असं म्हणतात - कोण्या पाहूर वंशाने एके काळी इतक्या विहीरी बांधल्या, की तेवढ्या भागांत कितीतरी काळापर्यंत विहीरीचं एक नांव 'पाहूर' असंच पडून गेलं होतं. 'कोसीटो' किंवा 'कोईटो' म्हणजे जरा कमी खोल विहीर, तर जास्त खोल विहीरीचं 'कोहर' असं नांव आहे. पुष्कळश्या भागांत भूजल खूपच खोलवर असतं, त्यामुळे खोल विहीरींची नांवसुध्दा खूपच आहेत. असे - 'पाखातल, भंवरकुआं, भमलियो, पातालकुआं, आणि खारीकुआं',. 'वैरागर' हे रूंद अश्या विहीरीचं नाव - तर 'चौतिना' हे त्या विहीरीचं नाव, जिच्यावर चारही बाजूंनी चार 'चडस' लावून एकाच वेळी पाणी ओढलं जातं. 'चौतिना' चं एक नांव 'चौकरण' सुध्दा आहे. शिवाय, बावडी, पगबाव किंवा झालरा म्हणजे पायऱ्या पायऱ्यांच्या विहीरी - ज्यांच्यात खाली पाण्यापर्यंत सहज उतरून जाता येतं.... आणि फक्त पशूंना पाणी पाजण्यासाठी बनलेल्या विहीरींची नावं 'पीचको' किंवा 'पेजको' असतात.
खोल विहीरींमध्ये मोठे 'डोल' किंवा 'चडस' यांचा उपयोग होतो. एका साधारण हंड्यात सामान्यपणे 20 लिटर पाणी राहातं. तर 'डोल' दोन - तीन हंडे इतकं पाणी आणतो. 'चडस, कोस किंवा मोट' ही सात हंड्यांची असते. तिची आणखी नांव 'पुर' आणि 'गांजर' अशीही आहेत. ह्या सर्वांमध्ये बऱ्याच प्रमाणात पाणी भरतं - आणि म्हणूनच ह्या वजनदार कामासाठी - ते 200 -300 हात वर खेचण्यासाठी आणि पुन्हा ते पाणी ओतण्यासाठी कितीतहरी साधनं आणि तितक्याच प्रकारच्या सावधानतेची आवश्यकता असते.
सौ. प्रज्ञा सरखोत - मो : 07738240836